बांधकामाची सामग्री : मनुष्याने आपल्या सुखसोयींसाठी घरे, रस्ते, पूल, धरणे इ. अनेक वास्तू बांधल्या. या वास्तू बांधण्यासाठी ज्या अनेक व निरनिराळ्या तऱ्हेच्या पदार्थांचा उपयोग करण्यात येतो, त्या सर्वांचा बांधकाम सामग्रीत समावेश होतो. हवा, पाणी व निवारा ह्या मानवाच्या तीन मूलभूत गरजांपैकी निवाऱ्यासाठी मानवाने सुरूवातीस नैसर्गिक गुहा व झाडे यांचा आश्रय घेतला. वाऱ्यापावसापुढे झाडांचा निभाव लागत नाही हे पाहून, या सामग्रीचा उपयोग करून स्वतः निवारा बांधण्याच्या प्रयत्नात त्याने यश मिळविले आणि माती, दगड, लाकूड यांचा बांधकाम सामग्रीत समावेश झाला. प्रगतबुद्धी व प्रत्यक्ष मिळालेला अनुभव यांचा उपयोग करून मावनाने वरील सामग्रीत वेळोवेळी बदल करून जास्तीत जास्त सुरक्षित निवारा बांधण्यात यश मिळविले. विज्ञानाच्या प्रगतीमुळे वरील पारंपरिक पदार्थांमध्ये बदल घडवून आणण्यात आले, तसेच अनेक नव्या पदार्थांची भर पडत आहे. यात प्रत्यक्ष इमारतीस लागणाऱ्या वस्तू, जुडाई (संयोजक) पदार्थ, आवरण पदार्थ तसेच ओलावा, पाऊस, उष्णता, ध्वनी इत्यादींसाठी निरोधक पदार्थ वगैरेंचा बांधकाम सामग्रीत समावेश होतो.

नैसर्गिक निवाऱ्यात (गुहा, झाडे इ.) उपयोगात आलेल्या सामग्रीचाच मानवाने प्रथम स्वतः बनविलेल्या निवाऱ्यासाठी उपयोग केला. हे करीत असताना आवश्यकतेनुसार त्यात थोडेफार बदल करावे लागले. काही बदलांमुळे पदार्थाच्या गुणधर्मात फरक पडतो, हे लक्षात आल्यावर बांधकामातील घटकाच्या आवश्यक गुणधर्मानुसार त्या घटकासाठी सामग्रची निवड करण्यात येऊ लागली. हे गुणधर्म मूळच्या नैसर्गिक पदार्थात आणण्यासाठी त्यावर प्रक्रिया करण्यात येऊ लागल्या आणि पदार्थाच्या गुणधर्मावर नियंत्रण ठेवणे शक्य होऊ लागले. समान गुणधर्माच्या मानवनिर्मित पदार्थांची त्यात भर पडली. पारंपरिक माती, दगड, चुना, लाकूड, विटा, कौले, काच, काँक्रीट इ. बांधकाम सामग्रीची माहिती त्या त्या स्वतंत्र नोंदीमध्ये विस्ताराने दिलेली असल्याने प्रस्तुत नोंदीत या सामग्रीचा फक्त बांधकामाच्या दृष्टीने थोडक्यात आढावा व इतर काही नवीन पदार्थांची माहिती दिलेली आहे.

कोणतेही बांधकाम हे निरनिराळ्या लहानमोठ्या अनेक घटकांचे बनलेले असते. त्या प्रत्येकाचे बांधकामात स्वतंत्र कार्य असते. या कार्यानुसार त्याला आवश्यक असणारे गुणधर्म वेगळे असू शकतात, तसेच कार्यानुसार त्यावर पडणारा भार व त्याचे स्वरूप वेगवेगळे असू शकतात. सामान्यपणे घटकांवर पडणारा भार संकोची (संपीडक) किंवा अनुप्रस्थ (आडव्या) स्वरूपाचा असतो, क्वचित तो ताण स्वरूपाचाही असतो. पदार्थाची संकोची भार पेलण्याची क्षमता जास्त असल्याने एकच पदार्थ निरनिराण्या घटकांसाठी वापरला जातो.

वर्गीकरण : इमारतीच्या बांधकामात वापरण्यात येणाऱ्या मुख्य घटकांचे व सामग्रीचे खालीलप्रमाणे वर्गीकरण करता येते.

संरचनात्मक घटक : इमारतीच्या वरील छपराचा भार जमिनीपर्यंत पोहोचविण्याचे महत्वाचे कार्य करणारे लाकडी, पोलादी, प्रबलित (पोलादी सळ्या किंवा जाळ्या घालून अधिक बलवान केलेल्या) वा पूर्वप्रतिबलित (काँक्रीटमधील सळ्यांना ताण देऊन नंतर त्या काँक्रीटमध्ये गाडून केलेल्या) काँक्रीटचा सांगाडा यांचा यात समावेश होतो. इमारतीत उदग्र (उभ्या) स्थितीत वा क्षैतिज (क्षितिज समांतर, आडव्या) स्थितीत उपयोग केला जाईल त्याप्रमाणे घटकावरील भार अक्षीय वा अनुप्रस्थ असतो.

भारवाहक सामग्री : दगडी चिरे, विटा, काँक्रीट व त्यापासून बनविलेल्या विटा(ठोकळे) व तत्सम घटक, वाळू व चुना यांच्या विटा इ. सामग्रीचा यात समावेश होतो. सामान्यपणे या सामग्रीचा उपयोग ज्या घटकांत अक्षीय संकोची भार पडतो अशा ठिकाणी करतात.

जुडाई पदार्थ : भारवाही सामग्रीचे घटक एकमेकांस जोडण्यासाठी चुना, सिमेंट इ. जुडाई पदार्थांचा उपयोग केला जातो. सामान्यपणे दोन घटकांना घट्ट धरून ठेवणे हेच यांचे मुख्य काम असते मात्र ताण-स्वरूपी भार पेलणे अपेक्षित नसते.

आडभिंतीसाठी सामग्री : आडभिंतीचे मुख्य कार्य इमारतीतील जागेचे सोयीनुसार विभाजन करणे एवढेच असून छपराचा वा इतर घटकांचा भार पेलणे अपेक्षित नाही. सिमेंट, चुना, लाकूड यांपासून स्वतंत्रपणे बनविलेले अथाव एकत्रितपणे बनविलेले फलक (तक्ते), दगडी फरश्या इत्यादींचा यात समावेश होतो. गोंगाट नियंत्रणासाठी वापरावयाचे ध्वनिशोषक फलक आणि अग्निरोधी फलक या खास फलकांचाही यात समावेश होतो.

 जमिनीसाठी सामग्री : माती, पक्क्या विटा, दगडी चिरे, फरश्या, सिमेंट काँक्रीटची लादी वा आकर्षक रचनेच्या कवडी (मोझेइक) फरश्या, संगमरवरी फरशी, रबरी फरशी, लाकडी फळ्यांची फरशी, झिलईच्या मृत्तिका फरश्या इत्यादींचा यात समावेश होतो. अवजड यंत्रे ठेवण्यासाठी व हाताळण्यासाठी खास पोलादी जमिनीचा उपयोग करतात. मजले असलेल्या इमारतीत खालच्या मजल्याचे छप्पर वरच्या मजल्याची जमीन होऊ शकते.


