महाभाष्य : पाणिनीच्या अष्टाध्यायीतील सूत्रांवरील आणि कात्यायनाने ह्या सूत्रांवर लिहिलेल्या वार्त्तिकांवरील चिकित्सक दृष्टीने लिहिलेली टीका. ही प्रश्नोत्तररूपाने लिहिलेली आहे. संस्कृत भाषेतील हा टीकाग्रंथ ⇨पतंजलीने रचिला. पतंजलीचा काळ इ. स. पू. सु. १५० असावा. असे म्हटले जाते. तथापि महाभाष्यातील काही उल्लेखांवरून काळ इ. स. पू. ५० च्या मागे जाऊ शकणार नाही, असे मानण्याकडे अलीकडच्या विद्वानांचा कल आहे.

महाभाष्य लिहिण्याचे पतंजलीचे मुख्यतः पुढील उद्देश होते : (१) कात्यायनाच्या नवीन सूचना समाधानकारक नसतील, तेथे त्यांतील दोष दाखवून पाणिनीच्या सूत्रांचे समर्थन करणे. (२) कात्यायनाने नवीन म्हणून केलेल्या सुधारणा पाणिनीने इतरत्र अप्रत्यक्ष रीतीने कशा सूचित केलेल्या आहेत, ते दाखवून कात्यायनाचे बदल अनावश्यक ठरविणे. (३) ज्या महत्त्वाच्या सूत्रांवर कात्यायनाची टीका उपलब्ध नसेल, तेथे चिकित्सक पद्धतीने सूत्रांचे स्पष्टीकरण करणे. (४) जे प्रयोग पाणिनींच्या सूत्रांनी सिद्ध होत नसतील, त्यांना चरितार्थ करण्यासाठी स्वतःची भर घालणे.

पतंजलिकृत हा ग्रंथ शास्त्रीय असला, तरी त्याची भाषा सुबोध आहे. जिवंत संस्कृत गद्याचा नमुना म्हणून महाभाष्याची ख्याती आहे. क्लिष्ट शास्त्रीय सिद्धांतांची उकल सोप्या, व्यावहारिक दृष्टांतांनी करण्याची ह्या ग्रंथाची पद्धती आहे. संस्कृत व्याकरणशास्त्राच्या इतिहासात ह्या ग्रंथाला महत्त्वाचे स्थान आहेत परंतु त्यात तत्कालीन रीतिरिवाज, कलाकौशल्य, धर्म, लोकांची राहणी इ. बाबींची माहितीही अनुषंगाने आलेली असल्यामुळे एकूण ऐतिहासिक दृष्ट्याही महाभाष्याचे महत्त्व विशेष आहे.

ह्या ग्रंथावर अनेक टीका लिहिल्या गेल्या. तथापि त्यांतील तीन विशेष प्रसिद्ध आहेत : (१) भर्तृहरिकृत महाभाष्यदीपिका किंवा त्रिपदी (इ. स. चे चौथे शतक. ही पहिल्या सात आह्‌निकांपर्यंतच उपलब्ध आहे). (२) कैयटाचा प्रदीप (अकरावे शतक) आणि (३) नागेशाचा उद्योत (अठरावे शतक). प्रदीपउद्योत ह्या टीकांसह संपूर्ण महाभाष्य वनारसहून पं. गुरूप्रसाद शास्त्री ह्यांनी (१९३८) व गुरूकुल झज्जार (रोहटक) येथून पं. वेदव्रत ह्यांनी प्रसिद्ध केले आहे. विख्यात जर्मन प्राच्यविद्यापंडित फ्रांट्‌स कीलहोर्न ह्यांनी ह्या ग्रंथांची चिकित्सक आवृत्ती तीन भागांत संपादिली (१९४८−५४ दुसरी आवृ. १९६२−६९). ह्या अजस्त्र ग्रंथाचा एकमेव मराठी अनुवाद वासुदेवशास्त्री अभ्यंकर ह्यांनी सहा भागांत केला आहे. (१९३८−५१). दहा महत्त्वाच्या स-प्रदीप आह्‌निकांचा, डॉ. शि. द. जोशी व डॉ. जे. ए. एफ्. रोडबर्गेन ह्यांनी दहा खंडांत टिपणीसह इंग्रजी अनुवाद केला आहे (१९६८−८४).

जोशी, शि. द.