लक्ष्मणराव सरदेसाई

सरदेसाई, लक्ष्मणराव श्रीपादराव : (१७ मार्च १९०४-४ फेबुवारी १९८६). मराठी व कोकणीमधून लेखन करणारे प्रसिद्ध साहित्यिक. सावई-वेरे (फोंडा, गोवा) येथे जन्म. पणजीला ‘लिसेव’चा सात वर्षांचा अभ्यासक्रम त्यांनी १९२५ मध्ये पूर्ण केला, तसेच ‘इंश्तितूतु कोमेर्सियल’ची पदविका घेतली. त्यानंतर त्यांनी म्हापश्याला ‘कुलॅजियु इन्दियानु’ नावाची खाजगी शिक्षणसंस्था स्थापन केली. तेथे त्यांनी पाच वर्षे काम केले. पुढे गोवा विदयाप्रसारक मंडळाने चालविलेल्या फोंडयाच्या आलमैद कॉलेजचे प्रमुख व संचालक म्हणून दहा वर्षे त्यांनी काम पाहिले व त्या काळात संस्था भरभराटीस आणली. त्यानंतर त्यांनी मडगाव येथे ‘इंश्तितूतु रेनास्सेंस’ हे लिसेवचे सात वर्षाचे शिक्षण देणारे खाजगी विदयालय स्थापन करून ते पाच वर्षे चालविले. त्यांनी गोव्याच्या स्वातंत्र्यसंग्रामात भाग घेतला, तसेच गोव्याच्या राष्ट्रीय काँग्रेसच्या संस्थापकांपैकी ते एक होते. १९४६ मध्ये सत्यागहात भाग घेतल्यामुळे त्यांना एक महिना व पुढे १९४७ मध्येही काही काळ कारावास भोगावा लागला. १९४९ मध्ये ते मुंबईला गेले व तेथे दहा वर्षे राहून त्यांनी सभा, परिषदा, लेखन यांच्याव्दारे गोमंतक स्वातंत्र्य आंदोलनाचे कार्य केले. ‘गोवा पोलिटिकल कॉन्फरन्स’च्या एका अधिवेशनाचे ते स्वागताध्यक्ष होते. १९५९ साली ते दिल्लीला गेले व तेथे आकाशवाणीच्या कोकणी-पोर्तुगीज विभागाचे प्रमुख म्हणून त्यांनी १९६३ पर्यंत काम पाहिले. १९६३ मध्ये ते गोव्याला परतले व त्यांनी गोवा विलीनीकरणाच्या विरोधी प्रचार-आघाडीत काम केले.

