शबरस्वामी : जैमिनी ऋषींच्या पूर्वमीमांसासूत्राचे थोर भाष्याकार. मीमांसासूत्रांचा सर्वात प्राचीन भाष्यकार उपवर्ष हा असला, तरी खऱ्या अर्थाने पहिला, श्रेष्ठ व अधिकारी भाष्याकार म्हणजे शबरीस्वामी हाच होय कारण जैमिनीय पूर्वमीमांसा शबरानेच समाजमनात रुजविली. सूत्रकाराचे स्थान व आसन स्थिर करणाऱ्याभाष्याकारांची उदाहरणे इतर दर्शनांतही आढळतात. [⟶ जैमिनी पूर्वमीमांसा].

शबरस्वामीबद्दल निश्चित स्वरूपाची व्यक्तिगत माहिती फारशी उपलब्ध नाही. त्याचा जन्म उत्तर प्रदेशात ख्रिस्तपूर्व तिसऱ्या शतकात झाला, असे एक मत आहे. डॉ. बलदेव उपाध्याय यांच्या मतानुसार त्यांचा जन्म इ.स. च्या दुसऱ्या शतकात झाला तर डॉ. संपूर्णानंदांच्या मते चौथ्या शतकात तमिळनाडूमध्ये झाला. त्याच्या पित्याचे नाव दीप्तस्वामी असून तो काश्मीरी पंडित होता, असे मानण्यात येते.

शबरस्वामीला चार बायका होत्या त्या चार वर्णातील होत्या. त्यांच्यापासून त्याला वराहमिहिर, विक्रमादित्य, भर्तृहरी, हरचंद वैद्य, शंकू अमर असे सहा पुत्र झाले, असे म्हटले जाते.

शबरस्वामीचे पहिले नाव आदित्य होते, असेही मत व्यक्त केले जाते. त्या काळात जैन धर्मीयांचे वर्चस्व फार असल्याने त्यांच्या भीतीने तो जंगलात पळून गेला व शबराचा वेश धारण करून अरण्यवासी झाला, म्हणून त्याचे नाव शबरस्वामी पडले, अशी आख्यायिका आहे. तो मूळचा बुद्धिमान असल्यामुळे त्याने पूर्वमीमांसासूत्रावर भाष्य लिहले. हेच ते सर्वश्रेष्ठ भाष्य –शाबरभाष्य – होय. भाष्यगुणांमुळे या शाबरभाष्याची तुलना पतंजलीच्या  महाभाष्याबरोबर व ⇨ आद्य शंकाराचार्याच्या शारीरकभाष्याबरोबर केली जाते.

पाहा : पूर्वमीमांसा.

इनामदार, वि. बा.

Close Menu
Skip to content