महाभारत : संस्कृत भाषेतील दोन अतिप्राचीन महाकाव्यांपैकी एक महाकाव्य कृष्णद्वैपायन व्यासांचे महाभारत हे होय दुसरे महाकाव्य म्हणजे वाल्मीकी मुनींचे रामायण होय. भारत हा शब्द पाणिनीच्या व्याकरणात (अष्टाध्यायी ४-२-५६) भरत या नावाच्या मानववंशाचा संग्राम या अर्थी सिद्ध केला आहे. या अर्थी सिद्ध केलेल्या भारत या शब्दाला ‘महान्’ हे विशेषण पाणिनीने (६−२−३८) लावून महाभारत हा शब्द सिद्ध केला आहे. भरत लोकांचे महायुद्ध असा याचा अर्थ होतो. म्हणून या महायुद्धाच्या कथेला भारत किंवा महाभारत हे नाव दिले. प्रतिपाद्य विषयाचे नाव प्रतिपादक ग्रंथाला दिले जाते. उदा., कालिदासाचे रघुवंश  हे महाकाव्य.

हे भरत लोक कोण होते ? भरत या मानववंशाचे नाव ऋग्वेदा मध्ये अनेक ठिकाणी येते. त्याच मावनवंशाच्या भारतजन असा उल्लेख ऋग्वेदात आला आहे. भरत या संज्ञेचे अनेक प्राचीन सम्राट पुराणांमध्ये निर्दिष्ट केलेले आढळतात. त्यांपैकी दुष्यंत-शकुंतला यांचा पुत्र भरत हा सम्राट होऊन त्याच्या वंशालाही भरत ही संज्ञा होती. त्याच्याच वंशातील कौरव-पांडव हे होत. त्यांच्या युद्धाची कथा म्हणजे भारत किंवा महाभारत होय. दुष्यंतपुत्र भरताच्या कुलात जन्मलेल्या कुरू राजाचे हस्तिनापूर येथील वंशज म्हणजे कौरव आणि पांडव होत. या वीरांची जन्मापासून अखेरपर्यंतची महाभारत ही कथा वीरगाथाच होय. ही वीरगाथा संबंध महाभारताचा गाभा होय.

कुरूवंशीय सम्राट शंतनु याच्या क्रमाने झालेल्या दोन विवाहांपासून ही वीरकथा सुरू होते. शंतनूची पहिली पत्नी गंगा होय. ही गंगा म्हणजे मावनशरीरिणी गंगा नदी. त्याला तिच्या पोटी आठ पुत्र उत्पन्न झाले. त्यांपैकी पहिले सात तिने गंगेत बुडवून टाकले. आठवा जन्मल्याबरोबर ती त्याला बुडवायला निघाली, तेव्हा शंतनूने प्रतिबंध केला तेव्हा त्याला घेऊन ती निघून गेली. त्याचे नाव देवव्रत. पुढे तोच भीष्म या नावाने प्रसिद्धीस आला. गंगा निघून गेल्यावर काही वर्षांनी देवव्रत गंगेने परत दिला. नंतर एका धीवराच्या म्हणजे कोळ्याच्या मुलीशी शंतनूने लग्न केले. तिचे नाव सत्यवती. त्या धीवराने शंतनूला एका अटीवर आपली कन्या सत्यवती दिली. ती अट म्हणजे सत्यवतीच्या पुत्रालाच राजपद मिळाले पाहिजे. ह्या अटीला देवव्रताने पितृभक्तीमुळे अनुमती दिली आणि मी ज्येष्ठ पुत्र असूनदेखील राजपद घेणार नाही आणि जन्मभर ब्रम्हचारी, अविवाहित राहीन अशी कठोर, भयानक प्रतिज्ञा केली व पाळली. त्यामुळे त्याला ‘भयानक’ या अर्थी  ‘भीष्म’ हे नाव प्राप्त झाले. ती  धीवरकन्या सत्यवती या लग्नापूर्वी कुमारी असूनदेखील माता झाली होती. ती  नौका चालवित होती. पराशर मुनींची व तिची नौकेत गाठ पडली. दोघांचे प्रेम जमले. तिला पराशर मुनींपासून कृष्णद्वैपायन व्यास हा पुत्र यमुनेच्या एका बेटावर झाला. तो यमुनेच्या त्या बेटावर वाढला. हाच महाभारतकार व्यास होय. नंतर सत्यवती शंतनूची पत्नी झाली. तिच्यापासून शंतनूला चित्रांगद व विचित्रवीर्य हे पुत्र झाले. चित्रांगद लहानपणीच एका गंधर्वाने मारला. विचित्रवीर्य हा पुत्र निपुत्रिकच निवर्तला. त्यामुळे सत्यवतीने आपला कानीन पुत्र जो कृष्णद्वैपायन व्यास त्याच्या द्वारे आपल्या सुनांच्या-म्हणजे अंबिका व अंबालिका ह्या विचित्रविर्याच्या दोन विधवा पत्नींच्या–ठिकाणी नियोगविधीने  अनुक्रमे धृतराष्ट्र आणि पांडु हे दोन पुत्र निर्माण केले. धृतराष्ट्र अंध आणि पांडु हा फिका जन्मला. विचित्रवीर्याच्या दासीपासून कृष्णद्वैपायनाने विदुर ह्या प्रज्ञावान पुत्राला जन्म दिला. धृतराष्ट्राचे शंभर पुत्र कोरव आणि पांडूचे पाच पांडव यांच्यामध्ये बालपणापासूनच जो विग्रह सुरू झाला, या विग्रहाची अखेर परिणती मोठ्या व्यापक संग्रामामध्ये झाली. या संग्रामात देशोदेशीचे राजे, राजपुत्र, कौरव-पांडवांचे संबंधी बांधव एकेक पक्ष घेऊन सामील झाले. १८ दिवस कुरूक्षेत्राच्या रणांगणात तुमुल संग्राम झाला. असंख्य मानवांचा संहार झाला, कुरूवंशाचा निःपाप झाला एकच धागा म्हणजे अर्जुनपुत्र अभिमन्यूपासून उत्तरेला राहिलेला गर्भ तिच्या उदरात शिल्लक राहिला. तो जन्मल्यानंतर परिक्षित म्हणून विख्यात झाला. सगळे पांडव आणि कौरव मरून स्वर्गस्थ झाले. असे हे संक्षिप्त भारत.

युद्धाच्या समाप्तीनंतर कौरव−पांडवांचे पितामह कृष्णद्वैपायन व्यासमुनी यांनी तीन वर्षे ग्रंथलेखनाची तपश्चर्या करीत ही युद्धकथा लिहून पुरी केली. व्यासमुनींनी श्लोक रचून ती कथा गणपतीला सांगितली आणि गणपती ह्या देवाने ती लिहून पुरी केली. या ग्रंथाला जय, भारत आणि महाभारत अशा तीन संज्ञा दिलेल्या ग्रंथातच आढळतात. या ग्रंथाच्या प्रारंभी जो मंगलाचरणाचा श्लोक आहे त्यातच या ग्रंथाचे जय हे नाव आले आहे.

नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमम् ।

देवीं सरस्वतीं चैव ततो जयमुदीरयेत् ।।

‘नारायण आणि त्याचप्रमाणे नरोत्तम नर यांना तसेच देवी सरस्वतीला नमस्कार करून त्यानंतर जय ग्रंथाचे पठन करावे’.

प्रारंभीच निर्दिष्ट केल्याप्रमाणे पाणिनीच्या सूत्रांवरून असे लक्षात येते की, महाभारत हे नाव प्रथमपासूनच प्राप्त झालेले असावे भारत ह्या ग्रंथाचा बराच विस्तार कालांतराने झाल्यानंतर महाभारत हे नाव प्राप्त झाले नसावे कारण महान हे विशेषण भारतसंग्रामाचे विशेषण आहे आणि तो संग्राम महासर्वसंहारक होता, ही गोष्ठ लक्षात घेऊन विकल्पाने भारत किंवा महाभारत असे त्या संग्रामाला प्रथमपासूनच म्हणत असावेत. परंतु यासंबंधी निश्चित असे काहीच सांगता येत नाही कारण वारंवार भर पडत गेली त्यामुळे ग्रंथाची श्लोकसंख्या वाढली. ग्रंथाचा भार मोठा झाला म्हणून त्याला महाभारत म्हणतात असे आदिपर्वातच म्हटले आहे. आश्वलायन गृह्यसूत्रातील   ऋषितर्पणात चार व्यासशिष्य यांचा निर्देश आल्यानंतर (भारत महाभारताचार्यः) भारताचार्य व महाभारताचार्य असे वेगवेगळे निर्देश येतात. महाभारताचे क्रमाने तीन संस्कार झाले, याची नोंद महाभारतातच आहे. कृष्णद्वैपायनांनी शिष्य वैशंपायन यांना हा इतिहास पढविला वैशंपायन ऋषींनी पांडवांचा उत्तराधिकारी राजा परिक्षित याचा पुत्र जनमेजय याला त्याने आरंभिलेल्या सर्पसत्राच्या वेळी ही भारतकथा सांगितली त्यावेळी सूत लोमहर्षण याचा पुत्र उग्रश्रवा हा उपस्थित होता. राजांच्या, ऋषींच्या, देवासुर, राक्षस, यक्षादिकांच्या व त्यांच्या वंशांच्या कथा, वीरकथा, इतर धार्मिक आणि ऐहिक घटनांच्या कथा, विश्वोत्पत्ती व विश्वरचना यांची वर्णने वा पुराणे रचण्याचा व सांगण्याचा व्यवसाय वंशपरंपरेने करीत असलेल्या जमातीला किंवा अशा एका संकर जातीला ‘सूत’ ही संज्ञा होती. भृगुकुलोत्पन्न शौनक ऋषींनी नैमिषारण्यात आरंभिलेल्या द्वादश वार्षिक सत्राच्या समारंभात उपस्थित असलेल्या ऋषींच्या विनंतीवरून महाभारत त्या सत्रात उग्रश्रव्याने सांगितले. तात्पर्य, एकंदर तिघांचे संस्कार होऊन हा ग्रंथ वाढत गेला. या ग्रंथातच पहिल्या अध्यायात म्हटले आहे की, मनूच्या निर्देशापासून भारत ग्रंथ सुरू होतो, असे काही म्हणतात. आस्तिक ऋषीची कथा असलेल्या उपपर्वापासून (भांडारकर प्राच्यविद्यासंशोधन संस्थाप्रत आदिपर्व अध्याय−४−५३) हा ग्रंथ सुरू होतो असे कित्येकांचे मत आहे. उपरिचर राजाच्या कथेपासून (आदिपर्व अध्याय ५७) ग्रंथ सुरू होतो असे कित्येक मानतात. आस्तिक उपपर्वाच्या अखेरीस (आदिपर्व अध्याय ५३) शौनक ऋषी सूत उग्रश्रवा याला म्हणतात की, कृष्णद्वैपायनांनी सांगितलेले महाभारत आख्यान मी ऐकू इच्छितो. तेव्हा सूत त्याला सांगतो की, हे मोठे आख्यान महाभारत पहिल्यापासून आता तुला सांगतो. त्यानंतर आदिवंशावतरण हे उपपर्व येते. त्या उपपर्वातील पहिल्या छोट्याशा दोन अध्यायांत (अ. ५४–श्लोक-२४ अ ५५−श्लोक−४३) महाभारत हे आख्यान वैशंपायनांनी जनमेजयाला संक्षेपाने (समासेन) सांगितले. तेव्हा जनमेजय म्हणतो, हे आख्यान मला विस्ताराने सांगा मला एवढ्यात समाधान नाही. जनमेजयाला वैशंपायनांनी महाभारत आख्यान प्रथम अगदी संक्षेपाने सांगितले आणि मग पुन्हा तेच आख्यान विस्ताराने सांगण्यास सुरूवात केली. तेव्हा वैशंपायन प्रस्तावनेत म्हणतात–हे महाभारत –आख्यान शत सहस्त्र श्लोकांचे म्हणजे लक्ष श्लोकांचे, सत्यवतीचा पुत्र व्यास याने सांगितले आहे हा जय नावाचा इतिहास आहे हे अर्थशास्त्र, धर्मशास्त्र आणि मोक्षशास्त्र आहे याला महाभारत म्हणतात. याचे कारण भरतवंशीय लोकांचा महान जन्म म्हणजे त्यांचे महान जीवन आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष ह्यांविषयी ह्यात जे सांगितले आहे तेच अन्यत्र सांगितलेले असते. जे येथे सांगितले नाही ते कोठेही मिळायचे नाही (आदिपर्व अध्याय ५६). या ठिकाणी हा महाभारत ग्रंथ लक्ष श्लोकात्मक आहे असे म्हटले परंतु आदिपर्वाच्या पहिल्या अध्यायात (श्लोक−६१) म्हटले आहे की, २४ सहस्त्र श्लोकांची ही भारतसंहिता, उपाख्याने वगळून, कृष्णद्वैपायन व्यासांनी तयार केली. तेवढ्याला भारत असे विद्वान लोक म्हणतात. कौरव-पांडवांच्या पूर्वजांची कथा धरून कौरव−पांडवांच्या प्रारंभापासून अखेरपर्यंतच्या जीवनाच्या कथेचा गाभा आदिपर्वापासून स्वर्गारोहण पर्वापर्यंत सापडतो. परंतु आदिपर्वापासून स्वर्गारोहण पर्वापर्यंत अनेक आख्याने व उपाख्याने मधूनमधून भरण्यात आली आहेत. त्यांतील काही मूळ कथेशी जुळणारी आहेत काही जुळवून घेतली आहेत काही आडवळणी व विसंगत आहेत. पहिले दोन अध्याय वगळून आदिपर्वाच्या प्रारंभी, भांडारकर प्राच्यविद्यासंशोधन संस्थेने प्रसिद्ध केलेल्या चिकित्सक आवृत्तीच्या अनुसाराने, पहिल्या ५३ अध्यायांमध्ये कौरव-पांडवांच्या कथेशी संबंध नसलेल्या निराळ्याच कथा भरलेल्या आहेत.


