काणे, पांडुरंग वामन: (७ मे १८८०-१८ एप्रिल १९७२). विख्यात प्राच्यविद्यासंशोधक आणि धर्मशास्त्राचे गाढे अभ्यासक. जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात पेढे पर्शराम ह्या गावी. शिक्षण दापोली आणि मुंबई येथे, एम्.ए. एल्एल्. एम्. पर्यंत. शैक्षणिक जीवनात `भाऊ दाजी पारितोषिक’, `दक्षिणा फेलोशिप’, `झाला वेदान्त पारितोषिक’, `मंडलिक सुवर्णपदक’ (दोनदा) इ. अनेक पारितोषिके आणि सन्मान त्यांनी मिळविले. काही काळ रत्नागिरीच्या आणि मुंबईच्या सरकारी विद्यालयांत, तसेच मुंबईच्या एल्फिन्सटन आणि विल्सन महाविद्यालयांत त्यांनी अध्यापन केले. १९११ पासून मुंबईच्या वरिष्ठ न्यायालयात त्यांनी अनेक वर्षे वकीली केली. हिंदू आणि मुसलमान कायद्यांचा त्यांचा विशेष व्यासंग होता. मुंबई विद्यापीठाने आयेजित केलेल्या भाषाशास्त्रविषयक व्याख्यातमालेत (विल्सन फिलॉलॉजिकल लेक्चर्स) संस्कृत आणि तत्संबध्द भाषांवर त्यांनी सहा व्याख्याने दिली (१९१३).

महामहोपाध्याय पां. वा. काणे

पुढे महाराष्ट्राच्या प्राचीन भूगोलाच्या विशेष संशोधनासाठी त्यांनी दोन वर्षे (१९१५-१९१६) स्प्रिंगर संशोधन शिष्यवृत्ती मिळाली.१९१७-१९२३ पर्यंत मुंबईच्या गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्ये त्यांनी प्राध्यापकाचे काम केलेल. १९४७-१९४९ मध्ये ते मुंबई विद्यापीठाचे उपकुलगुरु होते. १९५९ मध्ये भारतविद्येचे राष्ट्रीय प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली. १९५३-१९५९ पर्यंत ते राज्यसभेचे सदस्य होते.

वकीलीचा व्यवसाय करीत असताना, तसेच इतर अनेक अंगीकृत जबाबदाऱ्या पार पाडीत असताना त्यांचे संशोधनकार्य सातत्याने चालू होते. हिस्टरी ऑफ धर्मशास्त्र (१९३०-१९६२) हा पंचखंडात्मक आणि साडेसहा हजारांहून अधिक पृष्ठांचा ग्रंथ हे काण्यांच्या प्रदीर्घ कार्याचे आणि व्यासंगाचे फलित होय. हिंदू धर्मशास्त्राचे त्यात व्यापक आणि अधिकारपूर्ण विवेचन आहे. हिंदू धर्माच्या पुनर्रचनेच्या मार्गदर्शक तत्वांचा वेध घेणे, हा त्यांच्या धर्मशास्त्रसंशोधनाचा एक महत्वाचा हेतू होता. साहित्य अकादेमीने ह्या  ग्रंथाच्या चौथ्या खंडास (१९५३) पारितोषिक दिले (१९५६). ह्या ग्रंथास आंतरराष्ट्रीय कीर्तीही लाभली.

हिस्टरी ऑफ संस्कृत पोएटिक्स (तिसरी सुधारित आवृ.१९६१) हा त्यांचा आणखी एक विशेष महत्वाचा ग्रंथ. त्यातील विवेचन एकूण दोन भागांत आलेले आहे.

पहिल्या भागात भारतीय साहित्यशास्त्र विषयक महत्त्वाचे ग्रंथ, त्यांचे कर्ते आणि काल इ. विषयांचा परामर्श घेतलेला असून दुसऱ्यात अलंकार शास्त्राचे विषय आणि भारतीय साहित्यशास्त्राच्या विकासाचे वेगवेगळे टप्पे दाखविलेले आहेत.

ह्याशिवाय पूर्वमीमांसा, शंखलिखिताचे धर्मसूत्र, कात्यायनस्मृति, हिंदू कायद्याचा वैदिक मूलाधार, शंकराचार्यापूर्वीचे वेदान्त भाष्यकार, विज्ञानेश्वरांचे पूर्वसूरी, कोहलाचे अवशेष, प्राचीन संस्कृत साहित्यातील पहलव आणि पारसिक, तंत्र वार्तिक व धर्मशास्त्रग्रंथ इ. विविध विषयावरील त्यांचे लेखन-संकलन प्रसिध्द झालेले आहे.

