रामचरितमानस : तुलसीदासविरचित प्रख्यात हिंदी महाकाव्य. हिंदीच्या अवधी बोलीभाषेत १५७६ मध्ये त्यांनी हे महाकाव्य रचले, ते स्वान्तःसुखाय म्हणजे स्वतःच्या अंतःकरणाच्या समाधानासाठी. अनेक हस्तलिखितांच्या आधारे ‘नागरी प्रचारिणी सभे’ने याची शुद्ध व प्रमाणभूत प्रत तयार करून प्रसिद्ध केली आहे (१९४८). या काव्याच्या लेखनाला तुलसीदासांनी १५७४ च्या रामनवमीला अयोध्येत प्रारंभ केला व १५७६ मध्ये ते पूर्ण केले. याचे कथानक राम-रावण युद्धातील रामाच्या विजयापर्यंत व त्यानंतर रामराज्याच्या आदर्शाचे वर्णन करण्यापर्यंत आहे. उत्तरकांडात रामकथेतील सीतेचा त्याग व शंबुकबध हा भाग नाही त्यात केवळ भक्तीचा महिमा वर्णिला आहे. अनेक आधुनिक विद्वानांप्रमाणे तुलसीदासांनाही मूळ उत्तराखंड प्रक्षिप्त वाटले असावे. याचा काही भाग काशीनगरीत रचण्यात आला. रामचरित हे मानससरोवराप्रमाणे निर्मल, गंभीर, प्रसन्न व सुखप्रद असल्याने तुलसीदासांनी आपल्या कृतीला रामचरितमानस असे नाव दिले असे म्हणतात. वाल्मीकि रामायण अध्यात्म रामायणा प्रमाणे यातही सात कांडे आहेत. रामकथेला सुरूवात करण्यापूर्वी रावणाच्या काही पूर्वजन्मांच्या व रामाच्या पूर्वावतारांच्या कथा सांगितल्या आहेत. शिव-पार्वती यांचे चरित्र, पार्वतीच्या शंका व त्यांचे शिवाने केलेले निरसन इत्यादींद्वारा रामकथेची पार्श्वभूमी तयार केली आहे. तत्पूर्वी तुलसीदासांनी आपली भूमिका व काव्याची प्रस्तावना मांडली आहे. रामचरितमानस मध्ये तुलसी व संत, शिव व पार्वती, याज्ञवल्क्य व भरद्वाज आणि कागभुशुंडी व गरुड यांच्या संवादांचा (चार वक्ते व चार श्रोते) समावेश आहे. रामकथेच्या निरूपणावरच भर दिला गेला असल्याने प्रागंगिक कथांना यात फारसे स्थान नाही. रामाच्या समग्र जीवनाचे दर्शन घडविण्याचा कवीचा उद्देश यात पूर्णपणे सफल झाला आहे. भारतीय महाकाव्याचा तसेच पाश्चात्त्य ‘एपिक’ ची अशी दोन्ही लक्षणे या काव्याला लागू पडतात. कथानकाची सर्गबद्ध रचना, धीरोदात्त नायक, प्राचीन कथावस्तू, दैवी शक्तींचा समावेश, विविध रसांचा आविष्कार व शेवटी आदर्श पात्राचा विजय इ. महाकाव्याची सर्व लक्षणे यात दिसून येतात. त्याची रचना मुख्यत्वे चौपाई व दोहा छंदांत आहे. त्यातील सात कांडांत चौपाई व दोहा छंदांतील एकूण १,०७४ कडबी आली आहेत. ज्ञानेश्वरांप्रमाणे तुलसीदासांनाही शांत रस शृंगाराला जिंकतो, असे वाटते. रामचरितमानसा मध्ये शांत रस प्रमुख मानून इतर रस गौण मानले आहेत. मर्यादापुरूषोत्तमाच्या या महान चरित्रकाव्यात संस्कृत व अवधी, शैव व वैष्णव, निरनिराळे वर्ण व आश्रम, काव्य, तत्त्वज्ञान व चरित्र, राजा व सामान्यजन, ज्ञान, भक्ती व कर्म या सर्वांमध्ये उचित समन्वय दाखविण्यात आला आहे. उदारता, ममता, निर्वैर इ. गुणांनी युक्त अशा रामाचे लौकिक रूप आणि राम, लक्ष्मण, सीता, कौसल्या, भरत, हनुमान इ. सर्वच पात्रांचे आदर्श रूप सर्वांनाच उदात्त व प्रिय वाटते. राम व भरत यांचे एकमेकांबद्दलचे अकृत्रिम प्रेम सहजतेने, संयमपूर्ण व प्रसन्न शैलीत तुलसीदासांनी व्यक्त केले आहे. तुलसीदासांनी कथेच्या बाबतीत कालिदासाचा मागोवा घेतलेला दिसतो. या महाकाव्याचे उत्तरकांड तर भक्तिमार्गाची श्रेष्ठता सिद्ध करण्यासाठीच जणू लिहिले आहे. रामचरितमानस हा केवळ उत्तर भारतातीलच नव्हे, तर साऱ्या जगातील एक उत्कृष्ट महान काव्य व धर्मग्रंथ होय. उत्तर भारतात ⇨ रामलीला उत्सवाचा प्रारंभ रामचरितमानासामुळेच झाला. याच्याच प्रेरणेने ⇨केशवदासां नी आपले रामचंद्रिका हे काव्य रचले. रामचरितमानसाची मराठी, बंगाली, इंग्रजी, रशियन इ. आधुनिक भारतीय व यूरोपीय भाषांत भाषांतरे झाली आहेत.

