रे, निहाररंजन : (१४ जानेवारी १९०३–३० ऑगस्ट १९८१). इतिहास, पुरातत्वविद्या, चित्रकला, त्याचप्रमाणे ग्रंथालयशास्त्र, बौद्ध धर्म अशा विविध विषयांमधील मान्यवर विद्वान. त्यांचा जन्म आज बांगला देशात असलेल्या मैमनसिंग येथे झाला. त्यांचे उच्च शिक्षण कलकत्ता, लंडन व लेडन (नेदरर्लंड्‌स) या विद्यापीठांत झाले. त्यांनी लंडनला ग्रंथालयशास्त्राची पदविका मिळविली आणि लेडन येथून ते डी. लिट्. व डी. फिल्. झाले. नंतर १९३७ ते १९४४ या काळात कलकत्ता विद्यापीठात प्रमुख ग्रंथपाल म्हणून त्यांनी काम पाहिले. याच काळात भारतीय इतिहास व संस्कृती या विषयाचे ते कलकत्ता विद्यापीठात प्राध्यापकही होते. नंतर कलकत्ता विद्यापीठाच्या कला विभागाचे अधिष्ठाता (डीन) आणि भारतीय कला व संस्कृती या विद्याशाखेचे प्रमुख प्राध्यापक म्हणून १९५९ मध्ये त्यांची नियुक्ती झाली. १९६५ पासून सिमल्याच्या ‘भारतीय प्रगत अध्ययन परिसंस्था’ (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲड्‌व्हान्स्‌ड स्टडी) येथे संचालक म्हणून त्यांनी कार्यभार स्वीकारला.

रे यांच्या प्रगाढ पांडित्यामुळे त्यांना अनेक संस्थांचे सन्मान्य सभासद म्हणून निवडले गेले. रॉयल एशियाटिक सोसायटीचे ते अधिछात्र (फेलो) होते. तसेच केंद्रीय शिक्षण सल्लागार मंडळ, पुरातत्वमंडळ, मानववंशशास्त्र मंडळ, संगीत नाटक अकादमी, ललितकला अकादमी व साहित्य अकादेमी अशा अनेक संस्थांचे सदस्यत्व त्यांना मिळाले. भारतीय ग्रंथालय परिषदेचे अध्यक्षपद त्यांना १९५९ मध्ये देण्यात आले. राज्यसभेचे सदस्यत्वही त्यांना मिळाले.

रे यांच्या ग्रंथसंपदेत रवींद्र साहित्येर भूमिका (१९४६), बांगलीर इतिहास : आदि पर्व (१९४९) हे बंगाली ग्रंथ, तसेच ब्रॅह्मनिकल गॉड्स इन वर्मा (१९३२), संस्कृत बुद्धिझम इन वर्मा (१९३६), मौर्य अँड शुंग आर्ट (१९४५), ॲन इंट्रोडक्शन टू द स्टडी ऑफ थेरवाद बुद्धिझम इन वर्मा (१९४६), इंडो वर्मीज आर्ट (१९४९), ॲन आर्टिस्ट इन लाइफ : ए कॉमेंटरी ऑन द लाइफ अँड वर्कस ऑफ रवींद्रनाथ टागोर (१९६७), आयडिया अँड ॲन इस्टॉरिकल अनॅलिसिस ऑफ इट्‌स स्ट्रेसीस अँड स्ट्रेन्स (१९७३), मुवल कोर्ट पेंटिंग : ए सोशल अँड फॉर्मल अनॅलिसिस (१९७५) ह्यांचा समावेशहोतो. त्यांपैकी ॲन आर्टिस्ट इन लाइफ ह्या ग्रंथाला साहित्य अकादेमीचा पुरस्कार प्राप्त झाला (१९६९). त्यांच्या सर्व लेखनात जसे वैविध्य आहे, तसाच टीकाकाराचा साक्षेप आणि विद्वत्ता ह्यांचा मनोहर संगमही दिसून येतो. १९६९ साली पद्‌मभूषण ही सन्माननीय पदवी देऊन भारत सरकारने त्यांचा गौरव केला होता.

कोपरकर, द. गं.