ययाती व देवयानी यांची कथा अखेरीस वैराग्यकाव्य बनले आहे. मुळात प्रथम तसे नसेल. नल-दमयंती  आख्यान हे स्वतंत्र महाकाव्य जागतिक वाङ्मयात प्रतिष्ठा पावलेले आहे ते या ग्रंथात मागाहून सामाविष्ट केलेले दिसते. सावित्री−सत्यवान यांची भव्योदात्त कथा अशीच मागाहून अन्तर्भूत केलेली दिसते. कद्रू आणि विनता यांचे आख्यान, एक विशाल असे निसर्गसृष्टीचे रूपक आहे कद्रू म्हणजे पृथ्वी, तिचे पुत्र सर्प विनता म्हणजे नभोमंडल, कढईसारखे बाक असलेले नभोमंडलाचा पुत्र गरूड आकाशात भराऱ्या मारणारा. नाग व गरूड यांची कथा, भृगुवंशाची व विशेषतः च्यवन व सुकन्या यांची कथा, मनू आणि मासा यांची कथा, भार्गव परशुराम कथा, रामकथा, कार्तवीर्यार्जुन कथा, वसिष्ठ-विश्वामित्र कथा अशी पुष्कळ आख्याने-उपाख्याने काही जुळणारी, काही जुळवून घेतलेली व काही तशीच या ग्रंथात भरली आहेत. म्हणून भारतीय साहित्याचा इतिहास लिहिणारे जर्मन पंडित विंटरनिट्‌झ महाभारताला अनेक ग्रंथांचा संग्रह म्हणून निर्दिष्ट करतात. काही आख्याने आणि उपाख्याने मूळ गाभ्याशी अधिक जुळणारी अशी दिसतात. उदा., वनपर्वातील अजगर होऊन पडलेला राजा नहुष आणि युधिष्ठिर यांचा संवाद किंवा यक्षयुद्धिष्ठिर संवाद, भीष्मपर्वातील भगवद्‌गीता मूळ कथानकाशी, तिचा सारांश लक्षात घेता सुसंगत दिसते परंतु दोन्ही बाजूंची सैन्ये एकमेकांशी भिडली असता. शस्त्रसंपात प्रवृत्त झाला असताना इतकी दीर्घकाळ तत्त्वचर्चा चाललेली विसंगत वाटते. 

परंतु या महाभारताख्यानाच्या संदर्भात प्राचीन भारतीय संस्कृतीचा वैचारिक परमोत्कर्ष म्हणजे भगवद्‌गीता होय, असे म्हणता येते. विश्वसाहित्यातील तिचे उच्चच स्थान निर्विवादपणे आज मान्य झाले आहे. विश्वव्यापी विनाशाच्या अपरिहार्य परिणतीच्या दर्शनाने मानवी मन गलितधैर्य बनता कामा नये तटस्थ, अलिप्त, शांत, तत्त्वदर्शी प्रज्ञेच्या सामर्थाने प्रपंचात मानवाने टिकले पाहिले, असा संदेश गीता देते. मानवी जीवनाचा अर्थ अनंत व अगाध विश्वाच्या म्हणजे विश्वरूपदर्शनाच्या संदर्भात लक्षात घेऊन गीतेने हा संदेश दिला आहे. महाभारतसंग्रामाचा तो ध्वनितार्थ आहे. वासुदेव कृष्ण हा पुरूषोत्तम, प्रत्यक्ष विष्णूच भगवद्गीतेचा उपदेष्टा आहे. मूलतः महाभारत हा वासुदेव भक्तिसंप्रदायातला ग्रंथ आहे परंतु त्यात अर्जुनाला पाशुपत अस्त्र देणारा पशुपती शिवही मधूनमधून प्रकट होतो देवीही एखाद्या वेळी झळकते. हिंदू धर्मातील सर्व संप्रदायांना मान्य असा हा ग्रंथ आहे. मुख्यतः हे महाकाव्य आहे. या महाकाव्यामध्ये धीरोदात्त पुरूष आणि महनीय महिला यांचे जीवन हे केंद्रस्थानी आहे. अद्‌भूत कथानकांच्या स्वरूपात दडलेल्या अतिप्राचीन इतिहास त्यांत सूचित केला आहे. राजनीती, धर्मशास्त्र आणि तत्त्वज्ञान त्याचप्रमाणे तीर्थकथांच्या संदर्भांतील धार्मिक कर्मकांड यांचाही ऊहापोह यात केलेला आहे. कमीत कमी दोन सहस्त्र वर्षे मान्य झालेला हा ग्रंथ आहे.

हा भारत  संग्राम केव्हा घडून आला याच्याबद्दल निर्विवाद निर्णय करण्याइतपत पुरावा अजून मिळालेला नाही. हल्ली रूढ असलेल्या हिंदूंच्या पौराणीक युगगणनेच्या पारंपारिक पद्धतीप्रमाणे कलियुगाच्या प्रारंभी भारत संग्राम घडून आला, असे चिंतामण विनायक वैद्य इत्यादी विद्वानांचे मत आहे कलियुग हे इ. स. पूर्व ३१०१ या वर्षी लागले म्हणून तोच भारत−युद्धाचा काळ ते ठरवितात. काही अन्य संशोधक आपापल्या कल्पनेप्रमाणे इ. स. पू. बाराव्या शतकापासून नवव्या शतकाच्या कालावधीत निरनिराळ्या कालविभागांत भारतीय युद्ध झाले. असे मानतात. नागपूरचे डॉ. के. ल. दप्तरी हे महाभारतातील युद्धकाल निर्णय या निबंधात इ. स. पू. ११९७ (शकपूर्व १२७५.३) हे साल भारतीय युद्धाचा काल ठरवतात. इ. स. पू. पाचवे शतक हा साधारणपणे पाणिनीचा काळ धरतात. पाणिनीच्या वेळी महाभारत ही संज्ञा रूढ झाली होती. सध्याचे लक्ष श्लोकात्मक महाभारत इ. स. च्या पहिल्या शतकात बहुतेक असावे असे त्या वेळच्या एका ग्रीक प्रवाशाच्या नोंदीवरून मानता येते. हा लक्ष श्लोकात्मक ग्रंथ गुप्तकाली म्हणजे इ. स. पाचव्या शतकात उपलब्ध होता, याबद्दल मात्र शंका राहत नाही.

महाभारताच्या अनेक पाठावृत्त्या हिंदुस्थानच्या निरनिराळ्या लिपींमध्ये भिन्नभिन्न प्रदेशांत मान्यता पावलेल्या आढळतात. त्यांच्यामध्ये मजकूर पुढचा मागे व मागचा पुढे झालेला दिसतो. अनेक अध्याय वा श्लोक कमीजास्त आहेत. सु. १२ हजार श्लोकसंख्यांचा फरक आढळतो. उदा., कुंभकोणम प्रत. मजकुराची विसंगती अनेक ठिकाणी दिसते. उदा., जतुगृहदाहउपपर्व. त्या सगळ्या पाठावृत्त्या तपासून कोणती पाठीवृत्ती सगळ्यांत प्राचीन असावी, हे निश्चित करून व चिकित्सक पाठावृत्ती संपादून प्रकाशित करण्याकरिता पुणे येथील भांडारकर प्राच्यविद्यामंदिराने डॉ. व्ही. एस्. सुकथनकर यांच्या नेतृत्वाखाली संपादनकार्यालय स्थापित केले. चिकित्सक आवृत्ती संपादून सु. ४० वर्षांत निर्माण केली. जुन्यातली जुनी चिकित्सक पाठावृत्ती आता वाचकांच्या हाती पडली आहे. या संपादकांनी आज ज्या अनेक पाठावृत्त्या उपलब्ध आहेत, त्यांचे विभाजन उत्तर भारतीय पाठावृत्त्या व दक्षिण भारतीय पाठावृत्त्या अशा दोन वर्गांत केले. उत्तर भारतीय पाठावृत्त्या शारदा (काश्मीरी), नेपाळी, मैथिली, बंगाली व देवनागरी या पाच लिप्यांमध्ये आणि दक्षिण भारतीय पाठावृत्त्या तेलुगू, ग्रंथ, मलयाळम् आणि देवनागरी लिपींमध्ये उपलब्ध आहेत. त्या सगळ्या तपासून ही चिकित्सक पाठावृत्ती प्रकाशित केली आहे.

सध्या उपलब्ध असलेल्या सर्व पाठावृत्त्यांमधील महाभारताची एकंदर १८ पर्वे आहेत. पर्व म्हणजे विभाग. हरिवंश हे खिल, १९ वे पर्व. प्रत्येक पर्वात अनेक उपपर्वे, उपपर्वे अध्यायांमध्ये आणि अध्याय श्लोकांमध्ये अशी रचना आहे. क्वचित काही अध्याय हे गद्यरूप आहेत. सामान्यतः सर्व १८ पर्वांची शीर्षके लक्षात घेतली, तर ती सर्व शीर्षके क्रमाने विकास पावणाऱ्या कथेची विषयदर्शक शीर्षके आहेत, ही गोष्ठ वाचकांच्या ध्यानात भरते. (१) आदिपर्व, (२) सभापर्व, (३) वनपर्व, (४) विराटपर्व, (५) उद्योग पर्व, (६) भीष्म पर्व, (७) द्रोण पर्व, (८) कर्ण पर्व, (९) शल्य पर्व, (१०) सौप्तिक पर्व, (११) स्त्री पर्व, (१२) शांती पर्व, (१३) अनुशासन पर्व, (१४) आश्वमेधिक पर्व, (१५) आश्रमवासिक पर्व, (१६) मौसल पर्व, (१७) महाप्रस्थानिक पर्व, (१८) स्वर्गारोहण पर्व. हरिवंश हे पर्व खिल म्हणजे परिशिष्ट किंवा मागून जोडलेले एकोणिसावे पर्व होय. प्रत्यक्ष महाभारतात कृष्णकथा नाही. ती कथा विस्ताराने हरिवंशात सांगितली आहे.

