संयोजक : (मॉर्टर). इमारती व घरे, पूल, बोगदे, रस्ते, बंदरे, विमानतळ, दीपगृहे, भट्टया इत्यादींचे बांधकाम करताना मातीच्या विटा, भाजलेल्या विटा, दगड, चिरे, फरश्या, काँक्रीटचे ठोकळे, उच्च्तापसह विटा, तुळया, खांब इ. घटक वापरतात. हे घटक जोडण्यासाठी संयोजक वापरतात. या घटकांच्या पृष्ठभागावर संयोजक पसरून लावतात व त्यावर दुसरा घटक ठेवून दाबतात. संयोजक या दोन पृष्ठभागांना चांगला चिकटतो. तो कठिण होऊन हे घटक एकमेकांना चिकटून एकसंध असा जोड निर्माण होतो. असे आडवे व उभे जोड निर्माण होऊन अखंड व दृढ बांधकाम रचना तयार होते (उदा., भिंती, इमारती इ.) अशा रीतीने या जोडांमुळे या रचनेला मूळ घटकांइतके बल व टिकाऊपणा प्राप्त होतो. अशा प्रकारचे जोड तयार करण्यासाठी विविध उत्तम संयोजकांची आवश्यकता असते. माती, पांढरीची माती, चुना, सिमेंट, जिप्सम, केरी (सिंडर), विटांचा व कौलांचा चुरा, अर्धवट जळालेल्या कोळशाची भट्टीतून मिळणारी राख, कॅल्शियम ॲल्युमिनेट या एका व अनेक घटकांचे (संमिश्र) संयोजक वापरतात. बांधकामातील घटक जोडण्याप्रमाणेच गिलावा करणे, खाचखळगे व दरजा भरणे, जलाभेदय करणे इ. कामांसाठी संयोजक बांधकामात वापरतात.

कणांच्या आकारमानाची सूक्ष्मता, रासायनिक संघटन, ताणबल, संपीडन (दाब) बल, आळण्याची (घट्ट होऊन कठीण बनण्याची) त्वरा व काळ यांच्या चाचण्या घेऊन संयोजकाचे बल मोजतात. अपेक्षित मानकांनुसार संयोजकांच्या चाचण्यांची क्षमता पुढीलप्रमाणे असावी लागते. ताणबल हे एका दिवसानंतर दर चौ. सेंमी.ला २० किगॅ. पेक्षा कमी आणि तीन दिवसां-नंतर दर चौ. सेंमी.ला २५ ते ३० किगॅ. पेक्षा कमी नसावे. तसेच एक भाग सिमेंट व तीन भाग वाळू असणाऱ्या संयोजकाचे संपीडन बल तीन दिवसां-नंतर दर चौ.सेंमी.ला १५० किगॅ. आणि सात दिवसानंतर दर चौ. सेंमी.ला १७७ किगॅ. असावे.

संयोजकांचे गुणधर्म व कार्यकारी विनिर्देश यांनुसार वेगवेगळे प्रकार करतात. बांधकामाच्या रचनाविषयक गरजा, जोडावयाच्या घटकांचा प्रकार, बांधकाम आतले आहे की बाहेरचे इ. गोष्टी विचारात घेऊन नेमका संयोजक निवडतात. यामुळे संयोजकाचे उचित संघटन निवडले जाते. उदा., आगरोधी उच्च्तापसह विटांच्या बांधकामासाठी लागणारा संयोजक त्या विटांप्रमाणेच उच्च तापमानाला तग धरणारा आणि रासायनिक विक्रिया व झीज यांत टिकून राहणारा असावा लागतो. त्यात कॅल्शियम ॲल्युमिनेट, सिमेंट, पाणी व या विटांच्या संघटनासारख्या द्रव्याची बारीक पूड हे घटक असतात. उच्च्तापसह विटांदरम्यानच्या सांध्याची (जोडाची) जाडी १.५ मिमी.पर्यंत असते. या विटा संयोजकात बुडवितात व नंतर एकमेकींवर जोराने दाबतात. यामुळे अतिशय पातळ सांधे तयार होतात. संयोजकांचे प्रमुख प्रकार पुढील आहेत :

