विटा-२: महाराष्ट्र राज्याच्या सांगली जिल्ह्यांतील खानापूर तालुक्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या ३२,०१८ (१९९१). सातारा शहराच्या आग्नेयीस सु. ७५ किमी., कराडच्या पूर्वेस ४२. तर तासगावच्या उत्तरेस २९ किमी. वर हे असून तालुक्याच्या साधारण मध्यवर्ती व विटा आणि येरळा नद्यांदरम्यानच्या काहीशा खोलगट भागात ते वसलेले आहे. येथे गुहागर-चिपळूण-कराड-विजापूर आणि शिंगणापूर-बेळगाव हे दोन रस्ते एकत्र येतात. विट्या पासून पश्चिमेस ११ किमी. वर येरळा नदीचे पात्र आहे.

ऐतिहासिकदृष्ट्या या नगराला महत्त्व आहे. छत्रपतींच्या प्रतिनिधीचे वास्तव्य येथे होते. त्रिंबक कृष्ण यांनी एक वाडा येथे बांधला. विट्याला येण्यापूर्वी ते पन्हाळगडच्या प्रतिनिधींचे कारभारी होते. सध्या या वाड्याचे केवळ भग्नावशेष आढळतात. त्रिंबक कृष्ण यांनीच येथील त्रिंबकेश्वर मंदिर बांधले असे सांगतात. त्यांच्यानंतर प्रतिनिधिपद भवानराव, भगवंतराव व पुन्हा भवानराव यांचेकडे आले. भगवंतराव व त्यांच्या पत्नीचे स्मारक त्रिंबक कृष्ण यांच्या स्मारकाच्या बाजूलाच आहे.

विटा हे तालुक्यातील प्रमुख वाणिज्य व व्यापारी केंद्र आहे. सोमवार व गुरुवार असा दोनदा बाजार भरतो. ज्वारी, बाजरी, गहू, हरभरा, उडीद, तूर, भुईमुग शेंग, मिरची, हळद यांचा व्यापार येथे चालतो. येथील गुरांचा बाजारही मोठा असतो. नगरात पूर्वीपासून विणकाम व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालत आहे. पूर्वी नगराभोवती ६.०९ मी. उंचीची दगड व मातीतील भिंती होती व तिला पूर्वेच्या व पश्चिमेच्या बाजूला दरवाजे होते. १८५४ मध्ये येथे नगरपालिकेची स्थापना करण्यात आली. महाविद्यालयीन शिक्षणापर्यंतच्या सोयी येथे आहेत. भैरवनाथ (ग्रामदैवत), विठोबा, मारुती, गणपती, दत्तात्रय, त्रिंबकेश्वर यांची मंदिरे नगरात आहेत.

चौधरी, वसंत