सर्वेक्षण : भूपृष्ठावरील किंवा त्यांच्या जवळील बिंदू, रेषा आणि प्राकृतिक स्वरूपे यांच्यातील परस्परसंबंधाचे मापन करणे म्हणजे सर्वेक्षण होय. यामुळे या बिंदूंची सापेक्ष स्थाने निश्चित करता येतात. यामध्ये निरनिराळ्या उपकरणांच्या साहाय्याने बिंदुबिंदूंमधील क्षितिजसमांतर अंतरे मोजणे, उंची मोजणे, त्यांमधील दिशा व कोन मोजणे वगैरे गोष्टींचा अंतर्भाव होतो. भूमापन करून जमविलेली माहिती नकाशे, जमिनीचा उंचसखलपणा दाखविणारे तक्ते वगैरेंद्वारा व्यक्त केली जाते. त्यामुळे भूमापनाबरोबरच नकाशे बनविण्याचे कामही सर्वेक्षणात अंतर्भूत असते. याद्वारे क्षेत्रफळ व घनफळ काढता येते. तसेच कोणत्या तरी सहनिर्देशक प्रणालीच्या संदर्भात स्थाननिश्चिती करता येते.

सर्वेक्षणाचे अनेक प्रकारे वर्गीकरण केले जाते. सर्वेक्षणाचे क्षेत्र मर्यादित (२५० चौ. किमी. पर्यंत) असल्यास ते समपातळीतील सर्वेक्षण समजतात, उलट हे क्षेत्र मोठे असल्यास केलेल्या मोजमापात भूपृष्ठाच्या वक्रतेचा विचार करून दुरूस्त्या करणे आवश्यक असते. यास भूगणितीय सर्वेक्षण म्हणतात. सर्वेक्षणाच्या उद्देशावरून केलेले वर्गीकरण म्हणजे मार्ग सर्वेक्षण, निर्माण सर्वेक्षण, जलालेखीय सर्वेक्षण, सीमा सर्वेक्षण इ. होत. सर्वेक्षणाच्या उपकरणांवर अवलंबून केलेले वर्गीकरण म्हणजे साखळी टेप, होकायंत्र, प्लेन टेबल (समतल यंत्र) सर्वेक्षण वगैरे होत. सर्वेक्षणाच्या पद्धतीनुसार केलेले वर्गीकरण म्हणजे त्रिकोणीकरण, वेढा पद्घत, छायाचित्रणात्मक वगैरे होत.

इतिहास : सर्वेक्षणशास्त्राचा उगम ईजिप्तमध्ये झाला असावा असे अनुमान काढण्यात येते. एका थडग्यात एका ईजिप्शियन सरदाराच्या राजवाड्याचा नकाशा सापडला. त्याचप्रमाणे एका थडग्यावर दोन मोजणीदार शेतीची मापे घेत असल्याचा देखावा आहे. ईजिप्तमधील लोक हे योग्य प्रकारे मोजणी करण्यात व त्याप्रमाणे काम करण्यात तरबेज होते, हे त्यांनी बांधलेल्या प्रचंड पिरॅमिडवरून सिद्ध होते. रोमन लोकांनी ईजिप्त व्यापला तेव्हा त्यांना तेथील सर्वेक्षणाची उपकरणे मिळाली. त्यात रोमनांनी पाणसळी व प्लेन टेबल यांची भर घातली.

रोमन काळात एकमेकींस काटकोन करणाऱ्या दोन पट्ट्यांवरून ओळंबे सोडून जमिनीवर काटकोनात रेषा आखत असत. या उपकरणास ‘ गोमा ’ असे म्हणत. तसेच ते लोक १० फुटी ( सु. ३ मी.) सळया लांबी मोजण्यासाठी वापरीत. अशा सळ्या व गोमा सापडलेल्या आहेत. प्लेन टेबलासारखे एक उपकरण रोमन लोक रस्त्यांची दिशा आखण्यासाठी वापरीत असत. इ.स.पू. १६०० वर्षांपासून चिनी लोकांना चुंबकीय दगडाचे महत्त्व ठाऊक होते व त्यांच्याजवळ होकायंत्रासारखे एक यंत्र होते. इ.स.पू. दुसऱ्या शतकात ग्रीक लोक ताऱ्यांची क्षितिजावरील उंची (उन्नतांश ) मोजण्यासठी ॲस्ट्रोलेब हे उपकरण वापरीत. इ.स. १४५० मध्ये अरबांनी होकायंत्राच्या साहाय्याने ते जेथे जेथे गेले तेथील समुद्रकिनाऱ्यांचे आराखडे तयार केले. इ. स. १४९८ मध्ये भारताच्या समुद्रकिनाऱ्याचा नकाशा वास्को द गामा यांना एका गुजराती गृहस्थाने दाखविला. यूरोपमध्ये सोळाव्या शतकात प्लेन टेबलाचा उपयोग होत होता. त्याच सुमारास इंग्लंड व इतरत्र सर्वेक्षक त्रिकोणीकरण व आंतरछेदन पद्धतींचा उपयोग करीत होते.

पंधराव्या शतकात यूरोपमध्ये मुद्रण कलेचा शोध लागला आणि त्यानंतर अनेकविध महान शास्त्रीय शोधांचे जे युग अवतरले त्याचा सर्वेक्षण व नकाशे बनविण्याच्या शास्त्रावर विलक्षण प्रभाव पडून या क्षेत्रात झपाटयाने प्रगती व विस्तार सुरू झाला. सतराव्या शतकाच्या सुरूवातीला इंग्रज गणिती एडमंड गंटर यांनी सर्वेक्षणाची साखळी तयार केली. ती अंतर मोजण्याचे प्रमाण माप ठरली. ही साखळी दीर्घकाळ वापरात होती. विसाव्या शतकाच्या प्रारंभी पोलादी टेपने (मोजणी फितीने) तिची जागा घेतली.

अठराव्या शतकाच्या अखेरीस आधुनिक सर्वेक्षण कामे प्रचलित होती. १७९०-१८०० दरम्यान स्पेनमधील बार्सिलोना व फ्रान्समधील डंकर्क यातून जाणाऱ्या मध्यान्हवृत्ताचे मापन करण्यात आले. त्यानंतर मेट्रिक मापन पद्धतीतील मीटर हे लांबीचे मूलभूत एकक प्रस्थापित झाले. ते सर्वेक्षणासाठी लांबीचे मूलभूत मानक झाले.

विसाव्या शतकात प्रकाशकी, छायाचित्रण, इलेक्ट्रॉनिकी, हवाई उड्डाणे, कृत्रिम उपगह इ. क्षेत्रांतील नवनवीन शोधांचा सर्वेक्षण पद्धतींत वाढत्या प्रमाणात उपयोग सुरू झाला. हवाई छायाचित्रणांची तंत्रे नकाशा तयार करण्यासाठी वापरात आली. तसेच इलेक्ट्रॉनीय प्रयुक्त्यांव्दारे अंतर मोजण्यात येऊ लागले. यामुळे सर्वेक्षणाच्या अचूकतेत मोठी प्रगती झाली. विसाव्या शतकाच्या अखेरीस झालेल्या तंत्रविदयेतील महत्त्वपूर्ण प्रगतीचा लाभ जगभरातील सर्वेक्षणासाठी झाला. उदा., भूगणितीय सर्वेक्षणासाठी कृत्रिम उपगहांचा संदर्भबिंदू म्हणून उपयोग झाला; तर सर्वेक्षणाच्या प्रदत्तावर (माहितीवर) संस्करण करण्यासाठी व ती नोंदण्यासाठी संगणकांचा उपयोग होऊ लागला.

आ. १. त्रिकोणीकरण: ( अ ) त्रिकोणाकृतींचे जाळे ( आ ) त्रिकोणाकृतींची साखळी ( इ ) कर्णयुक्त चौकोनांची साखळी.सर्वेक्षणाची मूलतत्त्वे : त्रिकोणीकरण : सर्वेक्षणाचे क्षेत्र अनेक त्रिकोणांत विभागण्याच्या पद्धतीस त्रिकोणीकरण असे म्हणतात. या पद्धतीत त्रिकोणाची एक बाजू अत्यंत काळजीपूर्वक मोजतात व कोनही अत्यंत काटेकोरपणे मोजतात. त्रिकोणाची एक बाजू व सर्व कोन माहीत झाल्यावर ⇨ त्रिकोणमिती च्या साहाय्याने इतर बाजूंची लांबी काढता येते. अशा तऱ्हेने त्रिकोणाच्या इतर बाजूंची लांबी मिळाल्यावर त्या बाजूंवर आधारित त्रिकोण करून त्यांचे कोन व ही बाजू यांच्या आधाराने त्याच्या इतर बाजू काढता येतात. सर्वेक्षण क्षेत्र ज्या प्रमाणात लहान अथवा मोठे असेल त्या प्रमाणात किंवा जास्तीतजास्त दृष्टी पोहोचू शकेल त्या प्रमाणात या त्रिकोणाच्या बाजूंची लांबी घेतात. भारतीय सर्वेक्षणात अशा त्रिकोणाच्या बाजूंची लांबी डोंगराळ भागांत ३० मैल ( सु. ४८ किमी.) व सपाट भागांत ११ मैल (सु. १७.६ किमी.) आहे. ज्या भागावर सर्वेक्षण करावयाचे त्यावर अशा त्रिकोणाचे एक जाळेच बनविले जाते. भूपृष्ठावर प्रथम मोठमोठे त्रिकोण बनवितात व ते अत्यंत सूक्ष्मपणे मोजतात. या मुख्य त्रिकोणांतर्गत दुय्यम त्रिकोण बनवितात व त्यांचे मापन थोडे कमी काटेकोरपणे केले तरी चालते. या त्रिकोणांतर्गत पुन:तिय्यम त्रिकोण तयार करतात, कारण प्राथमिक त्रिकोणांचे क्षेत्र खूप मोठे असल्याने तपशीलवार सर्वेक्षणासाठी जवळच्या संदर्भरेषांची आवश्यकता असते.

काही वेळा त्रिकोणाच्या जाळ्यांऐवजी त्रिकोणाकृतींची अथवा कर्णयुक्त चौकोनांची साखळी बनवितात. भारतीय सर्वेक्षणात या पद्धतीचा उपयोग केलेला आहे (आ. १). या साखळ्या एखादया विशिष्ट अक्षास समांतर व काटकोनात घेऊन सर्व क्षेत्र व्यापले जाते. भारतीय भूमिस्वरूप सर्वेक्षणात या पद्धतीचा उपयोग करण्यात आला आहे. त्रिकोणांची साखळी दक्षिणोत्तर कन्याकुमारी ते डेहराडून, तिला समांतर दुसरी साखळी मंगलोरहून उत्तरेकडे टाकली आहे. त्याचप्रमाणे पूर्व-पश्चिम कराची ते कोलकाता, मंगलोर ते चेन्नई, पूर्व किनाऱ्याने कोलकाता ते चन्नई वगैरे साखळ्या टाकलेल्या आहेत.

या पद्धतीत त्रिकोणाच्या ज्या एका बाजूची लांबी मोजावयाची ती खूप लांब व बहुधा डोंगर-टेकडयांवर तिची दोन्ही टोके असल्याने मोजणे अशक्यप्राय होते. यासाठी त्रिकोणाच्या बाजूपेक्षा खूपच लहान अशी एक रेषा घेतात, तिला पाया रेषा म्हणतात. ही रेषा अत्यंत काटेकोरपणे मोजून तिच्यावरून कोन मोजून गणिताने त्रिकोणाच्या बाजूंची लांबी काढतात.

वेढा पद्घत : (ट्रॅव्हर्सिंग ). या पद्धतीत एकमेकींस जोडणाऱ्या अनेक मोजणी रेषा असतात. या रेषांची लांबी साखळी अथवा टेपने मोजतात व दिशा कोनमापकाने निश्चित करतात. वेढा पद्धतीचे दोन प्रकार आहेत. ‘ बंद होणारा वेढा ’ या पद्धतीत शेवटची रेषा सुरूवातीच्या बिंदूत येऊन मिळते व मोजणी रेषांची एक बहुभुजाकृती तयार होते. या पद्धतीत वेढा पद्धतीचे सर्वेक्षण अचूक झाले आहे की नाही, हे तपासणे शक्य होते. एखादे जंगल, तलाव, शहरी वस्तीतील क्षेत्र अशा ठिकाणच्या सर्वेक्षणास ही पद्धत योग्य ठरते. दोन पूर्वनिश्चित स्थानकांमध्ये वेढा सर्वेक्षण केले तरी तो संपूर्ण वेढाच होय. ज्यावेळी शेवटची रेषा सुरूवातीच्या बिंदूस येऊन मिळत नाही, तेव्हा त्यास ‘ खुला किंवा मुक्त वेढा ’ असे म्हणतात. ही पद्धत रस्ते, रेल्वे, नदया वगैरेंच्या सर्वेक्षणात वापरतात. तथापि, या सर्वेक्षणाचा बिनचूकपणा तपासणे अशक्य असते. या सर्वेक्षणात दिशा ठरविण्यासाठी होकायंत्र किंवा थिओडोलाइट ही उपकरणे वापरतात. वेढा पद्धतीने स्थानके एकदा निश्चित झाल्यानंतर तपशिलाचे सर्वेक्षण मोजणी रेषांवरून लंबांतरे घेऊन किंवा अन्य पद्धतीने केले जाते.

