राघवन्, व्ही. : (२२ ऑगस्ट १९०८ − ५ एप्रिल १९७९) एक प्राच्यविद्यापंडित. जन्म तमिळनाडू राज्यातील तिरुवरुर येथे.आपल्या जन्मगावीच शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर संस्कृत हा विषय घेऊन मद्रासच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमधून ते एम्. ए. ची परीक्षा प्रथम श्रेणीत पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले (१९३०). शिवाय पं. अप्पाशास्त्री शास्त्रीगळ, पं. ऋषियुर संतनम अय्यर आणि पं. नारायण बाजपेयर ह्यांच्याकडे प्राचीन पद्धतीने त्यांनी संस्कृत शास्त्रांचे अध्ययन केले होते. शृंगारप्रकाश ह्या भोजाच्या ग्रंथावर संशोधन करून, १९३५ साली त्यांनी मद्रास विद्यापीठाची पीएच. डी. मिळवली.

तंजावर येथील सरस्वती महाल ग्रंथालयाच्या हस्तलिखित सूची विभागाचे प्रमुख म्हणून त्यांनी १९३० साली काम करण्यास प्रारंभ केला. १९३५ मध्ये न्यू कॅटलोगस कॅटलागोरम ह्या प्रकल्पामध्ये ते काम करू लागले आणि आयुष्याच्या अखेरापर्यंत त्यांनी ते काम चालू ठेवले. १९३९ साली मद्रास विद्यापीठात कनिष्ठ अधिव्याख्याता म्हणून त्यांची नेमणूक झाली आणि त्यानंतर पदोन्नती मिळवीत प्राध्यापक व विभागाध्यक्ष म्हणून ते सेवानिवृत्त झाले. १९६०−७० ह्या कालखंडात ‘जवाहर नेहरु फेलो’ म्हणून त्यांनी संशोधन केले.

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अष्टपैलू विद्वान तर ते होतेच परंतु प्रतिभाशाली कवी, उत्तम नट आणि अभिजात संगीताचे मार्मिक जाणकार म्हणूनही ते मान्यता पावले होते.

त्यांच्या लेखनाचा व्याप फार मोठा आहे. त्यांनी लिहिलेल्या व संपादिलेल्या ग्रंथांची संख्या शंभरांहून अधिक आहे. त्यांच्या निवडक ग्रंथांची नावे पुढीलप्रमाणे : भोजकृत शृंगारप्रकाश (संपा. १९४०−४५), आनंदरंगविजयचंपू (संपा. स्वरचित संस्कृत टीकेसह, १९४८), न्यू कॅटलोगस कॅटलागोरम (संपा. खंड १ ते ९ १९४९−७९), यंत्राज ऑर मेकॅनिकल कंट्रायव्हन्सीस इन एन्शंट इंडिया (१९५२), द इंडियन हेरिटेज (१९५६), मॉडर्न संस्कृत रायटिंरज (१९५७), संस्कृत लिटरेचर (१९६१), मलयमाकत (संपा. १९६६), द रामायण इन ग्रेटर इंडिया (१९७४).

तमिळमध्ये त्यांनी काही कथालेखन केले आहे. त्यांनी लिहिलेल्या संस्कृत नाटकांत व एकांकिकात कामशुद्धि : (१९४६), प्रेक्षणकवयी (१९५६), वंतिसुंदरी (१९५६), लक्ष्मी स्वयंवरम् (१९५९), आषाढस्य प्रथम दिवसे (१९६१), भ्रदाश्वेता (१९६१) ह्यांचा समावेश होतो. मुत्तुस्वामी दीक्षितचरितम् हे त्यांनी रचिलेले संस्कृत महाकाव्य.

संस्कृत रवींद्रम् ह्या नावाने, रवींद्रनाथ टागोरांच्या काही साहित्य कृतींचा संस्कृत अनुवादही त्यांनी केला आहे ( १९६६).

महाभारताचा संक्षिप्त इंग्रजी अनुवाद (१९३५), श्री देवी माहात्म्याचा तमिळ अनुवाद (१९४६) आणि नाटकलक्षणरत्नकोशाचा इंग्रजी अनुवाद हे त्यांचे अनुवादकार्यही उल्लेखनीय आहे. संस्कृताच्या आणि कलेच्या क्षेत्रांत व्ही. राघवन् ह्यांनी भरीव कामगिरी केली आहे. ‘संस्कृत रंग’ ह्या संस्थेचे ते संस्थापक व दीर्घकाळ अध्यक्ष होते. मद्रासमधील म्यूझिक अकादमीचे ते अनेक वर्षे कार्यवाह होते तसेच मद्रास नाट्यसंघाचे अध्यक्ष होते. साहित्य अकादेमी, संगीत नाटक अकादमी, आकाशवाणी, नॅशनल बुक ट्रस्ट इत्यादींत सदस्य व सल्लागार म्हणून त्यांनी काम केले.संस्कृताचे अध्ययन-अध्यापन करणाऱ्या भारतीय तसेच भारताबाहेरील संस्था व विद्यापीठे ह्यांच्या सल्लागार समित्यांवर त्यांनी काम केले. युरोप-अमेरिकेत, तसेच पूर्व आशियाई देशांत त्यांनी व्याख्याने, परिषदा ह्यांच्या निमित्ताने दौरे केले.

कांची कामकोटी पीठाकडून ‘कविकोकील’ व ‘सकलकलाकलाप’ ह्या सन्माननीय पदव्या त्यांना मिळाल्या (१९५५). १९६२ साली त्यांना भारत सरकारकडून पद्मभूषण ही पदवी देण्यात आली. साहित्य अकादेमीचे पारितोषिक त्यांना भोजाज शृंगारप्रकाश ह्या ग्रंथासाठी १९६६ मध्ये देण्यात आले. मद्रास येथे ते निधन पावले.

बहुलकर,श्रीकांत