मातीच्या संयोजकासाठी पांढरीची माती चांगली असून तिचा चिखल करून तो तुडवून संयोजक बनवितात. चिवट, सूक्ष्मकणी व जैव पदार्थ नसलेली चिकण मातीही संयोजक बनविण्यासाठी वापरतात. मात्र निखळ काळी चिकण माती संयोजकासाठी चांगली नसते. माती व वाळू एकत्र करून व त्यात योग्य प्रमाणात पाणी घालून चिखल करतात व तो तुडवून चांगला मळतात. तो चिकट होण्यासाठी बऱ्याचदा त्यात डिंक व घायपाताची भुकटी मिसळ- तात. गिलाव्याकरिता त्यात गवताचे व वाखाचे तुकडे, लीद व शेण घालून हे मिश्रण एक आठवडा कुजवून संयोजक बनवितात. मातीचा संयोजक कमी महत्त्वाचा असून तो कमी भाराच्या बांधकामांसाठी वापरतात. प्राचीन काळी ईजिप्त, मेसोपोटेमिया, भारत व गीस येथे हा संयोजक वापरीत. भारतात अजूनही काही ठिकाणी गामीण भागांत मातीचा संयोजक वापरतात.

तिखट चुना (७० टक्के कॅल्शियम ऑक्साइड- CaO), दमट (ओला) चुना (६० टक्के चुना व २५ टक्के सिलिका- वाळू) व चुनकळी चुन्याच्या संयोजकात वापरतात. चुन्याचे खडे (चुनखडी) ९००° ते १२००° से. पर्यंत तापवून व त्यात पाणी घालून बनविलेले द्रव्य सुकवून व दळून गुळगुळीत व मुलायम चुनकळी मिळते. भट्टीतून काढलेली चुन्याची भुकटी (फकी) पंधरा दिवसांच्या आत वापरतात. तिखट चुन्याची फकी व वाळू यांचा संयोजक आळण्यास वेळ लागतो व पाण्याच्या सान्निध्यात तो खराब होतो. म्हणून त्यात सुरखी (माती भाजून किंवा भाजलेल्या विटांचा किंवा कौलांचा चुरा) घालून दमट चुना बनवितात. सुरखी, तिखट चुन्याची फकी व पुरेसे पाणी घालून घाणीत हे मिश्रण दोन-तीन दिवस चांगले मळतात. मग त्यात वाळू घालून ते पुन्हा तेवढेच मळून संयोजक बनवितात. त्याची मजबुती व चिकणाई वाढविण्यासाठी कधीकधी त्यात गूळ, हिरडे, बेलफळ, कात वगैरे घालीत. चुन्याचा संयोजक ३६ तासांत ओलसर ठेवून वापरावा लागतो.

गिलाव्यासाठी एक भाग तिखट चुना व तीन-चार भाग वाळू घाणीत मळून व एक आठवडा मुरवून संयोजक वापरतात. दमट चुना वापरल्यास एका आठवडयानंतर त्यात ५-१० मिमी. लांबीचे वाखाचे तुकडे टाकून तो पुन्हा मळतात. मळलेला चुना ढीग करून ३०-४० दिवसांपर्यंत साठविता येतो. १० ते २० टक्के चुनखडी असलेली माती भाजून बनविलेली सुरखी जास्त चांगली असते. सुरखी वापरल्याने संयोजक मजबूत होतो आणि लवकर आळून घट्ट होतो.

संयोजकात मिसळावयाची वाळू स्वच्छ व खरखरीत असावी. तिच्यात मातीचे प्रमाण ४ टक्क्यांहून जास्त नसावे. ५ मिमी. पेक्षा जाड वाळू संयोजकात वापरीत नाहीत. गिलाव्याच्या संयोजकात अधिक बारीक वाळू वापरतात.