त्रिपार्श्व पद्धत : या पद्धतीत त्रिकोणीकरणाप्रमाणेच त्रिकोणाकृतीत सर्वेक्षण क्षेत्र विभागलेले असते परंतु अंतरे इलेक्ट्रॉनीय पद्धतीने मोजतात. त्रिकोणांच्या तिन्ही बाजूंची अंतरे मोजून त्रिकोणाचे आंतरकोन गणिताच्या साहाय्याने काढतात. त्रिकोणाचे तिन्ही बिंदू एकाच पातळीत नसतात. त्यामुळे होणारा त्रिकोण हा तिरक्या पातळीतील त्रिकोण होतो. ही अंतरे गणिताच्या साहाय्याने आडव्या पातळीतील अंतरात रूपांतरित करतात.

सर्वेक्षणाचे प्रकार : भूगणितीय सर्वेक्षण : या प्रकारच्या सर्वेक्षणात कमालीची दक्षता व सूक्ष्मतम मापनाची आवश्यकता असते. फार मोठया भूभागाचे सर्वेक्षण करताना भूपृष्ठाची वक्रता लक्षात घेऊन केलेल्या मोजणीत यासाठी योग्य ती दुरूस्ती करावी लागते. या सर्वेक्षणाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे भूपृष्ठावरील निरनिराळ्या बिंदूंची स्थाने, त्यांची उंची अत्यंत काटेकोरपणे निश्चित करणे व अशा तऱ्हेने छोटया सर्वेक्षणासाठी नियंत्रण बिंदू तयार करणे हे होय. त्रिकोणीकरण किंवा वेढा सर्वेक्षणातील शिरोबिंदू किंवा स्थानकाचे निश्चित स्थान किंवा उंची ठरविणे, हा या सर्वेक्षणाचा हेतू होय. थिओडोलाइटाने अनेकदा परतपरत मापने घेऊन कोन मोजतात. दोन बिंदूंमधील अंतर ते एका पातळीवर आणून काढतात. मोजणी रेषांची दिशा खऱ्या उत्तर दिशेपासून मोजतात. सूक्ष्मतम संतलन पद्धतीचा अवलंब करून बिंदूंची प्रमाण गणना (मोजणी) तळापासूनची उंची निश्चित करतात व ते उंची मोजण्यासाठी नियंत्रण बिंदू म्हणून वापरता येतात.

मार्ग सर्वेक्षण : महामार्ग,  रेल्वे, जलवाहिन्या बसविणे, कालवे यांसारख्या दळणवळणाच्या मार्गांची आखणी करण्यासाठी करावयाच्या सर्वेक्षणास ‘ मार्ग सर्वेक्षण ’ म्हणतात. यामध्ये मार्गाचे आरेखन, उंचसखलपणा पाहणे, मार्गाच्या कामासाठी लागणाऱ्या खोदकाम व भरावाचे अंदाज बांधणे व प्रत्यक्ष कार्यवाही इ. गोष्टींचा समावेश होतो. यासाठी करावयाच्या सर्वेक्षणाचे सर्वसाधारण पाहणी, प्राथमिक सर्वेक्षण, निश्चित आखणीनंतरचे तपशीलवार सर्वेक्षण व सर्वांत शेवटी कार्यवाहीच्या वेळचे सर्वेक्षण असे विभाग पडतात. सर्वसाधारण पाहणीत ज्या भागातून मार्ग जाणार त्या भागातील जमीन, उंचसखलपणा, जंगले, नदयानाले इत्यादींचा पूर्ण अभ्यास अपेक्षित असतो. त्यानंतर १-२ कच्च्या मार्गरेषा अंदाजे ठरवितात. प्राथमिक सर्वेक्षणात या मार्गाच्या दोन्ही बाजूंस भूसंपादनाच्या रूंदीएवढी अंतरे घेऊन होणाऱ्या अरूंद पट्टीचे सर्वेक्षण करतात व नकाशे बनवितात. या नकाशांचा अभ्यास करून निश्चित मार्गरेषा आखली जाते. मार्गात जेथे दिशाबदल होतो, तेथे तो बदल योग्य त्रिज्येच्या वक्राने घडवून आणला जातो. हा निश्चित मार्ग जमिनीवर आखून त्याचे तपशीलवार सर्वेक्षण केले जाते. तपशीलवार सर्वेक्षणात मार्गरेषेवर काही ठराविक अंतरावरील (१५ किंवा ३० मीटरवर) बिंदूंची उंची मोजली जाते व तसेच या रेषेवर ठराविक अंतरावर आडवे छेद घेऊन छेदावरील बिंदूंची उंची मोजतात. यावरून उभ्या छेदाचे नकाशे बनवून त्यावर रस्त्याची नियोजित पातळी दाखवितात. यावरून मातीकामाचा बराच अचूक अंदाज बांधता येतो. याबरोबरच मार्गावरील नदयानाल्यांवरील पुलांच्या कामासाठी व अभिकल्प ( आराखडा ) बनविण्यासाठीही सर्वेक्षण करावे लागते.

निर्माण सर्वेक्षण : या सर्वेक्षण कामाच्या जागेवर, तरीही प्रत्यक्ष कामापासून थोडे बाजूस, संदर्भबिंदू निश्चित करून ठेवतात. काम चालू असताना हे बिंदू नियंत्रण बिंदू म्हणून उपयोगी पडतात. या बिंदूंची  उंचीही काटेकोरपणे निश्चित केली जाते. काम चालू असताना विविध स्तरांवर ते नियोजित कामाबरहुकूम चालू आहे की नाही हे सर्वेक्षणाने तपासतात. अशा कामाचे क्षेत्र मर्यादित असल्याने अशा ठिकाणचे  सर्वेक्षण समपातळीतीलच असते.

भूमिस्वरूप सर्वेक्षण : भूपृष्ठांवरील त्रिकोणीकरण किंवा वेढा पद्धत सर्वेक्षणाचे बिंदू भूगणितीय सर्वेक्षणाद्वारा नियंत्रण बिंदू म्हणून निश्चित केल्यानंतर त्यामधील तपशील भरण्यासाठी भूमिस्वरूप सर्वेक्षण वापरतात. जमिनीवर नदयानाले, जंगले, तलाव इ. नैसर्गिक गोष्टी तसेच गावे, रस्ते, लोहमार्ग, पूल, कृत्रिम तलाव इ. गोष्टी नकाशावर यथार्थपणे दाखविण्यासाठी हे सर्वेक्षण उपयोगी पडते. यावरून बनविलेल्या नकाशास भूमिस्वरूप नकाशे म्हणतात. ह्या नकाशावर वरील गोष्टींचे आडव्या पातळीतील अंतर तर मिळतेच, पण त्याचबरोबर विविध बिंदूंमधील सापेक्ष उंचीदेखील मिळते. भूपृष्ठाचा उंचसखलपणा नकाशावर विटकरी रंगाच्या समपातळी  (समोच्च्ता) रेषांच्या साहाय्याने दाखविलेला असतो. समपातळी रेषा ही रेषा असून तीवरील प्रत्येक बिंदूंची एका प्रमाणपातळीपासूनची उंची सारखी असते. ही प्रमाणपातळी म्हणजे समुद्रसपाटी होय.

या सर्वेक्षणात प्रथम नियंत्रण बिंदू पुरेशा सूक्ष्मतेने निश्चित करून त्यांच्या चौकटी तयार करतात. प्रत्येक चौकटीतील तपशीलवाराचे सर्वेक्षण निरनिराळ्या उपकरणांनी करतात. प्लेन टेबल व नतिमापक किंवा थिओडोलाइट वगैरेंच्या साहाय्याने तपशीलवार सर्वेक्षण करतात. या कामात छायाचित्रीय सर्वेक्षणाचाही मोठया प्रमाणावर उपयोग केला जातो. छोट्या क्षेत्राचा नकाशा मोठया मापप्रमाणाने ( स्केलने ) बनविणे सोपे आहे परंतु खूप मोठया क्षेत्राचा नकाशा लहान स्केलने काढणे हे मोठे जिकिरीचे असते. भूमिस्वरूप नकाशांचे स्केलही खूप लहान (१” = १ मैल किंवा १/६३३६० आणि मेट्रिक पद्धतीत १ सेंमी. = १ किमी. म्हणजे १/१०००००) असते. म्हणूनच हे काम भारतीय सर्वेक्षण संस्थेसारख्या सरकारी संस्थेमार्फत होते. या नकाशांचा प्रकल्पांच्या नियोजनात फार मोठा उपयोग होतो. धरणासाठी योग्य जागा निवडणे रस्ते, कालवे वगैरेंचे अंदाजे आरेखन पूल, धरणे या ठिकाणी नदया-नाले यांची पाणलोट क्षेत्रे मोजणे यांसारख्या अनेक स्थापत्यशास्त्रीय प्रकल्पांची प्राथमिक तपासणी भूमिस्वरूप नकाशावरून करता येते. देशाच्या संरक्षणदलात या नकाशांचा फार मोठया प्रमाणावर उपयोग केला जातो.

भूपृष्ठांतर्गत सर्वेक्षण : खाणकाम, बोगदे अथवा पाण्याखालून जाणारे मार्ग इत्यादींसाठी भूपृष्ठांतर्गत (भूमिगत ) सर्वेक्षण करावे लागते. ह्या सर्वेक्षणाचे स्वरूप तत्त्वत: जमिनीवरील सर्वेक्षणासारखेच असते परंतु काही बाबतींत थोडासा फरक असतो. कारण सर्वेक्षणाचे नियंत्रण बिंदू भूपृष्ठावर असतात. निरीक्षणांचा अचूकपणा तपासण्याचे साधन उपलब्ध नसल्याने निरीक्षणे अनेकदा परतपरत घ्यावी लागतात. त्रिकोणमिती व संतलन पद्धतीचा उपयोग करावा लागतो. अंतरे उतारावर मोजावी लागतात. निरीक्षणासाठी दुर्बिण, कोरलेले आकडे यांवर कृत्रिम प्रकाश टाकण्याची सोय करावी लागते. उभ्या पातळीतील निरीक्षणे घेताना फार मोठया ऊर्ध्व कोनांची निरीक्षणे घ्यावी लागतात. हे थिओडोलाइटाच्या दुर्बिणीतून वेधणे अशक्य होते. यासाठी ‘A’ फ्रेमच्या बाहेर आणखी एक दुर्बिण बसविलेला  थिओडोलाइट वापरावा लागतो. यातील सर्वांत अवघड काम म्हणजे भूपृष्ठावरील बिंदूवरून जमिनीखालील कामाच्या दिशेचे नियंत्रण करणे हे होय.

जलालेखीय सर्वेक्षण : यात जलाशयाशी संबंधित सर्वेक्षणाचा अंतर्भाव होतो. याचा मुख्य उद्देश जलमार्गासाठी नकाशे बनविणे, किनाऱ्यानजिकच्या पाण्याची खोली मोजणे, जलाशयाच्या तळाचे स्वरूप अजमावणे, खडकांच्या रांगा, दीपस्तंभ, मार्गदर्शक खुणा वगैरे नकाशावर दाखविणे, तसेच नदया व प्रवाहामधील पाण्याचा वेग व दिशा निश्चित करणे, भरती-ओहोटीची उंची मोजणे हा होय. त्याप्रमाणे धरणे, त्यामुळे निर्माण झालेले कृत्रिम जलाशय, पूल, बंदरे, धक्के आणि नदया व बंदरे यांच्याशी संबंधित विविध स्थापत्यशास्त्रीय प्रकल्पांच्या नियोजनात व कार्यवाहीत या सर्वेक्षणाचा उपयोग होतो.

याचे स्वरूप बरेचसे भूमिस्वरूप सर्वेक्षणासारखे असते. यात पाण्यातील निरनिराळ्या बिंदूंची प्रमाण पातळीपासूनची खोली मोजतात. भरती-ओहोटीमुळे पाण्याचा पृष्ठभाग नेहमी एकाच पातळीत राहत नाही. त्यामुळे विशिष्ट ठिकाणची विशिष्ट वेळची पाण्याची पातळी प्रमाण मानून तीपासून खोली मोजतात.

उथळ पाण्याची खोली ४.५ ते ७ मीटर लांबीचा एक दंड पाण्यात उभा करून तो जेवढा बुडेल त्यावरून मोजतात किंवा साखळी अथवा दोरीच्या टोकाशी जड वजन बांधून तळाशी वजन पोहोचेपर्यंत पाण्यात सोडतात व दोरीच्या बुडालेल्या लांबीवरून पाण्याची खोली मोजतात; परंतु जेथे खोली जास्त असेल अशा ठिकाणी ध्वनिपरावर्तन पद्धतीने खोली मोजतात. ठिकठिकाणची खोली मोजण्यासाठी एक नौका वापरतात. ही नौका जेथील खोली मोजावयाची तेथे नेतात. विद्युत् ध्वनिपरावर्तक उपकरणाने जलपृष्ठावरून ध्वनितरंग पाण्यात सोडतात. हे ध्वनितरंग तळाशी पोहोचून तेथून परावर्तित होऊन पाण्याच्या पृष्ठभागी येण्याच्या कियेस लागणारा वेळ व ध्वनीचा पाण्यातील वेग यांचे अचूक गणित वापरून यंत्रावर सरळ पाण्याची खोलीच मिळते. काही उपकरणांवर तर नौका जसजशी हलेल तसतशी खोली मोजून खोलीचा आलेखच मिळतो. [⟶ प्रतिध्वनि सोनार व सोफार].

