वाहितमल : मानवी वसतिस्थानात असलेले संडास, स्नानगृहे, स्वच्छतास्थले यांमधून तसेच पाळीव जनावरांच्या गोठ्यांतून येणारे घन पदार्थ मिश्रित द्रव आणि कारखान्यामधून वापरलेले सांडपाणी व त्याबरोबर येणारे अनुपयुक्त पदार्थ आणि पाऊस पडल्यावर रस्त्याकडेच्या गटारांमधून वाहणारे पाणी या सर्वांस वाहितमल (निरुपयोगी द्रव्ये वाहून नेणार द्रव) ही सामान्य संज्ञा वापरतात. वाहितमलासंबंधी विचार करताना त्यामागील विकसनविषयक दृष्टिकोन, त्यांचे वर्गीकरण, गुणात्मक व परिमाणात्मक विश्लेषण, नमुना घ्यावयाच्या पद्धती, महत्त्वाची परीक्षणे, संकलन, संस्करण व विल्हेवाट इ. गोष्टी सर्वसामान्यपणे विचारात घ्याव्या लागतात. यांपैकी संकलन, संस्करण व विल्हेवाट तसेच ऐतिहासिक माहिती या मुद्यांचा ऊहापोह ‘वाहितमल संस्करण व विल्हेवाट’ या नोंदीत केला असून प्रस्तुत नोंदीत अन्य मुद्दे विचारात घेतले आहेत.

विकसनविषयक आकृतिबंध : पूर्वीच्या काळी मानव अथवा पशूंच्या वसतिस्थानांतून निर्माण होणाऱ्या विष्ठेचे संकलन दिवसातून एकदोनदा मनुष्यांमार्फतच केले जाई व अन्य ठिकाणी नेऊन त्यावर संस्करण केले जाई, तर इतर सांडपाणी घरापासून थोड्या अंतरावरील कुंडीत साठवून जमिनीत जिरवले जाई. तसेच झाडे लावून त्यांना ते दिले जाई परंतु जसजशी मानवी वसतिस्थाने व तेथील रहिवाशांची संख्या वाढू लागली, तसतशा वरील पद्धतीत अनेक अडचणी येऊ लागल्या. तसेच अशा प्रकारची घाण कामे माणसांमार्फत करू नयेत, हा सामाजिक प्रतिष्ठेची व कायदेशीर विचारसरणी पुढे आली. यामुळे विष्ठा, मूत्र व अन्य सांडपाणी भुयारी गटारांद्वारे दूरवर नेऊन तेथे त्यावर संस्करण करून त्यांची विल्हेवाट लावण्याची कल्पना पुढे आली. या पद्धतीत विष्ठा, मूत्र व इतर सांडपाणी पाण्याच्या प्रवाहाबरोबर विश्ष्ट ठिकाणी वाहून न्यावयाचे असल्याने या पद्धतीला जलवाहक तंत्र पद्धती असेही म्हणतात. अशा पद्धतीकरिता पाण्याचा कमीत कमी पुरवठा हा साधारपणे दररोज दरमाणशी १३५ लिटर इतका असावा लागतो. तसेच दररोज साधारण ५० ते ६० हजार एवढ्या लोकांसाठी ही तंत्र पद्धती र्थिक दृष्ट्या सुसाध्य होते. भारतातील बहुतेक मोठ्या शहरांत अशा प्रकारची पद्धती प्रचलित असून तीत दिवसेंदिवस वाढ होत आहे व इतर शहरांत तिचा वापर करणे आवश्यक होत आहे.[⟶ भुयारी गटार].

वर्गीकरण : वाहितमल जेथून येते त्या स्थानानुसार त्याचे वर्गीकरण करतात. यानुसार मुख्यतः खालील तीन प्रकारच्या वाहितमलांचा विचार होतो.

