रोगनिदान : रोग्याला झालेला रोग शोधण्याची प्रक्रिया व त्यावरून काढलेले अनुमान म्हणजे रोगनिदान होय. अचूक रोगनिदान ही अचूक व योग्य उपचारांसाठी आवश्यक असलेली पहिली पायरी आहे. येथे रोगनिदानातील ‘रोग’ या शब्दाचा अर्थ रोगाच्या विस्तृत व सर्वसमावेशी व्याख्येप्रमाणे अभिप्रेत आहे [⟶ रोग]. त्यामध्ये जीवजन्य रोग आनुवंशिक व जन्मजात विकृती चयापचय क्रियेतील (शरीरात सतत होणाऱ्या भौतिक व रासायनिक घडामोडींतील) असमतोल असंतुलित आहार व रोगप्रतिकारक्षमतेशी संबंधित विकार अर्बुदे (नवीन कोशिकांच्या-पेशींच्या-अत्यधिक वाढीमुळे निर्माण होणाऱ्या गाठी) बाह्य अपायकारक गोष्टींमुळे होणाऱ्या इजा, अपघात व विषबाधा आणि मानसिक आजार इ. सर्व रोगांचा समावेश होतो. यावरून रोगनिदान म्हणजे प्राकृतिक अवस्थेपासून दूर गेलेल्या शरीराच्या सर्व अवस्था व त्यांची कारणे शोधण्याची प्रक्रिया आहे असे म्हणता येईल.

प्रस्तुत नोंदीत एखाद्या विशिष्ट रोगाच्या निदानासंबंधी विवेचन केलेले नसून रोगनिदानाच्या सर्वसाधारण प्रक्रियेची रूपरेषा दिलेली आहे. उपदंश, कर्करोग, कुष्ठरोग, मधुमेह यांसारख्या महत्त्वाच्या विशिष्ट रोगांचे निदान करण्याच्या पद्धती त्या त्या रोगावरील नोंदीत दिलेल्या आहेत. ‘जीवोतक परीक्षा’ ‘नाडी’ ‘मूत्र’ ‘रक्तदाब’ ‘विकृतिविज्ञान, उपरुग्ण’ ‘विद्युत् मस्तिष्कालेखन’ ‘विद्युत् हृल्लेखन’ ‘विषविज्ञान’ ‘वैद्यकीय उपकरणे’ ‘वैद्यकीय प्रतिमादर्शन’ ‘शवपरीक्षा’ ‘स्टेथॉस्कोप’ या रोगनिदानाशी संबंधित असलेल्या नोंदीही पहाव्यात. आयुर्वेदातील रोगनिदानाच्या पद्धतींसंबंधी ‘आतुर निदान’ या नोंदीत विवरण केलेले आहे.

रोगनिदान म्हणजे रोग शोधण्याची क्रियाशील पद्धत (प्रक्रिया) आणि त्याचबरोबर या पद्धतीचा उपयोग करून काढलेले अनुमानही (निष्कर्ष) आहे. रोगनिदानाचे क्रियाशील स्वरूप म्हणजे आजारी माणसाशी संबंधित असलेल्या सर्व प्रश्नांची शास्त्रीय पद्धती वापरून उकल करण्याची कला होय. त्यासाठी प्रथम रोगासंबंधी प्रत्येक बारीकसारीक तपशील व माहिती, प्रत्येक शक्य ठिकाणाहून आणि प्रत्येक उपयुक्त पद्धतीने जमा करावी लागते. नंतर या माहितीची सत्यासत्यता पडताळणे, छाननी करणे व तौलनिक महत्त्व लक्षात घेणे या गोष्टी केल्या जातात. या पुराव्याच्या आधारे आणि वैद्यकीय पूर्वज्ञान व अनुभवांच्या साहाय्याने रोगाच्या स्थूल स्वरूपासंबंधी अंदाज बांधता येतात. अशा अनेक शक्य अंदाजांतून पुराव्यांत जास्तीत जास्त चपखल बसणारा रोग म्हणजे प्राथमिक निष्कर्ष किंवा तात्पुरते रोगनिदान होय.  

तात्पुरते रोगनिदान, उपचारांची तौलनिक उपयुक्तता, उपचारांतील शक्य धोके आणि उपचारांच्या साहाय्याने किंवा उपचारांशिवाय रोग्याचे भवितव्य (फलानुमान) यांचा विचार करून उपचारांचे प्राथमिक व तातडीचे स्वरूप ठरवता येते. तात्पुरते रोगनिदान ही विशिष्ट दिशेने त्वरित उपचार सुरू करण्यासाठी आवश्यक अशी पहिली पायरी आहे.  

यानंतर अधिक माहिती व पुराव्यासाठी निरनिराळ्या काटेकोर तपासण्या केल्या जातात. त्यांवरून रोग्याची सर्वसाधारण अवस्था, रोगाचे कारण, रोगप्रक्रिया, रोगाचे शरीरांतर्गत परिणाम व आतापर्यंतच्या उपचारांचे परिणाम यांविषयी जास्त माहिती मिळते. तिचा उपयोग तात्पुरत्या रोगनिदानातील काही त्रुटी व चुका ओळखण्यासाठी आणि काही अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी होतो. त्यानंतर पुनर्विचार करून जास्त अचूक सुधारित रोगनिदान करता येते आणि पहिल्याच दिशेने विशिष्ट, सुधारित व पूरक उपचार करणे किंवा दुसऱ्या दिशेने उपचार सुरू करणे शक्य होते.


हे सुधारित निदानही कित्येकदा अंतिम नसते. त्यासाठी पुन्हा पुढच्या पायरीच्या विशेष तपासण्या, आधीच्या तपासण्यांची पुनरावृत्ती व आवश्यकतेप्रमाणे निदानासाठी शस्त्रक्रियेचा उपयोग करून आणि या सर्वांचा तौलनिक अभ्यास व पुनर्विचार करून पुन्हा सुधारित रोगनिदान व उपचार करावे लागतात.

यानंतरही काही वेळा रोग्याच्या मृत्यूपर्यंत रोगाचे निश्चित स्वरूप समजत नाही. अशा वेळी अचानक मृत्यू आल्यास किंवा अपमृत्यू आल्यास मृत्यूचे कारण कळण्यासाठी व अंतिम रोगनिदानासाठी शवविच्छेदन करावे लागते. त्यानंतरही काही वेळा रोगनिदान पुरेसे परिपूर्ण असत नाही.

कोणत्याही वैद्यकीय घटनेचे किंवा रोगविषयक वस्तुस्थितीचे आकलन व स्पष्टीकरण हे त्या त्या काळातील माहिती मिळवण्याच्या, रोगी तपासण्याच्या व इतर तपासण्या करण्याच्या उपलब्ध सोयी, उपलब्ध वैद्यकीय ज्ञान आणि वर्षानुवर्षे साठत आलेला अनुभव यांच्या आधारेच शक्य असते. तसेच ‘माणसाने माणसाचे त्याच्या भोवतालच्या परिस्थितीच्या संदर्भात केलेले निरीक्षण’ या मर्यादेतच रोगाचा रोग्याच्या शरीरातील प्रसार, रोगाचे टप्पे आणि प्रत्येक टप्प्यावर उपचारांचा परिणाम, हे पाहावे लागतात. त्यामुळे हे आकलन व स्पष्टीकरण नेहमीच तात्कालिक व अपूर्ण असते. या अर्थाने कोणतेही रोगनिदान हे तात्पुरते रोगनिदानच असते. ते जितके वस्तुनिष्ठ माहितीवर आधारित, शास्त्रीय ज्ञानाच्या पायावर व परिपूर्ण असेल तितकी योग्य उपचारांची शक्यता वाढते.

प्रगती : सुरुवातीच्या काळात हस्तक्षेप न करता केलेल्या फक्त निरीक्षणावर रोगनिदान अवलंबून होते. नंतर हळूहळू इतर मार्गांनी रोगविषयक माहिती मिळवणे व रोग्याला प्रत्यक्ष तपासणे (प्रत्यक्ष हस्तक्षेप) यांचा समावेश झाला. त्यातही मुख्य भर निरीक्षण व चाचपणीवरच होता. शरीरावर आघात करून आवाज व स्पर्श अनुभवणे आणि शरीरातील नैसर्गिक-अनैसर्गिक आवाज ऐकणे यांचा नंतर समावेश झाला.  

मृत शरीराचे विच्छेदन करून शरीरांतर्गत रचनेची माहिती जसजशी होत गेली तसतशी शारीर (शरीररचनाविज्ञान) व नंतर विकृतिविज्ञान (रोगविज्ञान), शरीरक्रियाविज्ञान, जीवरसायनशास्त्र इ. शास्त्रे विकसित झाली. या शास्त्रांची एकमेकांशी सांगड घालत वैद्यकशास्त्राची प्रगती झाली. निरोगी शरीर व रोगी शरीर याच्या शरीररचना व शरीरक्रिया यांबाबतच्या संदर्भातील अर्थाचे ज्ञान होत गेले.

भौतिकी, रसायनशास्त्र व जीवविज्ञान यांतील प्रगतीबरोबर वैद्यकीय ज्ञानात भर घालणाऱ्या सुविधा उपलब्ध झाल्या व निरनिराळ्या तपासण्यांचा रोगनिदानासाठी उपयोग होऊ लागला. शास्त्रीय प्रगतीबरोबर रोगांसंबंधी नव्या वस्तुस्थिती उजेडात आल्यावर त्यांचे महत्त्व समजावून घेणे व पूर्वज्ञानाशी त्यांची सांगड घालणे यांतून वैद्यकशास्त्राची प्रगती सुरू आहे.

पूर्वी वैद्यक म्हणजे व्यक्तीचे वैयक्तिक मत होते व त्याला आधार दुसऱ्या व्यक्तीच्या मताचाच फक्त असे. आता वैद्यक हे अधिक वस्तुनिष्ठ ज्ञानाच्या पायावर आधारलेले व प्रगतिशील शास्त्र झाले आहे, म्हणून रोगनिदानाची पद्धतही आता जास्त प्रयोगक्षम व क्रियाशील झाली आहे आणि रोगनिदान जास्त अचूक, परिपूर्ण व त्वरित व्हावे, असे प्रयत्‍न सुरू आहेत.


सर्वसाधारण पद्धत : रोगनिदानासाठी आवश्यक माहिती जमा करण्यात व तपासण्यात कोणतीही त्रुटी राहू नये आणि अनवधानाने कोणताही मुद्दा तपासणीतून सुटू नये यासाठी तपासणीची विशिष्ट सुसूत्र पद्धत वापरणे महत्त्वाचे ठरते. अशी सध्या प्रचलित असलेली सर्वसाधारण पद्धत पुढीलप्रमाणे आहे : (१) रोग्याचा वैद्यकीय इतिहास, (२) वैद्याकडून वैद्यकीय तपासणी, (३) प्रयोगशाळेतील, क्ष-किरण व इतर सर्वसाधारण तपासण्या आणि विशेष तपासण्या.

 

 याप्रमाणे केलेले रोगनिदान आणि उपचारांचा सर्वसाधारण आराखडा यांचा परस्पर संबंध खालीलप्रमाणे मांडता येईल.

वैद्यकीय इतिहास + वैद्यकीय तपासणी ⟶ तात्पुरते रोगनिदान [⟶ त्वरित/प्राथमिक उपचारांची सुरुवात] ⟶ सर्वसाधारण तपासण्या ⟶ सुधारित रोगनिदान [⟶ सुधारित उपचार] ⟶ पुढील तपासण्या ⟶ सुधारित निदान [व उपचार] ⟶ विशेष तपासण्या + जरूरीप्रमाणे निदानासाठी शस्त्रक्रिया ⟶ अचूक रोगनिदान [⟶ विशेष व अचूक वैद्यकीय आणि/किंवा शस्त्रक्रियेने उपचार] ⟶………मृत्यू झाल्यास शवविच्छेदनाने रोगनिदान (अंतिम).