त्यांनी वयाच्या अठराव्या वर्षी ‘सौमित्र’ या टोपणनावाने भारत या साप्ताहिकात मराठीतून लेखन करण्यास सुरूवात केली. हिंदू उ एराल्दु, प्रकाश, तसेच गोव्यातील केसरी इ. नियतकालिकांतून पोर्तुगीज व मराठी भाषांतून त्यांनी सातत्याने लेखन केले. १९२९ पासून यशवंत, रत्नाकर अशा मासिकांतून त्यांच्या कथा प्रसिद्ध होऊ लागल्या. ह्याच सुमारास यशवंत मासिकाने १९३० साली कथास्पर्धेत त्यांच्या‘मोहिनी’ या कथेस दुसरे पारितोषिक मिळाले. कल्पवृक्षाच्या छायेत हा त्यांचा पहिला मराठी कथासंग्रह १९३४ मध्ये प्रकाशित झाला. त्या पाठोपाठ त्यांचे सागराच्या लाटा (१९३५), वादळातील नौका (१९३६), ढासळलेले बुरूज (१९४०), अनितेचे दिव्य (१९४४), संसारातील अमृत (१९५१), सोनेरी ऊन (१९६४), निवारा (१९६९) इ. कथासंग्रह प्रसिद्ध होत गेले. ह्या कथासंग्रहांनी प्रादेशिक मराठी साहित्यात मोलाची भर घालणारा महत्त्वाचा कथाकार, असा लौकिक त्यांना प्राप्त करून दिला. गोमंतकाची निसर्गरम्य पार्श्वभूमी, तेथील मंदिरे व चर्चवास्तू, गोवेकर हिंदू व क्रिस्ती लोकजीवनाचे प्रभावी चित्रण इ. वैशिष्टये ह्या कथांतून दृग्गोचर होतात. मांडवी ! तू आटलीस ? (१९४७) ह्या त्यांच्या प्रादेशिक कादंबरीतून पोर्तुगीज राजवटीतील गोवेकरांच्या अवनत, ऱ्हासशील जीवनाचे व त्यातील व्यथा-वेदनांचे प्रभावी चित्रण केले असून, हिंदू-क्रिश्चनांच्या ऐक्यातूनच ह्या व्यथांचा निरास होऊ शकेल, असे सूचित केले आहे. त्यांच्या काही कथांत प्रणयभावनांच्या विविध छटा रंगविणारी शृंगारिक वर्णनेही आढळतात. प्रादेशिकतेपलीकडे जाऊन काही नवे विषय व वैविध्यपूर्ण भावावस्थांचे चित्रणही त्यांनी काही कथांतून केले. न्यूयॉर्क हेराल्ड ट्रिब्यून ने घेतलेल्या भारतीय भाषांच्या कथास्पर्धेत त्यांच्या ‘मोहोर’ या मराठी कथेस पहिले पारितोषिक मिळाले (१९५१). लक्ष्मणरेषा (१९५७) ह्या त्यांच्या निवडक कथांच्या संग्रहाला १९५८ च्या गोमंतक साहित्य संमेलनाच्या विलेपार्ले अधिवेशनात सुवर्णपदक मिळाले. गोव्याकडची माणसं (१९८१) ह्या त्यांच्या व्यक्तिचित्रसंग्रहात पोदेर, रेंदेर, शेट, भगत अशा प्रातिनिधिक गोमंतकीय माणसांची हृदय व्यक्तिचित्रे रेखाटली असून, त्यांतून पोर्तुगीज राजवटीतील वैशिष्टय पूर्ण गोमंतकीय लोकजीवन त्याच्या सर्व अंगोपांगांसह मूर्तिमंत साकार झाले आहे. ह्या व्यक्ती म्हणजे गोव्याच्या लोकसंस्कृतीच्या जणू शिल्पकारच होत्या. सरदेसाई यांनी अनेक फ्रेंच व पोर्तुगीज लघुकथांची मराठी भाषांतरे केली. तसेच आल्बेअर काम्यूच्या L’etranger (१९४८) ह्या फ्रेंच कादंबरीचे जगावेगळा (१९५८) हे मराठी भाषांतर केले. त्याला महाराष्ट्र शासनाचे पारितोषिक मिळाले. फांसीश्कु लुईश गॉमिशच्या उश बामानिश या पोर्तुगीज कादंबरीचे ब्राह्मण (१९७७) हे मराठी भाषांतर त्यांनी केले. कुडचडे येथील पंधराव्या गोमंतक मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते (१९७७). वेचक लक्ष्मणराव हे त्यांच्या निवडक साहित्याचे संकलन प्रसिद्ध आहे.

१९५० पासून त्यांनी कोकणीमध्ये लेखन करण्यास सुरूवात केली. निबंध, लेख, कविता, लघुनाटये अशा विविध प्रकारांत त्यांनी कोकणीमधून विपुल लेखन केले. त्यांची भाषा खास प्रादेशिक बोलीवैशिष्टयांनी संपन्न आहे. त्यांनी मौलिक स्वरूपाचे समीक्षालेखनही केले. कथाशिल्प (१९७७) हा त्यांचा समीक्षागंथ मूलगामी समीक्षेच्या दृष्टीने लक्षणीय आहे. आंतरराष्ट्रीय बालक वर्षानिमित्त (१९७९) त्यांनी मुलांसाठी रामग्याली वागाभोवंडीपापडम् कवल्यो ही पुस्तके लिहिली. त्यांचे खबरी कांय कर्मांच्यो, कांय वर्मांच्यो हे आत्मकथन वैशिष्टयपूर्ण असून, त्याला १९८२ मध्ये साहित्य अकादेमीचा पुरस्कार लाभला. प्रसिद्ध कोकणी साहित्यिक ⇨ मनोहरराय सरदेसाय हे त्यांचे पुत्र होत.

मुंबई येथे लक्ष्मणराव सरदेसाईंचे निधन झाले.

इनामदार,श्री. दे.