जॉन स्ट्यूअर्ट मिल

मिल, जॉन स्ट्यूअर्ट : (२० मे १८०६–८ मे १८७३). ब्रिटिश तत्त्वज्ञ, राजकीय अर्थशास्त्रज्ञ व उपयुक्ततावादाचे प्रभावी पुरस्कर्ते. जन्म लंडन येथे. जेम्स मिल ह्यांचे ते पुत्र होत. वडिलांच्या देखरेखीखाली त्यांचे शिक्षण झाले. त्याची हकीकत जॉन स्ट्यूअर्ट मिल यांनी आपल्या आत्मचरित्रात दिली आहे. वयाच्या तिसऱ्या वर्षी त्यांनी ग्रीक भाषेच्या आणि आठव्या वर्षी लॅटिन भाषेच्या अभ्यासाला सुरुवात केली. वयाच्या चवदाव्या वर्षापर्यंत इतिहास, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, तर्कशास्त्र, गणित आणि तत्त्वज्ञान ह्या विषयांत त्यांनी अधिकार संपादन केला होता. बेंथॅम यांच्या सामाजिक व नैतिक तत्त्वज्ञानाचे ते अनुयायी झाले आणि समाजसुधारणेच्या कार्याला वाहून घेण्याचे त्यांनी ठरविले. त्यांनी १८२३ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच नोकरी पतकरली पण पार्लमेंटने कंपनीची सनद चालू ठेवायची नाही असा निर्णय घेतल्यानंतर मिल सेवेतून निवृत्त झाले (१८५८). १८६५ ते १८६८ ह्या काळात ते वेस्टमिन्स्टरचे प्रतिनिधी म्हणून पार्लमेंटमध्ये होते.

मिल ह्यांच्या जीवनातील एक महत्त्वाचा भाग म्हणजे हॅरिएट टेलर ह्या विवाहीत स्त्रीशी असलेले त्यांचे भावनिक नाते. ह्या दोघांचा १८३१ मध्ये परिचय झाला आणि त्याची लवकरच गाढ स्नेहात आणि ‘फ्लेटॉनिक’ प्रेमात परिणती झाली. हॅरिएट टेलर ह्यांच्या बुद्धिमत्तेविषयी मिल ह्यांना अतिशय आदर होता आणि आपल्या अनेक मतांचा उगम त्यांच्या आपल्यावरील प्रभावात आहे अशी त्यांची धारणा होती. १८४९ मध्ये हॅरिएट टेलर ह्यांच्या पतीचे निधन झाले आणि त्यानंतर तीन वर्षांनी मिल ह्यांनी त्यांच्याशी विवाह केला. १८५८ मध्ये त्या फ्रान्समध्ये ॲव्हीन्यों येथे मृत्यू पावल्या. नंतर काही काळाने ॲव्हीन्यों येथेच मिल निधन पावले.

बेंथॅमप्रमाणेच ऑग्यूस्त काँत आणि सेंट सिमॉन ह्या फ्रेंच विचारवंतांचाही त्यांच्यावर प्रभाव होता. विशेषतः समाजशास्त्र आणि सामाजिक इतिहास ह्या क्षेत्रांतील मिल ह्यांच्या मतांवर हा प्रभाव ठळकपणे दिसून येतो. मिल ह्यांच्या पक्व मतांच्या घडणीमध्ये वर्ड्‌स्वर्थ, कोलरिज इ. स्वच्छंदतावादी कवी आणि विचारवंत ह्यांचाही महत्त्वाचा भाग होता. वयाच्या विसाव्या वर्षी विषण्णतेचा एक तीव्र झटका मिल ह्यांना आला होता. वर्ड्‌स्वर्थ ह्यांच्या काव्याने त्यांना ह्या कठीण प्रसंगातून तारले आणि त्यांच्या मनाला नवीन टवटवी आणि उभारी दिली. विचारांच्या तर्कशुद्धतेइतकेच भावनांच्या ताजेपणाला आणि कोमलपणाला मानवी जीवनता महत्त्वाचे स्थान असते, हा धडा मिल ह्या अनुभवापासून कायमचा शिकले. सामाजिक परंपरा आणि धर्म ह्यांच्याविषयीचा त्यांच्या उपयुक्ततावादाच्या नव्या मांडणीवरून जो दृष्टीकोण त्याच्या प्रौढ वयातील लिखाणात व्यक्त होतो, त्यावरून हा धडा त्यांनी आत्मसात केला होता हे स्पष्ट होते.

