सार्वजनिक स्वच्छता व आरोग्य : आरोग्यसंपन्न किंवा निरोगी पर्यावरणीय परिस्थिती निर्माण करण्याची कृती किंवा प्रक्रिया म्हणजे ‘सार्वजनिक स्वच्छता’ होय. सार्वजनिक आरोग्य म्हणजे समाजाच्या किंवा एकूण लोकसंख्येच्या आरोग्याची अवस्था होय. लोकांच्या आरोग्याचे रक्षण करणे, त्यांची गुणवत्ता वाढविणे व ते सुधारणे यांसाठी समाजाने संघटित केलेल्या प्रयत्नांना ‘सार्वजनिक आरोग्य’ म्हणतात. यामध्ये विविध विज्ञान शाखा, कौशल्य व लोकसमजुती यांचा समावेश होतो, म्हणजे सामूहिक कृतींद्वारे आरोग्य टिकविण्याच्या व सुधारण्याच्या दृष्टीने या प्रणालीचा उपयोग करतात. सार्वजनिक आरोग्यविषयक कार्यक्रम व सेवा आणि त्यात कार्यरत असलेल्या संस्था यांमध्ये रोगांचा प्रतिबंध करणे, समग्र लोकसंख्येच्या आरोग्यविषयक गरजा भागविणे यांच्यावर भर देतात. रोगांचे प्रमाण, अकाल मृत्यू, शारीरिक दौर्बल्य, अस्वास्थ्य, कुपोषण इ. कमी करणे हे सार्वजनिक आरोग्याचे जादा वा पूरक उद्दिष्ट असते.

सार्वजनिक स्वच्छता : सार्वजनिक स्वच्छता हे सार्वजनिक आरोग्याचे एक महत्त्वाचे अंग आहे. रोगांचा प्रतिबंध व नियंत्रण करण्यासाठी पर्यावरणाचे नियमन करणाऱ्या यंत्रणा विविध प्रयत्न करतात. असे प्रयत्न सार्वजनिक स्वच्छतेचाच भाग असतात. सार्वजनिक स्वच्छतेत व्यक्तिगत स्वच्छताही अंतर्भूत असते. कारण व्यक्तिगत स्वच्छतेमुळे समाजाचे रोगांपासून रक्षण करण्याच्या कामाला मदत होते.

अनेक प्रकारचे व्यवसाय व विविध शासकीय यंत्रणा समाजाच्या आरोग्यरक्षणासाठी एकत्रितपणे काम करतात. पिण्याच्या तसेच वापरावयाच्या पाण्यावर संस्करण करणारी संयंत्रे, वाहितमलावर (सांडपाण्यावर) संस्करण करणारी संयंत्रे यांचे अभिकल्प (आराखडे) तयार करणे व ही संयंत्रे व्यवस्थित चालू ठेवणे ही कामे स्वच्छता अभियंते करतात. निरोगी पर्यावरण वृद्घिंगत करण्याला साहाय्यभूत ठरतील असे कायदे तयार करून त्यांची अंमलबजावणी करण्याचे काम शासकीय यंत्रणा करतात. अन्न व खाद्यपदार्थांवर संस्करण वा प्रक्रिया करणे आणि त्यांचे वाटप करणे, घन कचऱ्याची विल्हेवाट लावणे, तसेच पाण्यावर व वाहितमलावर संस्करण करणे ही सार्वजनिक स्वच्छतेची कामे आहेत. शिवाय हवेचे प्रदूषण व कृंतक(कुरतडणारे) प्राणी यांचे नियंत्रण करण्याचे कामही सार्वजनिक स्वच्छतेत येते.

अन्न संस्करण व वाटप : सूक्ष्मजंतू, व्हायरस, कृमी व इतर जीव आणि रासायनिक विषारी द्रव्ये यांच्यामुळे खाद्यपदार्थ व पेये यांचे सहजपणे संदूषण होते. तयार खाद्यपदार्थ व पेये यांचे नियंत्रण सर्वसाधारणपणे शासकीय यंत्रणा करतात. या यंत्रणा पशुपक्ष्यांच्या कत्तलीपूर्वी व कत्तलीनंतरही मांस परीक्षण करतात. तसेच खाद्यपदार्थांवरील संस्करण, त्यांच्यावर लावावयाच्या खुणेच्या चिठ्ठ्या व त्यांची आवेष्टने यांचीही तपासणी या यंत्रणा करतात. शिवाय खाद्यपदार्थ व पेये यांच्या वाटपावरही या यंत्रणा लक्ष ठेवतात. एकूणच खाद्यपदार्थांचे उत्पादन, संस्करण, हाताळणी इत्यादींसाठी असलेल्या आवश्यक कायदेशीर बाबींची अंमलबजावणी या यंत्रणा न चुकता करतात.

वाहितमल संस्करण व विल्हेवाट : लोकांनी निर्माण केलेले व केरकचऱ्यासारखी निरूपयोगी द्रव्ये वाहून नेणारे पाणी वा द्रव म्हणजे वाहितमल होय. अशा सांडपाण्यात सु. एकदशांश टक्क्यांपर्यंत घनरूप अपशिष्टे (टाकाऊ द्रव्ये) असतात. घरातील स्नानगृहे, स्वच्छतागृहे, पाळीव जनावरांचे गोठे इ. ठिकाणांतून येणारे घन पदार्थ मिसळलेले पाणी, कारखान्यांतून बाहेर पडणारे सांडपाणी व त्याबरोबर येणारे निरूपयोगी पदार्थ, शेतीवाडी, उपाहारगृहे, कार्यालयीन इमारती इत्यादींमधून येणारे सांडपाणी, तसेच पाऊस पडल्यावर रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारांतून किंवा नळांमधून वाहणारे पाणी यांचा वाहितमलात अंतर्भाव होतो.

पुष्कळशा औद्योगिक वाहितमलात घातक रसायने व इतर टाकाऊ पदार्थ असतात. यामुळे अशा वाहितमलावर संस्करण करूनच ते नद्या, सरोवरे, समुद्र किंवा इतर जलाशयांत सोडणे आवश्यक असते अन्यथा जलाशय असंस्कारित वाहितमलामुळे संदूषित होऊ शकतात. काही वेळा अशा संदूषित पाण्यामुळे जलचर प्राणी व वनस्पती मरतात. तसेच वाहितमलामुळे पाणी पिण्याच्या दृष्टीने असुरक्षित होऊन पिण्यालायक राहत नाही. एवढेच नव्हे तर असे पाणी पोहणे, मासेमारीचा छंद व इतर मनोरंजनाच्या दृष्टीनेही निरूपयोगी होते.

लोकसंख्या वाढली की वाहितमलाची सुरक्षितपणे विल्हेवाट लावण्याचे काम अधिक गुंतागुंतीचे होते. पूर्वी ग्रामीण भागात वाहितमल जवळच्या जलाशयात सोडीत असत मात्र हे धोकादायक ठरते. अर्थात ही प्रथा पूर्णपणे बंद झालेली दिसत नाही. ग्रामीण भागांतही स्वच्छता अभियांत्रिकीची तंत्रे वापरून घरगुती सांडपाणी व मानवनिर्मित अपशिष्टे यांची विल्हेवाट लावतात. बहुतेक मोठ्या शहरांत आणि काही गावांतही किमान एक तरी वाहितमल संस्करण संयंत्र असते. तथापि, बहुतेक ग्रामीण भागांत वाहितमल संस्करणाची सोय उपलब्ध नसते. अशा ठिकाणी पूतिकुंड (सेप्टिक टँक) प्रणालीद्वारे घरगुती सांडपाण्याची विल्हेवाट लावतात. या प्रणालीत सर्व प्रकारचे सांडपाणी भूमिगत व जलाभेद्य टाकीत म्हणजे पूतिकुंडात सोडतात. तेथे सांडपाण्यावर सूक्ष्मजीवांची क्रिया होते व सांडपाण्यातील बहुतेक घनपदार्थाचे अपघटन होते. त्यातून उत्सर्जित होणारे वायू बाहेर पडतात किंवा निचऱ्याच्या नळांत जातात. नंतर द्रव व वायू टाकीच्या माथ्यावरील निर्गमन मार्गावाटे बाहेर पडतात. टाकीचा निर्गमन मार्ग सामान्यपणे जमिनीपासून सु. ६० सेंमी. उंचीवर असतो. अपघटन न झालेले घन पदार्थ टाकीत खाली बसतात. शेवटी ते तेथून काढून त्यांची सुरक्षितपणे विल्हेवाट लावतात. पूतिकुंड प्रणालीमुळे ग्रामीण भागात व शेतीवाडीवर आधुनिक प्रकारची स्नान सुविधा आणि वाहितमल विल्हेवाटीच्या स्वच्छता पद्घती वापरणे शक्य झाले आहे. [⟶ वाहितमल वाहितमल संस्करण व विल्हेवाट औद्योगिक अपशिष्ट].

घन कचऱ्याची विल्हेवाट: घन कचरा हा सार्वजनिक स्वच्छतेमधील एक महत्त्वाची समस्या आहे. यामध्ये गावातील व शहरातील मानवनिर्मित केरकचरा तसेच शेती, खाणकाम, औद्योगिक उत्पादने इत्यादींमधून बनलेल्या टाकाऊ उपपदार्थांचाही अंतर्भाव असतो. अशा उपपदार्थांत प्राण्यांची कलेवरे, शेतात वापरलेली वरखते, लाकडाचा भुसा, कारखान्यातील धातूंचा निरूपयोगी भाग तसेच खाणीतील दगडी कोळशाचे तुकडे, धातूंचे कण, इलेक्ट्रॉनिक अपशिष्ट इ. असतात.

घन कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या बहुतेक पद्घतींमुळे पर्यावरणीय समस्या निर्माण होऊ शकतात. उदा., घन कचऱ्याचे उघडे ढिगारे, उकिरडे वाईट दिसतात. त्यांची दुर्गंधी दूरपर्यंत येऊ शकते. तेथे रोगवाहक उंदीर व इतर प्राण्यांची राहण्याची सोय होते. घन कचरा जाळल्यास धूर होतो व त्यामुळे हवा प्रदूषित होते. तथापि, घन कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या जागा व तो जाळण्याच्या भट्ट्या योग्य वापरल्यास त्यांच्यामुळे पर्यावरणाची हानी बऱ्याच कमी प्रमाणात होते.


पाण्यावरील संस्करण : पिण्यासाठी, स्वयंपाक, स्नान, पोहणे, धुलाई इत्यादींसाठी पाणी वापरतात. पाण्याचा वापर होण्यापूर्वी त्यावर संस्करण होणे गरजेचे असते. संस्करण न केलेल्या पाण्यात पुष्कळदा सूक्ष्मजंतू, व्हायरस व इतर रोगकारक सूक्ष्मजीव असू शकतात त्याला दुर्गंधी येऊ शकते ते बेचव असू शकते किंवा क्षारयुक्त खनिज द्रव्ये असल्याने ते धुलाईसाठी वापरणे गैरसोईचे होते.

शहरे, गावे व खेडी यांना जलाशय तसेच भूमिजल यांतून पाणीपुरवठा होतो. अशा जलस्रोतांधील पाणी नळांद्वारे जलसंस्करण संयंत्राकडे पाठवितात. तेथे रासायनिक व भौतिक प्रक्रिया करून पाणी शुद्घ करतात, असे शुद्घ पाणी बहुधा भूमिगत नळांमार्फत घरे, इमारती, कारखाने इ. ठिकाणी पुरवितात.

ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्यातील शुद्घीकरणाला १९०० पासून मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली. इतर कोणत्याही सार्वजनिक आरोग्यविषयक उपायांपेक्षा या उपायामुळे मानवाचे आयुर्मान वाढण्यास अधिक मदत झाली. विषमज्वर, आमांश व पटकी या रोगांना कारणीभूत होणारे सूक्ष्मजीव प्रदूषित पाण्यात दीर्घकाळ टिकून राहू शकतात. या रोगांचा प्रसार रोखण्यासाठी पाण्याच्या संदूषणावर व प्रदूषणावर प्रतिबंधक उपाय योजणे हे अत्यावश्यक काम असते. विहिरींवर जलाभेद्य आच्छादन घालणे हा ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्यामध्ये पृष्ठभागावरून होणारे संदूषण रोखण्याचा महत्त्वाचा उपाय आहे.

