साल्दान्य, मारियान दोतोर : (२६ जून १८७८–२३ ऑक्टोबर १९७५). विख्यात गोमंतकीय इतिहासतज्ज्ञ तसेच संस्कृत, मराठी आणि कोकणी या भाषांचे गाढे विद्वान व संशोधक. त्यांचा जन्म उसकई (ता. बार्देश, गोवा) येथे एका सुशिक्षित व सुखवस्तू कुटुंबात झाला. हिस्तोरिया दे गोवा ह्या ग्रंथाचे कर्ते फादर गाब्रीएल साल्दान्य हे त्यांचे चुलते होत. त्यांच्याकडून मारियान यांना संशोधनाचा वारसा लाभला. त्यांचे पोर्तुगीज माध्यमातील ‘लायसियम’ (यूरोपीय माध्यमिक शैक्षणिक अर्हता) पर्यंतचे शिक्षण म्हापसा येथे झाले. पोर्तुगीज भाषेचे उच्च शिक्षण घेतल्यानंतर त्यांना मराठी आणि संस्कृत शिकण्याची गोडी लागली. अथक परिश्रम करून त्यांनी ह्या भाषांवर प्रभुत्व मिळविले. संस्कृतच्या ज्ञानाचा त्यांना पुढे भाषाविषयक व अन्य संशोधनकार्यात बराच फायदा झाला व ते प्राच्यविद्यापंडित म्हणून प्रसिद्घी पावले. लायसियमचे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी तत्कालीन ‘इस्कोल मेदिका दे गोवा’ या वैद्यक महाविद्यालयातून वैद्यकीय शिक्षण घेतले, तसेच औषधनिर्माणशास्त्र (फार्मसी) शाखेचीही पदवी संपादन केली तथापि वैद्यक व्यवसायापेक्षा ते भाषा, इतिहास इ. विषयांवरील संशोधनकार्यांतच अधिक रमले. आयुष्यभर ते याच क्षेत्राशी निगडित राहिले. कालांतराने त्यांची ‘लिसेव नासियोनाल’ ह्या शासकीय उच्च शिक्षणसंस्थेत प्राध्यापकपदी नियुक्ती झाली. १९२९ मध्ये त्यांनी लिस्बनला प्रयाण केले आणि लिस्बन विद्यापीठात संस्कृत भाषा व साहित्य या विषयांचे प्राध्यापकपद भूषविले.

भाषाविषयक संशोधनामध्ये कोकणी भाषा हा त्यांच्या व्यासंगाचा प्रमुख विषय होता. प्राच्यविद्याविषयक इतर ज्ञानशाखाही त्यांच्या संशोधनकक्षेत समाविष्ट होत्या. बहुभाषाकोविद असल्याने ते आपल्या भाषाविषयक संशोधनासाठी लिस्बनसह लंडन, माद्रिद, रोम, पॅरिस इ. यूरोपीय शहरांतील ग्रंथालये व पुरातत्त्वसंस्था यांना सतत भेटी देत असत व आपल्या कार्याला पूरक अशी माहिती जमवीत. त्यांनी लंडन, माद्रिद, रोम, पॅरिस या शहरांबरोबरच पोर्तुगाल, ब्राझील, गोवा व इतर ठिकाणच्या प्रतिष्ठित संशोधनपत्रिका व नियतकालिकांतून आपल्या आवडीच्या विषयांवर शेकडो लेख लिहिले. रेव्हिस्त दु कुल्तुर, ब्राझील बुलेटिन ऑफ ओरिएंटल अँड आफ्रिकन स्टडिज, लंडन बोलेती दु इंस्तीत्युत वास्को द गामा, पणजी इ. संशोधनपत्रिकांनी त्यांचे लेख प्रसिद्घ केले.

साल्दान्य यांची काही पुस्तकेही प्रसिद्घ झाली आहेत. संस्कृत भाषा आणि साहित्य यांची पाश्चात्त्य जगाला ओळख करून देणारे द इंपॉरतान्सीय दु संस्कृत हे पुस्तक त्यांनी १९१६ मध्ये लिहिले. कोकणी व मराठी या दोन्ही भाषा महाराष्ट्री संस्कृतपासून विकसित झालेल्या असून, या भाषांच्या सखोल अभ्यासासाठी संस्कृत भाषा ही अत्यावश्यक असल्याचे त्यांनी या पुस्तकात प्रतिपादन केले आहे. महाकवी कालिदासाच्या मेघदूत ह्या खंडकाव्याचा मेघदूत ओव मेसाज दु एग्‌झीलादु (१९२०) या शीर्षकाने त्यांनी केलेला पोर्तुगीज अनुवाद पोर्तुगीज साहित्याच्या इतिहासात महत्त्वाचा मानला जातो. पोर्तुगीजमधील हे एकमेव संस्कृत भाषांतर होय. फादर स्टीफन्स यांचे ख्रिस्ती धर्माची ओळख करून देणारे दौत्रिना क्रिस्तां हे पुस्तक त्यांनी संपादित करून त्याची नव्याने आवृत्ती काढली. याव्यतिरिक्त जेझुइट पाद्री अँतॉन्यु साल्दान्य यांच्या उपशमु (सतरावे शतक) या ग्रंथाचा एक भागही त्यांनी नव्याने प्रकाशित केला. कोकणी व्याकरणविषयक ग्रंथही त्यांनी लिहिले. इनिसियासांव ना लिंग्वा कोंकनी (लिस्बन, १९५०) हे कोकणी भाषेचा परिचय करून देणारे पुस्तक त्यांनी लिहिले. अनेक संशोधनपत्रिकांतून व नियतकालिकांतून त्यांनी जे लेख लिहिले, त्यांत भाषा, इतिहास या विषयांबरोबरच लोकसाहित्य, लोकपरंपरा, लोकसंस्कृती इ. विषयांवरचेही अनेक लेख आहेत. त्यांनी हाताळलेल्या अनेकविध विषयांवरून त्यांची विद्वत्ता व बहुश्रुतपणा यांचा प्रत्यय येतो.

सोळाव्या शतकापासून कोकणीची जी अनेक व्याकरणे, विशेषतः मिशनऱ्यांनी, तयार केली, त्यांतील काही उपलब्ध व्याकरणांचा साल्दान्य यांनी अभ्यास केला होता व त्यांवर लेखनही केले होते. या व्याकरणांबद्दलची इत्थंभूत माहिती त्यांनी महान संशोधक अ. का. प्रियोळकर यांना उपलब्ध करून दिली होती. गुरूदेव रवींद्रनाथ टागोरांशीही त्यांचा परिचय व पत्रव्यवहार होता. अखेरच्या दिवसांत त्यांचे वास्तव्य गोव्यात होते.

उसकई येथे त्यांचे निधन झाले.

बोरकर, माधव करमली, नागेश