छताकरिता सामग्री : छतासाठी पूर्वी सामान्यतः तक्तपोशीचा म्हणजे लाकडी कडीपाटाचा (पटईचा) मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येई. काँक्रीटच्या इमारतीत मजल्यांच्या जमिनीकरिता लाद्या वापरण्यात येत असल्याने छताकरिता निराळी सामग्री सहसा वापरीत नाहीत. नाट्यगृहे, चित्रपटगृहे यांसारख्या मोठ्या इमारतींमध्ये काँक्रीटच्या छतावर नक्षीकाम करतात अगर ध्वनिशोषक फलक बसवितात. प्लायवुड, कठीण फलक (हार्डबोर्ड) इत्यादींचाही छताकरिता काही ठिकाणी उपयोग करतात.

छपरांसाठी सामग्री : यात झाडांच्या साली, पाने, गवत, बांबू, लाकडी फळ्या, कौले, माती, पाटीच्या दगडाच्या (स्लेटच्या) फरश्या, शहाबादी फरश्या, जस्तलेपित (गॅल्व्हनाइज्ड) लोखंडी पन्हळी पत्रे, ॲस्बेस्टस-सिमेंटचे पत्रे, ॲल्युमिनियमाचे पत्रे, बिट्युमेनचे पत्रे, काचेचे तक्ते, सिमेंट-काँक्रीट छप्पर यांचा आवरणे म्हणून समावेश होतो. या पदार्थांना आधार देण्यासाठी वा त्यांचा भार भारवाही घटकांवर नेण्यासाठी तुळ्या, कैच्या, चौकटी यांची आवश्यकता असते. त्यासाठी लाकूड, पोलाद, काँक्रीट यांचा उपयोग करतात. [⟶छप्पर].

सजावटीची सामग्री : इमारतीच्या सजावटीसाठी निरनिराळ्या तऱ्हेचे रंग, व्हार्निशे, फलक इत्यादींचा उपयोग करतात [⟶रंगलेप व्हार्निश प्लायवुड लॅमिनेट]. आकर्षक रंगात व आकृत्यांत रंगविलेले भिंतीला व फरशीला बसविण्याचे कागद, विविध प्रकारच्या फरश्या इत्यादींचा यात समावेश होतो. शोभेसाठीच अशा सामग्रीचा उपयोग करावयाचा असल्याने स्वतःचे वजन पेलणे याव्यतिरिक्त इतर कुठलाही भार पेलणे तिच्याकडून अपेक्षित नसते. माती, चुना, सिमेंट यांचे गारे गिलाव्यासाठी सामान्यपणे वापरतात. तसेच दगडी, शहाबादी, सिमेंटच्या, संगमरवरी वा झिलईच्या फरश्यांचाही सजावटीसाठी उपयोग करतात.

बांधकाम सामग्रीचे वरील वर्गीकरण फक्त बांधकामात वेगवेगळ्या घटकांनी करायच्या कार्यानुसार केलेले असून सामग्रीचे निरनिराळे गुणधर्म विचारात घेऊन एकच सामग्री अनेक घटकांसाठी वेगवेगळ्या तऱ्हांनीही वापरता येते. प्रत्येक पदार्थांचे बांधकामासाठी उपयुक्त गुणधर्म व त्यांचा उपयोग पुढे वर्णन केल्याप्रमाणे आहेत. विवेचनाच्या सोयीसाठी पदार्थांचे पारंपरिक पदार्थ, सुधारित पदार्थ व नवीन पदार्थ असे ढोबळ विभाजन केले आहे. तसेच अग्निरोधी व आर्द्रतारोधी इ. खास प्रकारच्या सामग्रीची माहिती स्वतंत्रपणे दिली आहे.

पारंपरिक सामग्री : यात माती, दगड, विटा, कौले, शहाबादी फरशी, संगमरवरी फरशी, चुना, लाकूड, काच, सिमेंट, प्रबलित काँक्रीट, लोखंडी व ॲस्बेस्टस-सिमेंटचे साधे व पन्हाळी पत्रे, पोलाद, बिट्युमेन, पक्व मृदा (टेरा कोटा), रबर, चिकण मातीचे ठोकळे यांचा समावेश होतो. 

माती : नैसर्गिक रीत्या मोठ्या प्रमाणात आणि सोप्या पद्धतीने सर्वदूर उपलब्ध होणारी सामग्री म्हणजे माती होय. कणाकणांनी बनलेल्या मातीचे गुणधर्म हे कणांतील खनिजे व त्यांचे प्रमाण, कणांचे आकारमान, त्यांतील पोकळी, त्यांतील पाणी, वरचा पडणारा दाब, कणांचे घनीभवन इत्यादींवर अवलंबून असतात. परिस्थितिनुसार त्यांत फरक पडतो. भारामुळे मातीचे कण वेगळे होण्याची शक्यता असल्याने व प्रत्येक कणाची भार पेलण्याची क्षमता कमी असल्याने जास्त भार पडेल अशा घटकांसाठी मातीचा उपयोग करता येत नाही. मातीच्या उन्हात वाळविलेल्या कच्च्या विटांचा-भेंडाच्या विटांचा-उपयोग घरांच्या भिंतीसाठी करतात. मात्र पावसाच्या माऱ्याने अशा भिंती लवकर पडण्याची शक्यता असते. तसेच तुळई वगैरेंच्या भारामुळे अशा विटांचा चुराडा होऊन छप्पर व भिंत पडण्याची शक्यता असते. मातीचा गारा पक्क्या विटांचे बांधकाम, दगडाचे बांधकाम यांसाठी करतात. जुन्या काळी मातीचा गारा, दगड-गोटे, विटांचे तुकडे एकत्र कालवून किल्ल्यांच्या जाड भिंती वगैरे बांधत असत. अर्थात त्यासाठी ठराविक गुणधर्मांची माती आवश्यक असे. जवसाचे कच्चे तेल व उकळलेले तेल (बेल तेल), बेलफळ इ. पदार्थ घालून माती जास्त चांगली केली जात असे. मातीचा गिलाव्यासाठीही उपयोग करतात. गिलावा पक्का राहण्यासाठी कापूस, गवत इ. पदार्थ मातीत घालून कुजवतात व असा गारा त्यासाठी वापरतात. मातीचा उपयोग घराच्या जमिनीसाठीही करतात. अर्थात जमिनीवर वावर जास्त असल्यास ती शेणाने सारवून वा इतर तऱ्हेने वारंवार दुरूस्त करावी लागते. घराच्या छपरासाठी लाकडी पट्ट्या, फळ्या यांवर मातीचा थर देतात व वर चुनखडीचे जास्त प्रमाण असलेल्या चिकणमातीचा थर देतात. त्यामुळे मातीत जास्त पाणी मुरत नाही. ओल्या चिकणमातीच्या जलाभेद्यता या गुणधर्माचा उपयोग मातीच्या धरणात जलाभेद्य भिंतीसाठी करतात. 

विटा : मातीच्या विटा भाजल्यावर त्यांतील खनिजांची नवी संयुगे तयार होऊन सुटे कण घट्ट बसतात. त्यामुळे त्या जास्त भार पेलू शकतात आणि जलाभेद्य होतात. विटांचा उपयोग मुख्यतः भिंतीसाठी, भारवाही व आडभिंतीसाठी करतात. घरातील जमिनी, पाऊलवाटा, पदपथ यांच्यासाठीही विटांचा उपयोग करतात. लाकडी किंवा पोलादी लहान तुळ्यांवर विशिष्ट पद्धतीने चुन्यात विटा रचून छपरे बांधतात. भट्ट्यांसाठी खास विटा वापरतात. दगडाची खडी मिळत नसेल, तर विटांच्या तुकड्यांचा उपयोग खडीसारखा काँक्रीटसाठी करतात. [⟶विटा].