यातील प्रत्येक टप्प्यावर रोग्याच्या अवस्थेचा, रोगाच्या स्थितीचा व उपचारांच्या तौलनिक फायद्याचा पुनःपुन्हा आढावा घेऊन पुनर्विचार करावा लागतो.

 

रोग्याचा वैद्यकीय इतिहास : रोग्याची वैयक्तिक माहिती : रोग्याचे नाव, वय, लिंग, जात, धर्म, विवाह, व्यवसाय, पत्ता, उत्पन्न इ. गोष्टींची नोंद केली जाते. यातील प्रत्येक माहितीचा रोगनिदानाच्या दृष्टीने प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध असतो. तसेच या माहितीच्या आधारे त्या विशिष्ट व्यक्तीला होऊ शकणाऱ्या रोगांची संख्या व प्रकार मर्यादित करता येतात.

निरनिराळ्या प्रकारचे रोग निरनिराळ्या वयोगटांत जास्त प्रमाणात आढळतात. उदा., साथीचे रोग, जन्मजात विकृती इ. लहान वयात आणि हृदयविकार, जास्त रक्तदाब, कर्करोग इ. प्रौढ वयात जास्त प्रमाणात आढळतात. यामुळे रोग्याच्या वयोगटाप्रमाणे त्या त्या वयोगटात मुख्यत्वे आढळणाऱ्या रोगांवर लक्ष केंद्रित करता येते.

फक्त स्त्रियांना व फक्त पुरुषांनाच होणारे जनन तंत्राशी (जनन संस्थेशी) संबंधित रोग सोडल्यासही अनेक सर्वसाधारण रोगांचे प्रमाण स्त्रियांमध्ये व पुरुषांमध्ये भिन्न असते. आनुवंशिक विकारांचे प्रमाणही दोन्ही गटांत भिन्न असते. तसेच सर्वसाधारण व्यवसाय भिन्नतेमुळे व्यवसायजन्य रोगांचे प्रकार व प्रमाणही दोन्ही गटांत वेगवेगळे असते.

विशिष्ट जातीत व धर्मात प्रचलित असलेल्या काही परंपरा, रुढी, श्रद्धा या विशिष्ट रोगांना अप्रत्यक्षपणे कारणीभूत होऊ शकतात किंवा काही वेळा रोगप्रतिबंधक सामाजिक बंधन म्हणूनही त्यांचा उपयोग असू शकतो. त्या त्या जातीच्या किंवा धर्माच्या सर्व लोकांत सर्वसाधारणपणे आढळणाऱ्या खाण्याच्या, राहाण्याच्या, स्वच्छतेच्या, कपड्यांच्या इ. कित्येक सवयी रोगांशी संबंधित असू शकतात. विशिष्ट वंशाच्या लोकांत विशिष्ट रोगांचे प्रमाण जास्त आढळते, याचे कारण आनुवंशिक, परिस्थितिजन्य किंवा राहणीशी संबंधित असते. सामाजिक दृष्ट्या बंदिस्त असलेल्या वंशात किंवा जमातीत आनुवंशिक रोगांची शक्यता वाढते.


रोग्याच्या राहण्याच्या जागेचा सबंध परिसर, वातावरणीय प्रदूषण, स्वच्छता, गर्दी इ. दृष्टींनी रोग होण्यास किंवा फैलावण्यास कारणीभूत होणाऱ्या गोष्टींशी असतो.

विशिष्ट परिसरात विशिष्ट प्रकारचा व्यवसाय करणाऱ्याला विशिष्ट प्रकारचे व्यवसायजन्य रोग होण्याचा संभव अधिक असतो. सध्याच्या परिस्थितीमुळे, विशेषतः औद्योगिकीकरण झालेल्या भागांत, व्यवसायजन्य रोगांना महत्त्व आले आहे [⟶ व्यवसायजन्य रोग ].

 

सध्याच्या तक्रारींचे स्वरूप : वैयक्तिक माहितीनंतर रोग्याच्या सध्याच्या तक्रारींविषयी जास्तीत जास्त वस्तुनिष्ठ माहिती मिळवण्याचे वेळखाऊ, किचकट पण महत्त्वाचे काम सुरू होते. रोग्याच्या तक्रारींचे स्वरूप, त्यांचा प्रकार किंवा गुणधर्म, त्यांची सुरुवात, काळ व सध्याची स्थिती, गंभीरपणा व तीव्रता आणि त्यांतील चढ-उतार, शरीरातील स्थान, निरनिराळ्या शरीरक्रियांबरोबर तक्रारीचा संबंध, निरनिराळ्या तक्रारींचा कालानुक्रम व प्रत्येकीचे तौलनिक महत्त्व इ. प्रकारे तक्रारींचे विश्लेषण करणे व प्रत्यक्षाप्रत्यक्षपणे रोगाची संबंधित असलेली जास्तीत जास्त माहिती रोग्याकडून आणि त्याच्या संबंधितांकडून जास्तीत जास्त अचूकपणे मिळविणे ही अवघड कला आहे. रोग्याची स्मरणशक्ती, वर्णनक्षमता, वर्णनशैली व निर्णयक्षमता यांवर आणि योग्य माहिती रोग्याकडून थोडक्यात मिळविण्याची वैद्याची क्षमता यांवर ही माहिती, तिचा खरेपणा, अचूकपणा (नेमकेपणा) व पूर्णपणा अवलंबून असतो.

 

रोग्याचे विस्मरण, रोगी आणि वैद्याच्या संभाषणातील विसंवाद, एखाद्या तक्रारीचे महत्त्व व गांभीर्य न समजल्याने रोग्याने ती न सांगणे आणि भीती, लाज किंवा इतर कारणांमुळे एखादी महत्त्वाची तक्रार रोग्याने जाणूनबुजून लपविणे यांमुळे माहिती मिळविण्यात अनेक त्रुटी राहू शकतात.

रोगी आजारी असल्याने काळजीत व घाबरलेला असतो. या मानसिक अवस्थेचाही त्याने सांगितलेल्या माहितीवर परिणाम होतो. रोगी न बोलण्याच्या, न समजण्याच्या, गंभीर किंवा बेशुद्ध अवस्थेत असेल किंवा लहान मूल असेल, तर रोग्याच्या संबंधितांनी सांगितलेल्या माहितीवरच अवलंबून रहावे लागते. म्हणून वैद्याने स्वतः शांत राहून व रोग्याला शांत करण्याचा प्रयत्‍न करून लक्षपूर्वक व सहानुभूतीने रोग्याकडून माहिती मिळवावी लागते. संभाषण जरूर तिथे योग्य मार्गाने वळविणे, रोग्याला समजतील अशा भाषेत प्रश्न विचारणे व रोग्याने त्याच्या भाषेत सांगितलेल्या माहितीचे वैद्यकीय भाषेत रूपांतर करून तिचा योग्य अन्वयार्थ लावणे या गोष्टी चांगल्या वैद्याने करणे अपेक्षित असते.

हे समजण्यासाठी ‘वेदना’ या तक्रारीचे उदाहरण घेता येईल. वेदनेची निश्चित जागा, खोली, व्याप्ती, प्रसार, तीव्रता, कशा प्रकारे दुखते या स्वरूपात वेदनेच्या गुणधर्मांचे वर्णन, दुखण्याचा काल, कालाप्रमाणे वेदनेतील चढ-उतार व चढ-उताराच्या पुनरावृत्तीचा काल, नैसर्गिक शारीरिक क्रिया, हालचाल व इतर गोष्टींमुळे वेदनेच्या तीव्रतेत होणारे बदल. अन्यत्र-वेदना इ. अनेक गोष्टी ‘वेदना’ या तक्रारीच्या संदर्भात विचारात घ्याव्या लागतात. यासाठी व मुख्यतः वेदनेचा प्रकार व गुणधर्म व तिची तीव्रता समजण्यासाठी रोग्याची सहनशक्ती, त्याची वेदनेची तलसीमा, त्याचा वेदनेकडे पाहण्याचा दृष्टिकोन व त्याची वर्णनशैली यांवरच अवलंबून राहावे लागते. यासाठी रोग्याला समजतील अशा प्रकारे काळजीपूर्वक प्रश्न विचारून त्याने दिलेल्या माहितीची काळजीपूर्वक छाननी आणि विश्लेषण करावे लागते आणि त्यावरूनच वेदनेचे कारण शोधण्यासाठी म्हणजेच रोगनिदानासाठी उपयुक्त धागे शोधावे लागतात.


पूर्वेतिहास : रोग्याच्या एकंदर प्रकृतीची कल्पना येण्यासाठी त्याच्या आतापर्यंतच्या आयुष्यातील वैद्यकीय दृष्टीने महत्त्वाच्या घडामोडींसंबंधी माहिती विचारली जाते. सध्याच्या तक्रारींशी साम्य असणाऱ्या पूर्वायुष्यातील तक्रारी, त्यांवरील उपचार व उपचारांचे परिणाम  इतर महत्त्वाचे, गंभीर, दूरगामी परिणाम करणारे आणि चयापचयातील असंतुलनामुळे उद्‌भवणारे रोग आणि त्यांसाठी केलेले व सध्या चालू असलेले उपचार व त्यांचे परिणाम, रुग्णालयात दाखल करण्याची जरूर पडण्याइतके गंभीर किंवा अनेक दिवस रेंगाळलेले आजार, त्यांवरील उपचार व उपचारांचे परिणाम, सध्या इतर कोणत्याही रोगासाठी चालू असलेले उपचार, आतापर्यंतच्या शस्त्रक्रिया यांसंबंधीच्या माहितीचा यात समावेश होतो. तसेच आतापर्यंतच्या निरनिराळ्या कारणांसाठी केलेल्या तपासण्या, रक्तदान किंवा रक्ताधान (रक्त भरणे), रोगप्रतिबंधक लशीसंबंधीची सद्यस्थिती आणि आतापर्यंतच्या औषधोपचारांपैकी काही औषधे व अंतःक्षेपणे (इंजेक्शने) यांमुळे झालेला त्रास, विपरीत परिणाम किंवा अधिहृषता (ॲलर्जी) यांसंबंधीची माहितीही महत्त्वाची असते.

कौटुंबिक इतिहास : यामध्ये मुख्यतः आनुवंशिक आजार, जवळच्या नातेवाईकांमध्ये पुनःपुन्हा आढळणारे काही आजार, साथीचे रोग, कुटुंबाचा आरोग्यविषयक दृष्टिकोन व आहार, स्वच्छता, रोगप्रतिबंधक उपाय यांसंबंधीची जाण यांविषयी माहिती मिळविली जाते, तिचा उपयोग सध्याच्या रोगाचे निदान करण्याबरोबरच रोग्याला इतर काही साथीचे किंवा आनुवंशिक रोग असण्याची सध्या व पुढे शक्यता आहे का, हे पडताळून पहाण्यासाठी होतो.

 वैयक्तिक इतिहास : रोग्याचा नेहमीचा सर्वसाधारण दिनक्रम व जीवन पद्धती कामाचे स्वरूप, वेळा व तास आहाराच्या व मलमूत्र विसर्जनाच्या नेहमीच्या सवयी, झोप, विश्रांती व भूक आणि या सर्वांमध्ये सध्या आजारी पडल्यापासून झालेले बदल व्यायाम, रोग्याच्या इतर सवयी आणि व्यसने इ. गोष्टींची माहिती सध्याच्या रोगावर व रोग्याच्या अवस्थेवर प्रकाश पाडण्यास उपयुक्त ठरते.

