स्थापत्य अभियांत्रिकी : ( सिव्हिल एंजिनिअरिंग ). ही अभियांत्रिकीची एक शाखा आहे. पक्क्या (अचल) बांधकामाची योजना आखणे, त्याचा अभिकल्प (आराखडा) तयार करणे, प्रत्यक्ष बांधकाम करणे, त्याची देखभाल करणे व निगा राखणे इ. गोष्टी स्थापत्य अभियांत्रिकीत येतात. हिच्या व्यापक व्याख्येत निवासी, कार्यालयीन, औद्योगिक इमारती व बांधकामे, पाणीपुरवठ्याच्या सुविधा, वाहितमल (सांडपाणी ) व अपशिष्टे (टाकाऊ पदार्थ) यांची विल्हेवाट, माल व प्रवासी वाहतूक प्रणाली, मानवी जीवनाची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी व सुधारण्यासाठी पर्यावरणाचे नियमन यांसारख्या गोष्टींची संकल्पना, अभिकल्प, उभारणी व व्यवस्थापन करणे यांचा अंतर्भाव होतो. अशा रीतीने रस्ते आणि हमरस्ते, रूळमार्ग, बोगदे, पूल, गोद्या व बंदरे, धक्के, नदीतील व सागरी वाहतूक, लाटारोधक बांधकामे,नळयोजना, वाहितमल व अपशिष्टे यांचे व्यवस्थापन, जलवाहिन्या आणि कालवे, जलसंस्करण संयंत्रे, जलसेतू , विमानतळ, स्थानके, हॉटेले, रुग्णालये, तटबंदी, औद्योगिक संयंत्रे, धरणे व बंधारे, सिंचन, भांडारगृहे, गोदामे, वखारी, स्मारके, नगररचना, अवकाशाचे समन्वेषण, अणुऊर्जा निर्मितीसाठीच्या सुविधा, क्षेपणास्त्रतळ, विद्युत् वाहक तारा, संदेशवहन व रडार यांसाठीचे मनोरे हे स्थापत्य अभियांत्रिकीतील काही महत्त्वाचे विषय आहेत.

तंत्रविद्याविषयक म्हणजे अभियांत्रिकीय सर्व कामे सुरुवातीला लष्करातील मंडळी करीत असत. त्यामुळे सैनिकी अभियांत्रिकी ही संज्ञा रूढ झाली होती. नंतर ही कामे लष्कराबाहेरील (सिव्हिलियन) मंडळी करू लागल्याने सिव्हिल एंजिनिअरिंग ही संज्ञा पुढे आली आणि या शाखेत अभियांत्रिकीतील अनेक कामे केली जात असत. नंतर पुढे अभियांत्रिकीमध्ये विशेषीकृत शाखा पुढे आल्या व त्यांपैकी बांधकामविषयक शाखेला स्थापत्य (सिव्हिल) अभियांत्रिकी म्हणण्यात येऊ लागले.

मराठी विश्वकोशामध्ये स्थापत्य अभियांत्रिकीशी संबंधित स्वतंत्र नोंदी पुढीलप्रमाणे असून त्यांमध्ये सविस्तर विवरण दिलेले आहे : इमारती व घरे, गवंडीकाम, जलवाहिनी, धरणे व बंधारे, पदार्थांचे बल, पाणी-पुरवठा, पूरनियंत्रण, पूल, बंदरे, बांधकाम तंत्र, ‘ बांधकाम, पोलादाचे , ‘ बांधकाम , लाकडाचे , ‘ बांधकाम : संरचना सिद्धांत व अभिकल्प , ‘ बांधकाम, हलक्या धातूंचे , बांधकामाची सामग्री, बांधकामाचे दगड, बोगदा, भुयारी गटार, भूकंप-प्रतिरोधक बांधकाम, रस्ते, वाहितमल संस्करण व विल्हेवाट, विमानतळ, संयोजक, संरचना अभियांत्रिकी, सिंचन, सिमेंट इत्यादी. प्रस्तुत नोंदीत स्थापत्य अभियांत्रिकीचा इतिहास, बांधकामाचे स्वरूप आणि अभियांत्रिकीच्या विविध शाखा यांसंबंधी माहिती दिली आहे.

इतिहास :भारत : स्थापत्य अभियांत्रिकी किंवा वास्तुविद्या ही ज्ञानशाखा प्राचीन असून मानवी संस्कृतीबरोबरच तिचा उदय झाला. ऋग्वेदात गृहरचनेविषयीचे उल्लेख आहेत. तेव्हा वास्तुरचना हे धार्मिक कृत्य मानीत. ऋग्वेदात वास्ताष्पती तर अथर्ववेदात गृहस्वामिनी ही वास्तूची अधिष्ठात्री देवता मानली आहे. तेव्हाची घरे मोठी, सुखसोयींनी युक्त व चांगली बांधलेली होती (उदा., वरुणाचा प्रासाद). अथर्ववेदात घर बांधताना म्हणावयाची काही सूक्ते असून त्यांत वास्तुशास्त्रीय परिभाषाही आहे. चैत्य, स्तूप, वेदी, यज्ञसभा, मंदिरे व घरे बांधण्यासाठी तेव्हा विविध आकारांच्या व प्रकारांच्या भाजलेल्या विटा वापरीत असावेत, असे मत आहे. वेद व ब्राह्मणे यांतील वर्णनावरून स्थापत्यशास्त्र हळूहळू विकसित होत गेलेले दिसते. रामायणमहाभारत या महाकाव्यांत प्रासाद, घरे, मंदिरे, किल्ले, नगरे आदींचे वर्णन आढळते. नगरांची रचना, त्यांची तटबंदी, मनोरे, खंदक यांची माहिती त्यांमध्ये आहे. मय व विश्वकर्मा हे त्या काळातील विख्यात वास्तुविशारद होते (उदा., मयसभा). जातकांतील कथांमध्येही असे उल्लेख आहेत (उदा., विटांचे भुयार व त्यावरील गिलावा). घरासाठी लाकडाचा मोठ्या प्रमाणावर तर लोखंडाचा थोडा वापर होत असल्याचे उल्लेख आढळ-तात. पाली भाषेतील धार्मिक ग्रंथांत विहार व गुहा यांचे उल्लेख आहेत.

कौटिलीय अर्थशास्त्रात वास्तुविद्येवरील अनेक प्रकरणे असून वास्तूचा अर्थ घरे, घराची जागा,आरामभवने (विश्रामगृहे), सेतुबंध, तलाव व धरणे असा व्यापक आहे. त्यात गोपुर, तोरण इत्यादींचा उल्लेख आहे. द्वारे, तट, चैत्य, स्तूप, अट्टालक (तटावरील मनोरा), स्तंभ इत्यादींचे वर्णनही त्यात आहे.

वास्तुशास्त्राच्या उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय या दोन पद्धतींचे अनेक प्रवर्तक आचार्य व ग्रंथ आहेत. उदा., ब्रह्मा, मय, भृगू, काश्यप, मानसार, गर्ग, अत्री, वसिष्ठ, पराशर हे आचार्य तर मत्स्यपुराण, बृहत्संहिता, स्कंदपुराण, गरुडपुराण, अग्निपुराण, कामिकागम, विश्वकर्मप्रकाश, मानसार, समरांगणसूत्रधार हे ग्रंथ आहेत. या ग्रंथांचे स्वरूप स्थूलमानाने सारखेच आहे. त्यामध्ये प्रथम ज्योतिषशास्त्रविषयक व नंतर रचनाविषयक सिद्धांत आहेत. नंतर स्थपती (वास्तुरचनाकार) व मापनपद्धती (कोष्टके) यांची माहिती दिलेली असते. त्यात नगरविधान, दुर्गविधान, मंदिरविधान, गृहविधान इ. सर्व प्रकारच्या बांधकामांचे आराखडे येतात. वाहनांचे प्रकार, मार्ग व्यापारी आहे की सैनिकी इ. लक्षात घेऊन रस्त्यांची आखणी केली जाई. नगररचनेत दुर्गरचनेलाही महत्त्वाचे स्थान असे. तटबंदी, दरवाजे, बुरूज, खंदक इत्यादींचंी वर्णने असतात. नगरात राजप्रासाद, सैनिक विभाग व सामान्य लोक यांचे वेगवेगळे विभाग असतात. प्रासाद, घरे, मंदिरे इ. वास्तूंच्या विधानांत त्यांतील स्तंभांचे आकारमान व स्थान, द्वारे, भिंती, खिडक्या, मजले, छप्परे, छते, दालने, महाल यांचे सविस्तर वर्णन असते. सांडपाण्याची व्यवस्था कशी करावी तेही सांगितलेले असते. लाकूड, विटा, दगड इ. कोणत्या प्रकारचे बांधकाम साहित्य वापरावे या विषयीचे बरेच नियम व संकेत होते. वास्तू सुशोभित करण्यासाठी कोणती कलाकुसर करावी ते देखील सांगितलेले आहे.