कौले : छप्परांसाठी मातीची भाजलेली वेगवेगळ्या आकाराची कौले (उदा,, सपाट, पन्हळी, मंगलोरी) वापरतात. साधारणपणे कौलांसाठी चिकणमाती वापरतात त्यामुळे भाजल्यावर कौले जलाभेद्य होतात. [⟶कौले]. 


दगड : पृथ्वीमधील निरनिराळी खनिजे एकामेकांत मिसळून आणि रासायनिक संयोग होऊन दगड तयार होत असल्याने त्यांतील खनिजांचे कण एकमेकांशी घट्ट चिकटलेले असल्यामुळे दगडांची भार पेलण्याची क्षमता खूपच जास्त असते. तसेच ऊन, वारा, पाऊस व इतर कारणांनी कण सुटे होऊन दगडांची झीज होण्याचे प्रमाण खूपच कमी असते. त्यामुळे बांधकामासाठी दगडाची निवड फार पूर्वीपासून केली जात आहे. भार पेलण्याची क्षमता जास्त असल्याने भारवाही भिंती, धरणांच्या भिंती, अवजड यंत्रांसाठी चौथरे, स्मारके यांसाठी दगडांचा उपयोग केला जातो. घटक खनिजांनुसार दगडांचे गुणधर्म बदलतात. ज्या दगडांच्या मोठ्या चिपा, तुळ्या मिळू शकतात त्यांचा तुळ्या व खांब या रूपांत उपयोग करतात. अवजड वाहनाची खूप वाहतूक असणाऱ्या रस्त्यांसाठी, माणसांची खूप वर्दळ असलेले पदपथ, रेल्वे व बस यांच्या स्थानकांतील फलाट, बंदरातील मालवाहू व उतारूंसाठीचे फलाट, घसरणी यांसाठीही दगडांची जमीन करतात. [⟶बांधकामाचे दगड] 

फरशी : थरांच्या दगडांच्या पातळ, कमी जाडीच्या फरश्यांत कमी झीज होणे व जलाभेद्याता हे गुण असतात. त्यांशिवाय वरून पडणारा कमीअधिक भार पेलण्याची क्षमता व आवश्यकतेनुसार लहान-मोठ्या जाडीचे तुकडे पडणे यांमुळे फरशांचा उपयोग जमिनी व छपरांसाठी करतात. यंत्राच्या साहाय्याने पृष्ठाभागावरील उंचसखलपणा काढून टाकून फरश्यांचना चकाकी आणता येते. कणांच्या खनिजानुसार ही चकाकी कमी अधिक प्रमाणात येते. वातुकाश्म, संगमरवर, ग्रॅनाइट, शेल आणि तत्सम इतर अनेक प्रकारच्या फरश्यांचा उपयोग इमारतींच्या जमिनी, पायऱ्या इत्यादींसाठी करतात. संगमरवरी फरश्यांचा महत्त्वाच्या इमारती व बांधकामे, स्मारके, तसेच भिंतीचे पृष्ठभार यांसाठी उपयोग करतात. दगड व फरश्यांचा उपयोग सांडपाण्याच्या नाली, पाण्याचे पाट, पन्हण यांच्या बांधकामासाठीही करतात. [⟶फरशी].

 चुना : चुनखडी भाजून तयार होणाऱ्या चुन्यात पाणी पडल्यावर त्याचा पुन्हा हवेशी संयोग होऊन कठीण पदार्थात रूपांतर होते आमि त्याचबरोबर बांधकामातील बाजूच्या विटा, दगडी चिरे इत्यादींना तो घट्ट धरून ठेवतो. वाळल्यावर चुन्यात भेगा पडू नयेत व संयोगासाठी पुरेशी हवा खेळती रहावी म्हणून चुना व वाळून यांचा गारा तयार करतात. या गाऱ्याचा उपयोग दगड-विटांचे बांधकाम, गिलावे, काँक्रीट यांसाठी करतात. विटांचा बारीक चुरा चुन्यात मिसळून वापरल्यास गिलावा सपोत व भेगारहित होतो. [⟶चुना].

 सिमेंट : पाण्याशी संयोग पावून घट्ट होण्याच्या सिमेंटमधील संयुगाचा उपयोग दगड-विटांच्या बांधकामाकरिता गारा, भिंतीचा गिलावा, काँक्रीट इत्यादींसाठी केला जातो. गारा करताना सिमेंट कमी लागावे व वाळल्यावर आकुंचनाने पडणाऱ्या भेगा पडू नयेत म्हणून वाळूचा कमीअधिक प्रमाणात उपयोग करतात. भार पेलण्याची व कणांना घट्टपणे धरून ठेवण्याची क्षमता आणि जलाभेद्यता या गुणधर्मांमुळे काँक्रीटच्या स्वरूपात सिमेंटचा उपयोग करतात. जलाभेद्यता व नैसर्गिक दगडाइतपत भार पेलण्याची क्षमता यांमुळे काँक्रीटचा उपयोग बांधकामासाठी जवळजवळ अनिवार्य झालेला आहे. काँक्रीट इष्ट जागेवर टाकता येते किंवा पूर्वरचित घटकांच्या स्वरूपातही वापरता येते. प्रबलित काँक्रीटचा छप्पर, आधाराचे खांब, तुळ्या इत्यादींसाठी उपयोग करतात. काँक्रीटचा फरशीखालील आधारतल, पाया, कारखान्यातील आणि रेल्वे वा बस स्थानकांतील फलाट, जास्त रहदारी असलेले रस्ते, विमानतळ इत्यादींसाठी वापर करतात. पाण्याचा संपर्क जेथे जेथे येईल अशा प्रत्येक ठिकाणी उदा., धरणांच्या भिंती, कालवे, पाण्याचे नळ इ. ठिकाणि सिमेंट काँक्रीटा उपयोग अनिवार्य ठरला आहे. ओलावा प्रतिबंधासाठी सिमेंट काँक्रीटचा उपयोग केला जातो. ॲस्बेस्टस-सिमेंटच्या साध्या पत्र्याचा आडभिंती, तावदाने यांसाठी उपयोग करतात, तर पन्हळी पत्र्याचा छपरासाठी उपयोग होतो. [⟶सिमेंट क्रक्रीट].

खडी व वाळू : पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून दगडगोट्यांपासून वाळू तयार होते तर दगडगोचे हातोड्याने व दलित्राने (दगड फोडण्याच्या यंत्राने) फोडून खडी तयार करतात. मूळ दगडांचे जलाभेद्यता, भार पेलण्याची क्षमता आदि महत्त्वाचं गुणधर्म खडीमध्ये रहात असल्याने तिचा उपयोग काँक्रीट, रस्तेबांधणी इ. ठिकाणी करतात, तर वाळूचा उपयोग चुना व सिमेंट यांचा गारा व काँक्रीट करण्यासाठी करतात. मातीच्या धरणाच्या भिंतीतून येणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी केलेल्या चाऱ्यांत निरनिराळ्या आकारमानांच्या खडीचा व वाळूचा उपयोग अनिवार्य असतो. [⟶वाळू]. 