सरोवरे, तलाव वगैरेंमधून पृष्ठभागावरील कालवे व पाट यांतून पुरविण्यात येणाऱ्या पाण्याचे शुद्घीकरण अवसादन (निवळण्याची क्रिया), गाळणे व क्लोरिनीकरण यांद्वारे करतात. पाणी साठविण्याच्या टाकीत ॲल्युमिनियम सल्फेट टाकून अवसादन करतात. ॲल्युमिनियम सल्फेटामुळे पाण्यातील मातीचे अधिक सूक्ष्म कण व पाण्यातील इतर अनिष्ट निलंबित द्रव्याचे कण संकलित होतात म्हणजे एकत्र येऊन अधिक मोठे कण तयार होतात. ते खाली बसू शकतात किंवा असे पाणी बारीक वाळूमधून गाळल्यास त्यातील हे मोठे संकलित कण काढून टाकले जातात. अखेरीस क्लोरिनाच्या विद्रावाने क्लोरिनीकरण करून पाणी शुद्घ केले जाते. मानवनिर्मित अपशिष्टांमुळे प्रदूषित झालेले पाणी ओळखण्यासाठी कोलोन दंडाणू उपयुक्त ठरतो. म्हणजे पाणी प्रदूषित असल्याचा तो निदर्शक असतो. क्लोरिनामुळे असे जीव मरतात म्हणून पाण्याच्या शुद्घीकरणासाठी क्लोरीन मोठ्या प्रमाणात वापरतात [⟶ पाणी पाणीपुरवठा].

सार्वजनिक स्वच्छतेविषयक इतर कामे : घरे, कारखाने, रुग्णालये व मनोरंजनाची ठिकाणे येथे विशिष्ट दर्जाची स्वच्छता राखणे आवश्यक असते, यासाठी तसे कायदे केलेले असतात. या स्वच्छतेत कीटक व कृंतक यांचे नियंत्रणही अंतर्भूत असते. तसेच सार्वजनिक स्वच्छतेच्या सुविधा पुरविणाऱ्यांना परवाने देण्याविषयीचे नियमही केलेले असतात.

सार्वजनिक आरोग्य : या संज्ञेने संपूर्ण समाजाच्या आरोग्याची अवस्था दर्शविली जाते. रोगांचा प्रतिबंध तसेच शारीरिक व मानसिक आरोग्य, स्वच्छता, यांचे संवर्धन, संसर्गाचे नियंत्रण करणे, आरोग्यसेवा संघटित करणे आणि मानवी आयुर्मान वाढविणे. या गोष्टी सार्वजनिक आरोग्यात येतात. सार्वजनिक जीवनातील प्रश्न हाताळताना माणसांमध्ये ज्या सर्वसाधारण परस्परक्रिया घडतात त्यांतून आरोग्यात सुधारणा करणे, रोगांचा प्रतिबंध करणे व त्यावर उपचार करणे या गोष्टी लक्षात आल्या असून सार्वजनिक आरोग्याच्या संकल्पनेत त्यांचा अंतर्भाव करतात.

सार्वजनिक आरोग्याशी अनेक विज्ञान शाखा व तंत्र यांचा संबंध येतो. यांपैकी रोगपरिस्थितिविज्ञान व जैव सांख्यिकी ही सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने मूलभूत महत्त्व असलेली विज्ञाने आहेत. यांच्या मदतीने आरोग्याची पातळी मोजतात व आरोग्यविषयीच्या समाजातील प्रवृत्ती किंवा समजुती यांचे मोल ठरवितात. रोग परिस्थितिविज्ञान ही प्रबळ संशोधन पद्घती आहे. या संशोधनाने रोगाची कारणे ओळखता येतात. अनेक परिस्थिती कशा उद्‌भवतात व विनाशकारक जोखमी कोणत्या ते ठरविण्यास हे संशोधन उपयुक्त असते. उदा., ॲक्वायर्ड इम्युनोडिफिशिअन्सी सिंड्रोम (एड्स) या विकाराला कारणीभूत असणाऱ्या ह्यूमन इम्युनोडिफिशिअन्सी व्हायरसाने (एच्आय्‌व्ही) होणाऱ्या संसर्गाचे स्वरूप स्पष्ट करण्याचे हे मुख्य तंत्र आहे. पर्यावरणामधील जैव, रासायनिक व भौतिकीय संकटे वा जोखिमा ओळखणे दोष दाखविणे व ते सुधारणे यांसाठी सूक्ष्मजीवविज्ञान, विषविज्ञान इ. अनेक विज्ञान शाखांचा उपयोग होतो. सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने सामाजिक व वर्तनविषयक शास्त्रे अधिक महत्त्वाची झाली. कारण निरुद्योगीपणा (वा निष्क्रियता), एकाकीपणा, व्यक्तिमत्त्व व तंबाखूसारखे व्यसन या बाबींमुळे अकाल मृत्यू व विकलांगता आणणारे चिरकारी रोग यांचे प्रमाण वाढण्यास साहाय्य होते.

सार्वजनिक आरोग्यविषयक वैद्यकाला सार्वजनिक वैद्यक किंवा शरीरक्रियावैज्ञानिक म्हणतात. सार्वजनिक आरोग्य व्यवसायाचा वैद्यकावर व वैद्यकीय तत्त्वज्ञानावर मोठा प्रभाव पडतो. तसेच समाजाच्या हितासाठी पर्यावरणाचे नियमन करणे व त्यावर ताबा ठेवणे यांकडे विशेष लक्ष पुरविले जाते. अशा प्रकारे सार्वजनिक आरोग्यविषयक कार्याचा संबंध गृहबांधणी, पाणीपुरवठा व खाद्यपदार्थ यांच्याशी येतो. सार्वजनिक आरोग्य टिकविणे व सुधारणे हे व्यापक क्षेत्र असून सार्वजनिक वैद्यक हे त्याचे एक अंग आहे. अशा प्रकारे बांधकाम व्यावसायिक, वास्तुविशारद, स्वच्छता अभियंते, तापन व वायुवीजन अभियंते, कारखाने व अन्न निरीक्षक, समाजशास्त्रज्ञ व मानसशास्त्रज्ञ, रसायनशास्त्रज्ञ, भौतिकीविद व विषवैज्ञानिक अशा अगदी भिन्न क्षेत्रांतील तज्ञांचा सामाजिक वैद्यकाशी संबंध येतो. काम करण्याच्या ठिकाणी असणाऱ्या व्यक्तिगत आरोग्य सुविधा, सुरक्षितता व समाजकल्याण यांच्याशीही व्यावसायिक सार्वजनिक वैद्यकाचा संबंध येतो. ज्या पर्यावरणात व्यक्ती काम करते, त्यातील जोखीम कमी करणे हा सार्वजनिक वैद्यकाचा हेतू असतो.

सार्वजनिक आरोग्य टिकविणे, त्याचे रक्षण करणे व प्रत्यक्षात ते सुधारणे यांसाठी माहिती गोळा करण्याच्या विशिष्ट पद्घती वापरतात. या पद्घतींद्वारे आढळलेल्या महत्त्वाच्या बाबी कृती करून प्रत्यक्षात आणण्यासाठी व्यावसायिक व्यवस्था व यंत्रणा यांची गरज असते. लोकांमध्ये आढळणाऱ्या रोगाचे वर्णन व खुलासा करण्यासाठी रोगपरिस्थितिवैज्ञानिकांनी मिळविलेल्या आकडेवारीची मदत होते. यासाठी आहार, पर्यावरण, प्रारण (तरंगरूपी ऊर्जा) किंवा धूम्रपान यांचा रोग उद्‌भवण्याशी व त्याचा प्रसार होण्याशी असलेला संबंध स्पष्ट करतात. याच्या आधारे शासकीय यंत्रणा कायदे व नियम तयार करते. विलग्नवास सक्तीचा करून साथीच्या रोगाच्या संसर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी शासन यंत्रणा उभारते. उदा., संसर्गजन्य रोगाचा देशात शिरकाव होऊ नये म्हणून बंदरे व विमानतळ या ठिकाणी असलेली तपासणी यंत्रणा.


सार्वजनिक आरोग्यविषयक विविध संकल्पना कशा विकसित झाल्या, तसेच विकसित व विकसनशील देशांत सार्वजनिक आरोग्यविषयक प्रश्न हाताळण्याच्या संघटनात्मक व प्रशासकीय पद्घतींची रूपरेषा इत्यादींची कल्पना पुढील माहितीवरून येईल. सार्वजनिक आरोग्याचे प्रश्न, साधनसंपत्तीच्या मर्यादा, सार्वजनिक आरोग्याशी निगडित असलेल्या कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण इ. घटक सार्वजनिक आरोग्यसेवा प्रणालीचा आराखडा तयार करताना विचारात घ्यावे लागतात. याशिवाय या क्षेत्रातील अत्याधुनिक प्रगती व न सुटलेले काही प्रश्न यांचीही माहिती पुढे दिली आहे.

इतिहास : जगातील बहुतेक आदिवासींनी अनेक धार्मिक कारणांसाठी स्वच्छता व व्यक्तिगत आरोग्य यांचा अंगीकार केला होता, असे दिसते. म्हणजे आपल्या देवांच्या नजरेत आपण पवित्र अथवा शुद्घ असायला हवे, अशी इच्छा यामागे होती. उदा., जुन्या करारात स्वच्छ व अस्वच्छ जीवनप्रणाली यासंबंधीची अनेक निषिद्घे व निर्बंध आलेले आहेत. सार्वजनिक आरोग्यविषयक काही कामांची मुळे इसवी सनाच्या सुरुवातीच्या काळातील प्रत्यक्ष निरीक्षणांत गेलेली आढळतात. उदा., त्या काळात कुष्ठरोगी घंटा वापरीत असत. घंटानादाद्वारे इतरांना स्पर्शाद्वारे होणाऱ्या संभाव्य संसर्गाच्या धोक्याची पूर्वसूचना मिळत असे. या काळात साधे स्वच्छताविषयक नियम पाळले जात होते, असे दिसते. रोमन लोक लष्करी मोहिमांमध्ये स्वच्छतेविषयी पूर्वनियोजित खबरदारी घेत असत तथापि रोगाच्या संक्रमणातील दूषित पाण्याचे कार्य त्यांना समजले नव्हते, असे त्यांच्या पाणीपुरवठा व नळजोडणी यांविषयीच्या स्वरूपावरून लक्षात येते.

रोगाच्या साथी हा माणसाच्या कुकर्माचा परिणाम आहे, असे आदिम समाज हजारो वर्षे मानीत होता. प्लेगसारखा साथीचा रोग वातावरणातील दीर्घकालीन बदल व पर्यावरण यांसारख्या नैसर्गिक कारणांनी उद्‌भवतो, ही माहिती सावकाश विकसित होत गेली. अशा प्रकारची मोठी वैचारिक प्रगती ग्रीसमध्ये इ. स. पू. पाचव्या व चौथ्या शतकांत झाली. दलदल व हिवताप यांमधील परस्परसंबंध इ. स. पू. ५०३–४०३ इतक्या आधी लक्षात आला होता. अर्थात हा कार्यकारणभाव संदिग्ध स्वरूपाचा होता. रोगामागील कारणांचा विवेकशील व वैज्ञानिक उपपत्ती मांडण्याचा हा पहिला प्रयत्न होता. हिपॉक्राटीझ यांनी एअर्स, वॉटर्स अँड प्लेसेस  या शीर्षकार्थाचे पुस्तक इ. स. पू. पाचव्या-चौथ्या शतकांत लिहिल्याचे मानतात. मानवी रोग व पर्यावरण यांच्यातील परस्परसंबंध किंवा कार्यकारणभाव दाखविण्याचा हा पद्घतशीर असा पहिला प्रयत्न होता. एकोणिसाव्या शतकात सूक्ष्मजंतुशास्त्र व प्रतिरक्षाविज्ञान यांचा उदय होईपर्यंत साथीचा म्हणजे विशिष्ट भागात टिकून राहणारा व अल्पकाळात अनेकांना होणारा म्हणजे संसर्गजन्य रोग यांच्या बाबतीतील हे प्रमाणभूत पुस्तक होते.

मध्ययुग : रोगाच्या संदर्भात सांगायचे झाल्यास मध्ययुगाची सुरुवात इ. स. ५४२ च्या प्लेगने झाली आणि त्याचा शेवट १३४८ च्या गाठीचा प्लेग (ब्लॅक डेथ) या रोगाने झाला. कुष्ठरोग, गाठीचा प्लेग, देवी, क्षय, खरूज, धावरे, काळपुळी (अँथ्रॅक्स), खुपरी, नृत्यविषयक गंड (डान्सिंग मॅनिया) इ. रोगांचे प्रमाण या काळात साथीच्या रोगाप्रमाणे मोठे होते. कुष्ठरोगाच्या प्रसाराच्या संदर्भात संसर्गजन्य रोग झालेल्या व्यक्तीला प्रथमच पृथक्‌वासात ठेवले होते. तेराव्या व चौदाव्या शतकांत कुष्ठरोगाचा प्रश्न विशेष गंभीर बनला होता. यूरोपात विलग्नवास चौदाव्या शतकात सुरू झाले व त्यांतून सार्वजनिक आरोग्यविषयक कायदे पुढे आले. लोकांचे संसर्गापासून रक्षण करणे हा या कायद्यांचा हेतू होता. [ ⟶ संसर्गजन्य रोग].

