फू सुंग-लिंग : (५ जून १६४०-२५ फेब्रुवारी १७१५). चिनी कथाकार. शँटुंग प्रांतात जन्मला. त्याचे पूर्वज मंगोल किंवा तुर्की असावेत असा अंदाज आहे. आपल्या घराण्याच्या परंपरेनुसार त्यानेही राजसेवेत प्रवेश करण्यासाठी आवश्यक त्या परीक्षा देण्याचा प्रयत्‍न केला. त्यांपैकी प्राथमिक परीक्षेत उत्तम यश मिळवून स्यन्-त्साह ही पदवी त्याने मिळवली. तथापि त्यानंतरच्या परीक्षेत मात्र तो सतत अपयशी ठरला. ललितलेखनाकडेच असलेला त्याचा स्वाभाविक कल हे ह्या अपयशाचे प्रमुख कारण. त्यानंतर कारकुनी, एका श्रीमंत मित्राचे सचिवपद अशी काही कामे करीत असतानाच त्याने ‘ल्याव्-जाय्’(रिकामा वेळ आरामात घालविण्यासाठी ठेवलेल्या दालनातला गृहस्थ) ह्या टोपण नावाने विपुल कथालेखन केले. ल्याव्-जाय्-जृ-र्ट (आराम-दालनात सांगितलेल्या अद्‍भुतकथा) ह्या नावाने त्याच्या कथा संगृहीत असून ह्या संग्रहात एकूण ४३१ कथांचा समावेश आहे. फू सुंग-लिंगच्या काळी कथा हा साहित्यप्रकार चीनमध्ये शिष्टमान्य नसल्यामुळे त्याचा कथासंग्रह त्याच्या हयातीत प्रसिद्ध होऊ शकला नाही तो १७७९ मध्ये प्रकाशित करण्यात आला. त्यातील काही कथा सत्य घटनांवर आधारलेल्या असून काही दंतकथांच्या स्वरूपाच्या आहेत. जवळजवळ सर्वच कथांत अद्‍भुततेचे वातावरण आहे. कोल्ह्याचे सुंदर स्त्रीमध्ये रूपांतर होणे आणि तिने एका पुरूषाला त्याच्या अडचणीतून सोडवणे, हा प्रकार अनेक कथांत आढळतो. सर्व कथांत सत्प्रवृत्त व्यक्तींनी दुष्टांवर विजय मिळविलेला दिसून येतो. त्याच्या कथांची शैली अभिजात आणि काव्यात्म असून तिचे पुढे अनेकांनी अनुकरण केले. फू सुंग- लिंगच्या मृत्यूनंतर ‘कथे’चे महत्त्वही वाढले आणि त्याच्या कथांना फार मोठी लोकप्रियता लाभली. उपर्युक्त कथासंग्रहातील निवडक कथांचे संग्रहही प्रसिद्ध झाले. अशा काही संग्रहांचे इंग्रजी, जर्मन, जपानी आणि रशियन भाषांत अनुवाद झालेले आहेत. स्यींग-श्रृ-यीन्-युआन्-ज्वान् ही गाजलेली कादंबरीही त्याचीच असावी, असे सामान्यतः मानले जाते.

फू सुंग-लिंगचा मृत्यू कोठे झाला, ह्यासंबंधीची माहिती उपलब्ध नाही.

देशिंगकर, गि. द.