लाकूड : नैसर्गिक रीतीने मिळणारी आणखी एक बांधकाम सामग्री म्हणजे लाकूड. इमारती लाकडाचे बरेच प्रकार असून त्यांपैकी बहुतेक सर्वांचा बांधकामात एक वा अनेक स्वरूपांत उपयोग होतो. लाकडाची भार पेलण्याची क्षमता कमी असते व पाण्याच्या संपर्कामुळे ते कुजते व फुगते आणि त्यामुळे त्याचे सामर्थ्य कमी होते. इमारतीच्या चौकटीचे खांब, तुळ्या, छपरांच्या कैच्या, दरवाजे, खिडक्या, दगड-विटांच्या बांधकामासाठी उभारावयाचे बाजूचे टेकू, काँक्रीटसाठी लागणारे तात्पुरते आकारमान (काँक्रीट घट्ट होत असताना त्याला योग्य आकार येण्यासाठी वापरण्यात येणारे तात्पुरते लाकडी आवरण), पायातील स्तंभिका, जिने, तक्तपोशी यांसाठी लाकडाचा उपयोग होतो. पाण्यामुळे फुगण्याच्या लाकडाच्या गुणधर्माचा उपयोग छोट्या बंधाऱ्यांचे दरवाजे, पाणी सोडण्याच्या मोऱ्या इत्यादींसाठी करतात. दरवाजे-खिडक्यांच्या छावण्या व छपरांसाठी आधारफळ्या यांसाठी लाकडाचा वापर करतात. बांबूच्या पट्ट्यांचा कुडाच्या भिंतीसाठी उपयोग करतात. [⟶लाकूड बांधकाम, लाकडाचे]. 

रबर : कंपने व आवाज शोषून घेण्याच्या रबराच्या गुणधर्माचा मुख्यतः उपयोग बांधकामा करून घेतात. याकरिता रबराचे कमी अधिक जाडीचे तक्ते जमिनीवर टाकतात. कंपने जास्त असल्यास जाड रबरी लादीचा जमिनीसाठी उपयोग करतात. [⟶रबर]. 

लोखंड : बांधकामात साधारणपणे घडीव लोखंडाचा उपयोग सांडपाण्याचे नळ, कड्या, कोयंडे यांसाठी केला जातो. जस्तलेपित पत्र्यांचा उपयोग छपरांसाठी, तसेच आडभिंती म्हणून केला जातो. पायातील कुसुल व पुलाचे लोखंडी खांब यांसाठी लोखंडाचा उपयोग करतात. पाण्याच्या नळांसाठीही लोखंड वापरतात. [⟶लोखंड].


पोलाद : तन्य व संकोची भार पेलण्याची क्षमता व कुठल्याही आकारात बनविता येणाऱ्या गुणधर्मामुळे पोलादाचा बांधकामात निरनिराळ्या स्वरूपांत उपयोग केला जातो. पोलादाचे खिळे, स्क्रू, नट, बोल्ट यांचा जोडकामासाठी उपयोग होतो. लाटीव तुळ्यांचा उपयोग छपरांसाठी, तसेच छपरांच्या कैच्या, खांब, दरवाजे, खिडक्यांच्या चौकटी, तावदाने व त्यांच्या चौकटी यांसाठी उपयोग होतो. प्रबलित, पूर्वप्रबलित काँक्रीट यांमध्ये लहानमोठ्या आकारमानांच्या पोलादी सळ्यांचा व तारांचा उपयोग अनिवार्य होतो. पोलादी जाळीचा कुडाच्या आडभिंतीत उपयोग करतात. कारखान्यांतील व जास्त वर्दळ असलेल्या ठिकाणांच्या जमिनींसाठी पोलादाचा उपयोग करतात. धरणांचे दरवाजे पोलादापासूनच बनवितात. जास्त दाबाखाली पाणी वाहून नेणारे नळ, सांडपाण्याच्या लहानमोठ्या टाक्या पोलादाच्या करतात. स्तंभिकांची आचरणे, स्तंभिकांसाठी पाडावयाची छिद्रे यांसाठी पोलादी नळांचा उपयोग केला जातो. [⟶पोलाद बांधकाम, पोलादाचे]. 

काच : काचेच्या पारदर्शकतेचा उपयोग दारे व खिडक्या यांच्या तावदानांसाठी व छपरांमधून प्रकाश घ्यायचा असल्यास कौलांच्या रूपात अथाव कारखान्यांत छपरांशी तक्ते बसवून करतात. आडभिंतीसाठी तक्त्यांच्या स्वरूपात किंवा भिंतीच्या जाडीच्या विटांच्या आकारात काचेचा उपयोग करतात. काच ध्वनिरोधक असल्याने तिचा या दृष्टीने बांधकामात तक्त्याच्या रूपात वापर करतात. आघाताने काचेचे तुकडे विखरून अपघात होऊ नये म्हणून बारीक पोलादी जाळी घातलेले तक्ते वापरतात. क्वचित प्रसंगी यंत्राच्या खोलीच्या जमिनीसाठी व छपरासाठी काचेचा उपयोग करतात. [⟶काच]. 

ॲस्बेसटस : सिमेंटमध्ये मिसळून तक्ते बनविण्यासाठी ॲस्बेसटसाचा बांधकामात मुख्यतः उपयोग करतात. अशा तक्त्यांचा उपयोग अग्निरोधी बांधकामाचे गिलावे, आडभिंती, तसेच ध्वनिनियंत्रमासाठी छत व भिंती यांसाठी करतात. लहान करवतीने कोणत्याही आकारत हे तक्ते कापणे शक्य असल्याने सजावटी बांधकामासाठीही त्यांचा उपयोग करतात. [⟶ॲस्बेस्टस] बिट्युमेन : बिट्युमेनाचा (त्याचप्रमाणे डांबर व अस्फाल्ट यांचा) जलाभेद्यता हा गुणधर्म बांधकामात अतिशय उपयोगी पडतो. रस्त्याच्या बांधकामात खडी एकमेकांस घट्ट धरून एक जलाभेद्य समतल पृष्ठभाग करण्यासाठी बिट्युमेनाचा उपयोग केला जातो. तसाच उपयोग विमानतळासाठीही करतात. इमारतीच्या बांधकामात भिंतीत ओलावा येऊ नये म्हणून जोत्यावर बिट्युमेनाचा एक थर देऊन नंतर भिंतीचे बांधकाम करतात. तळघरात जमिनीखालीदेखील एक थर देऊन ओलव्यास प्रतिबंध

करतात. छप्पराच्या लादीतून गळू नये म्हणून बिट्युमेन व फेल्ट यांच्यापासून बनविलेल्या कापडाचा वापर करतात. [⟶बिट्युमेन अस्फाल्ट डांबर].

आ. १. चिकणमातीचा पोकळ ठोकळा

 चिकणमातीचे ठोकळे : चिकणमातीचे भरीव वा पोकळ (आ.१) ठोकळे बनवितात. पोकळ ठोकळ्यांच्या भिंतीची जाडी १५ मिमी. ते ५० मिमी. व आकारमान सामान्यपणे ५०×३०×२० सेंमी असते. ठोकळ्यांच्या चारीही बाजूंस बारीक खाचा असतात त्यामुळे ठोकण्यांची जुडाई वा गिलावा चांगला होतो. हे ठोकळे कौलांप्रमाणे भट्टीत भाजून काढतात त्यामुळे ते टणक बनतात. भरीव ठोकळ्यांचा विटांप्रमाणे उपयोग करतात, तर पोकळ ठोकळ्यांचा भिंती बांधण्यासाठी. खांबांसाठी व नक्षीदार कामासाठी उपयोग करतात. 

पक्व मृदा : (टेरा कोटा). आयर्न ऑक्साइड (५ ते ८ % प्रमाणात) असलेल्या चिकणमातीच्या १,२००० से. तापमानाला भाजून पक्व मृदेच्या वस्तू बनवितात. चकाकी येण्यासाठी भाजण्यापूर्वी मीठ वगैरेसारख्या पदार्थांचे रोगण ६५०० से. तापमानाला भाजलेल्या वस्तूंना लावून पुन्हा १,२००० से. तापमानाला भाजतात. चिकणमातीत लाकडाचा भुसा वगैरेसारखे जळून जाणारे पदार्थ वापरून पक्व मृदा सच्छिद्र बनवितात. साधारणपणे बांधकामात नक्षीदार आकार व गिलावे यांसाठी हिचा उपयोग करतात. कौले व फरश्या तयार करण्यासाठीही पक्व मृदेचा उपयोग करतात. चिकणमातीत थोडी वाळू, चिनीमातीच्या भांड्याचा चुरा इ. पदार्थ घालून त्यापासून चकाकी दिलेले नळ बनवितात. ह्या नळांवर अम्लांचा परिणाम होत नाही. तसेच पाणी झिरपू शकत नाही. [⟶मृत्तिका उद्योग].

