नीलकंठ: (सतरावे शतक). संस्कृत लेखक-टीकाकार. गौतमगोत्री महाराष्ट्रीय ब्राह्मण. आडनाव चतुर्धर वा चतुर्धारी (चौधरी). पित्याचे नाव गोविंदसूरी मातेचे फुल्लाम्बिका. गोदावरीवरील कर्पूरग्राम (कोपरगाव, जिल्हा अहमदनगर) येथील रहिवासी. त्याचे बरेचसे टीकालेखन वाराणशीस झाले.

नीलकंठाची महाभारतावरील टीका भारतभावप्रदीप म्हणून प्रसिद्ध आहे. ही टीका लिहिण्यापूर्वी भारताच्या भिन्नभिन्न भागांतील पोथ्या आणि पूर्वीच्या टीका आपण पाठशुद्धीसाठी पाहिल्याचे नीलकंठाने म्हटले आहे. नीलकंठाच्या टीकेत अधिक पाठांतरे, काही आवृत्त्यांत आढळणारे अधिक श्लोक आणि देवबोध, सर्वज्ञनारायण, अर्जुनमिश्र यांनी केलेली अर्थचर्चा यांची नोंद आहे. महाभारताच्या पाठचिकित्सेसाठी नीलकंठी टीकेचे महत्त्व निरपवाद आहे.

भारतभावप्रदीपखेरीज नीलकंठाने रचलेल्या ग्रंथांची व टीकांची नावे अशी : मंत्रकाशीखण्डटीका, मंत्रभागवत, मंत्ररामायण, वेदान्तकतक, शिवताण्डवव्याख्या, षट्तंत्रीसार, हरिवंशटीका, गणेशगीताटीका, सौरपौराणिकमतसमर्थन, रुद्रमीमांसा (रुद्र सारसंग्रहव्याख्या), विधुराधानविचार.

भारतभावप्रदीप आणि रुद्रमीमांसा या टीकांमध्ये नीलकंठाने आपल्या अध्ययन-गुरूंची नावे दिली आहेत. त्यावरून साङ्‌ग वेद, श्रौत विधी, वेदान्त, पूर्वमीमांसा, तर्क, शैवमत अशा विविध ज्ञानशाखांमध्ये नीलकंठ प्रवीण असल्याचे दिसून येते.

भट, गो. के.