अशा प्रकारे प्रत्येक रोग्याचा सर्वसाधारण वैद्यकीय इतिहास तपासला जातो. विशिष्ट गटांमध्ये, निरनिराळ्या तंत्रांच्या, अवयवांच्या व विषयांच्या तज्ञ वैद्यांना त्या त्या प्रकारच्या रोगांप्रमाणे विशिष्ट प्रकारची अधिक व आनुषंगिक माहिती आवश्यक असते. ती त्यांना त्याप्रमाणे विशिष्ट प्रश्न विचारून कौशल्याने मिळवावी लागते. उदाहरणार्थ स्त्रियांमध्ये मासिक पाळीची सवय व तक्रारी, वैवाहिक स्थिती, गर्भारपणाचे व बाळंतपणाचे तपशील, बाळाला स्तनपान देणे व कुटुंबनियोजनासाठी साधने वापरणे यांसंबंधीच्या तपशीलांची रोगनिदानाबरोबरच उपचार करतानाही जरूरी असते. तसेच लहान मुलांच्या बाबतीत, त्या मुलाच्या वेळच्या प्रसूतीचे तपशील, मातेचे दूध, वरचे दूध, इतर आहार, आहारातील बदल, हवामान व परिसरातील अचानक बदल, रोगप्रतिबंधक लशींसंबंधीची सद्यस्थिती, वाढीचे टप्पे व ते आढळण्याच्या वेळचे बाळाचे वय इ. गोष्टींच्या तपशीलांना महत्त्व असते.

 

जेव्हा या प्रकारे वैद्यकीय इतिहासासंबंधी मिळालेल्या माहितीचे स्वरूप विस्तृत गुंतागुंतीचे असते तेव्हा त्या माहितीची सुसंगत व मुद्देसूद नोंद करावी लागते. या माहितीला पोषक वस्तुनिष्ठ पुरावा म्हणून पूर्वी केलेल्या औषधोपचारांची किंवा रोगांची नोंदलेली माहिती, रुग्णालय सोडतानाचा दाखला व पूर्वीच्या प्रयोगशाळेतील क्ष-किरण आणि विशेष तपासण्यांचे उपलब्ध अहवाल फार उपयुक्त ठरतात.

वरील पद्धतीने जास्तीत जास्त पूर्ण व वस्तुनिष्ठ माहिती जमा करून तिचे विश्लेषण केल्यावर रोग्याला झालेल्या रोगाविषयी व रोग्याच्या आतापर्यंतच्या आरोग्याविषयी सर्वसाधारण कल्पना येऊ शकते. तसेच रोग मुख्यतः कोणत्या तंत्राचा आहे याची कल्पना येऊन रोगनिदानाच्या पुढील टप्प्यात (प्रत्यक्ष तपासणीत) त्या दृष्टीने जास्त लक्ष देता येते.


वैद्यकीय तपासणी : रोगी तपासणे म्हणजे ज्ञानेंद्रियांमार्फत निरनिराळ्या संवेदना ग्रहण करून त्यांच्या आधारे वैद्याने रोगासंबंधी जास्त व प्रत्यक्ष माहिती मिळवणे होय. यासाठी विशिष्ट संवेदना व त्यांचे अर्थ समजावून घेण्याचे तंत्र शिक्षणाने आत्मसात करावे लागते व त्याचा सतत सराव असावा लागतो. वैद्याचा अनुभव ही या दृष्टीनेच महत्त्वाची गोष्ट आहे.

रोगनिदानासाठी सर्वसाधारणपणे दृष्टी, स्पर्श, श्रवण व काही वेळा गंध या संवेदनांचा उपयोग केला जातो. दिसणाऱ्या, ऐकू येणाऱ्या व स्पर्श होणाऱ्या गोष्टींना खास शिक्षण व सततच्या सरावामुळेच रोगाच्या संदर्भात विशेष महत्त्व प्राप्त होते. निरीक्षणावरून मिळणारी माहिती निरीक्षकाच्या निरीक्षणशक्तीवर अवलंबून असते. ही शक्ती बघण्याची सवय, शिक्षण, सराव, एकाग्रता व सुयोग्य सांगड घालणे यांच्या साहाय्याने मुद्दाम वाढवावी लागते.

निरीक्षणाप्रमाणेच स्पर्शज्ञान वाढविण्यासाठी मुद्दाम प्रयत्‍न करणे आवश्यक असते. त्याशिवाय स्पर्शांतील सूक्ष्मातिसूक्ष्म फरक (उदा., लाकडाप्रमाणे कठीण व दगडाप्रमाणे कठीण) समजू शकत नाहीत. या बाबतीत शस्त्रक्रियातज्ञाला, रोग्याच्या शरीराला बाहेरून व शस्त्रक्रियेच्या वेळी प्रत्यक्ष अंतर्गत अवयवांना स्पर्श करून स्पर्शज्ञान वाढविण्याची जास्त संधी उपलब्ध असते. एखाद्या गोष्टीचे बाह्य स्वरूप निरीक्षण व अप्रत्यक्ष स्पर्शाने समजावून घेणे व शस्त्रक्रियेच्या वेळी तीच गोष्ट प्रत्यक्ष बघणे व स्पर्शाने समजावून घेणे आणि या दोन्ही गोष्टींची सांगड घालणे याचा त्याला सतत सराव होतो. त्यामुळे दृष्टीने आणि स्पर्शाने जाणलेल्या विशिष्ट बाह्य चिन्हांना अनुसरून कोणत्या गोष्टी आत प्रत्यक्ष आढळतील आणि त्या दिसायला आणि स्पर्शाला कशा असतील याचा अंदाज बांधण्याचे कौशल्य त्याच्या अंगी जास्त प्रमाणात येते व त्याचा अनुभव साठत जातो.

श्रवण व गंध या संवेदनांची जाणीवही याच प्रकारे अभ्यास, सराव व एकाग्रतेने सूक्ष्म व काटेकोर करावी लागते.

तपासणी करताना रोग्याने व त्याच्या नातेवाईकांनी दिलेल्या व्यक्तिनिष्ठ माहितीऐवजी त्रयस्थ, प्रशिक्षित व अनुभवी व्यक्तीने जास्तीत जास्त वस्तुनिष्ठ पद्धतीने मिळविलेली माहिती उपलब्ध होते.

सर्वसाधारण तपासणी : यात सर्व संवेदनांचा थोड्या फार प्रमाणात उपयोग करून सर्व शरीराची स्थूल तपासणी केली जाते. सर्व शरीरभर आढळणाऱ्या काही लक्षणांच्या आणि चिन्हांच्या साहाय्याने मुख्यतः रोग्याच्या सर्वसाधारण अवस्थेविषयी या तपासणीतून माहिती मिळविली जाते.

या तपासणीत बघितल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टी पुढीलप्रमाणे : (१) रोग्याचे वजन, उंची व बांधा (२) पोषणाची स्थिती (३) सहज लक्षात येणारी विद्रूपता, गाठ, व्रण आणि नैसर्गिक बांध्यात विशिष्ट ठिकाणी झालेले बदल (४) रोग्याच्या शरीराचे तापमान, नाडीपरीक्षा [⟶ नाडी], श्वासोच्छ्‌वासाचा प्रकार व दर मिनिटाला होणारी आवर्तने आणि रक्तदाब (५) यानंतर केसांपासून पायांपर्यंत सर्व बाह्य अवयव तपासण्यात येतात. केसांचा रंग, चमक व पोत, तेलकटपणा किंवा कोरडेपणा, दाट/विरळपणा आणि गळण्याची प्रवृत्ती डोळ्यांचा तेजस्वीपणा किंवा निस्तेजपणा, नेत्रश्लेष्म्याचा (पापण्यांच्या नाजूक अस्तराचा) रंग (तो शरीरातील रक्ताच्या कमीजास्त प्रमाणाप्रमाणे कमी-अधिक गुलाबी असतो शोथ-दाहयुक्त सूजप्रक्रियेत तो जास्त लाल असतो किंवा फुप्फुसे व हृदयाच्या काही रोगांत त्यात निळसर झाक दिसते). श्वेतपटलाचा (नेत्रगोलाच्या सर्वांत बाहेरच्या आवरणात्मक थराचा) रंग (एरवी पांढरा असलेला हा रंग काही वेळा मळकट तपकिरी दिसतो किंवा अ जीवनसत्त्वाच्या त्रुटिजन्य विकारात त्यावर जास्त पांढऱ्या सुरकुत्या किंवा ठिपके दिसतात किंवा काविळीत तो स्वच्छ पिवळा दिसतो) बुबुळाचा रंग, बाहुली व तिची ⇨प्रतिक्षेपी क्रिया नाक व कान आणि त्यांतील स्त्राव जिभेचा रंग, तिचा ओलसरपणा व तिच्यावरील थर दातांची स्वच्छता व किडलेपणा हिरड्यांचा रंग, सूज, त्यांवरील थर, स्वच्छता, घाण किंवा पू किंवा त्यांतून स्पर्शाबरोबर रक्त येणे, तोंडाचा वास त्वचेचा रंग, तेलकटपणाचे प्रमाण, पोत, स्थितिस्थापकता (लवचिकता), निस्तेज पांढरके किंवा लालसर, काळपट इ. निरनिराळ्या रंगांचे चट्टे, पुरळ, स्वच्छता इत्यादी नखांचा रंग, आकार (फुगीर, सपाट व खोलगट नखांवरून शरीरातील रक्ताच्या प्रमाणाची कल्पना येते आकार जास्त फुगीर किंवा गदाकृती असल्यास फुप्फुसांशी किंवा हृदयाशी संबंधित रोग असू शकतात) बाह्य जननेंद्रिये व सर्वसाधारण दुय्यम लैंगिक लक्षणे वगैरे गोष्टी या तपासणीत महत्त्वाच्या असतात. यांखेरीज सावधपणा, अंगस्थिती, दिक्‌स्थितींचे भान, शरीराचे निर्जलीभवन, त्वचेची नीलवर्णता व काविळीचा पिवळेपणा या रोग्याच्या सर्वसाधारण अवस्थेविषयी माहिती देणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टी सर्वसाधारण तपासणीतच आढळतात. यांशिवाय सर्व शरीरभर पसरलेल्या ⇨लसीका ग्रंथींपैकी त्वचेखाली सहज चाचपून पाहता येतील अशा ठिकाणी असलेल्या लसीका ग्रंथींच्या गटांची व त्या त्या संभाव्य ठिकाणांची पद्धतशीर चाचपणी करून यांतील काही ग्रंथींना सूज आहे का, त्या आकारमानाने वाढल्या आहेत का व त्या चाचपताना दुखतात का याची तपासणी केली जाते (प्राकृतिक अवस्थेत या ग्रंथी चाचपणीत सहज हाताला लागत नाहीत व त्या दुखऱ्या नसतात).


यानंतर निरीक्षण, स्पर्श व चाचपणी, बोटांनी आघात करणे व श्रवण या क्रमाने आणि नंतर प्रत्येक तंत्रासाठी इतर विशिष्ट चिन्हे पाहून प्रत्येक तंत्राची व विशेषतः सकृत्‌दर्शनी रोग असलेल्या तंत्रांची तपासणी करण्यात येते.

तंत्रांची तपासणी : (१) निरीक्षण : तात्पुरते रोगनिदान अनेक वेळा केवळ निरीक्षणावरून करता येते. रोगी वैद्याकडे आल्यापासून परत जाईपर्यंत हे निरीक्षण सतत चालू असते. त्यावरून रोग्याचा बांधा, शरीराची ठेवण, रंग, लिंग, अंदाजे वय, सहज दिसणारे व्यंग, चालण्याची ढब, सर्वसाधारण शारीरिक हालचाली, उभे राहण्याची व बसण्याची पद्धत, वागण्याची पद्धत, सर्वसाधारण स्वभाव व सध्याची मानसिक स्थिती, बोलण्याची पद्धत, आर्थिक-सामाजिक स्थिती इ. अनेक गोष्टी समजतात आणि त्यांचा सर्वसाधारण तपासणीत समावेश होतो. तसेच आजाराची तीव्रता व स्वरूपासंबंधी प्राथमिक अंदाज करता येतात किंवा काही वेळा या निरीक्षणातील काही माहिती लगेच रोगनिदान होण्यास मदत करणारी असते.