सुधारित सामग्री : परंपरागत सामग्रीच्या गुणधर्मात चागंले बदल घडवून आणण्यासाठी, बांधकामाचा वेळ वाचविण्यासाठी, गुणधर्मांच्या प्रमाणीकरणासाठी, सामग्रीची बचत करण्यासाठी परंपरागत सामग्रीत काही सुधारणा करण्यात आल्या. अशा सुधारित सामग्रीची काही वैशिष्टये खाली दिली आहेत. 


काँक्रीटचे ठोकळे : कारखान्यात आवश्यक त्या आकारमानाचे व भारवाही क्षमतेचे हवे तेवढे हव्या त्या वेळी काँक्रीटचे ठोकळे बनविता येत असल्याने भारवाही भिंतीच्या कामासाठई दगड-विटाऐवजी काँक्रीटच्या ठोकळ्यांचा उपयोग वाढू लागला. आवश्यकतेनुसार आकारमानात व भारवाही क्षमतेत बदल करण्यासाठी काँक्रीटमध्ये बदल करणे शक्य असते. तसेच दगडास आकार देण्याच्या वेळेपेक्षा कमी वेळात काँक्रीट ठोकळा बनविणे शक्य असल्याने एकूण बांधकामास वेळ कमी लागतो व बांधकामाची गती वाढते.

ठोकळ्यांसाठी लागणारे काँक्रीट कमी करून सिमेंटची बचत व्हावी म्हणून भरीव ठोकळ्यांऐवजी निरनिराळ्या आकारांचे पोकळ ठोकळे उपयोगात आणतात. असे ठोकळे पोकळ असले तरीही सच्छिद्र नसल्याने जलाभेद्य असू शकतात. पोकळ ठोकळ्यामुळे पायावर बांधकामाचा पडणारा भार कमी होतो. तसेच वजन कमी झाल्याने ठोकळे हाताळण्यास लागणारा वेळ कमी लागून बांधकामाची गती वाढते. काँक्रीटचे वजन कमी करण्यासाठी कमी वजनाच्या काँक्रीटचा उपयोग करतात. काँक्रीटचे सर्व गुणधर्म काँक्रीटच्या ठोकळ्यांत असल्याने काँक्रीटप्रमाणेच त्यांचा उपयोग होतो. काँक्रीटचे वजन कमी करण्यासाठी हलक्या वजनाची खडी वापरणे, काही इतर समावेशक पदार्थांचा उपयोग करणे इ. पद्धती आहेत. 

काँक्रीटच्या ठोकळ्यांचा उपयोग करून भिंत बांधण्याऐवजी प्रबलित काँक्रीटची पूर्वनिर्मित भिंत, छावणी, तुळई, छपराची लादी इ. अनेक घटकांचा उपयोग केला जातो. मोठ्या प्रमाणावर घटक तयार करता येणे, गुणधर्मांचे नियंत्रण, कमी श्रम आणि किंमत इ. अनेक फायदे पूर्वनिर्मित घटकांमुळे मिळतात. इमारतीचे निरनिराळे घटक बांधकामाच्या जागेवर नेऊन योग्य जोडणी करून इमारतीचे बांधकाम पूर्ण करता येते. मात्र हे घटक नेहमीच्या काँक्रीटचे असल्याने वजनाने जड असतात आणि हाताळणीस व उभारणीस अवघड जाते. त्यासाठी यारी वगैरेंसारखी यंत्रे आवश्यक ठरतात. त्याऐवजी हलक्या वजनाचे काँक्रीट वापरल्यास घटकांचे वजन कमी होऊन हाताळणी सोपी व उभारणी लवकर होते. 

काँक्रीटचे वजन कमी करण्यासाठी सच्छिद्र काँक्रीटचाही वापर करतात. तसेच काँक्रीट घट्ट व पक्के होण्याचा वेळ कमी व्हावा म्हणून वाफेने वाळविणे किंवा भट्टीत भाजून काढणे अशा प्रक्रियांचाही उपयोग करतात. अशा एका पद्धतीत सिमेंट, वाळू, खडी व पाणी यांच्याबरोबरच ॲल्युमिनियम वा जस्त यांच्या चुऱ्यासह इतर काही संयुगे यांचे काही ठराविक प्रमाणात मिश्रण करून काँक्रीटचे हव्या त्या आकारमानाचे ठोकळे बनवितात व भट्टीतून भाजून काढतात. भाजल्याने मिश्रणातील संयुगे आणि ॲल्युमिनियम व जस्त यांचा चुरा यांचे नविन संयुग तयार होऊन हवेचे बुडबुडेही तयार होतात व काँक्रीट सच्छिद्र होते. मात्र छिद्रे सलग नसल्याने पाणि किंवा हवा आरपार जाऊ शकत नाही. महाराष्ट्रात पुणे येथील सिपोरेक्स कंपनी असे ठोकळे बनविते. काँक्रीटच्या ठोकळ्यांचे काही प्रकार आ. २ मध्ये दाखविले आहेत. 

सुधारित विटा : चुनखडी विपुल प्रमाणात सापडणाऱ्या ठिकाणीच चुना व वाळू यांच्या मिश्रणाच्या विटा बनवितात. चुनखडी चांगली भाजून तिच्यातील राख, जळके तुकडे बाजूला करून मिळालेल्या चुनखडीचे बारीक चूर्ण करतात. त्यात स्वच्छ व श्रेणीयुक्त वाळू मिसळून दाब देऊन विटा तयार करतात. त्यावर दाबाखालील वाफ सोडतात. या विटा टणक, बळकट व ठराविक आकारमानाच्या असतात. नक्षीदार कामासाठी देखील त्यांचा उपयोग होतो. थोडा रंग मिसळल्यास रंगीत विटा तयार करता येतात. 

पॉट्सलान : (पोझोलोना). इटलीतील पोतत्सावली येथे आढळणाऱ्या व ज्वालामुखीतून बाहेर पडणाऱ्या धुळीसारख्या दिसणाऱ्या भाजलेल्या मृत्तिकेला वा शेलला पॉट्सलान म्हणतात. पाण्याखाली ते घट्ट होते. नुसत्या सिमेंटचा वा चुन्याचा गाऱ्यासाठी उपयोग केला असता पृष्ठभागावर भेगा पडतात. थोड्या प्रमाणात पॉट्सलानाचा उपयोग गाऱ्यात केल्यास भेगा पडत नाहीत, तसेच चुना किंवा सिमेंट या महाग सामग्रीची बचत होते. 

आ. २. क्राँक्रीटच्या ठोकळ्यांचे काही प्रकार : (१) भरीव ठोकळा, (२) भिंतीसाठी पोकळ ठोकळा, (३) कोपरा व खांबासाठी पोकळ ठोकळा, (४) छप्पराच्या लादीचा ठोकळा, (५) प्रबलित क्राँक्रीट तुळईसाठी ठोकळा, (६) पडदीसाठी ठोकळा, (७) सच्छिद्र हलका ठोकळा.