गाठीचा प्लेग मध्यपूर्वेतून दक्षिण यूरोपच्या समुद्रकिनाऱ्यापर्यंत पोहोचला होता. पुढील तीन वर्षांत तो संपूर्ण यूरोपात पसरला. या रोगाचे ज्ञात किंवा शंकास्पद रोगी व त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती यांना पृथक्‌वासात ठेवणे हा या रोगाशी मुकाबला करण्याचा मुख्य उपाय होता. सुरुवातीला याचा अवधी १४ दिवस होता. तो हळूहळू ४० दिवसांपर्यंत वाढविला. या रोगाचा प्रतिकार करण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांनी स्वच्छतेच्या नियंत्रणाची प्रणालीच उभारली. या प्रणालीत निरीक्षण केंद्रे, पृथक्‌वास, रुग्णालये व जंतू नष्ट करण्याच्या पद्घती अंतर्भूत होत्या. शुद्घ पाणीपुरवठा, केरकचरा व वाहितमलाची विल्हेवाट, अन्नाचे निरीक्षण इ. स्वच्छतेत सुधारणा करण्याचे उपाय योजणे असे प्रयत्न शहरांमध्ये महत्त्वाचे होते. कारण शहरांत लोक दाटीवाटीने परंतु आपल्या घराभोवती अनेक प्राणी बाळगून खेड्यातील परिस्थितीसारखे राहत असत.

मध्ययुगात सार्वजनिक आरोग्यविषयक अनेक कामे प्रथमच करण्यात आली. अनारोग्यकारक परिस्थितीशी मुकाबला करण्याचे प्रयत्न केले विलग्नवासांद्वारे रोगाच्या प्रसाराला आळा घालण्यात आला रुग्णालये उभारली तसेच वैद्यकीय सेवा व शासकीय मदत यांची तरतूद केली.

प्रबोधन काळ : अनेक शतकांतील तंत्रविद्येमधील प्रगतीचा कळस सोळाव्या व सतराव्या शतकांत गाठला गेला. कारण या काळात अनेक वैज्ञानिक लक्ष्ये साध्य होत होती. देश वा राज्य आर्थिक व राजकीय दृष्टींनी बलवान होण्यासाठी जनतेचे आरोग्य टिकून राहणे गरजेचे असते, हे त्या काळातील शिक्षित नेत्यांच्या लक्षात आले होते. तोपर्यंत इंग्लंड व यूरोपमध्ये आरोग्यविषयक राष्ट्रीय धोरण विकसित झाले नव्हते, कारण असे धोरण राबविण्यासाठी आवश्यक असणारी माहिती व यंत्रणा शासनाकडे नव्हती. परिणामी सार्वजनिक आरोग्याचे प्रश्न मध्ययुगाप्रमाणे स्थानिक पातळीवर सामूहिक रीतीने हाताळले जात असत.

सोळाव्या व सतराव्या शतकांतील वैज्ञानिक प्रगतीमुळे शारीर व शरीरक्रियाविज्ञान यांचा पाया घातला गेला होता. निरीक्षण व वर्गीकरण यांच्यामुळे रोग अधिक अचूकपणे ओळखणे शक्य झाले होते. संसर्गजन्य रोग सूक्ष्मजीवांमुळे होऊ शकतात, या मतास पुष्टी मिळू लागली होती.

जॉन ग्राँट हे सार्वजनिक वैद्यकातील एक आघाडीचे विशेषज्ञ होते. त्यांनी १६६२ मध्ये सांख्यिकीचे एक पुस्तक प्रसिद्घ केले. त्यात मृत्युसंख्या देऊन काहींच्या मृत्यूंची कारणे सूचित केली होती. त्यातील आकडेवारी अचूक नसली, तरी त्यामुळे रोगपरिस्थितिविज्ञान या वैद्यकाच्या शाखेची सुरुवात झाली.

अठरावे व एकोणिसावे शतक : एकोणिसाव्या शतकात अनेक यूरोपीय देशांत स्वच्छतेत सुधारणा करण्याविषयीची आंदोलने एकाच वेळी झाली. अर्थात यांचा पाया १७५०–१८३० दरम्यान तयार झाला होता. १७५० नंतर यूरोपची लोकसंख्या जलदपणे वाढली. त्याचबरोबर लहान मुलांच्या मृत्यूच्या प्रमाणात मोठी वाढ झाली. तसेच तुरुंग व मनोरुग्णांच्या संस्था येथील असमाधानकारक परिस्थितीविषयी लोक अधिक जागरूक झाले.

याच काळात रुग्णालये उभारण्यास सुरुवात झाली व त्यांची संख्याही जलदपणे वाढली. व्यक्तिगत पातळीवरील नागरिकांच्या ऐच्छिक प्रयत्नांमधून ब्रिटनमध्ये रुग्णालये उभी राहिली. यातून सार्वजनिक आरोग्यसेवेधील रुग्णालयाचा परिचित झालेला नमुना पुढे येण्यास मदत झाली. समाजाच्या आरोग्यविषयक वाईट परिस्थितीची कल्पना आल्यावर व्यक्तिगत पुढाकारातून या परिस्थितीचा अभ्यास सुरू झाला. यातून उद्‌भवलेल्या सार्वजनिक मतांकडे व आंदोलनांकडे सरकारचे लक्ष वेधले गेले आणि अखेरीस शासनाने रुग्णालये उभी केली.


लोकांना आरोग्यविषयक शिक्षण देण्याचे प्रयत्न ही या काळातील वैशिष्ट्यपूर्ण घटना ठरली. १८५२ मध्ये सर जॉन प्रिंगल यांनी लिहिलेल्या पुस्तकात बराकींमधील वायुवीजन व स्वच्छतागृहांची तरतूद यांचा ऊहापोह केला होता. १८५० मध्ये त्यांनी तुरुंग ज्वर (जेल फीव्हर) या विकाराविषयी लिहिले (हा बहुधा टायफस म्हणजे प्रलापक सन्निपात ज्वर असावा). तेव्हाही त्यांनी व्यक्तिगत गरजांवर व व्यक्तिगत आरोग्यशास्त्रावर जोर दिला होता. १७५४ मध्ये जेम्स लिंड यांचा क जीवनसत्त्वाच्या अभावी होणाऱ्या स्कर्व्ही रोगावरील व्याप्तिलेख प्रसिद्घ झाला होता.

जसजसा औद्योगिक क्रांतीचा विकास होत गेला, तसतसे कामगारांचे आरोग्य व कल्याण निकृष्ट दर्जाचे होत गेले. औद्योगिक क्रांती व तिचे आरोग्यावरील वाईट परिणाम याचा अनुभव प्रथम इंग्लंडमध्ये आला.  तेथे एकोणिसाव्या शतकात आरोग्यविषयक सुधारणांचे आंदोलन उभे राहिले. यातून अखेरीस सार्वजनिक संस्था स्थापन झाल्या.

एकोणिसाव्या शतकात इंग्लंडमधील मानवहितवादी व परोपकारी मंडळींनी शासनाला आणि जनतेला लोकसंख्या वाढ, गरिबी तसे साथीचे रोग याबाबत प्रबोधन केले आणि यांविषयीच्या समस्यांचे निवारण करण्याबाबत शिक्षण दिले. ⇨ टॉमस रॉबर्ट मॅल्थस  यांनी लोकसंख्या वाढ, लोकसंख्येवर अन्नपुरवठा अवलंबून असणे आणि संततिनियमन पद्घतींद्वारे प्रजनन नियंत्रित करणे या विषयांवर लेखन केले (१७९८). उपयुक्ततावादी तत्त्वज्ञ जेरेमी बेंथॅम यांनी ‘जास्तीत जास्त लोकांचे जास्तीत जास्त हित’ ही कल्पना विशिष्ट गोष्टींची न्याय्यता मोजण्याचा मापदंड म्हणून मांडली होती. तसेच टॉमस साऊथवुड स्मिथ यांनी विलग्नवास, पटकी, पीतज्वर  व स्वच्छतेधील सुधारणांचे कायदे यांवरील अहवाल प्रसिद्घ केले.

पुअर लॉ कमिशनने (स्था. १८३४) सार्वजनिक आरोग्याविषयीच्या प्रश्नांचे सर्वेक्षण केले व हे प्रश्न सोडविण्याचे उपाय सुचविले. संसर्गजन्य रोग व पर्यावरणातील दूषित पदार्थ यांच्यात परस्परसंबंध असून सार्वजनिक आरोग्य हा वैद्याऐवजी स्थापत्य अभियंत्याचा विषय आहे, हे स्वच्छताविषयक सर्वेक्षणांतून उघड झाले.

जनरल बोर्ड ऑफ हेल्थ हे १८४८ च्या पब्लिक हेल्थ ॲक्ट या कायद्यानुसार स्थापन झाले, तेव्हापासून वाहितमल व केरकचऱ्याच्या विल्हेवाटीचे नियमन करणे, पाळीव प्राण्यांचे निवास (उदा., गोठे, तबेले), पाणीपुरवठा, रोगप्रतिबंध व नियमन, रुग्णपरिचर्या गृहे व रुग्णालये यांची नोंदणी व तपासणी, जन्माची अधिसूचना, प्रसूतिगृह व बालकल्याण सेवा पुरविणे यांविषयीचे अनेक सार्वजनिक आरोग्यविषयक कायदे संमत झाले.

ब्रिटनमधील सार्वजनिक आरोग्यविषयक प्रगतीचा अमेरिकेवर मोठा प्रभाव पडला. तेथेही सार्वजनिक आरोग्याची देखभाल व नियमन करण्यासाठी प्रभावी प्रशासकीय यंत्रणा उभारण्याची गरज होती. अमेरिकेत पीतज्वर, पटकी, देवी, विषमज्वर  व प्रलापक सन्निपात ज्वर  यांच्या साथी वरचेवर उद्‌भवत असत. त्यामुळे प्रभावी सार्वजनिक आरोग्य प्रशासन ही तेथील तातडीची गरज होती. १८५० च्या तथाकथित शाटुक अहवालात सार्वजनिक आरोग्य संघटनेची रूपरेषा सुचविली होती. अमेरिकेतील अशी पहिली संघटना न्यूयॉर्क शहरात १८६६ मध्ये उभी राहिली.

फ्रान्स व जर्मनी येथे एकोणिसाव्या शतकात झालेल्या विकासाने भावी काळातील सार्वजनिक आरोग्यसेवांची दिशा दाखविली. फ्रान्समधील सार्वजनिक आरोग्याच्या चळवळीवर सामाजिक सुधारणांमधील उत्साहाचा प्रभाव पडला होता. संसर्गजन्य रोग ओळखणे, त्यांच्यावर उपचार करणे व त्यांचे नियंत्रण या बाबतींत वैज्ञानिक पद्घती रूढ करण्याचे महत्त्वाचे कार्य फ्रान्सने केले. जर्मनीतील सार्वजनिक आरोग्याविषयीचे विचार इंग्लंड व फ्रान्स येथील विचारांसारखे होते. जर्मनीत आरोग्यविज्ञान प्रयोगशालीय विज्ञान बनल्याने तेथे सार्वजनिक आरोग्यविषयक प्रगतीतील एक लक्षणीय टप्पा गाठला गेला. १८६५ मध्ये म्यूनिकला आरोग्यशास्त्राचे पहिले अध्यासन निर्माण झाले आणि सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रात विज्ञानाचा प्रवेश झाला. सार्वजनिक आरोग्याचे प्रश्न हाताळताना सांख्यिकीय विश्लेषणाचा वापर सुरू झाला. १८७८ च्या सुमारास अमेरिकेत मर्यादित काळासाठी जहाज बंदरामध्येच वेगळे ठेवण्यास सुरुवात झाली, कारण या काळात रोग उद्‌भवू शकतो. अशा तऱ्हेने अमेरिकेत राष्ट्रीय पातळीवर अशा बंदर विलग्नवासाची सुरुवात झाली. यातूनच तेथे युनायटेड स्टेट्स पब्लिक हेल्थ सर्व्हिसेस ही सार्वजनिक आरोग्यसेवांची संघटना निर्माण झाली.