महाभारताची रचना किंवा महाभारताची निरनिराळ्या वेळी झालेली संस्करणे म्हणजे व्यासांची रचना, त्यावरील वैशंपायनांचा संस्कार आणि त्यानंतर सूत उग्रश्रव्याने केलेला संस्कार एवढ्यावरच महाभारताची संस्करणे थांबली नाहीत. भृगुकुलातील ऋषींनीही महाभारतावर नंतर केलेला संस्कार स्पष्ट दिसतो. या गोष्टीकडे व्ही. एस्. सुकथनकर यांनी चिकित्सकांचे लक्ष वेधून घेतले आहे. भृगुकुलातील सर्वांत प्रख्यात पुरूष म्हणजे परशुराम किंवा भार्गवराम होय. याच्या अनेक कथा या ग्रंथात गोवल्या आहेत. आदिपर्वातल्या पौलोम व पौष्य या उपपर्वातील अधिकांश भाग भृगुवंशीयांच्या कथांनी भरलेला आहे. वस्तुतः भार्गवरामाच्या कथा किंवा रुरू आणि च्यवनऋषीची कथा वगळली असती, तरी या भारत कथेत अपूर्णता दिसली नसती. भरतवंशाची कथा सुरू होण्याच्या अगोदरच भार्गव वंशाची कथा सुरू होते. हे एकापरी विसंगत व विचित्र दिसते.


महाभारताच्या मुख्य कथेची रूपरेषा अशी आहे : आदिपर्व : पांडू व धृतराष्ट्र यांचा जन्म नियोगविधिने अंबालिका व अंबिका ह्या विचित्रवीर्याच्या पत्नींपासून झाला. येथपर्यंतचा कथाभाग वर आलेलाच आहे. धृतराष्ट्र हा जन्मांध म्हणून त्याला राजपद मिळाले नाही. पांडू हा युद्धविद्यानिपुण म्हणून हस्तिनापूरच्या राजसिंहासनावर भीष्मांनी त्याची स्थापना केली. धृतराष्ट्र, पांडू व विदुर या तिघांचेही शिक्षण झाले व विवाहही झाले. धृतराष्ट्राने गांधारीला वरले. आपला पती अंध आहे, असे समजताच तिने आपल्या नेत्रांवर कायमची पट्टी बांधली. कुंती आणि माद्री यांच्याशी पांडूचा विवाह झाला. त्याने अनेक दिग्विजय करून आपले राज्य वाढविले. एकदा अरण्यात तो मृगया करीत असता मृग आणि मृगीच्या रूपाने एक मुनिदांपत्य कामोपभोग घेत होते. पांडूचा बाण लागून मुनी मरण पावला. मरताना पांडूला त्या मुनीने शाप दिला की, तूही स्त्रीसंग करताच तत्काल मरशील. त्यानंतर पांडूने विजनवास पतकरला. वनात असताना पांडूने कुंती आणि माद्री या दोन्ही पत्न्यांना नियोगविधिने अन्य पुरूषांपासून पुत्रप्राप्ती करून घ्यावी, अशी आज्ञा केली. कुंतीला एका ऋषीने पुत्र प्राप्तीकरता मंत्रविद्या शिकवली होती. तिच्या योगाने कुंतीने यम, वायु  व इंद्र यांचे मंत्रांनी आवाहन करून त्यांच्यापासून धर्म, भीम व अर्जन हे पुत्र प्राप्त करून घेतले माद्रीने आश्विनीकुमारांपासून नकुल व सहदेव हे दोन पुत्र मिळविले. धृतराष्ट्राची पत्नी गांधारी याच सुमारास गर्भवती होती. आपल्या आधी कुंतीला पुत्र झाल्याचे ऐकून तिच्या मनाला धक्का बसला आणि तिचा गर्भ पतन पावला. धक्का बसण्याचे कारण आपला पुत्र राज्याचा वारस होणार नाही कुंतीचाच पुत्र वारस होईल, हे लक्षात आले. तिचा गर्भ लोखंडासारखा टणक मांसपेशी होता. व्यासांच्या सांगण्यावरून त्यावर थंड पाण्याचा शिपका मारला. त्याचे एकशे एक भाग झाले. ते भाग एकशे एक घृतकुंभांमध्ये जपून ठेवले. त्यांतून दुर्योधन, दुशाःसन इ. शतपुत्र आणि एक कन्या अशी एकशे एक अपत्ये निपजली. एके दिवशी माद्रीशी रममाण झाला असताना पांडू पंचत्वाप्रत गेला कारण असा शाप होता. त्याच्याबरोबर माद्रीने सहगमन केले आणि कुंती पाच पांडवांसह राजधानीला म्हणजे हस्तिनापूरला परतली. पांडवांना परतलेले पाहून भीष्मांना संतोष झाला. भीष्मांनी कौरव-पांडवांना धनुर्विद्या शिकविण्यासाठी प्रथम कृपाचार्यांची नेमणूक केली. त्यानंतर द्रोणाचार्य आपला पुत्र अश्वत्थामा याच्यासह हस्तिनापूरला आले. ते शस्त्रास्त्रविद्येत पारंगत असल्यामुळे भीष्मांनी कौरव-पांडवांचे आचार्य म्हणून त्यांची योजना केली. पांडूशी विवाह होण्याच्या अगोदर कुंतीला कुमारी असतानाच सूर्यमंत्राने कर्ण हा पुत्र झाला होता. तोही द्रोणाचार्यांच्या हाताखाली शिकला. कुंतीने त्याचा जन्म झाल्याबरोबरच त्याला नदीत सोडले होते. एका सूतजातीय व्यक्तीने त्याचा सांभाळ केला होता. कर्णही धनुर्विद्येत पारंगत झाला. अर्जुन व कर्ण यांचे आपसात पटत नव्हते पण कर्ण व दुर्योधन यांचे सख्य होते. दुर्योधनाने कर्णाला अंग देशाचा राजा केले. कृतज्ञतेमुळे कर्ण दुर्योधनाचा कायमचा मित्र बनला.

धनुर्विद्या समाप्त झाल्यावर द्रोणाचार्यांना शिष्य गुरूदक्षिणा देऊ लागले. काय गुरूदक्षिणा पाहिजे, असे विचारले. आचार्य द्रोण म्हणाले, लहानपणी पंचाल देशाचा राजा द्रुपद आणि मी एकत्र शिकलो मित्र होतो. कालांतराने आम्ही एकमेकांपासून दूर गेलो. द्रुपद हा राजपदावर अभिषिक्त झाल्यावर मी त्याच्याकडे जाऊन त्याला म्हटले, की आपण जुने मित्र आहोत परंतु द्रुपदाने ओळख दिली नाही व म्हणाला, की तू दरिद्री कफल्लक आणि मी ऐश्वर्यसंपन्न              राजा. आपली मैत्री कशी असू शकेल? समानांची मैत्री असते. असा द्रुपदाने माझा अपमान केला. त्याला तुम्ही जिवंत पकडून माझ्यापुढे आणावे. हे काम अर्जुनाने पार पाडले. द्रोणांनी द्रुपदाचे अर्धे राज्य हिरावून त्याला क्षमा केली. ही घोर मानखंडना द्रुपदाच्या मनात सलत होती. द्रोणाचा वध करील असा पुत्र प्राप्त होण्याच्या कामनेने द्रुपदाने यज्ञ केला. अग्निदेव प्रसन्न होऊन पुत्र धृष्टद्युग्म आणि कन्या द्रौपदी त्याला झाली. द्रौपदीलाच याज्ञसेनी, पांचाली किंवा कृष्णा अशा अनेक नावांनी संबोधितात. तिसरे अपत्य म्हणजे शिखंडी हा होय. तो पहिल्यांदा कन्येच्या रूपाने उत्पन्न झाला. पश्चात स्थूणाकर्ण यक्षाच्या कृपेने तो पुरूष बनला.

दुर्योधनाने बलरामाकडे गदायुद्धाचा व कर्णाने परशुरामाकडे अस्त्रविद्येचा अभ्यास केला. हस्तिनापूरच्या राज्याचे सूत्रधार भीष्म होते. त्यांनी त्यांच्या घराण्यातील ज्येष्ठ पुत्र युधिष्ठिर यास बौवराज्याचा अभिषेक केला, त्यामुळे राज्यव्यवहार पांडवांकडे आपोआप गेला. धृतराष्ट्र व त्याचे पुत्र कौरव हे मत्सरग्रस्त झाले आणि पांडव-कौरवांचे वैमनस्य वाढीस लागले. दुर्योधन, शकुनी, दुःशासन आणि कर्ण यांनी गुप्त खलबत करून कुंतीला पुत्रांसह दग्ध करण्याचा कट रचला आणि तो कट त्यांनी धृतराष्ट्राला सांगितला. धृतराष्ट्रही पांडवांचा सर्वांगीण उत्कर्ष पाहून मनात जळतच होता. त्याने विरोध केला नाही. कौरवांनी वारणावत या सुंदर नगरीमध्ये जतुगृह म्हणजे लाखेचा महाल तयार करविला. त्वरित ज्वालाग्राही अशा लाखेच्या ह्या महालात कुंतीसह पांडव राहतील अशी योजना केली. दुर्योधनाचा हस्तक पुरोचन योग्य वेळी लाक्षागृहाला आग लावणार होता. विदुराच्या हा सगळा कट लक्षात आला. धृतराष्ट्राने कुंती आणि पांडवांना सांगितले होते, की वारणावत ही नगरी फार सुंदर आहे. ती पहायला तुम्ही तिकडे जा. या कटाचा सुगावा विदुराला लागला होता. त्याने आपल्या कुशल कारागिराकडून त्या जतुगृहातून गुप्त रीतीने बाहेर पडण्याकरता एक भुयार खोदून घेतले. वारणावनात आल्यावर एके दिवशी कुंतीने ब्राह्मणभोजनाचा व दानधर्माचा कार्यक्रम केला. संतुष्ट अतिथी आणि पुरोचिन रात्री झोपी गेले. त्या लाक्षामहालात एका बाजूला आपल्या पाच पुत्रांसह एक निपादी उतरली होती. रात्री भीमानेच लाक्षागृहाली आग लावली. पांडव लगेच उठून त्या भुयारातून कुंतीसह गुप्तपणे सुखरूप बाहेर पडले आणि वनात गेले. पुरोचन ह्या आगीत जळून मेला. तसेच दुसऱ्यात दिवशी पाच पुत्रांसह एक स्त्री जळलेली पाहून कौरवांना वाटले की, पांडवांचा योग्य निकाल आपण लावला.

वनामध्ये हिंडत असताना रात्र झाली आणि पांडव, कुंती हे झोपी गेले. राक्षस हे रात्री हिंडत असतात. त्याप्रमाणे हिडिंबनामक राक्षस व त्याची भगिनी हिडिंबा यांना माणसांची चाहूल लागली. हिडिंब राक्षसाने हिडिंबेला ती माणसे हुडकून काढण्याकरता पाठवले. तिला पांडव दिसले. त्यातला भीमसेन तिला फार आवडला. भीमसेनावर ती आसक्त झाली. हिडिंबा परत गेली नाही. हिडिंब हा तिचा भाऊ तेथे आला व खवळला. त्याचे आणि भीमसेनाचे युद्ध झाले व त्यात हिडिंब ठार झाला. हिडिंबेने भीमाशी विवाह करण्याची अनुज्ञा कुंतीपाशी मागितली. दोघांचा विवाह झाला. हिडिंबेला घटोत्कच नावाचा पुत्र झाला.