(१)मानवी वसतिस्थानांतून येणारे वाहितमल : घरे, हॉटेले, कार्यालये, रुग्णालये इत्यादींमधील मुख्यतः संडास, स्नानगृहे, स्वच्छता स्थले इ. ठिकाणी वापरलेले पाणी, तसेच विष्ठा, मूत्र इ. पाण्याबरोबर वाहत येणारी द्रव्ये यात येतात. स्नानगृहे, स्वच्छता स्थले इ. ठिकाणांहून येणारे पाणी हे कमी अपायकारक व कमी दुर्गंधीयुक्त असल्याने त्याला सांडपाणी अशी वेगळी संज्ञा आहे. पण भुयारी गटारांतून सांडपाणी व वाहितमल हे एकत्र वाहत असतात. वहितमलाचे परिमाण हे मुख्यतः पाणीपुरवठ्यावर अवलंबून असते. अशा प्रकारचे एकत्रित वहितमल दुर्गंधीयुक्त असून शिवाय त्यामध्ये रोग प्रसारक सूक्ष्मजंतूही असल्याने त्यावर योग्य ते संस्करण करून त्याची ताबडतोब विल्हेवाट लावणे आवश्यक ठरते.

(२) औद्योगिक द्रव अपशिष्ट : निरनिराळ्या कारखान्यांतील व औद्योगिक वसाहतींतील सांडपाणी व त्याबरोबर येणारे निरुपयोगी पदार्थ यांचाही औद्योगिक वहितमलात समावेश होत असला, तरी विविध प्रकारच्या कारखान्यांतून (उदा., अलकोहॉल व मद्य, लोखंड व पोलाद, रंगलेप, औषधिद्रव्ये, कागद, साखर वगैरेंचे कारखाने) येणाऱ्या सांडपाण्यातील वहितमलाचे गुणधर्म व परिणाम हे अत्यंत भिन्न असल्याने त्याला औद्योगिक द्रव अपशिष्ट (अपशिष्ट म्हणजे टाकाऊ पदार्थ) अशी स्वतंत्र संज्ञा वापरतात. औद्योगिक द्रव अपशिष्टाचे संकलन व संस्करण करणे कठीण व खर्चाचे असल्याने प्रत्येक कारखान्याने तेथील द्रव अपशिष्टाचे गुणधर्म व प्रमाण यांच्यानुसार स्वतंत्र रीत्या संस्करण करून ते निरुपद्रवी करण्याची जबाबदारी घेणे आवश्यक असते [⟶ औद्योगिक अपशिष्ट]. जलप्रदूषण कायद्यान्वये ही बाब संबंधित कारखान्यावर बंधनकारक असते [⟶ प्रदूषण].

(३) पावसाच्या पाण्यामार्फत येणारे वाहितमल : रस्त्यावर व इतर भागांवर पाऊस पडून त्यावरील घाण व केरकचरा पावसाच्या पाण्याबरोबर वाहून रस्त्याकडेच्या गटारांमध्ये येतो. यालाच पावसामुळे येणारे वहितमल असे म्हणतात. या वहितमलात अपायकारक पदार्थ कमी प्रमाणात असल्याने व जेव्हा पाऊस पडेल त्याच वेळी वहितमल येत असल्याने पुष्कळ वेळा यांचे सकंलन करण्याकरिता स्वतंत्र भुयारी गटारांची योजना करतात [⟶ भुयारी गटार]. वहितमलाचे वरीलपैकी दोन अथवा अधिक अधिक प्रकार एकत्रित होऊन गटारांतून वाहत असतील, तर त्यास एकत्रित वहितमल असे म्हणतात. वहितमल व औद्योगिक अपशिष्ट यांचे परिमाणात्मक व गुणात्मक विश्लेषण करणे जरूर असते. कारण त्यांद्वारा त्याचे गुणधर्म व परिमाण कळल्याने त्यावर करावयाचे संस्करणम ठरविणे व निरुपद्रवी झालेल्या वहितमलाची विल्हेवाट लावणे सोपे जाते.

वाहितमलाचे परीक्षण : वहितमलात अल्प प्रमाणात अशुद्धी असतात. या अशुद्धींचा परिणाम काय होतो हे जाणून घेण्यासाठी वहितमलाचे परीक्षण करतात. वहितमलाची गुणवैशिष्ट्ये, संघटन व स्थिती समजण्यासाठी निरनिराळ्या परीक्षांची मदत होते. भौतिक परीक्षा, घन पदार्थाचे प्रमाण व जैव वा कार्बनी द्रव्यासाठी असणारी ऑक्सिजनाची गरज निश्चित करणाऱ्या परीक्षा, रासायनिक व सूक्ष्मजंतूंविषयीच्या परीक्षा व सूक्ष्मदर्शकाद्वारे परीक्षण या मार्गांनी वहितमलाचे परीक्षण करतात. यांपैकी काहींची माहिती पुढे दिली आहे.