एकोणिसाव्या शतकात महाराष्ट्रात झालेल्या प्रबोधनामागे ज्या वैचारिक प्रेरणा होत्या, त्यांच्यातील एका महत्त्वाच्या प्रेरणेचा उगम मिल ह्यांच्या उपयुक्ततावादामध्ये होता.

मिल ह्यांचे सिस्टिम ऑफ लॉजिक (तर्कशास्त्राची व्यवस्था) हे पुस्तक १८४३ मध्ये प्रसिद्ध झाले. अनुभववादी भूमिकेला अनुसरून तर्कशास्त्रातील सर्व समस्यांची सुसंगतपणे व्यवस्था कशी लावता येते हे दाखवून देणे हे ह्या ग्रंथाचे मुख्य प्रयोजन आहे. मिल ह्यांचा हा पहिलाच ग्रंथ अतिशय लोकप्रिय व प्रभावी ठरला. ह्याचे एक प्रमुख कारण असे, की ह्या ग्रंथाचे एक सामाजिक उद्दिष्ट होते. नैतिक नियमांचे आपले ज्ञान हे प्रतिभानावर -इंटुइशनवर-आधारलेले असते. म्हणजे ‘नेहमी सत्य बोलावे’ ह्यासारखे नैतिक नियम प्रमाण आहेत. असे एक साक्षात बौद्धिक दर्शन किंवा प्रतिभान आपल्याला होते असा दृष्टिकोन दृढपणे आणि व्यापक प्रमाणावर प्रचलित होता. ह्या दृष्टिकोनावर टीका करून त्याचा अव्हेर मिल ह्यांनी ह्या ग्रंथात केला आहे आणि तिला अनुसरून ज्ञानाच्या सर्व प्रकारांचे स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. ह्यापासून त्यांनी काढलेला निष्कर्ष असा, की सामाजिक कल्याण वृद्धिंगत करण्यासाठी ज्या सामाजिक आणि राजकीय धोरणांचे संयोजन करावे लागते ती धोरणे अनुभवजन्य, वैज्ञानिक ज्ञानावर आधारावी लागतात, ती धार्मिक किंवा आध्यात्मिक परंपरांगत अंतर्भूत असलेल्या तत्त्वांवर आधारणे अयोग्य असते.

सर्वच ज्ञान अनुभवापासून, म्हणजे निरीक्षणांपासून आपल्याला प्राप्त होते. ह्या अनुभववादी भूमिकेला विशेष अडचणीची वाटणारी समस्या म्हणजे निगामी अनुमानापासून-डिडक्टिव्ह इन्फरन्स पासून-आपल्याला जे ज्ञान प्राप्त होते त्याची व्यवस्था कशी लावायची? निगामी अनुमानात आपण काही विधाने आधारविधाने म्हणून स्वीकारतो आणि त्यांच्यापासून निष्पन्न होणारे विधान निष्कर्ष म्हणून सिद्ध करतो. उदा., भूमितीत आपण काही विधाने स्वयंसिद्धक (ॲक्सम) म्हणून स्वीकारतो आणि त्यांच्यापासून केवळ निगमनाने अनेक सिद्धांत निष्पन्न करून घेऊन सिद्ध करतो. अशा रीतीने उदा., त्रिकोण, वर्तुळ इ. आकृतीच्या गुणधर्माविषयीचे अनेक सिद्धांत भूमितीत सिद्ध करण्यात येतात. हे नवीन ज्ञान असल्यासारखे दिसते. ते निरीक्षणापासून प्राप्त झालेले नसते. ते केवळ निगमनाने प्राप्त झालेले असते.