परंतु केवळ एखादया बिंदूची खोली निश्चित होऊन भागत नाही. जलपृष्ठावरील बिंदूचे नकाशावरील स्थान निश्चित होणे आवश्यक असते. हे स्थान निश्चित करण्यासाठी निरनिराळ्या पद्धतींचा वापर करतात. एक म्हणजे किनाऱ्यावरील तीन पूर्वनिश्चित बिंदूंचे पाण्यातील बिंदूंशी होणारे कोन मोजणे व त्यावरून त्रिभुज कोनमापकाच्या साहाय्याने नकाशावर बिंदूंचे स्थान ठरविणे. दुसऱ्या पद्धतीत किनाऱ्यावरील दोन पूर्वनिश्चित स्थानकांवरून थिओडोलाइटाने बिंदूंची दिशा मोजून आंतरछेद पद्धतीने बिंदूंचे स्थान ठरवितात. इलेक्ट्रॉनिकीचा उपयोग करून नौकेवरून रेडिओ तरंग प्रक्षेपित करतात. हे तरंग किनाऱ्यावरील गाहीवर गहण करून परावर्तित केले जातात. हे तरंग परत नौकेवर येण्यास लागणारा वेळ १ × १०-८  सेकंद इतक्या सूक्ष्मपणे मोजता येतो. लागलेला वेळ आणि ध्वनितरंगाचा वेग यांच्या गणिताने अंतरे मिळतात. अशा तऱ्हेने पाण्यातील निरनिराळ्या बिंदूंचे क्षितिजपातळीतील स्थान व त्यांची खोली यावरून जलाशयातील समपातळी रेषा दाखविणारे नकाशे बनविता येतात.

प्रवाहाच्या पृष्ठभागावरून तरंगत जाणारी एखादी हलकी वस्तू सोडून ती दोन ठराविक बिंदूंमधील अंतर किती वेळात जाते यावरून प्रवाहाचा वेग मोजतात. वेग मोजण्यासाठी प्रवाहमापक उपलब्ध आहेत. प्रवाहातून वाहणारे पाणी मोजण्यासाठी छोटया प्रवाहात एक भिंत बांधून पाणी भिंतीवरून वाहू देतात. या पाण्याच्या उंचीवरून प्रवाह मोजता येतो. मोठया नदीतून वाहणारे पाणी मोजताना नदीच्या पात्राचा आडवा छेद घेतात व तेथे प्रवाहाचा वेग मोजतात. छेदाच्या क्षेत्रफळास वेगाने गुणून वाहणारे पाणी मोजता येते. दर सेकंदास किती घनमीटर पाणी वाहते हे पाणी मोजण्याचे एकक होय.

सीमा सर्वेक्षण : एखादया मालमत्तेच्या जमिनीवरील सीमा निश्चित करण्यासाठी करावयाच्या सर्वेक्षणास सीमा (कॅडेस्ट्रल ) सर्वेक्षण म्हणतात. हे नकाशे मोठया स्केलने काढलेले असतात. यात जमिनीच्या मालकी हक्काप्रमाणे तुकडे पाडलेले असून अशा तुकड्यांना क्रमांक दिलेले असतात. त्यास सर्वेक्षण क्रमांक (सर्व्हे नंबर) असे म्हणतात. जमीन मोजण्याचे एकक एकर असल्यास ६६’ = १” ह्या स्केलने नकाशे काढतात. सर्वेक्षणात प्लेन टेबल व शंकू साखळी यांचा उपयोग करतात. सर्वेक्षण क्रमांकाचे स्थान त्याच्या पूर्व, पश्चिम, दक्षिण व उत्तरेस असलेल्या सर्वेक्षण क्रमांकावरून निश्चित करतात. जमिनीवर या सर्वेक्षण क्रमांकाच्या सीमा जेथे जेथे मिळतात तेथे दगड रोवून ठेवलेले असतात. जमिनीच्या सीमांबरोबरच तीवरील घरे, झाडे, नदयानाले, विहिरी, रस्ते, पाऊलवाटा वगैरेही नकाशावर दाखवितात. मालमत्तेची वाटणी झाल्यास, मालकीहक्कात बदल झाल्यास पुन्हा सर्वेक्षण करून नवीन सीमा निश्चिती करावी लागते. हे सर्वेक्षण मालमत्ता विषयक कायद्यांच्या अनुषंगाने करावे लागते. त्यामुळे हे काम सरकारी महसूल खात्यातर्फे सरकारी मोजणीदाराकरवी होते. जमिनीच्या किंमतीच्या अनुषंगाने ढोबळ अथवा सूक्ष्ममापनाची उपकरणे  या सर्वेक्षणात वापरतात. शहरातील मालमत्तेच्या सीमा ठरविताना अशीच पद्धत उपयोगात आणतात. शहरी विभागांत सर्वेक्षण क्रमांकात रस्ते आखून इमारतींचे प्लॉट (खंड) पाडलेले असतात. शहरी विभागात जमिनीचा दर जास्त असल्याने नियंत्रण बिंदू थिओडोलाइटाने निश्चित करून तपशील भरणीचे काम प्लेन टेबलाने करतात. यालाच शहर सर्वेक्षण (सिटी सर्व्हे) म्हणतात.

छायाचित्रीय सर्वेक्षण : छायाचित्रांचा उपयोग करून भूपृष्ठांवरील निरनिराळ्या बिंदूंचे स्थान व उंची निश्चित करता येतात व समपातळी रेषांकित नकाशे बनविता येतात. या प्रकारच्या सर्वेक्षणाचा उपयोग भूमिस्वरूप नकाशावरील तपशील दाखविण्याच्या सर्वेक्षणात मोठया प्रमाणावर केला जातो. या कामासाठी छायाचित्रांचा उपयोग करण्याची कल्पना बरीच जुनी असून प्रथम ती एका लौसेदात या सैन्यातील फेंच अभियंत्याला सुचली व त्याने १८६१ मध्ये अशा तऱ्हेचा पहिला कॅमेरा शोधून काढला परंतु विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात छायाचित्रण, विमानोड्डाण वगैरे क्षेत्रांतील प्रगतीमुळे पहिल्या महायुद्धात या पद्धतीच्या सर्वेक्षणाचा विकास झाला. भूपृष्ठ दाट जंगलाने आच्छादलेले असेल किंवा ते अत्यंत सपाट असेल तर या सर्वेक्षणाचा फारसा फायदा होत नाही. संरक्षण दृष्टया महत्त्वाची माहिती मिळविण्यासाठीही या सर्वेक्षणाचा उपयोग होतो. हे सर्वेक्षण दोन प्रकारचे असते. जमिनीवरील छायाचित्रणात दोन पूर्वनिश्चित बिंदूवरून एकाच दृश्याची छायाचित्रे घेतात व दोन्ही छायाचित्राच्या साहाय्याने निरनिराळ्या बिंदूंचे नकाशावरील स्थान आंतरछेद पद्धतीने निश्चित करतात.

छायाचित्रीय सर्वेक्षणाचे तत्त्व प्लेन टेबल सर्वेक्षणाचेच आहे परंतु यामध्ये प्रत्यक्ष जागेवरील काम थोडे व कार्यालयातील काम खूप व तेही बरेच कष्टप्रद व कंटाळवाणे असते. जमिनीवरील सर्वेक्षणात फोटो (छायाचित्र ) थिओडोलाइट नावाचे उपकरण वापरतात. यामध्ये थिओ-डोलाइटाबरोबरच एक कॅमेरा बसविलेला असतो व मिळणाऱ्या छायाचित्रात मध्यावर एक आडवी व उभी काळी रेषा असते. या दोन रेषा जेथे मिळतात तेथून कॅमेऱ्याच्या भिंगाचा आस जातो. छायाचित्र घेताना कॅमेऱ्याच्या आसाचा उत्तरकोनही मोजता येतो. [⟶ कॅमेरा].

हवाई छायाचित्रावरून विश्वासार्ह नकाशे बनविण्यासाठी जमिनीवर काही नियंत्रण बिंदू असणे आवश्यक असते व हे बिंदू सर्वेक्षणाच्या अन्य पद्धतीने एकमेकांस जोडता आले पाहिजेत. हवाई सर्वेक्षणात काम अत्यंत जलद होते व जमिनीवरील सर्वेक्षणापेक्षा त्यात जास्त माहिती मिळते. विमानात कॅमेऱ्याचे भिंग जमिनीकडे व फिल्म क्षितिजसमांतर ठेवून छायाचित्रे घेतली जातात. विमान एका सरळ रेषेत व एकाच पातळीत उडते. ही उड्डाणे अनेक समांतर रेषांत केली जातात. प्रत्येक छायाचित्रात मागील छायाचित्राचा ६० टक्के वा बाजूच्या छायाचित्राचा ३० टक्के भाग पुन्हा चित्रित केला जातो. यामुळे कुठलाही भाग चित्रित व्हायचा राहून जात नाही. छायाचित्रांच्या जोडया त्रिमितिदर्शकाने पाहता येतात. विमानाचे उड्डाण सरळ रेषेत व एकाच पातळीत करणे ही अवघड गोष्ट आहे. तथापि, ⇨ रडार च्या साहाय्याने विमानांच्या उड्डाणावर व्यवस्थित नियंत्रण ठेवणे शक्य झाले आहे. कॅमेऱ्याचा अक्ष तिरका होणे, जमिनीचा उंचसखलपणा वगैरेंमुळे छायाचित्रावरील बिंदूचे स्थान बदलते; परंतु हा बदल गणिताच्या साहाय्याने काढून यथार्थ नकाशे बनविता येतात. [⟶ छायाचित्रण].

अंतर-मापन : अंदाजे अंतर मोजणे : दोन बिंदूंमधील अंतर हे नेहमी क्षितिजपातळीतील अंतर समजले जाते. अनेक वेळा हे अंतर उतारावर मोजून गणिताने त्याचे रूपांतर क्षितिजपातळीतील अंतरात केले जाते. हे अंतर मोजण्याच्या अनेक पद्धती उपलब्ध आहेत. अंदाजे अंतर काढण्यासाठी पावले मोजणे, पासोमीटर, आकमित-अंतरदर्शक वगैरेंचा उपयोग करतात. सर्वसाधारण माणसाचे सहज टाकलेले पाऊल ७५ ते ८० सेंमी. भरते. अंतर मोजताना दोन बिंदूंमधील अंतर चालत टाकलेली पावले मोजतात व त्यास पावलाच्या लांबीने गुणून अंतर काढतात. परंतु यासाठी जमीन एका पातळीत हवी व अंतर थोडे हवे. लांब अंतरास ही पद्धत कंटाळवाणी आहे व पावले मोजण्यातही चुका होऊ शकतात. चालताना शर्टाच्या बटणास पेडोमीटर अडकविल्यास त्यावर टाकलेल्या पावलांची अचूक नोंद होते. त्याचप्रमाणे पासोमीटर अडकविल्यास चाललेल्या अंतराचीच नोंद त्यावर होते. दोन बिंदू जोडणाऱ्या रेषेवरून गाडीचे अथवा सायकलचे चाक आकमित-अंतरदर्शक ( ओडोमीटर ) बसवून फिरवीत नेल्यास होणाऱ्या चाकाच्या फेऱ्यांची नोंद त्याच्यावर होते व चाकाच्या परिघास फेऱ्यांनी गुणून अंतर मिळते.

साखळी : अचूक अंतर मोजण्यासाठी मात्र वरील पद्धतीवर विसंबून चालत नाही. यासाठी साखळी किंवा टेप वापरतात. लोखंडाच्या एकसारख्या लांबीच्या अनेक सळ्या एकमेकींस जोडून साखळी बनवितात. साखळ्या अनेक प्रकारच्या असून त्यांची रचना सारखीच असते. परंतु साखळीच्या प्रकारानुसार तिची एकूण लांबी, सळईची लांबी व संख्या वेगवेगळी असते. मेट्रिक साखळ्या २० व ३० मीटर लांबीच्या असून त्यांत प्रत्येकी २० सेंमी. लांबीच्या अनुकमे १०० व १५० सळ्या असतात. दर पाच सळ्यानंतर एक पितळी रिंग (मीटर दाखविणारी ) व दर पाच मीटरवर एक पितळी बिल्ला असतो. अभियांत्रिकी साखळी १०० फूट  ( सु. ३० मी.) लांब असून तीत १ फूट ( सु. ३० सेंमी.) लांबीच्या  १०० सळ्या असतात व दर १० फुटांवर ( सु. ३ मी.वर ) एक बिल्ला लावलेला असतो. जमिनीचे क्षेत्र एकरांत मोजत असत. त्यासाठी सोयीची साखळी म्हणजे गंटर साखळी ही ६६ फूट ( सु. २० मी.) लांब असून तिच्यात ८ इंच ( सु. २० सेंमी.) लांबीच्या १०० सळ्या असतात. सर्व साखळ्यांना दोन्ही टोकांना हातात धरण्यासाठी पितळी कडया असतात.

टेप : टेप ही कापडाची, धातूची, पोलादाची किंवा एन्व्हाराची बनविलेली असते. ही ठराविक लांबीची १५ ते १६ मिमी. रूंदीची पट्टी एका गोल खोक्यात गुंडाळलेली असते. टेपचे एक टोक खोक्याच्या आसास जोडलेले असते व दुसऱ्या टोकास पितळी कडी बसविलेली असते. ती टेप हातात धरण्यास उपयोगी पडते. या पट्टीवर एका बाजूस अंतरे छापलेली असतात. मेट्रिक टेपवर प्रत्येक सेंमी.वर काही रेघ व दर १० सेंमी.वर १०, २०, ३० असे काळे आकडे छापलेले असतात. मीटरचे आकडे लाल शाईने छापलेले असतात. मेट्रिक टेप १५ व ३० मी. लांबीच्या मिळतात. कापडी टेप दमट हवेत खराब होतात, ताणल्या जातात म्हणून त्या सर्वेक्षणाच्या कामाच्या नाहीत. धातूचे टेप मात्र सर्वेक्षणात सर्रास वापरतात. ज्या ठिकाणी टेपने अत्यंत काटेकोर मापन करावयाचे तेथे पोलादी टेप वापरतात. ही टेप मोजताना ताणण्याची आवश्यकता नसते. एन्व्हार टेप पोलाद व निकेल यांच्या मिश्रधातूची बनविलेली असते व या मिश्रधातूच्या लांबीचा प्रसरण गुणक अतिशय कमी असल्याने मोजण्याच्या वेळी होणाऱ्या तापमानातील बदलाचा या टेपच्या लांबीवर विशेष परिणाम होत नाही. पायारेषा मोजणी, त्रिकोणीकरण इ. सर्वेक्षणांत ही टेप वापरतात.

