जलवाहिनी : (ॲक्विडक्ट). पाण्याचा (कोणत्याही द्रवाचा) प्रवाह देण्याचे कृत्रिम (मुद्दाम बांधलेले वा तयार केलेले) साधन उदा., कालवा, पाण्याचा बोगदा व नळ. नदी, ओढा, नाला या नैसर्गिक जलवाहिन्यांना ही संज्ञा लावीत नाहीत. जलवाहिनी या शब्दाने सामान्यतः जलप्रवाह त्या संरचनेतून नेला जातो तीच दर्शविली जाते. प्रवाहमार्ग नेहमी सपाट आणि जरूर तितक्या उताराच्या जमिनीवरून नेता येतो असे नाही. वाटेत डोंगर, टेकड्या, टेकाडे, दऱ्या, नद्या, नाले असे अडथळेही काही वेळा येतात. या अडथळ्यांचे निराकरण करण्यासाठी डोंगरात बोगदे, टेकाडात खिंडी, दरीत पूल किंवा वक्रनलिका वगैरेंची योजना करतात. पैकी पुलासाठी त्याचे रस्त्याच्या किंवा रूळमार्गाच्या (रेल्वेच्या) पुलापासूनचे भिन्नत्व दाखविण्यासाठी, जलसेतू हा शब्दप्रयोग करतात. मात्र जलवाहिनीचा इंग्रजी प्रतिशब्द जो ‘ॲक्विडक्ट’ तो जलवाहिनी व जलसेतू या दोन्ही गोष्टींसाठी योजतात.

इतिहास : भारतात पुरातत्त्वविद्येच्या दृष्टीने जे काही थोडे उत्खनन झाले आहे, त्यात काही ठिकाणी जलवाहिन्या सापडलेल्या आहेत पण त्या नेण्यासाठी जलसेतू बांधलेले कुठेही आढळत नाहीत. आजतागायत ज्ञात अशी सर्वांत जुनी (इ. स. पू. तिसरे शतक) जलवाहिनी मोहें-जो-दडो येथील उत्खननात सापडली आहे, ही वाहिनी म्हणजे घरांचे सांडपाणी वाहून नेण्याचे गटार आहे. रस्त्याच्या मधोमध मुख्य गटार असून त्यावर विटांचे आच्छादन आहे. या मुख्य वाहिनीला रस्त्याच्या कडेला असलेल्या घरांच्या स्नानगृहांतील व मोऱ्यांचे सांडपाणी आणणारे वरील प्रकारचेच पण लहान मार्ग जोडलेले आहेत.

यानंतरची माहिती मिळते ती अलीकडची आहे. पेशव्यांनी (अठरावे शतक) पुण्याजवळच्या कात्रज येथील नाल्याचे पाणी बांध घालून अडविले व लहानसा तलाव बनविला. त्याचे पाणी जमिनीखाली घातलेल्या खापरीच्या नळांनी पुण्यात आणले. फुले मंडईजवळील एका घरात आजही ते चोवीस तास येत असते. अशाच तऱ्हेची पाणी पुरवठा योजना साताऱ्यातही त्याच काळात चालू करण्यात आली होती. या व्यवस्थेचे अवशेष सातारा शहरात अजूनही दिसतात. औरंगाबाद शहरासाठी केलेल्या पाणी पुरवठा योजनेत शहरापासून सु. ८ किमी. अंतरावरील हरसूल या खेड्याजवळ असलेल्या तलावाचे पाणी जमिनीखालून घातलेल्या नळांनी आणले असून शहरात ठिकठिकाणी हौद बांधून त्यांत हे पाणी सोडले आहे. या व्यवस्थेत अशी एक क्लृप्ती आहे की, हौदातील पाणी ठराविक पातळीपर्यंत आले की, पाणी बंद होते व वाहून फुकट जात नाही.