नंतरची पायरी म्हणजे सर्व तंत्रांचे व अवयवांचे आकार, आकारमान, सर्वसाधारण रचना व त्यातील दोष, रंग, नैसर्गिक किंवा अनैसर्गिक हालचाल किंवा हालचालीचा अभाव या दृष्टीने निरीक्षण करणे ही होय. यातून अनेक वेळा रोगनिदानास आवश्यक प्रत्यक्ष पुरावा उपलब्ध होऊन तात्पुरते रोगनिदान होऊ शकते.

निरीक्षण ही प्रत्यक्ष हस्तक्षेप न करणारी व त्याचबरोबर खूप व महत्त्वपूर्ण माहिती देणारी तपासणीची पद्धत आहे. त्यामुळे सध्याच्या काळात साध्या निरीक्षणाबरोबरच बाह्य व शरीरांतर्गत अवयवांचे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष निरीक्षण करण्यासाठी अनेक प्रकारची प्रतिमादर्शक उपकरणे वापरली जातात. ही उपकरणे म्हणजे आवाका, खोली व सूक्ष्मदर्शन यांच्या बाबतीत वैद्याचा विस्तारित डोळाच आहेत.

(२) स्पर्श व चाचपणी : या तपासणीचा मुख्यतः बाह्य गोष्टींच्या तपासणीसाठी उपयोग होतो व तीवरून अंतर्गत अवयवांसंबंधी काही अनुमाने काढता येतात. हा प्रत्यक्ष हस्तक्षेप करणारा तपासणीचा क्रियाशील प्रकार आहे. स्पर्शासाठी हाताच्या बोटांची टोके, चाचपणीसाठी बोटांची टोके, बोटे व सर्व तळवा, थरथर अनुभवण्यासाठी तळवा व बोटे मिळतात तिथला भाग किंवा तळव्याच्या करंगळीच्या बाजूकडील भाग व तापमान पाहण्यासाठी बोटांचा पाठीमागील भाग यांचा उपयोग करतात. या तपासणीतून तापमान, स्पर्श, पोत, थरथर, खरखर, खडखड, हालत्या द्रवांची जाणीव व थरथर, सांधे किंवा इतर ठिकाणच्या दोन पृष्ठभागांतील खरखर, दाब, अंतर्गत हालचाल इ. स्पर्शातून जाणवणाऱ्या गोष्टींसंबंधी माहिती मिळते. निरीक्षणाने ठरवलेला आकार व आकारमान (अवयवाचा, गाठीचा किंवा द्रवार्बुदाचा म्हणजे द्रव किंवा अर्धघन पदार्थयुक्त पिशवीचा) स्पर्शाने व चाचपणीने निश्चित केला जातो. (कारण अंतर्गत अवयवांच्या बाबतीत किंवा गाठींमध्ये गाठीचा मोठा भाग शरीरांतर्गत असेल, तर दिसणाऱ्या आकारमानापेक्षा प्रत्यक्ष आकारमान मोठे असते किंवा बाजूच्या सुजेमुळे किंवा फुगीरपणामुळे मोठी दिसणारी गाठ प्रत्यक्षात लहान असू शकते). स्पर्शाला एखादा अवयव कसा आहे (उदा., दगडाप्रमाणे कठीण, लाकडाप्रमाणे कठीण, टणक, घन, मऊ, लिबलिबीत, द्रवार्बुदाप्रमाणे किंवा आतील द्रवाच्या दाबाने तटतटलेला इ.) आणि त्या अवयवाच्या नैसर्गिक व रोगग्रस्त अवस्थांतील स्पर्शांत काय फरक आहे व या निरनिराळ्या स्पर्शांतील बारकावे कोणते हे ठरविणे, हा चाचपणी तपासणीतील महत्त्वाचा भाग आहे. तसेच पकडण्याची व हालचालीतील ताकद पहाणे किंवा हालचालीची क्षमता व मर्यादा पहाणे हाही या तपासणीचाच भाग आहे.


याचबरोबर प्रत्येक तंत्राच्या तपासणीत प्रत्येक तंत्रासाठी विशिष्ट अशी काही चिन्हे चाचपणीने ठरविली जातात. उदा., श्रोणिभागातील (धडाच्या शेवटी हाडांनी वेष्टित असलेल्या भागातील) अवयवांच्या चाचपणीसाठी एका हाताची बोटे गुदांत्रात (मोठ्या आतड्याच्या शेवटच्या दोन भागांपैकी पहिल्या भागात) किंवा योनिमार्गात व दुसऱ्या हाताची बोटे ओटीपोटावर ठेवून दोन्ही हातांच्या बोटांच्या मधे येणाऱ्या अवयवांची चाचपणी केली जाते.

नाक, तोंड, कान, बाह्य-जननेंद्रिये, गुदांत्र, योनिमार्ग इ. पोकळ्यांची व त्यांतील अवयवांची (उदा., तोंडातील दात व जीभ, घशातील टॉन्सिल) तपासणी करताना वापरल्या जाणाऱ्या हत्यारांतून अप्रत्यक्षपणे होणाऱ्या स्पर्शाचाही निदानासाठी उपयोग होतो. तसेच शस्त्रक्रियेच्या वेळी अंतर्गत अवयव प्रत्यक्ष चाचपण्याची संधी शस्त्रक्रियातज्ञाला मिळते.

(३) प्रताडन किंवा आघात करणे : शरीरावर किंवा अवयवांवर बोटाने हलके आघात करून येणारे आवाज ऐकणे व आघात करताना दोन्ही हातांच्या बोटांचा उपयोग करून आघाताची अवयवांतील कंपने स्पर्शाने जाणणे, हे या तपासणीचे तत्त्व आहे. यामुळे यात स्पर्श व श्रवण या दोन्हींचाही उपयोग होतो. एका बोटाने अवयवावर आघात करण्याला प्रत्यक्ष प्रताडन व एका हाताची बोटे शरीरावर ठेवून त्यांवर दुसऱ्या हाताच्या बोटांनी आघात करण्याला अप्रत्यक्ष प्रताडन असे म्हणतात. या तपासणीचा उपयोग प्रामुख्याने छाती व पोटातील अवयवांसंबंधी (उदा., फुप्फुसे, हृदय, यकृत, आतडी, मूत्राशय इ.) माहिती मिळविण्यासाठी होतो. आघाताचे आवाज अवयवातील हवा, द्रव व घन पदार्थांच्या प्रमाणाबरोबर बदलतात. त्यामुळे वेगवेगळे आवाज येणाऱ्या दोन अवयवांतील सीमारेषा या तपासणीने निश्चित करता येते आणि त्यावरून एखाद्या अवयवाचा आकार व आकारमान ठरविणे शक्य होते. तसेच द्रवार्बुदी किंवा पर्युदर (उदर-श्रोणी पोकळीत भित्तींच्या आतील बाजूवर व तीमधील इंद्रियांवर पसरलेले अस्तरासारखे पटल), परिफुप्फुस (फुप्फुसावरील स्त्रावोत्पादक पटलमय आवरण) यांच्या पोकळ्यांतील मोकळ्या द्रवांचे अस्तित्व या तपासणीने शोधता येते. त्याचबरोबर अप्रत्यक्ष प्रताडनाने अवयवाच्या घनतेसंबंधी अंदाज करता येतो.

अवयवांच्या पृष्ठांवरून व अंतर्गत भागांतून परावर्तित होणाऱ्या श्राव्यातीत ध्वनी तरंगांच्या [⟶ श्राव्यातीत ध्वनिकी] साहाय्याने अंतर्गत अवयवांची प्रतिमा मिळविण्याच्या आधुनिक ⇨ वैद्यकीय प्रतिमादर्शनाच्या तंत्रांचे हे प्राथमिक स्वरूप म्हणता येईल. यात प्रताडन तपासणीतील अनुभवी वैद्य स्वतःच्या कल्पनाशक्तीने अंतर्गत अवयवांचे चित्र तयार करतो.

(४) श्रवण : नुसत्या कानांनी किंवा स्टेथॉस्कोपच्या साहाय्याने शरीराचे व शरीरांतर्गत आवाज ऐकणे म्हणजे श्रवण तपासणी होय. निरीक्षणाप्रमाणेच लक्षपूर्वक ऐकण्याची क्रियासुद्धा रोगी वैद्याकडे येतो तेव्हापासूनच चालू होते. हे श्रवणाचे कौशल्य मिळविलेला अनुभवी वैद्य रोगी त्याच्याकडे आल्यापासून रोग्याकडून होणाऱ्या अनेक आवाजांवरून अजाणताच अनेक महत्त्वाचे निष्कर्ष काढू शकतो. हे आवाज म्हणजे रोग्याच्या श्वासोच्छ्‌वासाचे व बोलण्याचे आवाज, खोकला, शिंक, ढेकर, पोटातील सहज ऐकू येणारी गुरगुर, पादणे यांचे आवाज तसेच रडण्याचा, ओरडण्याचा, किंचाळण्याचा, कण्हण्याचा, घशातील घरघरीचा आवाज इ. होत. त्यांवरून मुख्यत्वे सर्वसाधारण तपासणीत समावेश करता येणारी रोग्याच्या सर्वसाधारण अवस्थेविषयीची माहिती मिळते.

तंत्रांच्या तपासणीत, मुख्यतः छातीच्या व पोटाच्या तपासणीत, स्टेथॉस्कोपच्या साहाय्याने हृदयाचे आणि शरीरांतर्गत वायूंच्या व द्रवांच्या हालचालींचे आवाज ऐकणे आणि त्यांतील सूक्ष्म बदल जाणणे हा महत्त्वाचा भाग आहे.


स्टेथॉस्कोपच्या रचनेत उच्च व नीच अशा दोन्ही प्रकारच्या ध्वनिकोटींचे (स्वरपदांचे) आवाज ऐकण्याची सोय असते. त्याच्या घंटेच्या आकाराच्या भागाने नीच ध्वनिकोटीचे आवाज चांगले ऐकू येतात आणि दुसऱ्या भागाला लावलेल्या प्लॅस्टिकच्या पटलामुळे हे आवाज वगळले गेल्याने उच्च ध्वनिकोटीचे आवाज सुटे व स्पष्ट ऐकू येतात. [⟶ स्टेथॉस्कोप].

शरीरांतर्गत आवाज स्पष्ट व विवर्धित करणारी उपकरणे आता उपलब्ध झालेली आहेत. त्यांचा उपयोग मुख्यतः अगदी सूक्ष्म आवाज (उदा., गर्भाच्या हृदयाचे आवाज) स्पष्टपणे ऐकण्यासाठी होतो.

(५) गंध : गंधाचा किंवा वासाचा रोगनिदानासाठी करण्यात येणारा उपयोग निरीक्षणाप्रमाणेच प्रत्यक्ष हस्तक्षेप करणारा नाही पण तो निरीक्षणाइतका महत्त्वाचा आणि दर्जाचाही मानला जात नाही. निरीक्षणाइतकी महत्त्वाची व काही वेळा रोगनिदान निश्चित करणारी माहितीही त्यातून मिळत नाही (पण याचे कारण कदाचित वासाची संवेदना मुद्दाम वाढविण्याचा व वासावरून महत्त्वाची माहिती मिळविण्याची क्षमता वाढविण्याचा प्रयत्‍न केला जात नाही, हेही असू शकेल) पण वास सहज येतात व त्यांवरून निदान-निश्चिती करणारी नव्हे, तरी निदानास उपयुक्त अशी बरीच माहिती रोगी तपासतानाच सहज मिळू शकते.

