रिकेट्‌सिएलीझ : प्राणी व मानव यांत रोग उत्पन्न करणाऱ्याच रिकेट्‌सिया सूक्ष्मजंतूंचा रिकेट्‌सिएलीझ या गणात समावेश होतो. रॉकी मौंटन उत्स्फोटक ज्वर या रोगावर संशोधन करीत असताना एच्. टी. रिकेट्‌स (१८७१−१९१०) या शास्त्रज्ञांनी १९०९ मध्ये या सूक्ष्मजंतूंचा शोध लावला. ठिपक्यासारखे फोड निर्माण करणारा हा ज्वर अमेरिकेतील रॉकी पर्वत प्रदेशात प्रथमतः आढळला. ⇨प्रलाक सान्निपात ज्वर (टायफस ज्वर) हा रिकेट्‌सियामुळेच होतो हेही रिकेट्‌स यांना आढळून आले. हे संशोधन करीत असताना प्रलापक सन्निपात ज्वरामुळेच रिकेट्‌स यांचा मृत्यू ओढवला. त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ या सूक्ष्मजंतूंना रिकेट्‌सिया हे नाव देण्यात आले.

क्लॅमिडीएलीझ गणात मोडणारे क्लॅमिडीया सूक्ष्मजंतू व रिकेट्‌सिया हे जवळजवळ एकसारखेच आहेत. या दोहोंत फरक एवढाच की, रिकेट्‌सियांच्या चयापचय (शरीरात सतत होणाऱ्या भौतिक व रासायनिक घडामोडी) अधिक जटिल असून एटीपीच्या (ॲडिनोसीन ट्रायफॉस्फेटाच्या) संश्लेषणाची क्षमता त्यांमध्ये आढळते. याउलट क्लॅमिडीयांसारखे जटिल विकासचक्र रिकेट्‌सियांमध्ये आढळत नाही.

सूक्ष्मजंतू व व्हायरस यांचे गुणधर्म रिकेट्‌सियात सामावलेले असल्याने दवा म्हणून रिकेट्सिया ओळखले जातात. कोशिका (पेशी) विभाजनातून [⟶ कोशिका] वाढ हे रिकेट्‌सिया व सूक्ष्मजंतू यांतील साधर्म्य, तर निर्जीव संवर्धकावर (वाढीस मदत करू शकणाऱ्या पदार्थांवर) वाढ होण्याची असमर्थता हे रिकेट्‌सिया व व्हायरस यांतील साधर्म्य आहे. रिकेट्‌सिया व व्हायरस यांना वाढीसाठी जिवंत कोशिका आवश्यक ठरतात. याला एक अपवाद म्हणजे ⇨खंदकज्वर या मानवी रोगास कारणीभूत ठरणाऱ्या बोल्बाचिया प्रजातीतील रिकेट्‌सियांची निर्जीव संवर्धकांवर वाढ करण्यात यश प्राप्त झाले आहे. सखोल अभ्यास आणि आधुनिक तंत्रांच्या उपयोगामुळे डीऑक्सिरिबोन्यूक्लिइक अम्ल (डीएनए) आणि रिबोन्यूक्लिइक अम्ल (आरएनए) या दोन्ही ⇨न्यूक्लिइक अम्लांचे अस्तित्व रिकेट्‌सियांच्या कोशिकेत तसेच म्युरॅमिक अम्लाचे अस्तित्व त्यांच्या कोशिकाभित्तीत आढळून आले आहे. त्याचबरोबर रिबोसोमांचे [⟶ कोशिका] व क्रियाशील एंझाइमांचे (जीवरासायनिक विक्रिया घडून येण्यास मदत करणाऱ्या प्रथिनांचे) अस्तित्वही रिकेट्‌सियांत असल्याचे स्पष्ट झाले म्हणून एके काळी व्हायरसांबरोबर वर्गीकृत झालेले रिकेट्‌सिया सूक्ष्मजंतू वर्गात समाविष्ट करण्यात आले मात्र असा समावेश करताना त्यांना परिवतीत सूक्ष्मजंतू असे मानले गेले.