आ. २. उतारावर अंतर मोजणे : १, २, ३- टप्प्याटप्प्याने मोजलेली अंतरे. अ आणि ब मधील अंतर = १ + २ + ३.

उतारावर अंतर मोजणे : यामध्ये गणिताने आडव्या पातळीतील अंतर काढणे आवश्यक असते. उताराचा कोन मोजता आल्यास गणिताने हे अंतर काढता येते. उतार फार असल्यास टेप व ओळंबा घेऊन टप्प्याटप्प्याने अंतर मोजतात. टेपची थोडी लांबी दरवेळेस क्षितिजसमांतर धरून ओळंब्याने जमिनीवरील बिंदू काढतात. त्या बिंदूवरून पुन्हा टेप क्षितिजसमांतर करून त्याच्या टोकाचा बिंदू ओळंब्याने प्रक्षेपित करतात. (आ. २.).

अप्रत्यक्ष अंतर मोजण्याची पद्घत : (स्टेडिया). सर्वेक्षणातील दुर्बिणीच्या साहाय्याने दोन बिंदूंमधील क्षितिज पातळीतील अंतर मिळू शकते. दुर्बिणीत जेथे प्रतिमा मिळते तेथे एका काचेच्या तबकडीवर तीन आडव्या समांतर तारा असतात, त्यांना स्टेडिया म्हणतात. अंतर मोजताना दुर्बिण एका बिंदूवर उभी करून ती क्षितिजसमांतर पातळीत आणतात. या बिंदूपासून ज्या बिंदूचे अंतर हवे असेल त्या बिंदूवर संतलन दंड ठेवून वरची व खालची तार दंडास जेथे छेदते तेथील निरीक्षणे घेतात. दोन बिंदूंमधील अंतर हे दुर्बिणीच्या वस्तुभिंगाचे केंद्रांतर आणि वरच्या व खालच्या तारांमधील अंतर यांवर अवलंबून असते. ही दोन्ही अंतरे स्थिर असल्याने बहुतेक दुर्बिणीची रचना अशी करतात की अंतरे मिळण्यासाठी येणारा स्थिर गुणक १०० यावा. या गुणकाने संतलन दंडावरील निरीक्षणांतील फरकास गुणिले असता दोन बिंदूंमधील अंतर मिळते. या पद्धतीने अचूक अंतर मिळते व अन्य पद्धतीने मोजलेली अंतरे चटकन तपासून पाहता येतात. थिओडोलाइटाची दुर्बिण आडव्या आसाभोवती उभ्या पातळीत फिरू शकते. त्यामुळे या दुर्बिणी बिंदूच्या खालच्या अगर वरच्या पातळीतील बिंदूंचे अंतरही स्टेडिया पद्धतीने मिळते परंतु, दृष्टिरेषा तिरकी होत असल्याने अंतरे तिरकी मिळतात. अर्थात दृष्टिरेषेचा कोन मोजून त्रिकोणमितीच्या साहाय्याने किंवा तयार कोष्टकातून या दोन बिंदूं-मधील आडव्या व उभ्या पातळीतील अंतरे काढता येतात. काही थिओडोलाइटांच्या दुर्बिणीत स्टेडियाऐवजी निरनिराळ्या वक्र रेषा असतात. त्यांनी संतलन दंडाचे निरीक्षण घेऊन कोणत्याही बिंदूचे उभ्या व आडव्या पातळीतील अंतर कसलीही आकडेमोड न करता सरळ मिळते.

रेंज फाइंडर, सब्टेन्स बार यांच्या साहाय्यानेही अंतरे मोजतात. यामध्ये एका ठराविक पायारेषेच्या दोन टोकांवरून अंतर हवे असेल त्या बिंदूचे कोन मोजतात. त्यावरून बिंदूचे अंतर काढतात. पायारेषेची लांबी ठराविक असल्याने कोनांचे रूपांतर अंतरात केले जाते.

कोनमापन : कोनमापन व दिशामापन : हे सर्वेक्षणात अतिशय महत्त्वाचे आहे. कोणत्याही रेषेने एखादया संदर्भदिशेशी केलेल्या कोनावरून तिची दिशा ठरविली जाते. ही संदर्भदिशा म्हणजे चुंबकीय उत्तर दिशा अथवा खरी उत्तर दिशा अथवा एखादी कल्पित दिशा असू शकेल. छोटया सर्वेक्षणात चुंबकीय उत्तर दिशा ही संदर्भ रेषा मानतात. कोणत्याही दिशेने या संदर्भ रेषेस केलेल्या कोनास उत्तरकोन (दिगंश) असे म्हणतात. हा कोन संदर्भदिशेपासून ०° ते ३६०° पर्यंत घटिवत (सव्य घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने) मोजतात. दोन एकत्र मिळणाऱ्या रेषांचे उत्तरकोन माहीत असल्यास त्या दोन रेषांमधील कोन काढता येतो. दोन बिंदूंमध्ये उभ्या पातळीत कोन असू शकतो. क्षितिजपातळीशी उभे कोन हे ऊर्ध्वकोन किंवा अध:कोन असू शकतात.

लोलकयुक्त होकायंत्र : याने उत्तरकोन मिळतात व थिओडोलाइट, पेटी कोणादर्श (बॉक्स सेक्सटंट) या उपकरणांनी कोन सरळ मिळतात. लोलकयुक्त होकायंत्रात एका चपटया डबीत सुईच्या अगावर चुंबकसूची तरंगती ठेवलेली असते. या सूचीवर कोन दाखविणारी एक गोल पट्टी असते. होकायंत्र अडणीवर एका बिंदूवर बरोबर उभे करून संतलित करतात दुसऱ्या बिंदूवरील ध्वजदंडाचा वेध घेतात व लोलकाने कोन वाचतात. हाच हे दोन बिंदू जोडणाऱ्या रेषेचा उत्तरकोन होय.

पेटी कोणादर्श : याच्या साहाय्याने दोन रेषांतील कोन मोजतात. तसेच उभ्या पातळीतील कोन सरळ अथवा ऊर्ध्वकोन किंवा अध:कोनही  मोजता येतात. ‘एखादा प्रकाशकिरण दोन परावर्तकांवरून ओळीने परावर्तित झाल्यास त्याचा आपाती किरण व परावर्तित किरण यांतील कोन परावर्तकातील कोनांच्या दुप्पट असतो ’, या तत्त्वावर उपकरणाची रचना केली जाते. दोन रेषांमधील १२०° पर्यंतचे कोन यांवर वाचता येतात.

थिओडोलाइट : याच्या साहाय्याने क्षितिज पातळीतील तसेच उभ्या पातळीतील कोन अत्यंत काटेकोरपणे व सूक्ष्मपणे मोजता येतात. २० सेकंदाइतक्या अचूकतेने कोन मोजता येतात. अतिसूक्ष्ममापक सूक्ष्मदर्शकामुळे कोन १ सेकंदाइतक्या सूक्ष्मपणे वाचता येतो. थिओडोलाइटाला ट्रफ कंपास बसवून उत्तरकोन देखील मोजता येतात. उभे कोन दुर्बिणीवर बसविलेल्या उभ्या चक्रावर मिळतात.

ॲबनी लेव्हल : हे यंत्र उभ्या पातळीतील कोन मोजण्यासाठी वापरतात. यांत १ अंशापर्यंतचा कोन मोजता येतो. अर्थात हे कोन तेवढे अचूक असू शकत नाहीत. अत्यंत काटेकोर कोनमापनास थिओडोलाइट वापरतात. इतर ठिकाणी अन्य साधने वापरतात.

संतलन : जेव्हा एक बिंदू दुसऱ्यापेक्षा उंच आहे असे म्हटले जाते तेव्हा उभ्या पातळीत हे बिंदू एकमेकांपासून काही अंतरावर आहेत असे लक्षात येते. जमिनीवरील निरनिराळ्या बिंदूंची सापेक्ष उंची काढण्यासाठी त्यांमधील उभ्या पातळीतील अंतर ठरवावे लागते. या कियेलाच संतलन असे म्हणतात. यासाठी निरनिराळ्या बिंदूंची उंची एका प्रमाण गणना वा संदर्भ पातळीपासून मोजतात. ही प्रमाण गणना पातळी किंवा प्रमाणपातळी म्हणजे समुद्रसपाटी होय. भारतीय सर्वेक्षण संस्थेने कराची येथील समुद्रसपाटी प्रमाण गणना पातळी म्हणून मानली होती.

आ. ३. संतलन : (१) प्रमाण पातळी (२,२’) संतल पृष्ठभाग (३,३’) क्षितिजसमांतर रेषा (४,४’) उभी रेषा (५) ब आणि अ यांच्यामधील उंचीचा फरक. पृथ्वीचा पृष्ठभाग वक्र आहे व त्याच्याशी समांतर असलेला कोणताही पृष्ठभाग हा संतल पृष्ठभाग होय. शांत जलाशयाचा पृष्ठभाग हे संतल पृष्ठभागाचे उत्तम उदाहरण होय. संतल भागास काढलेल्या स्पर्शात्मक रेषेस क्षितिजसमांतर रेषा म्हणतात. पृथ्वीवर कोणत्याही बिंदूतून पृथ्वीचा मध्य सांधणारी रेषा ही उभी (ऊर्ध्व) रेषा होय. कोणत्याही दोन बिंदूंतील उंची म्हणजे त्या बिंदूंतून जाणाऱ्या संतल पृष्ठभागांमधील उभ्या रेषेवर मोजलेले अंतर होय (आ. ३).

निरनिराळ्या बिंदूंची प्रमाण पातळीपासूनची उंची काढण्याकरिता प्रत्येक संतलन सर्वेक्षणाची सुरूवात (समुद्रसपाटीपासून) करावी लागेल हे अर्थातच अशक्य असते. म्हणून भारतीय सर्वेक्षण संस्थेने भारतभर घडीव दगडांचे चौथरे पक्के रोवून त्यांवरील सपाट पृष्ठभागाची ( प्रमाण पातळीपासूनची ) उंची अत्यंत काटेकोरपणे व सूक्ष्मपणे मोजून ठेवली आहे. ह्यांना संदर्भस्थाने (बेंचमार्क) असे म्हणतात. अशा तऱ्हेच्या संदर्भस्थानांचे एक जाळेच या खात्यातर्फे भारतभर तयार केलेले आहे. हे चौथरे जमिनीवर कुंपण घालून किंवा जमिनीखाली पुरून संरक्षित ठेवलेले असतात. याचे ठिकाण, त्यांची उंची वगैरे माहिती त्या खात्यातर्फे प्रसिद्ध केलेल्या सूचीत मिळते. यांना जी. टी. एस. (ग्रेट ट्रिगनॉमेट्रिक सर्व्हे) बेंचमार्क किंवा व्यापक त्रिकोणमिती सर्वेक्षण असे म्हणतात. नेहमीच्या उपयोगाकरिता मूळ जी. टी. एस. बेंचमार्कांवरून राज्याच्या निरनिराळ्या भागांत प्रमुख इमारतींच्या जोत्यावर, पुलांचे कठडे इ. ठिकाणी संदर्भस्थाने नोंदवून ठेवली आहेत. व्यवहारात फक्त सापेक्ष उंचीचीच आवश्यकता असते. अशा वेळी कामाच्या जवळपासचा एखादा सपाट व पक्का पृष्ठभाग संदर्भस्थान मानून त्याची प्रमाण पातळीपासूनची उंची गृहीत धरून सर्वेक्षण करतात.

संतलन मोजण्यासाठी वापरण्यात येणारे प्रमुख साधन म्हणजे संतलन उपकरण होय. यात एक दुर्बिण संतलन स्क्रूवर बसविलेली असून तिच्यावर एक स्पिरिटची पाणसळ बसविलेली असते. हे उपकरण लाकडी तिपाईवर उभे केले जाते. दुर्बिणीत एक काचेची तबकडी असून तीवर आडव्या व उभ्या काळ्या रेषा असतात. दुर्बिणीच्या भिंगाचा मध्य व मधल्या आडव्या तारेचा मध्य जोडणारी रेषा ही अक्षीय रेषा होय. संतलन मोजणी करताना दुर्बिण जमिनीवर अडणीवर उभी करून संतलन स्क्रूने पाणसळीतील बुडबुडा मध्यावर आणतात व नेत्रभिंग पुढे-मागे सरकवून आडव्या तारांची स्पष्ट प्रतिमा मिळवितात. बुडबुडा मध्यावर येताच अक्षीय रेषा क्षितिजसमांतर होते. ही जुळणी होताच ज्या बिंदूची उंची पाहिजे त्या ठिकाणी संतलन दंड उभा करून तो दुर्बिणीतून पाहतात व त्याची स्पष्ट प्रतिमा दुर्बिणीत येताच आडवी तार ( मधली ) या दंडास जेथे छेदते ते निरीक्षण घेतात व त्याची नोंदवहीत नोंद करतात. संतलन दंड लाकडी व ४ मीटर लांबीचा असून त्याचा पृष्ठभाग पांढरा रंगवून त्यावर मीटर व त्याचे छोटे भाग दाखविलेले असतात. १ मीटरचे १० भाग व प्रत्येक दहाव्या भागाचे आणखी २० भाग केलेले असतात. मीटरचे आकडे खुणांच्या उजव्या बाजूस लाल रंगविलेले असून दहा भागांचे आकडे डावीकडे काळे रंगविलेले असतात. साध्या संतलन दंडावर ५ मिमी.पर्यंत सूक्ष्म उंची मोजता येते.