आ. १. नीमजवळील पाँ द्यू गार जलवाहिनी व तिच्या खालील जलसेतू (इ.स.पू. पहिले शतक) : (१) जलवाहिनी (कालवा), (२) जलसेतू.वरील गोष्टी स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीने फारशा महत्त्वाच्या नाहीत. जास्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे वरीलपेक्षा खूप दूर अंतरावरून पाणी आणणे व त्यासाठी जरूर त्या जलसेतूंची योजना व बांधणी करणे ही होय. रोमन लोकांनी रोम शहरात पुष्कळ सार्वजनिक स्नानगृहे बांधली होती. त्यांसाठी व घरातील वापरासाठी पुष्कळ पाण्याची आवश्यकता होती. म्हणून शहरापासून दूरवरच्या नद्या-नाल्यांचे पाणी उघड्या वाहिन्यांतून (पाट-कालव्यातून) आणून शहराबाहेर बांधलेल्या तलावात आणले होते. तेथून ते शहरा सर्वत्र खेळविले होते. रोमन लोकांनी बांधलेल्या संरचनांत त्यांच्या जलवाहिन्यांना व त्यांसाठी लागणाऱ्या जलसेतूंना फार महत्त्व दिले जाते. त्यांची ही बांधकामे इ. स. पू. १५०–१०० वर्षांपासून ते इ. स. १००–१५० पर्यंत केली गेली. त्यांनी बांधलेला एक वैशिष्ट्यपूर्ण असा नीमजवळचा (सध्या फ्रान्समधील) जलसेतू हा आ. १ मध्ये दाखविला आहे. हा जलसेतू मार्कस अग्रिपा यांनी इ. स. पू. १९ मध्ये बांधला. यामध्ये ४६·५ मी. उंचीच्या व अर्धगोलाकृती अशा अनेक कमानी असून त्यांचे बांधकाम एकावर एक अशा तीन मजल्यांमध्ये केले आहे. त्यांनी या विस्मयजनक संरचनेप्रमाणे व कालवे एकावर एक किंवा एकाला ओलांडून दुसरा, अशाही संरचना केल्या होत्या. रोमन साम्राज्याच्या नंतरच्या काळात पाणी पुरवठ्यासाठी आणि मैला व सांडपाणी यांच्या वहनासाठी अशा उघड्या वाहिन्या त्यांतील प्रदूषणाचे धोके लक्षात घेऊन बांधणे कमी होऊन शेवटी बंद झाले. जलविद्युत् केंद्रे, सिंचाई इत्यादींसाठी मात्र कालवे सर्वत्र वापरात आहेत.

आ. २. नदीवर बांधलेला जलसेतू, कालव्याचे पात्र समलंबी छेदाचे : (अ) कालव्याचा व सेतूचा पुरोदर्शनी देखावा, (आ) अ मधील कक वर घेतलेला काटछेद : (१) कालवा, (२) कालव्याचे समलंबी पात्र, (३) साधा जलसेतू, (४) नदी.

वर्गीकरण : जलवाहिन्यांचे उघड्या (मुक्त प्रवाहाच्या) आणि (दाब प्रवाहाच्या) असे दोन मुख्य वर्ग आहेत. पाट व कालवा पहिल्या वर्गातील आहेत, तर बोगदा व नळ दुसऱ्या वर्गात येतात. उघड्या वाहिनीचे मुख्य अभिलक्षण म्हणजे तिच्या पाण्याला दाब नसतो. म्हणजेच ते वातावरणाशी स्पर्शित असते व त्यामुळे पाण्याला फक्त वातावरण दाब (वा. दा.) असतो. बंद वाहिनीत ती जर पूर्ण भरून वाहत असेल, तर वा. दा. पेक्षा अधिक किंवा कमी दाब असू शकतो पण ती थोडी रिकामी वाहत असेल, तर तीतही वा. दा. एवढाच दाब असतो. आणखी एक प्रकारचे वर्गीकरण वाहिनीतील पाण्यावरून होते, पिण्याच्या व औद्योगिक वापराच्या पाण्याच्या वाहिन्या आणि सांडपाण्याच्या वाहिन्या. या दोहोंत बांधणीच्या दृष्टीने तसा फरक नसतो पण पुरवठ्याच्या वाहिनीतील पाणी कोणत्याही कारणाने व कोणत्याही प्रकारे बाहेरून दूषित होणार नाही, याबद्दल खबरदारी बाळगावी लागते. याउलट सांडपाण्याच्या वाहिनीतील दूषित पाणी तिच्यातून बाहेर पडून प्रदूषित होणार नाही, याची काळजी घ्यावी लागते. उघड्या आणि बंद वाहिन्यांच्या अभिकल्पन (आराखडा तयार करण्याच्या) पद्धतींत बराच फरक असतो.


उघडी जलवाहिनी : वर म्हटल्याप्रमाणे हिच्यातील प्रवाह वा. दा. चा असून तो पात्राच्या पुऱ्या अथवा अपुऱ्या भागातून वाहत असतो. माती, वीटा आणि दगड यांचे बांधकाम करून वाहिनीचे पात्र तयार करतात. नळ वापरले असल्यास ते अपुरे राहतील एवढ्या मोठ्या छेदाचे असतात. वाहिनीला तिच्या लांबीत योग्य तो उतार देऊन तिच्यातील प्रवाहाचा वेग इच्छित मूल्यावर ठेवता येतो. वाहिनी बव्हंशी भूपृष्ठावरून जाते, पण अपरिहार्यपणे काही ठिकाणी भूपृष्ठाखालूनही न्यावी लागते. कालवे, पाट, गटारे ही या प्रकारच्या वाहिनीची उदाहरणे होत.