ह्यावर मिल ह्यांचे उत्तर असे आहे, की केवळ निगमनाने नवीन ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही. उदा., ‘सर्व माणसं मर्त्य आहेत आणि (अजून जिवंत असलेला) वामन माणूस आहे.’ ह्या विधानांपासून निगमनाने ‘वामन मर्त्य आहे’, हे नवीन ज्ञान प्राप्त झाल्यासारखे वाटत खरे पण हा केवळ भास आहे असे मिल ह्यांचे म्हणणे आहे. ‘सर्व माणसे मर्त्य आहेत’ हे विधान स्वीकारणे म्हणजे ज्या कोणत्याही माणसाचा निर्देश आपण करू त्याच्याविषयी तो मर्त्य आहे असा निर्णय करण्याचा अधिकार आपल्याला आहे असे सांगणे किंवा मान्य करणे आणि त्याला अनुसरून वरील निष्कर्ष काढण्यात आला आहे. पण हा अधिकार आपल्याला कसा प्राप्त होतो ? तर अगणित विशिष्ट माणसे मेली आहेत ते ज्ञान आपल्याला निरीक्षणाने प्राप्त झाले आहे. असंख्य विशिष्ट माणसांविषयीचा निरीक्षणानं प्राप्त झालेला हा जो पुरावा आहे, त्यापासून ह्या माणसांपलीकडला कुणीही माणूस घेतला तर तो मर्त्य असणार असा निष्कर्ष आपण काढतो. म्हणजे एका प्रकारच्या काही विशिष्ट वस्तूंच्या ठिकाणी एक विशिष्ट गुणधर्म आहे हे आपल्याला निरीक्षणाने कळते आणि ह्यापासून त्या प्रकारच्या दुसऱ्या विशिष्ट वस्तूविषयी (हा गुणधर्म तिच्या अंगी आहे हे निरीक्षणाने माहीत झाले नसतानाही), तो गुणधर्म तिच्या अंगी आहे असा निष्कर्ष आपण काढतो. आणि हे नवीन ज्ञान असते. तेव्हा नवीन ज्ञान देणारे अनुमान हे निरीक्षित विशिष्ट वस्तूंपासून अनिरीक्षित विशिष्ट वस्तूविषयी केलेले अनुमान असते. ते अनुभवजन्य पुराव्यावरच आधारलेले असते.


भूमितीची स्वयंसिद्धके आपण घेतली, तर ती अनुभवावरच आधारलेली असतात असे दिसून येईल. उदा., एक सरळ रेषा घेतली आणि तिच्या बाहेरचा एक बिंदू घेतला तर ह्या बिंदूमधून जाणारी आणि त्या सरळ रेषेला समांतर असलेली एक आणि एकच सरळ रेषा असू शकते हे स्वयंसिद्धक घ्या. ह्याचा पडताळा आपण असंख्य वेळा निरीक्षणाने घेतला आहे. आणि तो इतक्या वेळा घेतला आहे, की वरील स्वयंसिद्धक निश्चितपणे आणि अनिवार्यतेने सत्य आहे अशी आपली धारणा होते. अंकगणिताच्या मूलभूत नियमांची गोष्टही अशीच आहे. समजा ३ वस्तूंचा समुदाय आपण घेतला, तर त्याचे २ वस्तू बाजूला आणि १ वस्तू एका बाजूला असे गट पाडता येतात आणि त्या समुदायात आणखी कोणती वस्तू उरत नाही. ह्यापासून २ + १ = ३ आणि १ + २ = ३ असे अंकगणिताचे नियम आपल्याला मिळतात. आणि ह्या नियमांचा विस्तार काय तो अंकगणित आणि बीजगणित ह्यांच्यात निगामी पद्धतीने करण्यात येतो. तेव्हा मिल ह्यांचा निष्कर्ष असा, की खरेखुरे नवीन व प्रमाण असे ज्ञान आपल्याला केवळ निगमनाने मिळू शकत नाही, ते केवळ निरीक्षणाने किंवा विशिष्ट वस्तूंच्या निरीक्षणांपासून इतर तत्सम विशिष्ट वस्तूंविषयी केलेल्या अनुमानापासून, म्हणजे विगामी-इंडक्टिव्ह-अनुमानापासून मिळते.

विगामी अनुमानाचा आकार असा असतो : ‘आतापर्यंत अनुभविलेल्या एकाच प्रकारच्या सर्व उदाहरणांचा अंगी हा धर्म आहे तेव्हा ह्या प्रकारच्या इतर कोणत्याही उदाहरणांच्या अंगीही ध हा धर्म असणार’. म्हणजे एका प्रकारच्या काही उदाहरणांपासून त्या प्रकारच्या कोणत्याही किंवा सर्व उदाहरणांविषयीचा निष्कर्ष विगामी अनुमानाद्वारे काढण्यात येतो. विगामी अनुमान निसर्गाच्या एकरूपतेच्या तत्त्वावर आधारलेले असते असे मिल यांचे म्हणणे आहे. निसर्गाच्या एकरूपतेच्या तत्त्वावर आशय असा, की एका परिस्थितीत जे असते किंवा घडते ते तिच्यासारख्या (म्हणजे पुरेशा प्रमाणात सारख्या असलेल्या) परिस्थितीत नेहमीच असते किंवा घडते. निसर्गाच्या एकरूपतेच्या तत्त्वाचे एक रूप म्हणजे कार्यकरणाचे तत्त्व. हे तत्त्व असे, की कोणतीही घटना घेतली, तर ती अशा कोणत्या तरी घटनेनंतर (किंवा घटनांच्या समूहानंतर) घडत असते, की ती घटना कधीही घडली (किंवा तो घटनासमूह कधीही घडून आला) तर दिलेली घटना नियमाने, म्हणजे निरपवादपणे घडून येते ज्या घटननेनंतर किंवा घटना समूहानंतर, लगेच अव्यवधानाने एखादी घटना निरपवादपणे घडून येते ती अगोदरची घटना किंवा तो घटनासमूह नंतरच्या त्या घटनेचे कारण होय अशी कारणाची व्याख्या मिल करतात. [⟶ कार्यकारणभाव]. निसर्गाचे नियम शोधून काढताना ‘कारण’ ह्या संकल्पनेचा वापर उपयुक्त ठरतो.