वाहितमलाचे परिमाणात्मक विश्लेषण : वहितमलाचे एकूण परिमाण काढण्यासाठी मुख्यतः मानवी वसतिस्थानाला अथवा कारखान्याला होणारा एकूण पाणीपुरवठा, त्याच्या वेळा इत्यादींचा विचार होतो [⟶ पाणीपुरवठा]. एकूण पाणीपुरवठ्यापैकी काही पाणी वागांना देण्याकरिता, आग विझवण्यासाठी वापरले जाते. तसेच पाणीपुरवठा करताना काही पाण्याची गळती होते व काही पाण्याचे बाष्पीभवन होते. अशा प्रकारे पाणीपुरवठ्याच्या १० ते १५ टक्के पाणी वरील करणांकरिता वापरले जाईल, असे धरून मानवी वसतिस्थानांमधून येणाऱ्या वहितमलाचे व औद्योगिक द्रव अपशिष्टाचे परिमाण ठरवितात. जेव्हा मलवाहिन्यांचे स्थान जमिनीखालील सर्वसाधारण जलस्तराच्या पातळीखाली असते, तेव्हा मलवाहिन्यांमध्ये भूमिजल शिरण्याचा संभव असतो. तसेच तपास कुंड्यांच्या बांधकामातून व वाहिन्यांच्या कच्च्या किंवा भेगा पडलेल्या सांध्यांमधून भूमिजल मलवाहिन्यांत शिरू शकते. अशा प्रकारे साधारणपणे वाहिन्यांच्या प्रत्येक किमी. लांबीत रोज अंदाजे ६,००० ते १५,००० लिटर इतके पाणी झिरपून येईल, असे धरतात. पावसामुळे येणाऱ्या वाहितमलाचे एखाद्या मलवाहिनीच्या ठिकाणी असणारे परिमाण पावसाची तीव्रता, त्या वाहिनीमध्ये निचरा करणाऱ्या सभोवतालच्या प्रदेशाचे क्षेत्रफळ, त्या प्रदेशाची पाणी वाहून नेण्याची क्षमता इ. गोष्टींवर अवलंबून असते [⟶ भुयारी गटार].


वाहितमलाचे व औद्योगिक अपशिष्टांचे गुणात्मक विश्लेषण : वाहितमल व औद्योगिक अपशिष्ट यांच्यावर संस्करण करून ते निरुपद्रवी करणे जरूर असल्याने त्यांमध्ये असलेल्या घन व द्रव पदार्थांचे अनेक दृष्टींनी गुणात्मक विश्लेषण करणे अतिशय महत्त्वाचे ठरते. सर्वसाधारणपणे वाहितमलाचे व औद्योगिक अपशिष्टांचे खालील तीन प्रकारे विश्लेषण करावयाची पद्धत करावयाची पद्धत आहे.

भौतिक विश्लेषण : साधारणपणे वाहितमलामध्ये पाण्याचे वजनी प्रमाण ९५ ते ९७ टक्के असते. उरलेले २ ते ५ टक्के समद्र म्हणजे सर्व प्रकारचे घन पदार्थ असतात. यांमध्ये मुख्यतः विष्ठा, राख, माती, कोळसे, कागद, चिंध्या इ. असतात. हे पदार्थ पाण्यामध्ये विरघळलेल्या, तरंगणाऱ्या अथवा अर्धवट बुडालेल्या स्वरूपात असतात. तसेच या घन पदार्थाचे स्वरुप हे विद्राव्य-अविद्राव्य (विरघळणारे-न विरघळणारे), बाष्पनशील-अबाष्पनशील (वाफेच्या रूपात उडून जाणारे-न उडून जाणारे), गाळारूपात खाली बसण्याजोगे-न बसण्याजोगे अशा प्रकारचे असते. वाहितमलाच्या विविध परीक्षा करून वरील प्रकारच्या घन पदार्थांचे परिमाण काढणे आवश्यक असते.

यांशिवाय भौतिक गुणधर्मात वाहितमलाचे तापमान, वास, रंग, गढूळपणा इ. गुणात्मक विश्लेषणाच्या परीक्षा करणे आवश्यक असते. सर्वसाधारण प्रकारचे ताजे वाहितमल करडसर रंगाचे व काहीसे अपारदर्शक असून त्याला थोडासा दर्प असतो व त्याचे तापमान साध्या पाण्यापेक्षा किंचित अधिक असते. कार्बनी द्रव्याच्या अपघटनामुळे (कुजण्याने) वाहितमल गडद रंगाचे बनते व त्याला विशिष्ट कुजकट दुर्गंधी येते.