भारतातील प्राचीन सिंधू संस्कृतीमधील नगरांच्या अवशेषांवरून त्या काळातील वास्तुशास्त्राची प्रगती लक्षात येते. ही नगरे अगदी आखीव व सर्व सोयी असलेली होती. तेव्हाची घरे चांगली हवेशीर, उजेड असलेली व पुष्कळदा अनेक मजलीही असावीत. तेव्हा विटा भाजण्याची व गिलावा करण्याची कला अवगत होती. उदा., मोहें-जो-दडो (मृतांची टेकाडे, इ. स. पू. तिसरे सहस्रक) येथील हडप्पा संस्कृतीचे अवशेष कोट विभागांत बुरूज तसेच निरनिराळ्या काटकोन चौकोनी विभागांत विभाग-लेली नागरी वस्ती तेथे होती. घरे किमान तीन खोल्यांची असून त्यांमध्ये स्नानगृह व स्वयंपाकघर असे. दुमजली घरांसाठी स्वतंत्र जिना होता. तेथील आरोग्य व्यवस्था उत्कृष्ट व जलनिःसारण व्यवस्था शास्त्रशुद्ध होती. गटारे बंदिस्त होती. सार्वजनिक स्नानगृह, तलाव, धान्याचे मोठे गोदाम, विद्यालय, सभागृह, चाळी इ. प्रकारची बांधकामे तेथे आढळली आहेत. [⟶ मोहें-जो-दडो हडप्पा ].

भारतात वास्तुशास्त्राच्या प्रगतीप्रमाणे वास्तुशिल्पांचाही प्राचीन काळात विकास झाला होता. मंदिरे, स्तूप, प्रासाद, लेणी इ. त्या काळातील वास्तू आणि शिल्पे चांगल्या व भग्न अवस्थेत पाहावयास मिळतात.

मुख्यतः लाकडाच्या वापरामुळे मौर्यपूर्व काळातील वास्तुशिल्पे आढळत नाहीत. चंद्रगुप्त मौर्यांची राजधानी पाटलिपुत्र (पाटणा) नगरीभोवती लाकडी तटबंदी होती. अशोकाच्या राजवाड्यातील काष्ठशिल्पे सातशे ते आठशे वर्षे टिकली आणि त्याने बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी तयार केलेली दगडी शिल्पे टिकून राहिली. उदा., दगडी स्तंभावर कोरलेल्या बौद्ध धर्माच्या आज्ञा तसेच त्याने बुद्धाच्या शरीराचे अवशेष सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक स्तूप व बौद्ध धर्माची प्रार्थनागृहे (चैत्य) बांधली. उदा., सारनाथ, श्रावस्ती, कोसिया येथील स्तूप.

दहाव्या शतकापर्यंत विशेषतः महाराष्ट्रात लेण्यांची निर्मिती चालू होती. उदा., अजिंठा, बेडसा, कान्हेरी, पांडव लेणी (नासिक), वेरूळ, बाथ इत्यादी. देवतांची मंदिरे गुप्तकाळात (इ.  स.  सु. ३००-५५०) प्रथम निर्माण झाली. उदा., बरेलीजवळ रामनगरला आढळलेले शिवमंदिराचे अवशेष. गुप्तकाळानंतर जवळजवळ हजार वर्षे नागर व द्राविड शैलींची असंख्य मंदिरे बांधली गेली.

भारतात क्षेत्रसिंचनाच्या योजना होत्या. चंद्रगुप्त मौर्याच्या काळात धरणे व कालवे होते. शेतीला त्यांच्याद्वारे पाणी देत असत. सौराष्ट्रातील सुदर्शन तलाव चंद्रगुप्ताच्या काळात बांधला. त्याची अशोकाने व क्षत्रप रुद्रदामन राजाने मोर्‍या, द्वारे, कालवे वगैरे बांधून दुरुस्ती केली. चोल राजांनी कावेरी नदीवर धरण बांधले. कांजीवरम् जवळचा तलाव (सातवे शतक), चेन्नईजवळचा  कोलावरिधी  तलाव (दहावे शतक) तसेच मध्ययुगातील भोपाळजवळचा भोजपूर व दक्षिणेतील अनंतराज सागर हे तलाव बांधले गेले. फिरोज शहा तुघलकाने यमुनेचा कालवा बांधला.


तेराव्या शतकाच्या सुरुवातीपासून इस्लामी वास्तुनिर्मिती सुरू झाली. कुतुब मशीद व मिनार, इल्तमश कबर, अलाउद्दीन खलजीची कबर या मोठ्या आणि कलाकुसर असलेल्या वास्तू बांधण्यात आल्या. १३२० नंतर साध्या वास्तू बांधण्यात आल्या. उदा., घियासुद्दीन तुघलकाची कबर व कलन मशीद. पंधराव्या शतकारंभी पुन्हा सुशोभित वास्तू बांधण्यात आल्या. उदा., जौनपूरच्या शर्की घराण्याच्या मशिदी व कबरी.

चौदाव्या शतकात बहमनी सत्ता आल्यावर राजधानी गुलबर्गा येथे मोठ्या मशिदीसह अनेक इमारती बांधण्यात आल्या. या काळातील कबरीही उल्लेखनीय आहेत. विजापूरच्या आदिलशाही घराण्याच्या काळात अनेक भव्य व कलाकुसर असलेल्या इमारती बांधण्यात आल्या. उदा., गोलघुमट व अली आदिलशहाने बांधलेली जुम्मा मशीद.

मोगल वंशाशी संबंधित भारतीय सारासेनिक वास्तुशिल्प पद्धती सोळाव्या शतकात उदयास आली. उदा., दिल्लीजवळील शेरशहाने बांधलेला पुराणा किल्ला व त्यातील मशीद, हुमायुनाची कबर, फतेपूर सीक्री येथील भव्य इमारती, अकबराची कबर, शाहजहानच्या काळातील आग्रा आणि दिल्ली येथील राजवाडे, ताजमहाल व मोती मशीद यांपैकी काही वास्तूंमध्ये हिंदू आणि इस्लामी वास्तुकलेचे मिश्रण झालेले आढळते.

ब्रिटिशांची सत्ता आल्यावर इंग्रज अभियंत्यांनी भारतात एकोणिसाव्या शतकात पुढील बांधकामे केली : डून कालवे, पश्चिम चिनाब कालवा, गंगा कालवा इत्यादी. तसेच रूळमार्ग, रस्ते, बंदरे यांची बांधकामेही झाली. भंडारदरा, भाटघर व खडकवासला ही महाराष्ट्रातील धरणेही या शतकात बांधली गेली. १८८१ नंतर दुष्काळप्रतिबंधक बांधकामे होत गेली. भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत १९०१ मधील सिंचन आयोग व १९४४ मधील भारतीय रस्ते परिषद यांनी आखलेल्या योजना आणि अभिकल्प यांनुसार बांधकामे होत होती.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्थापत्य अभियांत्रिकीय कामांना मोठी गती प्राप्त झाली. शिवाय ही कामे भारतीय अभियंत्यांनी पूर्ण केली. उदा., भाक्रा-नानगल, पोंग, गांधीसागर प्रकल्प, दामोदर नदी खोरे योजना, कोयना प्रकल्प तसेच रिहांड, पेरियार, शरावती, नागार्जुन, तुंगभद्रा, हिराकूद , रामगंगा इ. धरण योजना राज्यांतील व राष्ट्रीय महामार्ग, रूळमार्ग, खनिज तेल व नैसर्गिक वायू यांसाठी उभारलेले अपतटीय फलाट, दीपगृहे, भर समुद्रातील बांधकामे पारादीप, विशाखापटनम्, तुतिकोरीन, मंगलोर, मार्मागोवा, कांडला येथील मोठ्या बंदरांची बांधकामे रडार मनोरे, विमानतळ, अवकाशविज्ञानाशी निगडित बांधकामे वगैरे असंख्य स्थापत्य अभियांत्रिकीय कामे झाली व होत आहेत.

विदेश :प्राचीन काळ : भारताबाहेरील प्राचीन संस्कृतीमध्ये पूल, रस्ते, हमरस्ते, कालवे, बोगदे, पाणीपुरवठा, सिंचन व जलनिःसारण प्रणाली, गोद्या, बंदरे, जलसेतू , पिरॅमिडे, प्रेक्षागृहे, सार्वजनिक स्नानगृहे, मनोरे, देवळे, प्रार्थना स्थळे इ. अनेक प्रकारची बांधकामे झाली होती. उदा., ग्रेट पिरॅमिडे (ईजिप्त, इ. स. पू. २६७०-२५९०), सॉलोमन राजाचे देऊळ (वेलिंग वॉल, जेरूसलेम, इ. स. पू. १०००), पार्थनॉन (अथीना मोनाइआच्या देवतेचे मंदिर, डेल्फाय, ग्रीस, इ. स. पू. ४४७ —४३९), कॉलॉसिअम ( रोम, इ. स. ८०), अंकोरवात (देवळे, कंबोडिया, १११३ — सु.११५०) इ. सर्वोत्कृष्ट बांधकामे आहेत.