शरीराचे, श्वासाचे तसेच उलटी, मल, मूत्र, वीर्य इत्यादींचे नेहमीचे किंवा बदललेले वास सहज येत असतात. यांतील काही पदार्थांच्या प्रयोगशाळेतील विश्लेषणात बऱ्याच वेळा हे वास नमूद केलेले असतात. मधुमेह-बेशुद्धी, दीर्घकालचे वृक्काचे (मूत्रपिंडाचे) रोग, यकृताचे रोग इत्यादींमध्ये अनेक प्रकारचे विशिष्ट व रोगनिदानास उपयुक्त वास येतात. यीस्ट, कवके (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पती) व निरनिराळे सूक्ष्मजंतू यांच्यामुळे किंवा इतर कारणांमुळे होणाऱ्या अपघटनामुळे (पदार्थांच्या रेणूंची घटक द्रव्ये अलग झाल्यामुळे) येणारे वास व पुवाचे वास विशिष्ट आणि कित्येक वेळा कोणत्या सूक्ष्मजीवाचा प्रादुर्भाव झाला आहे, हे ओळखण्यास मदत करणारे असतात. तसेच उलटीतील कुजणाऱ्या अन्नाचे, अम्‍ल रसाचे, पित्तरसाचे व पोटात गेलेल्या विषांचे वास विशिष्ट असतात परंतु हे बहुतेक सर्व वास न टाळता येणारे असले, तरी दुर्गंधी या स्वरूपातील असल्याने त्यांकडे कमी लक्ष दिले जाते.

तंत्रांच्या तपासणीतील महत्त्वाच्या बाबी : या प्रकारे निरीक्षण, स्पर्श व चाचपणी, प्रताडन व श्रवण या क्रमाने प्रत्येक तंत्राची किंवा शरीराच्या भागाची तपासणी करत असताना प्रत्येक तंत्र व शरीराच्या भागाच्या तपासणीत कोणत्या विशिष्ट गोष्टींकडे लक्ष दिले जाते, त्याचे विवरण खाली केले आहे.

छातीच्या तपासणीत (श्वसन तंत्र हृदयाभिसरण तंत्र) प्रामुख्याने खोकला, ताप, दम किंवा धाप, छातीत दुखणे किंवा दडपण आल्याप्रमाणे वाटणे, छातीची धडधड, हात, पाय व चेहेऱ्यावरील सूज इ. लक्षणांचे काटेकोर विश्लेषण करावे लागते. सर्वसाधारण तपासणीत तापाचे प्रमाण, नाडीतील बदल, रक्तदाबातील बदल, श्वासोच्छ्‌वासाची गती, त्वचेचा फिकटपणा किंवा नीलवर्णता, गदाकृती नखे, सूज इ. चिन्हे महत्त्वाची असतात व ती दोन्ही तंत्रांच्या रोगांत आढळू शकतात.


श्वसन तंत्राच्या तपासणीत नाक, कान व घशाची तपासणी, श्वासनालाची (कंठापासून फुप्फुसापर्यंत जाणाऱ्या कूर्चामय व पटलमय नळीची) स्थिती, श्वासोच्छ्‌वासाबरोबर छाती व पोटाच्या हालचाली, श्वासोच्छ्‌वासास पूरक असलेल्या स्‍नायूंच्या हालचाली, छातीच्या आकारातील विकृती व छातीच्या दोन्ही बाजूंच्या हालचालींतील समानता यांचे निरीक्षण केले जाते आणि यांतील काही गोष्टींच्या तपासणीत चाचपणीचा उपयोग केला जातो. त्यानंतर छातीच्या पुढील व मागील बाजूंवर प्रताडन करून डाव्या व उजव्या समान भागांवरील आवाज व स्पर्शाचा तौलनिक अभ्यास केला जातो. श्रवणातही डाव्या व उजव्या समान भागांतही श्वासोच्छ्‌वासाचे व इतर आवाज तुलना करत ऐकणे महत्त्वाचे असते. श्वसन तंत्राच्या रोगाप्रमाणे श्वासोच्छ्‌वासाचे दोन्ही बाजूंना असमान येणारे आवाज, असमान कुजबुज ध्वनी, श्वासमार्गात अडथळे असताना येणारे घर्घर ध्वनी, हवेऐवजी द्रव पदार्थ (पाणी, चिकट लाळेसारखे पदार्थ, पू इ.) हवेच्या पोकळ्यांत साठले असता येणारे गुड्‌गुड् किंवा बुड्बुड ध्वनी व परिफुप्फुसाच्या घर्षणाचे (प्राकृतिक अवस्थेत न येणारे) ध्वनी इ. आवाज श्रवणाच्या तपासणीत आढळतात व त्यांवरून रोगाचा प्रकार, त्याची फुप्फुसांतील व्याप्ती व तीव्रता यांसंबंधी अनुमाने बांधता येतात.

हृदयाभिसरण तंत्राच्या तपासणीमधील निरीक्षणात हृदग्र स्पंदन (हृदयाच्या अग्रावर जाणवणारे स्पंदन) व त्याचे स्थान, सर्वसाधारण छातीवर दिसणारी हृदयाच्या काही भागांची स्पंदने वा थरथर या गोष्टी पाहिल्या जातात. चाचपणीत याच गोष्टी स्पर्शाने जास्त चांगल्या समजू शकतात. प्रताडनात होणाऱ्या आवाजांतील बदलांवरून हृदयाच्या आकार व आकारमान यांसंबंधी कल्पना येऊ शकते, तसेच हृदयाच्या मूळ रोगामुळे फुप्फुसांत सूज असल्यास त्याचीही कल्पना येते.

हृदयाभिसरण तंत्राच्या तपासणीत श्रवण तपासणी फार महत्त्वाची असून हृदयाच्या निरनिराळ्या आवाजांवरून योग्य निष्कर्ष काढणे हे तज्ञ वैद्याचेच काम होय. हृदयाच्या आवाजात प्रामुख्याने झडपांची उघडमीट होतानाचे आवाज व रक्त हृदयातून अनैसर्गिकपणे किंवा अनैसर्गिक वेगाने किंवा अडथळ्यांतून फिरत असता होणारे गुंजनासारखे आवाज सर्वसाधारणपणे रोगनिदानावर बोट ठेवण्याइतके त्या त्या रोगासाठी विशिष्ट असतात.

पोटाच्या तपासणीत पचन तंत्र व संबंधित अवयव, उत्सर्जन तंत्र व जनन तंत्र यांच्या तपासणीचा समावेश होतो. पचन तंत्राच्या रोगांत मळमळ, उलटी, पोटदुखी, मलविसर्जनाच्या सवयींतील बदल (मलावरोध किंवा जुलाब), मलाबरोबर चिकट पदार्थ, रक्त किंवा पू येणे किंवा काळपट तपकिरी मल होणे, भूक मंदावणे किंवा खा-खा सुटणे इ. लक्षणे आढळतात. उत्सर्जन तंत्राच्या रोगांत मूत्र विसर्जनाशी संबंधित तक्रारी, ताप, पोटातील कळ, मळमळ, उलटी, सूज इ. लक्षणे आढळतात.

पोटाच्या तपासणीमधील निरीक्षणात पोटाची श्वासोच्छ्‌वासाबरोबर होणारी हालचाल, पोटाचा सर्वसाधारण आकार, सहज दिसणारी गाठ वा फुगीरपणा इ. पाहिले जाते. पोटाच्या तपासणीत चाचपणी फार महत्त्वाची असते. सर्वसाधारणपणे रोगमुक्त अवस्थेत चाचपणीत पोट हाताला मऊ व स्पर्शाला एकसारखे लागते व कोणतीच विशेष गोष्ट स्पर्शाला जाणवत नाही. यकृत, प्लीहा (पानथरी), वृक्क, मूत्राशय, गर्भाशय इत्यादींच्या नैसर्गिक आकारमानात लक्षणीय वाढ झालेली असल्यासच ते हाताला लागतात किंवा या व इतर अवयवांशी संबंधित अर्बुदे असल्यासच ती हाताला लागतात. आतड्यांच्या मार्गात अडथळा असल्यास अडथळ्याच्या अलीकडील आतड्यांचा भाग फुगतो व मगच आतड्यांची हालचाल दिसते किंवा स्पर्शाला जाणवते. पोटाच्या रोगांत पोटाला स्पर्श करताच प्रथम जाणून घ्यायच्या गोष्टी म्हणजे पोटाचा सर्वसाधारण कठीणपणा किंवा स्पर्श करताच पोटाचा एखादा भाग घट्ट होणे, स्पर्श करताच वेदना होणे व पोटाचे तापमान या होत. यानंतर कोणताही अवयव अनैसर्गिकपणे हाताला लागतो का हे पाहण्यासाठी पोटाच्या निरनिराळ्या भागांची पद्धतशीर चाचपणी केली जाते.  


पोटावर प्रताडन करताना नेहमीच निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळे आवाज ऐकू येतात पण त्यातही अनैसर्गिकपणे वाढलेल्या अवयवावर किंवा अर्बुदांवर येणारे बदललेले आवाज व स्पर्श विशिष्ट असतात. तसेच पर्युदर पोकळीत द्रव साठलेला असल्यास तो रोग्याच्या स्थितीप्रमाणे जागा बदलत राहतो. त्यामुळे रोग्याच्या बदलत्या स्थितीत विशिष्ट प्रकारे प्रताडन करून सरकता बद्द आवाज दर्शवता आल्यास ती जलोदराचे निदान करणारी विशिष्ट खूण ठरते.

पोटावरील श्रवणात मुख्यतः आतड्याच्या क्रमसंकोचामुळे येणारे हवा व द्रव यांचे आवाज ऐकले जातात.

वृक्क, मूत्रवाहिनी व मूत्राशय यांच्या तपासणीत लक्षणांमध्ये पोटातील कळीचे योग्य विश्लेषण करावे लागते. ही कळ सहसा उजव्या किंवा डाव्या एकाच बाजूला असून पाठीत बरगड्यांखाली किंवा पोटाच्या वरच्या भागात येते (वृक्काच्या विकारांत) किंवा पाठीकडून सुरू होऊन पुढे व खाली सरकत जननेंद्रिय व त्याच बाजूच्या मांडीच्या आतील बाजूपर्यंत अन्यत्र वेदनेच्या स्वरूपात पसरते (मूत्रवाहिनीच्या विकारात) किंवा पुढे ओटीपोटात येते (मूत्राशयाच्या विकारांत). काही वेळा ती मूत्रविसर्जन क्रियेशी संबंधित असते किंवा पोटातील कळीबरोबर मूत्रविसर्जन वारंवार करावे लागणे, घाई होणे, आग होणे इ. इतर तक्रारी असू शकतात. या तंत्राच्या तपासणीत नेहमीच्या पद्धतीने केलेल्या पोट व जननेंद्रिय यांच्या तपासणीबरोबरच वृक्क, मूत्रवाहिनी व मूत्राशय यांचे साधे व अंतर्नीला मूत्रद्रोणदर्शन करणारे (भेद दर्शविणारा द्रव अंतर्नीला अंतःक्षेपणाद्वारे वृक्‍क व मूत्रवाहिनी यांत भरून घेतलेले) क्ष-किरण छायाचित्र आणि मूत्रपरीक्षा या तपासण्यांचा अनेक वेळा वापर करावा लागतो.

तंत्रिका तंत्राच्या (मज्जासंस्थेच्या) तपासणीत, मेंदूची उच्च पातळीवरील कार्ये (उदा., बुद्धी, भाषा, स्मरणशक्ती, दिक्‌स्थितीचे भान इत्यादी), मस्तिष्क तंत्रिका व ज्ञानेंद्रियांचे कार्य, संवेदनावाहक व प्रेरक तंत्रे, प्रतिक्षेपी क्रिया, अंगस्थिती, तोल व सावधपणा इ. दृष्टींनी, विशिष्ट पद्धतीने, निरीक्षण व चाचपणी यांची सांगड घालत तपासणी करावी लागते.

