किपिंग, फ्रेड्रिक स्टॅन्ली : (१६ ऑगस्ट १८६३ — १ मे १९४९). ब्रिटीश रसायनशास्त्रज्ञ. कार्बनी रसायनशास्त्रात महत्त्वाचे कार्य. यांचा जन्म हायर ब्रॉटन (मॅंचेस्टर) येथे झाला आणि शिक्षण मॅंचेस्टर, केन व म्युनिक येथे झाले. १८८७ मध्ये त्यांना लंडन विद्यापीठाची डी. एस्सी. ही पदवी मिळाली. त्यांनी प्रथम पर्किन (ज्यु.) यांच्या मार्गदर्शनाने आणि नंतर स्वतंत्रपणे संशोधन केले. ते नॉटिगॅम येथील युनिव्हर्सिटी कॉलेजात प्राध्यापक होते.

त्यांनी १८८६ मध्ये म्यूनिक येथे पर्किन यांच्या मार्गदर्शनाने संवृत्त (बंद) कार्बनी शृंखला या विषयावर संशोधनास प्रारंभ केला. त्यानंतर त्यांनी कापराच्या काही अनुजातांची (एका संयुगापासून बनलेल्या दुसऱ्या संयुगाची) समघटकता (तेच व तितकेच अणू रेणूमध्ये असूनही भिन्न संरचना असल्यामुळे वेगळे गुणधर्म असणाऱ्या संयुगांमधील संबंध) सिलिकॉनची असममित (घटक रेणूंची मांडणी अनियमित असणारी) संयुगे, सिलिकॉन व फॉस्फरस यांची संयुगे यांविषयी महत्त्वाचे संशोधन केले. सिलिकॉनच्या संयुगांचा उपयोग उच्च तापमान सहन करू शकणाऱ्या प्लॅस्टिकमध्ये करण्यासंबंधी त्यांनी बहुमोल संशोधन केले.  ऑर्‌गॅनिक केमिस्ट्री (१८९४) हा त्यांचा ग्रंथ सुप्रसिद्ध असून त्याच्या अनेक आवृत्त्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. त्यांना १८९७ मध्ये रॉयल सोसायटीचे सभासदत्व मिळाले. १९०९ मध्ये केमिकल सोसायटीचे लाँगस्टाफ पदक आणि १९१८ मध्ये डेव्ही पदक त्यांना बहाल करण्यात आले. ते इंग्लंडमधील क्रिक्येथ येथे मृत्यू पावले.

जमदाडे, ज. वि.