रासायनिक विश्लेषण : वाहितमलात असलेल्या घन पदार्थांचे रासायनिक विश्लेषणाच्या दृष्टीने कार्बनी व अकार्बनी असे दोन भाग पडतात. अकार्बनी पदार्थ हे मुख्यतः अस्थिर स्वरुपाचे असल्याने प्रथम त्याच्या परिमाणत्मक विश्लेषणाच्या परीक्षा करणे जरूर असते. या संदर्भात खालील मुख्य परीक्षा घेतात.

(१)नायट्रोजनाची राशी : वाहितमलात असणारा नायट्रोजन हा मुख्यतः प्रथने, यूरिया इ. संयुगांत असतो. त्यामुळे मुक्त अमोनिया, जैव नायट्रोजन, नायट्रेट, नायट्राइटे इ. परीक्षांद्वारे नायट्रोजनाचे प्रमाण व स्थिती अजमावता येते.

(२)विद्राव्य ऑक्सिजनाची एकूण गरज : वाहितमलातील अस्थिर अकार्बनी घटकांचे स्थिरीकरण करण्यासाठी विद्राव्य ऑक्सिजनाची जरूरी असते. ऑक्सिजनाची एकूण गरज पुढील दोन प्रकारच्या प्रक्रियांत विभागली जाते : (अ) रासायनिक प्रक्रियेमधील ऑक्सिजनाची गरज व (आ) जीवरासायनिक प्रक्रियेतील ऑक्सिजनाची गरज.

वाहितमलातील रासायनिक विक्रिया ह्या मुख्यतः तात्कालिक स्वरूपाच्या असल्याने त्यांकरिता लागणारी विद्राव्य ऑक्सिजनाची गरज थोड्या वेळेपुरतीच म्हणजे १-२ तासांपुरतीच असते पण जीवरासायनिक प्रक्रियेतील ऑक्सिजनाची गरज दीर्घ काळाची म्हणजे मुख्यतः ५ ते ७ दिवसांपर्यंत अथवा अधिक काळासाठी असल्याने फारच महत्त्वाची ठरते.

(३) पीएच मूल्य : वाहितमल निर्माण झाल्यापासून त्यामध्ये रासायनिक व जीवरासायनिक क्रिया सतत चालू राहतात. यांचा वाहितमलाच्या पीएच मूल्यावर [⟶ पीएच मूल्य] परिणाम होतो. त्यामुळे वाहितमलाचे पीएच मूल्य काढणे अत्यंत जरूरीचे असते. वाहितमलाच्या संस्करण पद्धतीत अनेकविध जीवरासायनिक क्रिया असतात. अशा प्रकारच्या क्रियांना ६ ते ८ एवढ्या पीएच मूल्याची आवश्यकता असते. वाहितमलाचे पीएच मूल्य वरील मर्यादेपेक्षा कमी वा अधिक झाल्यास ते ओळखून त्याचा ताबतोब बंदोबस्त करावा लागतो. 

वरील चाचण्यांशिवाय क्लोराइडाची गरज फिनॉल्प्थॅलीन व मिथिल ऑरेंज ही दर्शक द्रव्ये [⟶ दर्शके] वापरून काढलेली क्षारता [विद्रावात हायड्रॉक्सिल आयनाचे (OH)- विद्युत् भारित अणुगटाचे-जादा प्रमाण असण्याची स्थिती] उर्वरित क्लोरीन, वसा व तेलकट पदार्थ यांची तौलनिक स्थिरता वाहितमलात पारा, क्रोमियम, शिसे, तांबे थवा अतर धातूंची विषारी संयुदे आहेत का व असल्यास किती प्रमाणात आहेत याची तपासणी तसेच किरणोत्सर्गी (भेदक कण वा किरण बाहेर टाकणाऱ्या) पदार्थांच्या अस्तित्वाबद्दलच्या परीक्षा इ. परीक्षणे जरूरीप्रमाणे करावी लागतात.