बॅबिलोनिया व ॲसिरिया : (इ. स. पू. ४७५० — ५६२). येथील लोकांनी जलीय अभियांत्रिकीविषयक प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न केले (उदा., धरणे, कालवे, बंधारे ). त्यांनी जमिनीचे व बांधकामाचे क्षेत्रफळ आणि कालवा खोदताना होणार्‍या खोदकामाचे घनफळ गणिताने काढले होते. बॅबिलोनियात झिगुरात (प्रचंड मंदिर— मनोरे), नगराभोवतीचे तट व बुरूज ही विटांची बांधकामे झाली होती. तेथे काचेची झिलई लावलेली रंगीत कौले वापरीत. प्रचंड आकार व भव्यता ही तेथील बांधकामांची वैशिष्ट्ये होती. असूर निनेव्ह व कालाख या ॲसिरियन शहरांतील कलात्मक वास्तूंमधील राजवाडे, त्यांतील फर्निचर, देवळे व त्यांतील शिल्पकाम यांचे नमुने उपलब्ध आहेत. ॲसिरियात रस्ते बांधण्याचे पहिले संघटित काम करण्यात आले. युफ्रेटीस नदीवर पहिला महत्त्वाचा तांत्रिक पूल इ. स. पू. सहाव्या शतकात बांधण्यात आला.

ईजिप्त : प्राचीन ईजिप्तमध्ये सर्वांत साधी यांत्रिक तत्त्वे व प्रयुक्त्या वापरून देवळे आणि पिरॅमिडे बांधली गेली ही बांधकामे अजून उभी आहेत. उदा., गीझा येथील पिरॅमिडे व कारनॅक येथील ॲमन- रा देऊळ. त्यांनी दगड कापण्यासाठी कठीण काशाची हत्यारे वापरली. मोठे दगड वाहून नेण्यासाठी हंगामी पूल व रस्ते बांधले. दगडाचे मोठे ठोकळे हलविण्यासाठी तरफा, उतरणी, रूळ, घसरगाड्या इत्यादींचा वापर केला. तेथील स्फिंक्स, थडगी व जुने राजवाडे ही बांधकामेही प्रसिद्ध आहेत.

ग्रीस : इ. स. पू. सहावे ते तिसरे शतक या काळात ग्रीकांनी अभियांत्रिकीय प्रश्नांमध्ये सैद्धांतिक माहिती वापरण्यात मोठी झेप घेतली. विशिष्ट वस्तूंच्या संदर्भाऐवजी त्यांनी रेषा, कोन, पृष्ठभाग व प्रस्थ (घनाकृती) यांचे अमूर्त ज्ञान वापरले. इमारतींचे बांधकाम करताना त्यांनी चौरस,आयत, त्रिकोण यांसारख्या भूमितीय आकृत्यांचा आधार म्हणून उपयोग केला. ग्रीक आर्किटेक्टॉन हा बहुधा अभिकल्पक आणि बांधकाम करणाराही म्हणजे वास्तुशिल्पी व अभियंताही असे.  ग्रीकांच्या अभिजात युगात सर्व महत्त्वाच्या इमारती चुनखडकांच्या व संगमरवराच्या बांधण्यात आल्या. उदा., संगमरवरी पार्थनॉन, झ्यूस मंदिराचे अवशेष, पारंपरिक पवनचक्की याही तेथील वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी आहेत. सपाट छताच्या वास्तूची संकल्पना व रचना ग्रीकांना वंशपरंपरेने माहीत झालेली होती. स्तंभावलीच्या रचनेतून त्यांनी प्रमाणबद्धता व सुसंवादित्व साधण्याचा प्रयत्न केला. उदा.,इरेक्थीयम हे अथेन्स येथील अक्रॉपलिस किल्ल्यावरचे अथीना देवतेचे मंदिर (इ. स. पू. ४२१—४०६), सभागृहे व बाजारपेठा या वास्तूंमध्येही स्तंभावली रचना वापरण्यात आली होती. प्रॉपिलीआ (भव्य प्रवेशद्वारे, इ.  स.  पू. ४३७—४३२) या वास्तूही लक्षणीय होत्या.

ग्रीकांश संस्कृती : (इ. स. पू. ३२३—३१). या संस्कृतीला ग्रीसबरोबर ईजिप्त व बॅबिलन यांचा वारसा लाभला असून तो वास्तुकलेत प्रत्ययास येतो. तेथे चौकोनी व आयताकृती नगरांभोवती उंच तट आणि काटकोनांत एकमेकांना छेदणारे काहीसे अरुंद रस्ते होते. रस्त्यांमुळे शहराचे विविध भाग झाले होते. यांपैकी एका भागात राजप्रासाद, दुसर्‍यात सचिव निवास आणि इतरांत व्यवसायानुसार लोकसंख्येची वाटणी केलेली होती. शहरात पाटांद्वारे किंवा नळांनी पाणी येई. ते घरोघरी न जाता सार्वजनिक हौद, स्नानगृहे येथे जात असे. शिवाय शहरात समाजजीवनाची विद्यालये,व्यायामगृहे व प्रेक्षागृहेही असत.

रोम : रोमच्या इ. स. दुसर्‍या शतकातील भरभराटीच्या काळात रोमन लोकांनी पादाक्रांत केलेल्या प्रदेशांतील कल्पना व बांधकामे यांची नक्कल केली, म्हणून रोमचे अभियंते हे आद्यप्रवर्तक नव्हे तर विकासक म्हणून ओळखले जातात. त्यांच्यावर खास करून ग्रीकांचा लक्षणीय प्रभाव होता. तथापि, माथ्यापाशी मध्यभागी कळीचा दगड वापरून त्यांनी रोमन कमानी बांधल्या. यावरून रोमन अभियंत्यांना संपीडनाखालील (दाबाखालील) गवंडीकामाचा परिचय होता, हे दिसून येते. रोमन वास्तुविशारद (आर्किटेक्टस) यांनी पूल, जलसेतू, हमरस्ते व सार्वजनिक इमारती यांचे अभिकल्प तयार करून त्यांनुसार बांधकामही केले. त्यांनी रस्ते, जलसेतू व दगडी कमानीचे पूल यांच्यासाठी बोगदे तयार केले. तसेच गोद्या, बंदरे व दीपगृहेही बांधली. रोममधील रस्ते बांधण्याची कला आधुनिक काळापर्यंत सर्वोच्च पातळीपर्यंत पोहोचली होती. व्हिआ आप्पीआ, व्हिआ फ्लामिनिया, व्हिआ ऑरीलीअस व व्हिआ ईमिलिआ हे प्रमुख रस्ते त्यांनी बांधले होते.

कॅराकॅलाची स्नानगृहे (रोम, २११—२१७), बाथ्स ऑफ टायटस (इ. स. ८१), बाथ्स ऑफ डोमिशन (इ. स. ९५), ट्रेजन्स बाथ्स (सु.१००), थर्मी ऑफ डायोक्लीशन इ. रोमन स्नानगृहे अश्वरथांच्या शर्यती, सर्कशी, मैदानी खेळ, गुलामांच्या व हिंस्र पशूंच्या झुंजी, साठमारी इत्यादींसाठी मोठी क्रीडागारे नाटकांसाठी रंगमंडले, मार्सेलस, ओडिऑन इ. रंगमंदिरे जेरासाचे अश्वशर्यतीचे रिंगण, पोतत्स्वॉली येथील क्रीडागार, ज्युपिटर कॅपिटोलिनीय सत्रे व इतर मंदिरे (रोम), सभाचौक, राजवाडे, मॅरिटाइम थिएटर, ट्रेव्ही कारंजे, सेंट पीटर्स चर्च तसेच ऑगस्टस, टायटस, ट्रेजन इ. कमानी.


माया संस्कृती : दक्षिण मेक्सिको, ग्वातेमाला, हाँडुरस व एल् साल्वादोर येथे माया संस्कृती इ.  स.  पू. सु. १००० — इ. स. १६०० दरम्यान होती. पलेंक व कोपान येथील उंच चबुतर्‍यावर बांधलेली मंदिरे, त्यातील सभामंडप व बॉलकोर्टस या प्रसिद्ध वास्तू आहेत. चुनेगच्चीतील मूर्तिकाम उठावदार असून छप्पर व द्वारशाखांसाठी कमानी वापरण्यात आल्या आहेत. तेथील शहरे पक्क्या दगडी रस्त्यांनी जोडली होती. तेथे बाजारपेठही होती. [⟶ माया संस्कृति ].

रोमनेस्क वास्तुकला : मध्ययुगाच्या सुरुवातीपासून ते सु. १२५० पर्यंतच्या काळातील ही वास्तुकला असल्याचे मानतात. तटबंदी असलेल्या किल्ल्यासारख्या भक्कम वास्तू , मठ, चर्च व धार्मिक वास्तू ही यातील बांधकामे असून या वास्तुकलेचा प्रसार फ्रान्स, जर्मनी, इटली व स्पेन या भागांत झाला. चापछत (व्हॉल्ट), अर्धवर्तुळाकृती कमानी, नक्षीदार झुकावाचे दगड, जोडखांब व मंडपाचा उंच मध्यभाग ही हिची वैशिष्ट्ये होती. चापछत, पीसाचा कलता मनोरा (११७४—१३५०), इटलीतील सान मीकेले चर्च, जर्मनीतील वर्म्झ कॅथीड्रल, फ्रान्समधील ओबेई ओ झॉम (१०६६—८६) ही या वास्तुकलेतील उत्तम उदाहरणे आहेत. हिने अभिजात ख्रिस्ती वास्तु-कलेचा पाया घातला. रोमन वास्तुकलेतून पुढे आलेल्या रोमनेस्क वास्तु-कलेच्या प्रभावातून गॉथिक व प्रबोधनकालीन वास्तुशैली निर्माण झाल्या. [⟶ रोमनेस्क वास्तुकला ].