मराठीत त्याचे १९१३ मध्ये (दुसरी आवृ. १९४०) यादव शंकर जामदार, १९२० मध्ये ग. स. भोपटकर आणि १९४९ मध्ये द. ना. कर्वे यांनी गद्य वा पद्य अनुवाद केले आहेत. १९५२ मध्ये रा. चिं. श्रीखंडे यांनी सुश्लोकमानस हा अनुवाद केला.

रामचरितमानस हे चरित्रकाव्य तर आहेच पण त्याचबरोबर त्याचा नायक पुरूषोत्तम राम हा कवीचे आराध्यदैवत असल्याने ते त्याच्या रामभक्तीचे प्रतीकही आहे. म्हणूनच ह्या तिन्ही अंगांनी ह्या काव्याकडे पाहणे उचित ठरेल.

तुलसीदासांनी मूळ रामायणातील कथानकात व त्यातील प्रसंगांत मूलभूत बदल केले नाहीत रामचरिताचे मूळ रूपच त्यात कायम राखले. सहजसुंदर शैली हा चरित्र-काव्याचा मोठा गुण मानला जातो. आणि मानसमध्ये तो पुरेपूर प्रत्ययास येतो. आपले पांडित्य, काव्यकौशल्य, बहुश्रुतपणा यांचे प्रदर्शन करण्याचा मोह तुलसीदासांनी कटाक्षाने टाळला आहे. श्रेष्ठ महाकाव्याच्या कसोटीस ते पुरेपूर उतरते, म्हणूनच त्याचा अंतर्भाव जागतिक श्रेष्ठ महाकाव्यांत केला जातो.

तुलसीदासांच्या रामभक्तीचा सुंदर आविष्कार त्यात झालेला दिसतो. सबंध उत्तर भारतावर मानसची जी विलक्षण मोहिनी व पकड आहे, तिचे इंगित त्यातील उच्च प्रतीच्या अत्यंत प्रासादिक काव्यगुणात आणि भक्तिमार्गी धार्मिक आवाहनात आहे. गेली सु. ४०० वर्षे उ. भारतात मानसाचे वाचन-पठण घरोघर होत आले असून, तेथील आध्यात्मिक-धार्मिक जीवनावर त्याचा विलक्षण प्रभाव पडलेला आहे. एका धर्मग्रंथाच्या स्वरूपात मोठ्या आदरभावनेने त्याकडे पाहिले जाते. त्याच्या आधारे रामलीला उत्सवही दरवर्षी गावोगाव साजरा केला जातो. उत्तर भारतातील तो सर्वाधिक लोकप्रिय ग्रंथ असून त्याने जीवनाच्या सर्वच क्षेत्रांतील उच्च नैतिक आदर्श लोकांपुढे ठेवले आहेत. त्याच्या लोकप्रियतेची व परमादराची अनेक कारणे आहेत तथापि त्यात व्यक्त झालेली वैशिष्ट्यपूर्ण मानवता हे एक महत्त्वाचे कारण सांगता येईल. या मावनतेत औदार्य, त्याग, क्षमा, धैर्य, सहनशीलता, निर्वैरता इ. सद्‍गुणांचा परमोत्कर्ष आढळतो, यातील राम, सीता, भरत, कौसल्या इ. पात्रे या गुणांनी परिपूर्ण आहेत. मानसातील आदर्शवाद तुलसीदासांनी सतत लौकिकाच्या पातळीवरच ठेवला आहे.

