हंगूल (सर्व्हस एलिफस हंग्लू)

हंगूल : स्तनी वर्गाच्या समखुरी (पायाच्या खुरांची संख्या सम असलेल्या आर्टिओडॅक्टिला) गणातील सर्व्हिडी या कुलामधील एक प्राणी. सर्वसाधारणपणे तो काश्मीर स्टॅग (काश्मीर बारशिंगा) या नावाने ओळखला जातो. भारतात जम्मू व काश्मीर येथे मोठ्या प्रमाणात त्यांचा आढळ असून ते काश्मीर दरीच्या उत्तरेस व आसपासच्या दऱ्यांमध्ये आढळतात. त्यांचा आढळ सस.पासून १,५००-३,७०० मी. उंचीवर असतो. तो तांबड्या मृगाच्या प्रजातीतील असून त्याचे शास्त्रीय नाव सर्व्हस एलिफस हंग्लू असे आहे. शौ (सर्व्हस एलिफस वालिची) हाप्राणी सुद्धा तांबड्या मृगाच्या प्रजातीतील असून भूतानमध्ये आढळतो. भारतीय उपखंडात याच्या दोन उपजाती आढळतात. यूरोपमधील तांबड्या मृगाची सर्व्हस एलिफस लिन्नाआस ही उपजाती उत्तर आफ्रिका, उत्तर अमेरिका व हिमालयाच्या उत्तरेस आढळते.

हंगूल दिसावयास खूप आकर्षक व सुंदर असून त्याचा रंग फिकट पिवळा ते गडद तपकिरी असा असतो. त्याचे डोके मोठे व मुस्कट अरुंद असते. डोक्यासहित शरीराची लांबी २१३-२२८ सेंमी. असते. त्याची खांद्यापर्यंतची उंची १२०-१४० सेंमी. असून शेपटी आकाराने लहान असते. नराचे वजन २००-३०० किग्रॅ., तर मादीचे १००-१५० किग्रॅ. असते. नरामध्ये उदर गडद तपकिरी रंगाचे असून दोन्ही बाजू व पायफिकट रंगाचे असतात. नराच्या मानेवरील केस लांब, दाट व राठअसतात. ओठ, हनुवटी, पोटाखालचा भाग व कुल्ले पांढरे असतात. पाडस व वयस्कर माद्यांच्या शरीरावर पांढरे ठिपके असतात. उन्हाळ्यातत्यांचा रंग फिकट होतो व फर इतर ऋतूच्यामानाने तेजस्वी होते. थंडीत त्यांचा रंग गडद होतो.

हंगूलमध्ये नराची शिंगे आकर्षक, पसरट व विविध आकारांत असतात, तर मादीला शिंगे नसतात. प्रौढामध्ये शिगांची लांबी सु. १२७ सेंमी. असून शिंगाला ५-१४ शाखा फुटतात. तर काही वेळा त्यांची संख्या त्यापेक्षाही जास्त असते. मार्च-एप्रिलमध्ये शिंगे गळून पडतात व त्याजागी नवीन येतात. सप्टेंबर अखेर नवीन शिंगे चांगली कठीण बनतात. [→ मृगशृंगे आणि शिंगे ].

हंगूल झाडांचा कोवळा पाला व गवत यांवर उपजीविका करतो. तो एकटा किंवा कळपाने हिंडतो. तो सतत एका जंगलातून दुसऱ्या जंगलात स्थलांतर करतो. थंडीत उंचीवरून खाली येतो आणि उन्हाळ्यात परत उंच जागी जातो. तो उन्हाळा सस.पासून २,५५०-३,६५० मी. उंचीवर घालवतो. ऑक्टोबरच्या सुरुवातीस माद्यांमध्ये नर येऊन मिसळतात. माजाच्या काळात माद्यांवर ताबा मिळविण्यासाठी नरांची एकमेकांशी झुंज होते. ताकदवान नर अनेक माद्यांचा ताबा मिळवितो. नोव्हेंबरमध्ये वाळलेल्या पानांनी जमीन झाकली जाताच माद्यांना सोडून नर परत उंचावर जातात. एप्रिलमध्ये नवीन पाडसे जन्माला येतात. तीन वर्षांनीत्यांची पूर्ण वाढ होते. त्याचे सरासरी आयुर्मान २५ वर्षे असते.

शौ हा प्राणी मूळचा दक्षिण तिबेटमधील चुंबी दरी आणि तिच्या लगतच्या भूतानच्या जंगलातील आहे. ही उपजाती आकाराने हंगूलपेक्षा मोठी असून तिची खांद्यापर्यंतची उंची १४०-१५० सेंमी. असते.तिच्या शिंगांची लांबी सु. १४२ सेंमी. असून मुख्य दांडा पुढे झुकलेला असतो. नराचे वजन २००-२५० किग्रॅ. असते.

तिबेटच्या सरहद्दीवरील जंगलात सर्व्हस एलिफस मक्रीइली (पैलू) ही दुसरी उपजाती आढळते. ती व्हाईट स्टॅग या नावाने ओळखली जाते. तिचा रंग पांढरा असून आकार व शिंगे हंगूलासारखीच असतात.

हंगूलचे जंगलामध्ये मुख्यत्वे चार नैसर्गिक शत्रू आहेत. त्यामध्ये हिमालयन तपकिरी अस्वल, हिमालयन काळे अस्वल, बर्फ चित्ता (स्नो लेपर्ड) व चित्ता यांचा समावेश होतो. मानव सुद्धा त्यांचा मोठा शत्रू आहे. शिंगांसाठी व कातडीसाठी केलेल्या शिकारीमुळे त्यांची संख्या खूप घटली आहे. तसेच जंगलतोडीमुळे त्यांचा नैसर्गिक अधिवास धोक्यात आला आहे. त्यांची संख्या १९७० सालापर्यंत खूप घटल्यामुळे त्यांच्या शिकारीवर वन्य जीवांचे संरक्षण कायद्यान्वये बंदी घालण्यातआली आहे. जम्मू व काश्मीर या राज्याचा तो राज्यप्राणी असून पोस्टव टेलिग्राफ विभागाने काश्मीर स्टॅगचे पोस्टाचे तिकीट तयार केले आहे.

दातार, म. चिं. मगर, सुरेखा अ.