गॉथिक वास्तुकला : सु. ११५० मध्ये फ्रान्समध्ये पुढे आलेल्या या शैलीचा सु.१४०० पर्यंत इंग्लंड, स्पेन, जर्मनी व इटली येथे प्रसार झाला. मुख्यत: ही शैली धर्माशी निगडित होती व निरनिराळी कॅथीड्रले ही तिची उदाहरणे होत. आडव्या कमानी वापरून चर्चचा घुमट उभारणे हे या शैलीचे सारभूत वैशिष्ट्य होते. मात्र प्रबोधनकालीन शैलीमुळे ही वास्तुकला मागे पडली. [⟶ गॉथिक कला ].

ॲझटेक वास्तुशिल्प : (१२००—१५२१). ॲझटेक वास्तूंमध्ये सर्पाकृती खांब असून खांबाच्या पायथ्याशी सापाचे तोंड तर शेपटीचा भाग तुळईवर असे. इमारतीभोवती खांबांचे व्हरांडे असत. त्यांची राजधानी जलाशयावर बांधून पुलाद्वारे जमिनीशी जोडली जात होती. शहराच्या मध्य-भागी सभास्थान, पिरॅमिड व त्यावर देऊळ बांधले जात होते. सभास्थानाभोवती सम्राटाचे महाल, शासकीय इमारती व बाजारपेठा होत्या.

मध्ययुग व प्रबोधन काल : पूल, कॅथीड्रले व किल्ले ही मध्ययुगातील (इ. स. सु. पाचवे — पंधरावे शतक) महत्त्वाची बांधकामे होत. रोमन परंपरेत पूल बांधणे हे सतत चालू असलेले काम होते. त्यासाठी दगडी कमानी वापरीत. टेम्स नदीवरील ओल्ड लंडन ब्रिज १२०९ मध्ये बांधण्यात आला. पूल, कालवे, रस्ते व पाणीपुरवठा योजना यांसारख्या बांध-कामांच्या बाबतीत यूरोपमध्ये, विशेषतः फ्रान्स व ब्रिटन या देशांनी  मोठी झेप घेतली. सर्वप्रथम फ्रान्समध्ये एकोल दे पाँत्स एत शोसीज या संस्थेने औपचारिक प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला. त्याद्वारे रस्ते व पूल बांधण्याच्या कामात वैज्ञानिक प्रगती झाली.

नेपोलियनबरोबरच्या युद्धांनंतर ब्रिटनमध्ये अभियांत्रिकीय कौशल्य विकसित झाले.इन्स्टिट्यूशन ऑफ सिव्हिल एंजिनिअर्स ही संस्था तेथे १८१८ मध्ये स्थापन झाली आणि १८२८ मध्ये तिचा शाही जाहीरनाम्यात अंतर्भाव करण्यात आला. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यास स्थापत्य अभियांत्रिकी व वास्तुशिल्प या शाखा वेगळ्या ओळखण्यात येऊ लागल्या. स्थापत्य अभियंते अधिक विवेकी वैज्ञानिक अभिकल्प तयार करीत असत. त्यांच्या तुलनेत दुय्यम गणले गेलेले वास्तुशिल्पज्ञ अभिकल्पातील सौंदर्यशास्त्रीय गोष्टींवर भर देत असत. वास्तुशिल्पज्ञांवर परंपरा, अंतःप्रज्ञा व दर्शन (दिसणे) यांचा प्रभाव असे.

आधुनिक काळ : मिलिटरी एंजिनिअरिंगपेक्षा वेगळा व नव्याने पुढे आलेला व्यवसाय या अर्थाने सिव्हिल एंजिनिअरिंग (स्थापत्य अभियांत्रिकी) ही संज्ञा प्रथम १७६० मध्ये जॉन स्मीटन  यांनी वापरली. तोपर्यंत सैनिकी अभियांत्रिकी ही मुख्य संज्ञा प्रचलित होती. एकोणिसाव्या शतकापर्यंत अभियांत्रिकीच्या यांत्रिक, विद्युत्, रासायनिक इ. बहुतेक शाखा या संज्ञेतच अंतर्भूत होत्या. फ्रान्समध्ये १७१६ मध्ये पूल व हमरस्ते सैन्य- दल (ब्रिज अँड हायवे कोअर) ह्याची स्थापना झाली, तेव्हा स्थापत्य अभियांत्रिकीची एक स्वतंत्र विज्ञानशाखा म्हणून सुरुवात झाली, असे म्हणता येते. यातूनच पूल व हमरस्ते यांची राष्ट्रीय प्रशाळा (नॅशनल स्कूल ऑफ ब्रिजेस अँड हायवेज) ही संस्था पुढे आली. तेथील शिक्षकांनी बांधकामाची सामग्री, यामिकी, यंत्रे व जलस्थापत्य या विषयांची फ्रेंच भाषेतील पुस्तके लिहिली. ही पुस्तके प्रमाणभूत पाठ्यपुस्तके झाल्यावर ती वाचण्यासाठी आघाडीवरील इंग्रज अभियंते फ्रेंच भाषा शिकले. जसजशी अंगुष्ठ नियम व अनुभवजन्य सूत्रे यांची जागा अभिकल्प आणि गणित-कृत्ये (आकडेमोड) यांनी घेतली आणि जसजशी कौशल्यविषयक माहिती संकेतबद्ध व सूत्रबद्ध करण्यात आली, तसतसे असैनिकी अभियंते स्थापत्य अभियांत्रिकीच्या क्षेत्रात पुढे येत गेले.

सैनिकी अभियंत्यापेक्षा आपण वेगळे आहोत हे दर्शविण्यासाठी जॉन स्मीटन यांनी प्रथम स्वत:ला स्थापत्य अभियंते असे म्हणवून घेतले.ते सुरुवातीला उपकरणे तयार करीत असत. एडिस्टोन लाइट हाऊस ( प्लीमथ, इंग्लंड, १७५६—५९) या दीपगृहाचा त्यांचा अभिकल्प स्वत:च्या कारागिरीच्या अनुभवांवर आधारलेला होता. यात अंतर्बंधनयुक्त गवंडी-काम केलेले आहे. त्यांच्या कामाला परिपूर्ण संशोधनाचा आधार होता. १७७१ मध्ये त्यांनी सोसायटी ऑफ सिव्हिल एंजिनिअर्स (नंतरची स्मीटोनियन सोसायटी ) स्थापन केली. कालवे व नंतर रूळमार्ग यांसारख्या सार्वजनिक बांधकामांना प्रोत्साहन देण्यासाठी व आपल्या योजना अंमलात आणण्यासाठी आवश्यक असलेला संसदीय अधिकार अबाधित करण्यासाठी अनुभवी अभियंते, उद्योजक व कायदेतज्ञ एकत्र आणणे, हे या संस्थेचे उद्दिष्ट होते. या संस्थेच्या बैठका संसदीय सत्रे चालू असताना घेण्याची प्रथा पडली आहे. पॅरिसला द एकोल पॉलिटेक्निक (१७९४) आणि बर्लिन बो ॲकॅडेमी (१७९९) या संस्था स्थापन झाल्या. तेथे १८१८ मध्ये तरुणांच्या एका गटाने इन्स्टिट्यूशन ऑफ सिव्हिल एंजिनिअर्स ही संस्था स्थापन केली. १८५० च्या सुमारास यूरोपातील अनेक देशांत व अमेरिकेतही स्थापत्य अभियांत्रिकीच्या संस्था होत्या.

अभियांत्रिकीय विज्ञानामधील औपचारिक शिक्षणाची सुरुवात फ्रान्स व जर्मनी येथे झाली. नंतर हे शिक्षण इतर देशांत व्यापक प्रमाणात उपलब्ध होत गेले. ग्रेट ब्रिटनमध्ये अभिजात शिक्षणाची परंपरागत अध्यासने किंवा अध्यापन पीठे असलेली विद्यापीठे होती. ही विद्यापीठे नवीन असलेले अभियांत्रिकीचे शिक्षण देण्यास तयार नव्हती. १८२६ मध्ये लंडन येथे स्थापन झालेल्या युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये शैक्षणिक अध्ययनाची व्यापक सुविधा पुरविण्यात आली आणि तेथे यांत्रिक तत्त्वज्ञान या विषयाचा एक अभ्यासक्रम सुरू झाला. लंडनच्या किंग्ज कॉलेजमध्ये १८३८ मध्ये प्रथम स्थापत्य अभियांत्रिकीच्या शिक्षणाची सुरुवात झाली. १९४० मध्ये स्कॉटलंडमधील युनिव्हर्सिटी ऑफ ग्लासगो येथे राणी व्हिक्टोरिया यांनी स्थापत्य अभियांत्रिकी व यामिकी यांचे पहिले अध्यासन स्थापन केले.नंतर विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळापर्यंत जगभर स्थापत्य अभि-यांत्रिकीसह अभियांत्रिकीतील इतर शाखांचे शिक्षण देणार्‍या विद्यापीठांची संख्या जलदपणे वाढत गेली. अशा रीतीने जगातील प्रत्येक खंडावर स्थापत्य अभियांत्रिकीचे शिक्षण देण्याची सोय अनेक विद्यापीठांत उपलब्ध झाली.

