देवयानी : (अँड्रोमेडा). पाश्चात्य पद्धतीप्रमाणे उत्तर गोलार्धातील एक महत्त्वाचा तारकापुंज. हा शर्मिष्ठा व मीन यांच्या दरम्यान आहे. उत्तराभाद्रपदा नक्षत्राचा उत्तरेकडील तारा वा पेगॅसी चौकोनापैकी [→ उच्चैःश्रवा] ईशान्येचा तारा आल्फा (अल्‌फेरात्झ), बीटा (मिराश) गॅमा (अल्माक) हे यातील महत्त्वाचे व तेजस्वी, दुसऱ्या प्रतीचे [→ प्रत] तारे आहेत. या ताऱ्यांची रांग आल्फा पर्सेईपर्यंत ईशान्येस जाते. या रांगेजवळच बारीक चार-पाच ताऱ्यांची आणखी एक वेगळी रांग आल्फापासूनच निघते. गॅमा हा दूरदर्शकातून पांढरा-निळा असा सुंदर तारकायुग्म स्वरूपात दिसतो. याच्या दीप्तीमध्ये सारखे फरक होतात म्हणून याला आवर्ती तारकायुग्म म्हणतात. हा पुंज उत्तर आकाशात पूर्वरात्री ऑगस्ट ते डिसेंबर या मुदतीत दिसतो. अँड्रोमेडा ही इथिओपियाचा राजा सीफियस व कॅसिओपिया यांची रूपवती मुलगी होय. तिच्यावर वरुणदेवाची अवकृपा झाल्यामुळे तिला जलराक्षसांनी खावी म्हणून शृंखलांनी खडकाला बांधून ठेवली व पर्सियसने तिची सुटका केली. ही ग्रीक कथा कच–देवयानी या भारतीय कथेप्रमाणे वाटल्यामुळे बाळशास्त्री जांभेकरांनी या पुंजाला देवयानी हे नाव दिले.

बीटा ताऱ्याच्या वायव्येस एम ३१ म्हणजेच एनजीसी २२४ ही एक दीर्घिका (तारामंडळ) आहे निरभ्र काळोख्या रात्री ही नुसत्या डोळ्यांनी सुद्धा दिसते. ही आकाशगंगेसारखीच पण जरा मोठी (व्यास २,००,००० प्रकाशवर्षे) सर्पिल दीर्घिका सूर्यकुलाला सर्वांत जवळ (२० लक्ष प्रकाशवर्षे) असलेल्यांपैकी एक असून ती ३०० किमी./से. वेगाने आपल्याकडे येत आहे. तिच्यात नवतारे, तेजस्वी मोठे आणि महत्तम तारे, कित्येक गोलाकार तारकापुंज व इतर कोट्यावधी तारे आहेत. ही दीर्घिका १६१२ मध्ये जरी दूरदर्शकातून प्रथम पाहिली गेली असली, तरी ९६४ च्या सुमारास अल् सुफी या पर्शियन ज्योतिर्विदांना ती दिसली होती, असा उल्लेख सापडतो. या दीर्घिकेविषयीची काही अधिक माहिती पुढीलप्रमाणे आहे. दृष्टिप्रतलाशी कल १३° अक्षीय परिभ्रमणाचा काळ २ X १० वर्षे वस्तुमान (सूर्याच्या वस्तुमानाच्या पटीत) १०११ ताऱ्याची संख्या २ X १०११ दीप्ती–सूर्याच्या २ X १०११ पट दीर्घिका प्रकार Sb. या दीर्घिकेच्या जवळ आणखी दोन लहान सर्पिल दीर्घिका (एनजीसी २२१ व एनजीसी २०५) आढळतात. या तिन्ही दीर्घिकांचा ‘स्थानिक समूहा’त समावेश होतो [→ दीर्घिका].

या तारकासमूहातील एका केंद्रातून अँड्रोमेडीड उल्कावृष्टी नोव्हेंबरात होत असते. २७ नोव्हेंबर १८७२ रोजी झालेली मोठी उल्कावृष्टी बीला नावाच्या धूमकेतूच्या भग्न अवशेषांची असावी.

फडके, ना. ह.