सोझा, एदुआर्द जुझे ब्रुनु द : (७ ऑक्टोबर १८३६-५ डिसेंबर १९०५).आद्य कोकणी पत्रकार, कवी आणि कादंबरीकार त्यांचा जन्म गोव्यातील अस्नोडा (ता. बार्देश) या गावी एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. रायतूर येथील सेमिनरीमध्ये ख्रिस्ती धर्माचे शिक्षण घेण्यास ते गेले परंतु काही कारणास्तव त्यांनी अभ्यासक्रम अर्धवट सोडून दिला. नंतर ते पुणे येथे एका छायाचित्रण संस्थेत कामाला लागले. त्यांनी कोकणी, पोर्तुगीज, इंग्रजी व मराठी या भाषांवर प्रभुत्व मिळविले. कोकणी भाषेतील वृत्तपत्र व्यवसायाचे ते जनक मानले जातात. त्यांनी पुणे येथून २ फेब्रुवारी १८८९ रोजी उदेंतेचे साळक (म. शी. ‘पूर्वेचे कमळ’) ह्या नियतकालिकाचा पहिला अंक प्रकाशित केला. हे कोकणी भाषेतील सर्वांत आद्य नियतकालिक होय. प्रारंभी ते मासिकरूपात प्रसिद्ध होत असे, पुढे त्याचे पाक्षिकात रूपांतर झाले. ते रोमन लिपीत होते परंतु या लिपीत काही बदल करून सोझा यांनी ‘मारियान’ ही नवी लिपी वा लेखनपद्धती विकसित करून तिचा वापर केला. या नियतकालिकातून त्यांनी बार्देशी व्याकरणावर लेख लिहिले तथापि १८९४ मध्ये हे नियतकालिक बंद पडल्याने त्यांची ही लेखमाला अपूर्ण राहिली. पणजीहून प्रसिद्ध होत असलेल्या उ येराल्द या पोतुर्गीज नियतकालिकातून त्यांनी एजोबुदेजा या टोपण-नावाने कोकणी भाषेसंबंधी अभ्यासपूर्ण लेख लिहिले. त्यांनी कोकणीतून विविध प्रकारचे विपुल लेखन केले : दौत्रिन क्रिस्ता (१८९७), क्रिस्तावांची दोतोर्न गोंयचे भाशेत (१८९८), इव्हा आनी मारी (१८९९), पिएदाद सायबिणीची आनी साबार दुसरी गायना (१९०१), रिसुरेस्सांव द कोंकानी (पोर्तुगीज, १९०५), खुशालपणाचो घराबो आनीं पंचवीस कुंवर. त्यांच्या क्रिस्तांव घराबो व सर्गाचो थेवो या कादंबऱ्या त्यांच्या मृत्यूनंतर अनुक्रमे १९११ व १९१५ साली प्रसिद्ध झाल्या. क्रिस्तांव घराबो ही त्यांची कादंबरी ख्रिस्ती समाजजीवनाचे यथार्थ चित्रण करते. ही कादंबरी कोकणी साहित्यातील पहिली कादंबरी असल्यामुळे ती कोकणी साहित्याच्या इतिहासात मैलाचा दगड मानली जाते. इव्हा आनी मारी हे एक खंडकाव्य असून त्याच्यावर महाकवी ⇨ दान्तेच्या डिव्हाइन कॉमेडी या महाकाव्याचा तसेच प्रबोधनकालीन पोर्तुगीज महाकवी ⇨ लुईज द कामाँइशच्या (सु. १५२४-१५८०) काव्याचा प्रभाव जाणवतो. त्यांनी कोकणी भाषेचे व्याकरण व ध्वनिशास्त्र या दोन बाबींवर सखोल संशोधन केले. रोमन लिपीचा वापर करून कोकणी लिहिताना ज्या मर्यादा येतात, त्यावर त्यानी ‘मारियान’ लिपीचा शोध लावला व ती प्रचारात आणण्याचा प्रयत्न केला. या लिपीवर त्यांनी एक पुस्तिकाही लिहिली.

ते मुंबई येथे मरण पावले.

बोरकर, माधव