१८७५ नंतरचा विकास :  इटालियन सूक्ष्मजंतुवैज्ञानिक ऑगोस्टिनो मारिआ बासी यांनी एकोणिसाव्या शतकाच्या आधीच्या काळात रेशमाच्या किड्याला होणाऱ्या संसर्गाविषयी संशोधन केले. यावरून विशिष्ट जीव अनेक रोगांना कारणीभूत होतात, हे लक्षात आले. जीवांची संक्रामणशीलता आणि एखाद्या रोगाच्या संदर्भातील व्यक्तीची ग्रहणशीलता यांमधील भिन्नतेविषयीच्या प्रश्नांची उत्तरे तेव्हा मिळाली नव्हती. मानव व प्राणी संसर्गजन्य रोगांचे वाहक असतात, या शोधामुळे या प्रश्नांवर प्रकाश पडला.

फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ लूई पाश्चर, तसेच फेर्डिनांट यूलिउस कोन व रॉबर्ट कॉख हे जर्मन शास्त्रज्ञ आणि इतरांनी सूक्ष्मजंतू अलग करण्याच्या व त्यांची वैशिष्ट्ये उघड करणाऱ्या पद्घती १८९०–१९०० दरम्यान विकसित केल्या. इंग्रज शल्यविशारद जोसेफ लिस्टर यांनी पूतिरोधक शस्त्रक्रियेची संकल्पना विकसित केली. इंग्रज शरीरक्रियावैज्ञानिक सर रॉनल्ड रॉस यांनी डास हा हिवतापाचा वाहक आहे, हे शोधून काढले. फ्रेंच रोगपरिस्थितिवैज्ञानिक पॉल ल्वी सीमाँ यांनी प्लेग हा मुळात उंदीर-घुशीचा रोग असून तो त्यांच्या अंगावरील पिसवांमार्फत पसरतो, याचा पुरावा दिला. वॉल्टर रीड व जेम्स कॅरल यांनी पीतज्वर डासांमार्फत वाहून नेल्या जाणाऱ्या गालनक्षम व्हायरसांमुळे होतो, हे दाखविले. अशा तऱ्हेने आधुनिक सार्वजनिक आरोग्य व प्रतिबंधात्मक वैद्यक यांमधील आधीच्या काळातील कीटकवैज्ञानिकांचे व सूक्ष्मजीववैज्ञानिकांचे कार्य मोठे आहे. यातून सूक्ष्मजीववैज्ञानिकांमुळे सूक्ष्मजीवविज्ञानाची प्रतिरक्षाविज्ञान ही शाखा पुढे आली.


 पाश्चर यांनी रक्षात्मक लशीचे तत्त्व १८८१ मध्ये प्रस्थापित केले. यामुळे रोगप्रतिकारक्षमतेच्या यंत्रणांविषयीचे कुतूहल जागृत झाले. सूक्ष्मजीवविज्ञान व प्रतिरक्षाविज्ञान यांमधील प्रगतीचा सार्वजनिक आरोग्यावर प्रचंड प्रभाव पडला. एकोणिसाव्या शतकात आरोग्यविभागाला पर्यावरणीय परिस्थितीचे नियंत्रण करता आले. विशिष्ट रोगाला कारणीभूत असणारे सूक्ष्मजीव सूक्ष्मजंतुवैज्ञानिकांनी ओळखले. म्हणून विशिष्ट संसर्गजन्य रोगांचे विचारपूर्वक नियंत्रण करण्याच्या कामात प्रगती झाली.

सूक्ष्मजीवविज्ञानाचा सैद्घांतिक विकास मुख्यतः यूरोपात झाला. रोगनिदानासाठीच्या प्रयोगशाळा उभारून या सूक्ष्मजीववैज्ञानिक उपपत्तीचा उपयोग अमेरिकेत करून घेण्यात आला. समाजाच्या आरोग्याचे रक्षण व सुधारणा करण्यासाठी अनेक शहरांत अशा प्रयोगशाळा उभारल्या. त्यांमध्ये सूक्ष्मजंतूंच्या अभ्यासातून पुढे आलेल्या व्यवहारोपयोगी सुविधा होत्या. याचप्रमाणे स्वच्छतेमधील सुधारणांच्या चळवळीतून पूर्वी आरोग्य विभाग पुढे आले होते. आरोग्यविभाग हा सार्वजनिक आरोग्याच्या प्रश्नांशी संबंधित असलेली प्रशासकीय यंत्रणा आहे. त्याप्रमाणे सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा या सार्वजनिक आरोग्य कार्यक्रम राबविणाऱ्या यंत्रणा असतात.

विसाव्या शतकातील पहिल्या दशकात पर्यावरणीय स्वच्छतेच्या सुधारणा सार्वजनिक आरोग्यविषयक काही प्रश्नांच्या दृष्टीने मोलाच्या ठरल्या. मात्र गरीबांमधील अशा अनेक प्रश्नांच्या संदर्भात त्यांचा मर्यादितच उपयोग झाला. ब्रिटन व अमेरिका येथील झोपडपट्ट्यांत कुपोषण, गुप्तरोग, मद्यासक्ती अथवा औषधासक्ती व  इतर विकार व्यापक प्रमाणात होते. वस्तूंचे उत्पादन वाढले म्हणजे अखेरीस टंचाई, गरिबी व हालअपेष्टा संपुष्टात येतील, अशी एकोणिसाव्या शतकातील आर्थिक उदारमतवादी विचारसरणीची धारणा होती. यासाठी शासनासहित सुधारणा करू इच्छिणाऱ्यांनी यामध्ये मुद्दाम व सकारात्मक हस्तक्षेप करणे गरजेचे असते, हे विसावे शतक संपल्यावर स्पष्ट झाले. या कारणासाठी अनेक शरीरक्रिया वैज्ञानिक, धर्माधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक जाण असलेले नागरिक व शासकीय अधिकारी यांनी सामाजिक कार्याला बळकटी आणली. क्षयरोगाचा प्रतिबंध, व्यावसायिक जोखीम कमी करणे आणि बालकांचे आरोग्य सुधारणे यांसाठी संघटितपणे प्रयत्न सुरू झाले.

विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात (१९००–५०) सार्वजनिक आरोग्याची निगा राखण्यात विशेषतः माता व मुले तसेच शाळकरी मुले यांच्या आरोग्यरक्षणातही प्रगती झाली. या काळात सार्वजनिक आरोग्य परिचारिकेची कल्पना उदयास आली आणि स्वयंसेवी आरोग्य यंत्रणा व आरोग्य शिक्षणाचे कार्यक्रम विकसित झाले.

या काळात मोठ्या लोकसमूहाला वैद्यकीय सेवा पुरविण्याचे दोन महत्त्वाचे प्रयत्न झाले. रशियात साम्यवादी क्रांतीनंतर ग्रामीण भागांतील वैद्यकीय सेवांच्या रूपात पहिला प्रयत्न झाला. या सेवांचा विस्तार होऊन प्रत्येकाला पूर्णतया शासकीय खर्चाने वैद्यकीय व सार्वजनिक आरोग्यसेवा पुरविण्यात आल्या. यांसारखे कार्यक्रम त्यानंतर अनेक यूरोपीय व आशियाई देशांनी स्वीकारले. अनारोग्याचा प्रतिरोध करण्यासाठी आगाऊ वैद्यकीय व आर्थिक मदत देणे, हा दुसरा प्रयत्न होता. एकोणिसाव्या शतकाअखेरीस प्रथम जर्मनीमध्ये असा सामाजिक विमा सुरू झाला. तेथे वैद्यकीय सेवेसाठी अशी आगाऊ रक्कम देणे, ही रूढ झालेली गोष्ट होती. अनेक यूरोपीय देशांतही यांसारखे विम्याचे कार्यक्रम सुरू झाले.

ब्रिटनमध्ये १९०९ मध्ये ‘पूअर लॉ’ चे शाही आयोगामार्फत परीक्षण झाले. यातून एकीकृत राज्यसेवेचा प्रस्ताव पुढे आला. ही सेवा म्हणजे १९४६ च्या नॅशनल हेल्थ सर्व्हिस ॲक्ट या कायद्याची सुरुवातीची अवस्था होती. हा कायदा आधुनिक औद्योगिकीकरण झालेल्या देशाने सर्व लोकांना वैद्यकीय सेवा पुरविण्याच्या प्रयत्नांचे प्रतीक ठरला. पुढे प्रसवपूर्व काळजी घेण्याचे प्रयत्न सुरू झाले. त्यामुळे प्रतिबंधात्मक वैद्यकाला मोठा हातभार लागला. कारण आईच्या शिक्षणामुळे कुटुंबाच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर चांगला परिणाम होऊन हे शिक्षण पुढील पिढीकडे संक्रामित होई. प्रसवपूर्व काळजी घेतल्याने आईला व्यक्तिगत आरोग्यशास्त्र, आहार, व्यायाम, धूम्रपानाचे घातक परिणाम, मद्यार्काचा काळजीपूर्वक वापर व औषधाच्या गैरवापराचे दुष्परिणाम यांचे शिक्षण मिळण्याची संधी उपलब्ध झाली.

कर्करोग, हृदयविकार, रक्तवाहिनीक्लथन, फुप्फुसविकार, संधिवात व इतर रोगांकडेही सार्वजनिक आरोग्याचे लक्ष गेले. यांपैकी पुष्कळ विकारांना पर्यावरणीय घटक कारणीभूत असल्याचे पुरावे वाढत्या प्रमाणात मिळत आहेत. उदा., विशिष्ट फुप्फुस विकार व हृद्‌वाहिनीविकार आणि धूम्रपान यांच्यातील परस्परसंबंध. पर्यावरणात बदल करता आल्यास ते तत्त्वतः रोगप्रतिबंधन करण्यासारखे आहेत. आरोग्यशिक्षण हे अतिशय महत्त्वाचे असून ते देणे ही राष्ट्रीय वा स्थानिक शासकीय यंत्रणा तसेच स्वयंसेवी संस्था यांची जबाबदारी असते. सार्वजनिक आरोग्याची स्थिती वाईट असलेले देश वगळता बहुतेक सर्व देशांत आयुर्मान वाढलेले दिसते.

आधुनिक संघटनात्मक व प्रशासकीय आकृतिबंध :आंतरराष्ट्रीय संघटना : सांसर्गिक रोगाच्या प्रसाराची तऱ्हा पाहता त्याच्यापासून आरोग्यरक्षण होण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य आवश्यक असल्याचे प्राचीन काळापासून लक्षात आले आहे. यूरोपात व मध्यपूर्वेत राष्ट्रीय विलग्नवास होते.  यावरून अशा रोगांच्या नियंत्रणाचे आंतरराष्ट्रीय प्रयत्न झालेले दिसतात. पहिली अधिकृत आंतरराष्ट्रीय १८५१ मध्ये पॅरिसला भरली. नंतर अशा परिषदांची मालिका सुरू झाली. विलग्नवासाच्या आंतरराष्ट्रीय नियमावलीचा मसुदा तयार करणे, हा या परिषदांचा हेतू होता. १९०७ मध्ये पॅरिसला कायम स्वरूपाची आंतरराष्ट्रीय आरोग्य संघटना स्थापन झाली. परिषदेत भाग घेणाऱ्या देशांकडून गंभीर संसर्गजन्य रोगांविषयीची सूचना मिळविण्यासाठी या संघटनेची स्थापना झाली. नंतर ही माहिती सदस्य देशांना पुरवायची होती. तसेच तिच्यामार्फत जहाज व रेल्वे वाहतुकींमधील स्वच्छताविषयक संकेत व विलग्नवासविषयक नियमावली यांच्या अभ्यासाद्वारे त्यांचा विकास घडवायचा होता. ही संघटना अखेरीस १९४८ मध्ये जागतिक आरोग्य संघटनेमध्ये (WHO) विलीन झाली.

युद्घे आणि त्यानंतरचे परिणाम यांमुळे आरोग्य संघटनांचा उत्कर्ष व ऱ्हास झाला. पहिल्या महायुद्घानंतर राष्ट्रसंघाचा आरोग्य विभाग स्थापन झाला व दुसऱ्या महायुद्घापर्यंत त्याचे कार्य चालू होते. दुसऱ्या महायुद्घानंतर युनायटेड नेशन्स रिलीफ अँड रिहॅबिलिटेशन ॲडमिनिस्ट्रेशन ही संयुक्त राष्ट्रांची आस्थापना उभी राहिली. रोगप्रसार होऊ नये या हेतूने या आस्थापनेने विस्थापित लोकांवर उपचार केले. या आस्थापनेने नियोजनपूर्वक पाऊले टाकली. यातून जागतिक आरोग्य संघटना ही संयुक्त राष्ट्रांची खास यंत्रणा स्थापन झाली. ही संघटना केवळ रोग नाहीसे करण्यासाठी उभारली नाही, तर या संघटनेचा संबंध शारीरिक, मानसिक व सामाजिक स्वास्थ्याशीही आहे.


