लिम्युलस : (आ) पृष्ठीय दृश्य (आ) अधर दृश्य (१) मध्य कायेचे अचर काटे, (२) पार्श्विक नेत्र, (३) मध्य नेत्र (४) पूर्व कायेचे पृष्ठवर्म, (५) नखरिका, (६) मुख, (७) पादमृश, (८) नखरी पाद, (९) मध्यकायेची उपांगे, (१०) मध्यकायेचे चर काटे, (११) गुद, (१२) पुच्छखंड, (१३) पश्चकाया, (१४) मध्यकाया, (१५) जनन प्रच्छद, (१६)पायांच्या बुडांमधील प्रवर्ध (वाढ). लिम्युलस : आर्थ्रोपोडा संघाच्या झिफोसूरा उपवर्गातील संधिपाद सागरी प्राणी. याला राजकर्कट किंवा नाल खेकडा अशीही नावे आहेत. या उपवर्गात पुष्कळ जीवाश्मभूत (शिळेभूत अवशेषरूप) प्ररूपे व चार जिवंत जातींचा समावेश होतो. लिम्युलस पॉलिफेमस हे याच्या सामान्य जातीचे शास्त्रीय नाव आहे. ही अटलांटिक किनाऱ्यावर उथळ संथ पाण्यात नोव्हास्कोशा ते युकॅटनपर्यंत आढळते. लिम्युलस  वाळूत किंवा चिखलात बिळे करून राहतो. याची लांबी ६० सेंमी. पर्यंत असते. शरीर  १५ खंडांचे बनलेले असते. शरीरावर चकचकीत गर्द तपकिरी अखंडित पृष्ठवर्म (पाठीला सर्व वा काही भाग झाकणारी ढालीसारखी संरचना) असते. पृष्ठवर्म कमानीसारखे व नालाकृती असून पार्श्व चलनक्षम कंटकांनी (काट्यांनी) व बॉनेटसारख्या पुच्छखंडाने (शेपटीच्या भागाने) ते रुंद षट्कोनी उदराला जोडलेले असते. इतर ॲरॅक्निड प्राण्यांप्रमाणे यांच्या शिरोवक्षावर (डोके व छाती यांच्या एकीकरणाने बनलेल्या भागावर) उपांगांच्या (अवयवांच्या) सहा जोड्यांशिवाय उदरावर रुंद, पातळ उपांगांच्या सहा जोड्या असतातत्या मध्यशिरेवर साधंलेल्या असतात. नराच्या  पायांच्या पहिल्या जोडीचे आलिंगकामध्ये रूपांतर झालेले असते. शेवटच्या पाच जोड्यांच्या मागील बाजूवर उघङी क्लोम पुस्तके (पुस्तकाच्या पानांप्रमाणे मांडणी असलेले कल्ले) असतात. प्रत्येक क्लोम-पुस्तकात १५० २०० पाने असून त्यात रक्तवाहिन्या असतात त्या श्वसनाचे काम करतात. शिरोवक्षातील कक्ष ग्रंथीची जोडी उत्सर्जनाचे कार्य करते. तोंडाभोवतालच्या तंत्रिका (मज्जातंतू) वलयाने अधर तंत्रिका रज्जू गुच्छिकांना जोडलेला असतो. पृष्ठवर्मावर दोन पार्श्विक संयुक्त नेत्र व दोन अधिमध्य  साधे डोळे (अक्षिका) असतात [→ डोळा].

मृदुकाय प्राणी, कृमी व समुद्रतळावर राहणारी शैवले यांवर लिम्युलस उपजीविका करतो. तो आपल्या पृष्ठवर्माने जोराने दाबून वाळूत बीळ करतो. या कामी त्याला पुच्छखंड व उपांगांची मदत होते. तो तळावर चालू शकतो, उदराची तकटे फडफडवून पोहू शकतो व पुच्छखंडाच्या मदतीने उडी मारू शकतो. अन्न मिळविण्यासाठी तो रात्री बाहेर पडतो. तो आपल्या नखरिकांनी (नख्यांनी) भक्ष्य घट्ट पकडतो. या कामी त्याला इतर उपांगांवरील चिमट्याची मदत होते.

लिम्युलसांत लिंगे भिन्न असतात. नर मादीपेक्षा लहान असतो. उन्हाळ्यात उथळ पाण्यात त्यांचा समागम होतो. मादी भरती-ओहोटीच्या टप्प्यात वाळूतील बिळांत अंडी घालते. त्यांचे शुक्राणूंनी बाह्य फलन होते. अंड्यांतून बाहेर पडण्याच्या वेळेस डिंभ (भ्रूणानंतरची स्वतंत्रपणे अन्न मिळवून जगणारी व प्रौढाशी साम्य नसणारी सामान्यतः क्रियाशील पूर्व अवस्था) ट्रायलोबाइटासारखा दिसतो कारण त्याचे उदर खंडित असते व उपांगे किंवा पुच्छखंड नसतो परंतु पहिली कात टाकल्यावर ही लक्षणे बदलतात. पॅरालिथोडीस कॅमचॅटिका ही लिम्युलसची दुसरी जाती उत्तर पॅसिफिक किनाऱ्यापासून दूरवर आढळते व ती खाद्य आहे. झिफोसूरा उपवर्ग कँब्रियन कालापासून (सु. ६० कोटी वर्षांपासून) व लिम्युलस प्रजाती तृतीय कल्पापासून (सु. ६.५ कोटी वर्षापासून ) अस्तित्वात आहे.

जमदाडे, ज. वि.