अमेरिका : अमेरिकन सोसायटी ऑफ सिव्हिल एंजिनिअर्स ही संस्था ५ नोव्हेंबर १८५२ रोजी स्थापन झाली व अमेरिकेतील स्थापत्य अभि-यांत्रिकीचे युग सुरू झाले. अमेरिकेतील स्थापत्य अभियांत्रिकीचा पहिला अभ्यासक्रम रेन्सेलर पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट (१८२४) येथे सुरू झाला. नवीन प्रदेशांचे सर्वेक्षण, जल-ऊर्जेचा विकास आणि रस्ते व कालवे यांचे बांधकाम ही स्थापत्य अभियांत्रिकीशी निगडित मोठी कामे सुरू झाली. संपन्न खनिजांच्या शोधामुळे खाणकाम या महत्त्वाच्या कामाची यांमध्ये भर पडली. १८२५ मध्ये एरी कालव्याचे बांधकाम चांगल्या प्रकारे पूर्ण झाले. परिणामी देशाच्या पूर्व भागात अनेक कालवे खोदण्यास प्रोत्साहन मिळाले. कालव्यानंतर लवकरच रूळमार्ग तयार करण्याचे काम मोठ्या प्रमाणात होऊ लागले. यांपैकी बॉल्टिमोर आणि ओहायओ हे रूळमार्ग १८३० मध्ये पूर्ण झाले. अशा प्रकारे एकोणिसाव्या शतकात बहुसंख्य प्रशिक्षित स्थापत्य अभियंते रूळमार्ग तयार करण्याच्या कामात गुंतले होते. त्यानंतर थोड्याच काळाने शहरांतील पाणीपुरवठा, स्वच्छता व सुधारलेले रस्ते यांच्या बांधकामासाठी स्थापत्य अभियंत्यांना असलेल्या मागणीत वाढ झाली. नंतर स्थापत्य अभियंत्यांना सल्ला देण्यासाठी संघटना स्थापन झाल्या आणि या संघटना देशभरातील नगरपालिकांमधील सुविधांचे अभिकल्प तयार करण्याचे काम करू लागल्या.

अमेरिकेतील एंजिनिअर्स कौन्सिल फॉर प्रोफेशनल डेव्हलपमेंट या संस्थेने अभियांत्रिकीच्या आधुनिक शाखेची व्याख्या केली. अभियांत्रिकीची शाखा हा एक व्यवसाय असून यामध्ये गणितीय व नैसर्गिक विज्ञानांतील अध्ययन, अनुभव व व्यवहार (प्रत्यक्ष काम) यांतून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग पुढीलप्रमाणे करतात : निसर्गातील द्रव्ये व प्रेरणा (बल) यांचा मानवी हितासाठी किंवा लाभासाठी किफायतशीर रीतीने उपयोग करून  घेण्याचे मार्ग विकसित करण्याचा निर्णय घेण्यासाठी हे ज्ञान वापरतात. ही व्याख्या आधुनिक स्थापत्य अभियांत्रिकीलाही लागू पडते.


कामाचे स्वरूप : बांधकामाच्या संदर्भातील स्थापत्य अभियंत्याच्या कामांची विभागणी बांधकामाच्या आधीची, प्रत्यक्ष बांधकाम चालू असतानाची आणि बांधकाम झाल्यानंतरची या तीन गटांत करता येते. बांधकाम शक्य कोटीतील किंवा सुसाध्य आहे की कसे याचा अभ्यास, बांधकामाच्या जागेची बारकाईने केलेली तपासणी व अभ्यास आणि बांधकामाचा अभिकल्प तयार करणे ही बांधकामाच्या आधीची कामे आहेत. ग्राहका-बरोबरचा व्यवहार व वर्तन आणि अभियंत्यांबरोबरची व ठेकेदारांबरोबरची सल्लामसलत ही बांधकाम चालू असताना करावयाची कामे आहेत. बांधकामाची देखभाल व त्याविषयीचे संशोधन ही बांधकाम पूर्ण झाल्यावर करावयाची कामे आहेत.

बांधकामाच्या आधीची कामे : सुसाध्यताविषयक अभ्यास : बांधकामाच्या प्रमुख प्रकल्पाची सुरुवात करण्याआधी तो प्रकल्प शक्य कोटीतील आहे की नाही याविषयीचा अभ्यास करतात आणि त्यासाठी पुढील गोष्टी करतात : प्रकल्पाच्या उद्दिष्टाचा तपशीलवार अभ्यास करणे. तसेच शिफारस केलेल्या अभिकल्पापर्यंत जाणार्‍या संभाव्य पर्यायी योजनांचा प्रारंभिक अभ्यास करणे. सुसाध्यताविषयक अभ्यास करताना पर्यायी पद्धती समोर येऊ शकतात. उदा., एखाद्या अडसर ठरू शकणार्‍या रचने-पलीकडे पाणी नेण्यासाठी जलसेतू किंवा बोगदा हे पर्याय असू शकतात. यांपैकी एक पर्याय निश्चित केला की बांधकामाचा पुढील मार्ग निवडतात. हे करताना आर्थिक व अभियांत्रिकीय प्रश्नांचा विचार करणे गरजेचे असते. [⟶ बांधकाम तंत्र ].

जागेची तपशीलवार तपासणी : जागेची प्राथमिक तपासणी हा सुसाध्यताविषयक अभ्यासाचा भाग असतो. मात्र, योजना निश्चित झाल्यावर जागेचा अधिक व्यापक प्रमाणावर बारकाईने अभ्यास करणे गरजेचे असते. भूमी (मृदा) आणि जमिनीखालील बांधकामाचा भाग यांचा कसोशीने अभ्यास करण्यासाठी पैसे खर्च करावे लागतात. मात्र, या खर्चामुळे नंतर होऊ शकणार्‍या मोठ्या खर्चाची बचत होते. उदा., झालेले नुकसान भरून काढण्यासाठी करावी लागणारी कामे अथवा बांधकामाच्या पद्धतींमध्ये करावे लागणारे आवश्यक फेरफार यांच्यावर होऊ शकणारा संभाव्य खर्च वाचतो.

कोणत्याही मोठ्या बांधकामामध्ये भूमीचे भारग्रहण (भार सहन करण्याचे) गुणधर्म व तिचे स्थैर्य या गोष्टी महत्त्वाच्या असतात. तथापि, १९३५ पर्यंत मृदा यामिकीचा गंभीरपणे अभ्यास करण्याचे कोणाला सुचले नव्हते. कार्ल फोन टेरझागी हे मृदा यामिकीचे संस्थापक अभ्यासक असून त्यांनी या विज्ञानशाखेची सुरुवात १९३६ मध्ये केली. तेव्हा हार्व्हर्ड विद्यापीठात फर्स्ट इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन सॉइल मेकॅनिक्स अँड फाउंडेशन एंजिनिअरिंग ही परिषद भरली व एक आंतरराष्ट्रीय संस्था निर्माण झाली. नंतर अनेक देशांमध्ये व विद्यापीठांत अशा विशेषीकृत संस्था व त्यांच्या ज्ञानपत्रिका निर्माण झाल्या.

अभिकल्प : बांधकामाचा कागदावर तयार केलेला अभिकल्प हे स्थापत्य अभियांत्रिकीमधील एक मुख्य काम आहे. उदा., पुलासारख्या बांधकामावर पडणार्‍या भारांचा वा प्रेरणांचा तपशीलवार अभ्यास करणे गरजेचे असते. वार्‍याचा भार (जोर), बांधकामामधील भागांच्या वजनाचा निश्चलभार, गतिमान वाहनाचा चलभार, हिम, बर्फ वा पाण्याचा भार, उन्हात उघडे पडण्याचा काळ इत्यादी. हे भार तोलण्यासाठी तुळई, स्तंभ, गर्डल यांसारख्या घटकांची प्रणाली वापरतात.