सूक्ष्मजंतुशास्त्रीय विश्लेषण : औद्योगिक अपशिष्टांमध्ये रोगकारक सूक्ष्मजंतू व इतर अनेक प्रकारचे उपयोगी सूक्ष्मजीव असतात. वाहितमलावर संस्करण करण्यास उपयोगी पडणारे सूक्ष्मजीवजंतूंचे तीन गट असतात वायुजीवी (जीवनविषयक प्रक्रिया चालू ठेवण्यासाठी हवेची वा मुक्त ऑक्सिजनाची गरज असणारे), अवायुजीवी (जीवनविषयक प्रक्रियांसाठी हवेची वा मुक्त ऑक्सिजनाची गरज नसणारे) व वैकल्पिक जीवी (हवा किंवा मुक्त ऑक्सिजन असताना अथवा नसतानाही जगू शकणारे) हे तीन प्रकार होत. वाहितमलाचे सूक्ष्मजंतूमुळे झालेल्या प्रदूषणाचे प्रमाण काढण्यासाठी मुख्यतः एश्वेरिक्या कोलाय या सूक्ष्म जंतूच्या गुणात्मक व परिमाणात्मक परीक्षा घेतात व त्यांद्वारे सूक्ष्मजीवांची सर्वांत जास्त येणारी संभवनीय संख्या (उदा., १००) देतात.

सूक्ष्मदर्शकीय परीक्षण : सामान्यतः कच्च्या वाहितमलाच्या सूक्ष्मदर्शकीय परीक्षा करीत नाहीत. सूक्ष्मदर्शकीय परीक्षांचा उपयोग संस्करण करताना होतो. शैवले, आदिजीव (प्रोटोझोआ), सूक्ष्मजंतू, कवक (हरितद्रव्यरहित सूक्ष्म वनस्पती), रोटिफर व कृमी हे सूक्ष्मजीव वाहितमलात आहेत की नाहीत, हे निश्चित करण्यासाठी सूक्ष्मदर्शकाने परीक्षण करतात.

वाहितमलाचा नमुना घेण्यासाठी पद्धत : वाहितमल अथवा औद्योगिक अपशिष्ट याच्या परीक्षा घेण्यासाठी त्याचे योग्य प्रकारे प्रतिनिधिक नमुने घेणे गरजेचे असते. याचे कारण वाहितमलाचे गुणधर्म हे काळ, वेळ, ठिकाण, खोली, प्रकार इ.नेक गोष्टींवर अनलूंन असतात.

नमुना घेण्यासाठी अतिशय स्वच्छ काचेची २०० ते १,००० मिली. क्षमतेची बाटली घेऊन तिच्यात वाहितमलाच्या पृष्ठापासून निम्म्या खोलीवर बाटलीमध्ये हवेचे बुडबुडे राहणार नाहीत एवढी काळजी घेऊन आणि पूर्ण बाटली भून वाहितमलाचा नमुना घेतात. नमुना घेऊन बाटलीचे झाकण घट्ट बंद करून त्यावर नमुन्याची तारीख, वेळ, स्थल खोली इ. बाबींची नोंद करून नमुना प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवतात. तपासणीसाठी पाठविलेल्या नमुन्यात काही बदल होऊ नयेत म्हणून ते शीचपेटीत जतन करतात.


महत्त्वाच्या गुणात्मक परीक्षा : वाहितमलावर अथवा औद्योगिक अपशिष्टावर करावयाच्या काही गुणात्मक परीक्षांची माहिती थोडक्यात खाली दिली आहे.

(१)घन पदार्थाच्या परीक्षा : समग्र म्हणजे निलंबित व विरघळलेल्या घन पदार्थांच्या भोतिकीय परीक्षेसाठी २०० ते ३०० मिली. एवढा वाहितमलाचा नमुना मुशीसारख्या भांड्यात घेऊन तो साधारण १०३º से. तापमानात कोरडा होईपर्यंत तापवून व नंतर गार करून त्याचे वजन घेतात. अशा प्रकारे काढलेले वजन हे समग्र घन पदार्थांचे असते.