चुना व केरी समप्रमाणात वापरून बनविलेल्या केरी संयोजकाचे बल बेताचे असते. केरी उपलब्ध असणाऱ्या ठिकाणी याची निर्मिती स्वस्त पडते. जादा भाजलेल्या व वाया जाणाऱ्या विटांच्या तुकडयांचा चुरा, चुना व पाणी यांपासून बनविलेला संयोजक मध्यम बलाचा असतो. छताच्या गळतीसारख्या ठिकाणी हा जलरोधी संयोजक उपयुक्त ठरतो. भट्टीतून निघणाऱ्या वायुप्रवाहांव्दारे वाहून नेल्या जाणाऱ्या सूक्ष्मकणी अज्वलनशील गाळाला हवाई (उडणारी) राख (फ्लाय ॲश) म्हणतात. चुना, वाळू व त्याच्या दुप्पट ही राख वापरून काळा संयोजक तयार करतात. जेथे अशी राख उपलब्ध असते, तेथे हा संयोजक स्वस्त पडतो.

चुन्याच्या संयोजकात सिमेंट घालून बनविलेला संमिश्र संयोजक सामान्यत: भिंतीच्या आतील गिलाव्यासाठी वापरतात. तो आकार्य व मजबूत असून सर्वत्र व्यवस्थित बसतो. हवेत चुन्याचे कार्बनीभवन होऊन तो अधिक बळकट होतो. एकेकाळी चुन्याचा गिलावा सर्वाधिक वापरला जात असे.

तिखट चुना घट्ट चिखलासारखा होईल इतपत पाणी घालून तो लोण्या-सारखा मऊ होईपर्यंत मळतात. तो गाळून टाकीत पाण्यात बुडून राहील असा दहा दिवस ठेवतात. चुन्यावरील निवळी काढून त्यात पाव भाग बारीक वाळू व चुन्याच्या दर घ.मी.ला ३ किगॅ. वाखाचे बारीक तुकडे घालून मळतात. या संयोजकाला नीरू म्हणतात. तो पंधरा दिवसांपर्यंत ओलसर ठेवून वापरता येतो.

सिमेंटचा संयोजक सर्वाधिक वापरला जातो. सामान्य पोर्टलँड सिमेंट, लवकर आळणारे मजबूत सिमेंट, कमी उष्णता निर्माण करणारे सिमेंट इ. प्रकारचे सिमेंट कारखान्यात तयार केले जाते. सिमेंट व स्वच्छ वाळू कोरडीच मिसळून त्यांत हळूहळू पुरेसे पाणी घालून घट्ट रबडीसारखे होईपर्यंत ते कालवितात. मग हे मिश्रण यांत्रिक मिश्रकाने वा यंत्राने अथवा जमिनीवर माणसांकडून मळून घेतात. यातून तयार झालेले आकार्य व काम करण्यायोग्य मिश्रण अर्ध्या तासात वापरतात. नंतर हा संयोजक चौदा दिवस ओलसर राहण्यासाठी त्याच्यावर पाणी मारतात. विविध प्रकारच्या संयोजकांसाठी लागणाऱ्या संयोजकांमधील सिमेंट, वाळू व चुना यांचे प्रमाण वेगवेगळे असते. अशा पुढील संयोजकांमध्ये सिमेंट एकभाग असून इतर घटक वेगवेगळ्या प्रमाणात असतात. उदा., सामान्य बांधकामासाठी वाळू सहा भाग, जादा मजबूत बांधकामासाठी वाळू चार भाग, जलरोधी बांधकामात वाळू तीन भाग, पाण्याच्या टाकीच्या आतील गिलाव्यासाठी वाळू एक भाग, भिंतीच्या गिलाव्यासाठी (बारीक) वाळू सहा भाग व चुना एक भाग अथवा वाळू नऊ भाग व चुना दोन भाग वगैरे. विटांच्या एक घ.मी. बांधकामासाठी ०.३ घ.मी., तर तेवढ्या दगडी बांधकामासाठी अंदाजे ०.३३ घ.मी. संयोजक लागतो. फरशी बसविण्यासाठी पुष्कळच कमी संयोजक लागतो.