जागतिक आरोग्य संघटनेच्या कामांचे पुढील तीन प्रमुख गट होतात : (१) जगभरातील रोगांविषयीच्या माहितीची देवाणघेवाण करण्याचे ही संघटना प्रमुख केंद्र आहे. तिने आजार व मृत्यू यांच्या कारणांची माहिती देणारी यंत्रणा उभारली आहे. औषधांची आंतरराष्ट्रीय मान्यता असलेली मानके तिने तयार केली आहेत. प्रभावी, स्वस्त व विश्वासार्ह म्हणजे जीवनावश्यक व जीवरक्षक औषधांची यादी ही संघटना तयार करत असते. जगात अनेक संशोधन प्रकल्प पुरस्कृत करून त्यांना ती आर्थिक मदत पुरविते. (२) साथी व साथीचे रोग यांच्यासाठीच्या अनेक सामूहिक मोहिमांचा पुरस्कार संघटना करते. त्यांपैकी अनेक मोहिमांना चांगले यश मिळाले आहे. (३) सार्वजनिक आरोग्य प्रशासन व सदस्य देशांच्या सेवा बळकट व व्यापक करण्याचे प्रयत्न ती करते. त्यासाठी तांत्रिक सल्ला, सर्वेक्षण व प्रकल्पांना मार्गदर्शन करण्यासाठी तज्ञांची पथके पुरविणे आणि प्रादेशिक व राष्ट्रीय आरोग्याच्या विकास प्रकल्पांना आर्थिक मदत देऊन पाठबळ देणे ही कामे जागतिक आरोग्य संघटना करते. [⟶ जागतिक आरोग्य संघटना].

विकसित देश : विविध देशांत आरोग्य प्रशासनाच्या वेगवेगळ्या पद्घती असतात. सार्वजनिक आरोग्याच्या कामांचा एक गट करून तो एका विभागाकडे सोपवितात. म्हणजे या विभागाकडे आरोग्य व संबंधित कामांची जबाबदारी असते. ब्रिटनमध्ये ही कामे डिपार्टमेंट ऑफ हेल्थ अँड सोशल सिक्युरिटी हा विभाग करतो. अमेरिकेत सार्वजनिक आरोग्यविषयक कार्यक्रमांचे नियंत्रण डिपार्टमेंट ऑफ हेल्थ अँड ह्यूमन रिसोर्सेस हा विभाग करतो. थोडेच केंद्रीय आरोग्य विभाग सर्वव्यापी असतात. म्हणजे इतर विभागही वैद्यकीय कार्यक्रम राबवितात. कोणताही देश आपल्या सैन्यदलांच्या आरोग्यसेवा मध्यवर्ती आरोग्यसेवेकडे सोपवीत नाही. कारण मध्यवर्ती ठिकाणी एकसारखे नियंत्रण ठेवणे अव्यवहार्य ठरते. तेथे समन्वय महत्त्वाचा असतो.

समान धागा सामाईक प्रणाली  : राष्ट्रीय आरोग्यविषयक बाबींच्या प्रशासनाची जबाबदारी असलेला अधिकारी बहुधा मंत्री असतो. अग्रगण्य वैज्ञानिक, आरोग्यतज्ञ व सामाजिक नेते यांच्या कल्पना समजून घेण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय आरोग्याच्या प्रमुख प्रश्नांवरील त्यांची मते जाणून घ्यावी लागतात आणि यासाठी बऱ्याच ठिकाणी सल्लागार मंडळे असतात.

स्थानिक आरोग्यसेवा गट वैद्यकीय अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक आरोग्यसेवा पुरवितो. सामान्यपणे स्थानिक अधिकारी या गटाचा कारभार पाहतो व तो पुढील बहुतेक कामे करतो : माता-बालकांचे आरोग्य राखणे, संसर्गजन्य रोगांचे नियंत्रण, पर्यावरणाची स्वच्छता ठेवणे, सांख्यिकीय कामांसाठी नोंदी ठेवणे, लोकांना आरोग्यशिक्षण देणे तसेच सार्वजनिक आरोग्य परिचर्या, वैद्यकीय निगा व पुष्कळ वेळा शालेय आरोग्यसेवा यांची तरतूद करणे वगैरे. अशा स्थानिक गटामुळे व्यापक प्रमाणावरील सार्वजनिक आरोग्यसेवांसाठी प्रशासकीय चौकट तयार करता येते. उदा., वयस्कर, अपंग, दीर्घकाळ आजारी असलेल्या व मानसिक आरोग्य बिघडलेल्या व्यक्तींना आरोग्यसेवा पुरविणे. समाजकल्याणविषयक सेवा वेगळ्या यंत्रणेमार्फत पुरविता येऊ शकतात. मात्र आरोग्य व समाजकल्याण सेवांचे एकत्रीकरण करणे फायदेशीर ठरते. कारण एखाद्या कुटुंबाचे आरोग्य व सामाजिक समस्या परस्परांशी निगडित असतात. इंग्लंडमध्ये आरोग्यसेवांचे असे एकत्रीकरण केले आहे. मात्र अमेरिकेत या सेवा बहुधा वेगवेगळ्याच असतात. असा एक गट काहीशे किंवा काही हजार लोकांना सेवा पुरवू शकतो. विरळ वस्तीचे ग्रामीण भाग आणि दाट लोकसंख्या असलेली नगरे यांच्यापुढे अनेक वेगवेगळ्या प्रशासकीय समस्या उभ्या राहतात. उदा., स्थानिक आरोग्यसेवा स्वतंत्रपणे स्थानिक अधिकाराखाली चालवावयाच्या की, त्यांची पुनरुक्ती टाळण्यासाठी समन्वय व प्रभावी संबंध प्रस्थापित होण्याची खातरजमा करून घ्यायची, असा प्रश्न स्थानिक आरोग्यसेवांपुढे उभा राहतो.

बहुतेक देशांत वैद्यकीय निगा ही सार्वजनिक आरोग्यसेवा असते. म्हणजे एड्स, कर्करोग, मानसिक रोग, क्षय, चिरकारी विकार व तीव्र संसर्ग यांनी ग्रस्त लोकांना रुग्णालयात दाखल करण्यापुरती ही सेवा मर्यादित असते. अनेक देशांत वैद्यकीय विमा सक्तीचा आहे.

फेरबदल  : विकसित देशांतील आरोग्यसेवांच्या संघटनात व प्रशासनात आवश्यकतेनुसार फेरबदल होतात. उदा., ब्रिटनमध्ये नॅशनल हेल्थ सर्व्हिस ही संघटना आहे व त्याचबरोबर या सेवांच्या अंमलबजावणीत स्थानिक शासनाला पुरेशी स्वायत्तता दिलेली आहे. अमेरिकेत आरोग्यसेवांच्या बाबतीत स्थानिक, राज्य व केंद्र शासनांच्या जबाबदारीत बदल होताना दिसतात. तसेच यामधील खाजगी सेवांचा सहभाग मोठा आहे. तेथे आरोग्यसेवांच्या स्थानिक,  राज्य व  संघराज्य अशा पातळ्या असून खाजगी प्रयत्नही महत्त्वाचे आहेत. तेथील सेवांतर्गत  बाबी, त्यांची व्याप्ती व गुणवत्ता यांच्यात मोठे वैविध्य आढळते. या सेवा अनेक स्वतंत्र यंत्रणा पुरवितात.

विकसनशील देश : सामाईक प्रणाली  : आरोग्यनिगाविषयक प्रश्नांच्या बाबतीत कधीकधी या प्रणालीवर विकसित देशांचा प्रभाव पडलेला दिसतो, म्हणजे आफ्रिका व आशिया येथील एकेकाळच्या ब्रिटिश वसाहतींमध्ये आरोग्यनिगेविषयीच्या प्रश्नांकडे बघण्याच्या दृष्टिकोनावर ब्रिटिशांचा प्रभाव पडलेला आढळतो. अर्थात, स्थानिक गरजांनुसार तेथे निराळ्या गोष्टीही स्वीकारलेल्या आढळतात. फ्रान्स, बेल्जियम व नेदर्लंड्स यांच्या पूर्वीच्या वसाहतींतही असेच आढळते. देशादेशांत फरक असला, तरी विकसनशील देशांसाठी काहीशी आदर्श अशी प्रणाली देता येईल. खाजगी वैद्यकीय व्यवसायाचा अपवाद वगळता तेथील सर्व सेवा आरोग्य विभागाकडे असतात. या प्रणालीचे रुग्णालयविषयक, आरोग्य शिक्षण व प्रशिक्षण, संशोधन, नियोजन इ. भाग असतात. रुग्णालये व आरोग्यसेवा देशभर पसरलेल्या असतात. या प्रणालीत सर्वांत शेवटी दवाखाने असतात व त्यांत प्रशिक्षण घेतलेले एक वा दोन कर्मचारी असतात. मर्यादित प्रभावक्षेत्र असलेल्या अशा दवाखान्यांचे शक्य होईल तेव्हा पूर्ण आरोग्य केंद्रात परिवर्तन होते. अशी आरोग्य केंद्रे व तेथील कामे हा या प्रणालीचा पाया असतो. तेथे ८ ते १० वर्षे मूलभूत शिक्षण किंवा १ ते ४ वर्षे तांत्रिक प्रशिक्षण घेतलेले म्हणजे सुईण, परिचारिका, स्वच्छता तज्ञ व वैद्यकीय साहाय्यक हे कर्मचारी असतात. वैद्यकीय साहाय्यकाचे रोगनिदान व उपचार यांविषयीचे प्रशिक्षण झालेले असते. आपल्या आवाक्याबाहेरील रोगी तो चिकित्सकाकडे पाठवितो. आरोग्य केंद्राची सुविधा १० ते १५ हजार लोकांसाठी असते तर जिल्हा रुग्णालय १ ते २ लाख लोकांसाठी असते आणि याची सर्व जबाबदारी जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्याची असते. तो आरोग्यविषयक प्रश्नांचे बहुव्यापक कार्यक्रमात संकलन करतो. त्याच्या मदतीला व्यावसायिक व साहाय्य करणाऱ्या व्यक्ती असतात. साहाय्यक साधे प्रश्न सापेक्षतः मोठ्या प्रमाणावर हाताळतो.


जिल्हा रुग्णालय प्रादेशिक रुग्णालयावर अवलंबून असते. अधिक खास प्रकारच्या सेवांसाठी गुंतागुंतीचे रुग्ण प्रादेशिक रुग्णालयाकडे सोपवितात. प्रादेशिक आरोग्य व रुग्णालय सेवांना प्रशासनविषयक मार्गदर्शन प्रादेशिक वैद्यकीय अधिकारी करतो. संपूर्ण आरोग्यसेवांविषयीची धोरणे व मार्गदर्शन ही कामे विभागाच्या मध्यवर्ती प्रशासनाकडे असतात. काही बाबतींत हे मध्यवर्ती प्रशासन नियोजन गटाचीही तरतूद करते.

दीर्घ अंतरावर वाहतूक व संदेशवहन, कर्मचारी व इतर साधनसंपत्ती यांची कमतरता असते. तसेच कर्मचाऱ्यांना घडविणे व त्यासाठी त्याला उद्युक्त करणे यांतही अपुरेपणा असतो. या समस्यांमुळे या प्रणालीत गैरकारभार येतो. तथापि, आफ्रिका व आशिया खंडांतील देशांमध्ये विकसित झालेल्या आरोग्यसेवांमुळे सर्वसाधारणपणे राष्ट्रीय विकासाच्या चौकटीतील भावी विकासाला भक्कम आधार मिळतो.

फेरबदल  : दक्षिण अमेरिकेतील देशांमधील सार्वजनिक आरोग्यसेवांची व्यवस्था आशिया-आफ्रिकेतील देशांपेक्षा पुष्कळच वेगळी आहे. कारण तेथील ऐतिहासिक पार्श्वभूमी भिन्न आहे. दक्षिण अमेरिकेतील देश सर्वसाधारणपणे अधिक संपन्न आहेत तसेच तेथील खाजगी वैद्यकीय सेवा अधिक व्यापक आहे. शिवाय तेथील खाजगी किंवा स्वयंसेवी यंत्रणा अधिक कार्यतत्पर आहेत. मुख्य आरोग्यसेवा मोठ्या प्रमाणात स्थानिक व राष्ट्रीय प्रशासने पुरवितात. तेथील अनेक देशांतील कामगारांसाठीच्या दवाखान्यांचा व रुग्णालयांचा आर्थिक भार मालक व कामगार उचलतात. तेथील आरोग्य केंद्रे, रुग्णालये, प्रतिबंधात्मक सेवा इत्यादींमार्फत आरोग्यसेवांची झालेली विभागणी स्थूलपणे आशिया-आफ्रिका खंडांसारखी आहे. दक्षिण अमेरिकेत साहाय्यकारी संस्थांचा वापर कमी केला जातो. आरोग्यविषयक नियोजनाच्या पद्घतीच्या विकासाच्या बाबतीत दक्षिण अमेरिकी देश आघाडीवर आहेत.