ज्यांना आपण वैज्ञानिक नियम म्हणू ते दोन प्रकारचे असतात. क ही घटना घडली की नंतर ख ही घटना निरपवादपणे घडते असे सांगणारे सार्वत्रिक नियम हे मुलभूत निसर्गनियम असतात. पण अनेकदा, एका विशिष्ट परिस्थितीत क ह्या घटनेनंतर ख ही घटना नियमाने घडून येते असे सांगणारे नियमही आपल्याला आढळून येतात ही विशिष्ट परिस्थिती अस्तित्वात नसली तर हा नियम लागू पडत नाही. अशा नियमांना मिल ‘आनुभविक’ नियम-इम्पिरिकल लॉज-म्हणतात. कित्येक विज्ञानांत मूलभूत निसर्गनियम सिद्ध करता येतात आणि त्यांच्यापासून आनुभविक नियम निष्पन्न होतात असे अनुमानाने दाखवून देता येते. उदा., भौतिकीचे स्वरूप असे असते. कित्येक विज्ञानांत उदा., रसायनशास्त्रात आनुभविक नियम सिद्ध करता येतात.

मानवी व्यक्तिंच्या समजुती, इच्छा, भावना इ. मानसिक घटना आणि त्यांच्या कृती तसेच व्यक्तींच्या, गटांच्या किंवा समाजाच्या कृती ह्यांचेही विज्ञान विकसित करता येईल. असा मिल यांचा विश्वास होता. निसर्गात घडणारी कोणतीही घटना एकतर साधी असते किंवा मिश्र (कॉम्प्लेक्स) असते. ती साधी असली तर ज्या नियमाला अनुसरून ती घडते त्याचा निर्देश करून तिचा उलगडा करता येतो. ती मिश्र असली तर ती अनेक साध्या घटकांची मिळून बनलेली असते. तिचा प्रत्येक घटक कोणत्या तरी नियमाला अनुसरून घडत असतो आणि ह्या वेगवेगळ्या घटकांचा उलगडा करावा लागतो. म्हणून मिश्र घटकांचा उलगडा करणे हे गुंतागुंतीचे काम असते. आता व्यक्तीच्या मानसिक घटना अतिशय मिश्र असतात. कारण व्यक्तिमनाचा विकास होत असतो. पूर्वीच्या असंख्य अनुभवांचे व्यक्तींच्या मनावर झालेले संस्कार आणि तिला आता प्राप्त होणारे अनुभव ह्यांच्या जुळणीतून व्यक्तीच्या आताच्या इच्छा, भावना, प्रवृत्ती, समजुती घडलेल्या असतात. तेव्हा एकाच बाह्य घटनेला दोन व्यक्ती भिन्न प्रतिसाद देतात. सामाजिक घटना आणि वर्तन अनेक व्यक्ती एकत्र येऊन घडत असतात. तेव्हा त्यां अधिकच मिश्र आणि गुंतागुंतीच्या असतात. पण सामाजिक घटनांचे वैयक्तिक मानसिक घटनांमध्ये नेहमीच निःशेष विश्लेषण करता येते तसेच सामाजिक वर्तनाचे वैयक्तिक वर्तनामध्ये निःशेष विश्लेषण करता येते आणि वैयक्तिक मानसिक घटना आणि वर्तन ह्यांचा मानसशास्त्राच्या नियमांना अनुसरून उलगडा करता येतो. तेव्हा सामाजिक घटनांचा आणि वर्तनाचा उलगडा करू पाहणारे सामाजिक विज्ञान हे मानसशास्त्राच्या नियमांवर आधारलेले असते. वैयक्तिक मानसिक घटना अतिशय मिश्र असल्यामुळे मुलभूत मानसशास्त्रीय नियम शोधून काढणे आणि त्यांचा उपयोग करून मानसिक घटनांचे स्पष्टीकण करणे हे अतिशय गुंतागुंतीचे काम आहे हे खरे पण हे नियम शोधून काढण्यात आणि त्यांचा उपयोग करून विशिष्ट मानसिक घटनांचा उलगडा करणे ह्या कार्यक्रमात तत्त्वतः कोणतीही अडचण नाही. मानसशास्त्राचे अंतिम नियम शोधून काढण्याच्या आणि त्यांचा उपयोग करून अखेरीस ज्यांचे स्पष्टीकरण करावे लागेल असे सामाजिक विज्ञानातील आनुभाविक नियम सिद्ध करण्याच्या कार्याला आपल्या काळात प्रारंभ झाला आहे असे मिल मानीत होते आणि निसर्गाविज्ञानांप्रमाणे मानसिक व सामाजिक विज्ञानेही भावी काळात उभारली जातील असा त्यांना विश्वास होता आणि ह्या विज्ञानांच्या आधारे समाजाचे नियमन अधिक यशस्वीपणे करता येईल अशी त्यांना आशा होती.