साहित्यदर्पण, कादंबरी, उत्तररामचरित, हर्षचरित, व्यवहारमयूख ह्यासारख्या ग्रंथांचे त्यांनी संपादन केले.

भारतरामायणकालीन समाजस्थिति (१९११) आणि धर्मशास्त्रविचार (१९३५) हे त्यांच्या महत्वाच्या मराठी ग्रंथांपैकी होत. कालिदासाच्या धार्मिक व तत्वज्ञानविषयाक कल्पना, कालिदासीय ज्योतिष, विदर्भ व महाराष्ट्र, कवी भास व त्याची नाटके इ. विषयांवरही त्यांनी मराठीतून स्फुट लेखन केले.

काण्यांची सामाजिक आणि धार्मिक दृष्टी पुरोगामी होती. लोणावळे येथील धर्मनिर्णयमंडळाने चालविलेल्या हिंदुधर्मसुधारणेच्या चळवळीत त्यांनी मनःपूर्वक भाग घेतला. अस्पृश्यता, केशवपनादी अनिष्ट चालींचा त्यांनी निषेधच केला. सकेशा विधवेला पंढरपुरात विठ्ठलपूजेचा अधिकार मिळवून देण्यासाठी त्यांनी वकीलपत्र घेतले होते. आंतरजातीय विवाह, विधवाविवाह, घटस्फोट ह्यांचा त्यांनी पुरस्कार केला. १९४६ साली नागपूर येथे भरलेल्या अखिल भारतीय प्राच्यविद्या परिषदेचे ते अध्यक्ष होते. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय प्राच्यविद्या परिषदांनाही ते भारताचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिले (पॅरिस,१९४८ इस्तंबूल, १९५१ केब्रिज, १९५४). वॉल्टेअर येथे भरलेल्या भारतीय इतिहास परिषदेचे (१९५३) ते अध्यक्ष होते.

काण्यांचे बरेचसे संशोधनकार्य मुंबईच्या `एशियाटिक सोसायटी’ त झाले. संशोधनकार्यातील विशेष कामगिरीसाठी या संस्थेने आता `काणे सुवर्णपदक’ ठेवले आहे.

अनेक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता आणि ह्या संस्थांना त्यांचे मार्गदर्शन लाभले होते. मुंबईच्या `एशियाटिक सोसायटी’ चे ते फेलो आणि बरीच वर्षे उपाध्यक्ष होते. पुणे येथील `भांडारकर प्राच्यविद्या संशेधन मंदिरा’च्या नियामक मंडळावर रेग्युलेटिंग कौन्सिल तसेच तेथील `महाभारत संपादन मंडळा’वरही ते होते. काही काळ ते `महाराष्ट्र साहित्य परिषदे’चे उपाध्यक्ष आणि तिच्या व्यवस्थापक मंडळाचे सदस्य होते. ह्याशिवाय `दापोली एज्युकेशन सोसायटी’, `मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय’ इ. संस्थांचेही ते पदाधिकारी होते.

काण्यांना त्यांच्या हयातीतच अनेक मानसनमान लाभले. त्यांच्या षष्ट्यब्दिपूर्तीनिमित्त त्यांच्या चाहत्यांनी भारतविद्याविषयक विव्दत्तापूर्ण लेखांचा एक संग्रह त्यांना अर्पण केला (१९४१). बिटिश शासनाने त्यांना `महामहोपाध्याय’ ही पदवी देऊन त्यांचा गौरव केला (१९४२). अलाहाबाद आणि पुणे विद्यापीठांनी त्यांना अनुक्रमे १९४२ व १९६० मध्ये डी.लिट्. ही सन्माननीय पदवी दिली. १९५१ मध्ये `लंडन स्कूल ऑफ ओरिएंटल अँड आफ्रिकन स्टडीज’ ह्या संस्थेचे त्यांना सन्माननीय फेलो करण्यात आले. संस्कृत भाषेचे एक मान्यवर विद्वान म्हणून त्यांना राष्ट्रपतींचे प्रशस्तिपत्र देण्यात आले (१९५८). `भारतरत्न’ हा भारतातील सर्वोच्च बहुमान त्यांना १९६३ मध्ये प्राप्त झाला. मुंबई येथे ते निधन पावले.

करंदीकर, शैलजा