ईश्वरकृष्ण : (? —?). सांख्यकारिकेचा कर्ता. त्याची चरित्रविषयक माहिती उपलब्ध नाही. त्याच्या काळाबाबतही विद्वानांत मतभेद आहेत. त्याचा काळ डॉ. ताकाकुसू सु. ४५०, ए. बी. कीथ सु. चौथे शतक, तर डॉ. स्मिथ २४० असा देतात. बलदेव उपाध्याय त्याचा काळ पहिल्या शतकाच्या अलीकडचा नाही, असे म्हणतात. ईश्वरकृष्ण हा बौद्ध आचार्य वसुबंधू याच्या गुरूचा समकालीन व प्रतिस्पर्धी होता, असेही काही विद्वान मानतात. त्याच्या कारिकांचे ५५७–५६८ च्या दरम्यान परमार्थ याने चिनी भाषेत भाषांतर केले. आद्य शंकराचार्यांच्या शारीरकभाष्यातही त्याच्या तिसऱ्या कारिकेचे अवतरण आलेले आहे. यावरून त्याचा काल परमार्थ व शंकराचार्य यांच्या पूर्वीचा आहे आणि तो स्थूलमानाने चौथे-पाचवे शतक असावा, असे मानले जाते.

ईश्वरकृष्ण आपली गुरुपरंपरा ⇨ कपिल → आसुरी → पंचशिख → ईश्वरकृष्ण अशी नमूद करतो (कारिका ६९ व ७०). त्याच्या कारिका सांख्यमतावरील सर्वाधिक प्राचीन व लोकप्रिय संहिता मानल्या जातात. मूळ कारिकांची संख्या ६९ किंवा ७० आहे तथापि त्यांत तीन कारिकांची मागाहून भरही पडली आहे. ह्या सर्व कारिका आर्या वृत्तात असून त्यांत सांख्यांचे तत्त्वज्ञान थोडक्यात व सुसंगतपणे आलेले आहे. ईश्वरकृष्ण हा अनीश्वरवादी होता. त्याच्या कारिकांवर अनेक टीका उपलब्ध असून त्यांतील गौडपादकृत सांख्यकारिकाभाष्य (सु. सातवे शतक) आणि वाचस्पतिमिश्रकृत सांख्यतत्त्व-कौमुदी (सु. नववे शतक) ह्या विख्यात आहेत.

पहा : सांख्यदर्शन

सुर्वे, भा. ग.