भाजलेल्या विटांचा बारीक चुरा सिमेंट वा चुन्याबरोबर एकत्र मळतात व त्याचा गाऱ्यासाठी उपयोग करतात. त्यामुळे वाळू आणि सिमेंट वा चुन्याचे मिश्रण चांगले एकजीव होते. अर्धवट भाजलेल्या वा पक्क्या विटांचे मोठे तुकडे काँक्रीटमध्ये खडीबरोबरही वापरतात. असे काँक्रीट जमिनीखाली आधारतल म्हणून वापरतात.

दगडी कोळशातील अज्वलनशील धूलिकण : (फ्लाय ॲश). औष्णिक विद्युत् केंद्रे व दगडी कोळशाचा इंधन म्हणून वापर करणाऱ्या कारखान्यांतून धुराबरोबर न जळणारे कणही बाहेर पडतात. हे कण गोलाकार, अतिसूक्ष्म व हलके असतात. रासायनिक दृष्ट्या ते निष्क्रिय असतात. मात्र सिमेंटबरोबर ते वापरल्यास भेगा पडण्याचे कमी होऊन सिमेंट कमी लागते. त्यामुळे काँक्रीटमध्ये या धूलिकणांचा वापर करून ठोकळे बनविले जातात. या धूलिकणांच्या लहानमोठ्या आकारमानांच्या गोट्या बनवून खडीच्या ऐवजी त्यांचा उपयोग केला जातो. मृदेबरोबर त्यांचा काही प्रमाणात वापर करून मृदेचे स्थिरीकरण करता येते. अशा मृदेचा भरीव वा पोकळ विटा करण्यासाठी किंवा रस्त्यांचा पृष्ठभाग करण्यासाठी उपयोग करता येतो. 

कवडी फरशी : संगमरवरी फरशीला पर्याय म्हणून सिमेंट-काँक्रीट मध्ये निरनिराळ्या रंगांच्या दगडांचे तुकडे घालून निरनिराळ्या रंगांत या फरश्या दाब देऊन बनविल्या जातात. कारखान्यात बनविल्यामुळे या सर्व प्रक्रियांवर चांगली देखरेख राहून फरश्या काँक्रीटप्रमाणे कडक बनतात. तसेच हव्या त्या आकारच्या व आकारमानाच्या बनविता येतात. सामान्यपणे जमिनीसाठी व जमिनीलगत भिंतीला लावण्यासाठी त्यांचा उपयोग करतात. काही मोठ्या इमारतींत भिंतींना गिलावा करण्याऐवजी या फरश्यांचा वापर करतात. फरशीवर यांत्रिक पद्धतीने चकाकी आणतात. जिन्याच्या पायऱ्यांसाठी चौकटीची नक्षी असलेल्या फरश्या वापरतात.

जमिनीसाठी कारखान्यांत बनविलेल्या फरश्यांऐवजी जागेवर काँक्रीटचे योग्य रंगातील मिश्रण टाकून देखील फरशी बनविता येते. या काँक्रीटला नंतर यांत्रिक पद्धतीने चकाकी आणतात. 

समपृष्ठ फलक : (फल्श बोर्ड). हलक्या व कमी प्रतीच्या लाकडाच्या पट्ट्या एकमेकींस जोडून वा त्यांची चौकट तयार करून तीवर प्लायवुडाचा तक्ता दोन्ही बाजूंनी पक्का जोडून हे फलक तयार करतात. लाकडाच्या पट्ट्यांवर जोडण्यापूर्वी रासायनिक प्रक्रिया करतात. त्यामुळे पाणी शोषून फुगणे, वाकणे, तडकणे इ. गोष्ठी टाळल्या जातात. तसेच प्लायवुडाच्या तक्त्याऐवजी एका बाजूने अथवा दोन्ही बाजूंनी पातळ चादरयुक्त तक्ते (व्हिनीयर बोर्ड) वापरतात. हे तक्ते झाडाच्या खोडाचा अगदी बारीक स्तर प्लायवुडाच्या तक्त्यावर बसवून बनविलेले असतात. या बारीक स्तरांत लाकडातील रेषांची नैसर्गिक आकर्षक जाळीची नक्षी आपोआप तयार होते. लाकडाप्रमाणेच समपृष्ठ फलक कापता येतो, जोडता येतो, त्यात स्क्रू बसविता येतात मात्र लाकडाप्रमाणे पाण्याने फुगणे, तडकणे, वाकणे इ. दोष त्यात नसतात. या फलकांचा उपयोग दरवाजे, खिडक्यांची तावदाने आणि आडपडद्या (पार्टिशन) यांसाठी करतात. 

कणी फलक : लाकडाचा भुसा, रंधताना पडलेला बारीक चुरा, ढलप्या यांसारख्या कच्च्या मालापासून लगदा बनवून फलक बनविले जातात. हे फलक कमी जास्त जाडीचे असतात. त्यांचा उपयोग तावदाने, आडपडदी, लाकडी सामान इत्यादींसाठी करतात. समपृष्ठ फलक व कणी फलक यांपासून वस्तू लवकर बनविता येतात. 

कठीण फलक : (हार्डबोर्ड). मुख्यत्वे लाकडाच्या भुशापासून हे फलक बनवितात. भुसा व चुरा पोलादी भांड्यात ठेवून त्यावर दाबाखालील वाफ सोडतात. त्यामुळे लाकडातील नैसर्गिक डिंक बाहेर पडून व वाफेने चिकट होऊन भुशाचा लगदा तयार होतो. एका तोटीद्वारे हा लगदा बाहेर सोडला जातो. त्यावेळी भुशाचे कण अलग अलग होऊन एकमेकांवर घट्ट बसून त्यांचे आवश्यक त्या जाडीचे फलक बनवितात. त्यांचा उपयोग तावदाने, जमिनी, ध्वनी-व उष्णता-रोधी पडदी, लाकडी सामानावरील आवरणे यांसाठी करतात. लाकडाच्या धाग्यासारख्या तुकड्यांपासून बनविलेल्या फलकांना धागी फलक असे म्हणतात. याशिवाय थोडाफार फरक करून बनविलेल्या फलकांना बाजारात वेगवेगळ्या नावांनी ओळखतात. [⟶प्लायवुड].  

पूर्वप्रतिबलित काँक्रीट : प्रबलित काँक्रीटमधील पोलादाचा भार घेण्यासाठी पुरेपुर उपयोग व्हावा म्हणून हा सुधारित काँक्रीटचा प्रकार वापरात आला. यात बांधकाम पूर्ण झाल्यावर काँक्रीटमधील पोलादी सळ्यांवर ज्या तऱ्हेने [संकोची वा ताण] प्रतिबल [विकृती निर्माण करणारी प्रेरणा] अपेक्षित असेल त्याविरूद्धचे प्रतिबल पोलादी सळ्यात बांधकाम करण्यापूर्वी निर्माण करतात व नंतर बांधकाम करतात. त्यामुळे पोलादी सळया जास्त भार पेलू शकतात. तसेच काँक्रीटमध्येही कमाल मर्यादेपर्यंत प्रतिबल निर्माण होऊ शकते आणि पोलाद व काँक्रीट यांचा पुरेपूर उपयोग होऊ शकतो. पूर्वप्रतिबलित काँक्रीटचा पुलांचे बांधकाम, घरांच्या चौकटी व घरांचे पूर्वनिर्मित घटक यांसाठी उपयोग होतो [⟶काँक्रीट].


ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम व टिटॅनियम : या वजनाने हलक्या असलेल्या धातू व त्यांच्या मिश्रधातू यांचा १९१० सालानंतर मोठ्या प्रमाणावर बांधकामात उपयोग होऊ लागला आहे. पूर्वनिर्मित घरे, मोठमोठ्या इमारतींच्या दर्शनी भागासाठी विविधरंगी तक्ते, खोल्यांमधील आडपडदी, दारे-खिडक्या व त्यांच्या चौकटी, विविध सजावटीचे साहित्य, छप्परे इ. विविध स्वरूपांत या धातूंचा (विशेषतः ॲल्युमिनियम व तिच्या मिश्रधातूंचा) उपयोग करण्यात येत आहे.[⟶ ॲल्युमिनियम बांधकाम, हलक्या धातूंचे].

नवीन सामग्री : वैज्ञानिक प्रगतीमुळे काही नवीन सामग्रीच्या गुणधर्मांत बदल घडवून आणून त्यांचा बांधकामात उपयोग करून घेणे शक्य झाले आहे. तसेच अभिकल्पाच्या (आराखड्याच्या) तंत्रात सुधारणा झाल्याने काही सामग्रीचा बांधकामात उपयोग करणे शक्य झाले आहे. मात्र बांधकामात मोठी रक्कम गुंतवावी लागत असल्याने व चुका दुरुस्त करणे सोपे नसल्याने नव्या सामग्रीचा उपयोग त्या मानाने कमी प्रमाणात होतो.

फेरोसिमेंट काँक्रीट : प्रबलित काँक्रीटमधील पोलादाची बचत करावी, सळया वाकविण्याचा खर्च कमी करावा व काँक्रीटचे कमी जाडीचे पण पुरेशा बलाचे घटक बनविता यावेत यांसाठी या काँक्रीटचा उपयोग करण्यात आला. यात पोलादी सळयांऐवजी पोलादी जाड-बारीक जाळी अथवा अभियांत्रिकीय उद्योगात तयार होणारा टाकाऊ पोलादी चुरा यांचा उपयोग केला जातो. घटकावर पडणाऱ्या भारानुरूप जाळी जाड वा बारीक वापरता येते. जाळी पसरवून तिच्यावर बारीक आकारमानाची खडी घातलेले काँक्रीट टाकून घटक बनवितात. जाळी सर्वदूर पसरवली असल्याने घटकाची जाडी कमी होऊन एकूणच बांधकामाचा खर्च कमी होतो. मात्र अजूनही काँक्रीटचा भारतात मोठया प्रमाणावर वापर होत नाही.

दुसऱ्या पद्धतीत टाकाऊ पोलादी चुरा काँक्रीटच्या इतर घटकांबरोबर योग्य त्या प्रमाणात मिसळवून काँक्रीट टाकले जाते. पोलादाचा चुरा सलग नसल्याने ताण प्रतिबल पेलण्याच्या दृष्टीने त्याचा फारसा उपयोग होत नाही. शिवाय घटकातील निरनिराळ्या भागांवर कमी जास्त प्रमाणात पडणाऱ्या भारानुरूप पोलादाचे प्रमाण बदलात येत नाही. त्यामुळे या काँक्रीटचा वापर फक्त काही ठराविक ठिकाणीच करता येतो.

प्रबलित काँक्रीटमधील पोलाद वाचवून किंमत कमी करण्यासाठी पोलादी सळयांऐवजी बांबूचा देखील वापर करतात. वेत व बांबू ताण प्रतिबल चांगल्या प्रकारे पेलू शकतात. मात्र वरच्या गुळगुळीत पृष्ठभागामुळे काँक्रीट व बांबू एकसंघ होण्यासाठी जास्त काळजी घ्यावी लागते. वेताचे व बांबूचे बल पोलादासारखे निश्चित व एकसारखे नसल्याने त्याचा उपयोग फारसा होत नाही.

काँक्रीटचे बल वाढविण्यासाठी सुताचे धागे, अभियांत्रिकीय उद्योगातील पोलादाचा चुरा, तंतुरूपका [⟶ काच, तंतुरूप] यांचाही उपयोग करतात. काँक्रीटचे मिश्रण तयार करतानाच हे धागे ठराविक प्रमाणात मिसळतात. मात्र अशा काँक्रीटला मोठ्या प्रमाणातील ताण प्रतिबल पेलता येत नाही.

प्लॅस्टिके : कार्बनी द्रव्यापासून नैसर्गिक वा कृत्रिम रीतीने ⇨ बहुवारिकीकरणाने साच्यात ओतता येतील अशी द्रव्ये बनविली जातात. त्यांना प्लॅस्टिके म्हणतात. त्यांतील मुख्य घटक बंधक (बहुवारिक), भरण पदार्थ (कार्बनी वा खनिज चूर्ण, धागे, कपडा वा तक्ता),⇨प्लॅस्टिकीकारक,घनीकरण प्रवेगक, (द्रव रेझिनाच्या घनीकरणाचा वेग वाढविणारी द्रव्ये) व रंग हे असतात.

बांधकामाचे साहित्य म्हणून उपयुक्त असे प्लॅस्टिकांचे अनेक गुणधर्म आहेत. प्लॅस्टिक वजनाला हलके (घनता ०.९ ते २.२ग्रॅ./सेंमी.३) असून त्यांचे संकोची बल जास्त (१,२००-२,०००किग्रॅ./सेंमी.२) असते. तसेच तक्त्याच्या स्वरूपात भरण पदार्थ असल्यास ताणबल १,५००किग्रॅ./ सेंमी.२ एवढे जास्त असते. भार पेलण्याची क्षमता व घनता यांचा गुणांक वीटकाम ०.२, काँक्रीट ०.०६, पोलाद ०.५, डयूराल्युमीन (ॲल्युमिनियमाची मिश्रधातू) १.६व प्लॅस्टिकच्या बाबतीत २ ते २.२असतो. प्लॅस्टिक गंजत नाही आणि त्यावर अम्ल व क्षार (अम्लाशी विक्रिया झाल्यास लवण देणारा पदार्थ अल्कली) यांचा परिणाम होत नाही. प्लॅस्टिके उष्णतारोधक असून त्यांना कोणताही आकार व रंग देता येतो, तसेच ती पारदर्शक व अपारदर्शक अशी बनविता येतात. कोळसा, खनिज तेल, चुनखडी, नैसर्गिक वायू व हवा यांसारख्या विपुल कच्च्या मालापासून प्लॅस्टिके बनविता येतात.

उष्णतारोधक, घर्षणरोधक, जलरोधक, पाण्यामुळे न फुगणे, टिकाऊ, बळकटपणा इ. गुणधर्मांमुळे प्लॅस्टिकांचा जमिनीसाठी उपयोग होऊ शकतो. त्यासाठी गुंडाळण्यायोग्य अशा तक्त्यांच्या स्वरूपात, जोडता येण्यासारख्या फरश्यांच्या व लाद्यांच्या स्वरूपात किंवा एकसंध जमिनीच्या स्वरूपात प्लॅस्टिके उपलब्ध आहेत.


भिंतींना गिलाव्याऐवजी गुंडाळण्यायोग्य असे प्लॅस्टिकाचे विविध रंगी पारदर्शक व अपारदर्शक तक्ते किंवा जोडता येतील अशा लाद्या वापरता येतात.

भारवाही घटक काचतंतू, कार्बनी काच, तक्ते इ. प्रबलक द्रव्ये प्लॅस्टिकामध्ये घालून बनवितात. यांशिवाय नळ, कठडयांचे आधाररूळ, कोनीय व इतर छेदीय आकाराच्या पट्ट्या, स्नानगृहातील भांडी इ. स्वरूपांत प्लॅस्टिकाचा उपयोग करतात.