अभियांत्रिकीय कामांच्या अभिकल्पांत जलस्थापत्य, ऊष्मागतिकी किंवा अणुकेंद्रीय अभियांत्रिकी यांसारख्या अनेक क्षेत्रांमधील अभिकल्प सिद्धांताचा उपयोग करून घ्यावा लागतो. बांधकामविषयक संरचनात्मक विश्लेषण व द्रव्यांविषयीची तंत्रविद्या यांमध्ये झालेल्या संशोधनांमुळे अधिक विवेकी (विवेकशील) अभिकल्प, अभिकल्पाच्या नवीन संकल्पना व सामग्रीची जास्त काटकसर यांसाठीचा मार्ग खुला झाला. बांधकामांचे संरचना सिद्धांत व द्रव्यांचा अभ्यास जसा प्रगत होत गेला, तसे बांधकामांचे प्रतिबल विश्लेषण व पद्धतशीर प्रशिक्षण अधिकाधिक परिष्कृत होत गेले. आधुनिक अभिकल्पकांच्या हाताशी प्रगत सिद्धांत व सहजपणे उपलब्ध असणारी माहिती आहेच, शिवाय संगणकाच्या मदतीने ते बांधकामांच्या अभिकल्पांचे कठोरपणे (कसोशीने) विश्लेषण करू शकतात. [⟶ बांधकाम : संरचना सिद्धांत व अभिकल्प ].

प्रत्यक्ष बांधकाम चालू असतानाची कामे : स्थापत्य अभियांत्रिकीय कामाचा प्रस्ताव खाजगी रीतीने एखादी व्यक्ती ठेवू शकते. मात्र, मोठ्या आयोगांसाठी किंवा मंडळांसाठी बहुतेक प्रकल्पांचे काम सरकारी प्राधिकरणे किंवा सार्वजनिक मंडळे करतात. यांपैकी अनेकांकडे त्यांचा स्वतःचा अभियांत्रिकीय कर्मचारी वर्ग असतो. तसेच मोठ्या खास प्रकल्पांसाठी सामान्यपणे सल्लागार अभियंत्याची नेमणूक करतात.

सल्लागार अभियंता प्रथम प्रकल्पाची सुसाध्यता अभ्यासतो. नंतर तो योजना सुचवितो व प्रकल्पाला येणारा खर्च अंदाजे किती असेल ते सांगतो. बांधकामाच्या अभिकल्पाची जबाबदारी अभियंत्याची असून तो आरेखने, विनिर्देशने व कायदेशीर दस्तऐवज पुरेशा तपशिलाने पुरवितो. यातून निविदेसाठीच्या स्पर्धात्मक किंमती कळतात. दरपत्रकांची तुलना करणे हे त्याचे काम असते. त्यांपैकी एकाची तो शिफारस करतो. सदर करारातील तो एक भाग वा पक्ष नसला, तरी त्याची कर्तव्ये ठरविलेली असतात. कर्मचारी वर्ग बांधकामाची पाहणी वा पर्यवेक्षण करतो व अभियंता काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र देतात. त्याचे काम त्यांच्या ग्राहकांच्या संदर्भातील कर्तव्याशी सुसंगत असते. या व्यावसायिक वर्तनावर व्यावसायिक संघटनांचे शिस्तबद्ध नियंत्रण असते. निवासी अभियंता हा कामाच्या जागेवरील सल्लागार अभियंत्याची नेमणूक ग्राहकाऐवजी ठेकेदार करतो.

नंतरच्या काळात एक गठ्ठा ठेका किंवा करार म्हणजे टर्न की प्रोजेक्ट ही संकल्पना प्रचलित झाली. यात वित्तव्यवस्था, अभिकल्प, विनिर्देश, बांधकाम व प्रकल्प परिपूर्ण रूपात सुरू करणे याची जबाबदारी ठेकेदार घेतो. यात सल्लागार अभियंत्यांची नेमणूक ग्राहकाऐवजी ठेकेदार करतो. ठेकेदार बहुधा निर्गमित कंपनी असते. ही कंपनी सल्लागार अभियंत्याच्या विनिर्देशानुसार व आरेखनांनुसार ठेका निश्चित करते. अंतर्भूत केलेल्या सर्व फेरफारांना व तपशीलवार आरेखनांना सल्लागार अभियंत्याचा वरिष्ठ प्रतिनिधी असतो.

बांधकाम झाल्यानंतरची कामे : देखभाल : सल्लागार अभियंत्याचे समाधान होईल अशा रीतीने ठेकेदार बांधकामाची देखभाल करतो. बांधकामाचाच भाग असलेल्या जादा ( साहाय्यक ) व तात्पुरत्या बांध-कामांची वाढीव देखभालही ठेकेदार करतो. बांधकामानंतर किती काला-वधीसाठी देखभाल करावयाची ते ठेकेदार ठरवितो. सल्लागार अभियंत्याकडून सोडवणूक होईपर्यंत ठेक्याच्या किंमतीच्या अंतिम हप्त्याची रक्कम रोखून ठेवली जाते. देखभालीशी मुख्यत्वे मध्यवर्ती व स्थानिक शासकीय अभि-यांत्रिकी आणि सार्वजनिक बांधकाम या विभागांचा संबंध असतो. त्यासाठी हे विभाग थेट नोकरभरती करतात.

संशोधन : शासकीय संस्था, औद्योगिक प्रतिष्ठाने, विद्यापीठे व इतर संस्था स्थापत्य अभियांत्रिकीच्या क्षेत्रातील संशोधन करतात. बहुतेक देशांमध्ये शासनाचे नियंत्रण असलेल्या अशा संस्था असतात. उदा., यू. एस्. ब्युरो ऑफ स्टँडर्ड्स (अमेरिका), नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी (ग्रेट ब्रिटन), महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था (नासिक). अशा संस्थांचा व्यापक संशोधनाशी तसेच इमारती, रस्तेे, हमरस्ते, जल-स्थापत्य, जलप्रदूषण व इतर क्षेत्रे यांतील संशोधनविषयक आस्थापनांशी संबंध येतो. अशा अनेक संस्थांना शासनाची मदत मिळते परंतु त्या अंशतः उद्योगांमार्फत पुरस्कृत केलेल्या संशोधनकार्यातून मिळणार्‍या उत्पन्नावर अवलंबून असतात.

शाखा : स्थापत्य अभियांत्रिकीच्या अनेक शाखा असून त्यांची खास कार्यक्षेत्रे असतात. अर्थात काही शाखांची कार्यक्षेत्रे परस्परव्यापी असू शकतात.


सर्वेक्षण व मानचित्रण : या शाखेत भूपृष्ठाचे अचूक मापन (मोजणी) करतात. यातून मिळणार्‍या विश्वासार्ह माहितीचा प्रकल्पाची जागा ठरविताना, त्याची आखणी करताना व अभिकल्प तयार करताना उपयोग होतो. या शाखेत जमिनीच्या परंपरागत सर्वेक्षणाच्या पद्धतींपासून ते उच्च तंत्रविद्येचा वापर करणार्‍या पद्धतींपर्यंतच्या सर्व बाबी येतात. उच्च तंत्रविद्या पद्धतींत अचूक मापनासाठी हवाई छायाचित्रणाचा उपयोग करता येतो. कृत्रिम उपग्रह व छायाचित्रीय प्रतिमादर्शनावरील संगणकीय प्रक्रियण यांचाही या पद्धतींत उपयोग करतात. तसेच प्रकाशकीय वेध (निरीक्षणे), रेडिओ संकेत, लेसर, क्रमवीक्षण किंवा ध्वनिशलाका यांच्यामार्फत मिळालेल्या माहितीचे मानचित्रांमध्ये (नकाशांमध्ये ) परिवर्तन करतात. त्यामुळे  नियोजित विकास कामाचा अभिकल्प तयार करणे, बोगदे खोदणे, हमरस्ते बांधणे, नळयोजना सिद्ध करणे, पूरनियंत्रणाचा नकाशा बनविणे, सिंचन तसेच इतर बांधकामांसहित असलेले जलविद्युत् संयंत्र उभारणे, बांधकाम प्रकल्पावर विपरित परिणाम घडवू शकतील अशी भूपृष्ठाखालील शैलसमूहांची मर्यादा निश्चित करणे आणि इतर अनेक बांधकामविषयक उपयोगांना मदत करणे यांसाठीच्या अचूक जागा वा ठिकाणे उपलब्ध होऊ शकतात.[ ⟶ मानचित्रकला संरचना अभियांत्रिकी सर्वेक्षण].

समाज व नागरी जीवन : या शाखेत नियोजनबद्ध विकास कामे, मनोरंजनाची उद्यानसदृश क्षेत्रे वा प्रदेश, शहरे व समाजाचा भाग यांसाठीची औद्योगिक संकुले प्रस्थापित करण्यासाठी योजना आखतात. हे करताना जमीन व नैसर्गिक साधनसंपत्ती यांचा वापर व विकास करतात. यातून होणार्‍या पर्यावरणीय, सामाजिक व आर्थिक घटकांच्या परिणामांचे मूल्य-मापनही यात करतात. सामाजिक, आर्थिक व पर्यावरणीय हिताची खातरजमा करण्यासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांच्या बाबतीत समन्वय साधण्यासाठी या शाखेतील अभियंते इतर व्यावसायिकांबरोबर सहकार्य करून काम करतात.