संतलन करताना प्रथम संतलन उपकरण जमिनीवर उभे करून तात्पुरती जुळणी पूर्ण करतात. संतलन दंड प्रथम संदर्भस्थानावर ठेवून व नंतर ज्याची उंची पाहिजे त्या बिंदूवर ठेवून निरीक्षणे घेतात. संदर्भस्थानाची प्रमाण पातळीपासूनची उंची माहीत असल्याने अक्षीय पातळीची उंची मिळते. त्यातून बिंदूवरील निरीक्षण वजा केल्यास बिंदूंची पातळी मिळते. कुठल्याही प्रकारचे संतलनकाम असो,त्याची सुरूवात नेहमी संदर्भ स्थानापासूनच करावी लागते.

आ. ४. साधे संतलन : (१) संदर्भस्थान, (२) अक्षीय पातळी, अ- उंची काढावयाचा बिंदू, b - संदर्भस्थान व अक्षीय पातळी यांच्या उंचीतील फरक, a - अ व अक्षीय पातळी यांच्या उंचीतील फरक. म्हणून संदर्भ-स्थानाची उंची + b = अक्षीय पातळीची उंची अक्षीय पातळीची उंची - a = अ बिंदूची उंची.साधे संतलन : दोन बिंदूंमधील उंचीचा फरक काढण्यासाठी दोन बिंदूंच्या मध्यावर संतलन उपकरण जुळणी करून उभे करतात व दोन्ही बिंदूंवरील संतलन दंडावर निरीक्षणे घेतात. या निरीक्षणातील फरक हाच दोहोंमधील उंचीचा फरक होय. ( आ. ४).

आ. ५. संयुक्त संतलन : क, ड, इ - स्थलांतर बिंदू.संयुक्त संतलन : यात देखील आणि या दोन ठिकाणांमधील उंचीचा फरकच काढावयाचा असतो परंतु दोहोंचे निरीक्षण एकाच ठिकाणाहून घेता येत नाही. अशा वेळी पहिल्या बिंदूवर निरीक्षण घेऊन मध्ये स्थलांतर बिंदू घेऊन त्याची उंची काढतात. नंतर संतलन उपकरण पुढे नेऊन जुळवून या स्थलांतर बिंदूवर निरीक्षण घेऊन पुढच्या स्थलांतर बिंदूची उंची ठरवितात. असे करत शेवटच्या बिंदूपर्यंत संतलन करून त्याची उंची काढतात. यास संयुक्त संतलन म्हणतात. (आ. ५).

आ. ६. अन्योन्य संतलन :अन्योन्य संतलन : दोन बिंदू एका ठिकाणाहून दिसत असतील परंतु दोहांच्यामध्ये एखादी दरी अथवा नदी असेल अशा वेळी मधे संतलन आ. ६. अन्योन्यसंतलन :

अ आणि ब यांच्या उंचीतील खरा फरक = ( a – b ) + ( a’ – b’ )
2

उपकरण उभे करणे अशक्य असते व एका बाजूने निरीक्षणे घेतल्यास दूरच्या बिंदूवरील निरीक्षणात वक्रीभवनामुळे चूक येते. म्हणून या पद्धतीने दोहोंमधील यथार्थ फरक काढता येतो. यामध्ये प्रथम संतलन उपकरण अ बिंदूजवळ उभे करून अ आणि ब वरील संतलन दंडांची निरीक्षणे घेतात. नंतर संतलन उपकरण ब जवळ ठेवून अ आणि ब वरील दंडांची निरीक्षणे घेतात. दोन्ही ठिकाणांवरून घेतलेल्या निरीक्षणांतील फरकांची सरासरी म्हणजे अ आणि ब यांमधील खरा फरक होय. (आ. ६).

त्रिकोणमितीचे संतलन : दोन बिंदूंमधील उंचीचा फरक हा त्या बिंदूंमधील क्षितिज पातळीतील अंतर व त्यामधील उन्नत ( उभा ) कोन यांवरून त्रिकोणमितीच्या साहाय्याने काढता येतो. हे काम थिओडोलाइटाने करतात. विशेषत: जे बिंदू संतलन उपकरणाने मोजणे अशक्य असते, त्या ठिकाणी ही पद्धत सोयीची असते. या पद्धतीत बिंदूचा उन्नत कोन मोजून त्याचे तळापर्यंतचे क्षितिज पातळीतील अंतर प्रत्यक्ष मोजतात. हे अंतर प्रत्यक्ष मोजणे अशक्य असल्यास दोन ठराविक अंतरावरील बिंदूंपासून उन्नत कोनांची निरीक्षणे घेऊन गणिताने अंतरे व उंची काढतात.

उभ्या छेदाचे संतलन : यामध्ये एखादया विशिष्ट रेषेवरील भूपृष्ठाच्या उंचसखलपणाचे चित्र समजावे म्हणून रेषेवर ठराविक अंतरावरील बिंदूंची संतलनाने उंची काढून त्या रेषेवरील भूपृष्ठाचा उभ्या छेदाचा नकाशा तयार करतात. असे नकाशे रस्ते, रेल्वे, कालवे, जलवाहिन्या, धरणांच्या रेषा इ. ठिकाणी फार उपयोगी पडतात. उभ्या छेदाच्या नकाशांत आडव्या उभ्या पातळीतील स्केल्स वेगळी घेतात. बहुश: उभे स्केल आडव्या स्केलच्या १/१० किंवा १/२० असे घेतात.

आडव्या छेदाचे संतलन : उभ्या छेदाबरोबरच या रेषेच्या बाजूच्या जमिनीचा उंचसखलपणा समजावा म्हणून मुख्य रेषेच्या दोन्ही बाजूंस काटकोनात ठराविक अंतरावर उंची मोजतात. ह्या छेदरेषेची लांबी भूसंपादित जमिनीच्या रूंदीइतकी घेतात. त्यावरून आडव्या छेदांचे नकाशे बनवितात. यांत उभे व आडवे स्केल एकच असते. समुद्रसपाटीपासून जसजसे उंच जावे तसतसा हवेचा दाब कमी होत जातो. प्राथमिक स्वरूपाच्या सर्वेक्षणात उंचीचा अंदाज वायुभारमापकाने करता येतो.

विमानगामी उच्च्तामापन : भूपृष्ठावरून व समुद्रपृष्ठभागावरून उडणाऱ्या विमानाची उच्च्ता व उन्नतांश ( उंची ) रडार उच्च्तामापकाने चांगलीच अचूकपणे कळते. विमानातून पाठविलेला संकेत सदर पृष्ठावर आपटून परत उसळून विमानाकडे येण्याच्या तंत्राने हे शक्य होते. ज्याचा उन्नतांश माहीत आहे अशा पृष्ठभागावरून उसळून परत येणाऱ्या संकेताच्या साहाय्याने विमानाची नेमकी उंचीही कळू शकते. अशा रीतीने वरून उडणाऱ्या विमानात भूप्रदेशाची बाह्यरेषा (सीमाचित्र ) सलगपणे नोंदवून जर जमिनीवरील ज्ञात उन्नतांशाचे, नियंत्रित माहिती मिळविण्यासाठी, कमवीक्षण केले, तर जमिनीचे अचूक उन्नतांश मिळू शकतात. या यंत्राला विमानगामी बाह्यरेषा नोंदणी म्हणतात. या तंत्राने बरीच अचूक मापने मिळतात व अनेक कमी गरजेच्या कामांसाठी ती पुरेशी अचूक असतात.

खगोलशास्त्रीय निरीक्षणसर्वेक्षणामुळे विविध बिंदूंचे सापेक्ष स्थान मिळते परंतु एखादया बिंदूचे पृथ्वीवरील निश्चित स्थान ठरविण्यासाठी त्याचे स्थान सूर्य किंवा इतर स्थिर ताऱ्यांपासून निश्चित करावे लागते. हे काम खगोलशास्त्रीय निरीक्षणाने शक्य होते. या निरीक्षणावरून खरी संदर्भरेषा निश्चित करतात, अक्षांश-रेखांश ठरवितात आणि कालमापन करतात.

भूपृष्ठाच्या सर्वेक्षणात त्रिकोणीकरण, ट्रॅव्हर्स वगैरे पद्धती वापरतात परंतु या सर्वेक्षणात त्रिकोणाच्या एखादया बिंदूचे अक्षांश- रेखांश मिळविणे किंवा एखादया रेषेची दिशा खऱ्या संदर्भ रेषेपासून मिळविणे आवश्यक असते. चुंबकीय संदर्भ रेषा सदासर्वकाळ एकच दिशा दाखवीत नाही. म्हणूनच सर्वेक्षण रेषा जमिनीवर पुन्हा आखावयाची असल्यास ही दिशा एखादया स्थिर संदर्भ रेषेशी जोडणे आवश्यक असते. ही खरी संदर्भ रेषा ठरविण्याचे काम खगोलशास्त्रीय निरीक्षणाने शक्य होते. आंतरराष्ट्रीय सीमा ठरवितानाही या निरीक्षणाचा उपयोग केला जातो.[⟶ अक्षांश व रेखांश पृथ्वी भूगणित].

क्षेत्रफळ व घनफळ मोजणेसर्वेक्षित क्षेत्राचे क्षेत्रफळ नोंदवहीतील नोंदीवरून किंवा त्याच्या बनविलेल्या नकाशावरून काढता येते. सर्वेक्षण क्षेत्र मोजणी रेषांनी वेढतात परंतु प्रत्यक्ष क्षेत्राच्या सीमा सरळ असतील असे नाही. काही वेळा या सीमा वेड्यावाकड्या, नागमोडी असतात. अशा वेळी मोजणी रेषांमध्ये सामावलेल्या क्षेत्राचे क्षेत्रफळ गणिताने काढतात. मोजणी रेषा व नागमोडी सीमा यांमधील क्षेत्र, मोजणी रेषेस सीमेपर्यंत ठराविक अंतरावर लंब टाकून, त्या लंबांतरांवरून निरनिराळी सूत्रे वापरून क्षेत्रफळ काढतात. अनियमित आकृतीचे नकाशावरील क्षेत्र मोजताना आलेख कागद पद्धती किंवा क्षेत्रमापक हे उपकरण वापरतात.

रस्ते, रेल्वे, कालवे इ. कामांसाठी खोदकाम, भरावाचे काम, इतर कामातही करावयाच्या कामाचा अंदाज बांधण्यासाठी तसेच झालेल्या कामाची प्रगती जाणण्यासाठी किंवा झालेल्या कामाचा ठेकेदारास मोबदला देण्यासाठी कामाच्या विविध स्तरांवर, यथार्थ मापन करून घनफळ काढणे आवश्यक असते. खोदाई किंवा भरावाच्या कामात प्रथम आडव्या छेदाचे नकाशे बनवून त्यांवर नियोजित रस्त्याचा किंवा कालव्याचा छेद दाखवितात व छेद-क्षेत्रफळ मोजतात.दोन जवळच्या छेदांमधील लांबीने त्यांच्या सरासरी क्षेत्रफळास गुणून घनफळ काढतात. घनफळ काढताना समलंबात्मक नियम, प्रचिनाभ ( प्रिझमाँयडल ) नियम वगैरे सूत्रे वापरतात.

नकाशे कागदाच्या सपाट पातळीवर लहान स्केलने केलेल्या भूपृष्ठाच्या यथार्थ चित्रणास नकाशा असे म्हणतात. सर्व सर्वेक्षणांचा हेतू शेवटी विविध बिंदूंची उभ्या व आडव्या पातळीतील स्थाने निश्चित करून त्यायोगे नकाशा बनविणे हाच असतो. जेव्हा विशाल क्षेत्राचा नकाशा छोट्या स्केलने बनवितात तेव्हा भूपृष्ठाची वक्रता कागदावर दाखविण्यास अडचण येते आणि त्यामुळे स्केल व आकारमान यांमध्ये फरक पडू लागतो. जसजसे क्षेत्र मोठे तसतसा हा फरक वाढतच जातो. त्याचप्रमाणे अक्षांश-रेखांश दाखविणेही कठिण जाते. या रेषांना समांतर उभ्या व आडव्या रेषांनी बनलेल्या चौरसांच्या संदर्भात भूमिस्वरूप सर्वेक्षणातील तपशिलाचे काम केले जाते. त्यामुळे या चौकटी नकाशावर दाखविणे आवश्यक असते परंतु रेखांश एकमेकांस समांतर नसतात. पृथ्वीचा वक्रपृष्ठभाग कागदाच्या सरळ पृष्ठावर यथार्थपणे दाखविणे हे अशक्यप्राय आहे परंतु नकाशे तयार करण्याच्या विविध पद्धतींमुळे हा प्रश्न बऱ्याचशा समाधानकारकपणे सोडविणे शक्य झाले आहे. वक्र पृष्ठभाग सपाट पृष्ठांवर दाखविताना आकारमानात किंवा स्केलमध्ये फरक होणे अपरिहार्य असले, तरी निरनिराळ्या प्रक्षेप वा प्रक्षेपण पद्धतीमुळे हा फरक शक्य तेवढा कमीतकमी करण्याचा प्रयत्न करता येतो.[⟶ नकाशा मानचित्रकला].

