क्रेत्यँ द त्र्वा : (बारावे शतक). फ्रेंच पद्यरोमान्सकार. त्याचे उपलब्ध साहित्य सु. ११६५ ते सु. ११९० ह्या कालखंडातील आहे. प्रथम तो काउंटेस मारी द शांपान्य हिच्या आश्रयास होता. नंतर ॲल्सेसच्या फिलिपकडे गेला. तो इंग्‍लंडला जाऊन आलेला असावा. Erec et Enide (११६५ ?), Cliges (११७० ?), Le chevalier de la Charrette (११७२ ह्याचेच दुसरे नाव Lancelot), Yvain (११७५ ?) व Le Conte del Graal किंवा Perceval (अपूर्ण) हे त्याचे पाच पद्यरोमान्स उपलब्ध आहेत. Perceval  हा रोमान्स ॲल्सेसच्या फिलिपला अर्पण करण्यात आलेला आहे. ११९० मध्ये ॲल्सेसचा फिलिप धर्मयुद्धासाठी निघाला. त्याच सुमारास तो लिहायला घेतला असावा. हा रोमान्स पूर्ण होण्यापूर्वीच तो मरण पावला. यूरोपात अनेक आख्यायिकांचा विषय झालेला राजा आर्थर आणि त्याचे सरदार ह्या विषयावर त्याचे ⇨रोमान्स  आधारलेले आहेत.

ह्या रोमान्समधून आढळणारे खानदानी प्रेमाचे चित्रण दरबारी रीतिरिवाजांशी व त्या काळी प्रचलित असलेल्या कल्पनांशी सुसंगत आहे. योद्धा आणि प्रियकर अशा दोन्ही नात्यांनी शूराचे कर्तव्य काय असावे, ह्यावर ह्या कवीचा विशेष भर दिसतो. त्याच्या रोमान्सवर धार्मिकतेचाही पगडा आहे. निवेदनशैली ओघवती आहे. त्याच्या रोमान्समधून त्याची सूक्ष्म निरीक्षणशक्ती व बुद्धीची चमक दिसून येते. कल्पनारंजित घटना, अद्‌भुत आणि अतिमानवी शक्तींना स्थान इ. रोमान्सलेखनाची सर्वासाधारण वैशिष्ट्ये त्यांत आहेतच. अशा प्रकारच्या लेखनाला चालना देणाऱ्या आरंभीच्या कवींमध्ये क्रेत्यँ द त्र्वाचा समावेश होतो.

टोणगावकर, विजया