भूगर्भतंत्रविद्याविषयक अभियांत्रिकी : या शाखेत भूमीतील द्रव्यांचे वर्तन आणि जमिनीवरील व जमिनीखालील बांधकामांना आधार देण्याची त्यांची क्षमता यांचे विश्लेषण व मूल्यमापन करतात. बांधकामामुळे पडणारा दाब किंवा त्यांचे वजन यांमुळे आधार देणारी भूमी दाबली जाते व स्थिरस्थावर होत असते. या दाबाला प्रतिबंध करण्यासाठी या शाखेतील अभियंते कार्यपद्धतींचा आराखडा तयार करून त्या सिद्ध (सज्ज) करतात. उतार व भराव स्थिर करण्याच्या पद्धती, बांधकाम व पायाभूत सुविधा यांचे भूकंपापासून रक्षण आणि भूमिजलावरील अनिष्ट परिणामांचे निरसन या गोष्टींचाही या शाखेत विचार केला जातो.

भूस्तरांनुसार धरणात किती पाणी साठा टिकेल, पाझर तलावांची जागा नक्की करणे, जमिनीखाली कोणती खनिजे सापडतील याचा अंदाज घेणे, जमिनीखाली भुयारे खणणे, समुद्रातील बांधकामाचा पाया व स्तर निश्चित करणे इ. साठी भूस्तराच्या अभ्यासाचे शास्त्र विकसित झाले. त्यांचा समावेश भूगर्भ अभियांत्रिकीमध्ये होतो.

जलसंपदा अभियांत्रिकी : पाण्याच्या प्राकृतिक नियमनाशी निगडित बाबींचा विचार या शाखेतील स्थापत्य अभियंते करतात. ते पुढील कामे करतात : या कामांसाठी प्रणालींची आखणी करतात, त्यांचे मूल्यमापन करतात, त्या अभिकल्पानुसार उभारतात त्या चालवितात व त्यांची देखभाल करतात. पूरनियंत्रण, शहराचा पाणीपुरवठा, सिंचन व्यवस्थेचा विकास, नदीतील वाहतूक, जलपाश व किनारे यांचे व्यवस्थापन व नियंत्रण, समुद्रकिनार्‍याच्या झिजेला प्रतिबंध आणि जलमुखाजवळील (पाण्याने अंशतः सीमाबद्ध अशा क्षेत्राजवळील) सुविधांची देखभाल यांसाठी सदर प्रणाली असतात. बंदरे व त्यांतील सुविधा, धक्के, कालवे, अपतटीय फलाट व प्रणाली यांच्या नियोजनाशी व अभिकल्पाशीही या शाखेचा संबंध आहे. पूरनियंत्रक भित्ती, धरणे व जलविद्युत् शक्तीसाठी पाणी अडविणे किंवा साठविणे यांविषयीचे नियोजन व अभिकल्पनिर्मिती ही कामेही हे अभियंते करतात.

अपशिष्ट व्यवस्थापन व जोखीम मूल्यनिर्धारण : या शाखेतील काम सांघिक प्रकारचे असते. धोकादायक किंवा विषारी अपशिष्टांची अयोग्य विल्हेवाट व अशी द्रव्ये अविचारी पद्धतीने जमिनीवर टाकली वा ओतली जाण्यामुळे निर्माण होणार्‍या परिस्थितीमुळे जमिनीवरील व जमिनीखालील पाणीपुरवठ्यावर विपरित परिणाम होतो. अपशिष्ट पदार्थांना विविध प्रक्रियांद्वारे ( उदा., रासायनिक विश्लेषण, जाळणे, पाण्यात विद्राव्य करणे, जमिनीत गाडणे, उकळणे, चाळणे इ. क्रिया करून) निष्क्रिय करण्यात येते [⟶ वाहितमल संस्करण व विल्हेवाट ]. पर्यावरण अभियांत्रिकी-मध्ये पुढे आलेल्या एका शाखेचा खास संबंध अशा ठिकाणांच्या व्यवस्थापनाशी येतो. त्याचबरोबर अस्तित्वात असलेल्या अशा क्षेत्रांवर संस्करण करण्यासाठी उपलब्ध वेळ, पैसा व कर्मचारी वर्ग यांचा पद्धतशीरपणे व कमी खर्चात उपयोग करून घेणे गरजेचे असते. या संस्करणामध्ये श्रेणीबद्धता प्रस्थापित करण्याची एक पद्धत आहे. या पद्धतीत जोखमींचे मूल्यनिर्धारण  करतात आणि मनुष्य व नैसर्गिक साधनसंपत्ती यांना सर्वांत धोकादायक असलेले क्षेत्र निश्चित करतात. या क्षेत्रात काम करणारे अभियंते संस्करणाच्या कार्यपद्धती विकसित करतात व जोखमी कमी करण्यासाठी येणार्‍या खर्चाचा अंदाज करतात. नंतर ही माहिती लोकांना देऊन संभाव्य जोखमींचे निरसन व त्यासाठी येणारा खर्च स्पष्ट करून विशद करतात. कारण असे क्षेत्र स्वच्छ करण्यासाठी व त्याची व्यवस्था ठेवण्यासाठी यामुळे प्रभावित झालेल्या लोकांची वेळ, प्रयत्न व पैसे खर्च करण्याची तयारी असावी लागते.

वाहतूक अभियांत्रिकी : समाजाचा उत्कर्ष व गुणवत्ता यांचा वाहतूक प्रणालींशी अगदी निकटचा संबंध असतो. या शाखेत प्रवासी व माल यांची सुरक्षित व कार्यक्षम रीतीने वाहतूक करण्याच्या सुविधांची योजनाव अभिकल्प तयार करतात. या सुविधा उभारून त्यांची देखभाल ठेवण्याचे काम या शाखेतील अभियंते करतात. हे करताना पादचारी व सायकल मार्ग, गल्ल्या, रस्ते, हमरस्ते, सामूहिक स्थलांतर, रूळमार्ग, विमानतळ, बंदरे व गोद्या यांचे नियोजन करतात. वाहने व वाहतूक मार्ग यांना साहाय्य-भूत ठरणार्‍या बांधकामांमध्ये वाहने थांबण्यासाठी राखीव क्षेत्र व अंतिम स्थानके येतात, कारण निरनिराळ्या प्रकारांच्या रहदारीदरम्यान स्थानांतरणाच्या सुविधांचा विचार करणे गरजेचे असते. वाहतूक अभियंते तंत्रविद्येतील बुद्धिकौशल्य वापरतात व प्रत्येक प्रणालींवर परिणाम करणार्‍या आर्थिक, सामाजिक व राजकीय घटकांचाही ते विचार करतात. निवास ते नोकरीचे वा मनोरंजनाचे ठिकाण वा बाजारपेठ यांच्या दरम्यानच्या माल व प्रवासी वाहतुकीत वाढ करणारे स्वीकारार्ह उपाय योजणे हे त्यांचे उद्दिष्ट असते. रुग्णवाहिका, आगीचा बंब यांसारख्या आरोग्याची व समाजाची काळजी घेण्यासाठी असलेल्या आणीबाणीच्या वेळी वापरावयाच्या वाहनांना जलदपणे मार्गक्रमण करता येईल, अशी दक्षता घेणे हेही उद्दिष्ट असते.[ ⟶ रस्ते रेल्वे विमानतळ ].  

मोठ्या शहरांत व महानगरांत वाहतूक व रहदारी सुरळीतपणे चालू राहण्यासाठी अभियंते पर्याप्त परिस्थिती उपलब्ध करून देतात. अभिकल्प व प्रत्यक्ष बांधकाम यांच्या पुष्कळ आधीच नगराचा नियंत्रक नकाशा वा बृहत् योजना तयार करतात. त्यात रुंद जलद गतिमार्ग (व्यापारी वाहनांना बंदी असलेले पार्कवेज) तसेच जलद गतिमार्गावर जाताना व तो ओलांडताना वाहने थांबणे गरजेचे असलेला (थ्रूवे) मार्ग यांची आखणी करतात. त्यावर व्यापारी कारखाना विभाग व भांडारगृहे यांसाठी पोचमार्गाची तरतूद करतात. नागरी व शहरी भागांत येणार्‍या व जाणार्‍या मोटारगाड्या आणि अन्य वाहनांची संभाव्य संख्या प्रत्यक्ष मोजून वाहनतळावर थांबू शकणार्‍या वाहनांच्या संख्येवरून वाहनतळाचा अभिकल्प तयार करतात. शिवाय मार्गावरील पूल व बोगदे यांचेही अभिकल्प तयार करतात. यांमुळे नैसर्गिक व कृत्रिम  अडथळ्यांवरून किंवा त्यांच्यामधून वाहतूक चालू ठेवणे शक्य होते.[ ⟶ वाहतूक वाहतूक नियंत्रण ].