रिकेट्‌सिया हे सूक्ष्मतर असून (व्यास ०·२ ते ०·५ मायक्रॉन, १ मायक्रॉन= १० मी.) त्यांचा आकार शलाकाकार (बारीक काडीसारखा) किंवा गोलाकार असतो. ते ग्रॅमरंजक-अव्यक्त (ग्रॅम यांच्या रंजक-क्रियेतील जाभळसर रंग टिकवून न धरणारे) व अचल असून बीजाणूंची (सूक्ष्म प्रजोत्पादक घटकांची) निर्मिती करीत नाहीत. सूक्ष्म गाळणीतून ते गाळले जात नाहीत.

रिकेट्‌सियांची ३ कुलांत आणि १६ प्रजातींत वर्गवारी केलेली आहे. त्यांची कुलवार व प्रजातीवार नामावली पुढीलप्रमाणे आहे : रिकेट्‌सिएसी कुलात रिकेट्‌सिया, फॉक्सिएला, रोचालिमिया, एर्लिकिया, काऊड्रिएला, निओरिकेट्‌सिया, वोल्बाचिया, सिम्बायोल्टस व रिकेट्‌सिएला या प्रजाती समाविष्ट आहेत.

बार्टोनेलेसी कुलात बार्टोतेल्ला, ग्रॅहॅमेला, हीमोबार्टोनेला, एपिरिथ्रोझोअन या प्रजाती समाविष्ट आहेत, तर ॲनाप्लोझ्मटेसी कुलात ॲनाप्लाझ्मा, पॅरानाझप्लाझ्मा व ईजिप्तिएनेला या प्रजातींचा समावेश आहे.

कोंबडीच्या फलित अंड्यात रिकेट्‌सियांची वाढ होऊ शकते. अंड्यातील या वाढीचा उपयोग रोगप्रतिबंधक लस तयार करण्यासाठी, तसेच रिकेट्‌सियांच्या वर्गीकरणासाठी होतो.

रिकेट्‌सियांचा एक विशेष म्हणजे मानवामध्ये त्यांचा प्रसार कीटक किंवा इतर अपृष्ठवंशी (पाठीचा कणा नसलेले) प्राणी यांच्या माध्यमातून होतो. ऊ, पिसू, गोचीड वगैरे कीटकांत त्याची वाढ होते मात्र या वाढीमुळे कीटकांत रोगोद्‌भव होत नाही.

प्रलापक सन्निपात ज्वर, रॉकी मौंटन उत्स्फोटक ज्वर, क्यू ज्वर, खंदकज्वर वगैरे रोग रिकेट्‌सिएसी कुलातील सूक्ष्मजंतूमुळे होतात [⟶ रिकेट्‌सिया]. बार्टोनेलिसी कुलातील रिकेट्‌सियांची मानव व इतर प्राण्यांच्या रक्तातील तांबड्या कोशिकांत वाढ होते. यांपैकी बार्टोनेला बॅसिलिफॉर्मिसमुळे दक्षिण अमेरिकेच्या वायव्य किनाऱ्यावरील प्रदेशातील मानवांमध्ये ओरोया ज्वर (अतिज्वर व पांडुरोग ही लक्षणे असलेला रोग) आणि उत्स्फोटक रोग (व्हेरुगा पेरुआना) उद्‌भवतात. फ्लेबोटोमस या प्रजातीतील वालुमक्षिकांद्वारे हे सूक्ष्मजंतू वाहून नेले जातात. इतर जाती उंदीर व इतर लहान कृतंक (भक्ष्य कुरतडून खाणाऱ्या) प्राण्यांत आणि काही वेळा पाळीव प्राण्यांत आढळतात.

ॲनाप्लाझ्मटेसी रक्तातील तांबड्या कोशिकांमध्ये वाढ होते. हे सूक्ष्मजंतू गोचिडीवाटे संक्रमित होतात. ॲनाप्लाझ्मा जातींच्या सूक्ष्मजंतूचा प्रसार माश्यांच्या चाव्यांतून व शस्त्रक्रियेत वापरल्या जाणाऱ्यास उपकरणातूंनही होतो. ॲ. मार्जिनेलमुळे ॲनाप्लाझ्मॉसिस हा मारक रोग गुरांमध्ये जगभर आढळतो.

संदर्भ : 1. Fuerst, R. Frobisher and Fuerst’s Microbiology in Health and Disease, Philadelphia, 1983.

2. Pelczar, M. J. Chan, E. C. S. Krieg, N. R. Microbiology, New York, 1986.

3. Stanier, R. Y. Adelberg, E. A. Ingram, J. L. General Microbiology, Englewood Cliffs, N. J.,1985.

भिडे, वि. प. गोडबोले, श्री. ह.