हितोपदेश : बंगालचा राजा धवलचंद्र ह्याच्या आश्रयाला असलेल्या नारायण पंडिताने संस्कृतात लिहिलेला नीतिकथांचा एक ग्रंथ. हितोपदेशाच्या अखेरीस नारायण पंडिताचे नाव ग्रंथकर्ता म्हणून येते. ह्या ग्रंथांची रचना चौदाव्या शतकाच्या आसपास झाल्याचे दिसते. संस्कृतातील बोधकथांचा जगद्विख्यात ग्रंथ ⇨ पंचतंत्र हा हितोपदेशाचा मूळ आधार होय. इतकेच नव्हे, तर हितोपदेशा तील बऱ्याचशा कथा पंचतंत्रातूनच घेतलेल्या आहेत. हितोपदेशाच्या आरंभीच नारायण पंडिताने पंचतंत्रा चे त्याच्यावर असलेले ऋण मान्य केले आहे. मित्रलाभ, सुहृदभेद, विग्रह आणि संधी अशा चार परिच्छेदांत हा ग्रंथ विभागलेला आहे.सरळ, सुबोध भाषेत हा ग्रंथ लिहिलेला असून पंचतंत्रापेक्षा त्याची लोकप्रियता अधिक आहे. 

 

संस्कृत भाषेच्या आविष्काराचे कौशल्य वाढावे तसेच शहाण्या वर्तणुकीचे ज्ञान प्राप्त व्हावे, हा ह्या ग्रंथरचनेचा हेतू असल्याचे नारायण पंडिताने म्हटले आहे. 

 

हितोपदेशाचे पहिले मराठी भाषांतर मोडी लिपीत प्रसिद्ध झाले (१८१५). ही भाषांतरे कोणी केली ह्याचा उल्लेख यात नाही. इंग्रज पंडित व ख्रिस्ती धर्मप्रचारक ⇨ विल्यम कॅरी यांनी आपल्या देखरेखी-खाली वैजनाथशास्त्री कानफाडे यांच्याकडून हे भाषांतर करून घेतले आहे. ब्रिटिश म्यूझीअमच्या ग्रंथतालिकेमध्ये हितोपदेशा ची माहिती दिली आहे. सम्राट अकबराने ह्या ग्रंथाचा अनुवाद अबुल फज्लकडून करून घेतला. देवनागरी लिपीत छापला गेलेला हितोपदेश हा पहिला ग्रंथ होय. ⇨ हेन्री टॉमस कोलब्रुक ह्याची त्याला प्रस्तावना लाभली होती. ⇨ सर विल्यम जोन्स ह्याने हा ग्रंथ १७८६ मध्ये पाहिला आणि सर चार्ल्स विल्किन्झ ह्याच्याकडून त्याचे इंग्रजी भाषांतर करून घेतले. पुढील काळात एडविन आर्नल्ड ह्याने केलेले ह्या ग्रंथाचे भाषांतर १८६१ मध्ये द बुक ऑफ गुड काउन्सेल्स ह्या नावाने लंडनमध्ये प्रसिद्ध झाले. 

 

हितोपदेशा ची काही मराठी भाषांतरे अशी : बापूजी मार्तंड आंबेकर ह्यांचे हितोपदेश (आवृ. २ री, १८३१) कृष्णराव सुंदरजी कीर्तीकर ह्यांचे हितोपदेश (आवृ. ४ थी, १८८२) आणि रामचंद्र गणेश बोरवणकरकृत सार्थ हितोपदेश (१९३६). 

कुलकर्णी, अ. र.