रामास भरताविषयी वाटणाऱ्या प्रेमभावनेचा अद्‌भुत विकास हा मानसचा एक विशेष म्हणावा लागेल. अन्य कुठल्याही रामकथाग्रंथात तो आढळत नाही. उदा., चित्रकूट येथील रामाच्या वास्तव्याचे वर्णन किंवा भरताच्या आगमनाची वार्ता ऐकून लक्ष्मण त्याच्या प्रतिकारर्थ उठतो, तेव्हाचे रामाचे उद्‌गार किंवा चित्रकूटातच वसिष्ठांनी भरताचे म्हणणे ऐकून घ्यावे असे रामास म्हटल्यावर रामाने काढलेले उद्‌गार हे प्रसंग या दृष्टीने अभ्यसनीय आहेत. भरताविषयी वाटणाऱ्या रामाच्या प्रेमभावनेचा हा वैशिष्ट्यपूर्ण विकास अन्य रामकथाग्रंथांत आढळत नाही. मानसमध्ये तुलसीदासांनी मानवतेचे जे आदर्श पण व्यावहारिक, लौकिक स्वरूप चित्रित केले आहे, ते तत्कालीन वा पूर्वसूरींच्याही साहित्यात आढळत नाही. कदाचित म्हणूनच त्याला अपूर्व अशी लोकप्रियता वा अत्यंत आदराचे स्थान प्राप्त झाले असावे. एक अत्यंत आदरणीय व अफाट लोकप्रियता लाभलेला महान काव्यग्रंथ म्हणून हिंदी साहित्यात त्याला चिरंतन महत्त्वाचे स्थान आहे.

पहा : तुलसीदास राम रामायण हिंदी साहित्य.

संदर्भ : १. गौड, रामदास, रामचरितमानस की भूमिका, वाराणसी, १९५०.

२. चतुर्वेदी, परशुराम, मानस की रामकथा, अलाहाबाद, १९५३.

३. चौबे, शंभूनारायण, संपा. रामचरितमानस (संशोधित मूलपाठ), वाराणसी, १९४८.

४. जामदार, यादव शंकर, अनु. रामचरितमानस अथवा तुलसीरामायण (गद्यानुवाद), पुणे, १९१३.

५. त्रिपाठी, रामनरेश, सपा. सटीक रामचरितमानस, दिल्ली, १९५५.

६. द्विवेदी, देवनारायण, संपा. रामचरितमानस (देवदीपिका टीकासहित), नववी आवृ. वाराणसी,

१९६१.

७. पोद्दार, हनुमानप्रसाद, तुलसी-रामायण (बडी), गोरखपूर, १९५४.

८. रानडे, गो. मो. तुळशी मंजिऱ्या (मराठी), मुंबई, १९८४.

९. शर्मा, जगन्नाथ, रामचरितमानस की कथावस्तु. दिल्ली. १९५३.

१०. शर्मा, रघुराजशरण, रामचरितमानस चतुःशति, अलाहाबाद, १९७०.

११. शुक्ल, रामचंद्र, गोस्वामी तुलसीदास, बनारस, १९४९.

१२. श्रीखंडे, रा. चिं. सुश्लोकमानस, कोल्हापूर, १९५२.

१३. सिंह, भाग्यवती, तुलसीमानस रत्नाकर, आग्रा, १९६०.

दुबे, चंदूलाल द्रविड, व्यं. वि.