थायलंड हा देश कधीच कोणाची वसाहत नसल्याने तेथील आरोग्यविषयक व्यवस्थेवर वा प्रणालीवर कोणताही प्रभाव पडलेला दिसत नाही. थाई आरोग्य विभागाची शहरी व ग्रामीण जनतेसाठी असलेल्या आरोग्य केंद्रांची व रुग्णालयांची एक प्रणाली देशभर विकसित झाली आहे. तेथे ग्रामीण भागांत डॉक्टर व परिचारिका यांची संख्या अत्यल्प आहे. असे असले तरी वैद्यकीय निगा राखण्यासाठी साहाय्यकारी संस्थांचा वापर या देशांत केला जात नाही, हा येथील आरोग्य प्रणालीचा वेगळेपणा आहे. मात्र ग्रामीण भागांत सुईणी व स्वच्छता साहाय्यक यांची सेवा उपलब्ध आहे.

आरोग्य समस्या व अडथळे  : विकसनशील देशांत लोकांना आरोग्यसेवा पुरविण्याच्या कामात अनेक अडचणी येतात आणि त्यांच्यामध्ये अनेक परस्पर निगडित प्रश्न उद्‌भवतात. रोगांचे धोके व आरोग्यविषयक जोखमी यांचे स्वरूप, अपुरी व सदोष साधनसंपत्ती, आरोग्य प्रणालीचा आराखडा आणि या प्रणालीतील आरोग्य सेवकांचे शिक्षण यांतून हे प्रश्न निर्माण होतात. विकसनशील देशांतील आरोग्य कार्यक्रमांवरून बेतलेले कार्यक्रम आणि त्यांमध्ये राष्ट्रीय व कौटुंबिक पातळ्यांवर होणारी गुंतागुंत हे झपाट्याने वाढत असणाऱ्या लोकसंख्येशी निगडित असलेले तणाव आहेत.

वेगवेगळ्या देशांतील रोग, ते आढळण्याची त्वरा व रुग्णांचे वयोगट यांत भेद आढळतात. काही देशांतील लोकांचे आयुर्मान हे अन्य काही देशांच्या तुलनेत बरेच कमी असते. विकसनशील देशांतील बालमृत्यूंचे प्रमाण उच्च असणे हे यामागील प्रमुख कारण असते. अतिसार, श्वसन मार्गाचा व श्वसन मार्गाद्वारे होणारा जंतुसंसर्ग व कुपोषण ही विकसनशील देशांतील बालकांच्या आजारांची व मृत्यूची प्रमुख कारणे आहेत. या कारणांचा तेथील संस्कृती, रीतिरिवाज व आर्थिक परिस्थिती यांच्याशी निकटचा संबंध असतो. अनारोग्यकारक परिसर व साधे दुर्लक्ष वा हेळसांड यांतून मुलांचे नुकसान होते. अन्नविषयक रीतिरिवाजांमुळे कुपोषण निर्माण होऊ शकते. जठर व आतडी यांच्या अस्तरांचा दाह म्हणजे जठरांत्रदाह हा विकार होय. या विकाराबरोबर सामान्यपणे अतिसार असतो. जठरांत्रदाह व श्वसन संस्थेचा संसर्ग हे विकार पुष्कळदा प्रतिजैव पदार्थांना दाद न देणाऱ्या संसर्गकारी जीवाणूंमुळे उद्‌भवतात आणि यांच्यातील परस्परसंबंधांमुळे त्यांच्यावरील उपचारांमधील गुंतागुंत वाढते. यामागेही पुष्कळ वेळा कुपोषण हे कारण असते. कुपोषणामुळे शारीरिक व मानसिक विकास कुंठित होण्यासारखी प्रत्यक्ष हानी तर होतेच, शिवाय यामुळे इतर आजारांसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होते. कुपोषित मुलाला जठरांत्रदाह होतो, ते काही खाऊ शकत नाही, यामुळे आणखी अशक्तपणा येतो व नंतर निर्जलीकरण होते. अशक्त मूल फुप्फुसदाह (न्यूमोनिया) यासारख्या मारक संसर्गाला बळी पडू शकते किंवा संसर्गामुळे त्याच्या शरीरातील प्रथिनाच्या चयापचयावर वाईट परिणाम होऊन कुपोषणाचे दुष्ट चक्र पूर्ण होते.

गरीब व मोठ्या कुटुंबात जन्मलेल्या मुलांमध्ये कुपोषणामुळे बालके अकाली मृत्यू पावू शकतात किंवा त्यांच्यात अपंगत्व येऊ शकते. परिणामी बालकांच्या मृत्युसंख्येचे प्रमाण वाढते. यातून पालकांची अधिक मुले होऊ देण्याची प्रवृत्ती वाढते. अशा प्रकारे जननक्षमता-मरणशीलता हे चक्र सुरू होते. या चक्रात उच्च जननक्षमतेमुळे गरीब कुटुंबात लहान मुलांची संख्यावाढ होते. यामुळे बालमृत्यूचे प्रमाण वाढते व पर्यायाने उच्च जननक्षमतेला प्रोत्साहन मिळते. लोकसंख्येच्या नियंत्रणाच्या कार्यक्रमात बालकांमधील अनावश्यक मृत्यू कमी करण्याचे विश्वासार्ह उपाय अंतर्भूत केले जातात.

साधनसंपत्तीच्या मर्यादा व प्रशिक्षित व्यक्तींची कमतरता हे या संबंधातील महत्त्वाचे विषय आहेत. वैद्य, परिचारिका, आरोग्यसेवक आणि रुग्णालयातील खाटांची संख्या यांचे लोकसंख्येशी असलेले प्रमाण पाहिल्यास यातील त्रुटी किती गंभीर आहेत, हे लक्षात येते. तसेच विविध देशांमध्ये याबाबतींत किती मोठी तफावत आहे, याची कल्पना यांवरून येते. विकसनशील देशांच्या बाबतीत लोकसंख्येशी असलेले वैद्यांचे प्रमाण खूपच अपुरे असल्याचे यांवरून दिसते.

आरोग्य सेवेचा दर्जा राखण्याच्या व वाढविण्याच्या कामात पैसा महत्त्वाचा असतो. किती लोकांना शिक्षण देणे शक्य होईल, यांपैकी किती जण प्रत्यक्ष कामासाठी उपलब्ध होऊ शकतील आणि त्यांना लागणारी साधनसंपत्ती उपलब्ध करून देण्याची क्षमता या गोष्टी पैशाने ठरतात. आरोग्यविषयक कामांवर होणाऱ्या शासकीय खर्चात विविध देशांत खूप मोठी तफावत असलेली आढळते.

जनतेला आरोग्यसेवा पुरविताना शासन पुढील तीन प्रकारचे प्रयत्न करते : प्रसूती व तातडीच्या शस्त्रक्रिया यांसारखे गुंतागुंतीचे प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक असलेल्या रुग्णालयीन सेवेची तरतूद करणे गरज असूनही आरोग्यसेवा मिळत नाही अशा लोकांचा घरोघरी व समाजामध्ये जाऊन शोध घेणे तसेच कुपोषण व जठरांत्रदाह या विकारांची कारणे शोधणे.

आरोग्याशी निगडित व्यक्तींचे शिक्षण  : यात विशिष्ट बाबी पुढे येतात. साहाय्य करणाऱ्या लोकांसाठी असलेले शैक्षणिक कार्यक्रम स्थानिक परिस्थितीशी निगडित असतात. तर वैद्यकीय व परिचर्याविषयक शिक्षण हे अधिक प्रगत देशांतील शिक्षणासारखे असते. हे शिक्षण घेणारे विद्यार्थी स्वतःच्या देशापेक्षा औद्योगिकीकरण झालेल्या देशांत काम करण्याच्या दृष्टीने अधिक चांगले ठरतात. शिक्षण व प्रत्यक्ष करावयाचे काम यांत अशी विसंगती असू शकते. आरोग्यसेवांच्या प्रणालीतील निरर्थकता आणि व्यावसायिक व्यक्तींचे अधिक प्रगत देशांत होणारे स्थलांतरण या गोष्टींना बहुधा ही विसंगती मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरते.


सार्वजनिक आरोग्यविषयक प्रगती :विकसित देश : विकसित देशांत पुढील बाबी आढळतात :

राष्ट्रीय सरकारांची वाढती बांधिलकी व सहभाग  : पर्यावरणाची स्वच्छता, गरीबांचे वैद्यकीय निगेसाठी असलेले विलग्नवास आणि संसर्गजन्य रोगांचे नियंत्रण या आरोग्यविषयक मूलभूत प्रश्नांशी शासनाचा संबंध येत असे. संपूर्ण समाजाला व्यापक आरोग्यसेवा पुरविण्याच्या हेतूने घर, दवाखाना व रुग्णालय येथील वैद्यकीय आरोग्यसेवांच्या क्षेत्रांत शासनांनी हळूहळू आपली कामे व्यापक केली. याकरिता पुढील तीन घटकांचा प्रभाव कारणीभूत ठरला : खाजगी स्वयंसेवी संस्थांना वैद्यकीय सेवेचा खर्च भागविणे अशक्य झाले आजारांमुळे एखाद्या देशाला सोसावे लागणारे आर्थिक नुकसान वाढले आणि सामाजिक सेवांमध्ये शासनाचा सहभाग वाढावा ही नागरिकांची अपेक्षा निर्माण झाली. आरोग्य व समाजकल्याण ही क्षेत्रे परस्परपूरक अशी मानतात आणि सार्वजनिक कायदे तयार करताना या दोन्ही क्षेत्रांची दखल घेतात. यामुळे आरोग्य व समाजकल्याण या सेवांमध्ये निकटचे सहकार्य असावे, असा शासनाचा कल असतो.

प्रतिबंधक्षम रोगांविषयी बदलती संकल्पना  : पूर्वी प्रतिबंधक्षम रोग ही संज्ञा संसर्गजन्य रोगांपुरतीच मर्यादित होती. नंतर मात्र तिला अधिक व्यापक स्वरूप प्राप्त झाले. कारण रोगपरिस्थितिवैज्ञानिक पद्घती इतर परिस्थितींतही वापरल्या जाऊ लागल्या. कर्करोग, संधिवात, हृद्‌वाहिनी विकार, इतर चिरकारी विऱ्हासी रोग आणि अपघात या व्यापक पल्ल्यातील जोखमींशीही आता प्रतिबंधात्मक आरोग्यसेवांचा संबंध येतो.

प्रतिबंध व वैद्यकीय निगा यांच्याविषयीच्या सेवांचे एकत्रीकरण  : आजारी माणसाची काळजी घेणे ही सेवा मानवतावादी उद्देशातून पुढे आलेली आहे, तर प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा ह्या साथीच्या रोगांपासून आरोग्यसंपन्न पर्यावरणाचे रक्षण करण्याच्या गरजेतून पुढे आल्या. यामुळे या सेवांचा विकास वेगवेगळ्या पद्घतींनी झाला मात्र आता त्यांचे एका व्यापक आरोग्यसेवेत एकत्रीकरण करण्याची प्रवृत्ती वाढत आहे. असे एकत्रीकरण हे पूर्वीच्या सोव्हिएट युनियनमधील सार्वजनिक आरोग्यविषयक कल्पनेचे एक प्रमुख तत्त्व होते. तेथे सर्व स्थानिक आरोग्यसेवा जिल्हा रुग्णालयामध्ये एका प्रशासकीय पद्घतीत एकत्र केल्या जात होत्या. यूरोपीय देशांतील, विशेषतः ग्रामीण भागांतील या दोन शाखा स्थानिक वैद्यकीय व्यावसायिकांनी एकत्र आणल्या. वैद्यकीय सेवांविषयक चर्चा करताना आरोग्यसेवांतर्गत कर्तव्यांवर लक्ष केंद्रित केलेले आढळते.

अधिक चांगल्या मानसिक आरोग्याबाबतच्या तरतुदी  : मानसिक आरोग्याला आता प्रतिबंधात्मक आरोग्यसेवांमध्ये स्थान मिळाले आहे. मानसिक आरोग्य यंत्रणांमध्ये पुढील सुधारणा होत आहेत : बाह्यरुग्ण सेवेची सोय करणे, मानसिक रोग सुरुवातीच्या अवस्थेत असताना रुग्णाला सर्वसाधारण रुग्णालयात दाखल करण्याची सोय करणे, बालकांना व विवाहितांना मार्गदर्शन करणारे समुपदेशन केंद्रे चालविणे तसेच मद्यासक्तीने वा औषधासक्तीने ग्रस्त अशा रुग्णांची काळजी घेण्यासाठी योजना तयार करणे. समाजाशी जुळवून घेऊ न शकणाऱ्या व्यक्तींवर करावयाच्या उपचारपद्घतीत मोलाची प्रगती झाली आहे. शिवाय मानसमज्जाविकृती (सायकोन्यूरोसेस) समजून घेणाऱ्या सर्वसाधारण वैद्यकीय व्यावसायिकांच्या संख्येत वाढ झाली आहे तसेच संशोधनविषयक सुविधांमध्ये प्रगती झाली आहे.

