शणै गोंयबाब : (२३ जून १८७७ – ९ एप्रिल १९४६). आधुनिक कोकणी साहित्याचे जनक. मूळ नाव वामन रघुनाथ शणै वर्दे वालावलीकार. जन्म डिचोली (गोवा) येथे. मराठी प्राथमिक शिक्षणानंतर मुंबईतील गिरगावच्या मराठा हायस्कूलमधून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण (१८९८).

त्यांनी रामराज्याभिषेक हे आपले मराठी नाटक अण्णासाहेब किर्लोस्कर यांना दाखविले. अण्णासाहेबांनी नाटक ठीक असले, तरी भाषा कृत्रिम व अस्वाभाविक वाटते, असा अभिप्राय दिला. परिणामी आपल्या मातृभाषेविषयी – कोकणीविषयी-त्यांची अस्मिता उफाळून आली व त्या भाषेच्या अभ्यासास तसेच कोकणी भाषकांच्या सांस्कृतिक वारशाचा शोध घेण्याच्या कार्यास त्यांनी स्वतःला वाहून घेतले. गोव्यातील आसगांव गावी शिक्षक म्हणून, नंतर कराचीच्या नगरपालिकेत कारकून म्हणून व पुढे मुंबईत इटालियन वाणिज्य दूतावासात त्यांनी अल्पकाळ काम केले. पुढे ‘ल्यूसियस ब्रुनिया’ या जर्मन व्यवसायसंस्थेत त्यांनी उच्चतम पदावर नोकरी केली (१९०६-२६). या नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी कोकणी भाषा-साहित्याच्या अभिवृद्धीसाठी सलग दोन दशके मौलिक कार्य केले.

शणै गोंयबाब यांनी बालसाहित्य, कथा, नाटक, इतिहास, चरित्र, संशोधन, भाषांतर अशा विविध विषयांत विपुल व दर्जेदार लेखन केले आहे. भुरग्यांलो इष्ट (म.शी. मुलांचा मित्र, १९३५) या पुस्तकात गद्यपद्य पाठ आहेत. त्यातून कोकणीविषयी प्रेम आणि अभिमान जागविण्याचा प्रयत्न दिसून येतो. जादुचो जंबो (म. शी. जादूचे बेट, १९६८) यात शेक्सपिअरच्या टेंपेस्ट नाटकाची संक्षिप्त कथा कोकणीत दिली आहे. गोमन्तोपनिषत (खंड १ व २ : १९२८ –३३) यात कथा-संकलने आहेत. त्यांतून लेखकाचे जीवनविषयक तत्त्वज्ञान प्रकट झाले आहे. या कथा लोकप्रियही झाल्या. संवसार-बुट्टी (म. शी. महापूर, खंड – २) या कादंबरीचे स्वरूप महाकाव्यसदृश असून, त्यात जागतिक श्रेष्ठ धर्मग्रंथातील मतांचे आणि विचारांचे सार आढळते.

फ्रेंच नाटककार मोल्येरच्या ल मेदसँ मालग्रे या नाटकावरून मोगांचे लग्न (म. शी. प्रेमविवाह, १९३८), तर लाव्हार या नाटकावरून पोवनाचे तपले (म. शी. मोहोरांचा हंडा, १९४८) ही स्वैर नाट्यरूपांतरे गोंयबाब यांनी केली. झिल्बा राणो (१९५०) हे त्यांचे आणखी एक नाटक.

त्यांनी १९१० च्या सुमारास आल्बुकेर्कान गोंय कशें जिखलें (म. शी. अल्बुकर्क याने गोवा कसा जिंकला, १९५५) हे पुस्तक लिहिले. गोमंतकीयांच्या गोमंतकाबाहेरील वसाहतीसंबंधीची त्यांची पाच व्याखाने गोंयकारांची गोंया भायली वसणूक (पैलें खण्ड) या नावाने प्रसिद्ध झाली (१९२८). वलिपत्तनाचो सोद (म. शी. वलिपत्तनाचा शोध, १९६२) यात शिलाहार राज्यांच्या एका ताम्रपट्टात उल्लेखिलेल्या वलिपत्तन गावासंबंधी (सध्याचे कुकळ्ळी गावाजवळचे बाळ्ळी हे गाव) संशोधन आहे. पुण्यात्मो राम कामती (म. शी. पुण्यात्मा राम कामत, १९३९) या चरित्रग्रंथात अठराव्या शतकातील एका कर्तबगार गोमंतकीयाची आत्मसन्मात गमावल्यामुळे झालेली शोकांतिक वर्णिली आहे. शणै गोयबाब यांनी कोंकणी भाशेचे जैत (म.शी. कोकणी भाषेचा विजय, १९३०) या संशोधनपर ग्रंथात कोकणी ही स्वतंत्र भाषा असून ती मराठीची बोली नव्हे, हे मत पुराव्यांनिशी मांडले आहे. या पुस्तकात तीन मराठी लेखही आहेत. कोंकणी नादशास्त्र (म.शी. कोकणीचा ध्वनिविचार, १९४०) व कोंकणीची व्यायरणी बादावळ (म.शी. कोकणीची वैय्याकरणी संरचना, १९४९) हे त्यांचे तौलनिक व्याकरणविषयक ग्रंथ. भगवंताले गीत (१९३५) हे श्रीमदभगवतगीतेचे कोकणी भाषांतर होय. नवे-गोंय या त्रैमासिकाच्या संपादनातही त्यांच्या मोलाचा वाटा होता. मुंबईमध्ये भरलेल्या कोकणी परिषदेच्या तिसऱ्या अधिवेशनाचे (१९४२) शणै गोंयबाब स्वागताध्यक्ष होते. या प्रसंगीचे त्यांचे भाषण येवकार अध्यक्षांचे उलोवप (१९४५) नावाने पुस्तकरूपात प्रसिद्ध झाले आहे. आधुनिक कोकणी साहित्याचे व प्रबोधनाचे जनक म्हणून त्यांचे स्थान मोठे आहे. मुंबई येथे त्यांचे निधन झाले.

संदर्भ : १. आमोणकार, शांताराम वा. शणै गोयबाब (एक वळख), पणजी, १९९४.

           २. नायक, रा. ना शणै गोयबाब, नवी दिल्ली, १९८०.

सरदेसाय, मनोहरराव