फेर्नांदिश, ज्योकीं आंतोनियु : (८ जुलै १८८८-१५ ऑक्टोबर १९७५). कोंकणी लेखक, पत्रकार आणि पंडित. गोव्यातील बारदेश महालातील कांदोळी गावात जन्म. पोर्तुगीज शिक्षण गोव्यात व इंग्रजी शिक्षण मुंबईत. मुंबईतील ‘इन्स्तितूतू इन्दोपोर्तुगेज’ व मुंबईच्या ‘सेमिनरी’त त्यांनी कोंकणीचे शिक्षक म्हणून बरीच वर्षे काम केले. ⇨ माँसिग्‍नो दाल्गादू (१८५५–१९२२) (हे शब्दकोशकार) व ⇨ णै गोंयबाब (१८७७–१९४६) (हे साहित्यिक व भाषापंडित) यांच्यापासून स्फूर्ती घेऊन त्यांनी आव्हे मारिया, गोवामेल, नवें जीवित, उदेंतेचें नकेत्र ह्या रोमन लिपीतून निघणाऱ्या नियतकालिकांतून विपुल लेखन केले तसेच कित्येक वर्षे आमीगु दु पोव्हु गोआनु (गोमंतकीय जनतेचा मित्र), गोवामेलनवे जीवित या नियतकालिकांचे संपादनही केले.

शणै गोंयबाब यांच्या सहकार्याने ‘गोअन एमिग्रंट्‌स फंड’ या संस्थेतर्फे कोंकणी पयलें पुस्तक (१९३९, रोमन लिपित) व नंतर कोंकणी दुसरें पुस्तक (१९४८) ही पाठ्यपुस्तके तयार केली. आमचो सोडवणदार (१९५२) हा येशू ख्रिस्ताच्या जीवनावरील ग्रंथ लिहून रोमन लि‌पीतील कोंकणी साहित्याला त्यांनी नवे वळण लावले. ख्रिस्ती धर्मोपदेशकांनी कोंकणीत घुसडलेले पोर्तुगीज शब्द व कोंकणी भाषेवर लादलेली लॅटिन वाक्यरचना यांना बाजूस सारून कोंकणीच्या मूळ प्रकृतीचा त्यांनी पाठपुरावा केला. त्याचबरोबर रोमनमधील कोंकणीच्या शुद्धलेखनाची एक शास्‍त्रशुद्ध रीतीही त्यांनी शोधून काढून कोंकणी लेखकांना एक नवा आदर्श घालून दिला. ही शुद्धलेखनाची रीती कोंकणीचे नादशास्‍त्र वो रोमी लिपयेंत रोवंची री (१९७२) ह्या पुस्तकात त्यांनी विशद केली आहे. रोमन लिपीत लिहिणारे सध्याचे कोंकणी लेखक हीच रीती अनुसरतात. फेर्नांदिश यांचे बहुतेक वास्तव्य मुंबईतच झाले व तेथेच ते निधन पावले.

सरदेसाय, मनोहरराव