आ. ७. लोलकयुक्त होकायंत्र : (१) होकायंत्र डबी, (२) काचेचे झाकण, (३) चुंबकसूची, (४) चुंबकसूची स्थिर करण्यासाठी कळ, (५) वर्तुळाकार कोनमापक पट्टी, (६) पोलादी आस, (७) वेधिका, (८) लोलक, (९) पाहण्याची फट, (१०) रंगीत काचा.सर्वेक्षणाची उपकरणे : लोलकयुक्त होकायंत्रकोन अथवा दिशा मोजण्यासाठी हे उपकरण वापरतात. यामध्ये कोणत्याही रेषेचा चुंबकीय उत्तर दिशेशी झालेला कोन मिळतो. दोन एकत्र मिळणाऱ्या दिशांच्या उत्तरकोनांवरून दोन रेषांतील कोन काढता येतो. यात ३” ते ६” (७.५ ते १५ सेंमी.) व्यासाच्या चपटया डबीच्या मध्यभागी एका टोकदार सुईच्या अगावर एक चुंबकसूची ठेवलेली असून तीवर ०° ते ३६०° पर्यंत अंशांच्या खुणा व आकडे असलेली एक हलकी वर्तुळाकार कोनमापक पट्टी बसविलेली असते. डबीवर काचेचे झाकण असून डबी क्षितिज पातळीत ठेवली असता सूची तिच्यावरील कोनमापक वर्तुळासह मोकळेपणाने पोलादी आसाभोवती फिरू शकते. डबीच्या बाजूस एक आयताकृती लोखंडी चौकट असून तिच्यातील उभ्या फटीत वस्तूचा वेध घेण्यासाठी एक उभा केस अथवा तार बसविलेली असते. याच्याबरोबर विरूद्ध बाजूस उत्तरकोन वाचण्यासाठी लोलक बसविलेला असतो. उत्तरकोन मोजताना होकायंत्र बरोबर स्थानकावर एका अडणीवर उभे करून संतलन करतात. नंतर लोलकावरील फटीतून समोरील चौकटीतील केसाने ज्याची दिशा ठरवावयाची त्या रेषेवरील ध्वज दंडाचा वेध घेतात व लगेच लोलकातून तबकडीवरील कोन मोजतात. हाच उत्तरकोन होय. सर्वेक्षकाजवळील लोखंडी साहित्य, दूरध्वनी किंवा वीजवाहक तारा वगैरेंमुळे चुंबकीय सूची आकर्षिली जाते व खरी उत्तर दिशा कळत नाही परंतु हे आकर्षण  शोधून काढून मोजलेल्या उत्तरकोनात दुरूस्ती करता येते. (आ. ७).

सर्वेक्षक होकायंत्र : या होकायंत्राची रचना वरीलप्रमाणेच असते. फक्त लोलकाऐवजी वेध घेण्यासाठी उभी फट असलेल्या चौकटी समोरासमोर असतात व कोन दाखविणारी वर्तुळाकार पट्टी सूचीवर न बसविता डबीतच बसविलेली असते. कोनाच्या खुणा ०° ते ३६०° अशा नसून उत्तर व दक्षिण दिशेस ०° आणि पूर्वेकडे व पश्चिमेकडे ९०° अशा असतात. कोन मोजताना होकायंत्र स्थानकावर उभे करून वेध घेतात व सूचीचे उत्तर टोक दाखवीत असेल तर तो कोन डबीवरून सरळ वाचतात. यात मिळणारे कोन हे ९०° च्या आत असतात. त्यामुळे त्यांची त्रिकोणमितीतील गुणोत्तर काढणे सोपे जाते. हे कोन उत्तर किंवा दक्षिण दिशेपासून पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे असे मिळतात. ते लिहिताना प्रथम उत्तरेपासून की दक्षिणेपासून हे लिहून कोनाचा आकडा लिहितात व नंतर तो पूर्वेकडे की पश्चिमेकडे मोजला हे लिहितात. उदा., एखादया रेषेचा कोन दक्षिणेपासून ४०° पूर्वेकडे आहे हे लिहिताना द. ४०° पू. असे लिहितात (आ. ८). कोनांच्या या पद्धतीस काटकोनांतरीय व त्रिभांतरीय (क्वाड्रटल) पद्धत असे म्हणतात. लोलकयुक्त होकायंत्रात मिळणारे उत्तरकोन पूर्ण वर्तुळीय पद्धतीचे असतात.

ट्रफ होकायंत्र : अरूंद चौकोनी डबीमध्ये सुईच्या टोकावर एक चुंबकसूची बसविलेली असून तिच्या दोन्ही बाजूंस मधे ०° व बाजूस ५° च्या खुणा असलेली पट्टी बसविलेली असते. याच्या साहाय्याने कोन मिळत नाही, पण नकाशावर उत्तर दिशा दाखविण्यासाठी याचा उपयोग करतात. प्लेन टेबलावर सूचीची डबी सूची दोन्ही बाजूंस ०° कोन दाखवीपर्यंत हलवितात. त्यानंतर डबीच्या बाजूने रेघ ओढतात, हीच चुंबकीय उत्तर दिशा होय.

ट्रफ सूचीप्रमाणे उत्तर दिशा दाखविण्यासाठी एका दंडगोलाकार डबीत सुईवर चुंबकसूची ठेवलेली असते. डबीच्या एका टोकास काचेचे झाकण असून त्यावर दोन उभ्या रेघा असतात. सूचीचे टोक दोन उभ्या रेषांच्या मधोमध येईपर्यंत डबी हलवितात. यास नळीचे होकायंत्र म्हणतात. हे थिओडोलाइटाच्या बाजूच्या खाचेत बसविल्यास थिओडोलाइटाने उत्तरकोन मोजता येतात. [⟶ दिक्‌सूचक].

आ. ९. थिओडोलाइट : (१) दुर्बिणीचा आडवा आस, (२) पाणसळ, (३) उभे कोनमापक चक, (४) व्हर्निअर, (५) T चौकट, (६) दुर्बीण, (७) अक्षीय रेषा, (८) A चौकट, (९) व्हर्निअरचे चक स्थिर करण्याचा स्क्रू, (१०) वरचे व्हर्निअर चक, (११) खालचे कोनमापक चक, (१२) खालचे कोनमापक चक स्थिर करण्याचा स्क्रू, (१३) संतलन स्क्रू, (१४) संतलन शीर्ष, (१५) ओळंबा, (१६) सूक्ष्म हालचाल स्क्रू, (१७) पाणसळ.थिओडोलाइट : (आ. ९). अत्यंत काटेकोर व सूक्ष्म कोनमापनासाठी थिओडोलाइट हे अत्यंत विश्वासार्ह उपकरण आहे. थिओडोलाइटाचा उपयोग असंख्य कामांसाठी सर्वेक्षणात करता येतो. उभ्या A या इंगजी अक्षराच्या आकाराच्या दोन चौकटींवर सर्वेक्षण दुर्बिण तिच्या आडव्या आसावर बसविलेली असते. हाच थिओडोलाइटाचा आडवा अक्ष होय. या दुर्बिणीस उभ्या पातळीतील कोन मोजण्यासाठी एक चक जोडलेले असते. याचक्रा-सहित दुर्बिण आडव्या आसाभोवती उभ्या पातळीत संपूर्ण परिभमण करू शकते. उभ्या चक्रावरील कोन सूक्ष्मतेने मोजता येण्यासाठी दोन्ही बाजूंस व्हर्निअर असलेली एकT या इंगजी अक्षराच्या आकाराची चौकट उभ्या चक्रास लागूनच बसविलेली असते. या चौकटीवर एक स्पिरिटची पाणसळही बसविलेली असते. काही उपकरणांतही पाणसळ दुर्बिणीवर बसविलेली असते. दुर्बिण एखादया जागी उभ्या पातळीत तात्पुरती स्थिर ठेवण्यासाठी तिची सूक्ष्म हालचाल करण्यासाठी दोन स्क्रू A चौकटीवर असतात . चौकटी ५” ते ६” व्यासाच्या चक्रावर बसविलेल्या असून या चक्राच्या कडेवर १८०° या अंतराने दोन व्हर्निअर बसविलेले असतात. या चक्राच्या खालीच दुसरे चक असून त्याच्या परिघावर ० ते ३६० अंश व त्यांचे भाग कोरलेले असतात. वरचे व्हर्निअर चक खालच्या मुख्य चक्रावर व दोन्ही मिळून थिओडोलाइटाच्या उभ्या आसाभोवती आडव्या पातळीत फिरतात. ही दोन्ही चक्रे एकत्र किंवा स्वतंत्रपणे स्थिर ठेवण्यासाठी व त्यांची सूक्ष्म हालचाल करण्यासाठी दोन स्क्रू प्रत्येक चक्रासाठी असतात. या दोन्ही चकांच्या साहाय्याने व दुर्बिणीने वेध घेऊन क्षितिज पातळीतील कोन मोजतात. हे सर्व (चक्रे, A चौकट, दुर्बिण वगैरे) संतलन शीर्षावर बसविलेले असते. संतलन शीर्षामध्ये तीन संतलन स्क्रू असतात व त्याच्या साहाय्याने थिओडोलाइटाची आडवी चक्रे क्षितिज पातळीत आणतात. त्यासाठी वरच्या आडव्या चक्रावर एकमेकांस काटकोनात दोन पाणसळी बसविलेल्या असतात. संतलन शीर्षामुळे थिओडोलाइट लाकडी अडणीवर आट्याने घट्ट बसविता येतो. थिओडोलाइटाच्या उभ्या अक्षास एक आकडा बसविलेला असून त्यातून ओळंबा सोडतात. त्याच्या साहाय्याने उभा अक्ष बरोबर स्थानकातून जाईल अशा तऱ्हेने थिओडोलाइट उभा करता येतो. काही थिओडोलाइटांमध्ये हे काम स्थानकाचे प्रतिबिंब थिओडोलाइटावरील आरशावरील एका वर्तुळात आणून केले जाते. थिओडोलाइटाच्या रचनेत खूपच सुधारणा झाली असून अतिशय सुटसुटीत, सूक्ष्मतम कोनमापन करू शकणारे जास्तीतजास्त वेध शक्तीच्या दुर्बिणींचे थिओडोलाइट उपलब्ध झालेले आहेत. आडवी व उभी चक्रे काचेची ८ सेंमी. व्यासाची असून सूक्ष्ममापकाने १ सेकंदापर्यंत कोन वाचता येतात.

आ. १०. संतलन उपकरण : (१) केंद्रीकरण स्क्रू, (२) पाणसळ, (३) वस्तुभिंगाचे आच्छादन, (४) संतलन शीर्ष, (५) संतलन स्क्रू, (६) नेत्रभिंग, (७) पडदा जुळविण्याचा स्क्रू.संतलन उपकरण : याच्या साहाय्याने भूपृष्ठावरील निरनिराळ्या बिंदूंची सापेक्ष उंची मिळू शकते. या उपकरणाचे (१) संतलन शीर्ष, (२) दुर्बिण व (३) पाणसळ हे तीन मुख्य भाग आहेत. दुर्बिण संतलन शीर्षावर बसविलेली असते व यात तीन संतलन स्क्रू असतात. त्याच्या साह्याने दुर्बिण क्षितिज पातळीशी समांतर ठेवता येते. या शीर्षास खाली आटे पाडलेले एक भोक असते. ते लाकडी अडणीवर घट्ट बसवून दुर्बिण उभी करता येते. दुर्बिणीस नेत्रभिंग व वस्तुभिंग अशी दोन भिंगे असतात. संतलन दंडाची स्पष्ट प्रतिमा मिळण्यासाठी दुर्बिणीच्या आत एक नळी असते. तिला एक भिंग बसविलेले असते. ती मागे-पुढे सरकवून (स्पष्ट ) प्रतिमा मिळते. ही सरकविण्यासाठी केंद्रीकरण स्क्रू असतो. दुर्बिणीत प्रतिमा मिळते त्या ठिकाणी काचेची एक तबकडी असून तिच्यावर आडव्या व उभ्या काळ्या रेघा असतात. मधली आडवी रेषा ही भिंगाचे मध्य सांधणाऱ्या रेषेत असते. त्यामुळे संतलन दंडास समांतरित पातळी कोठे छेदते हे वाचता येते. काही यंत्रांत तीन समांतर आडव्या रेषा असतात. त्यांच्या साहाय्याने निरीक्षणे घेऊन बिंदूचे अंतरही काढता येते. काही संतलन यंत्रात दुर्बिणीच्या खाली होकायंत्र बसविलेले असते. अशा वेळी दुर्बिणीने वेध घेऊन रेषेचा उत्तरकोन मोजता येतो. स्पिरिटची पाणसळ एका दंडगोलाकार डबीत बसविलेली असून ही डबी दुर्बिणीवर पक्की बसविलेली असते. पाणसळीचा पृष्ठभाग वक्र असतो. या वक्रभागास काढलेली स्पर्श रेषा ही दुर्बिणीच्या समांतरित रेषेशी समांतर असते यामुळे पथम संतलन स्क्रूच्या साहाय्याने पाणसळीचा बुडबुडा बरोबर मध्यावर आणतात व ही भोवती आडव्या पातळीत संपूस्पर्श रेषा क्षितिज समांतर करतात, म्हणजेच समांतरित रेषाही क्षितिज समांतर होते. संतलन उपकरण उभ्या आसार्ण परिभमण करू शकते.

संतलन उपकरणे निरनिराळ्या प्रकारची असतात. डंपी, वाय्, कुक, कुशिंग वगैरे नावांनी ओळखली जाणारी संतलन उपकरणे उपलब्ध आहेत. सर्वांच्या रचनेत किरकोळ फरक आहे परंतु मूळ तत्त्व तेच आहे. डंपी संतलन उपकरण जास्त प्रचारात आहे. इतर उपकरणांना केवळ शैक्षणिक महत्त्व आहे.