बाह्य वस्तू ‘सार्वजनिक’ असतात असे आपण मानतो. म्हणजे एकाच बाह्य वस्तूचे, उदा., एकाच टेबलाचे, अनेक व्यक्तींना एकाच वेळी प्रत्यक्षज्ञान होते असे आपण मानतो. उलट, ज्या संवेदनांद्वारा हे ज्ञान होते त्या व्यक्तिगत असतात, प्रत्येक व्यक्तीला लाभणाऱ्या संवेदना तिच्या खाजगी संवेदना असतात, त्या विशिष्ट व्यक्तीशिवाय इतर कुणाला तिच्या संवेदनाचे साक्षात ज्ञान होऊ शकत नाही असेही आपण मानतो. अशा खंडित, अधूनमधून उद्‌भवणाऱ्या, खाजगी संवेदनांद्वारा टिकून राहणाऱ्या, सार्वजनिक स्वरूपाच्या बाह्य वस्तूंचे ज्ञान होऊ शकणार नाही, असा संशयवादी निष्कर्ष मिल ह्यांच्या पूर्वीच्या, ह्युम इ. अनुभववाद्यांनी काढला होता. पण मिल असा संशयवादी निष्कर्ष स्वीकारीत नाहीत. आपल्या खाजगी, खंडित संवेदनांद्वारा आपल्याला सार्वजनिक अशा बाह्य वस्तूंचे ज्ञान होते ही जी आपली समजूत असते, तिचे समर्थन आणि स्पष्टीकरण करण्याचा ते प्रयत्न करतात.


मनाच्या स्वरूपाचे स्पष्टीकरण असे, की मन ही अनुभवांची मालिका असते. पण मानवी मनाच्या आणखी एका वैशिष्ट्यांची नोंदही ते घेतात. मानवी मन ही अनुभवांची एक मालिका असते हे खरे पण जिला स्वतःच्या एकतेची जाणीव आहे अशी ही मालिका असते.

