भास:संस्कृत नाटककार. त्याच्या जीवनविषयी काहीच माहिती मिळत नाही. तो विष्णुभक्त ब्राम्हण असावा, असा एक तर्क केला जातो. भासाच्या काळाविषयीही अभ्यासकांत ऐकमत्य नाही. भासाच्या काळाविषयी विविध विद्वानांनी व्यक्त केलेली मते पाहिली, तर त्यांच्या पूर्वोत्तर मर्यादांत १,५०० हून अधिक वर्षांची तफावत आढळते. कालिदासकृत मालविकाग्‍निमित्रात, बाणाच्या हर्षचरितात आणि वाक्पतिराजाच्या गउडवहोत भासाचा उल्लेख आलेला आहे. कालिदासाने भासाचा उल्लेख ‘प्रथितयश’ असा केलेला असून स्वतःसाठी ‘नव’ हे विशेष लावलेले असल्यामुळे भास हा कालिदासाच्या आधीच नाटककार म्हणून ख्यातकीर्त झाला होता, हे दिसून येते. तथापि कालिदासाचा काळही निश्चित नाहीच.

‘भासाची नाटके कोणी तरी जाळून टाकली तथापि अग्‍नीत फेकलेल्या सर्व नाटकांमधून त्याचे स्वप्‍नवासवदत्त मात्र न जळता सुरक्षित राहिले आणि ह्या घटनेमुळे भासाला ‘ज्वलनमित्र’ असे संबोधण्यात येऊ लागले,’ असे म्हटले जाते.

भासाच्या नाट्यकृती विसाव्या शतकाच्या आरंभापर्यंत अनुपलब्धच होत्या. ‘भासनाटकचक्र’ असा त्यांचा उल्लेख मात्र मिळत असे. १९०९ मध्ये त्रिवेंद्रम येथील संस्कृत पोथीसंग्रहाचे (ओरिएंटल मॅन्यूस्क्रिप्टस्‍ लायब्ररी, त्रिवेंद्रम) प्रमुख टी. गणपतिशास्त्री ह्यांना पद्मनाभपुरम्‍जवळील मनलिक्कर मठात ताडपत्र्यांवर मल्याळम् लिपीत लिहिलेलेस, १०५ पृष्ठांचे एक हस्तलिखित मिळाले. तीनशेहून अधिक वर्षांपूर्वीच्या ह्या हस्तलिखितात दहा पूर्ण नाटके आणि त्रुटित स्वरूपातले एक नाटक अशी एकूण अकरा नाटके त्यांना आढळली. पुढे कैलासपुरम्, हरिपाद, चेंगान्नूर आदी ठिकाणी त्यांना दोन नवी नाटके, आधी सापडलेल्या दहा नाट्यकृतींच्या प्रती आणि उपर्युक्त त्रुटित नाट्यकृतीची परिपूर्ण प्रत असे साहित्य सापडले. १९१२ ते १९१५ ह्या काळात हाती आलेली ही एकूण तेरा नाटके त्यांनी प्रसिद्ध केली. त्यांची नावे अशी : (१) स्वप्‍नवासवदत्त (१९१२), (२) प्रतिज्ञायौगंधरायण (१९१२), (३) पंचरात्र (१९१२), (४) दूतघटोत्कच (१९१२), (५) अविमारक (१९१२), (६) बालचरित (१९१२), (७) मध्यमव्यायोग (१९१२), (८) कर्णभार (१९१२), (९) ऊरूभंग (१९१२), (१०) दूतवाक्य (१९१२), (११) अभिषेक (१९१३), (१२) चारूदत्त (१९१४), (१३) प्रतिमा (१९१५).

ह्यांपैकी प्रतिमा आणि अभिषेक ही नाटके रामायणावर आधारित असून पंचरात्र, मध्यमव्यायोग, दूतवाक्य, दूतघटोत्कच, ऊरूभंग आणि कर्णभार ह्या नाट्यकृती महाभारतातील कथांवर आधारलेल्या आहेत. बालचरितात कंसवधापर्यंतच्या कृष्णचरित्रास नाट्यरूप दिले आहे. अन्य नाटके लौकिक स्वरूपांच्या कथांवर उभी केलेली आहेत.