आधुनिक संतलन उपकरणांमध्ये कलत्या संतलन उपकरणाचा समावेश होतो. या उपकरणांत दुर्बिण आडव्या पातळीत पक्की बसविलेली नसते. नेत्रभिंगाखालील एका स्क्रूने दुर्बिण आडव्या आसाभोवती उभ्या पातळीत थोडीशी हलविता येते. संतलन शीर्षावरील गोल पाणसळीने उपकरण अंदाजे संतल करता येते व प्रत्येक निरीक्षणाच्या वेळी दुर्बिणीवरील पाणसळ नेत्रभिंगाखालील स्क्रूने संतल करावी लागते. यामुळे यंत्राच्या जुळणीत फार वेळ जात नाही. प्रत्येक निरीक्षणाच्या वेळी समांतरित रेषा क्षितिज समांतर केली जाते. त्यामुळे काम झटपट व अधिक अचूकपणे होते. नेत्रभिंगाखालील स्क्रूवर समांतरित रेषेचा उतार दाखविणाऱ्या खुणा असतात. त्याच्या साहाय्याने समांतरित रेषेस आवश्यक उतार देऊन रस्ते, कालवे आदींसाठी उताराचे टप्पे देता येतात. ( आ. १०).

प्लेन टेबल : इतर पद्धतीच्या सर्वेक्षणात प्रत्यक्ष जागेवर जाऊन मोजणी करून त्यांची योग्य पद्धतीची नोंद नोंदवहीत केली जाते व नंतर कार्यालयात त्या नोंदीच्या साहाय्याने नकाशे बनविले जातात परंतु प्लेन टेबल सर्वेक्षणात मोजणी व नकाशा काढणे ही कामे एकाच वेळी होतात. त्यामुळे नकाशा त्वरित तयार होतो, तयार झालेला नकाशा भोवतालच्या मोजणी क्षेत्राशी लगेच ताडून पाहता येतो, यामुळे एखादी गोष्ट राहून जात नाही तसेच काम लवकर व कमी खर्चाचे होते. नतिमापकाच्या साहाय्याने निरनिराळ्या बिंदूंची उंची काढता येते. नियंत्रण बिंदू दुसऱ्या एखादया सूक्ष्म यंत्राने निश्चित केल्यावर त्यामधील तपशिलाचे सर्वेक्षण प्लेन टेबलने करतात. या सर्वेक्षणास बरेच साहित्य लागते. चांगल्या रापविलेल्या लाकडाचा ४०×३० सेंमी. किंवा ७५×६० सेंमी. आकारमानाचा सपाट फलक लाकडी अडणीवर बसविलेला असतो व त्यावर आरेखन कागद टाचण्यांनी बसविलेला असतो. हा फरक अडणीवर विशिष्ट स्थितीत स्थिर ठेवता येतो. याशिवाय लागणारे साहित्य म्हणजे दृष्टिक्षेपक होय. दृष्टिक्षेपक ही एक ४५ सेंमी. लांबीची पितळी अथवा लाकडी पट्टी असून तिच्या दोन्ही बाजूंस वेध घेण्याच्या चौकटी असतात. एका चौकटीत उभी अरूंद फट असून दुसऱ्या चौकटीत उभी तार असते. काही पट्टयांवर वेध घेण्यासाठी चौकटीऐवजी दुर्बिण असते. पट्टी स्थानकावर उभ्या केलेल्या टाचणीस लागून ठेवून एखादया ठिकाणावरील निशाणीचा वेध घेतल्यावर पेन्सिलीने पट्टीच्या कडेने रेषा मारतात. स्थानकापासून त्या ठिकाणचे अंतर टेपने मोजून आरेखन कागदावर या रेषेवर स्केलने ते अंतर दाखवून त्या ठिकाणचे स्थान दाखवितात. यास रेडिएशन पद्घत म्हणतात. एकच बिंदू दोन स्थानकांवरून वेधून या दोन्ही रेषा जेथे छेदतील ते त्या बिंदूचे स्थान होय. यास आंतरछेद पद्घत म्हणतात. याशिवाय U या इंगजी अक्षराच्या आकाराची चौकट अथवा ओळंब्याचा आकडा, ट्रफ होकायंत्र वगैरे असतात. U चौकटीची एक बाजू टेबलावर स्थानकाच्या खुंटीवर आणून टेबलावरील चौकटीच्या टोकांवर खूण करतात. हा बिंदू स्थानकाच्या बरोबर वर असतो किंवा स्थानकाचे नकाशावरील स्थान व स्थानकाची खुंटी एकाच उभ्या रेषेत आणता येते. ट्रफ होकायंत्राच्या साहाय्याने नकाशावर चुंबकीय उत्तर दिशा दाखविता येते. टेबल संतल करण्यासाठी साधी पाणसळ वापरतात.

टेबलावर विशिष्ट नतिमापक ठेवून विविध बिंदूंची उंचीदेखील काढता येते. या उपकरणातील दृष्टीची क्षितिज पातळी ठरली की, यांच्या साहाय्याने बिंदूंचा वेध घेतात व नतिमापकावरील पट्टीवर उभा कोन मिळतो. त्या बिंदूपर्यंतचे अंतर व उभा कोन यांवरून बिंदूंची दृष्टिरेषेपासूनची उंची मिळते. ही उंची ऊर्ध्व कोन असल्यास दृष्टिपातळीत मिळवितात व अध:कोन असल्यास त्यातून वजा करतात.

गौण उपकरणे : नतिमापके : ही छोटी सुटसुटीत व हलकी उपकरणे असून त्यांचा उपयोग उभ्या पातळीतील कोन मोजण्यासाठी, उतार मोजण्यासाठी, दिलेल्या उतरावर टप्पे देण्यासाठी वगैरे होतो.

पेटी कोणादर्श : १२०° पर्यंतचे आडव्या अगर उभ्या पातळीतील कोन मोजण्यासाठी हे उपकरण वापरतात [⟶कोणादर्श].

हात-संतलन यंत्र : याचा उपयोग प्राथमिक सर्वेक्षण समपातळी रेषा काढणे, छोटे आडवे छेद घेणे, अंदाजे संतलन मोजणी वगैरेंसाठी होतो. यात एक गोल किंवा चौकोनी १० ते १५ सेंमी. लांबीची नळी असून तिच्या एका बाजूस बारीक छिद्र व दुसऱ्या बाजूस आडवी तार बांधलेली असते. या नळीवर एक छोटी पाणसळ असून तिच्या खाली नळीच्या अर्ध्या भागात नळीच्या आसाशी ४५° कोन करणारा एक आरसा बसविलेला असतो व पाणसळीचे प्रतिबिंब आरशात दिसावे म्हणून नळीच्या आरशावरील भागास फट असते. पाणसळीचा बुडबुडा जेव्हा बरोबर मध्यावर असेल म्हणजेच नळीचा आस जेव्हा क्षितिज समांतर असेल तेव्हा बुडबुड्याचे प्रतिबिंब आरशात दिसू शकते. हे उपकरण वापरताना हातात डोळ्यासमोर धरून संतलन दंडाचा वेध घेतात व नंतर उपकरणाचे पुढचे टोक खाली किंवा वर, आतील आरशात पाणसळीच्या बुडबुडयाचे प्रतिबिंब मिळून ते आडव्या तारेने मध्यावर छेदेपर्यंत हलवितात व त्याच वेळी तारेने संतलन दंडाचे निरीक्षण घेतात.

आ. ११. ॲबनी संतलन उपकरण : (१) पाणसळ, (२) पाणसळ फिरविण्याचा स्क्रू, (३) कोनमापक, (४) दृष्टिरेषा, (५) अवनत कोन, (६) व्हर्निअर, (७) उन्नत कोन.ॲबनी संतलन उपकरण : याची रचना हात-संतलन उपकरणाप्रमाणेच असते. पाहण्यासाठी यात छिद्राऐवजी एक छोटी दुर्बिण असते. डबीत ४५° च्या कोनात अर्ध्या भागात आरसा बसविलेला असतो व त्यावर पाणसळ बसविलेली असते. ही पाणसळ एका व्हर्निअरपट्टीस पक्की जोडलेली असते व ती एका स्क्रूच्या साहाय्याने फिरविता येते. डबीस एक अर्धवर्तुळाकृती कोनमापक पट्टी जोडलेली असून तीवरून व्हर्निअरपट्टी सरकते. यामुळे १०’ पर्यंत सूक्ष्म कोन वाचता येतात. कोनमापकावर मध्यभागी ०° व दोन्ही बाजूस ९०° च्या खुणा असतात. कोन मोजताना    ज्या वस्तूचा कोन हवा आहे, ती आडव्या तारेने छेदतात व दुसऱ्या हाताने पाणसळीतील बुडबुडयाची प्रतिमा डबीतील आरशावर येईपर्यंत स्क्रूने पाणसळ फिरवितात. बुडबुडयाची प्रतिमा व लक्ष्य वस्तू आडव्या तारेने एकाच वेळी छेदली की कोनमापक पट्टीवरील कोन वाचतात. पाणसळ जेव्हा क्षितिजसमांतर पातळीत असेल तेव्हाच बुडबुडयाचे प्रतिबिंब आरशात पडते. दृष्टिरेषेचा क्षितिज पातळीतील जो कोन होतो तेवढयच कोनातून पाणसळ फिरते व पाणसळीबरोबर फिरलेली व्हर्निअर तोच कोन दाखविते. या उपकरणात उतार मोजताना डोळ्याच्या पातळीवर एक खूण निशाण दंडावर करतात. ज्या बिंदूचा उतार मोजायचा त्या बिंदूवर दंड ठेवून उपकरणाने दंडावरील खुणेचा वेध घेऊन कोन मोजतात व त्यावरून  उतार ठरवितात. तसेच उतारावरील टप्पेही याने देता येतात. व्हर्निअर ०° वर स्थिर ठेवून हात-संतलन उपकरण म्हणूनही हे उपकरण वापरता येते. ( आ. ११).

सिलोन घाट अनुरेखक : हे उपकरण विशिष्ट उतार आखण्यासाठी किंवा मोजण्यासाठी वापरतात. यामध्ये एक पितळेची नळी त्रिकोणी चौकटीच्या खालच्या बाजूस बसविलेली असते. नळीच्या एका बाजूस लहान छिद्र असून दुसऱ्या बाजूस उभ्या व आडव्या तारा असतात. त्रिकोणी चौकट एका दंडावर अडकवून लोंबकळत ठेवलेली असते. नळीच्या खालच्या बाजूस एक गज नळीस समांतर बसविलेला असून त्यावर एक सरकते वजन लोंबकळत ठेवलेले असते. नळीच्या सपाट भागावर १ : १२० ते १ : ६ पर्यंतच्या उताराच्या खुणा असतात. या उपकरणाच्या साहाय्याने निरीक्षण घेण्यास अनेक वेधफलक आवश्यक असतात. एका काठीवर एक आडवा फलक लावलेला असून त्यावर उपकरणाच्या उंचीवर आडवी व उभी रेघ मारलेली असते.

विशिष्ट उतार आखावयाचा असल्यास त्या उताराच्या खुणेपर्यंत सरकते वजन नेऊन काही अंतरावर वेधफलक धरतात. उपकरणाच्या नळीच्या छिद्रातून पाहून वेधफलक उतारावर खाली अथवा वर नळीतील आडव्या तारांनी फलकावरील आडवी रेघ छेदेपर्यंत हलवितात व त्या ठिकाणी खुंटी ठोकतात. उतार मोजण्यासाठी उताराच्या एका टोकास वेधफलक लावतात व दुसऱ्या टोकावर उपकरण ठेवून नळीतील छिद्रावरून वेधफलक पाहतात. सरकते वजन नळीतील आडव्या तारांची वेधफलका-वरील आडव्या रेघेस छेदीपर्यंत सरकवितात व त्या वजनाजवळचे उताराचे निरीक्षण घेतात. हा जमिनीचा उतार होय. याचप्रमाणे उतार मोजण्यासाठी डिलाइट फूटरूल, वॉटकिन्स वगैरे प्रकारचे नतिमापक उपलब्ध आहेत.

इलेक्ट्रॉनीय उपकरणे : या उपकरणात प्रकाश, रेडिओ तरंग, लेसर ( प्रकाश ), अवरक्त किरणे व सूक्ष्मतरंग यांचा उपयोग करतात. अभूतपूर्व अचूकता, मापनाची मोठी गती व सोयीस्करपणा ही या उपकरणांची वैशिष्टये आहेत. शिवाय इलेक्ट्रॉनीय उपकरणे सरळ थिओडोलाइटावर किंवा त्याच्या निर्मितीच्या वेळी त्याच्यातच बसविलेली असतात. तसेच ती अंतर्गत संगणकासह जोडलेली असतात. यामुळे काही सेकंदामध्येच अगदी उतारावरील अंतरेही आणि दिशा (कोन ) मोजता येते. तसेच अपेक्षित बिंदूचे सहनिर्देशक ( अक्षांश-रेखांश ) आवश्यक तेवढय अचूकतेने संगणकाच्या मदतीने काढता येतात. इलेक्ट्रॉनीय पद्धती व उपकरणे यांच्यामुळे आधुनिक सर्वेक्षणाचे स्वरूप व पद्धती यांमध्ये खूप बदल झाला आहे.