आरोग्यशिक्षणावर वाढत्या प्रमाणात देण्यात येणारा भर  : अनेक देशांनी आरोग्यशिक्षणाविषयीची आपली बांधिलकी व्यापक केली आहे. यासाठी त्यांनी सामान्यपणे स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य घेतले आहे. विशेषेकरून शाळेसारख्या स्थानिक पातळीवर सर्वांत प्रभावशाली काम झाले आहे. प्रतिबंधात्मक आवश्यक आरोग्यसेवा या दृष्टीने आरोग्यशिक्षणाचा विस्तार करण्याकडे कल वाढत आहे. 

जैव सांख्यिकीय व रोगपरिस्थितिवैज्ञानिक दिशा : आरोग्यसेवांचे नियोजन, प्रशासन व मूल्यमापन करण्यासाठी सांख्यिकीय सेवा आवश्यक असते. वैद्यकीय निगाविषयक योजनांमध्ये शासकीय अधिकारी रस घेऊ लागल्याने पुढील गोष्टींमधील सांख्यिकीचे महत्त्व वाढले : रोग उद्‌भवण्याच्या घटना व इतर प्रश्न तसेच त्यांचा मुकाबला करण्यासाठी आवश्यक असलेले रोगपरिस्थितिवैज्ञानिक उपाय व यांविषयीची सांख्यिकीय माहिती. वैद्यकीय निगेच्या योजनांचे नियोजन, संघटन व मूल्यमापन याबाबतींत या दोन्ही गोष्टी अत्यावश्यक आहेत. परंपरागत पद्घतीत रोगपरिस्थितिविज्ञानाची पद्घत संसर्गजन्य रोगांसाठी वापरीत परंतु असांसर्गिक रोग व वैद्यकीय निगेचे प्रश्न यांच्यासाठीही ही पद्घत आता वाढत्या प्रमाणात वापरली जात आहे.

वयस्कर लोकांमुळे होणारे फेरबदल  : अधिक समृद्घ देशांत वृद्घांची संख्या वाढत आहे. यामुळे त्यांच्यासाठी सार्वजनिक आरोग्यसेवा-सुविधांमध्ये खास सेवांची तरतूद करणे आवश्यक झाले आहे. त्यांच्या आरोग्यनिगेमध्ये पुढील गोष्टी येतात : अकाली प्रौढत्वाचा, चिरकारी व विऱ्हासी रोगांचा प्रतिबंध करणे तसेच एकटेपण व निष्क्रिय असणे यांतून उद्‌भवणाऱ्या समस्यांचा मुकाबला करणे. यांविषयीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वृद्घांसाठीचे दवाखाने उघडले आहेत. तेथे वृद्घांमध्ये होणारे शारीरिक व शरीरक्रियावैज्ञानिक बदल आणि त्यांचे रोग यांवर उपचार करतात.

पर्यावरणाच्या गुणवत्तेची निगा  : पर्यावरणाच्या ऱ्हासाविषयी व्यापकपणे काळजी व्यक्त केली जात आहे. नियंत्रित आणवीय प्रारणामुळे आरोग्याला नवीन धोके निर्माण झाले आहेत. उदा., किरणोत्सर्गी उत्सर्जनाद्वारे हवेचे व पाण्याचे होणारे संभाव्य प्रदूषण, किरणोत्सर्गी अवपाताचे सर्वसामान्य व्यक्तीवर होणारे संभाव्य परिणाम आणि उद्योगाच्या आस्थापनांधील कर्मचाऱ्यांना असणारा किरणोत्सर्गाचा धोका. वाढत्या लोकसंख्येमुळे औद्योगिक व व्यावसायिक कामे वाढतात. यामुळे वातावरण, नद्या, सरोवरे व महासागर यांमध्ये संभाव्य धोकादायक प्रदूषक पदार्थांची भर पडून त्याचे निसर्गाच्या परिस्थितिविज्ञानावर विनाशक परिणाम होतात. पर्यावरणीय ऱ्हास नियंत्रित करण्यासाठी विविध देश व्यक्तिगत पातळीवर उपाय योजीत आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय नियमांद्वारे त्यावर उपाय योजले जात आहेत.


विकसनशील देश : या देशांतील अनेक गंभीर आरोग्य समस्या तसेच त्या सोडविण्यासाठी लागणाऱ्या साधनसंपत्तीच्या कमतरतांमुळे तेथे आरोग्यविषयक प्रगती होताना पुढील समस्या उद्‌भवतात : 

संसर्गजन्य रोगांचे नियंत्रण  : देवी, हिवताप, कुष्ठरोग व पोलिओ या रोगांवर जगभर चांगले नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. यांव्यतिरिक्त इतर कोणत्याही संसर्गजन्य आजारांच्या फैलावावर युद्घपातळीवर प्रयत्न करून नियंत्रण मिळविण्यात येते.

उपायाची प्रतीक्षा असलेल्या रोगांविषयीच्या समस्या  : नियंत्रणाखाली आलेल्या रोगांच्या परिणामकारक औषधांना दाद न देणाऱ्या सूक्ष्मजंतू, सूक्ष्मजीव व व्हायरसांच्या नव्या जाती हे सार्वजनिक आरोग्यापुढील सर्वांत गंभीर आव्हान आहे. गुप्तरोगांचा प्रश्न जुना असून ते वाढत्या प्रमाणात आढळत आहेत. परजीवींमुळे होणाऱ्या नवनवीन रोगांचा प्रसार झालेला आढळतो. कारण माणसाने त्यांच्या पर्यावरणात बदल घडवून आणले. उदा., सिंचनाची सोय असलेल्या व मानवनिर्मित सरोवरांच्या क्षेत्रांत आढळणाऱ्या सिस्टोसोमिॲसिस या रोगाची वाढ झाली. व्यापक प्रमाणातील कुपोषण, विशेषतः बालकांमधील प्रथिनकॅलरीविषयक कुपोषण ही समस्या सुटायची राहिली आहे. या कुपोषणाचा मुकाबला करण्यासाठी प्रथिनांनी समृद्घ असलेल्या पूरक अन्नाचा पुरवठा व अधिक प्रभावशाली शैक्षणिक कार्यक्रम यांचा विकास करण्यात येत आहे.

कौटुंबिक आरोग्य  : जलदपणे वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे आरोग्यविषयक प्रयत्नांवर कौटुंबिक व राष्ट्रीय पातळीवर मोठे दुष्परिणाम होत आहेत. माता-बालकाचे आरोग्य, मानवी प्रजोत्पादन व आनुवंशिकी यांच्याविषयीचे प्रश्न हे अधिक मोठ्या समस्येतील प्रश्न आहेत. यानुसार कौटुंबिक आरोग्याला सार्वजनिक आरोग्यसेवांमध्ये उच्च प्राधान्य देणे गरजेचे असते.

आरोग्यविषयक मनुष्यबळ  : आरोग्याशी निगडित कर्मचाऱ्यांची संख्या व त्यांचे शिक्षण याबाबतींत मोठी तफावत आहे. त्यांचे शिक्षण व त्यांचे कार्यक्षेत्र असलेली आरोग्यसेवा यांच्यामध्ये समन्वय साधण्याचे प्रयत्न होत आहेत. यासाठी शैक्षणिक संस्था व आरोग्यसेवा पुरविणाऱ्या यंत्रणा यांच्यामध्ये निकटचे परस्परसंबंध असणे आवश्यक आहे.  

बहुव्यापक सार्वजनिक आरोग्यसेवा  : एकाच रोगाशी निगडित असलेले कार्यक्रम आणि रोगनिवारण्याच्या व प्रतिबंधाच्या अलग अलग असलेल्या सेवा यांच्यामुळे पूर्वीच्या आरोग्यसेवा विखंडित स्वरूपाच्या होत्या. त्यांचे संघटन करण्याऐवजी आरोग्यसेवांच्या अधिक बहुव्यापी प्रणाली पुढे येत आहेत. आरोग्याचा पुरस्कार, रोगाचा प्रतिबंध व रुग्णाला बरे करून त्याचे पुनर्वसन करणे या गोष्टी एकत्रित सेवांच्या एका जाळ्यात आणले असून हे जाळे पूर्ण समाजाच्या दृष्टीने निर्माण केलेले असते.

राष्ट्रीय आरोग्य नियोजन : आरोग्यसेवांविषयीच्या मर्यादित साधनसंपत्तीची वाटणी असंख्य लोकांमध्ये करताना याविषयी निर्णय घेणाऱ्यांसमोर गुंतागुंतीची परिस्थिती निर्माण होते. परिणामी आरोग्यविषयक नियोजनाची प्रक्रिया तसेच अधिक प्रभावशाली आरोग्यसेवा प्रणालींचा आराखडा तयार करण्याची क्रिया या गोष्टींवर अधिकाधिक भर दिला जातो. अनेक देशांच्या आरोग्य विभागांत किंवा राष्ट्रीय नियोजन संघटनेत आरोग्यविषयक नियोजन करणारे गट निर्माण झाले आहेत. यामुळे सार्वजनिक आरोग्यविषयक कार्यक्रमांचे नियोजन, अंदाजपत्रक, अंमलबजावणी व मूल्यमापन यांमध्ये निकटचा समन्वय साधणे ही राष्ट्रीय आरोग्य नियोजनातील महत्त्वाची बाब झाली आहे.

भारत : ‘भारतीय जनतेच्या राहणीमानाचा दर्जा वाढवावा, तिचे सुपोषण साधावे आणि सार्वजनिक आरोग्यही सुधारावे’ हे भारतीय शासनाचे प्राथमिक कर्तव्य असल्याचे भारतीय संविधानातच नमूद केले आहे. हे मार्गदर्शक तत्त्व प्रत्यक्षात आणण्यासाठी सार्वजनिक आरोग्यविषयक प्रश्नाला शासनाने योग्य तो अग्रक्रम दिला आहे. भारतीय दंडसंहितेच्या चौदाव्या प्रकरणात सार्वजनिक आरोग्याविषयी तरतुदी आहेत. तसेच आरोग्याच्या जोपासनेसाठी काही अधिनियमही केलेले आहेत. [⟶ आरोग्य अधिनियम].

सार्वजनिक आरोग्य ही बाब मुख्यतः राज्य सरकारांच्या अखत्यारीतील आहे. असे असले तरी आरोग्याची पातळी सुधारावी म्हणून केंद्र शासन राज्यांना योग्य ते मार्गदर्शन करते. तसेच केंद्र शासन सार्वजनिक आरोग्यविषयक विविध योजना आखून त्यांच्यासाठी उचित अर्थसाहाय्यही करते. केंद्रीय आरोग्य व समाजकल्याण मंत्रालय राज्य सरकारांच्या याविषयीच्या कार्यांचा समन्वय साधते आणि त्याच्यावर नियंत्रणही ठेवते. या मंत्रालयाची आरोग्यविषयक धोरणे व विविध योजना आखण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंडळ मार्गदर्शन करते.  

भारताच्या दहाव्या पंचवार्षिक योजनेच्या काळात आरोग्याच्या जोपासनेविषयीची धोरणे व उपाययोजना यांमध्ये अनेक स्थित्यंतरे घडून आलेली आहेत. आरोग्यविषयक आधारभूत यंत्रणा सुधारणे आणि आरोग्यविषयीच्या लोकांच्या गरजा जाणून घेणे यांबाबतीत या काळात व्यापक सुधारणा करण्याचे ठरविण्यात आले आणि त्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा, असेही ठरले. रुग्णावस्था व मर्त्यता (रुग्णांतील मृत्युसंख्येचे प्रमाण) कमी करण्यासाठी काही रोगांच्या संबंधातील अनेक उपक्रम हाती घेण्यात आले. राष्ट्रीय किमान समान कार्यक्रमामध्ये नऊ क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले असून आरोग्य जोपासना हे त्यांपैकी एक क्षेत्र आहे. या काळातील सामाजिक-आर्थिक विकासाच्या एकूण उपाययोजनांमध्ये आरोग्यातील सुधारणा हा एक महत्त्वाचा घटक मानलेला आहे. राष्ट्रीय कार्यक्रमांत आरोग्य विभागाकडे खास लक्ष दिले आहे. आरोग्य व कुटुंबकल्याण यांच्यासाठी तयार केलेल्या कार्यक्रमांचा हा गाभा आहे. राष्ट्रीय कार्यक्रमाचा आदेश प्रत्यक्षात आणण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन अतिशय महत्त्वाचे काम करते. आरोग्य व कुटुंबकल्याणविषयक चालू कामांचा हे मिशन पाठपुरावा करते. स्वच्छता व आरोग्यशास्त्र, पोषण व पिण्याचे सुरक्षित पाणी हे चांगले आरोग्य निश्चित करणारे मूलभूत घटक आहेत, या दृष्टीनेही हे मिशन विचार करते. विकेंद्रित नियोजन, अस्तित्वात असलेल्या आधारभूत यंत्रणा बळकट करणे, लवचिक वित्तपुरवठा, समाजाचा सहभाग, मनुष्यबळ विकास व अशासकीय संघटनांबरोबर सहकार्य करणे इ. मोक्याचे उपाय हे मिशन योजते. आई व बालक यांच्या आरोग्याला राष्ट्रीय कार्यक्रमांत मूलभूत महत्त्व देऊन प्रोत्साहन दिले आहे.

