रादीश्चेव्ह, अलेक्‌सांद्र, निकलायेव्हिच : (३१ ऑगस्ट १७४९ – २४ सप्टेंबर १८०२). रशियन साहित्यिक. मॉस्को शहरी एका उमराव कुटुंबात जन्मला. काही शिक्षण मॉस्को येथे घेतल्यानंतर जर्मनीतील लाइपसिक विद्यापीठात त्याने कायद्याचे अध्ययन केले. रशियन सरकारच्या विविध खात्यांत प्रशासकीय पदांवर त्याने काम केले.

१७९० साली त्याने पुतेशेस्तवीये इज पीतरबुर्गा व मस्कवू (इं. भा. ए जरनी फ्रॉम पीटर्झबर्ग टू मॉस्को, १९५८) हा आपला सर्वांत महत्त्वाचा आणि स्फोटक ग्रंथ प्रसिद्ध केला. कॅथरिनच्या आधिपत्याखालील रशियात कृषकवर्गावर कसा अन्याय होत आहे, ह्याचे विदारक वर्णन त्याने ह्या ग्रंथात केले होते. तसेच बंड करून उठण्याचा ह्या अन्यायग्रस्त कृषकांना हक्क आहे, असेही म्हटले होते. फ्रेंच क्रांती नंतर एका वर्षातच हा ग्रंथ बाहेर आला होता. ह्या ग्रंथाच्या प्रसिद्धीनंतर रादीश्चेव्हला ताबडतोब अटक करण्यात आली. देहान्ताची सजा त्याला फर्मावण्यात आली होती परंतु नंतर त्या शिक्षेऐवजी, शासन म्हणून त्याला सायबीरियात दहा वर्षे हद्दपार करण्यात आले. १७९७ पर्यंत तो सायबीरियात होता. १९०१ मध्ये त्याला पूर्ण माफी देण्यात आली.

रादीश्चेव्हने कविताही केल्या आहेत.‘वोल्‌नस्त’ (इं. शी. फ्रीडम) ही त्याची कविता विशेष प्रसिद्ध आहे. १९०६ पूर्वी ती कविता प्रसिद्ध होऊ शकली नव्हती.

रादीश्चेव्हच्या लेखनाने रशियातील पुढील पिढ्यांना स्फूर्ती आणि प्रेरणा दिली. विशेषतः ‘देकाब्रिस्ट्‍स’ ह्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या बुद्धिमंतांच्या आणि उमरावांच्या अभिजनवर्गावर त्याचा प्रभाव पडला.

माल्यारस्लेव्ह्यिट्स ह्या स्थळाजवळील एका ठिकाणी विषप्राशन करून त्याने आत्महत्या केली.

पांडे, म. प. (इं.) कळमकर, य. शं. (म.)