नळयोजना अभियांत्रिकी : या अतिशय विशेषीकृत शाखेत द्रव, वायू किंवा राळा (स्लरी) यांची वाहतूक करतात. यासाठी नळयोजनेचे स्थान ठरवितात, तिची आखणी करतात. तिचा अभिकल्प तयार करतात तिची देखभाल करतात आणि तिचे कार्य व्यवस्थित चालू राहील हे पाहतात.या नळांमधून अज्वलनशील ते अतिज्वलनशील अशा विविध प्रकारच्या द्रव्यांची एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणाकडे वाहतूक होते. हे नळ ज्या प्रदेशातून जातात त्या प्रदेशावर पडणारे पर्यावरणीय व आर्थिक प्रभाव अभियंते निश्चित करतात. या नळांसाठी लागणारे द्रव्य त्याचा टिकाऊपणा व सुरक्षितता या गुणांच्या आधारे ठरवितात. शिवाय नळयोजना उभारण्याची तंत्रे तसेच तिच्या परीक्षणाच्या पद्धती आणि नळांतील द्रव्याचा योग्य दाब व ते वाहण्याची त्वरा टिकून राहण्यासाठी असणार्‍या नियंत्रक बाबी हे अभियंते नेमकेपणाने नमूद करतात.

सागरी व जलस्थापत्य अभियांत्रिकी : बंदर व जहाज यांची बांधणी ही प्राचीन कला आहे. मोठे कार्यक्षम बंदर उभारणे ही अनेक देशांची प्रारंभिक गरज असते. त्यातून औद्योगिक संयंत्रे व आवश्यक कच्चा माल यांची आयात होते आणि तयार वस्तूंची निर्यात होते. विकसित देशांतील जागतिक व्यापाराचा विस्तार, अधिक मोठ्या जहाजांचा वापर आणि मालाच्या एकूण राशीतील वाढ या गोष्टी अधिक जलदपणे व कार्यक्षम रीतीने हाताळणे गरजेचे झाले आहे. तसेच माल हाताळणारी सामग्री व मार्गनिर्देशनातील सुधारणा यांची जबाबदारीही या शाखेतील अभियंत्यांची असते. [⟶ बंदरे ].

पाणीपुरवठ्याचा विकास करणे हे सर्वांत आधीच्या संस्कृतीचे वैशिष्ट्य होते. पाण्याची मागणी सतत वाढत आहे. विशेषतः विकसित देशांत ही मागणी औद्योगिक व घरगुती वापरासाठी वाढत आहे. सिंधू नदीचे खोरे यांसारख्या जगाच्या अनेक भागांत मुख्यतः सिंचनासाठी मोठे प्रकल्प उभारले आहेत. त्यांची अन्नविषयक मागणी पुरविण्यास मदत होते. पुष्कळदा याच्या जोडीला जलविद्युत् निर्मिती होऊन औद्योगिक विकासाला चालना मिळते. [⟶ सिंचन].

आधुनिक धरणे ही सर्वांत मोठी बांधकामे असून त्यांच्या अभिक-ल्पातील विकासाला इंटरनॅशनल कमिशन ऑन लार्ज डॅम्स यासारख्या संस्था उत्तेजन देतात. लोकवस्तीजवळच्या मोठ्या धरणांच्या अभिकल्पांच्या बाबतीत सुरक्षितता ही महत्त्वाची बाब असून तिच्यासाठी सुरक्षितता अभियांत्रिकीचे साहाय्य अतिशय आवश्यक ठरते. यामध्ये मृदा यामिकी व परिबल विश्लेषण यांवर भर देतात. धरणांचे अभिकल्प तयार करणे व त्यांचे परीक्षण वा तपासणी करणे या बाबतींतील अर्हता असलेल्या अभियंत्यांच्या बाबतीत बहुतेक सरकारांचे कायदेशीर नियंत्रण असते.[ ⟶ धरणे व बंधारे ].

ऊर्जा : दगडी कोळसा व धातुके (कच्च्या रूपातील धातू) यांच्या खाणकामात स्थापत्य अभियांत्रिकीचे काम नेहमीच महत्त्वाचे ठरले आहे. बोगदे खणणे हे स्थापत्य अभियांत्रिकीच्या अनेक शाखांमधील सामान्य काम आहे. विसाव्या शतकात विजेची मागणी जलदपणे वाढल्याने शक्ति–उत्पादन केंद्राचे अभिकल्पन व बांधकाम यांत प्रगती झाली. अणुशक्ती केंद्रे व अणुभट्ट्या यांच्यामुळे अभिकल्पन व बांधकाम या क्षेत्रांत एका पूर्णपणे नवीन क्षेत्राची भर पडली. यामध्ये अणुभट्टीसाठी पूर्वप्रतिबलित काँक्रीटच्या दाबपात्रासारख्या वास्तुनिर्मितीचा संबंध येतो.

खनिज तेल क्षेत्रांचा उपयोग करून घेणे व नैसर्गिक वायूचा शोध यांमुळे या वायुनिर्मितीत मूलभूत बदलाला सुरुवात झाली. सहारातील नैसर्गिक वायूची द्रवरूपात जहाजांतून होणारी वाहतूक आणि नॉर्थ सी (उत्तर समुद्र) येथील थरांमधील नैसर्गिक वायूची नळांतून होणारी वाहतूक ही नावीन्यपूर्ण प्रगतीची उदाहरणे आहेत.

सार्वजनिक आरोग्य : जलनिःसारण ( पाण्याचा निचरा ) व द्रवरूप अपशिष्टांची विल्हेवाट यांचा प्रदूषणविरोधी उपायांशी निकटचा संबंध आहे. पाणलोट क्षेत्रांच्या काही भागांमधील नागरी विकासामुळे पाणलोटाचे स्वरूप बदलू शकते. नद्यांचे प्रवाह वळविणे व नियंत्रित करणे यांमुळे घडणार्‍या घटनांच्या स्वरूपात बदल होऊन पूर येतात आणि त्यांचा प्रतिबंध करण्याची व नियंत्रणाची आवश्यकता असते. हे काम अभियंते करतात. [⟶ पूरनियंत्रण ].

आधुनिक जीवनपद्धतीमुळे घनरूप अपशिष्टांच्या विल्हेवाटीचे प्रश्न निर्माण झाले. मोटारगाड्या व प्रशीतक यांसारख्या टिकाऊ वस्तूंच्या उत्पादनातून अशी अपशिष्टे निर्माण होत असतात. अशा वस्तूंचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते व या वस्तूंचे कार्य मर्यादित काळापर्यंत चांगले सुरू राहते. त्यामुळे घनरूप अपशिष्टांच्या मोठ्या राशी निर्माण होतात. पूर्वी  घनरूप अपशिष्टांच्या लहान राशी (गाठोडी) विल्हेवाट लावण्याजोग्या होत्या. मात्र, त्यांच्या मोठ्या राशी सहजपणे विल्हेवाट लावता येतील अशा नसतात. अशा रीतीने पर्यावरणाच्या संरक्षणातील स्थापत्य अभियांत्रिकीचे कार्य महत्त्वाचे आहे. म्हणून बांधकामाचा अभिकल्प तयार करतानाच पर्यावरणाची हानी व प्रदूषण न होता पर्यावरणाची वृद्धी होईल, याची काळजी घेतात. [⟶ औद्योगिक अपशिष्टे ]. 

संदर्भ : 1. American Society of Civil Engineers, Our Past, The Present, Your Future in Civil Engineering, 1993.           2. American Society of Civil Engineers, The Civil Engineering Technologist, 1993.

           3. Hall, W. J. et al, Civil Engineering in the 21st Century : A Vision and Challenge for the Profession, 1988.

           4. Merritt, F. S. Loftin, M. K. Ricketts, J. T. Standard Handbook for Civil Engineers, 1996.

           5. National Geographic Society (U.S.), Book Division, The Builders : Marvels of Engineering, 1992.

           6. Pannell, J. P. M. An Illustrated History of Civil Engineering, 1964.

           7. Piesold, D. D. Civil Engineering Practice, 1992.

ठाकूर, अ. ना.


आकाशी कायको पूल (१९९८) : जपानमधील मुख्यभूमीवरील कोबे शहर आणि ॲवॅज बेटावरील आवाया शहर यांना जोडणारा झुलता पूल (लांबी ३,९११ मी. उंची २८२.८ मी.).

आधुनिक काळातील काही सर्वोत्कृष्ट बांधकामे

हूव्हर धरण (१९३६) : ॲरिझोना व नेव्हाडा यांच्या सीमेवर ब्लॅक कॅन्यन येथे कोलोरॅडो नदीवरील भारस्थायी - कमानी धरण (उंची २२१.४ मी. लांबी ३७९ मी. जलाशयाची क्षमता ३३६ x १०४ मी.३

फॉलकर्क चाक (२०००) : स्कॉटलंडमधील युनियन कालव्याला द फिर्थ ऑफ क्लाइड कालवा जोडणारा परिभ्रमी जहाज उत्थापक. वेम्ब्ले स्टेडियम (२००७) : लंडन (इंग्लंड) येथील फुटबॉल क्रीडांगण (आसनक्षमता ९०,०००)
बुर्ज खलिफा (२०१०) : दुबई येथील जगातील सर्वांत उंच इमारत (उंची सु. ८२९ मी. १६३ मजले). दा व्हींची टॉवर (२०१०) : दुबई येथील वातशक्तिचलित गोल फिरणारी गगनचुंबी इमारत (यामधील प्रत्येक मजला स्वतंत्र रीत्या फिरू शकतो उंची ४२० मी. ८० मजले).