शास्त्री, हरिप्रसाद गंगाशंकर : (१७ ऑक्टोबर १९१९ –  ).  व्यासंगी भारतविद्यावंत. जन्म मलताज, जि. खेडा, गुजरात येथे. मुंबई विद्यापीठातून एम्. ए. झाल्यानंतर (१९४२) अहमदाबादच्या ‘गुजरात व्हर्‌नॅक्युलर सोसायटी’त अधिव्याख्याता म्हणनू त्यांनी काम केले (१९४५–४९). तेथे असताना त्यांनी वलभी येथे सापडलेल्या काही कोरीव लेखांच्या आधारे ‘पोलिटिकल अँड कल्चरल हिस्टरी ऑफ द मैत्रक किंग्‌डम ऑफ वलभी’ हा प्रबंध लिहून डॉक्टरेट मिळवली (१९४७). त्यानंतर ‘सेठ बी. जे. इन्स्टिट्यूट ऑफ लर्निंग अँड रिसर्च’, गुजराती विद्यासभा, मुंबई ह्या संस्थेत संस्कृत आणि प्राचीन भारतीय संस्कृती ह्या विषयांचे पदव्युत्तर प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले (१९४९–१९५८). पुढे ह्याच संस्थेत साहाय्यक संचालक (१९६२–६८) आणि संचालक (१९६८–१९७९) ही पदे भूषवून ते सेवानिवृत्त झाले.

पुरातत्त्वविद्या, कोरीव लेख, भारताचा इतिहास आणि संस्कृती हे त्यांच्या व्यासंगाचे विषय. वीसहून अधिक ग्रंथ त्यांनी लिहिले असून तीस ग्रंथांचे संपादन केले. तसेच सु. ७०० लेख लिहिले. पोलिटिकल अँड कल्चरल हिस्टरी ऑफ गुजरात या ग्रंथाच्या संपादनात त्यांचा सहभाग होता (खंड १ ते ९ १९७२–८७). तसेच श्रीमद्‌भागवतपुराणम्‌ ह्या ग्रंथाच्या चिकित्सक आवृत्तीच्या संपादकांपैकी ते एक होते.

त्यांच्या ग्रंथांपैकी काही विशेष उल्लेखनीय ग्रंथ असे : हडप्पा अँड मोहें-जो-दडो (१९५२), मैत्रककालीन गुजरात (दोन भाग १९५५), एन्शंट हिस्टरी ऑफ गुजरात (१९६४), एन्शंट इंडिया आणि इंडियन एप्रिगाफी (१९७०), बुद्धिस्ट आर्किटेक्चर ऑफ इंडिया (१९८३), द हिस्टॉरिकल अँड कल्चरल स्टडी ऑफ द इन्‌स्क्रिप्शन्स ऑफ गुजरात (१९८९). त्यांनी लिहिलेल्या गुजराती ग्रंथांत सांख्य-सार अने योग-सार (संपा. १९५२), भारतबाहेर विस्तारलेली भारतीय संस्कृती (१९५७) ह्यांसारख्या ग्रंथांचा समावेश होतो.

त्यांना अनेक सन्मान प्राप्त झाले. उदा., मैत्रककालीन गुजरात ह्या ग्रंथासाठी नर्मद सुवर्णपदक (१९५८), इतिहास आणि संस्कृतिविषयक संशोधनाबद्दल रणजीतराम सुवर्णपदक (१९६०), हरिवंशपुराणातील ‘श्रीकृष्ण’ ह्या विषयावरील शोधनिबंधाबद्दल हरिदास गोकाणी सुवर्णपदक (१९७५) इत्यादी. तसेच मैथिली विश्व विद्यापीठाने ‘महामहोपाध्याय’ ही सन्माननीय पदवी त्यांना १९७८ मध्ये बहाल केली.   

                                                          इनामदार.वि. बा.