विद्यापति : (सु. १३८०-सु. १४६०). हिंदीची उपभाषा मैथिलीचे सर्वश्रेष्ठ कवी. ‘मैथिल कोकिळ’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या विद्यापतींचा जन्म दरभंगा जिल्ह्यातील विसपी गावात झाला. त्यांच्या जन्मतारखेबद्दल तसेच मृत्युतारखेबद्दलची बरेच वाद आहेत परंतु पंधराव्या शतकाच्या मध्यापर्यंत त्यांनी लेखन केले होते, असे सांगितले जाते. विद्यापतींना लेखनाचे बाळकडू उपजतच लाभले होते. त्यांचे वडील गणपती ठाकूर यांनी गंगाभक्तितरंगिणी हे पुस्तक लिहिले होते. त्यांच्या पणजोबांनी व खापर पणजोबांनी देखील संस्कृत भाषेत ग्रंथनिर्मिती केली होती.

विद्यापतींची एकूण १५ पुस्तके उपलब्ध आहेत. त्यांपैकी ११ संस्कृत भाषेत, २ अपभ्रंश भाषेत व २ मैथिली भाषेत आहेत. विद्यापतींना संस्कृत, हिंदी, अपभ्रंश, बंगाली व मैथिली या भाषा अवगत होत्या. त्यांचे व्यक्तिमत्त्व बहुमुखी होते. ते दरबारी कवी होते, त्याचप्रमाणे जनसामान्यांचे देखील कवी होते. त्यांच्या काव्यात शृंगारस आणि भक्तिरस विपुल प्रमाणात आढळतो.

महाराज कीर्तिसिंहांना ऐकविण्यासाठी लिहिलेला कीर्तिलता हा काव्यसंग्रह हे विद्यापतींचे पहिले पुस्तक मानले जाते. कारण या पुस्तकाच्या शेवटच्या श्लोकात कवी स्वतःला ‘खेलन कवी’ म्हणतो, म्हणजे त्यावेळी कवी वयाने खूप लहान असला पाहिजे. कीर्तिलता आणि कीर्तिपताका ही दोन वीरकाव्ये अपभ्रंश किंवा अवहट्ट भाषेत लिहिलेली असून, त्यांत राजा कीर्तिसिंह व राजा शिवसिंह यांच्या शौर्यांचे वर्णन केले आहे. या दोन्ही पुस्तकांना वाङ्‌मयीन व ऐतिहासिक महत्त्व आहे.

संस्कृत भाषेत त्यांनी भूपरिक्रमा, पुरुषपरीक्षा, लिखनावली, शैवसर्वस्वसार, पुराण संग्रह, गंगा वाक्यावली, विभाग सार, दानवाक्यावली,दुर्गाभक्तिरंगिणी, गयापत्तलक आणि वर्षकृत्य ही पुस्तके लिहिली. भूपरिक्रमा हे भूगोल या विषयावर आधारित असून, पुरुषपरीक्षा या ग्रंथात दंडनीतीचे विवेचन केले आहे. लिखनावलीमध्ये पत्रलेखनाबद्दल मार्गदर्शन केले आहे. दुर्गाभक्ति-तरंगिणीशैवसर्वस्वसार या ग्रंथांमध्ये नावांप्रमाणे त्या त्या देवधर्माचे  विवेचन आढळते. या ग्रंथावरून त्यांच्या विद्वत्तेचा व विपुल अनुभवाचा प्रत्यय येतो. बऱ्याच धर्माबद्दल लिहिणारा हा कवी वृत्तीने धर्मनिरपेक्ष होता. विद्यापतिकी पदावलीमणिमंजिरी (नाटक) ही दोन पुस्तके मैथिली भाषेतील लोकप्रिय पुस्तके आहेत. १९६५ मध्ये साहित्य अकादेमीने भारताची सतरावी साहित्यिक भाषा म्हणून मैथिली भाषेला मान्यता दिली. विद्यापती या भाषेतील महत्त्वाचे कवी मानले जातात. पदावलीची भाषा प्राचीन मैथिली आहे. त्यामुळे तिच्यावर ब्रज भाषेचा प्रभाव आढळून येतो. जयदेवांच्या गीतगोविंद परंपरेतील कविता विद्यापतींनी रचली. विद्यापतींच्या हजारो पदांमधून कृष्णप्रेमाची संगीतधारा प्रवाहित झालेली पहावयास मिळते. राधाकृष्णविषयक पदांवर गीतगोविंदचा प्रभाव जरी आढळत असला, तरी विद्यापतींनी आपल्या पदांमधून दैनंदिन जीवनातील उदाहरणे देऊन अतिशय सोप्या भाषेत आपले म्हणणे स्पष्ट केले आहे. त्यामुळे पुढील काळात विद्यापतींच्या पदांवर आधारित बरीच पदे लिहिली गेली. ही सगळी पदे गेय असल्यामुळे आजही मैथिली भाषेतील लोक ती पदे गाताना आढळतात.

अंधश्रद्धा, प्रचलित म्हणी, वाक्प्रचार, रूढी, परंपरा यांविषयी देखील त्यांनी बरीच पदे लिहिली आहेत. श्रुती, स्मृती, इतिहास, पुराणे आणि राजकारण यांतही ते रस घेत असत. १४४० ते १४६० या कालखंडात त्यांनी विभागसागर, दानवाक्यावलीदुर्गाभक्तितरंगिणी ही पुस्तके लिहिली. सुभद्रा झा ह्या लेखिकेने संपादित केलेली विद्यापतींची पदे इंग्रजी भाषेत उपलब्ध आहेत. द साँग्ज ऑफ विद्यापति (१९५४) या पुस्तकाच्या सुरुवातीला १९३ पृष्ठांमध्ये इंग्रजी भाषेत विद्यापतींच्या जीवनाचा व साहित्याचा आढावा घेतला आहे.

विद्यापती फक्त मैथिली आणि हिंदी कृष्णकाव्याचे प्रवर्तक होते असे नाही, तर ते भारतातील सगळ्या आधुनिक भाषांमधील कृष्णकाव्यपरंपरेचे प्रवर्तक मानले जातात. पुढे हिंदी साहित्यात भक्तिकाळातील कृष्णकाव्य लिहिणाऱ्या कवींनी त्यांच्याच पदशैलीचे अनुकरण केले आहे. संस्कृत साहित्यात गीतगोविंदकार जयदेवांचे जे स्थान आहे, तेच स्थान हिंदी साहित्यात विद्यापतींचे आहे.

संदर्भ : 1. Jha, Ramanath, Vidyapati, New Delhi, 1972.

           २. झारी, कृष्णदेव, मैथिली कोकिल विद्यापति, दिल्ली.

           ३. झा, सुभद्रा, विद्यापति गीतसंग्रह, बनारस, १९५४.

सारडा, निर्मला