स्त्रीरोग व प्रसूतिवैज्ञानिक निदानामध्ये वैद्यकीय इतिहासात मासिक पाळी, गरोदरपणा व बाळंतपणाशी संबंधित असलेल्या इतिहासावर भर दिला जातो. मूल होण्याच्या वयात केव्हाही शेवटचा ऋतुकाल, कुटुंबनियोजन साधनांचा/गोळ्यांचा वापर किंवा अंडवाहिनी छेदन शस्त्रक्रिया यासंबंधीची माहिती महत्त्वाची असते. प्रत्यक्ष तपासणीत पोटाची नेहमीच्या पद्धतीने केलेली तपासणी, जननेंद्रिय व योनिमार्ग यांचे निरीक्षण व दोन्ही हातांचा वापर करून केलेली श्रोणिभागातील अवयवांची चाचपणी यांवर भर देण्यात येतो. गरोदरपणाच्या काळात गर्भाशयाची विशिष्ट कालखंडातील नियमित वाढ, गर्भाची अवस्था व गर्भाशयातील स्थिती, गर्भाची हालचाल व त्याच्या हृदयाचे ठोके श्रवण करणे या पद्धतीने तपासणी करण्यात येते.

 

मानसिक रोगांच्या निदानासाठी मानसरोगतज्ञाकडून विशिष्ट पद्धतीने केलेली मानसशास्त्रीय तपासणी महत्त्वाची असते परंतु त्याआधी मानसिक विकाराच्या मुळाशी काही शारीरिक रोग आहे का हे ठरवावे लागते व त्यासाठी नेहमीच्या पद्धतीने संपूर्ण शारीरिक व विशेषतः तंत्रिका तंत्राची तपासणी करावी लागते. [⟶ मानसचिकित्सा].


भौतिक आघातांमुळे होणारे अपघात, विषबाधा किंवा इतर कोणत्याही रोगांत उद्‌भवणारी आणीबाणीची परिस्थिती यांमध्ये जीव वाचविण्यासाठी किंवा धोका टळून रोगजन्य परिस्थिती आटोक्यात येण्यासाठी त्वरित उपचार सुरू होणे महत्त्वाचे असते. त्यासाठी कमीत कमी आवश्यक वेळात जास्तीत जास्त अचूक निदान करावे लागते. अशा वेळी जगण्यास आवश्यक असलेल्या अवयवांचे (जैव अवयव उदा., हृदय, फुप्फुसे, मेंदू इ.) कार्य व रोग्याची सर्वसाधारण स्थिती समजण्यासाठी आवश्यक अशी त्वरित तपासणी करून अग्रक्रमाच्या गोष्टी ठरवाव्या लागतात आणि त्यानुसार जीव वाचविणारे, सर्वसाधारण स्थितीत सुधारणा घडविणारे व जास्त महत्त्वाच्या आढळलेल्या गोष्टींवरील उपचार त्वरित सुरू करावे लागतात. त्यानंतर आवश्यकतेप्रमाणे व सवड मिळाल्यावर पूर्ण तपासणी करून इतर उपचार केले जातात. कोणत्याही कारणामुळे उद्‌भवलेल्या आणीबाणीच्या परिस्थितीत काही महत्त्वाचे उपचार एकसारखेच असतात आणि ते पूर्ण रोगनिदानाच्या आधीच सुरू केले जातात. त्यासाठी फक्त, अशी आणीबाणीची परिस्थिती आहे, इतकेच निदान पुरेसे होते. हे उपचार म्हणजे श्वासोच्छ्‌वासाचा मार्ग मोकळा ठेवणे, रोग्याला कुशीवर किंवा पालथे झोपवणे व त्याच्या पायांची बाजू वर करणे, हृदयाचे ठोके, नाडी व रक्तदाबावर लक्ष ठेवणे, प्रसंगी कृत्रिम श्वासोच्छ्‌वास व हृदयमर्दन करून कृत्रिम हृदयाभिसरण सुरू ठेवणे व जरूरीप्रमाणे अंतर्नीला द्रवोपचार सुरू करणे वगैरे होत. तसेच सर्व पोटातून होणाऱ्या विषबाधांसाठी पोटात नळी घालून जठर धुणे आणि चिन्हे आणि इतर तपासण्यांवरून कशाची विषबाधा झाली हे ठरवून त्वरित योग्य उताऱ्याच्या औषधांचा उपयोग करणे हे सर्वसाधारण तत्त्व अमलात आणले जाते.

याप्रमाणे रोग्याच्या तक्रारी, त्याचा वैद्यकीय इतिहास, संपूर्ण वैद्यकीय तपासणी करून वैद्याने मिळविलेली वस्तुनिष्ठ माहिती आणि वैद्याचे शिक्षण व पूर्वानुभव यांची सांगड घालून तात्पुरते रोगनिदान करता येते.

 

इतर तपासण्या : वरील प्रकारच्या पद्धतशीर वैद्यकीय तपासणीनंतर प्राथमिक उपचार सुरू करण्यास उपयुक्त असे तात्पुरते रोगनिदान होते परंतु निश्चित रोगनिदानासाठी किंवा रोग्याची सर्वसाधारण अवस्था कळण्यासाठी आणखी माहितीची आवश्यकता असते. त्यासाठी पायरी पायरीने इतर तपासण्या कराव्या लागतात. प्राथमिक तपासण्यांपासून खूप गुंतागुंतीच्या, विशेष प्रकारच्या आणि विशिष्ट रोगांच्या निदानासाठी विशिष्ट अशा अनेक प्रकारच्या तपासण्या आहेत. त्यांचे सोयीसाठी व ज्या टप्प्यांनी त्यांचा रोगनिदानासाठी उपयोग होतो त्याप्रमाणे वर्गीकरण केले आहे पण हे वर्गीकरण स्थूल व परस्परव्यापी आहे.

 

सर्वसाधारण तपासण्या : यात रोग्याच्या सर्वसाधारण अवस्थेची माहिती देणाऱ्या रक्त, मूत्र, मल व थुंकी यांवरील प्रयोगशाळेतील काही तपासण्या आणि साधे छातीचे किंवा पोटाचे क्ष-किरण छायाचित्र यांचा समावेश होतो.

 

चाळणी तपासण्या : एखाद्या समाजात एखाद्या रोगाचा मोठ्या प्रमाणात आढळ होत असल्यास, एखाद्या गंभीर रोगाचा रोगी प्राथमिक व आजारी नसलेल्या अवस्थेत शोधून काढायचा असल्यास किंवा समाजस्वास्थ्याच्या दृष्टीने एखाद्या रोगाचा रोगी शोधून काढणे जरूरीचे असल्यास समाजातील शक्य तितक्या सर्व व्यक्तींची, रोगाचा जास्त धोका असलेल्या समाजातील भागाची किंवा विशिष्ट प्राथमिक लक्षणे दाखवणाऱ्या सर्व रोग्यांची विशिष्ट प्रकारची सरसकट तपासणी केली जाते. त्यातून संशयित रोगी शोधून त्यांच्याकडे निदान व उपचारांच्या दृष्टीने जास्त लक्ष पुरवता येते. उदा., तापाच्या सर्व रोग्यांच्या रक्ताची हिवतापाच्या परजीवींसाठी (दुसऱ्या जीवांवर उपजीविका करणाऱ्या जीवांसाठी) तपासणी, खोकल्याच्या सर्व किंवा रुग्णालयात कोणत्याही रोगांसाठी येणाऱ्या सर्व रोग्यांच्या छातीचे छोटे क्ष-किरण छायाचित्र आणि/किंवा क्षयरोगाच्या जंतूंसाठी थुंकीची तपासणी, उपदंशासाठी रक्ततपासणी, रक्तदानासाठी येणाऱ्या व्यक्तींच्या बाबतीत रक्तातून पसरणाऱ्या रोगांच्या विशेष तपासण्या, चाळीस वयावरील सर्व स्त्री-रोगांच्या गर्भाशय ग्रीवेच्या (मानेसारख्या भागाच्या) अस्तराची कर्करोगासाठी तपासणी वगैरे.


चाळणी तपासण्यांची उपयुक्तता त्यांची उपलब्धता, खर्च करण्याची पद्धत, तपासणीतील चुकांचे प्रमाण व मर्यादा आणि त्यांतून मिळणाऱ्या माहितीचे महत्त्व इ. अनेक गोष्टींवरून ठरते.

विशेष तपासण्या : सर्वसाधारण व विशेष तपासण्या यांतील सीमारेषा पुसट आहे. काही तपासण्या विशिष्ट रोगासाठी व म्हणून विशेष असल्या, तरी काही वेळा त्या सर्वसाधारण किंवा चाळणी तपासण्या म्हणूनही वापरल्या जातात. उदा., रक्तातील ग्‍लुकोजचे प्रमाण ठरवणारी मधुमेहाचे निदान करणारी म्हणून विशिष्ट असली, तरी कित्येक वेळा, विशेषतः रोगी प्रौढ असेल, तर ती सर्वसाधारण किंवा चाळणी तपासणी म्हणूनही केली जाते. कारण मधुमेहामुळे इतर सर्व रोगांत व त्यांच्या उपचारातही गुंतागुंत निर्माण होत असल्याने रोग्याला मधुमेह आहे का नाही हे ठरविणे या वयोगटात आवश्यक असते किंवा उलट काही सर्वसाधारण तपासण्याही निदाननिश्चिती करू शकत असल्याने त्या संदर्भात त्यांना विशेष तपासणी म्हणता येईल. उदा., रक्ताच्या सर्वसाधारण तपासणीतच रक्ताचा कर्करोग किंवा हिवताप इत्यादींचे निदान होऊ शकते. म्हणून साधारणपणे रोगविशिष्ट, गुंतागुंतीच्या, विशेष उपकरणांची आवश्यकता असलेल्या, त्या करण्यासाठी कुशल किंवा तज्ञ व्यक्तीची आवश्यकता असलेल्या व खर्चिक तपासण्यांना विशेष तपासण्या म्हणता येईल.

या तपासण्यात (अ) प्रयोगशाळेतील तपासण्या, (आ) क्ष-किरण तपासणी, (इ) श्राव्यातीत ध्वनी प्रतिमादर्शन, (ई) किरणोत्सर्गी (भेदक कण वा किरण बाहेर टाकणाऱ्या) लवणांचा उपयोग, (उ) इतर तरंगांचा वा तंत्रांचा वापर करून केलेले वैद्यकीय प्रतिमादर्शन, (ऊ) अंतर्दर्शन, (ए) शरीरांतर्गत नैसर्गिक विद्युत् प्रवाहांचे आलेखन, (ऐ) इतर तपासण्या व (ओ)  रोगनिदानासाठी शस्त्रक्रियेचा उपयोग इत्यादींचा समावेश करता येईल.

प्रयोगशाळेतील तपासण्या : शरीरातून बाहेर पडणाऱ्या किंवा मुद्दाम मिळविलेल्या सर्व पदार्थांच्या [उदा., रक्त, मूत्र, मल, थुंकी, पर्युदर पोकळीतील द्रव, परिफुप्फुस पोकळीतील द्रव, मस्तिष्क-मेरुद्रव (मेंदू व मेरुरज्जू यांतील पोकळ्यांत असणारा द्रव), अस्थिमज्जा (लांब हाडांच्या पोकळ्यांत असणारा पदार्थ), पू, वीर्य, स्त्री-जननेंद्रियातील-योनिमार्गातील व गर्भाशय ग्रीवेतील-स्त्राव इत्यादी] प्रयोगशाळेत केल्या जाणाऱ्या तपासण्यांचा यात समावेश होतो. या अनेक प्रकारच्या असून वरील पदार्थांचे निरनिराळे गुणधर्म तपासण्यात व त्यावरून बऱ्याच वेळा निदाननिश्चिती करण्यास यांचा उपयोग होतो. या तपासण्यांसंबंधी तपशीलवार माहिती ‘विकृतिविज्ञान, उपरुग्ण’ या नोंदीत दिली आहे.