टी. गणपतिशास्त्री ह्यांनी भासाची म्हणून प्रसिद्ध केलेली नाटके भासाचीच आहेत किंवा काय, ह्याबद्दल विद्वानांत मतभेद आहेत. इतकेच नव्हे, तर ही तेरा नाटके एकाच व्यक्तीने लिहिलेली आहेत, असेही सर्व अभ्यासकांना वाटत नाही. ही नाटके अस्सल नसून केरळातील चाक्‍यार ह्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या नटवर्गाने केरळीय रंगभूमीसाठी मूळ नाटकांवरून तयार केलेल्या रंगवृत्त्या होत, असेही एक मत. ते आता मागे पडले आहे. अलीकडे त्रावणकोर विद्यापीठातील प्रपाठक डॉ. उन्नी यांना भासनाटकांची अनेक हस्तलिखिते केरळात उपलब्ध झाली आहेत. त्यांवरून ही नाटके तिकडे प्रयोगित होत, हे दिसतेच पण या संग्रहातील अविमारक नाटकाच्या एका हस्तप्रतीत ‘कात्या (यन)’ असे नाटककाराचे नाव आढळल्याने हे नाटक आणि बहुधा इतर त्रिवेंद्रम नाटके केरळीय नाटककारांची असावीत असे डॉ. उन्नी सुचवितात. परंतु एका हस्तलिखिताचा हा पुरावा किती सबल म्हणावा ? हस्तप्रत लिहिणाराची काही चूक नसेल काय ? केरळीय आणि दाक्षिणात्य टीकाकारांचा कल भासाचे नाट्यकर्तूत्व नाकारण्याकडेच दिसतो. परंतु या नाटकांप्रमाणेच शाकुंतल, नागानन्द वगैरे नाटकांचेही प्रयोग केरळीय नट करीत आणि या नाटकांच्या रंगवृत्त्या पण त्यांच्या बाडांत आढळतात. थोडी महत्त्वाची गोष्टी अशी, की त्रिवेंद्रम नाटकांचे कर्तृत्व संदिग्ध असले, तरी स्वप्‍नवासवदत्त भासाचे नाटक असल्याबद्दलचा निर्देश इतरत्र संस्कृत साहित्यात आहे आणि या एकूण नाटकांमध्ये नाट्यविषय, रचनातंत्र, भाषाशैली, विशिष्ट प्रतिमा-कल्पना आणि विशेषतः व्यक्तिचित्रणात तथाकथित दुष्ट पात्रांच्या मनाचा सहृदय मागोवा घेण्याची दृष्टी इ. बाबतींत जे विलक्षण साम्य आढळून येते, ते एककर्तृत्व मानल्याशिवाय उलगडता येण्यासारखे नाही. तटस्थ अभ्यासकांना त्यामुळे ही नाटके भासाची आहेत, असेच वाटते.

ह्या तेरा नाटकांची काही वैशिष्ट्ये लक्षणीय आहेत. ही सर्व नाटके ‘ सूत्रधारकृतारंभ ‘ म्हणजे आधी सूत्रधारचा प्रवेश, नंतर नांदीश्लोक अशा क्रमाने लिहिली गेलेली आहेत. बऱ्याच नाटकांच्या नांदीश्लोकांत दुहेरी अर्थाची शब्दयोजना करून तीतून नाटकातील पात्रांची नावे गोविलेली आहेत. नाटकाच्या आरंभकात (प्रलॉग) एक किंवा दोन पात्रे असून त्याला ‘स्थापना’ असा शब्द वापरलेला असतो. आरंभकात नाटककाराचे तसेच नाटकाचे नाव सांगण्याची पद्धत अनुसरलेली नाही. काही नाटकांत भरतवाक्य नाही. जेथे ते आहे, तेथे ते अनुष्टुभ छंदात रचिलेले असून ‘आमचा राजसिंह पृथ्वीचे रक्षण करो ‘ अशा आशयाची प्रार्थना त्यात आहे.