प्लॅस्टिकाच्या वरील गुणधर्मांमुळे बांधकामात त्याचा वाढता उपयोग होत असून विपुल प्रमाणातील व स्वस्तातील उपलब्धता, सोपी, चटकन व कमी कष्टात करता येण्याजोगी जुडाई इत्यादींमुळे प्लॅस्टिकांचा उपयोग वाढत आहे. गुणधर्मांवर पूर्णपणे नियंत्रण ठेवता येत असल्याने प्लॅस्टिकांची विश्वासार्हता वाढली आहे. तसेच देखभालीचा व दुरुस्तीचा खर्चही कमी असून एकूण बांधकामास लागणारा वेळही कमी असतो. प्लॅस्टिकाच्या नळांचा पाणी वाहून नेण्यासाठी भारतात आता सर्रास उपयोग होऊ लागला आहे.

सागोळ : चुनखडी भाजून व काही प्रक्रिया करून तिच्यापासून तयार करण्यात येणाऱ्या चूर्णाला ‘सागोळ’ या व्यापारी नावाने ओळखतात. सिमेंटची कमतरता लक्षात घेऊन बांधकामात सिमेंटऐवजी सागोळचा उपयोग करतात. बांधकामासाठी सागोळ, वाळू व पाणी यांचे मिश्रण गारा म्हणून वापरतात. कारखान्यात तयार होत असल्याने त्याचे गुणधर्म नियंत्रित करता येतात.

सिमेंटसाठी लागणारा कच्चा माल पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने काही नवीन पदार्थांचा सिमेंट करण्याकडे उपयोग होऊ लागला आहे.

धातुमळी व दगडी कोळशातील अज्वलनशील धूलिकण : भट्टीत खनिजांपासून धातू तयार करताना धातुरसावर मळी जमा होते. ही पाण्याने लगेच थंड केल्यास काचेरी दाणे तयार होतात. त्याऐवजी हवेत थंड होऊ दिल्यास तिचे स्फटिकांत रूपांतर होते. दाणेदार धातुमळी सिमेंट तयार करण्यासाठी वापरतात. तसेच औष्णिक विद्युत् केंद्रात व इतर कारखान्यांत फार मोठया प्रमाणावर अज्वलनशील धूलिकण तयार होत असतात. धातुमळी आणि हे धूलिकण परस्पर विक्रियाशील नसतात. मात्र त्यांपासून बनविलेले सिमेंट घट्ट होत असताना नेहमीच्या सिमेंटपेक्षा जास्त घटकांची विक्रिया होऊन सिमेंटचे बल वाढते व पोलादी सळया गंजत नाहीत. धातुमळी २५ ते ६५% व अज्वलनशील धूलिकण १०ते २५% सिमेंटमध्ये वापरता येतात.

फॉस्फोजिप्सम : फॉस्फोरिक अम्ल तयार करताना फॉस्फोजिप्सम हा एक टाकाऊ पदार्थ मिळतो. तो पाण्यात सोडल्यास प्रदूषण वाढते व जमिनीवर टाकल्यास त्यामुळे जमिनीचा कस कमी होतो. सिमेंट तयार करताना याचा उपयोग केल्यास कॅल्श्यियम सल्फेट हा एक घटक तयार होतो. त्याची पाण्याची विक्रिया होऊन सिमेंटसारखाच घट्ट पदार्थ बनतो. यापासून पडदीसाठी लागणारे कमी वजनाचे तक्ते बनवितात.

अस्फाल्ट तक्ते : छतासाठी स्वस्तातले साहित्य म्हणून अस्फाल्टपासून बनविलेल्या तक्त्यांचा उपयोग होतो. तागाच्या कापडावर अस्फाल्ट व इतर पदार्थांचे मिश्रण ओतून व नंतर दाब देऊन हे तक्ते बनवितात. हे तक्ते टणक, लवचिक, जलनिरोधक, उष्णतारोधक व वजनाला हलके असल्याने छत,पडदी, आतली सजावट यांसाठी त्यांचा उपयोग होतो.

काष्ठ-लोकर सिमेंट फलक : लाकडाचा चुरा व सिमेंट यांपासून निरनिराळ्या जाडीचे फलक बनवितात. हे वजनाला हलके असून जास्त बळकट असतात. तसेच ते करवतीने कापता येतात, डकविता येतात, त्यांत खिळे ठोकता येतात किंवा स्क्रूही बसविता येतात. ते ध्वनिरोधक असून त्यांवर गिलावा करता येतो किंवा रंग लावता येतो. ॲस्बेस्टस-सिमेंट पत्रे किंवा प्लायवुड यांपेक्षा हे फलक स्वस्त असतात.

 


सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इन्स्टिटयूट : बांधकामाच्या सामग्रीत, तंत्रात व तिच्या संकल्पनात सुधारणा करण्यासाठी ही सरकारी संस्था भारतात रूडकी येथे १९५३ मध्ये स्थापन करण्यात आली. या संस्थेचे कलकत्ता येथे प्रयोग केंद्र आणि अहमदाबाद व भोपाळ येथे विस्तार केंद्रे आहेत. या संस्थेत अनेक प्रकारची नवीन सामग्री व तंत्रे विकसित करण्यात आली आहेत. त्यांची थोडक्यात माहिती खाली दिली आहे. जांभ्याच्या मातीपासून फक्त उन्हांत वाळविलेल्या विटा बनविता येतात. त्यांचे बल भाजलेल्या विटांप्रमाणेच असते. फक्त त्या पुरेशा जलरोधक नसल्याने त्यांना गिलावा करावा लागतो. चुना वा दगडी कोळशातील अज्वलनशील धूलिकण वापरून स्थिरीकरण केलेल्या मातीच्या विटाही पुरेशा बळकट असतात. दगडाच्या चिपा, चुरा व सिमेंट यांपासून बनविलेल्या काँक्रीटवर दाब देऊन पोकळ विटा बनविता येतात. बांधकामासाठी त्यांचा उपयोग होऊ शकतो. काथ्याचा टाकाऊ भाग, भाताचे तूस, भूईमुगाची टरफले यांपासून बनविलेले तक्त तावदाने व पडदी यासांठी वापरता येतात. काथ्याचा टाकाऊ भाग व सिमेंट यांपासून तयार केलेले तक्ते छप्परांसाठी वापरता येतात. मॅग्नेशियम ऑक्सिक्लोराइड सिमेंट व लाकडाचा भुसा वापरून दरवाजे-खिडक्यांच्या चौकटी तयार करता येतात.

प्रस्तुत संस्थेने विकसित केलेली सामग्री कमी खर्चाच्या घरबांधणीच्या दृष्टीने उपयुक्त आहे तथापि तिचा उपयोग सध्या तरी प्रायोगिक अवस्थेतच आहे.

पहा : अग्निरोधन, काँक्रीट कौले जलरोधीकरण पोलाद फरशी बांधकामाचे दगड लाकूड विटा.

  

संदर्भ :

    1. Chaudhari, N., Ed., Building Materials, Calcutta, 1966.

    2. Huntington, W.C. Building Construction: Materials and Types of Construction, New York, 1963.

    3. Knight, R.G. Knight, B.H. Builders Materials, London, 1963.

    4. Mantell, C.L. Ed., Engineering Materials Handbook, New York, 1958.

    5. McKay, W.B. Building Construction, 4 Vols. London, 1963.

    6. Merritt, F.S., Ed., Building Construction Handbook, New York, 1958.

    7. Pannell, J.P.M. Materials of Civil Engineering, London, 1957

    8. Rader, L., F., Ed., Materials of Construction, New York, 1956.

    9. Rangwala, S.C. Engineering Materials, Anand, 1969.

टोणगांवकर, अ. स.