क्ष-किरण तपासणी : शरीराच्या एका बाजूने सोडलेले व शरीरातून आरपार जाऊन दुसऱ्या बाजूने बाहेर पडणारे क्ष-किरण अनुस्फुरक काचेवर (एखाद्या विशिष्ट तरंगलांबीच्या किरणांचे शोषण करून जास्त तरंगलांबीच्या दृश्य प्रकाशाचे उत्सर्जन करणाऱ्या द्रव्याचा थर दिलेल्या काचेवर) पहाणे किंवा छायाचित्रण फिल्मवर त्यांच्या साहाय्याने मिळणारी प्रतिमा पाहणे हे या तपासणीचे तत्त्व आहे. शरीरातील निरनिराळे अवयव व भाग क्ष-किरणांना कमी-अधिक पारदर्शक असल्याने त्याप्रमाणे छायाचित्रात ते कमी-अधिक तीव्रतेने दिसतात. आवश्यकतेप्रमाणे शरीराच्या निरनिराळ्या भागांची व विविध तांत्रिक गोष्टींचा उपयोग करून क्ष-किरण छायाचित्रे घेता येतात. या तांत्रिक गोष्टींत प्रतिमा प्रखर करणे, क्ष-किरणांना अपारदर्शक असलेल्या विद्रावांचा (उदा., बेरियम, कॅल्शियम, आयोडीन इत्यादींच्या लवणाच्या विद्रावांचा) उपयोग करून मुद्दाम विरोधाभास वाढविणे, संगणकाच्या मदतीने त्रिमितीय किंवा विशिष्ट पातळ्यांवरील छेद प्रतिमा मिळविणे वगैरेंचा समावेश होतो. अन्नमार्ग, यकृत, वृक्क, अवटू ग्रंथी, मूत्रवाहिन्या, रक्तवाहिन्या इत्यादींची विरोधाभास वाढविण्याच्या तंत्राने तपासणी करता येते. [⟶ क्ष-किरण वैद्यक].


 श्राव्यातीत ध्वनी प्रतिमादर्शन : यात क्ष-किरणांऐवजी विशिष्ट कमी तरंगलांबीचे व उच्च कंप्रतेचे श्राव्यातीत ध्वनी तरंग शरीरात सोडतात. ते निरनिराळ्या खोलीवरील अवयवांच्या पृष्ठभागांवरून परावर्तित होऊन आल्यावर ग्रहण केले जातात व त्यांच्यापासून संगणकाच्या मदतीने त्या पातळीवरील शरीराच्या छेदाचे चित्र मिळविले जाते. अशा चित्रांचा चलत् चित्रपट चुंबकीय फितीवर मुद्रित करता येतो व दूरचित्रवाणी पडद्यावर पाहाता येतो. तसेच महत्त्वाच्या टप्प्यांची छायाचित्रेही मिळविता येतात. यांचा अभ्यास करून रोगनिदान करता येते. जास्त तीव्रतेचे व जास्त वेळ वापरलेले क्ष-किरण शरीराला व मुख्यतः गर्भारपणाच्या काळात गर्भाला अपायकारक असतात. याउलट ध्वनितरंग अपायकारक नसल्याने या प्रकारची तपासणी एरवी व गर्भारपणाच्या काळातही सुरक्षित व जास्त उपयुक्त असते. [⟶ श्राव्यातीत ध्वनिकी].

 

किरणोत्सर्गी लवणांचा उपयोग : काही मूलद्रव्यांची लवणे शरीरात विशिष्ट अवयवांत मोठ्या प्रमाणात सांद्रित (एकत्रित) केली जातात. याचा उपयोग करून याच मूलद्रव्यांच्या पाण्यात विद्राव्य व किरणोत्सर्गी असलेल्या लवणांचे विद्राव रक्तात सोडतात आणि ते विशिष्ट अवयवांत सांद्रित झाल्यावर काढलेल्या छायाचित्रात ते अवयव ‘दृश्य स्वरूपात’ दिसतात किंवा ठराविक काळानंतर झालेले त्यांचे सांद्रण गायगर गणित्रासारख्या [⟶ कण अभिज्ञातक] साधनाने मोजता येते. [⟶ वैद्यकीय प्रतिमादर्शन].

इतर तरंगांचा वा तंत्रांचा उपयोग करून केलेले वैद्यकीय प्रतिमादर्शन : यामध्ये अंकीय क्ष-किरण चित्रणात अंकीय वर्जन रक्तवाहिनी दर्शन, क्ष-किरण संगणनित छेद-प्रतिमादर्शन, अणुकेंद्रीय चुंबकीय अनुस्पंदन (किंवा चुंबकीय अनुस्पंदन) प्रतिमादर्शन, उत्सर्जन छेद-प्रतिमादर्शन, ⇨सिंक्रोट्रॉन प्रारण प्रतिमादर्शन वगैरे तंत्रांचा अंतर्भाव होतो. या विविध तंत्रांच्या सहाय्याने मिळणाऱ्या प्रतिमांचे निरीक्षण करून शरीररचना, ऊतकांची (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांच्या समूहांची) संरचनात्मक वैशिष्ट्ये, वाहिन्यांतील प्रवाह, विरोधाभासदर्शक द्रव्याची हालचाल, चयापचय इत्यादींचा रोगनिदानाच्या दृष्टीने अभ्यास करता येतो. या तंत्रांची तत्त्वे, प्रतिमा मिळविण्याच्या पद्धती, त्यांचे गुणदोष वगैरे बाबींची अधिक माहिती ‘वैद्यकीय प्रतिमादर्शन’ या नोंदीत दिलेली आहे.

अंतर्दर्शन : शरीरातील पोकळ्यांत किंवा पोकळ अवयवांत निरनिराळ्या प्रकारच्या विशिष्ट बनावटीची दर्शक उपकरणे सरकवून आतील अवयवांचे किंवा अवयवाच्या आतील पृष्ठभागाचे प्रत्यक्ष निरीक्षण (उदा., पर्युदर पोकळी, परिफुप्फुस पोकळी, दोन सांध्यांमधील पोकळी इ. शरीरांतर्गत पोकळ्या आणि अन्ननलिका, जठर, लहान आतड्याचा काही भाग, मोठे आतडे, मूत्राशय, गर्भाशय इ. पोकळ अवयवांचे आतील पृष्ठभाग यांचे प्रत्यक्ष निरीक्षण) करण्याच्या पद्धतीला अंतर्दर्शन असे म्हणतात. यात सरळ, न वाकणारी किंवा वाकू शकणारी विशिष्ट प्रकारची व प्रकाशीय तंतूंचा उपयोग केलेली दर्शक उपकरणे प्रसंगानुसार वापरली जातात. या उपकरणांना अंतर्दर्शक म्हणतात [⟶ परिदर्शक]. या पद्धतीच्या तपासण्यांमुळे शरीररचनेत कमीत कमी ढवळाढवळ करून व अगदी लहान शस्त्रक्रिया करून अंतर्गत अवयवांचे प्रत्यक्ष निरीक्षण करणे, पोकळ अवयवांचे आतील पृष्ठभाग तपासणे व जरूरीप्रमाणे ⇨जीवोतक परीक्षेसाठी (जिवंत शरीरातून घेतलेल्या ऊतकांच्या तपासणीसाठी) अवयवांचे छोटे तुकडे मिळविणे शक्य झाले आहे. शिवाय काही प्रकारच्या छोट्या शस्त्रक्रिया (उदा., स्त्रियांतील अंडवाहिनी छेदन शस्त्रक्रिया, छोट्या गाठी काढणे इ.) व काही गुंतागुंतीच्या मोठ्या पण सूक्ष्म शस्त्रक्रियाही (उदा., बंद झालेल्या अंडवाहिनीवरील शस्त्रक्रिया) या पद्धतीच्या साहाय्याने करता येतात किंवा या पद्धतीने रोगनिदान झाल्यावर पुढील मोठी शस्त्रक्रिया कधी व कशा प्रकारे करावी याविषयी आराखडा ठरविता येतो.


शरीरांतर्गत नैसर्गिक विद्युत् प्रवाहांचे आलेखन : हृदय, मेंदू व स्‍नायू यांमध्ये नैसर्गिकपणे सतत, सूक्ष्म प्रमाणात विद्युत् प्रवाह वाहात असतात आणि ते या  अवयवांच्या कार्याशी संबंधित असतात. त्यांचे विशिष्ट पद्धतीने विशिष्ट उपकरणांच्या (उदा., विद्युत् हृल्लेखक, विद्युत् मस्तिष्कालेखक, विद्युत् स्‍नायुलेखक) साहाय्याने आलेखन करता येते. या आलेखांवरून या अवयवांच्या रचनेतील व कार्यातील दोष शोधता येतात. [⟶ विद्युत् हृल्लेखन विद्युत् मस्तिष्कालेखन].

इतर तपासण्या : वरील प्रकारांत समावेश करता न येणाऱ्या विशिष्ट प्रकारच्या काही तपासण्या त्या त्या विशिष्ट वैद्यकीय शाखांमध्ये वापरल्या जातात (उदा., श्रवणमापन, दृष्टिक्षेत्र मापन, रंगांधत्वासाठी तपासण्या, दृक्‌पटलदर्शन, डोळ्यातील अंतर्दाबाचे मापन, ॲलर्जीला कारणीभूत असलेल्या कारकाचा शोध घेण्यासाठी तपासणी वगैरे).  

रोगनिदानासाठी शस्त्रक्रियेचा उपयोग : इतर तपासण्यांसाठी शरीरातील द्रव किंवा ऊतके मिळविण्यासाठी बऱ्याच वेळा लहानमोठ्या शस्त्रक्रियेचा उपयोग करावा लागतो. उदा., (१) शरीरातील निरनिराळ्या पोकळ्यांतील नैसर्गिक असलेला पण अनैसर्गिक बनलेला किंवा अनावश्यकपणे साठलेला द्रव त्या त्या पोकळीत सुई टोचून तपासणीसाठी मिळवणे. उदा., परिफुप्फुस पोकळी व पर्युदर पोकळी यांतील द्रव, मस्तिष्क-मेरुद्रव, उल्बद्रव (भ्रूणाभोवतील पातळ कोशिकामय थराने बनलेल्या पिशवीतील द्रव) व रोहिणीतील किंवा नीलेतील रक्त या प्रकारे मिळवावे लागतात. (२) जाड सुई अवयवात टोचून सुईच्या पोकळीत मिळणारा ऊतकाचा तुकडा सूक्ष्मशारीरविकृतिवैज्ञानिक तपासणीसाठी मिळविणे. उदा., यकृत, मूत्रपिंड व अस्थिमज्‍जा यांची जीवोतक परीक्षा. (३) पृष्ठभागावरील कोशिकांचे थर मिळविण्यासाठी पृष्ठभाग खरवडणे. उदा., कुष्ठरोग व इतर त्वचारोगांसाठी त्वचा, श्लेष्मकला (अन्नमार्ग, श्वसनमार्ग वगैरेंच्या अस्तराचा पातळ बुळबुळीत थर), गर्भाशय ग्रीवा आणि गर्भाशय अंतःस्तर याप्रमाणे खरवडून जीवोतक परीक्षेसाठी पदार्थ मिळविला जातो. (४) केवळ शरीरांतर्गत अवयवाचा तुकडा जीवोतक परीक्षेसाठी मिळविण्यासाठी छोटी शस्त्रक्रिया करणे. उदा., लसीका ग्रंथी जीवोतक परीक्षा. (५) इतर सर्व मोठ्या शस्त्रक्रियांमध्येही जरूर असल्यास एखाद्या अवयवाचा तुकडा जीवोतक परीक्षेसाठी मिळविला जातो. तसेच बहुधा काढून टाकलेला शरीराचा भाग किंवा अवयव सूक्ष्मशारीरविकृतिवैज्ञानिक तपासणीसाठी पाठविला जातो.  