नीतिशास्त्रात मिल यांनी ⇨जेरेमी  बेंथॅमप्रणीत सुखवादी उपयुक्तावादाचा पुरस्कार केला पण त्याबरोबरच ह्या उपपत्तीला अधिक प्रगल्भ व उन्नत स्वरूप देण्याचाही त्यांनी प्रयत्न केला. माणसाला जे पाहिजे असते तेच त्याचे इष्ट असते किंवा माणूस जे साधायचा प्रयत्न करीत असतो तेच त्याचे प्राप्तव्य. जे त्याने साधणे योग्य असते असे त्याचे प्रातव्य असते हे तत्त्व मिल स्वीकारतात. आता माणसाला फक्त सुख हवे असते, माणूस केवळ सुख साधायचा प्रयत्न करीत असतो. हा मानसशास्त्रीय नियम मिल स्वीकारतात आणि म्हणून स्वतःचे सुख हेच व्यक्तिचे इष्ट असते किंवा तिचे योग्य असे साध्य असते असा निष्कर्ष ते काढतात. ह्या युक्तिवादावर अनेक आक्षेप घेण्यात आले आहेत. कोणतेही कृत्य योग्य आहे की नाही हे केवळ त्याच्या परिणामांपासून ठरते, त्याच्यापासून एकंदरित अनिष्ट परिणामांपेक्षा अधिक इष्ट परिणाम घडून येत असतील तर ते कृत्य योग्य होय अशी भूमिका मिल स्वीकारतात. ही उपयुक्ततावादाची भूमिका, म्हणजे कृत्याची योग्यता त्याच्या उपयुक्ततेत, इष्ट परिणामांचे साधन असण्यात सामावलेली असते असे प्रतिपादन करणारी भूमिका होय. आता केवळ सुख हेच इष्ट असल्यामुळे (आणि केवळ दुःख अनिष्ट असल्यामुळे) ज्या कृत्यामुळे एकंदरीत दुःखापेक्षा सुख अधिक निष्पन्न होते ते कृत्य योग्य होय हे मत मिल स्वीकारतात. योग्य कृत्याच्या ह्या निष्कर्षात अभिप्रेत असलेले सुख हे ते कृत्य करणाऱ्या व्यक्तीचे असते हे आपण पाहिले. पण ह्या व्यक्तिवादी निकषापासून, ज्या कृत्यामुळे अधिकात अधिक सुख हे ते कृत्य योग्य होय, मग ते कुणाही व्यक्तींचे सुख असो असा सामान्यवादी (यूनिव्हर्‌सॅलिस्ट) निकषही मिल एका युक्तिवादाच्या साहाय्याने निष्पादित करतात. हा युक्तिवाद असा प्रत्येक व्यक्तीचे सुख हे तिचे इष्ट असते. तेव्हा सर्व व्यक्तींचे सुख हे सर्वांचे इष्ट असते. तेव्हा सर्व व्यक्तीचे सुख हे प्रत्येक व्यक्तीचे इष्ट असते. हा युक्तिवाद फसवा आहे हे उघड आहे.

सुख हेच केवळ इष्ट असल्यामुळे कोणतीही दोन सुखे घेतली उदा., कविता वाचण्याचे सुख आणि पत्ते खेळण्याचे सुख-तर त्यांच्यात गुणवत्तेच्या दृष्टीने भेद करता येत नाही, एक सुख दुसऱ्या सुखापेक्षा कमी किंवा अधिक असते एवढा परिमाणात्मक भेद काय तो त्यांच्यामध्ये असू शकतो, अशी बेंथॅम ह्यांची भूमिका होती. ती नाकारून सुखांमध्ये गुणवत्तेच्या दृष्टीने भेद असतो, श्रेष्ठ गुणवत्तेचे लहान सुख कनिष्ठ गुणवत्तेच्या मोठ्या सुखापेक्षा अधिक इष्ट असते आणि ते साधण्याचा प्रयत्न करणे योग्य असते. सर्वांचे अधिकात अधिक सुख साधणारी कृत्ये योग्य असतात आणि ती करणे आपले कर्तव्य असते हे अंतिम नैतिक तत्त्व असले तरी कोणत्या प्रकारची कृत्ये केल्याने सर्वांचे जास्तीत जास्त सुख साधले जाते ह्याचे बरेचसे स्पष्ट आणि साधार ज्ञान माणसांना हजारो वर्षांच्या अनुभवाने प्राप्त झाले आहे आणि ‘सत्य बोलावे’, ‘दिलेले वचन पाळावे’ ह्यांसारखे अनेक नैतिक नियम समाजात प्रचलित असतात. हे नियम पाळणे सामान्यतः बंधनकारक असते असे मिल प्रतिपादन करतात. पण उपयुक्ततावादी तत्त्वाच्या कसोटीवर ह्या नियमांमध्ये सुधारणा करीत जाणे शक्य आणि आवश्यक असते. व्यक्तिने स्वतःच्या गुणांचा, शक्तिचा आणि शील किंवा चारित्र्य ह्यांचा विकास केला पाहिजे ह्यावर मिल ह्यांचा भर होता. आत्मविकासाचे हे ध्येय आणि उपयुक्ततावादाचे तत्त्व ह्यांच्यामध्ये मिल ह्यांच्या दृष्टीने कोणतीही विसंगती नाही. कारण कल्याण सर्वांत परिणामकारकरीतीने साधू शकते. तेव्हा आत्मविकास साधण्यात व्यक्तीचे सर्वश्रेष्ठ कल्याण साधणे हे असले पाहिजे, ह्या म्हणण्यात विरोध नाही. [⟶ उपयुक्ततावाद नीतिशास्त्र सुखवाद].

