‘बेवस’–किशिनचंद तीरथदास खत्री :  (२५ फेब्रुवारी १८८५ –२३ सप्टेंबर १९४७). आधुनिक काळातील युगप्रवर्तक सिंधी कवी. जन्म (पाकिस्तान) मधील लारकाना येथे. शिक्षकी पेशा पतकरून ते पुढे मुख्याध्यापक बनले. हुशार विद्यार्थी, यशस्वी अध्यापक व होमिओपॅथीचे वैद्य म्हणून त्यांचा लौकिक होता. लहानपणापासूनच त्यांना काव्यरचनेची व तत्त्वज्ञानाची आवड होती. सूफी तत्त्वज्ञान व वेदान्ताचाही त्यांनी अभ्यास केला होता. स्वभावाने ते अतिशय मृदू व विनम्र होते, म्हणूनही कदाचित त्यांनी ‘बेवस’ म्हणजे ‘असमर्थ’ ह्या अर्थाने टोपणनाव लेखनासाठी स्वीकारले असावे.

‘बेवस’–किशिनचंद तीरथदास खत्री

फार्सी वृत्तांचा वापर करून त्याकाळी सिंधीत गझल, रुबाई इ. प्रकारची ताव्यरचना केली जाई तसेच काव्याचे विषयही सामान्यतः प्रेमी युगुल किंवा त्यांची प्रतीके-शमा, परवाना, साकी, गुल इ.–आणि स्त्रीच्या अंगप्रत्यंगांची तीच ती वर्णने ह्या प्रकारचे असत. बेवस यांनी मात्र फार्सी प्रभावातून आलेले पारंपारिक सिधी काव्यप्रकार आणि काव्यविषय यांत मोठी कार्ती घडवून णली. त्यांनी केवळ स्त्रीरुपच नव्हे, तर बालकाच्या विविध निरागस लीला आणि निसर्गाची विविध रुपे यांतील सौंदर्यही आपल्या काव्यातून व्यक्त केले तसेच चराचर सृष्टी निर्माण करणाऱ्या परमेश्वराची महतीही त्यांनी काव्यातून गायली. प्रेयसीशिवाय स्त्रीची जी अन्य उदात्त, त्यागमय, वात्सल्यपूर्ण रुपे आहेत त्यांचेही गुणगान त्यांनी केले. गरिबी-श्रीमंती, शोषण, पारतंत्र्य, देशभक्ती, जन्म-मरण, अध्यात्म इ. विषयांवर त्यांनी काव्यरचना केली. फार्सी वृत्तांचा वापर बेवस यांनीही केला पण तो त्यांतील क्लिष्टता टाळून. शिवाय त्यावेळी फारशा प्रचल हिंदीतील ‘दोहा’ तसेच सिंधीतील ‘बेत’, ‘काफी’ व ‘वई’ या सूफी काव्यप्रकारांचेही त्यांनी आपल्या रचनेद्वारा यशस्वी पुनरुज्जीवन केले. पारंपरिक सिंधी काव्यास आधुनिक वळण देण्याचे श्रेय म्हणूनच बेवस यांच्याकडे जाते.

 बेवस हे काही अंशी पुरोगामी विचारांचे कवी मानले जातात. रशियातील साम्यवादी वास्तववाद तसेच बाल्झॅक, टॉलस्टॉय, डिकिन्झ यांचा सामाजिक दृष्टिकोन यांचा प्रभाव त्यांच्यावर जाणवतो. अनिष्ट सामाजिक रुढींचे निवारण व्हावे अशीही त्यांची उत्कट इच्छा होती म्हणूनच बंगाली सामाजिक सुधारणावादी चळीवळीचेही पडसाद त्यांच्या काव्यात उमटलेले दिसतात. सामाजिक विषमता व दोष त्यांना अस्वस्थ करीत पण ते दूर होतील असा अशावादही ते बाळगून होते. कारण प्रत्येक माणसातील देवत्वावर त्यांचा नितान्त विश्वास होता. दुर्दम्य शावाद, राष्ट्रवाद, देशभक्ती व मानवतावाद यांचा अपूर्व उन्मेष त्यांच्या रचनेत दिसून येतो. ⇨रवींद्रनाथ टागोर , ⇨ अब्दुल लतिफ शाह हे त्यांचे आदर्श कवी होते. त्यांचा पिंड भावकवीचा होता. उदात्त विचारांचा मधुर, संयत अविष्कार आणि थेट हृदयाला जाऊन भिडणारी भावनोत्कट लय यांचा सुरेख संगम त्यांच्या काव्यात आढळतो. अलंकारांचा वापर त्यांच्या काव्यात अत्यल्प व आवश्यक तेथेच आढळतो. अत्यंत समर्पक-प्रतीकांची योजना करण्यात ते सिद्धहस्त होते. नवा आशय व अभिव्यक्ती यांचे प्रवर्तन करणारी बेवस यांची कविता म्हणूनच युगप्रवर्तक ठरते. जुन्या शृंगारिकतेच्या व सूफी गूढवादाच्या चौकटीतून त्यांनी सिंधी काव्यास मुक्त केले व त्याला समाजाभिमुखता प्राप्त करून दिली म्हणूनच त्यांची कविता अबालवृद्धांच्याही जिभेवर घोळू लागली. सिंधीत सर्वप्रथम राष्ट्रीय स्वरुपाची कविता व गीते लिहिण्याचे श्रेयही त्यांच्याकडे जाते. स्वातंत्र्य आंदोलनात त्यांची ही राष्ट्रवादी कविता व गीते फार लोकप्रिय होती.

सुरुवातीच्या काळात त्यांनी लहान मुलांसाठी काही बोधपर नाटिका लिहिल्या असून त्या इंडललि (म.शी. इंद्रधनुष्य–१९३१) ह्या नावाने संगृहीत आहेत. त्यातील ‘प्रह्लादभगतु’ व ‘नल-दम-यंती’ ह्या नाटिका फार लोकप्रिय होत्या. गुरु नानक जीवन-कविता (१९४१) हे एक दीर्घ आख्यानकाव्यही त्यांनी लिहिले सून त्याची तिसरी आवृत्ती १९५४ मध्ये निघाली. शिरी शैरु (मधुर काव्य–१९२९), फूलदानी (१९३२), मौज गीत (आनंद गीते–१९४१) आणि बहारिस्तान हे त्यांचे इतर काव्यसंग्रह होत. मौजी गीत ह्या संग्रहात त्यांचे शिष्य हरी ‘दिलगीर’ यांचीही काही गीते आहेत.

विविध नियतकालिकांतून बेवस यांनी लिहिलेल्या कविता त्यांच्या मृत्यूनंतर पुढील काव्यसंग्रहांतून संकलित करण्यात आल्या : शैरु-बेवस (बेवसचे काव्य–१९५३), बेवस-गीतांजलि, गंगाजूं लहरूं (गंगालहरी), बेवसजा पंजवहि पूर (बेवसच्या २५ विचारकणिका–१९५९), सामुंडी सिपूं (सागर शिंपले–१९७०). यातील शेवटच्या तीन संग्रहांतील कविता चिंतनपर आहेत.

बेवस यांनी प्रवर्तित केलेल्या आधुनिक सिंधी काव्याचा प्रभाव हुंडराज दुखयाल, हरी ‘दिलगीर’, राम पंजवाणी, गोबिंद भाटिया, अयाझ, नारायण श्याम, फानी, गोवर्धन भारती, दयाळ शा इ. कवींवर कमीअधिक प्रमाणात पडला. लारकाना येथे त्यांचे निधन झाले.

बाधवानी, यशोधरा