विद्याभूषण, सतीशचंद्र : (३० जुलै १८७०-२५ एप्रिल १९२०). विख्यात भारतविद्यावंत. जन्म फरीदपूर जिल्ह्यातील खालकुला ह्या गावी. त्यांचे वडील पंडित पितांबर विद्यावागीश हेही विद्वान होते. सतीशचंद्र अवघे चार वर्षांचे असतानाच त्यांचे वडील निवर्तले. त्यामुळे प्रतिकूल अवस्थेत त्यांना आपले शिक्षण पूर्ण करावे लागले. आरंभीचे शिक्षण गावातल्याच शाळेत घेतल्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते नवद्वीप येथील ‘हिंदू स्कूल’ मध्ये दाखल झाले. १८८८ साली कलकत्ता विद्यापीठाच्या प्रवेशपरिक्षेत उत्तीर्ण होऊन कलकत्त्याच्या ‘सिटी कॉलेजा’त ते शिक्षण घेऊ लागले. १८८९ साली मिदनापूर कॉलेजचे प्राचार्य बाबू गंगाधर आचार्य ह्यांच्या कन्येशी त्यांचा विवाह झाला. संस्कृत विषय घेऊन ते बी. ए. (१८९२) आणि एम्. ए. (१८९३) झाले. दरम्यान नवद्वीप येथील ‘विदग्ध जननी सभे’च्या संस्कृत परीक्षेत त्यांनी उत्तम यश संपादन केल्यामुळे त्यांना ‘विद्याभूषण’ ही पदवी देण्यात आली होती. एम्. ए. झाल्यानंतर कृष्णनगर येथील एका महाविद्यालयात संस्कृतचे प्राध्यापक म्हणून ते काम करू लागले. तेथे म. म. अजितनाथ न्यायरत्न न म. म. जदुनाथ सार्वभौम ह्यांसारख्या गाढ्या विद्वानांकडून संस्कृत काव्य व संस्कृतातील न्यायशास्त्र शिकण्याची संधी त्यांना मिळाली. त्यानंतर काही वर्षांनी बंगाल सरकारने ‘बुद्धिस्ट टेक्स्ट सोसायटी’साठी त्यांची मदत घेतली. ह्या संस्थेच्या विद्यमाने त्यांनी अनेक पाली ग्रंथांचे संपादन केले आणि मूलभूत संशोधनात्मक असे अनेक निबंध लिहिले. त्यांच्या ह्या कामगिरीमुळे यूरोप-अमेरिकेतील विद्वानांचे लक्ष त्यांनी वेधून घेतले. पुढे तिबेटी-इंग्रजी शब्दकोशाच्या विद्वानांचे लक्ष त्यांनी वेधून घेतले. पुढे तिबेटी-इंग्रजी शब्दकोशाच्या कामातही त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले. ह्या कामासाठी दार्जिलिंग येथे असताना (१८९७-१९००) त्यांनी फंछोग वाङ्‌ग्डन या विद्वान लामांकडे तिबेटी भाषेचे अध्ययन करून तिच्यावर प्रभुत्व मिळविले. पुढे कलकत्त्याच्या ‘संस्कृत कॉलेजा’त प्राध्यापक म्हणून काम करीत असताना ते पाली विषय घेऊन उत्तम प्रकारे एम्. ए. झाले. १९०५ साली भारतातील प्राचीन पवित्र बौद्ध स्थळे पाहण्यासाठी आलेल्या ताशी लामांना त्या स्थळी घेऊन जाण्याचे, त्या स्थळांचा इतिहास सांगण्याचे आणि त्यांचा दुभाषा होण्याचे काम त्यांच्यावर सरकारकडून सोपविले गेले. त्यांच्या सहकार्यावर संतुष्ट होऊन ताशी लामा ह्यांनी एक सुंदर रेशमी उपरणे त्यांना भेट म्हणून दिले. १ जानेवारी १९०६ रोजी ‘महामहोपाध्याय’ हा किताब देऊन त्यांना गौरविण्यात आले. १९०८ साली त्यांना पीएच्. डी. पदवी मिळाली. विद्याव्यासंगासाठी १९०९ साली ते श्रीलंकेलाही जाऊन आले. डॉ. जॉर्ज थिबो यांच्याकडून फ्रेंच आणि जर्मन ह्या भाषंचेही चांगले ज्ञान त्यांनी मिळविले होते. १९१६ साली तिबेटी भाषेची उच्च श्रेणीतील पदवी त्यांनी मिळविली. १९१० साली कलकत्त्याच्या संस्कृत कॉलेजचे ते प्राचार्य झाले. थोर विद्वान म्हणून त्यांची कीर्ती सर्वदूर पसरली होती. त्यांच्या विद्वत्तेला साजेसे सन्मानही त्यांना मिळाले. अखिल भारतीय स्वरूपाच्या अनेक विद्वत्परिषदांचे अध्यक्षपद त्यांच्याकडे चालून आले. उदा., बनारस येथे भरलेल्या अखिल भारतीय दिगंबर जैन परिषदेच्या अधिवेशनाचे पहिले अध्यक्ष (१९१३), अखिल भारतीय श्वेतांबर जैन परिषदेच्या जोधपूर येथील अधिवेशनाचे अध्यक्ष (१९१४), अखिल भारतीय संस्कृत परिषदेच्या हरद्वार अधिवेशनाचे अध्यक्ष (१९१४), १९१९ साली पुणे येथे भरलेल्या पहिल्या प्राच्यविद्यापरिषदेचे उपाध्यक्ष, पाली व बुद्धिझम विभागाचे अध्यक्ष इत्यादी. बंगालमधील संस्कृत शिक्षणाची पुनर्रचनाही त्यांनी केली.

त्यांनी लिहिलेल्या-संपादिलेल्या ग्रंथांपैकी काही खालीलप्रमाणे : अवदान कल्पलता (संपा.) आत्मतत्त्वप्रकाश (न्यायदर्शनावरील बंगाली ग्रंथ, १८९७), लंकावतारसूत्र (संपा. १९००), कच्चायनाज पाली ग्रामर (मूळ ग्रंथाचे संपादन आणि त्याचे इंग्रजी भाषांतर, (१९०१), ग्रिम्स फोनेटिक लॉ ऑफ द इंडो-यूरोपियन लँग्वेजिस (१९०५), परीक्षामुख्यसूत्रम् (संपा.-दिगंबर जैनांचा तर्कशास्त्रविषयक ग्रंथ, १९०९), हिस्टरी ऑफ मिडीएव्हल स्कूल ऑफ इंडियन लॉजिक (१९०९), अमरकोश (संपा, तिबेटी भाषांतरासह, १९११-१२), द न्याससूत्राज् ऑफ गौतम (इंग्रजी भाषांतर, १९१३) आणि ए हिस्टरी ऑफ इंडियन लॉजिक (१९२२) वगैरे. त्यांनी विद्वत्तापूर्ण व मौलिक असे एकूण २२ ग्रंथ लिहिले व जागतिक स्तरावरील निरनिराळ्या नियतकालिकांत प्रदीर्घ असे १५० लेख लिहिले.

मस्तिष्काघाताच्या विकाराने कलकत्ता येथे ते निधन पावले.

कुलकर्णी, अ. र.