पांडव त्या वनातून ब्राह्मणवेश धारण करून एकचक्रा नगरीत आले आणि एका ब्राम्हणाच्या घरी राहिले. या नगरीला बकनामक असुराने आपल्या ताब्यात घेतले होते आणि प्रतिदिनी घरटी एक माणूस खाण्याकरता तो जबरदस्तीने घेत होता. पांडव जेथे राहिले होते, त्या ब्राम्हणाच्या कुटुंबावर पाळी आली. ते सबंध कुटुंब शोकाकूल झाले. कुंतीने त्या ब्राम्हणाची समजूत घालून भीमसेनाला बकासुराकडे पाठविले. त्याने बकासुराला गरगर फिरवून भूमीवर आपटले व त्याचा निकाल लावला. त्या नगरीवरचे संकट नष्ट झाले.


थोड्या दिवसांनी द्रुपद राजाने द्रौपदीचे स्वयंवर मांडिले. ही गोष्ट पांडवांच्या कानावर आल्यावर ते द्रुपदाच्या राजधानीस गेले व स्वयंवराच्या मंडपात म्हणजे रंगभूमीत येऊन दाखल झाले. ब्राह्मणसमुदायाच्या कक्षेत बसले. क्षत्रियांच्या कक्षेत दुर्येधन, कर्ण, शकुनी, श्रीकृष्ण, बलराम इ. मंडळी विराजमान झाली होती. धृष्टद्युम्नाने स्वयंवराचा पण घोषित केला. मंडपात एक फिरते मत्स्ययंत्र खूप उंचीवर बसविले होते. जो उच्च कुलोत्पन्न त्या फिरत्या मत्स्ययंत्रातील लक्ष्याचा वेध करील आणि भूमीवर पाडील त्याला माझी बहीण कृष्णा वरील. हे ऐकून उपस्थित असलेल्या बहुसंख्य राजपुत्रांनी मत्स्यवेधाचा प्रयत्न केला पण कोणालाच जमले नाही. हे पाहून कर्ण पुढे आला व धनुष्य सज्जल करून वेधणार, तोच द्रौपदीने म्हटले, की तो हलक्या जातीचा म्हणजे सूतपुत्र आहे. त्यामुळे मी त्याला वरणार नाही. पांडवांना माहीत होते, की कर्ण जरूर यशस्वी होईल. कर्ण मागे सरल्यावर अर्जुन पुढे आला व त्याने मत्स्यभेद करून पण जिंकला. एका ब्राम्हणाने द्रौपदीसारखे महारत्न हस्तगत केले, हे पाहून सर्व राजमंडळ क्षुब्ध झाले पण श्रीकृष्णाने मध्यस्ती करून युद्धाचा प्रसंग टाळला. अर्जुन द्रौपदीला घेऊन कुंतीकडे आला व म्हणाला, आई आज मी अपूर्व भिक्षा आणली आहे. इकडे तिकडे न पाहता ती एकदम उद्‌गारली, पाचही जण वाटून घ्या. त्याचप्रमाणे पांडवांनी द्रौपदीशी विवाह केला.

पांडव जिवंत असून अर्जुनाने द्रौपदीस्वयंवरातला पण जिंकला, ही वार्ता हस्तिनापुरात कळली. धृतराष्ट्राने पांडवांना विदुरातर्फे निरोप देऊन हस्तिनापुरात पुनश्च आणले. कौरव-पांडवांचे अंतर्वैर वाढू लागले. भीष्मांनी राज्याची त्यांच्यात वाटणी केली व पांडवांना इंद्रप्रस्थ ही राजधानी दिली.

नारदमुनींच्या उपदेशाप्रमाणे पांडवांनी द्रौपदीबरोबर प्रपंच एकत्र न करता दिवस प्रत्येकाला वाटून घ्यावे एकमेकांशी एकमेकांच्या एकांतवासात विक्षेप आणू नये विक्षेप जो आणिल त्याने एक वर्ष वनवास पतकरावा असे ठरले. परंतु एका महत्त्वाच्या कारणास्तव अर्जुनाकडून नियमभंग झाला. अर्जुन वनवास पतकरून अनेक देश हिंडला. या यात्रेत उलुपी नावाची नागकन्या व मणिपूरची राजकन्या चित्रांगदा यांच्याशी विवाह करून त्यांच्यापाशी काही दिवस राहिला. या यात्रेत द्वारकेलाही त्याने भेट दिली व रामकृष्णांची भगिनी सुभद्रा हिच्या प्रेमात सापडून तिला पळवून नेले. याला कृष्णाची संमती होती पण बलरामाची नव्हती. बलरामानेही अखेर संमती दिली. दोघांचा विवाह झाला आणि अर्जुन सुभद्रेला घेऊन इंद्रप्रस्थास परतला.

द्रौपदीला पांडवांपासून पाच पुत्र झाले. सुभद्रेला अभिमन्यू झाला. एकदा कृष्णासह अर्जुन वनविहाराला गेला असता त्याने खांडववन पाहिले. कृष्णार्जुनांपाशी अग्निदेवाने ते वन भक्षणार्थ मागितले. अग्निला संमती मिळाली. वणवा पेटला ज्वाळा भडकल्या. त्यातील प्राणिमात्र वणव्याच्या वेढ्यात सापडले आणि जळून खाक झाले. त्या वनात मय नावाचा स्थापत्यविशारद असुर रहात होता. तो शरण आला आणि अर्जुनाकडून त्याला जीवदान मिळाले. खांडववन भक्षून अग्नी तृप्त झाला. अग्निदेवाने अर्जुनाला दिव्य रथ, अभंग धनुष्य व अक्षय्य भाता या वस्तू दिल्या.

सभापर्व : खांडववनात जीवदान मिळालेल्या मयासुराने कृतज्ञबुद्धीने पांडवांना एक विशाल व भव्य सभा निर्माण करून दिली. ह्या सभेत अनेक चमत्कृती निर्माण केल्या. पाण्याच्या जागी भूमीचा आभास आणि भूमीच्या जागी पाण्याचा भास दिसावा अशा या अद्‌भुत सभेत युधिष्ठिर (धर्मराज) सिंहासनावर विराजमान झाले. तेव्हा   येथे आलेल्या नारदमुनींच्या उपदेशानुसार युधिष्ठिरांना राजसूय यज्ञ करण्याची इच्छा झाली. युधिष्ठिरांनी श्रीकृष्णाचा सल्ला घेतला. श्रीकृष्णाने सांगितले की, मगध देशाचा अधिरती जरासंघ अत्यंत प्रबल झाला आहे. त्याला जिंकल्याशिवाय राजसूय यज्ञ करता येणार नाही. जरासंघाच्या गिरिव्रज या राजधानीत ब्राह्मण वेश धारण करून कृष्ण व अर्जुन गेले आणि जरासंघापुढे प्रकट झाले. भीमसेनही बरोबर होता. जरासंघाने कृष्ण व अर्जुन यांना वगळून भीमाशीच युद्ध करणे पसंत केले. जोराचे गदायुद्ध झाले त्यात दोघेही अत्यंत थकले. शेवटी भीमाच्या हातून त्याला मरण आले. नंतर युधिष्ठिरांशिवाय चारी पांडव वेगवेगळे चार दिशांना दिग्विजयार्थ गेले व त्यांनी विपुल धनसंपत्ती इंद्रप्रस्थात आणली. नंतर राजसूय यज्ञ पार पडला. यज्ञाच्या अखेरीस अग्रपूजा कोणाची करायची, असा प्रश्न पडला. भीष्मांनी श्रीकृष्णाला अग्रपूजेचा मान द्यावा, असे सुचविले. राजा शिशुपालाने ते अमान्य केले व श्रीकृष्णाची निर्भर्त्सना केली त्यामुळे श्रीकृष्णाने शिशुपालाचे मस्तक सुदर्शन चक्राने उडविले. यज्ञसमाप्तीनंतर दुर्योधनाने ती अपूर्व मयसभा हिंडून पाहिली. त्यातील भूलभुलैयात तो फसला. पांडव त्याला हसले. अपमानाने जळजळत तो स्वतःच्या राजधानीस, हस्तिनापुरास, परतला.

युद्धार्थ किंवा द्युतार्थ कोणी आव्हान दिले, तर ते आव्हान स्वीकारणे हा क्षत्रियाचा धर्म म्हणून त्या काळी ठरला होता. कौरवांचा मातुल शकुनी याने कौरवांना पांडवांचे ऐश्वर्य हरण करण्याकरता द्यूताचा मार्ग सुचविला. तो दुर्योधनादी कौरवांना पटला. त्याप्रमाणे सर्व पांडवांना व विशेषतः धर्मराजांना आव्हान दिले. शकुनी द्युतातील कपटामध्ये पटाईत होता. पांडव व धर्मराज त्या द्युतात सर्वस्व हरवून बसले. सर्वस्वामध्ये द्रौपदीचाही समावेश होतो. दुःशासनाने भर सभेत तिला विवस्त्र करण्याचा प्रयत्न केला. परंतु श्रीकृष्णाने तिला अगणित वस्त्रे पुरविण्याचा चमत्कार केला व तिचे लज्जा रक्षण केले. धृतराष्ट्राला हे सर्व प्रकरण पाहून भीती वाटली आणि द्रौपदीला वर दिला की, तुझे पती दास्यमुक्त होतील व त्यांची शस्त्रे त्यांना परत मिळतील. त्याचप्रमाणे त्यांचे राज्यही त्यांना परत मिळेल. ही सर्व घटना पाहून कौरवांना आपला सर्व डाव फसला हे लक्षात आले आणि पांडवांना द्युतार्थ पुन्हा आव्हान दिले. त्याकरता राजा धृतराष्ट्राची संमती मिळविली. पुत्रमोहाला वश होऊन धृतराष्ट्राने संमती दिली. एकच डाव खेळायचा आणि त्यात जो पराभूत होईल त्याने १२ वर्षे वनवास आणि एक वर्ष अज्ञातवास स्वीकारायचा, अज्ञातवासाचा अवधी पूर्ण होण्याच्या अगोदर उघडकीस आल्यास पुनः १२ वर्षे वनवास व १ वर्ष अज्ञातवास पतकरावा असा पण दोन्ही बाजूंनी मान्य केला. अशा अटीवर पुन्हा तो डाव मांडला. युधिष्ठिर प्रख्यात द्युतपटू असूनही हरले कारण शकुनीचे द्युतातले कपट.