सिमेंट संयोजकाचा काँक्रीटशी निकटचा संबंध असतो. मात्र गाऱ्याप्रमाणे संयोजकात काँक्रीटप्रमाणे भरड तुकडे नसतात. काँक्रीट व गारा यांच्यातील कॅल्शियम सिलिकेटावर आधारित रासायनिक कियांप्रमाणेच संयोजकातील रासायनिक कार्य चालते. म्हणजे या प्रक्रियेत घटकांदरम्यान जोड निर्माण होऊन हवामानरोधी व एकसंध पृष्ठभाग तयार होतो. यांमुळे संयोजक आळण्याचा कालावधी, तो कठिण होण्याची त्वरा, जलधारणक्षमता आणि व्यवहार्यता या गुणांची पूर्तता होऊ शकते.

सिमेंट, वाळू व जिप्सम मिसळून जिप्सम संयोजक बनवितात. यासाठी जिप्समाचे खडक ४००° से.पर्यंत तापवितात. त्यानंतर दळून त्याची सूक्ष्मकणी पूड तयार करून घेतात व ती संयोजकात वापरतात. जिप्समामुळे संयोजक कठिण, लवकर (१ ते ४ तास) घट्ट होणारा, वजनाला हलका व आग प्रतिरोधक होतो. तो आग प्रतिरोधनाप्रमाणेच ध्वनिरोधनासाठीही वापर- तात. चित्रपटगृह, नाटयगृह, सभागृह यांतील ध्वनिकीय व्यवस्थेसाठी भिंतींच्या आतील गिलाव्यासाठी तो वापरतात.

सिमेंट, चुना व वाळू सिमेंट, वाळू व जिप्सम चुना, वाळू व नीरू सिमेंट, चुना, वाळू व संगमरवराचे बारीक कण या मिश्रणांव्दारे निरनिराळे संमिश्र संयोजक बनवितात. असे व्यापारी संमिश्र संयोजक तयार स्थितीत उपलब्ध असतात. त्यांत केवळ पाणी घालून ते विविध उपयोगांसाठी वापरता येतात. कारण त्यांत सिमेंट, चुना, वाळू यांच्याशिवाय जलाभेदयकारक द्रव्ये, बंधक रसायने, आकार्यता आणणारी द्रव्येही असतात.

इ. स. १९८३ मधील राष्ट्रीय बांधकाम संकेतांमध्ये बलानुसार संयोजकांचे उच्च बलाचा (H) , मध्यम बलाचा (M) व कमी बलाचा (L) , तसेच चुन्याच्या संयोजकांचे दमट चुन्याचा (A) , अर्ध-दमट चुन्याचा (B) व तिखट चुन्याचा (C) असे प्रकार केले आहेत. यांचे उपप्रकारही केले आहेत.

बांधकामाचे बल हे त्यातील दगड, विटा यांच्या बलाप्रमाणेच बांधकामासाठी वापरलेल्या संयोजकावरही अवलंबून असते. कारण संयोजकाचा प्रकार व त्याचे बल यांचा बांधकामाच्या बलावरही परिणाम होतो. उदा., चुन्याच्या संयोजकापेक्षा सिमेंटच्या संयोजकातील बांधकाम बरेच मजबूत असते. थोडक्यात बांधकाम साहित्याप्रमाणेच संयोजक हाही महत्त्वाचा घटक आहे. कारण बांधकाम साहित्याच्या बलाप्रमाणेच संयोजक व त्याचे बल बांधकामातील प्रभावशाली घटक आहे.

बांधकामाचे अपेक्षित बल, उपलब्ध बांधकाम साहित्य, वास्तूचा प्रकार, हवामान व वातावरणाचा प्रकार आणि येणारा खर्च यांवर संयोजकांचे निर-निराळे प्रकार अवलंबून असतात. कमी खर्चात आणि आहे त्याच साहित्यात अधिक मजबूत बांधकाम करणे व बांधकामासाठी लागणाऱ्या वेळाची बचत करणे हे उद्देश नजरेसमोर ठेवूनच संयोजकांविषयीचे संशोधन सतत चालू असते. यातून संयोजकांचे नवनवे प्रकार उपलब्ध होत असतात.

पहा : इमारती व घरे काँक्रीट गवंडीकाम चुना सिमेंट.

ठाकूर, अ. ना.