बागची, प्रबोधचंद्र : (१८ नोव्हेंबर १८९८-१९जानेवारी १९५६). भारताचा अतिप्राचीन इतिहास, भारत-चीन संबंध आणि चिनी भाषा ह्यांचे अग्रगामी संशोधक, आज बांगला देशात असलेल्या खुलना राज्याच्या जेसोर जिल्ह्यातील मागुरा येथे त्यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव हरिनाथ आईचे तरंगिणीदेवी. १८१८ साली, कृष्णनगर कॉलेजातून (आज हे पश्चिम बंगालमध्ये आहे) संस्कृत हा विषय घेऊन बी.ए. १९२॰ मध्ये एम्.ए. त्याच वर्षी कलकत्ता विद्यापीठात अधिव्याख्याते. कलकत्ता विद्यापीठाच्या पुरस्काराने शांतिनिकेतनात सिल्व्हँ लेव्ही या फ्रेंच पंडिताकडे अध्ययन (१९२१) व त्याच्यासह नेपाळला भेट दिली (१९२२), नंतर राशबिहारी घोष प्रवासी अधिछात्र म्हणून प्रा. लेव्ही. ह्यांच्या मार्गदर्शनाखाली इंडोचायना आणि जपान ह्या देशांत प्रवास केला (१९२२-२३). १९२३ मध्ये ते पॅरिसला गेले. तेथे सॉऱ्बॉन विद्यापीठात संस्कृतमधील बौद्ध धर्मग्रंथ, मध्य आशियातील प्राचीन भारतीय संस्कृतीचे अवशेष, चीनमधील बौद्ध वाङ्मय, प्राचीन पाली धर्मग्रंथ, अवेस्तन गाथा ह्या विषयांचा अभ्यास केला. १९२६ मध्ये ह्या विद्यापीठातून Docteures Letters ही अत्युच्च पदवी त्यांनी मिळवली. भारतात परतल्यानंतर कलकत्ता विद्यापीठातील आपले काम त्यांनी पुन्हा हाती घेतले व १९२७-१९४५ पर्यंत त्यांनी विद्यापीठाची सेवा केली. जपानी, तिबेटी चिनी भाषा बौद्धांचे मूलग्रंथ व तत्त्वज्ञान ह्यांचा खास व्यासंग त्यांनी केला होता. १९४७ मध्ये ‘नॅशनल पीकिंग यूनिव्हर्सिटी’त भारतीय इतिहास व संस्कृती ह्या विषयाचे पहिले अभ्यागत प्राध्यापक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. १९४८-५१ मध्ये विश्वभारती विद्यापीठात भारतविद्येचे (इंडॉलॉजी) प्राध्यापक, विद्याभवनाचे प्राचार्य आदी पदे त्यांनी भूषविली. १९५२ साली चीनला पाठविण्यात आलेल्या भारतीय सांस्कृतिक शिष्टमंडळाचे ते सदस्य होते. १९५४ मध्ये विश्वभारतीचे उपकुलगुरू म्हणून त्यांची नियुक्ती झाली. शांतिनिकेतनात ते निधन पावले. Le Canon Bouddhique en Chine les Traducteurs Et Les Traductions (दोन खंड, १९२७ १९३८) हा प्रबोधनचंद्रांचा पहिला ग्रंथ. संस्कृतातील बौद्ध, ग्रंथांचा चिनी अनुवाद करण्यासाठी ज्या विद्वानांनी परिश्रम घेतले, त्यांची चरित्रे त्यात दिलेली आहेत. तसेच अशा चिनी अनुवादांचे मूल्यमापनही त्यांनी त्यात केले आहे. त्यानंतर दोन प्राचीन शब्दकोशांच्या चिकित्सक आवृत्त्या त्यांनी Deux Lexiques Sanskrit Chinois… ह्या नावाने काढल्या (दोन खंड १९२९ १९३७). ह्या शब्दकोशांचे स्वरूप ‘संस्कृत-चिनी’ असे असून त्यांतील एक इ.स. आठव्या शतकातील असून दुसरा इ.स. सातव्या शतकातील आहे. हा दुसरा शब्दकोश विख्यात चिनी पंडित इत्सिंग ह्याचा आहे. प्रबोधचंद्रांच्या अन्य उल्लेखनीय ग्रंथांत इंडिया अँड चायना (१९४४ दुसरी आ.१९५॰), प्री-आर्यन अँड प्री द्रविडियन इन इंडिया (१९२९ दुसरी आवृ. १९७५) आणि स्टडीज इन द तंत्राज (१९३९) ह्यांचा समावेश होतो. भारत चीन ह्यांच्यातील दीर्घकालीन संबंधांचा आढावा त्यांनी इंडिया अँड चायना ह्या ग्रंथात घेतलेला आहे, तर प्री-आर्यन अँड प्री-द्रविडियन…. मध्ये भारताच्या अतिप्राचीन इतिहासातील समस्यांची चर्चा त्यांनी केली आहे ऑस्ट्रिक कुलातील भाषांची माहितीही दिलेली आहे. आर्य-पूर्व कालातील भारतीय संस्कृतीच्या अध्ययनासाठी प्रस्तुत ग्रंथ अत्यंत मोलाचा आहे. भारत आणि इंडोचायना, भारत आणि मध्य आशिया, भारत आणि चीन ह्या विषयांवर त्यांनी बंगाली भाषेतही पुस्तके लिहिली आहेत. स्टडीज इन द तंत्राज हा त्यांचा तंत्रमार्गावरील मौलिक ग्रंथ असून तंत्रमार्गाविषयक अनेक नव्या प्रश्नांचा विचार त्यात त्यांनी केलेला आहे. प्रबोधचंद्रांनी नेपाळला दोनदा भेट दिली होती आणि तेथील दरबारी ग्रंथालयातून काही मोलाची संस्कृत हस्तलिखिते मिळविली होती. ही हस्तलिखिते त्यांनी त्यांच्या तिबेटी चिनी अनुवादांशी ताडून पाहिली होती आणि त्यांचे चिकित्सक संपादन करून ती विद्वनांना उपलब्ध करून दिली होती. प्राचीन बंगालीतील चर्यापदनामक लघुकाव्यांची मूळ संहिता आणि त्यांचा तिबेटी अनुवाद ह्यांचा तौलनिक अभ्यास त्यांनी केला. मटेरिअल्स फॉर अ क्रिटिकल एडिशन ऑफ द ओल्ड बेंगॉली चर्यापदाज (भाग पहिला, १९३८) हा ग्रंथ त्याचे फलित होय. त्यांची अनेक भाषणे आणि लेख इंडॉलॉजिकल स्टडीज ह्या नावाने प्रसिद्ध होत आहेत.

सायनो-इंडियन स्टडीज हे दर्जेदार त्रैमासिकही त्यांनी चालविले. प्रबोधचंद्रांना अनेक सन्मान प्राप्त झाले. प्रवासी बंग साहित्य संमेलन (१९३८), बर्मा बंगाली साहित्य परिषद (रंगून, १९३९), भारतीय इतिहास परिषद (अलिगढ, १९४३) ह्यांचे ते अध्यक्ष होते. नागपूर येथे भरलेल्या अखिल भारतीय प्राच्यविद्या परिषदेचे (१९४६) ते पालीप्राकृत विभागाध्यक्ष होते.

प्रबोधचंद्रांच्या निधनाने भारत आणि चीन ह्यांच्यामधील एक असाधारण सेतू नष्ट झाला, अशा आशयाचे उद्गार सुनीतिकुमार चतर्जी ह्यांनी काढले आहेत.

भट, गो. के.