शाहू, छत्रपती (सातारा) : (१८ मे १६८२– १५ डिसेंबर १७४९). मराठी राज्याचे अधिपती व साताराच्या गादीचे पहिले संस्थापक छत्रपती. छत्रपती संभाजी व येसूबाई यांचा मुलगा. त्यांचा जन्म रायगड छत्रपती शाहू महाराजजिल्ह्यातील माणगाव तालुक्यात गांगवली या गावी झाला. त्यांचे बालपण रायगडावर गेले. छत्रपती संभाजींच्या हत्येनंतर मोगलांनी रायगड किल्ला घेतला (३ नोव्हेंबर १६८९) आणि शाहू, येसूबाई व त्यांचा कबिला मोगलांच्या हाती पडला. सुमारे सतरा वर्षे शाहूंना औरंगजेबाच्या नजरकैदेत राहावे लागले. त्या वेळी झिन्नत उन्निसा बेगम या औरंगजेबाच्या मुलीने त्यांची व्यवस्था ठेवली. मोगलांच्या सहवासात ते ऐषारामी-विलासी वृत्तीचे बनले पण त्यांचा स्वभाव नेमस्त, धार्मिक व प्रसंग निभावून नेण्याचा होता. या काळातच त्यांचे शिक्षण व दोन लग्ने झाली (१७०३). अंबिकाबाई व सावित्रीबाई या त्यांच्या दोन पत्नी. याशिवाय विरूबाई ही दासी त्यांच्याजवळ अखेरपर्यंत होती. शाहूंना औरंगजेबाने ७,००० झत, ७,००० स्वार अशी सन्मान्य मनसब व राजा हा किताब दिला होता तथापि त्यांची आर्थिक स्थिती नाजूक होती आणि धार्मिक बाबतीत त्यांची अवहेलनाही झाली. एकदा तर औरंगजेबाने त्यांना मुसलमान करण्याचा घाट घातला पण बेगमच्या मध्यस्थीने हा प्रसंग टळला. पहिली पत्नी अंबिकाबाई कैदेत असताना निवर्तली. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर (१७०७) शाहूंची मोगलांच्या कैदेतून सुटका झाली मात्र येसूबाईसह अन्य कबिला मोगलांनी दिल्लीला ओलीस ठेवून घेतला. औरंगजेबाचा मुलगा बहादूरशाहाने त्यांचे स्वराज्य मान्य करून त्यांस दक्षिणेतील खानदेश, वऱ्हाड, औरंगाबाद, बीदर, हैदराबाद व विजापूर या सहा सुभ्यांच्या चौथसरदेशमुखीचे अधिकार तत्त्वतः दिले. शाहूंना अनेक मराठे सरदार येऊन मिळले परंतु महाराणी ताराबाईंनी त्यांना विरोध केला पण खेडच्या लढाईत त्यांचा पराभव करून शाहूंनी सातारा घेतले. सातारा ही राजधानी करून जानेवारी १७०८ मध्ये त्यांनी राज्याभिषेक करून घेतला. यानंतर त्यांनी आणखी दोन लग्ने केली. सकवारबाई व सगुणाबाई या पत्नींपैकी सगुणाबाई राजकीय घडामोडीत लक्ष घालीत असत. महाराणी ताराबाई ह्या आपलाच छत्रपतींच्या गादीवर खरा हक्क आहे, ह्या मताच्या ठाम होत्या. त्यांनी पन्हाळ्याला तत्पूर्वी स्वतंत्र गादी स्थापून मोगलांकडे तसा दावाही केला होता. ताराबाई व शाहू यांत वारसाहक्कासाठी कलह सुरू झाला. तेव्हा शाहूंनी ताराबाईंवर मोहीम काढून वसंतगड, पन्हाळगड वगैरे किल्ले घेतले. सेनापती धनाजी जाधवांच्या मृत्यूनंतर (१७०९) त्यांचा मुलगा चंद्रसेन हा ताराबाईंच्या पक्षास मिळाला. पुढे बाळाजी विश्वनाथाने मुत्सद्दीगिरीने ताराबाईंच्या पक्षातील मातब्बर सरदार चंद्रसेन जाधव, उदाजी चव्हाण, कान्होजी आंग्रे यांना शाहूंच्या बाजूस घेतले. नंतर दमाजी थोरात आणि कृष्णराव खटावकर यांचेही पारिपत्य केले. तत्पूर्वी शाहूंनी बाळाजीची पेशवेपदावर नेमणूक केली (१७१३). ताराबाईंचा सावत्र मुलगा दुसरा संभाजी यांनी अवचित सत्तांतराद्वारे कोल्हापूरची गादी बळकाविली (१७१४) आणि ताराबाई व छ. दुसरा शिवाजी यांना कैदेत टाकले. तेव्हा शाहूंना कोल्हापूर संस्थानचा उपद्रव कमी झाला. बाळाजीने स्वपराक्रमाने व दूरदृष्टीने मराठी राज्यास नवी दिशा दाखविली. बाळाजीने दिल्लीला जाऊन उत्तरेतून सहा सुभ्यांच्या सनदा आणि मोगलांच्या कैदेत ओलीस असलेल्या अन्य मंडळींना स्वराज्यात आणले (१७१९). त्यामुळे स्वराज्याचा मुलूख व दक्षिणेच्या सहा सुभ्यांची चौथ व सरदेशमुखी शाहूंस विधिवत्‌ मिळाली. बाळाजी विश्वनाथाच्या मृत्यूनंतर (१७२०) शाहूंनी त्याचा ज्येष्ठ मुलगा पहिला बाजीराव यास पेशवेपद दिले. बाजीरावाने दक्षिण निर्वेध केली आणि राज्यविस्तार करून मराठेशाहीची शान वाढविली. निजाम, सिद्दी, पोर्तुगीज यांसारख्या शत्रूंशी टक्कर देऊन मराठी राज्याचे आसन स्थिर केले. याच काळात पेशव्यांच्या मध्यस्थीने शाहूंनी कोल्हापूर-सातारा या दोन्ही राज्यांतील वैमनस्य मिटावे, म्हणून प्रयत्न केले. त्यांनी कोल्हापूरकरांशी वारणेचा तह करून दोन्ही राज्यांच्या सीमा निश्चित केल्या (१७३१). तेव्हा ताराबाई व शाहू यांची भेट झाली आणि त्या पुढे साताऱ्यास राहावयास आल्या. शाहूंनी त्यांना अखेरपर्यंत (१७४९) मानाने वागविले.