ऑन लिबर्टी (स्वातंत्र्याविषयी) हा मिल ह्यांचा १८५९ मध्ये प्रसिद्ध झालेला निबंध अत्यंत प्रभावी आणि प्रसिद्ध ठरला आहे. त्याच्यात त्यांनी विचारस्वातंत्र्य आणि उच्चारस्वातंत्र्य ह्यांचा पुरस्कार केला आहे. व्यक्तिस्वातंत्र्य हे समाजाला अनेक कारणांमुळे उपयुक्त ठरते आणि ह्या स्वातंत्र्यावर अकारण मर्यादा घातल्याने समाजाचे एंकदरीत नुकसानच होते, हा त्यांचा युक्तिवाद आहेच. व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार मुख्यतः व्यक्तिवैशिष्ट्याचे जे मूल्य त्यांनी स्वीकारले होते त्यावर आधारलेला आहे. प्रत्येक व्यक्तिचे विशिष्ट असे व्यक्तिमत्व असते आणि त्याची कदर सर्वांनी केली पाहीजे आणि प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाची जोपासना आणि विकास करायला पूर्ण वाव दिला पाहिजे, अशी त्यांची खोल धारणा होती. ही भूमिका आणि उपयुक्ततावादी तत्त्व ह्यांच्यामध्ये विरोध नाही ह्या त्यांच्या मताचा निर्देश वर केलाच आहे. [⟶ स्वातंत्र्य].

लोकांनी निवडलेल्या प्रतिनिधींनी शासनसंस्था चालविणे ही आदर्श राजकीय व्यवस्था होय ह्या मताचा बेंथॅम, जेम्स मिल इ. उपयुक्ततावादी विचारवंतांनी पुरस्कार केला होता. त्याला अर्थात मिल यांचा पाठिंबा आहेच. पण प्रातिनिधिक लोकशाहीचे समर्थन मिल ह्यांनी आणखी एका कारणासाठी केले आहे. संबंध समाजाचे जास्तीत जास्त कल्याण (सुख) साधणारी शासनव्यवस्था एखादा झोटिंगशहा घालून देईलही पण इतरांच्या सुखाची पर्वा करण्याचे कारण त्याला जर नसेल, तर ही व्यवस्था टिकणे संभवनीय नाही. सर्व व्यक्तिंचे सुख साधणारी शासनव्यवस्था जर हवी असेल, तर सर्व व्यक्तिंना शासकीय निर्णय घेण्यात सहभाग दिला पाहिजे असा जुन्या उपयुक्ततावाद्यांचा युक्तिवाद होता. हा युक्तिवाद स्वीकारून मिल त्यात भर घालतात. शासनव्यवस्थेत सहभाग घेतल्याने, सार्वजनिक प्रश्नांची चर्चा करून त्यांच्याविषयीचे आपले मत बनविण्याची सतत संधी मिळाल्याने लोकांचे नैतिक व राजकिय शिक्षण होते, त्यांची दृष्टी उदार बनते, स्वतःचे हित आणि इतरांचे हित ह्यांच्यामध्ये किती गुंतागुंतीचे संबंध असतात ह्याची जाण त्यांना येते आणि आणि ह्यातून त्यांचा विकास होतो. प्रातिनिधिक लोकशाहीमुळे होणाऱ्या ह्या लाभाला मिल ह्यांनी अत्यंत महत्त्व दिले आहे. प्रत्येक व्यक्तिच्या वैशिष्ट्यांची कदर हे मुलभूत मूल्य मिल ह्यांनी स्वीकारले असल्यामुळे, लोकशाही म्हणजे बहुमताची सत्ता हे समीकरण धोक्याचे आहे ह्याकडे ते वारंवार लक्ष वेधतात. खऱ्या लोकशाहीमध्ये अल्पमताचाच काय, प्रत्येक व्यक्तीच्या मताचा मान राखला गेला पाहिजे असे ते बजावून सांगतात. [⟶ लोकशाही].