बंद जलवाहिनी : या वाहिनीतील प्रवाहाला वातावरणाचा स्पर्श होत नाही. ती नेहमी पूर्ण भरूनच वाहावी लागते. दाब वा.दा. पेक्षा कमीजास्त असल्याने वाहिनीतील सांधे पक्के गळबंद व मजबूत असणे आवश्यक असते. त्या बनविण्याकरिता वापरावयाचा पदार्थ आणि इतर साहित्य ताणभार घेणारे व ताकदवान असते. बीड, पोलाद, प्लॅस्टिक, पॉलिथीन, सलोह, सिमेंट, काँक्रीट या पदार्थांपासून अशा वाहिन्या (नळ) तयार करतात. या वाहिन्या भूपृष्ठावर वा खाली आणि कोणत्याही पातळीत ठेवल्या, तरी त्यांतील प्रवाहाला बाध येत नाही. या प्रकारच्या वाहिन्या पाणी, खनिज तेल, खाद्य तेले, वायू, हवा ह्यांच्या वहनासाठी वापरल्या जातात.

जलसेतू : जेव्हा एखाद्या कालव्याच्या मार्गात खोलगट भाग, दरी, ओढा, नदी ही येतात तेव्हा कालवा त्यांवरून नेतात आणि त्यासाठी पुलाची योजना करावी लागते. यावरून हे लक्षात येईल की, खास कालवा नेण्यासाठी बांधलेला पूल अथवा तसलीच दुसरी युक्ती एवढाच जलसेतू या शब्दाचा अर्थ आहे. वाहिनीची पातळी, खालील जमिनीची पातळी व सेतूसाठी सोईस्कर जागा या सर्वांचा विचार करून सेतूचा प्रकार व अभिकल्प हे ठरवावे लागतात. एका कमानीच्या सेतूला मोरी असेही म्हणतात. सेतूचे दोन मुख्य प्रकार आहेत : साधा (पुलासारखा) सेतू व वक्रनलिका (निनाल) सेतू.

साधा सेतू : ज्या वेळी कालव्याचा तळ त्याखालून जाणाऱ्या प्रवाहाच्या सर्वोच्च पातळीच्यावर असतो त्या वेळी प्रवाहावर पूल बांधून त्यावर काँक्रीटची लादी घालतात. लादीवर माती, विटा, दगड यांच्या किंवा काँक्रीटच्याच भिंती घालून कालव्याचे पात्र बनविले जाते. पात्राचा छेद बहुतेक समलंबी किंवा आयताकार असतो. असा एक साधा जलसेतू आ. २ मध्ये दाखविला आहे.

अशा प्रकारचा सेतू कृष्णेवरील धोम (ता. वाई, जि. सातारा) येथील धरणाच्या उजव्या कालव्यासाठी वाईपासून ५–६ किमी. वर बांधलेला आहे. तसेच उजनी (जि. सोलापूर) येथील भीमेवरील धरणातून निघणाऱ्या कालव्यासाठी एक असाच मोठा सेतू बांधला आहे.

आ. ३. वक्रनलिका जलसेतू प्रवाह (ओढा)कालव्याखालून नेला आहे : (१) कालवा, (२) प्रवाह (३) प्रवाहाचा मूळचा तळ, (४) प्रवाहाची पूर पातळी, (५) प्रवाहाचा खाली नेलेला तळ, (६) वक्रनलिका, (७) वक्रनलिकेची तोंडे बसविलेली बांधकामे. वक्रनलिका जलसेतू : ज्या वेळी कालव्याचा तळ खालील प्रवाहाच्या सर्वोच्च पातळीच्या जवळपास असतो त्या वेळी साधा जलसेतू वापरता येत नाही. मग खालील प्रवाहाचा तळच खाली उतरवतात व प्रवाहाचे पाणी जरूर तेवढ्या मोठ्या वक्रनलिकेतून नेऊन दुसऱ्या बाजूला इच्छित पातळीवर नलिकेतील पाणी सोडतात. या प्रकारचा सेतू आ. ३ मध्ये दाखविला आहे. मात्र ही वक्रनलिका नेहमीच्या उलट (बहिर्गोल खाली) असते.

जेव्हा सोईचे ठरेल तेव्हा कालवाही खालून म्हणजे वरच्या उलट वक्रनलिकेतून नेतात.

पाटणकर, मा. वि.