वनपर्व : पांडव द्रौपदीसह वनवासाला निघाले, त्यांच्या पाठीमागे नागरिकही मोठ्या संख्येने पांडवांबरोबर निघाले. युधिष्ठिरांनी नम्रतापूर्वक नागरिकांना परत पाठविले. मोठा ब्राह्मणसमुदाय मात्र गंगेच्या तटावरील वटवृक्षापर्यंत त्यांच्या पाठीमागून आला. त्या मुनिगणाच्या पोषणाची जबाबदारी आपणास पार पाडता येणार नाही, असे युधिष्ठिरांच्या लक्षात आले. आपले अकिंचनत्व आपणास मुनिजनांची सेवा करण्यास असमर्थ करते, हे पाहून त्यांना दुःख झाले. पांडवांचे पुरोहित धौम्य ऋषी यांनी धर्मराजांना सूर्योपासना सांगितली. सूर्याने प्रसन्न होऊन त्यांना अक्षय्य स्थाली अगणित मुनिपोषणाकरता दिली. वनातल्या मुक्कामात पांडवांवर एका रात्री किर्मीरनामक राक्षस चाल करून आला. भीमाने त्याला ठार केले. पांडवांना वनवास पतकरावा लागला, ही वार्ता द्वारकेत श्रीकृष्णाला समजली. श्रीकृष्ण भेटीस आला व म्हणाला की, मी दुर्योधनावर हल्ला करून त्याला नष्ट करतो. ही गोष्ट युधिष्ठिरांनी अमान्य केली. द्वैपायन व्यास पांडवांच्या भेटीस आले. वनवास व अज्ञातवास संपल्यावर राज्याकरता कौरवांशी लढावेच लागेल आतापासून युद्धाची तयारी करा असा उपदेश केला आणि व्यास अंतर्धान पावले. ही गोष्ट पांडव द्वैतवनात असताना घडली. अर्जुन शिवापासून पाशुपतास्त्र प्राप्त करून घेण्यासाठी हिमालयातील इंद्रकील पर्वतावर तपश्चर्यार्थ गेला. अर्जुन त्या पर्वतावरील वनामधील एका वराहाची शिकार करीत असता, अर्जुनाची कसोटी पाहण्याकरिता किरातवेशधारी शंकराने त्याच क्षणी आपलाही बाण त्या वराहावर सोडला. त्यामुळे अर्जुन व शंकर यांच्यात युद्ध जुंपले. अखेर अर्जुनाची शक्ती शंकराने अजमावली आणि संतुष्ट होऊन त्याला पाशुपतास्त्र दिले. अष्टादिक्पालांनी आपापल्या शक्ती अर्जुनाला दिल्या. अर्जुन स्वर्गात गेला. तेथे इंद्राने अर्जुनाला आपली अस्त्रविद्या शिकविली. अर्जुन तपश्चर्येला गेला असताना लोमश ऋषींना बरोबर घेऊन पांडवांनी तीर्थयात्रा केल्या. तीर्थयात्रा संपवून पांडव गंधमादन पर्वतावर गेले. अर्जुन स्वर्गातून खाली उतरला व गंधमादन पर्वतावर आपल्या बंधूंना परत भेटला. ते सगळे मिळून द्वैतवनात पुन्हा परतले. कौरवांना हे वर्तमान समजले आणि आपल्या वैभवाचे प्रदर्शनकरून पांडवांना खिजवण्याकरता द्वैतवनात शिरले. चित्रसेन गंधर्वाला दुर्योधनाचा हा दुष्टपणा रूचला नाही. त्याने कौरवांवर हल्ला करून दुर्योधनाला बंदिवान केले. दुर्योधनाचे अनुयायी ही वार्ता घेऊन युधिष्ठिरांकडे आले. युधिष्ठिरांनी दुर्योधनाला सोडवून आणण्याचा भीमार्जुनांना आदेश दिला कारण दुर्योधनाला चित्रसेन गंधर्वाच्या तावडीतून मुक्त न केल्यास कुरूकुलाचा अपमान होतो. युधिष्ठिर म्हणाले, आपण आपसांत लढू तेव्हा तिकडे शंभर इकडे पाच पण परक्यांशी प्रसंग असेल तेव्हा आपण पाच अधिक शंभर. भीमार्जुनांनी दुर्योधनाला चित्रसेनाच्या कचाट्यातून सोडवून आणले. पांडवांनी अखेरचे वर्ष द्वैतवनात काढले. या १२ वर्षांच्या अवधीमध्ये अनेक संकटे आली. त्यांतून उत्तीर्ण झाले. अनेक साहसे केली. अखेरच्या वर्षातही पुनः एक संकट आले. एका ब्राह्मणाची अरणी (अग्नी निर्माण करण्याचे लाकडी साधन) सांबराच्या शिंगात अडकली व ते सांबर त्या अरणीसह लांब जंगलात गेले. तो ब्राह्मण पांडवांकडे आला व म्हणाला, माझी अरणी त्या सांबराला गाठून परत आणून द्या. त्या सांबराचा पाठलाग करीत पांडवांना दूर जंगलात जावे लागले. दुपारची वेळ झाली होती. सगळे तहानेने व्याकुळ झाले. पाण्याच्या शोधाकरता नकुलाला युधिष्ठिरांनी पाठविले. जवळच एक पाण्याने भरलेले तळे दिसले. त्या तळ्याजवळ जाऊन नकुल पाण्याची ओंजळ भरतो, तोच ताच त्या तळ्याच्या काठावरील एका यक्षाने त्याला मज्जाव केला व म्हटले की, माझ्या प्रश्नांची उत्तरे दिल्याशिवाय पाणी पिऊ नकोस. नकुलाने त्या यक्षाच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले पाणी प्याला आणि मरून पडला. बाकीचे तिघे नंतर आले त्यांचीही तीच गत झाली. अखेर युधिष्ठिर आले. त्यांनी यक्षाची आज्ञा मान्य केली. सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली. यक्ष प्रसन्न झाला. यक्ष युधिष्ठिरांना म्हणाला, तुमच्या मृत बंधूंपैकी कोणातरी एकाला पुनर्जीवन देईन. कोणाला देऊ ? युधिष्ठिर म्हणाले, मी कुंतीचा एक आहेच माद्रीचा एक जिवंत व्हावा. नकुलाला पुनर्जीवन दे. युधिष्ठिरांची ही समबुद्धी पाहून यक्षाने चारी भावांना उठविले. हा यक्ष म्हणजे यमराजानेच घेतलेले एक रूप होते. अज्ञातवासाचे वर्ष कुठे काढावे, हा जटिल प्रश्न पांडवांपुढे होता. यमधर्माने प्रत्यक्ष दर्शन देऊन आदेश दिला की, विराट राजाच्या नगरीत अज्ञातवास करा त्यात तुम्ही यशस्वी व्हाल.

विराटपर्व : यमधर्माच्या आदेशाप्रमाणे पांडव विराट नगरीकडे जाण्यास निघाले. नगरीजवळ पांडवांनी आपली शस्त्रे एका शमीच्या वृक्षावर लपवून ठेवली. तेथे पोहोचल्यावर विराट राजाच्या आज्ञेनुसार द्यूतक्रीडानिपुण युधिष्ठिर कंक ब्राह्मम म्हणून राजाच्या सेवेत राहिले. भीमसेन पाकनिपुण म्हणून विराटाच्या पाकशाळेत बल्लब म्हणून राहिला. अर्जुनाला तो स्वर्गात गेला असताना उर्वशीने, तिचा स्वीकार न केल्यामुळे, शाप दिला होता की, एक वर्ष तू षंढ होशील. तो शाप अर्जुनाच्या पथ्यावर पडला. तो बृहन्नडा हे नाव घेऊन स्त्रीवेशात नृत्यशाळेत राजकुलातील कन्यांना नृत्यगीत शिकवत राहिला. नकुल हा अश्वविद्यापारंगत होता त्याने अश्वशालेवर नेमणूक करून घेतली. सहदेव गोरक्षणविद्येत कुशल असल्यामुळे त्याने गोशालेवर नेमणूक करून घेतली. द्रौपदी ही सैरंध्री नाव धारण करून अंतःपुरातील राण्यांची आणि स्त्रियांची केशप्रसाधनादी कार्ये करू लागली. राजमहालात सेवा करीत असता त्यांना कोणीही ओळखले नाही. दहा महिने निर्विघ्नपणे पार पडले.

विराट राजाची राणी सुदेष्णा हिचा कीचक नावाचा भाऊ होता. त्याची नजर सैरंध्रीवर गेली. त्याची वासना चाळवली. त्याने सुदेष्णेला सांगितले की, सैरंध्रीला माझ्या महालात पाठवून दे. त्याप्रमाणे सुदेष्णेने सैरंध्रीला आज्ञा केली, की किचकाकडून मद्य घेऊन ये. सैरंध्री निरूपाय होऊन कीचकाच्या महालात गेली. कीचकाने तिचा हात धरला. तिने कशीबशी आपली सुटका करून घेतली. रात्री भीमाला भेटून आपले गाऱ्हाणे सांगितले. भिमाने एक युक्ती योजली. सैरंध्रीला सांगितले की, रात्री नृत्यशाळेत त्याच्याशी भेटण्याचा संकेत कर. नंतर मी पाहून घेतो. रात्री नृत्यशाळेत कीचकाला सैरंध्री न भेटता भीमच भेटला. भीमाने कीचकाला बुकलून यमसदनास पाठविले. हा अनर्थ राजा विराटाला समजला पण कीचकाची वाट कोणी लावली हे काही कोणाला समजू शकले नाही. विराट राजाने सुदेष्णेला संदेश पाठवला की, सैरंध्रीला ह्यापुढे आश्रय देऊ नको. अज्ञातवासाच्या मुदतीचा विचार करून सुदेष्णेला सैरंध्रीने उत्तर दिले की, मला फक्त तेरा दिवसाचां अवधी दे. मला अगोदर घालविले, तर माझे गंधर्व पती खवळतील आणि तुमच्या राज्यावर संकट येईल. नाईलाजाने सैरंध्रीला तेवढी मुदत दिली.

अज्ञातवास पूर्ण एक वर्ष पुरा करता आला नाही तर, म्हणजे वर्षाच्या आत पांडव उघडकीस आले तर, त्यांना पुन्हा बारा वर्षे वनवास आणि एक वर्ष अज्ञातवास पतकरावा लागेल, अशी द्यूतातली अट होती. कोरवांनी त्यांना हुडकून काढण्यासाठी देशोदेशी हेर पेरले होते. बलाढ्य काचकाला कुणीतरी मारले आहे, अशी वार्ता कौरवांना मिळाल्यामुळे त्यांची खात्री झाली, की भीमावाचून हे अत्यंत कठीण कर्म अन्य कोणालाच जमणे शक्य नाही. पांडवांना प्रकट होणे भाग पडावे म्हणून विराट नगरीवर विराटाचे गोधन हिरावून नेण्याकरता कौरवांनी आक्रमण केले. विराट राजाला शत्रुसैन्याने घेरले. परंतु विराट राजाला भीमाने शर्थीने पराक्रम करून सोडविले. विराटपुत्र उत्तर हे प्रचंड सैन्य पाहून भेदरला, तेव्हा बृहन्नडा पुढे आली. या बृहन्नडेने म्हणजे अर्जुनाने, शमी वृक्षावरची आपली शस्त्रे उतरली आणि कौरवांशी अपूर्व शौर्याने तो लढला. दुर्योधनास वाटत होते, की पांडवांच्या अज्ञातवासाचे वर्ष अजून पूर्ण व्हावयाचे आहे. त्याआधी प्रकट झाल्यामुळे त्यांना पुन्हा वनवास आणि अज्ञातवास पतकरावा लागेल परंतु भीष्मांनी त्याचा भ्रम दूर केला. सांगितले, की अज्ञातवासाचे वर्ष संपले आहे. पांडवांनी आपला पण पूर्ण केला आहे. दुर्योधन खिन्न झाला व सैन्य घेऊन परत गेला. पांडवांनी वेशांतर केले व विराटापुढे खऱ्या रूपात प्रकट झाले. विराटाने पांडवांचा सत्कार केला आणि युधिष्ठिरांची क्षमा मागितली. विराटाने आपली कन्या उत्तरा अभिमन्यूला दिली. उत्तरा व अभिमन्यू यांचा विवाह थाटाने संपन्न झाला.