 

आणीबाणीच्या परिस्थितीत इतर प्रकारांनी निदान करण्याचा प्रयत्‍न करून वेळ घालविण्याऐवजी, उपाय शस्त्रक्रियेच्या स्वरूपातील असल्यास त्वरित शस्त्रक्रिया केली जाते. त्यामुळे प्रत्यक्ष अंतर्गत वस्तुस्थिती पाहून त्वरित व अचूक रोगनिदान करता येते आणि लगेच उपचारही करता येतात. उदा., शरीरांतर्गत रक्तस्त्राव होत असल्याची चिन्हे दिसत असल्यास शक्य तितक्या लवकर शस्त्रक्रिया करून रक्तस्त्रावाचे कारण व मूल ठिकाण शोधले जाते आणि लगेच रक्तस्त्राव थांबविण्याचे उपाय केले जातात.  

तातडी नसलेल्या परंतु ज्यांच्यावरील उपचार शस्त्रक्रियेने करावयाचे आहेत अशा रोगांचे निदान करण्यासाठीही किंवा सर्व प्रकारच्या तपासण्यांनंतरही निदान निश्चित होत नाही अशा परिस्थितीत शस्त्रक्रिया करून, रोगग्रस्त अवयव प्रत्यक्ष पाहून व हाताळून निदान केले जाते. त्याच वेळी आवश्यतकतेनुसार अवयवाचा छोटा तुकडा गोठवून जीवोतक परीक्षा करण्यास पाठविला जातो. त्याचा निष्कर्ष त्वरित पाहून पुढील शस्त्रक्रिया उपचारासाठी केली जाते किंवा उपचार म्हणून शस्त्रक्रिया करून नंतर जरूरीप्रमाणे काढलेला अवयव किंवा त्याचा भाग सूक्ष्मशारीरविकृतिवैज्ञानिक तपासणीसाठी पाठविला जातो. 


क्वचित प्रसंगी उपचार म्हणून शस्त्रक्रियेची जरूर नाही किंवा शस्त्रक्रिया करता येणार नाही अशी परिस्थिती आढळल्यास निदानाच्या पायरीपर्यंतच शस्त्रक्रिया थांबविली जाते व पुढील उपचार औषधांनी किंवा इतर पद्धतीने केले जातात. 

अंतर्दर्शन व तपासण्यांचे इतर काही प्रकारही लहान शस्त्रक्रिया या स्वरूपातच मोडतात. आधुनिक अंतर्दर्शन तंत्रांमुळे केवळ निदानासाठी मोठी शस्त्रक्रिया करण्याची जरूरी राहात नाही व जीवोतक परीक्षेसाठी ऊतकांचे नमुनेही मिळविता येतात. यामुळे उपचार शस्त्रक्रियेने होण्यासारखे नसताना, केवळ निदानासाठी अनावश्यकपणे मोठी शस्त्रक्रिया (शस्त्रक्रियेची अनावश्यकता निदान होईपर्यंत माहीत नसते) करावी लागणे यासारखी परिस्थिती टाळता येते.  

वरील प्रकारे वैद्यकीय तपासणी व इतर तपासण्यांच्या मदतीने बहुतेक वेळा अचूक व अंतिम रोगनिदान होऊ शकते आणि त्याप्रमाणे विशिष्ट उपचार करून रोगी बरा करता येतो.  

 

व्यवच्छेदक रोगनिदान : रोग्याचा वैद्यकीय इतिहास आणि रोग्याची तपासणी यांमधून मिळणारी माहिती अनेक वेळा एकापेक्षा अधिक रोगांना लागू पडण्याची शक्यता असते म्हणजेच रोग्याला यांपैकी कोणताही रोग असण्याची शक्यता असते. तसेच थोड्याफार फरकाने एकसारखी लक्षणे दाखविणारे अनेक रोग असू शकतात व एकाच रोगाची निरनिराळ्या रोग्यांत तीव्रता, व्याप्ती व गुणांच्या दृष्टीने सूक्ष्मपणे वेगवेगळी लक्षणे दिसू शकतात. म्हणून निदान करताना इतर तत्सम लक्षणे दाखविणाऱ्या रोगांची शक्यता गृहीत धरावी लागते. ही सर्व शक्य असलेली निदाने म्हणजेच व्यवच्छेदक रोगनिदाने होत. अशा वेळी मिळालेल्या माहितीचे काटेकोर विश्लेषण करून जास्तीत जास्त शक्य असलेल्या रोगाला तात्पुरते रोगनिदान ठरवून त्याप्रमाणे उपचार सुरू करण्यात येतात परंतु इतर सर्व शक्यता कायम गृहीत धरण्यात येतात. पुढे अनेक टप्प्यांवर तपासण्या करताना इतर एक एक शक्यता नाहीशा होतात व एकच रोगनिदान जास्त-जास्त पक्के होत जाते. हे पहिल्या व तात्पुरत्या रोगनिदानापेक्षा वेगळे निघाल्यास त्याप्रमाणे उपचार बदलण्यात येतात.  

एकापेक्षा जास्त रोग एकाच वेळी झालेले असल्यास मिश्र व गुंतागुंतीची माहिती मिळते व निदान करणे आणखी अवघड बनते. अशा वेळी निदानाच्या अनेक शक्यता गृहीत धरून अनेक पातळ्यांवर एकाच वेळी किंवा टप्प्या-टप्प्याने उपचार करता येतात.  

फलानुमान : रोगनिदानाच्या वेळी रोगाची त्या वेळची अवस्था कळते. या अवस्थेतून पुढे रोग कोणकोणत्या अवस्थांतून जाईल, रोगापासून कोणकोणते उपद्रव घडून येण्याची शक्यता आहे, सध्याच्या अवस्थेत उपचार सुरू केल्यास रोगाचा हा संभाव्य मार्ग बदलता येईल का व उपद्रव टाळता येतील का आणि उपचारांचे परिणाम काय होतील इ. प्रकारे रोगाच्या भवितव्याविषयी रोगनिदानाच्या वेळी केलेल्या अंदाजांना ‘फलानुमान’ असे म्हणता येईल. वैद्यकातील वर्षानुवर्षाचा संचित अनुभव व ज्ञान यांवरून त्या त्या रोगाचे त्या त्या अवस्थेतील फलानुमान ठरविता येते.


रोगनिदानाच्या वेळी केलेले फलानुमान व काही कालावधीनंतर दिसणारी रोगाची प्रत्यक्ष अवस्था यांचा तौलनिक अभ्यास करून व पुनर्विचार करून पुढील उपचारांची दिशा ठरविता येते व नवे फलानुमान ठरविता येते. यावरून रोगनिदान करणे, फलानुमान ठरविणे, उपचार करणे, उपचारांचे प्रत्यक्ष परिणाम फलानुमानाशी ताडून बघणे, पुनर्विचार करून पुनर्निदान करणे, नवे फलानुमान ठरविणे व पुढील उपचार सुरू करणे, हे एकाच क्रियाशील प्रक्रियेचे भाग आहेत असे म्हणता येईल.

  

निरनिराळ्या महत्त्वाच्या विशिष्ट रोगांचे फलानुमान त्या त्या रोगावरील नोंदीत दिलेले आहे.  

 

शवविच्छेदन : अपघात, विषबाधा अथवा इतर कारणांमुळे अपमृत्यू आल्यास किंवा समाधानकारक रोगनिदान होण्यापूर्वीच (आणि म्हणून पुरेशा आणि योग्य उपचारांअभावी) मृत्यू आल्यास अंतिम रोगनिदान करण्यासाठी व मृत्यूचे कारण समजण्यासाठी  शवविच्छेदन केले जाते. त्यात शरीराचे सर्व भाग उघडून आतील अवयवांची स्थूल तपासणी करण्यात येते अवयवांचे छेद घेऊन रोगग्रस्त भाग पाहाण्यात येतात या भागांचे छोटे तुकडे पुढील सूक्ष्मशारीरविकृतिवैज्ञानिक तपासण्यांसाठी पाठविण्यात येतात व निरनिराळ्या भागातील द्रवांचे नमुने ते रासायनिक, जीवरासायनिक, भौतिक, प्रतिरक्षावैज्ञानिक व सूक्ष्मजंतुवैज्ञानिक तपासण्यांसाठी पाठविण्यात येतात. 

या तपासणीवरून अपमृत्यूमध्ये मृत्यू अपघाती स्वरूपाचा, विषबाधेमुळे आणि आत्महत्या किंवा खून आहे यासंबंधी अंदाज वर्तविता येतो आणि मृत्यूचे कारण व आनुषंगिक परिस्थिती समजल्याने पुढे योग्य त्या कायदेशीर तरतुदी करणे शक्य होते. इतर रोगांमुळे मृत्यू आलेला असल्यास शवविच्छेदनाने अंतिम रोगनिदान करता येतेच परंतु वैद्यकीय ज्ञानात भर पाडणारी, रोगाचे स्वरूप, त्याचा फैलाव, त्यामुळे शरीरात व अवयवांत घडलेले बदल व मृत्युजन्य परिस्थिती उद्‌भवण्याची कारणे इ. बहुमोल माहिती उपलब्ध होते. या माहितीचा त्या रोग्याला उपयोग होण्यासारखा नसला, तरी इतर तत्सम रोग झालेल्या रोग्यांना फायदा होतो. या दृष्टीने रोगनिदानासाठी शवविच्छेदनाचे महत्त्व फार मोठे आहे. 

 

मर्यादा व भावी विकास : रोग व त्यासंबंधीच्या नवीन नवीन गोष्टी समजत गेल्या तसे तसे वैद्यक हे शास्त्र झाले आणि रोगनिदान अधिक गुंतागुंतीचे पण अधिकाधिक परिपूर्ण होत गेले. पूर्वज्ञान, अनुभव व वस्तुस्थितीवर नवीन प्रकाश पाडणारे शोध यांतून रोगनिदानाची पद्धत आजपर्यंत विकसित होत आली. आतापर्यंतच्या काळात प्रत्यक्ष वैद्यकशास्त्रात व भौतिकी, रसायनशास्त्र, जीवरसायनशास्त्र, सूक्ष्मजंतुविज्ञान, जीवभौतिकी, प्राणिविज्ञान, वनस्पतिविज्ञान वगैरे विज्ञानांच्या इतर क्षेत्रांत लागलेल्या शोधांचा व प्रगतीचा प्रत्यक्षाप्रत्यक्ष उपयोग वैद्यकशास्त्रात निदानासाठी व उपचारांसाठी मोठ्या प्रमाणावर केला गेला आहे. पुढेही सर्व विज्ञानाच्या शाखांत नवे नवे शोध लागतील व वस्तुस्थितीवर नवा प्रकाश पडेल त्याप्रमाणे रोगनिदानाची पद्धत विकसित होईल, तिची अचूकता वाढेल व अपूर्णता कमी होईल.

या दृष्टीनेही रोगनिदान ही तात्कालिक दृष्टीने नेहमीच अपूर्ण पण कायम प्रगतिशील अशी सतत चालणारी प्रक्रिया आहे. 

संदर्भ : 1. Clendening, L. Hashinger, E. H. Methods of Diagnosis, St. Louis, 1947.

           2. Conn, H. F. and others, Ed., Current Diagnosis, Philadelphia, 1966.

           3. DeGowin, E. L. and R. L. Bedside Diagnostic Examination, New York, 1969.

           4. Feinstein, A. R. Clinical Judgement, Baltimore, 1967.

           5. Jacquez, J. A. Ed., Diagnostic Process, 1964.

           6. Krapp, M. A.  Chaton, M. J., Ed, Current Medical Diagnosis and Treatment, Los Altost Calif, 1983.

           7. Macleod,  M., Ed., Clinical Examination, Edinburgh, 1983.

           8. Major, R. H. (Ed. By Delp, M. H. Manning, R. T.), Major’s Physical Diagnosis, Philadelphia, 1968.

           9. Morgan. W. L. Engel, G. L. The Clinical Approach to the Patient, Philadelphia, 1969.

         10. Swash, M. Mason, S. Hutichison’s Clinical Methods, Eastbourne, 1984.

         11. Todd, J. C. Sanford, A. H. (Ed. By Davidsonn, I. Henry, J. B.), Clinical Diagnosis by Laboratory Methods, Philadelphia, 1969.

प्रभुणे, रा. प.