ट्राक्वाइर, रॅम्झी हीटली : (? १८४०—? १९१२). या ब्रिटिश पुराजीवशास्त्रज्ञाचा जन्म पर्थशरमध्ये ऱ्हिंड येथे झाला. त्यांचे शिक्षण एडिंबरो येथे झाले आणि तेथेच त्यांनी वैद्यकाचेही शिक्षण घेतले. १८६७ मध्ये डब्लिनच्या रॉयल कॉलेज ऑफ सायन्समध्ये प्राणिशास्त्राच्या प्रमुख पदावर त्यांची नेमणूक झाली व १८७३ मध्ये ते रॉयल स्कॉटिश म्युझियमच्या प्रकृतिविज्ञानीय संग्रहाचे व्यवस्थापक झाले. या जागेवरून ते १९०६ मध्ये निवृत्त झाले. माशांच्या जीवाश्मांच्या (शिळारूप अवशेषांच्या) अभ्यासाची त्यांना विशेष आवड होती व या विषयात त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. उत्तर सिल्युरियन कल्पातील (सु. ४४ ते ४२ कोटी वर्षांपूर्वीच्या काळातील) ऑस्ट्रॅकोडर्म व डेव्होनियन कल्पातील (सु. ४२ ते ३६·५ कोटी वर्षांपूर्वीच्या काळातील) डिप्नोई यांच्याविषयी आपल्या ज्ञानात जी बरीच भर पडली आहे, ती त्यांच्यामुळेच   होय. मध्य डेव्होनियन कल्पातील पॅलिओस्पाँडिलस या लहान माशाच्या आप्तसंबंधाविषयी त्या काळात बराच वाद होता या माशाचे त्यांनी शब्दचित्र रेखाटले. तसेच कार्‍‌बॉनिफेरस कल्पातील (सु. ३५ ते ३१ कोटी वर्षांपूर्वीच्या काळातील) पॅलिओनिसिडी व प्लॅटिसोमिडी या दोन कुलांचा अभ्यास करून त्यांचा आधुनिक काँड्रॉस्टिआयांशी असलेला निकट संबंध त्यांनी दाखवून दिला.

जमदाडे, ज. वि.