उद्योगपर्व : अभिमन्यूच्या विवाहामध्ये पांडव व त्यांचे मित्र-राजे एकत्र जमले असताना श्रीकृष्णाने मित्र-राजांना सांगितले की, युद्धाची वेळ आल्यास तुम्ही पांडवांना साहाय्य केले पाहिजे. पांचालराजा द्रुपद याने सांगितले की, दुर्योधन सामोपचाराने पूर्वीप्रमाणे राज्याचा अर्धा वाटा देणार नाही तरी मित्र-राजांकडे आपले दूत पाठवावेत नाहीतर दुर्योधन अगोदरच त्यांच्याशी करारमदार करून बसेल. माझा पुरोहित धृतराष्ट्राकडे संदेश घेऊन सामोपचाराकरिता आपण पाठवू या. युद्धाची तयारी मात्र वेगाने केलीच पाहिजे. द्रुपदाचा पुरोहित हस्तिनापुरास रवाना झाला. दुर्योधनाला मात्र युद्ध हवे होते. श्रीकृष्ण द्वारकेला निघून गेला होता. कौरव व पांडव देशोदेशींच्या राजांना दूतांतर्फे संदेश देऊन आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न करू लागले. अर्जुन आणि दुर्योधन हे श्रीकृष्णाचे साहाय्य मिळविण्याकरिता द्वारकेस गेले. श्रीकृष्ण निद्रा घेत होता. त्याच्या डोक्याशी दुर्योधन बसला व पायांशी अर्जुन. श्रीकृष्णाला अर्जुन अगोदर दिसला नंतर दुर्योधन. दोघांनी साहाय्य मागितले. श्रीकृष्णाने आपल्या साहाय्याचे दोन भाग केले. एका बाजूला स्वतः म्हणजे श्रीकृष्ण आणि दुसऱ्या बाजूला त्याचे ‘नारायण’ नावाचे सैन्य यांपैकी दुर्योधनाने ‘नारायण’ सैन्य मागून घेतले आणि अर्जुनाने श्रीकृष्णाला स्वीकारले. श्रीकृष्णाने या युद्धात शस्त्र धरणार नाही असे सांगितले होते परंतु अर्जुनाने योग्य उपदेश व सारथ्य करणारा असा निःशस्त्र श्रीकृष्णच पतकरला. द्रुपदाचा संदेशवाहक पुरोहित जेव्हा कौरवांकडे आला तेव्हा त्याने सामोपचाराचे आवाहन केले. त्याला प्रतिसाद मिळाला नाही. परंतु धृतराष्ट्राचा सारथी संजय धृतराष्ट्राचा संदेश घेऊन आला. संदेशात एवढेच होते की, युद्ध वाईट म्हणून टाळा आणि शांततेने रहा. युधिष्ठिरांनी उलट संदेश पाठविला, की आम्हांला आमचे इंद्रप्रस्थाचे राज्य द्या आम्ही युद्धाला इच्छुक नाही. युधिष्ठिर केवळ पाच गावे घेऊनही समाधानाने राहण्यास तयार होते. संजयाने परत आणलेला संदेश धृतराष्ट्राकडे पोहचल्यावर भीष्म, द्रोण आणि विदुर यांनी दुर्योधनाचे मन वळविण्याचा प्रयत्न केला पण काहीच उपयोग झाला नाही. तो  काहीच द्यायला तयार नव्हता. सुईच्या अग्रावर राहील एवढी जमीनदेखील द्यायला तयार नव्हता. दुर्योधनापुढे धृतराष्ट्राचाही इलाज चालला नाही.

पांडव शक्य तितका प्रयत्न करून युद्ध टाळावे असा दृष्टिकोण बाळगून चर्चा करीत होते. दुर्योधनाचा नकार कळल्यावर श्रीकृष्णाने आपण शिष्टाई करतो व तडजोड घडवून आणण्याचा प्रयत्न करतो, असे सांगितले. पांडवांना ही श्रीकृष्णशिष्टाई मान्य झाली. भीम एरवी स्वभावाने अत्यंत संतापी आणि निग्रही त्यालाही हे मान्य झाले. द्रौपदी मात्र या शिष्टाईला नाकबूल होती. तिने युद्धाशिवाय मार्ग नाही शांततेचा बोल फोल आहे लढलेच पाहिजे, असे म्हटले. श्रीकृष्ण शिष्टाईकरता निघाला तेव्हा युधिष्ठिरांनी सांगितले, माता कुंती विदुराच्या घरी राहिली आहे, तिचेही क्षेमकुशल विचारून यावे. श्रीकृष्ण कौरवांकडे गेला. धृतराष्ट्राने त्याचा आदरपूर्वक सत्कार केला परंतु श्रीकृष्णाने आतिथ्याचा स्वीकार विदुराच्याच घरी केला. कुंतीची भेट झाली. युधिष्ठिरांचा प्रणाम स्वीकारून ती भडकली आणि म्हणाली, तुम्ही क्षत्रपुत्र आहात. असा शांतीचा आणि सामोपचाराचा मार्ग तुमच्या भेकडपणाचा दर्शक ठरतो. मी क्षत्रियपत्नी आहे. वीरपत्नी पुत्रांना ज्या कार्याकरता प्रसवते, ज्या उद्देशाने प्रसवते, तो उद्देश पूर्ण करण्याची ही वेळ आहे. श्रीकृष्णासह भीष्म, द्रोण, विदुर ह्यांनी दुर्योधनाचे मन वळवण्याचा प्रयत्न केला आणि वाद मिटवावा असे सांगितले. परंतु या सगळ्यांचे प्रयत्न व्यर्थ ठरले, श्रीकृष्ण संतापला आणि म्हणाला, की कौरवांच्या पैकी जे समंजस व शांततावादी असतील त्यांनी दुर्योधनाला आणि त्याच्या मताच्या सहकाऱ्यांना           बंदी करून कुलक्षय टाळावा. धृतराष्ट्राने कौरवांच्या मातेला म्हणजे गांधारीला सांगितले, की तूही दुर्योधनाचे मन वळविण्याचा प्रयत्न कर परंतु तिचाही प्रयत्न सफल झाला नाही. उलट दुर्योधनाने श्रीकृष्णाला बंदिवासात टाकण्याचा कट केला. या कटाची बातमी अगोदरच फुटली. धृतराष्ट्र व विदुर यांनी दुर्योधनाचा खूप निर्भत्सना केली. कृष्णशिष्टाई फुकट गेली. कृष्णाने कर्णाचे मन पांडवांच्या बाजूने वळविण्याचा प्रयत्न केला. कर्ण हा कुंतीला तिच्या विवाहापूर्वी सूर्यापासून झालेला पुत्र होता पण कुंतीने तो जन्मताच त्याचा त्याग केला होता. ह्या कौटुंबिक रहस्याचा कृष्णाने कर्णाजवळ स्फोट केला. परंतु कर्ण म्हणाला, अशा स्थितीत पांडव हे माझे बंधू असले, तरी मी दुर्योधनाचा पक्ष सोडू शकत नाही.

श्रीकृष्ण पांडवांकडे परतला आणि युद्धाशिवाय गत्यंतर नाही ही गोष्ट युद्धिष्ठिरांना पटली. युधिष्ठिर युद्धाविरूद्ध होते, परंतु व्यथिथ मनाने आपल्या भावांना त्यांनी युद्धाची संमती दिली. उभयपक्षाच्या सेनादलांची शिबिरे भरली. पांडवांचे ७ अक्षौहिणी आणि कौरवांचे ११ अक्षौहिणी असे एकूण १८ अक्षौहिणी सैन्य युद्धासाठी सज्ज झाले. भारतातील सर्व देशांचे राजे आपापल्या चतुरंग सेनादलासह आपापल्या पक्षाच्या बाजूने उपस्थित राहिले. धृष्टद्युग्म पांडवांचा सेनापती म्हणून नेमला गेला. भीष्म कौरवांचे सेनापती म्हणून ठरले. धृतराष्ट्राला या युद्धाच्या वार्ता मिळाव्या म्हणून सारथी संजयाला व्यासांनी दिव्य दृष्टी दिली. रणांगणापासून दूर, धृतराष्ट्राच्या महालात बसून, संजयाला युद्धभूमी संपूर्ण दिसू लागली व धृतराष्ट्राला सविस्तर वृत्त मिळेल अशी व्यवस्था झाली.

भीष्मपर्व : कुरूक्षेत्रावर समोरासमोर सेनापतींसह सैन्यदले उभी राहिली, रणवाद्ये गर्जू लागली. युधिष्ठिरांना पुढे करून चारही पांडव सरळ कौरव सैन्याकडे चालू लागले. भीष्म पितामहांची भेट घेतली. वंदन करून आशीर्वाद मागितला. भीष्म म्हणाले, युधिष्ठिरा, तुझा पक्ष सत्याचा आहे. सत्याचाच विजय होतो. पांडव आपल्या सैन्यकक्षेत परतले. रणदुंदुभी गर्जत होत्या. गगनभेदी शंखध्वनी होत होता. दोन्ही बाजूंना गुरूजन व आप्तस्वजन पाहून अर्जुनाच्या लक्षात आले की, सर्वांचा महान संहार होणार आहे कुलीनांच्या स्त्रिया अनाथ होणार आहेत करूणेने विषण्ण होऊन युद्ध करण्याचे कर्तव्य पार पाडावे की नाही याबद्दल मन संशयग्रस्त झाले. ही गोष्ट आपला सारथी भगवान श्रीकृष्ण याला त्याने मन मोकळे करून सांगितली. क्षत्रिय धर्म आचरावा, लढावे, की दयाधर्माने वागावे, निवृत्त व्हावे ह्या पेचात त्याचा आत्मा सापडला होता. भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेचा उपदेश करून त्याचा व्यामोह निरस्त केला व त्याला युद्धाला प्रवृत्त केले.

युद्धाच्या पहिल्या सात दिवसांत रणांगणात दुर्योधनाच्या सैन्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. भीष्म सेनापती होते. दुर्योधनाने त्यांची निर्भर्त्सना केली. त्यामुळे भीष्मांनी फार मोठा पराक्रम आरंभिला. युद्धाला भरती आली. पांडव सैन्याची दाणादाण उडाली. या धुमश्चक्रीत भीष्म आणि अर्जुन हे समोरासमोर आले परंतु अर्जुनाला रणावेशच चढेना. कृष्णाला आपली प्रतिज्ञा-युद्धात मी शस्त्र धरणार नाही ही-मोडण्याची पाळी आली. हे पाहून अर्जुनाने पराक्रम दाखविण्यास सुरूवात केली. युद्धाचा दहावा दिवस उजाडला. त्या दिवशी महारथी शिखंडी भीष्मामुढे उभा राहिला. शिखंडीच्या मागे उभे राहून भीष्मांवर अर्जुनाने बाणांचा मारा सुरू केला. भीष्मांची अशी प्रतिज्ञा होती , की स्त्रीशी लढायचे नाही. शिखंडी हा मूळचा स्त्री नंतर पुरूष झाला. म्हणून भीष्मांनी प्रतिकारच केला नाही. अर्जुनाच्या बाणांनी सर्वांग विद्ध झाले. शरीर रथातून भूमी वर कोसळले, ते बाणांवरच तरंगते राहिले. फक्त शिर तेवढे अधांतरी राहिले, अर्जुनाने बाणांचा त्रिकोण भूमीमध्येच रोवून भीष्मांच्या मस्तकाला आधार दिला. भीष्म शरपंजरी पडले तेव्हा दक्षिणायन होते. भीष्मांना त्यांच्या पित्याचा वर होता की, तू इच्छामरणी होशील. त्यामुळे भीष्म हे उत्तरायण लागेपर्यंत प्राण धारण करून राहिले.