समग्र घन पदार्थ हे पेटीच्या आकाराच्या विशिष्ट प्रकारच्या भट्टीत २ ते ३ तास ६५०ºसे.पर्यंत तापवल्यास त्यामधील बाष्पनशील पदार्थ निघून जातात व बाष्पनशील पदार्थ मिळतात. यावरून वाहितमलात असणाऱ्या कार्बनी पदार्थांचा अंदाज करता येतो. वाहितमलाचा २०० ते ३०० मिली. एवढा नमुना घेऊन तो कागदाच्या गाळणीतून गाळून खाली पडणारा द्रव १०३º से. तापमानाला कोरडा होईपर्यंत तापवल्यास, फक्त विद्राव्य (विरघळलेले) पदार्थ मिळू शकतात. वरील सर्व परीक्षांचे निकष हे मिग्रॅ./लिटर या एककात देण्याची प्रथा आहे. वाहितमलात गाळाच्या रूपात खाली बसणारे पदार्थ काढण्यासाठी १ लिटरएवढा नमुना घेऊन तो इमॉफ कोन नावाच्या काचेच्या अंशित मोजापात्रात २ तास स्थिर ठेवून खाली बसणारा गाळ मोजतात. याचा उपयोग वाहितमलावरील संस्करण प्रक्रियेचा अभिकल्प (आराखडा) बनविण्यासाठी होतो.

(२) जीवरासायनिक प्रक्रियेतील ऑक्सिजनाची गरज : रासायनिक दृष्ट्या वाहितमल व औघोगिक अपशिष्ट यांच्या संस्करणात अगदी थोड्या वेळात जीवरासायनिक प्रक्रियेद्वारे विद्राव्य ऑक्सिजन वापरून अकार्बनी पदार्थांचे स्थिरीकरण करणे हा अत्यंत महत्त्वाचा भाग असतो. तसेच विविध ठिकाणी, वेगवेगळ्या वेळी गोळा केलेल्या वाहितमलांचे गुणधर्म हे त्याला लागणाऱ्या जीवरासायनिक प्रक्रियेतील ऑक्सिजनाच्या गरजेवरून ठरविता येतात. तसेच वाहितमलात असलेल्या कार्बनी घटकांचे प्रमाण व अवस्था ह्या या परीक्षेद्वारे ठरविता येतात. याकरिता ही. पद्धत आंतरराष्ट्रीय प्रमाणानुसार २०ºसे. तापमानास ५ दिवस करतात. या परीक्षेमध्ये मुख्यतः विरलीकरण पद्धती वापरतात. प्रथम वाहितमलाच्या २ किंवा ३ मिली. एवढा नमुना घेऊन तो पुरेसा विद्राव्य ऑक्सिजन असणाऱ्या पाण्यामध्ये मिसळून त्याचे १०० ते २०० पट विरलीकरण करून व हवेचा बुडबुडा न राहील अशी काळजी घेऊन त्याच्या ४-५ बाटल्या भरतात व त्या सतत २०ºसे. एवढे तापमान देणाऱ्या पेटीत ५ दिवस ठेवतात. प्रयोग सुरू करते वेळी वरीलपैकी फक्त एका बाटलीमध्ये विद्राव्य ऑक्सिजन किती हे याचे मापन करून ते प्रमाण म्हणून घेतात व ५ दिवसांनंतर पुन्हा इतर बाटल्यांमधील मिश्रणात विद्राव्य ऑक्सिजन किती आहे, याचा शोध घेतल्यास विद्राव्य ऑक्सिजन किती प्रमाणात वापरला गेला, याचा अंदाज करता येतो. या परीक्षेचे निकष हे ५ दिवसांच्या शेवटी व २०º से.ला असणारी विद्राव्य ऑक्सिजनाची गरज किती आहे, हे मिग्रॅ./लिटर या एककात देतात.

(३) परिमाणात्मक सूक्ष्मजीव परीक्षा : या पद्धतीत निर्जंतुक केलेल्या काचेच्या बशीत वाहितमलाचे काही थेंब मोजून घेतात. नंतर त्यांमध्ये आगरसारख्या सूक्ष्मजीववर्धक पदार्थांच्या सान्निध्यात एश्चेरिकिया कोलाय या सूक्ष्मजंतूंची वाढ २०º से.अथवा ३७º से.तापमानात करून त्यावरून वाहितमलातील या सूक्ष्मजंतूंचे प्रमाण काढतात. अशा अनेक चाचण्या घेऊन अंदाज करतात व त्यांद्वारे सर्वाधिक संभवनीय संख्या देतात. [⟶ सूक्ष्मजंतुविज्ञान].