ऑन द सब्जेक्शन ऑफ विमेन (१८७४ स्त्रियांची परवशता) ह्या निबंधात स्त्रीस्वातंत्र्याचा आणि स्त्रियांना पुरुषांइतकीच आत्मविकासासाठी संधी असावी ह्या मताचा मिल ह्यांनी हिरिरीने पुरस्कार केला आहे. द प्रिन्सिपल्स ऑफ पोलिटिकल इकॉनॉमी (२ खंड, १८४८ म. शी. राजकीय अर्थशास्त्राची तत्त्वे) ह्या त्यांच्या ग्रंथाची सात संस्करणे प्रसिद्ध झाली आहेत. ह्या ग्रंथातील सिद्धांतात त्यांनी ⇨ डेव्हिड रिकार्डोंच्या उपपत्तींचा अनुवाद व विकास केला आहे. आर्थिक व्यवस्था ही अनिर्बंधतेच्या (लेसा-फेअर) तत्त्वावर आधारलेली असावी ह्या मताचे ते प्रारंभी पुरस्कर्ते होते. म्हणजे शांतता आणि केलेल्या करारांचे पालन ह्या चौकटीत स्वतःचा आर्थिक उत्कर्ष साधण्याचे पूर्ण स्वातंत्र्य प्रत्येक व्यक्तिला असावे, अशा व्यवस्थेमधूनच समाजातील सर्व व्यक्तिंचे दूरगामी आर्थिक हित साधले जाते ह्या भूमिकेचा त्यांनी स्वीकार केला होता पण हळूहळू ते समाजवादाकडे झुकत गेले. अर्थशास्त्रात संपत्तीच्या उत्पादनाचे प्रश्न आणि तिच्या वितरणाचे प्रश्न ह्यांत भेद केला पाहिजे, अशी भूमिका त्यांनी स्वीकारली. वितरणाच्या ज्या व्यवस्थेत श्रमिकांना उत्पादित संपत्तीचा खूपच तुटपुंजा हिस्सा लाभतो ती गैर होय ह्या मतापर्यंत ते येऊन पोहोचले. पण लोकशाहीप्रमाणेच समाजवादी व्यवस्थेकडून व्यक्तींच्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाला धोका पोहचू शकेल ही भीती त्यांनी अनेकदा व्यक्त केली आहे. [⟶ आर्थिक विचार – इतिहास आणि विकास].

मिल ह्यांची धर्मविषयक मते समतोल होती. विश्वात जी व्यवस्था दिसते तिच्यावरून त्याने योजनापूर्वक विश्वाची रचना केली आहे असा कुणीतरी बुद्धिमान कर्ता असावा असा तर्क करणे शक्य आहे हे ते मान्य करतात पण असा रचनाकार आहे ही केवळ शक्यता राहते. त्याचे अस्तित्व सिद्ध होत नाही. शिवाय हा रचनाकार सर्वशक्तिमान आहे असेही म्हणता येत नाही कारण विश्वरचनेत अनेक वैगुण्ये आहेत. पण आपल्या भोवतालच्या जगामध्ये आणि विशेषतः स्वतःच्या स्वभावामध्ये सुधारणा करण्याची शक्ती माणसामध्ये आहे. तेव्हा चांगले उद्दिष्ट असलेल्या पण ज्याची शक्ति मर्यादित आहे अशा देवाचे आपण साहाय्यक व सहकारी आहोत, असे माणसे मानू शकतील आणि त्याप्रमाणे जगू शकतील. तसेच आत्मा अविनाशी आहे असे मानायला आधार नाही, पण तो अविनाशी नाही असे सिद्ध करणारा पुरावाही नाही. सारांश ईश्वर, आत्मा इ. पारंपारिक धार्मिक श्रद्धेचे जे विषय आहेत त्यांच्या बाबतीत काही सत्य सिद्ध किंवा असिद्ध करता येत नाही. पण ईश्वर आणि अविनाशी आत्मा आहे अशी आशा बाळगायला जागा आहे आणि ह्या आशेच्या आधारे माणसे अधिक उन्नत जीवन जगत असली, तर त्यात काही आक्षेपार्ह नाही अशी मिल ह्यांची अंतिम भूमिका होती.

मिल यांचे उत्तर उल्लेखनिय ग्रंथ पुढीलप्रमाणे : एसेज ऑन सम अन्‌सेटल्ड क्वेश्चन्स ऑफ पोलिटिकल इकॉनॉमी (१८४४), थॉटस्‌ ऑन पार्लमेंटरी रिफॉर्म (१८५९), कन्सिडरेशन्स ऑन रिप्रेझेंटेटिव्ह गव्हर्न्मेंट (१८६१), युटिलिटेरिॲनिझम (१८६३), ऑग्यूस्त काँत अँड पॉझिटिव्हिझम (१८६५), ॲन एक्झामिनेशन ऑफ सर विल्यम हिमिल्टन्स फिलॉसॉकी (१८६५), ऑटोबायॉग्राफी (१८७३), थ्री एसेज ऑन रिलिजन (१८७४), एसेज ऑन पॉलिटिक्स अँड कल्चर (१९६२) इत्यादी.

संदर्भ : 1. Britton, Karl, John Stuart Mill, New York, 1869.

             2. Packe, Michael St. John, The Life of John Stuart Mill, London, 1954.

             3. Plamenatz, John, The English Utilitarians, Oxform, 1949.

रेगे, मे. पुं.