देशातील विविध भागांत आरोग्यविषयक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजनेद्वारे शासनाने पुढाकार घेतला आहे. मनुष्यबळाच्या विकासातील असमतोल कमी करण्याचे काम या योजनेमार्फत होईल, अशी अपेक्षा आहे. त्यासाठी वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करून त्यांच्यामार्फत आरोग्य जोपासनेविषयीच्या सेवा पुरविण्यात येतील.

संसर्गजन्य व असंसर्गजन्य रोगांच्या भावी संकटाचे भय लक्षात घेऊन आरोग्य व कुटुंबकल्याण विभाग देशभर राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम राबवितो. असे कार्यक्रम अंधत्व, एड्स, मानसिक विकार इत्यादींच्या निवारणासाठी असतात. आरोग्य जोपासना, वैद्यकीय शिक्षण व संशोधन यांमध्ये गुंतलेल्या मध्यवर्ती संस्था व संघटना पुढे उद्‌भवणाऱ्या रोगांविषयीचे प्रश्न हाताळण्यासाठी सतत बळकट केल्या जात असतात.


विसाव्या शतकाच्या अखेरच्या दशकापासून भारतातील लोकांची सर्वसाधारण आरोग्यविषयक परिस्थिती मोठ्या प्रमाणात सुधारली. उदा., १९९१ मध्ये पुरुषांचे सरासरी आयुर्मान ५९·७ तर स्त्रियांचे ६०·९ वर्षे होते, ते २००८ मध्ये अनुक्रमे ६३·७ व ६६·९ वर्षे एवढे वाढले. तसेच या कालावधीत अर्भकांच्या मृत्यूचे प्रमाण, अकाल प्रसूतीचे प्रमाण व प्रसूतीत होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण यांच्यामध्ये घट झाली. विशेषेकरून कुष्ठरोग व क्षयरोग यांसारख्या संसर्गजन्य रोगांच्या बाबतीत आखलेली धोरणे पुरेशी यशस्वी झाली. संसर्गजन्य रोगांमुळे येणारे आजारपण, असंसर्गजन्य रोगांचा वाढता ताण व पोषणाविषयीचे प्रश्न यांच्याकडे अधिक लक्ष दिले जात आहे. लोकसंख्येत होणारी वाढ मर्यादेत ठेवणे हाही एक मुख्य प्रश्न समोर आहे. 

नॅशनल व्हेक्टर बोर्न डिसीज कंट्रोल प्रोग्रॅमचे संचालनालय ही सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या रोगांचा प्रतिबंध व नियंत्रण करण्यासाठी असलेली प्रमुख राष्ट्रीय यंत्रणा आहे. हिवताप, काळा आजार, हत्ती रोग, जपानी एन्सेफॅलिटिस (मस्तिष्कशोथ), डेंग्यू किंवा डेंग्यू रक्तस्रावी ज्वर, चिकुनगुन्या, क्षयरोग, कुष्ठरोग, स्वाइन फ्ल्यू, अंधत्व व एड्स या रोगांच्या प्रतिबंधाचे व नियंत्रणाचे काम सदर संचालनालय करते.

भारतातील आरोग्यशिक्षण व आरोग्यसंवर्धन ही कामे सेंट्रल हेल्थ एज्युकेशन ब्यूरो या विभागाने ६ डिसेंबर १९५६ रोजी सुरू केली व त्याची पुढील उद्दिष्टे आहेत:(१) आरोग्य व कुटुंबकल्याण विभागाच्या योजना, कार्यक्रम व कामगिरी यांचा खुलासा करणे. (२) आरोग्यवर्तन, आरोग्यशिक्षणाची प्रक्रिया व साहाय्य यांविषयी आराखडा तयार करणे, मार्गदर्शन करणे आणि संशोधन करणे. (३) देशातील आरोग्यविषयक विविध प्रश्न व कार्यक्रम यांसाठी लागणाऱ्या आरोग्य संवर्धन व शिक्षण यांविषयीच्या साहित्याचे आद्य नमुने तयार करणे व त्यांचे वाटप करणे. (४) आरोग्यशिक्षण व संशोधन पद्घती यांमध्ये आरोग्य व समाजकल्याणविषयक काम करणाऱ्या निष्णात मंडळींना प्रशिक्षण देणे आणि प्रशिक्षणाचे प्रभावी पद्घतिशास्त्र व साधने यांचा विकास करणे. (५) शाळेतील मुलांच्या आरोग्यशिक्षणासाठी शाळा व शिक्षकांच्या प्रशिक्षण संस्था यांना मदत करणे. (६) राज्य, जिल्हा व इतर पातळीवर काम करणाऱ्या आरोग्यशिक्षण गटांच्या कार्याला व संघटित प्रणालीला मार्गदर्शक सूचना करणे. (७) आरोग्यशिक्षणाच्या कामात गुंतलेल्या अधिकृत व अनधिकृत यंत्रणांना तांत्रिक मदत देणे व त्यांच्या कार्यात समन्वय साधणे. (८) आरोग्यशिक्षणविषयक कार्याच्या संवर्धनासाठी आंतरराष्ट्रीय यंत्रणांशी सहकार्य करणे.

सदर ब्यूरो पुढील महत्त्वाची कामे करतो : विविध पातळीवर काम करणाऱ्या आरोग्य व आरोग्येतर व्यावसायिकांना ब्यूरो अल्पकालीन व दीर्घकालीन प्रशिक्षण कार्यक्रमांची माहिती देतो. आरोग्यशिक्षणविषयक दोन वर्षांच्या पदव्युत्तर पदविकेचा अभ्यासक्रम ब्यूरो चालवितो. वैद्यकीय अधिकारी, परावैद्यकीय (वैद्यकबाह्य) कर्मचारी, शैक्षणिक क्षेत्रातील निष्णात प्रशिक्षक, देशातील वैद्यकीय तसेच परिचारिका महाविद्यालये येथील पदवीपूर्व व पदव्युत्तर अभ्यासक्रम करणारे विद्यार्थी यांच्यासाठी अल्पकालीन म्हणजे सामान्यपणे एका आठवड्याचे अभ्यासक्रम असतात. आरोग्यशिक्षण व आरोग्यसंवर्धन यांचे अल्पकालीन अभ्यासक्रमही या ब्यूरोमार्फत घेतले जातात.

भिन्न प्रकारच्या आरोग्यविषयक बाबींवरील आरोग्यशिक्षण व आरोग्य-संवर्धन यांविषयीच्या मूळ नमुन्याच्या स्वरूपातील साहित्य ब्यूरोमार्फत तयार केले जाते. उदा., जाहिराती, पत्रके पुस्तिका, दृक्‌श्राव्य साहित्य, छापील व इलेक्ट्रॉनीय माध्यमांतील साहित्य इ. तसेच प्रसंगविशेषी वर्तमानपत्राचे अंक ब्यूरो काढतो किंवा वर्तमानपत्रात जाहिराती देतो. गरीब व गरजू लोकांना आर्थिक मदत करण्यासाठी १९९७ मध्ये राष्ट्रीय आरोग्य निधी स्थापन केला आहे.

दुर्गम भागांत राहणाऱ्या, सर्वांत गरीब अशा ग्रामीण व्यक्तीला सहजसाध्य, परवडणारी व विश्वासार्ह उत्तम आरोग्यसेवा देण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन १२ एप्रिल २००५ रोजी सुरू झाले. पाणी, स्वच्छता, शिक्षण, पोषक आहार, सामाजिक व लैंगिक समानता या आरोग्याशी संबंधित असलेल्या बाबींच्या संबंधातील कृती मिशन एकाच वेळी करण्याचा प्रयत्न करते. भारतातील सार्वजनिक आरोग्याची परिस्थिती कशी आहे हे जाणण्यासाठी अनेक स्वतंत्र सर्वेक्षणे व अभ्यास केले जातात. त्यांवरून मिशनने केलेल्या प्रगतीचा आढावा घेतात. यातून आरोग्य निदर्शकांसंबंधीच्या पुढील महत्त्वपूर्ण बाबी लक्षात आल्या : भारतातील आरोग्यविषयक परिस्थिती समाधानकारक नाही. आरोग्यस्थिती निश्चित करणाऱ्या अनेक बाबींवर लक्ष ठेवून त्यांत सुधारणा करणे हे अतिशय मोठे काम आहे. सामाजिक मालकी, लवचिक वित्तपुरवठा, मनुष्यबळाच्या व्यवस्थापनातील नाविन्यपूर्ण गोष्टी इत्यादींसह गुणवत्तायुक्त सेवा देणे, दुर्मिळ साधनसंपत्ती कार्यक्षमपणे वापरणे व स्थानिक पातळीवरील घरगुती बाबतींत सेवांची हमी देणे इ. बाबी आवश्यक आहेत. सार्वजनिक आरोग्य हा राज्यांचा विषय असल्याने हे मिशन राज्यांबरोबर सहकार्य करते आणि अधिक साधनसंपत्ती वापरून अर्थपूर्ण सुधारणा घडवून आणण्याचे प्रयत्न करते. याबाबतींत राज्यसरकारांना कार्यप्रवृत्त करण्यातच मिशनचे यश सामावलेले आहे. मिशन अशासकीय संस्थांबरोबरही सहकार्य करते. भारतातील ग्रामीण लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या सु. ७५ टक्के आहे. मात्र एवढ्या लोकसंख्येमागे दरवर्षी तीस हजार डॉक्टर (एम्. बी. बी. एस्. पदवीधर) तयार होऊनही कधीच सव्वीस हजारांहून जास्त डॉक्टर ग्रामीण भागात नव्हते.

स्थापनेपासून आतापर्यंत या मिशनने बरेच काम केले आहे. मिशनच्या कार्यातून पुढील प्रकारची कामे होण्यास मदत होते. सार्वत्रिक लसीकरण मोहिम, सुरक्षित प्रसूती, नवजात बालकाची निगा, पाण्याद्वारे होणाऱ्या व संसर्गजन्य रोगांचा प्रतिबंध, सुधारित पोषक आहार व घरगुती स्वच्छतागृहांचा पुरस्कार यांसारख्या कामांना मिशनचे साहाय्य मिळते. यांशिवाय गांधीग्राम इन्स्टिट्यूट ऑफ रूरल हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअर ट्रस्ट, जननी सुरक्षा योजना, पल्स पोलिओ लसीकरण मोहीम इत्यादींमार्फतही सार्वजनिक आरोग्याशी निगडित कामे भारतात केली जातात.

पहा : आरोग्य अधिनियम आरोग्यविज्ञान औद्योगिक अपशिष्ट परिस्थितिविज्ञान पाणीपुरवठा प्रदूषण भारत महाराष्ट्र रोगप्रतिबंधक व सामाजिक वैद्यक वैद्यक.

संदर्भ: 1. Brayant, John, Health and the Developing World, 1972.

   2. Brookington, Fraser, World Health, 1975.

   3. Burdrys, Grace, Planning for the Nation’s Health : A study of Twentieth Century Development in United State, 1987.

   4. Fraser, Derek, TheEvolution of the British Welfare State : A History of Social Policy Since the Industrial Revolution, 1984.

   5. Halland, W.W. Detels, R. Knox, G., Eds., Oxford Textbook of Public Health, 1997.

   6. Lanza, Robert, Ed. Medical Science and the Advancement of World Health, 1985.

   7. Last, J. M., Ed. Public Health and Preventive Medicine, 1998.

   8. Last, J. M. Public Health and Human Ecology, 1998.

   9. World Health Organization, Comp., Global Strategy for Health for All by the Year, 2000, 1981.

ठाकूर, अ. ना.