द्रोणपर्व : भीष्मांचे पतन झाल्यावर राजा दुर्योधनाने आचार्य द्रोण यांना सेनापतिपदाचा अभिषेक केला. तुझी इच्छा काय ते सांग, अशी पृच्छा द्रोणांनी दुर्योधनास करताच दुर्योधन म्हणाला, युधिष्ठिराला जिवंत पकडून माझ्या स्वाधीन करावे. द्रोणांनी लगेच उत्तर दिले की, अर्जुन रणांगणात नसेल, तर मी युधिष्ठिराला पकडीन. हा संवाद पांडवांना समजला. युधिष्ठिर पकडले जाणार नाहीत अशी काळजी अर्जुनाने घेतली. अर्जुनपुत्र अभिमन्यूने शल्य आणि जयद्रथ यांना जर्जर केले. अर्जुनाला मुख्य रणभूमीवरून दूर नेण्याचे काम त्रिगर्ताचा राजा सुशर्मा आणि त्यांचे बंधू संशप्तक यांनी केले. अर्जुनाला रणभूमीवर फार दूर नेऊन लढवीत ठेवले. इकडे द्रोणांनी युधिष्ठिरांकडे मोर्चा वळवला पण त्यांना पकडणे द्रोणांना शक्य झाले नाही. नंतर द्रोणाचार्यांनी चक्रव्यूहाची उभारणी केली. तो व्यूह कोण फोडील याची युधिष्ठिरांना चिंता पडली. अभिमन्यू पुढे आला. त्याने व्यूह भेदायचा आणि पाठीमागून भीमादिकांनी आत घुसायचे असा बेत ठरला. अभिमन्यू व्यूहात शिरला. व्यूह भेदत वेगाने पुढे सरकला. इकडे व्यूहाच्या द्वारावर जयद्रथ लढत उभा राहिला त्यामुळे भीमादिक आत शिरू शकले नाहीत. चक्रव्यूहात द्रोण, कर्ण, अश्वथामा, कृपाचार्य आदी लढवय्ये अभिमन्यूवर तुटून पडले. त्याची शस्त्रे मोडण्यात आली. अखेरीस दुःशासन-पुत्राचा व एकट्या अभिमन्यूचा संग्राम झाला अभिमन्यू मूर्च्छित झाला असताना दुःशासनपुत्राने गदाघात करून त्याला ठार मारले.

ही वार्ता पांडवसैन्याला मिळाल्याबरोबर सगळे असह्य दुःखाने व्यथित झाले. शिबिरावर अवकळा पसरली. अर्जुन संशप्तकांचा निःपात करून परत आला. तेव्हा अभिमन्यूच्या पतनाची वार्ता युधिष्ठिरांनी हुंदके देत सांगितली. अभिमन्यू एकाकी लढला आणि वीरगतीला गेला, ह्याचा अर्जुनाच्या मनाला तीव्र धक्का बसला. व्यूहाचे द्वार जयद्रथाने अडवून धरल्यामुळेच ही दुर्घटना घडली होता. म्हणून अर्जुनाने प्रतिज्ञा केली की, उद्या सूर्यास्ताच्या आत जयद्रथाला यमसदनास पाठवीन तसे न जमल्यास अग्निकाष्ठ भक्षण करून स्वतःची समाप्ती करून घेईन. ही वार्ता कौरव शिबिरात पसरली. जयद्रथ रणभूमी सोडून पलायन करू लागला, तेव्हा कौरवांनी त्याचे रक्षण करण्याची हमी घेतली. दुसऱ्या दिवशी दिवसभर घनघोर युद्ध झाले.सूर्यास्त जवळ आला, तरी अर्जुन जयद्रथाचा वध करू शकला नव्हता. तथापि एकाएकी अंधार झाला. सूर्यास्ताचा हा आभास कृष्णाने निर्माण केला होता. आपण सुटलो, असे वाटून जयद्रथ बेफिकीर झाला आणि कृष्णाने सूर्यास्त झालेला नसल्याचे अर्जुनाला दाखवून दिले. अर्जुनाने त्वरित जयद्रथाचे शिर उडविले. त्याच दिवशी रात्री मशाली पेटवून युद्ध सुरू राहिले. भीमपुत्र घटोत्कचाने पांडवांच्या बाजूने पराक्रमाची शर्थ केली. कर्णापाशी वासवी शक्ती होती. ती दुर्योधनाच्या आग्रहामुळे घटोत्कचावर कर्णाला सोडावी लागली. घटोत्कच संपला. द्रोणांच्या सेनापतित्वाखाली युद्ध अधिकच भडकले. त्यांनी आपल्या अस्त्रांनी इतका सेनासंहार केला की, पांडव आणि श्रीकृष्ण चिंताग्रस्त झाले. श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून भीमाने अश्वत्थामानामक हत्ती गदेने ठार केला आणि अश्वत्थामा मेला अशी आरोळी ठोकली. द्रोणाचार्यांचे पुत्रप्रेम अगाध होते. त्यांना वाटले, आपला पुत्र अश्वत्थामाच मारला गेला. त्यामुळे त्यांचे धैर्य खचले. त्यांनी युधिष्ठिरांना विचारले, की अश्वत्थामा म्हणजे कोण  युधिष्ठिरांनी नरो वा कुंजतो वा अशी बतावणी करून आपल्या कानावर हात                ठेवले. द्रोणांनी शस्त्र खाली ठेवून रथातच ते ध्यानस्थ झाले. धृष्टद्युग्माने तशा स्थितीतच द्रोणांचा वध केला.

कर्णपर्व : द्रोणाचार्यांनंतर राजा दुर्योधनाने कर्णाला सेनापतिपदाचा अभिषेक केला. कर्णाने म्हटले की, राजा शल्य याने माझे सारथ्य केले तर मी माझा पराक्रम दाखवीन. सूतपुत्राचे सारथ्य करणे, हा क्षत्रिय शल्याला आपला अपमान वाटत होता पण मला योग्य वाटेल ते मी बोलेन आणि ते बोलणे कर्ण सहन करील तर मी कर्णाचा सारथ्य करीन, या अटीवर शल्य सारथ्यास तयार झाला. रणांगणावर अर्जुनाचा रथ कोठे दिसेना, तेव्हा कर्ण आत्मप्रौढीची भाषा बोलू लागला. ही संधी साधून शल्याने कर्णाचा तेजोभंग होईल अशी भाषा वापरली. घोषयात्रेच्या प्रसंगी तू दुर्योधनाला सोडून पळ काढला होतास अशी आठवण कर्णाला करून दिली. कर्णाची आणि अर्जुनाची रणांगणावर गाठ पडली. अर्जुनाने कर्णपुत्र वृषसेन याचा आधी वध केला. अगोदरच कर्णाचा तेजोभंग झाला होता आणि नंतर पुत्रशोकाची पाळी आली. या आपत्तीत त्याच्या रथाचे चाकही  भूमीत रूतून बसले. कर्ण रूतलेले चाक काढण्यासाठी रथातून उतरला आणि त्याचे दोन्ही हात रथचक्र उद्धरण्यात गुंतले. अशा स्थितीत कृष्णाच्या सांगण्यावरून अर्जुनाने निःशस्त्र कर्णाचा वध केला. अर्जुनाकडून कर्णवध होण्यापूर्वी भीमाने दुःशासनाला ठार करून, त्याने केलेल्या पांचालीच्या विटंबनेचा सूड घेतला होता. दुःशासनाचे रक्तही भीम प्याला.

शल्यपर्व : युद्धाचा अठरावा दिवस उजाडला होता. राजा दुर्योधनाने शल्याला सेनापती केले. शल्य निकराने लढू लागला. भीमाने त्याला जबर जखमी केले आणि नंतर युधिष्ठिरांनी त्याचा नाश केला. नेतर शकुनी पुढे आला. सहदेवने शकुनीचा वध केला. कौरव सैन्यात आता कोणीही प्रबळ योद्धा उरला नव्हता. दुर्योधन निराश होऊन एका खोल तलावामध्ये पाण्याखाली गुप्तपणे जाऊन बसला. त्याला जलस्तंभन विद्या अवगत होती. म्हणून तो नाकातोंडातून पाणी जाऊन गुदमरला नाही. पांडवांना कालांतराने त्याचा शोध लागला. ते तेथे पोहोचले. भीमसेनाने दुर्योधनाला युद्धाचे आव्हान दिले. त्या दोघांचे गदायुद्ध जमले. भीमाने गदायुद्धाचा नियम मोडून दुर्योधनाच्या डाव्या मांडीवर घाव घातला आणि दुर्योधन त्या घावाने निपचित पडला. युद्ध थांबले. सगळे पांडव शिबिराकडे गेले.

अश्वत्थाम्याला ही दुर्योधनाच्या पराभवाची वार्ता कळली आणि तो मांडी मोडून पडलेल्या दुर्योधन राजाकडे गेला. अश्वत्थाम्याने शपथ घेतली की, सैन्य जरी नष्ट झालेले असले, तरी मी सर्व पांडवांचा निःपात करीन. तेव्हा मरणोन्मुख दुर्योधनाने त्याची सेनापती म्हणून नेमणूक केली.

सौप्तिकपर्व : आचार्य कृप, कृतवर्मा आणि अश्वत्थामा हे कौरवांच्या बाजूचे वीर अरण्यातील एका वृक्षाच्या छायेखाली रात्र झाल्यावर गेले आणि झोपले. अश्वत्थाम्याला झोप लागली नाही तो जागाच होता. रात्री एका घुबडाने त्या झाडावरील शेकडो निद्रिस्त पक्ष्यांचा फडशा पाडला. तो अश्वत्थाम्याने पाहिला. त्याच्या डोक्यात एक भयंकर कल्पना आली. कृतवर्मा आणि कृपाचार्य ह्या दोघांना त्याने जागे केले आणि लगेच रात्री पांडवकुलाचा संहार करण्याचा आपले बेत सांगितला. ते तिघेही पांडवांच्या शिबिरात गेले. अंधारात अश्वत्थाम्याने धृष्टद्युग्माच्या तंबूत जाऊन अगोदर त्याला ठार मारले. कारण द्रोणाचार्यांना ते समाधीत असताना धृष्टद्युग्माने ठार केले होते. नंतर प्रत्येक तंबूत जाऊन जे जे वीर झोपले होते त्या सगळ्यांचा झोपेतच खातमा केला. ह्यात द्रौपदीचे सर्व पुत्र मारले गेले. प्रत्यक्ष पांडव मात्र सापडले नाहीत. राहिलेल्या वीरांना नष्ट करण्याकरता सर्व छावणीला आग लावून दिली. सगळे गेले पांडव तेवढे जिवंत राहिले. अश्वत्थाम्याने आपण केलेल्या ह्या संहाराची वार्ता दुर्योधनाला सांगितली. दुर्योधनाने त्याची प्रशंसा करून प्राण सोडला. पांडव अश्वत्थाम्याचे पारिपत्य करण्यासाठी गेले, तेव्हा अश्वत्थाम्याने ब्रह्मास्त्र सोडले. त्याच्या प्रतिकारार्थ अर्जुनाने उलट तेच अस्त्र सोडले. त्या अस्त्रांच्या आगीत सर्व जग जळणार, अशी अवस्था उत्पन्न झाली म्हणून व्यास आणि नारदमुनी ह्यांनी अस्त्रे मागे घेण्यास सांगितले आणि अनर्थ टाळला. अश्वत्थाम्याच्या मस्तकावर एक दिव्य मणी होता. व्यासांच्या उपदेशानुसार तो त्याने भीमाच्या हाती दिला. ही त्याच्या पराजयाची खूण होती.


स्त्री पर्व : राजा धृतराष्ट्र आणि गांधारी हे दोघे भयंकर दुःखाने खचले. पती व पुत्र गमावलेल्या सगळ्या वीर स्त्रिया आक्रोश करीत होत्या. संजय आणि विदुर धृतराष्ट्राचे सांत्वन करण्याचा प्रयत्न करीत होते. त्याच सुमाराला पांडव आणि कृष्ण हे धृतराष्ट्राच्या भेटीस आले. पांडवांशी सद्‌भावनेने वागण्याचा उपदेश कृष्णाने धृतराष्ट्रास केला. गांधारीच्या दुःखाला पारावार नव्हता कारण सगळे पुत्र मारले गेले होते. द्रौपदीनेही सगळे पुत्र गमावले होते. महाभारताच्या  स्त्री पर्वातील गांधारीच्या दुःखाचे करुणामय चित्रण हा शोककाव्याचा उत्कृष्ट नमुना आहे. गांधारीजवळ श्रीकृष्ण गेला, तेव्हा दुःखतप्त गांधारीने त्याला शाप दिला, की या सर्व संहाराचे मूळ तू आहेस. तुझ्या यादवकुलाचाही असाच निःपात होईल आणि तो तुला आपल्या डोळ्यांनी पहावा लागेल. युधिष्ठिरांनी मृत वीरांच्या प्रेतांचा अग्निसंस्कार करून तिलांजली दिली.

