साहित्यदर्पण : काव्यशास्त्रविषयक एक ख्यातनाम संस्कृत ग्रंथ. कर्ता ⇨ विश्वनाथ. विविध पुराव्यांचा विचार करता विश्वनाथाच्या काळाची पूर्वोत्तर मर्यादा इ. स. १३००–८४ अशी ठरविली जाते. त्यामुळे ह्या ग्रंथाचा काळही चौदावे शतक असा ठरतो.

हा ग्रंथ दहा परिच्छेदांत विभागलेला आहे. ग्रंथारंभी विश्वनाथ निरनिराळ्या काव्यशास्त्रकारांनी सांगितलेल्या काव्याच्या व्याख्यांची चर्चा करून मग स्वतःची ‘वाक्यं रसात्मकं काव्यम्।’ ही व्याख्या सोदाहरण सांगतो. दुसऱ्या परिच्छेदात वाक्य आणि शब्द ह्यांच्या व्याख्या केल्यानंतर विश्वनाथ अभिधा, लक्षणा व व्यंजना ह्या तीन शब्दशक्तींची सविस्तर चर्चा करतो. तिसऱ्या परिच्छेदात रस, भाव ह्यांच्या विस्तृत विवेचनाखेरीज नायक-नायिका, त्यांचे भेद इ. विषयांचा त्याने परामर्श घेतला आहे. चौथ्या परिच्छेदात ध्वनी आणि गुणीभूतव्यङ्ग्य हे काव्याचे दोन प्रकार आणि त्याचे उपप्रकार त्याने विवेचिले आहेत. व्यंजनावृत्तीचे अस्तित्व सिद्घ करणे आणि तिचे अस्तित्व नाकारणाऱ्यांच्या युक्तिवादांचे खंडन करणे, हा पाचव्या परिच्छेदाचा विषय होय. सहाव्या परिच्छेदात नाटकविषयक सांगोपांग निरूपण आहे. सातवा परिच्छेद काव्यदोषांच्या विवेचनासाठी आहे. आठव्यात त्याने काव्यगुणांबद्दल लिहिले आहे. वैदर्भी, गौडी, पांचाली आणि लाटी ह्या चार काव्यरीतींचे विवेचन नवव्या परिच्छेदात असून दहाव्यात शब्दालंकार आणि अर्थालंकार ह्यांचा परामर्श घेतलेला आहे.

विश्वनाथाच्या साहित्यदर्पणाचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ह्या एकाच ग्रंथात त्याने काव्यशास्त्राच्या सर्व शाखांचा परिपूर्ण परामर्श घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. ⇨दंडी, ⇨मम्मट आणि ⇨जगन्नाथपंडित ह्यांच्यासारख्या काव्यशास्त्रकारांनी आपल्या ग्रंथांत नाटक ह्या विषयाला स्थान दिलेले नाही. साहित्यदर्पणात मात्र नाट्यकला, तिचे प्रकार, त्यांची तांत्रिक अंगे ह्यांचे विस्ताराने विवेचन आलेले आहे. शिवाय भरतमुनीचे ⇨ नाट्यशास्त्र आणि धनंजयाचे दशरूपक ह्यांचाही त्याने परामर्श घेतलेला आहे. विश्वनाथाची भाषा साधी, पण प्रवाही आहे. काही थोडे अपवाद वगळता त्याच्या समोरील विषयाचे विवेचन तो सहजपणे स्पष्ट करीत जातो तथापि त्याने केलेले काम काहीसे संकलकाचे आहे. रुय्यकाच्या अलंकारसर्वस्वाला त्याने मोठ्या प्रमाणावर अनुसरले आहे. बरीचशी उदाहरणेही त्याने ध्वन्यालोक, काव्यप्रकाश आणि अलंकारसर्वस्व ह्या ग्रंथांतून घेतलेली आहेत तथापि संस्कृत काव्यशास्त्राच्या अभ्यासासाठी एक मार्गदर्शक ग्रंथ म्हणून साहित्यदर्पणाचे महत्त्व आहेच.

संदर्भ : Kane, P. V. History of Sanskrit Poetics, Delhi, 1961.

कुलकर्णी, अ. र.