नाट्यशास्त्रप्रणीत वर्ज्यावर्ज्याचे नियम आणि रचनाबंध भासनाटकांत दिसत नाहीत. निद्रा, स्वप्‍न, युद्ध, मरण, रात्रीचे भ्रमण, घरफोडी असे प्रसंग रंगमंचावर दाखविण्यात आलेले आहेत. श्रीकृष्णाच्या आयुधांचे मानुषीकरण करून त्यांची नाटकीय पात्रे म्हणून योजना करण्यात आलेली आहे. संस्कृतात शोकात्मिका नाहीत परंतु ऊरूभंग आणि कर्णभार ही भासकृत नाटके मात्र शोकात्म आहेत.

नाटकात प्रभावी नाट्य निर्माण करण्यावर भासाचे लक्ष मुख्यतः केंद्रित झालेले दिसते. त्यासाठी आधारभूत कथेतही तो आवश्यक ते फेरफार करून घेतो. उदा., अज्ञातवासातील पांडवांचा तपास ‘पाच रात्री’ च्या आत विराटनगरीत लागल्यामुळे, द्रोणाचार्यांना कबूल केल्याप्रमाणे, गुरूदक्षिणा म्हणून, दुर्योधन पांडवांचे अर्धे राज्य त्यांना परत करतो, असे पंचरात्र ह्या तीन अंकी नाटकात दाखविले आहे. इथे तर महाभारतच बदलून गेले आहे.


घटनांच्या चित्रणापेक्षा नाट्यप्रसंगांचे केंद्र असलेल्या व्यक्तींची संकुल, भावनिक आंदोलने प्रत्ययकारीपणे दाखविणे भासाला विशेष प्रिय आहे. त्या दृष्टीने उदयन, वासवदत्ता, कंस, दुर्योधन, कर्ण, भरत, कैकेयी अशा त्याने रंगविलेल्या काही व्यक्तिरेखा लक्षणीय आहेत. कंस, दुर्योधन, कैकेयी ह्यांसारख्या खलपात्रांच्या मनांचे पापुद्रे उलगडून त्यांच्यातील माणुसकीही भासाने दाखविली आहे.

पंचरात्र हे तीन अंकी नाटक आहे. महाभारतातूनच विषय वा व्यक्तिरेखा घेतलेली भासीची अन्य सर्व नाटके एकांकी आहेत. रामायण व लौकिक कथा ह्यांवर आधारलेली त्याची नाटके मात्र पाच किंवा सहा अंकी आहेत.

भासाची भाषा साधी परंतु जिवंत आणि नाट्यपरिपोषक अशी आहे. नाट्यप्रसंगांमागील कारणपरंपरा सूचितही न करणे, संवादाची वा प्रसंगाची पुनरुक्ति करणे, भाषिक प्रमाद, त्रुटित वाक्यरचना आणि एकंदरीने नाटकाच्या श्राव्य बाजूकडे काहीसे दुर्लक्ष असे भासाच्या नाट्यलेखनातील दोष टीकाकारांनी दाखविले आहेत. तथापि ते असूनही भासाची नाट्यनिर्मिती कालिदासासारख्या श्रेष्ठींने गौरव करावा इतकी समर्थ ठरली, हे त्याच्या प्रतिमेच्या मोठेपणाचेच गमक होय.

कृष्णाजी लक्ष्मण सोमण ह्यांनी भासाची नाटके मराठीत आणली. (भासाची नाटके अर्थात भासकवीचा मराठीत अवतार, १९३१). बळवंत रामचंद्र हिरगांवकर ह्यांनी भासनाटकांचे गद्यपद्यात्मक मराठी भाषांतर केले आहे (भास कवीची नाटके, प्रथम खंड, १९२६ द्वितीय व तृतीय खंड, १९३१).

संदर्भ :

    1. Bhat, G.K. Bhasa Studies, Kolhapur, 1968.

    2. Dasgupta, S. N. De, S. K. A History of Sanskrit Literature. Classical Period, Calcutta, 1962.

    3. Pusalkar, A. D. Bhasa – A Study, Delhi, 1940.

    4. Winternitz, M. Trans, Jha, Subhadra. History of Indian Litretutre, Vol. III. Pt. I, Delhi, 1963.

    ५. भट, गो. के. संस्कृत नाट्यसृष्टी, पुणे, १९६४.

भट, गो. के.