शांतिपर्व : अंत्येष्टी उरकल्यानंतर बाकीच्या पांडवांसह युधिष्ठिर हस्तिनापुरास आले. युधिष्ठिरांचे मन अत्यंत विषण्ण असतानाच त्यांचा राज्याभिषेक झाला. नंतर शरपंजरी पडलेल्या भीष्मांकडे कृष्ण आणि युधिष्ठिर समाचारास गेले. तेथे विषण्ण व वैतागलेल्या युधिष्ठिरांना भीष्मांनी राजधर्म, आपद्‌धर्म आणि मोक्षधर्म यांचा उपदेश केला. नीतिशास्त्र, राजनीतिशास्त्र आणि अध्यात्मविद्या यांचे उत्कृष्ट विवेचन भीष्मांनी शरपंजरी असतानाच केले.

अनुशासन पर्व : अध्यात्मशास्त्र, धर्मशास्त्र, शुभाशुभ कर्मविचार, दैव पुरूष विचार, अनेक वर्णांचे आणि आश्रमांचे धर्म, गोरक्षणाचे माहात्म्य, तारकासुर वृत्तांत, श्राद्यविधी अशा विविध संकीर्ण विषयांचे भीष्मांनी केलेले विवेचन या अनुशासन पर्वात आले आहे. श्रोता व पृच्छक आहेत युधिष्ठिर म्हणजेच धर्मराज.

उत्तरायण सुरू झाल्यावर भीष्मांनी योगसाधनेने देहत्याग केला. त्यावेळी धृतराष्ट्र, युधिष्ठिरादिक पांडव व त्यांचे सर्व आप्तसुहृद उपस्थित होते. भीष्मांची अंत्येष्टी केल्यावर सगळे परतले.

आश्वमेधिक पर्व : स्वजनांचा आणि जगातील मानवकुलांचा एवढा मोठा संहार होण्यास आपण कारण झालो, असे युधिष्ठिरांना वाटत होते. त्यांचे मन पूर्ण वैतागले आणि वनात जाऊन कायम तपश्चर्या करीत जीवन संपवावे असा आपला उद्देश त्यांनी सर्व बंधूंना आणि मित्रांना सांगितला. कृष्ण आणि चारही पांडव बंधू युधिष्ठिरांना राज्याची सूत्रे हाती घेण्याकरता विनंती करीत होते परंतु त्यानी वानप्रस्थाचा आपला निश्चय सोडला नाही. शेवटी व्यास आले आणि त्यांनी आदेश दिला, की  या अपरंपार हत्येचे प्रायश्चित म्हणजे अश्वमेध होय. वानप्रस्त स्वीकारण्याची पापक्षालनार्थ आवश्यकता नाही. अश्वमेघ पार पाडा आणि राज्याची धुरा वहा. या आदेशाप्रमाणे त्या महायज्ञाची सर्व तयारी केली. अश्वमेघाचा अश्व एक वर्षभर देशोदेशा फिरवून आणायचा असतो. तो अश्व फिरवत असताना जर कोणी शूराने कायम पकडून ठेवला, तर अश्वमेघ होऊ शकत नाही. म्हणून त्या अश्वाच्या रक्षणार्थ अर्जुनाची निवड झाली. तो अश्व            देशोदेशी विजयासाठी फिरला आणि अर्जुन त्याच्या पाठीमागून जात राहिला. अनेक राष्ट्रांचे आणि जमातींचे शूर वीर आडवे आले असताना त्या सगळ्यांचा पराभव करून आणि त्यांना अश्वमेघाचे निमंत्रण देऊन अर्जुन यशस्वी रीतीने हस्तिनापुराला परतला. या यात्रेत फारसा रक्तपात झाला नाही. अश्वमेघ यज्ञ पूर्ण झाला. निमंत्रित शूर वीर क्षत्रीयांचे आणि राजांचे सत्कार झाले. पुरोहितांना मोठमोठ्या सुवर्णदक्षिणा मिळाल्या. युधिष्ठिरांनी मोठा धार्मिक राजा या नात्याने राज्याचा  भार उचलला.

आश्रमवासिक पर्व : करूवंशाचा प्रमुख या नात्याने धृतराष्ट्राचा युधिष्ठिरांकडून सर्व प्रकारे आदर केला जात होता. गांधारीचाही राज कुलात मान राखला जात होता. पंधरा वर्षे राजमहालात राहिल्यानंतर धृतराष्ट्राने गांधारीसह वानप्रस्थ स्वीकारला. धृतराष्ट्र-गांधारी वनात गेले. कुंती, विदुर आणि संजयही त्यांच्यासह वनात गेले. दोन वर्षांनंतर पांडवांना वार्ता आली की, धृतराष्ट्र, गांधारी आणि कुंती हे दावानलामध्ये भस्मसात झाले. संजय हिमालयात निघून गेला.

मौसल पर्व : करूयुद्ध झाल्यानंतर ३६ वर्षांनी पांडवांना पुन्हा धक्कादायक वार्ता मिळाली की गांधारीच्या शापामुळे यादव वंशासह कृष्णाचा नाश झाला आहे. ऋषीच्या शापामुळे यादव मद्य पिऊन बेहोश झाले आणि सर्वांनी आपापसांत युद्ध करून एकमेकांना ठार मारले. सर्व यादवांचा निःपात झाला. बलरामानेही आपला अवतार संपवला. कृष्ण वनात जाऊन समाधी लावून बसला असताना एका व्याधाने त्याच्यावर मृग समजून बाण मारला त्याच्या पायात तो गेला व त्याची अवतारसमाप्ती झाली. रूक्मिणी, हेमवती, जांभवती इ. काही कृष्णपत्न्यांनी अग्निप्रवेश केला. सत्यभामेने तपश्चर्येसाठी वनाचा आश्रय घेतला. उरलेल्या परिवारास घेऊन अर्जुन द्वारकेतून बाहेर पडला. पाठोपाठ समुद्राला उधाण येऊन द्वारका समुद्राच्या पोटातगडप झाली. अर्जुन राहिलेल्या यादव स्त्रियांसह हस्तिनापुरात येत असता वाटेत वन्य जनांनी अर्जुनावर हल्ला केला लुटालूट केली आणि यादव स्त्रियांना पळवून नेले. वाटेत व्यासांच्या आश्रमात अर्जुन आला तेव्हा व्यासांनी सांगितले की, आता सर्व संपले आहे पांडवांनी महाप्रस्थान ठेवावे.

महाप्रस्थानिक पर्व : व्यासांच्या निरोपाप्रमाणे युधिष्ठिरांनी महाप्रस्थानाचा संकल्प केला. अभिमम्युपुत्र परिक्षित याला राज्याभिषेक केला. नंतर हस्तिनापूर सोडून उत्तरेस द्रौपदीसह सर्व पांडव महाप्रस्थानास निघाले. हिमालय पर्वत पार केल्यावर त्यांना वाळूचा समुद्र लागला. मेरू पर्वताचे दर्शन झाले. शक्ती क्षीण झाली. प्रथम द्रौपदी कोसळली आणि संपली. क्रमाने सगळे पडले आणि संपले. युधिष्ठिर तेवढे पुढे जाऊ शकले. वाटेत रथस्थ इंद्राने त्यांचे स्वागत केले. इंद्र युधिष्ठिरांस स्वर्गात नेण्यासाठी आला होता. आपले बंधू आणि पत्नी द्रौपदी ह्यांच्याशिवाय आपण स्वर्गात येणार नाही, असे युधिष्ठिरानी सांगितले. ते सर्व आधीच स्वर्गात पोहोचल्याचे इंद्राने त्यांना सांगितले. युधिष्ठिरांबरोबर एक कुत्रा सारखा होता. त्याला स्वर्गात घेण्याचे इंद्राने नाकारले, तेव्हा धर्मराजांनी आपण स्वतःही त्या कुत्र्यावाचून स्वर्गात राहू शकत नाही, असे उत्तर दिले. हे उत्तर दिल्याबरोबर तो कुत्रा जो प्रत्यक्ष धर्मदेवच होता तो प्रकट झाला. धर्मदेवाने युधिष्ठिरांची प्रशंसा केली. नंतर स्वर्गात जाण्यासाठी युधिष्ठिर इंद्राच्या रथात बसले.


स्वर्गारोहण पर्व : स्वर्गामध्ये युधिष्ठिरांना दुर्योधन मानाने सिंहासनावर बसलेला दिसला. आपले बंधू मात्र त्यांना तेथे दिसले नाहीत द्रौपदीही दिसली नाही. त्यांना सखेदाश्चर्य वाटले. जेथे हे सर्व आहेत, तेथेच मला न्या, असे ते म्हणू लागले. तेव्हा एका देवदूताने त्यांना नरकात नेले. नरकाचे दर्शन त्यांना असह्य झाले पण तेथेच त्यांना आपले बंधू, पत्नी व आप्त भेटले. हे सर्व नरकात का? ह्यांनी पातक तरी काय केले ? असे प्रश्न युधिष्ठिरांना पडले. त्यांनी ह्या सर्वांसह नरकातच रहावयाचे ठरविले. अखेरीस धर्मदेवाने युधिष्ठिरांना सांगितले, की तू जे पाहिलेस, ती भगवान इंद्राची माया होती. तुझ्या परोपकारबुद्धीची कसोटी त्यातून पाहिली गेली. तू तीत उत्तीर्ण झालास. तुझे बंधू, द्रौपदी आदि सर्व स्वर्गातच आहेत. त्यानंतर युधिष्ठिराचा मानवी देह नाहीसा होऊन तो परमात्म्यात विलीन झाला.

मुंबई आवृत्तीप्रमाणेमहाभारताचे २,०१७ अध्याय आहेत त्यांपैकी जवळजवळ निम्म्या म्हणजे १,००० अध्यायांत ही करूवंशाची कथा सांगितली आहे. त्यातच कौरव-पांडवांच्या जन्मापासून अंतापर्यंतची वीरगाथा गोवली आहे. बाकी सर्व भर घातलेली आख्याने व उपाख्याने आहेत. त्यांचा थोडक्यात परामर्श वर आलेलाच आहे.

संदर्भ :1 Gupta. S.P. Ramchandran, K. S. Mahabharat : Myth and Reading, Delhi, 1976.

           2. Hopkins. E. W. The Great Epic of India : Its Character and Origin, Calcutta, 1969.

           3. Rajgopalachari, C.  Mahabharat, Bombay, 1951.

           4. Subramanium, Kamala, Mahabharat, Bombay, 1965.

           5. Sukthankar. V. S. On the Meaning of the Mahabharat,  Bombay, 1957.

           6. Sukthankar, V. S. Belwalkar, S. K. Vaidya, P. L. and others, The Mahabharat (Critical edition) Vols. 19, Books 22, Poona, 1933-1968.

           7. Vaidya, C. V. Mahabharat, A Research, Bombay, 1905.

           8. Vaidya, C. V. Mahabharat. A Criticism, Delhi, 1960.

           9. Winternitz, M. A History of Indian Literature, Vol. I, Calcutta.

         १०. फाटक, न. र. संपा. श्रीमहाभारताचे मराठी भाषांतर, १० खंड, मुंबई, १९६८– ७२.

जोशी, लक्ष्मणशास्त्री