पहिल्या बाजीरावाच्या मृत्यूनंतर त्याचा ज्येष्ठ मुलगा बाळाजी बाजीराव ऊर्फ नानासाहेब यास शाहूंनी पेशवेपद दिले (१८४०). बाळाजी बाजीरावाने शाहूंच्या वतीने अखिल हिंदुस्थानात मराठ्यांच्या राज्याचा विस्तार करून अटकेपर्यंत धडक मारली. आजरीपण आणि सकवारबाई व सगुणाबाई या राण्यांच्या अंतर्गत भांडणांत शाहूमहाराजांचा वृद्धापकाळ गेला. शाहूंना मुलगा नव्हता. ताराबाईंचा नातू व दुसऱ्या शिवाजींचा मुलगा रामराजा यास दत्तक घ्यावे, असा विचार त्यांनी पेशव्यांस सांगितला. शाहूंनी मरतेसमयी पेशव्यांस आज्ञापत्र लिहून दिले. मूत्रपिंडदाहाने शाहूंचे साताऱ्यात निधन झाले. त्या वेळी ज्येष्ठराणी सकवारबाई सती गेल्या. तत्पूर्वी एक वर्ष अगोदर सगुणाबाई मरण पावल्या होत्या. शाहूंच्या मृत्यूनंतर रामराजास दत्तक घेण्यात आले.

छत्रपती शाहूंची ऐन उमेदीची वर्षे मोगलांच्या लष्करी छावणीत व्यतीत झाली. शिवाय या काळात त्यांना लढाई व संघर्षाचा प्रसंग न उद्‌भवल्यामुळे कोणताच प्रत्यक्ष अनुभव मिळाला नाही. त्यामुळे त्यांना विलासी व शाही थाटाच्या राहणीमानाची सवय झाली होती. त्यांना शिकारीचा व विविध पक्षि-प्राणी जमा करण्याचा छंद होता. ते नृत्य-गाणे यांसाठी परप्रांतांतून नृत्यांगना-गवई मागवीत असत. तत्संबंधीच्या नोंदी कागदोपत्री आढळतात. त्यांना फार थोड्या लष्करी मोहिमांत नेतृत्व करावे लागले. त्यांच्या कारकीर्दीत मराठी सत्तेचे विकेंद्रीकरण होऊन पेशव्यांचे अनन्यसाधारण महत्त्व वाढले. तथापि गुणी माणसांची पारख आणि बिकट परिस्थितीतील समयसूचकता, या गुणांमुळे त्यांनी दीर्घकाळ (१७०७–४९) सत्ता उपभोगली. ते स्वतः सेनाधिकारी, मनसबदार, पेशवे इ. उच्चपदस्थांच्या नेमणुका करीत. परिस्थित्यनुसार योग्य निर्णय घेत. बाळाजी विश्वनाथ, पहिला बाजीराव व बाळाजी बाजीराव यांसारखे कर्तबगार- पराक्रमी पेशवे त्यांना लाभले आणि चौथ-सरदेशमुखी, साहोत्रा वसुलीमुळे राज्याला आर्थिक स्थैर्य मिळाले.

पहा : बाजीराव, पहिला बाळाजी बाजीराव बाळाजी विश्वनाथ भोसले घराणे सातारा संस्थान.

संदर्भ : Majumdar, R. C. Ed. The History and Culture of the Indian People : Maratha Superemacy, Bombay, 1973.

देशपांडे, सु. र.