दांडेकर, रामचंद्र नारायण : (१७ मार्च १९०९ – ). आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संस्कृत पंडित व भारतविद्यावंत. जन्म साताऱ्याचा. शालेय शिक्षण साताऱ्यास. महाविद्यालयीन शिक्षण पुण्याच्या डेक्कन कॉलेजात आणि जर्मनीतील हायड्‌लबर्ग विद्यापीठात. संस्कृत व प्राचीन संस्कृती हे विषय घेऊन ते एम्‌. ए. झाले. (१९३१ १९३३). ‘वैदिक मानव’ ह्या विषयावर जर्मन भाषेत डेर वेदिश मेन्श हा प्रबंध लिहून त्यांनी डॉक्टरेट मिळविली (१९३८). महाविद्यालयीन जीवनात अनेक शिष्यवृत्त्या आणि पारितोषिके त्यांना प्राप्त झाली.

फर्ग्युसन महाविद्यालयात संस्कृत आणि प्राचीन भारतीय संस्कृती ह्या विषयांचे प्राध्यापक (१९३२–५०) पुणे विद्यापीठात संस्कृत–पाकृत–विभाग–प्रमुख (१९५०–६४) ह्याच विद्यापीठात ‘संस्कृत प्रगत अध्ययन केंद्रा’ चे सन्मान्य संचालक (१९६४–७४). १९७४ पासून पुणे विद्यापीठाचे गुणश्री (एमेरिटस) प्राध्यापक म्हणून नियुक्त झाले.

दांडेकरांच्या लेखनाचा व्याप मोठा आहे. अनेक ग्रंथ आणि देशीविदेशी संशोधन–पत्रिकांमधून मुख्यतः वेद, महाभारत आणि भारतीय धर्म ह्या विषयांवर महत्त्वपूर्ण लेख त्यांनी लिहिले आहेत. त्यांच्या वेदविषयक उल्लेखनीय ग्रंथांत उपर्युक्त प्रबंधाखेरीज वैदिक देवतांचे अभिनवदर्शन (१९५१) ह्या ग्रंथाचाही अंतर्भाव होतो. काही वैदिक देवतांच्या मूलभूत स्वरूपावर डॉ. दांडेकरांनी येथे नवीन प्रकाश पाडला आहे. ह्याशिवाय वेदविषयक लेखनाच्या सूचीचे त्यांनी तयार केलेले तीन खंड–वेदिक बिव्लिऑग्रफी (१९४६, १९६१, १९७३) – वेदाभ्यासकांना अत्यंत उपयुक्त आणि मार्गदर्शक ठरलेले आहे. अ हिस्टरी ऑफ द गुप्ताज (१९४१) ह्या त्यांच्या इतिहासविषयक महत्त्वाच्या ग्रंथात गुप्तकालीन समाजाचे आणि संस्कृतीचे विविध अंगांनी दर्शन घडविलेले आहे. सम ॲस्पेक्ट्स ऑफ द हिस्टरी ऑफ हिंदूइझम (१९६७) हाही त्यांचा एक उल्लेखनीय ग्रंथ.

अनेक ग्रंथांचे संपादनही त्यांनी केले आहे. त्यांत सुभाषितावलि, रसरत्नप्रदीपिका (१९४५), श्रौतकोश (इंग्रजी विभाग–अन्य संपादकांच्या सहकार्याने) तसेच महाभारताची काही पर्वे इत्यादींचा समावेश होतो. जर्मन संस्कृती, राजकारण इ. विषयांवर त्यांनी स्फुट लेखन केलेले आहे.

अखिल भारतीय प्राच्यविद्यापरिषदेचे प्रधान सचिव, ‘इंटरनॅशनल युनियन फॉर ओरिएंटल अँड एशियन स्टडीज’ ह्या आंतरराष्ट्रीय प्राच्यविद्या महामंडळाचे अध्यक्ष, भारतातील आणि भारताबाहेरील संस्कृत भाषा आणि प्राच्यविद्या ह्यांच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांचे आणि विद्यापीठांचे सदस्य व सल्लागार, यूनेस्कोच्या तत्त्वज्ञान आणि मानव्य विद्याभ्यास यांसंबंधीच्या शाखेचे उपाध्यक्ष, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराचे सन्मान्य सचिव इ. पदे त्यांनी भूषविलेली आहेत. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृति मंडळाचे ते सदस्य होते. महाराष्ट्र राज्याच्या भाषासल्लागार मंडळातही ते होते.

भारत सरकारने १९६२ मध्ये ‘पद्मभूषण’ ही पदवी देऊन त्यांचा गौरव केला. १९६८ मध्ये भांडारकर प्राच्यविद्या संशोधनमंदिराच्या सुवर्ण जयंतीच्या प्रसंगी त्यांना सन्मानपूर्वक ताम्रपट देण्यात आला.

भट, गो. के.