मल्लिनाथ : (चौदावे शतक). विख्यात संस्कृत टीकाकार. पेड्डभट्ट म्हणूनही हा आंध्रात ओळखला जातो. ह्याला महोपाध्याय ही पदवी असून हा व्याकरण, काव्यशास्त्र इ. शास्त्रांत पारंगत असल्याने ह्याच्या टीका प्रमाणभूत मानल्या जातात. ‘नामूलं लिख्यते किञ्जित्’ (आधारावाचून लिहावयाचे नाही) अशा प्रतिज्ञेने मल्लिनाथाने आपल्या टीका लिहिल्या आहेत. काव्याचे मर्म उलगडून दाखविताना साहित्यशास्त्र, व्याकरण, आनुषंगिक शास्त्रे आणि वेद–पुराणादी वाङ्मय ह्यांचे अचूक संदर्भ त्याने ठिकठिकाणी दिले आहेत. चतुरस्त्र अध्ययनाबरोबर काव्यज्ञाची रसिकताही त्याच्यापाशी होती. रघुवंश, कुमारसंभव (पहिले आठ सर्ग), मेघदूत, भट्टिकाव्य, किरातार्जुनीय, शिशुपालवध, नैषधचरित, अमरकोश, वरदराजकृत तार्किक-रक्षा, विद्याधरकृत एकावलि ह्या ग्रंथांवरील त्याच्या टीका प्रसिद्ध आहेत. त्याचा मुलगा कुमारस्वामी ह्यानेही विद्यानाथकृत प्रतापरुद्र-यशोभूषण ह्या काव्यशास्त्रपर ग्रंथावर रत्नप्रभा नावाची उत्कृष्ट टीका लिहिली आहे.

मंगरूळकर, अरविंद