कुमारस्वामी, आनंद केंटिश : (२२ ऑगस्ट १८७७–८ सप्टेंबर १९४७). पौर्वात्य कलांचे जगप्रसिद्ध संशोधक आणि विद्वान भाष्यकार. जन्म श्रीलंकेतील कोलंबो येथे. त्यांचे वडील मुत्तू कुमारस्वामी हे ‘नाइट’ हा किताब मिळविणारे आशियातील पहिले गृहस्थ होते. त्यांची आई एलिझाबेथ क्ले बीबी ही सनातन इंग्रजी कुटुंबातील होती.

डॉ. आनंद कुमारस्वामी

आनंद कुमारस्वामी यांचे सर्व शिक्षण इंग्लंडमध्ये झाले. शैक्षणिक जीवनात एक अत्यंत हुषार विद्यार्थी म्हणून ते चमकले. एक अत्यंत नाणावलेले भूगर्भशास्त्रज्ञ म्हणून गाजले. नंतर श्रीलंकेच्या खनिजविज्ञान सर्वेक्षण संस्थेचे संचालक म्हणून त्यांनी काम केले. (१९०३–०६). या तीन वर्षांच्या संशोधनकार्यानंतर ते पौर्वात्य सांस्कृतिक परंपरेच्या अभ्यासात सर्वस्वाने रस घेऊ लागले. त्या दृष्टीने आशियाई भव्य कला, कारागिरी, वास्तुशिल्प, धर्मशास्त्र, सौंदर्यशास्त्र, अध्यात्म या विषयांत त्यांचे मन दिवसेंदिवस तल्लीन होऊ लागले. हा त्यांच्या युगप्रवर्तक जीवनाचा आरंभ होता. एखाद्या पुराणॠषीप्रमाणे कुमारस्वामींनी आपले जीवन सर्वस्व बौद्ध व हिंदू परंपरांची रंगचित्रे, शिल्प, वास्तू, लेखनकला, हस्तलिखिते आणि कारागिरीच्या वस्तू यांचे संदर्भ लावण्यात व त्यात दडलेली सांकेतिक गूढे उकलण्यात ओतले.

आनंद कुमारस्वामी हे ज्वलंत राष्ट्रवादाचे प्रवक्ते होते. परंतु त्यांचा राष्ट्रवाद केवळ राजकीय व सामाजिक स्वरूपाच्या तात्कालिक उद्दिष्टांपुरता सीमित नव्हता. पौर्वात्य आध्यात्मिकतेचा आधुनिकतेच्या अतिक्रमणापासून बचाव करणे व पौर्वात्य सांस्कृतिक मूल्यांचे पुनरुज्जीवन करणे, असे त्यांच्या राष्ट्रभक्तीचे स्वरूप होते. ‘खरे राष्ट्रीयत्व म्हणजे आपल्यावर झालेल्या राजकीय अन्यायाचे केवळ परिमार्जन करणे नव्हे जोपर्यंत राष्ट्राच्या सांस्कृतिक एकात्मतेने भारतीय जीवन उत्स्फूर्त होत नाही, तोपर्यंत राजकीय एकात्मतेची जाणीव होऊच शकणार नाही. अशी जाणीव निर्माण करणे हे खरे राष्ट्रीय कार्य होय’ अशा विचाराने भारून सर्व पौर्वात्य देशांचा भूतकाळ खणून काढण्याचे भगीरथ कार्य त्यांनी अचूकतेने व कळकळीने पार पाडले. भारतीय  कलेला जगात आगळे आणि आदरणीय स्थान प्राप्त झाले आहे, ते त्यांनी या क्षेत्रात केलेल्या मूलगामी कार्याचा परिपाक होय.

भारत, ब्रह्मदेश आणि इंडोनेशिया या देशांच्या कोनाकोपऱ्यापर्यंत प्रवास करून कलावस्तूंचा प्रचंड साठा त्यांनी जमविला. भारतात त्यांच्या संशोधनकार्यास आवश्यक त्या सवलती व जमविलेल्या कलावस्तूंचा संग्रह करण्यास योग्य तो प्रतिसाद न मिळाल्याने, तो प्रचंड वस्तुसंग्रह त्यांनी बॉस्टन म्यूझियम ऑफ फाइन आर्ट येथे पाठवून दिला. (१९१७) व त्यांच्या संशोधनकार्यास सर्वतोपरी सवलती उपलब्ध करून दिल्या. तेथेच त्यांनी बहुतेक सर्व महत्त्वाचे संशोधनात्मक लेखन केले. पौर्वात्य संस्कृतितज्ञ, प्रगाढ विद्वान, सौंदर्यशास्त्रज्ञ व  तत्त्ववेत्ते म्हणून डॉ. आनंद कुमारस्वामींचा अधिकार सर्वमान्य आहे.

त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांत पुढील ग्रंथ महत्त्वपूर्ण होत : मेडिईव्हल सिंहलीज आर्ट (१९०८), इ इंडियन क्राफ्ट्‌स्‌मन (१९०९), आर्ट अँड स्वदेशी (१९१०), इंडियन ड्रॉइंग्ज (दोन खंड : १९१०–१२), द आर्ट्‌स अँड क्राफ्ट्‌स ऑफ इंडिया अँड सीलोन (१९१३), मिथ्स ऑफ द हिंदूज अँड बुद्धिस्ट्‌स (१९१४ सिस्टर निवेदिता ह्यांच्या समवेत), विश्वकर्मा (१९१४), विद्यापति, बंगीय पदाली (१९१५ अरुण सेन यांच्यासह), बुद्ध अँड द गॉस्पेल ऑफ बुद्धिझम (१९१६), द डान्स ऑफ शिवा (१९१८), हिस्टरी ऑफ इंडियन अँड इंडोनेशियन आर्ट (१९२७), ए न्यू ऍप्रोच टू द वेदाज (१९३३), द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ नेचर इन आर्ट (१९३४), एलिमेंट्‌स ऑफ बुद्धिस्ट आयकॉनॉग्राफी (१९३५), फिगर्स ऑफ स्पीच ऑर फिगर्स ऑफ थॉट ? (१९४५) व टाइम अँड इटर्निटी (१९४७). त्यांना मुद्रणकलेतही विशेष रुची होती.  ऑक्सफर्ड येथील केल्मस्कॉट प्रेस त्यांनी घेतला होता व स्वत:ची पुस्तके प्रसिद्ध केली. त्यांनी लिहिलेल्या विविध विषयांवरच्या संशोधनात्मक ग्रंथांवरून त्यांच्या अष्टपैलू ज्ञानाचे दर्शन घडते. त्यांनी भारतीय कला व संस्कृती या विषयांत केलेल्या महान कार्याची  जाणीव म्हणून पुणे येथे असलेल्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेने डॉ. आनंद कुमारस्वामी यांना १९३६ मध्ये संस्थेचे माननीय सभासद करून घेतले. अमेरिकेतच मॅसॅचूसेट्‌स राज्यातील नीडम येथे त्यांचे निधन झाले.

संदर्भ : 1. Iyer, K.B. Ed. Art and Thought, London, 1947.  

    2. Raja Singam, S. Durai, Ed. Homage to Dr. Ananda Coomaraswamy, Duala Lumpur, 1947.

सोलापूरकर, वि. मो.