मिश्र, लक्ष्मीनारायण : (१९०३–    ). आधुनिक हिंदी नाटककार. जन्म उत्तर प्रदेशात बस्ती (जि. आझमगढ) येथे.१९२८ मध्ये ते बनारस हिंदू विद्यापीठातून बी. ए. झाले. काव्यलेखनाने साहित्यसेवेची सुरुवात. अंतर्जंगत (१९२५) हा त्यांच्या आरंभीच्या कवितांचा संग्रह. मिश्र नंतर नाट्यलेखनाकडे वळले. त्यांच्या नाटकांवर इब्सेन व शॉ यांच्या नाटकांचा प्रभाव आहे तथापि त्यांच्या नाटकांत भावुकता व काल्पनिकतेची जागा प्रखर वास्तववादी जीवनचित्रणाने घेतलेली दिसते. हिंदीत समस्याप्रधान नाटकांची सुरुवात सर्वप्रथम करणारे नाटककार म्हणून त्यांचे स्थान वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यांनी पौराणिक तसेच ऐतिहासिकही नाटके लिहिली असली, तरी त्यांची सामाजिक नाटके संख्येने अधिक असून ती विशेष महत्त्वपूर्णही मानली जातात. कलेच्या दृष्टीने त्यांची नाटके पाश्चात्य धर्तीची असून ती बहुतांश गद्य आहेत. त्यांनी अनेक एकांकिकाही लिहिल्या असून त्यांवर नभोनाट्यतंत्राचा प्रभाव दिसून येतो.

त्यांची उल्लेखनीय नाटके व इतर साहित्यकृती अशा : अशोक (१९२७), संन्यासी (१९३१), राक्षस का मंदिर (१९३१), मुक्ति का रहस्य (१९३२), राजयोग (१९३४),सिंदूर की होली (१९३४), आधी रात (१९३६), गरूडध्वज (१९४५), नारद की वीणा (१९४६), वत्सराज (१९४९), दशाश्वमेध (१९५०), वितस्ता की लहरे (१९५३),वैशाली में वसन्त (१९५४), जगद्‌गुरू एवं मृत्युंजय (१९५५), चक्रव्यूह (१९५५), अपराजित (१९६२) इ. त्यांची स्वतंत्र नाटके होत. इब्सेनच्या दोन प्रख्यात नाटकांचा त्यांनी समाज के स्तंभ आणि गुडिया घर ह्या नावांनी हिंदीत अनुवाद केला आहे. अशोक वन (१९५०) आणि प्रलय के पंख पर (१९५१) हे त्यांचे सामाजिक स्वरूपाचे, तर भगवान मनु तथा अन्य एकांकी (१९५७) हा पौराणिक स्वरूपाचा एकांकिकासंग्रह होय. सेनापतिकर्ण हे १९३५ मध्ये लिहावयास घेतलेले त्यांचे महाकाव्य आजही अपूर्णच आहे.

विचारांची मौलिकता, उठावदार व्यक्तिचित्रण आणि भारतीय संस्कृतीचा ओजस्वी पुरस्कार ही त्यांच्या नाट्यलेखनाची वैशिष्ट्ये व बलस्थानेही मानली जातात.

संदर्भ :१. मिश्र, उमेशचंद्र, लक्ष्मीनारायण मिश्र के नाटक, अलाहाबाद, १९५८.

           २. श्रीवास्तव, गोविंदप्रसाद, हिंदी मे समस्या नाटक, वाराणसी, १९५५.

दुबे, चंदूलाल द्रविड, व्यं. वि.