वाहितमलाच्या लाक्षणिक नमुन्याचा तपशील : जरी वाहितमलातील घन पदार्थ हे काळ, वेळ, स्थान, पाणीपुरवठा, लोकांचे जीवनमान, सवयी, चालीरीती इ. अनेक गोष्टींवर अवलंबून असून सतत बदलणारे असले, तरी सर्वसाधारण वाहितमलाच्या लाक्षणिक नमुन्याचा तपशील पाहिल्यास त्याच्यामधील घटकांची ढोबळ कल्पना कोष्टक क्र. १ वरून येईल.

कोष्टक क्र. १. भारतातील काही शहरांमधील वाहितमलातील घटक

घटक 

 

प्रमाण (मिग्रॅ./लिटर) 

 

 

पुणे 

कानपूर

अलाहाबाद 

विद्राव्य पदार्थ

८७

१०७

७२

तरंगणारे पदार्थ

७२

५०

४३

बाष्पनशील पदार्थ

६५

५०

७६

अबाष्पनशील पदार्थ

९४

९७

३९

एकूण घन पदार्थ

१५९

१५९

११५

मुक्त आणि लवणयुक्त अमोनिया (नायट्रोजन)

 २.६५

 २.४३

 ३.२

इतर नायट्रोजन

०.६५ 

१.८० 

१.५ 

एकूण नायट्रोजन

३.३०

४.२३

४.७

पीएच मूल्य

७.३०

७.६०

७.९

वाहितमलाची एकमेकांशी तुलना करण्यासाठी त्यावर केलेल्या महत्त्वाच्या विविध परीक्षांवरून त्यांचे दुर्बल, मध्यम व प्रबल असे तीन विभाग करतात. कोष्टक क्र. २ मध्ये यांसंबंधी अधिक माहिती दिली आहे.

कोष्टक क्र. २. वाहितमलावरील परीक्षांचा तपशील (मिग्रॅ./लिटरमध्ये)

घटक 

दुर्बल 

मध्यम 

प्रबल 

एकूण घन पदार्थ

४३०

७२०

१,२३०

बाष्पनशील पदार्थ

२४०

४२०

८१०

निलंबित पदार्थ

९८

२००

३७२

बाष्पनशील निलंबित पदार्थ

७२

१३३

२२०

गाळरूपात खाली बसणारे पदार्थ

२१

३८

६४

जीवरासायनिक प्रक्रियेसाठी ऑक्सिजनाची गरज

 ९६

 २१२

 ४१३

एकूण क्षारता

३१ 

४० 

१८ 

पीएच मूल्य

६.९

७.४

७.१

 

    वाहितमलाचे संकलन, संस्करण व विल्हेवाट : वेगवेगळ्या वसतिस्थानांत अथवा उद्योगांत निर्माण होणारे वाहितमल व औद्योगिक अपशिष्ट यांचे कुठल्याही प्रकारचा उपद्रव न होता भुयारी गटारांद्वारे संकलन करून एक वा अनेक ठिकाणी नेतात, त्यांवर योग्य प्रकारे संस्करण व ते निरुपद्रवी करून त्यांची विल्हेवाट लावतात. नागपूर येथील नॅशनल एन्व्हायरन्मेंटल एंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट (NEERI) या संस्थेमध्ये वाहितमल संकलन, संस्करण व विल्हेवाट इ. गोष्टींबाबत सतत संशोधन होत असून ते संस्थेच्या मासिकात प्रसिद्ध होत असते.

पहा : औद्योगिक अपशिष्ट पाणीपुरवठा प्रदूषण भुयारी गटार वाहितमल संस्करण व विल्हेवाट.

संदर्भ : 1. Babit, H. E. Bauman, E.R. Sewerage and Sewage Treatment, Bombay, 1960.

           2. Battlett, R. E. Public Health Engineering : Sewage, New York, 1979.

          3. Fair. G.M. Geyer, J.C Okum, D. A. Water and waste water Engineering, Vol. I and 2, New York, 1966.

          4. Gharpure, V. N. A Text Book of Sanitary Engineering : Theory, Design and Practice (MKS), Pune, 1975.

         5. Hardenberg, W. A. Sewerage and Sawage Treatment, Scranton, 1959.

         6. Steel, E. W. McGhee. T. Water Supply and Sewerage, New York, 1979.

पाटणकर, मा. वि. टोणगावकर, अ. स. 

लोकगारीवार, पा. लि.