इलेक्ट्रॉनीय अंतर-मापक : या उपकरणांमध्ये अंतर मोजण्यासाठी प्रकाशतरंग किंवा रेडिओ तरंग वापरतात. १९६०-७० या काळात रेडिओ तरंग वापरणाऱ्या उपकरणांचे वर्चस्व होते. मात्र या सुमारास प्रकाशतरंगाचा वापर करणारी स्वस्त उपकरणे उपलब्ध झाली व त्यांचा वापर वाढला. रेडिओ तरंग वापरणाऱ्या उपकरणांच्या बाबतीत मोजावयाच्या अंतराच्या दोन्ही टोकांशी एकसारखे उपकरणसंच ठेवावे लागतात. यांव्दारे १४० किमी.पर्यंत अंतर मोजता येते. तसेच या दोन संचादरम्यान थेट दृष्टिरेषा असण्याची गरज नसते. म्हणजे एका टोकाहून दुसरे टोक थेट दिसत नसले तरी चालते व यामुळे अंधारात, उजेडात, ढगाळ हवेत किंवा धुक्यातही काम करता येते. टेल्युरोमीटर हे असे उपकरण आहे.

प्रकाशतरंगांचा उपयोग करणाऱ्या उपकरणात दृश्य वा लेसर प्रकाश, तसेच अवरक्त किरण वापरतात. याने अंतर मोजताना फक्त एक उपकरण संच लागतो. मोजावयाच्या अंतराच्या दुसऱ्या टोकावरील खास प्रकारचा प्रचिन ( लोलक ) परावर्तक असतो. उपकरणातून निघालेले प्रकाशतरंग या दूर असलेल्या परावर्तकाकडून परावर्तित होऊन परत येण्यास लागणाऱ्या वेळेवरून अंतर मोजले जाते. याची मापने अधिक असतात, मात्र उपकरण व परावर्तक यांच्यात थेट दृष्टिरेषा असणे गरजेचे असते. लेसर वापरणाऱ्या उपकरणाने ४० किमी.पर्यंतचे तर अवरक्त किरण वापरणाऱ्या उपकरणाने १० किमी.पर्यंतचे अंतर मोजता येते. जीओडोमीटर हे असे उपकरण आहे.

प्रकाशतरंग व रेडिओ तरंग यांची गती अचूकपणे माहीत असल्याने या उपकरणांनी अंतर अगदी अचूकपणे ( १० भागात एक भाग या अचूकतेने ) मिळते. या उपकरणांनी मिळणाऱ्या अंतराचे मूल्य स्थिर असते व त्यात ±२ मिमी. एवढी चूक होऊ शकते. आता या उपकरणांमध्ये विशेषत: अनेक कंप्रता ( दर सेकंदास होणाऱ्या कंपनांच्या संख्या ) व प्रावस्था तुलना तंत्र वापरून अंतर ठरवितात कालमापनाव्दारे नाही. दूरची अंतरे मोजण्यासाठी ⇨ रडार वापरतात.

संयुक्त उपकरण संच : प्रकाशकीय, इलेक्ट्रॉनीय, प्रदत्त-इलेक्ट्रॉनीय किंवा चलित्रयुक्त इलेक्ट्रॉनीय प्रयुक्त्या यांचा संयुक्तपणे वापर या ठिकाणी केला जातो.

प्रकाशकीय : थिओडोलाइट आणि अवरक्त इलेक्ट्रॉनीय अंतरमापक एकाच उपकरणात असल्यास त्याला सामान्यपणे प्रकाशकीय संयुक्त उपकरणसंच ( समग स्थानक ) म्हणतात. एकात्मीकृत प्रकाराने अधिक दीर्घ पल्ल्याची अंतरे मोजता येतात, ती कोनाच्या उच्च्तर अचूकतेशी जुळणारी असतात. स्वयंसंघटक वा नियमनकारक प्रकारच्या उपकरणाने लघु ते दीर्घ पल्ल्याची अंतरे मोजता येतात व ती नीच ते उच्च कोनाच्या अचूकतेशी जुळतात.

इलेक्ट्रॉनीय : इलेक्ट्रॉनीय संयुक्त उपकरणसंचात इलेक्ट्रॉनीय थिओडोलाइट व अवरक्त इलेक्ट्रॉनीय अंतरमापक बरोबर असतात. हे आता सर्वेक्षणातील प्रमाणभूत उपकरण बनले असून सर्वेक्षणातील सर्व उपयोगांच्या बाबतीत याने सर्व प्रकारच्या कोन व अंतरमापक उपकरणांची जागा घेतली आहे. या उपकरणांवर त्रूटिपूर्ती घटक सामान्यत: असतात. त्यामुळे चुका व अनिष्ट परिणामांची भरपाई होते. अनेक उपकरणे द्विअक्षीय प्रकारची असून त्यांव्दारे दोन्ही दिशांमधील चुकीच्या संतलनात दुरूस्ती होते. अशा अनेक संयुक्त उपकरणसंचांत अनेक अंगभूत उपयुक्त संगणक कार्यक्रम असतात. त्यांव्दारे सर्वेक्षणाच्या जवळजवळ सर्व गरजा भागविल्या जातात.  बांधकामासाठी ( निर्माणासाठी ) विवेचकपणे स्वस्त उपकरणांचे आराखडे बनविले आहेत. अशी एकटी उपकरणेही खूपच कार्यक्षम असतात. इलेक्ट्रॉनीय प्रणालीतील उपकरणांच्या प्रगतीतील पुढील टप्पा म्हणजे हस्तलिखित नोंदी करण्याऐवजी त्यांसाठी प्रदत्त संकलकाची (माहिती संगाहकाची ) सोय करणे ही होय. प्रदत्त संकलकामुळे प्रत्यक्ष क्षेत्रात होणाऱ्या चुका कमी होतात. तसेच काही उपयुक्त हिशोब जलदपणे व सहजगत्या होऊ शकतात. कार्यालयीन संगणक हा संयुक्त उपकरण प्रणालीतील शेवटचा घटक असून प्रदत्त संकलकाकडून माहिती या संगणकाकडे स्थलांतरित होऊ शकते. विशेषीकृत सर्वेक्षण सॉफ्टवेअर वापरून मुद्रक वा स्वयंचलित आरेखक नवीन नकाशे तयार करतो.

प्रदत्त इलेक्ट्रॉनीय : इलेक्ट्रॉनीय घटकांच्या लघुकरणामुळे इलेक्ट्रॉनीय संयुक्त उपकरणसंच प्रदत्त संकलकाशी जोडणे शक्य झाले. काढता घालता येणारे लहान स्वयंघटक ( मोडयूल ) किंवा कार्डे प्रदत्त (माहिती ) साठविण्यासाठी वापरतात. अशी माहिती मग कार्यालयातील संगणकाकडे पाठविता ( स्थानांतरित करता ) येते. या प्रकारची उपकरणे म्हणजेच एकच घटक असतो. त्यामुळे त्यात केबली नसतात व त्यामुळे ती सहजपणे हलविता येतात. काही उपकरणांमध्ये संगणकात वापरण्यात येणारी सर्व चिन्हे ( अक्षरे, अंक, विरामचिन्ह खुणा, सूचक खुणा ) असलेला आल्फा न्यूमरिक चावी फलक असतो. यामुळे मोजलेल्या माहितीत वर्णने व नोंदी ( टीपा ) यांची भर घालता येते. प्रचलित संगणक कार्यकम वापरणारे खास प्रकारचे उपकरण संचांचे आराखडे तयार केले आहेत.

चलित्रयुक्त इलेक्ट्रॉनीय : या संयुक्त उपकरणसंचाच्या दोन वैशिष्टयांमुळे हा प्रमाणभूत उपकरणसंचाहून वेगळा आहे. हाताने वापरावयाच्या समरेखन यंत्रणांच्या जागी यात चलित्रे असतात. तसेच प्रकाशकीय दुर्बिणीच्या जागी इलेक्ट्रॉनीय प्रकारची दुर्बिण असते. हे उपकरण स्वत:च स्वत:ला प्रचिन परावर्तकाच्या समरेषेत आणते. त्यामुळे उपकरण चालविणाऱ्याची गरज नसते. परावर्तकाचा वापर करणाराच दुरून प्रदत्त नोंदणीचे काम सुरू करू शकतो. यामुळे ही सर्व प्रकिया एकच व्यक्ती करू शकते. अशा रीतीने सर्वेक्षणाचे काम करणाऱ्यांची संख्या कमी करणे हा या प्रणालीतील एक प्रमुख फायदा आहे.

भूगोलावरील स्थाननिश्चिती प्रणाली : ( ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिम ). मार्गनिर्देशनासाठी तसेच विमाने, जहाजे, वाहने इत्यादींची स्थाने निश्चित करण्यासाठी उभारलेली ही कृत्रिम उपगहांची प्रणाली आहे. गाहीचे अक्षांश-रेखांश काढण्यासाठी या प्रणालीत खास प्रकारचे गाही आणि सुविकसित सॉफ्टवेअर वापरतात. अचल असलेल्या दोन ग्राहींमधील अंतर अतिशय अचूकपणे मोजता येऊ शकेल, असे आधीच्या कार्यकमाच्या वेळी लक्षात आले. या ग्राहींदरम्यानचे अनेक किमी. अंतर मोजता येते. अतिशय अचूक नियंत्रित सर्वेक्षणांसाठी ही तंत्रविदया आदर्श वा प्रमाण ठरली. खास प्रकारच्या अचूक गाहींची जादा किंमत, प्रत्येक संच उभारणीला वा स्थापन करायला लागणारा दीर्घ कालावधी आणि ही प्रकिया सुविकसित करणे या कारणांमुळे या प्रणालीचा सर्वसाधारण कामांसाठी उपयोग करता येत नाही.

पाणीपुरवठा, वाहितमल ( सांडपाणी ) संकलन, वीज यांसाठीच्या प्रणाल्यांसारख्या शहरातील वैशिष्टयपूर्ण बाबींचा नकाशा तयार करण्या-साठी नेहमीच्या सर्वेक्षणातील अचूकतेची गरज नसते. स्वस्त, कमी अचूक ग्राही या कामांसाठी वापरतात. तसेच शहराला परवडण्यासारखी बहुस्तरी प्रदत्त पेढी ( माहितीचा पूर्णसंगह ) चालू शकते. या पेढीमध्ये शहरातील जमिनीखालची व जमिनीच्या वरची रचनात्मक वैशिष्टये असणे अपेक्षित आहे. [⟶ मार्गनिर्देशक].

सर्वेक्षण संबंधित संस्था : विशिष्ट प्रकारचे सर्वेक्षण त्या त्या सर्वेक्षणाशी संबंधित संस्थाव्दारे केले जाते. भौगोलिक व स्थलवर्णनात्मक सर्वेक्षणाचे काम डेहराडून येथील ⇨ भारतीय सर्वेक्षण संस्थे मार्फत केले जाते. गामीण भागांतील जमीन महसुलासाठी जमिनीच्या हद्दी, पोटहिश्श्याच्या हद्दी वगैरे निश्चित करून नकाशे बनविण्याचे काम राज्य सरकाच्या महसूल खात्यातील भूमि अभिलेख खात्यामार्फत केले जाते. याच खात्यातर्फे नगर सर्वेक्षणाचे काम नागरी विभागात केले जाते. जलसंबंधित सर्वेक्षणांपैकी सागरी सर्वेक्षणाचे काम नाविक दलातील यासंबंधित शाखा, हुगळी रिव्हर सर्व्हिस, कोलकाता पोर्ट कमिशन, महाराष्ट्र शासनाचे जलसर्वेक्षक आणि ड्रेजर कम सर्व्हे, पूल, वाहतूक मंत्रालय, भारत शासन यांच्यातर्फे होत असते. याशिवाय समुद्रकिनाऱ्यालगतच्या इतर राज्यांतही यासंबंधित शाखा आहेत. यांपैकी प्रवाह मोजणे, वेग मोजणे वगैरे कामे राज्य सरकारच्या स्थापत्य विभागांतर्फे होतात. स्थापत्यशास्त्रीय मोठे प्रकल्प बहुधा सरकारी पातळीवरच कार्यान्वित होत असतात. त्यांचे नियोजन व अंमलबजावणीसाठी लागणारे सर्वेक्षण राज्यातील बांधकाम, दळणवळण व पाटबंधारे खात्यांतर्फे करण्यात येते. लोहमार्गाच्या सर्वेक्षणासाठी भारतीय रेल्वे खात्यात स्वतंत्र विभाग आहे. यांशिवाय खासगी प्रकल्पांचे सर्वेक्षण खासगी संस्था, व्यक्ती अथवा वास्तुशिल्पज्ञाव्दारे केले जाते.

पाहा : छायचित्रण; नकाशा; प्रक्षेपण, नकाशाचे; बंदरे; भुयारी गटार; भूगणित; भूविज्ञान; मानचित्रकला; मार्गनिर्देशन; मृदा; रस्ता.

संदर्भ : 1. Bary, B. A. Construction Measurements, 1988.

2. Brown, C. M. Evidence and Procedures for Boundary Location, 1981.

3. Burnside, C. D. Electromagnetic Distance Measurement, 1982.

4. Cooper, M. A. R. Modern Theodolites and Levels, 1982.

5. Denmlich, F. Surveying Instruments, 1982.

6. Hofmann–Wellenhof, B. Lichtenegger, G. H. Global Positioning System : Theory and Practice, 1992.

7. Kahmen, H. Faig, W. Surveying, 1988.

8. McCormac, J. C. Surveying, 1994.

9. Moffitt, F. H. Bouchard, H. Surveying, 1989.

10. Rueger, J. M. Electronic Distance Measurement, 1990.

11. Wells. D. Guide to GPS Positioning, 1986.

12. Wolf P. R. Brinker, R. C. Elementary Surveying, 1994.

निबंधे, श्री. बा.