व्हीयाँ, फ्रांस्वा : (१४३१–?). मध्ययुगातील एक श्रेष्ठ फ्रेंच भावकवी. खरे नाव फ्रांस्वा द मोंकॉर्बये वा फ्रांस्वा द लॉझ. जन्म पॅरिस येथे एका गरीब कुटुंबात झाला. तो लहान असतानाच त्याचे वडील वारले. गीयोम द व्हीयाँ नावाच्या एका धर्मोपदेशकाने त्याचे पालन केले. त्याबद्दलची कृतज्ञता म्हणून त्याने स्वतःला फ्रांस्वा व्हीयाँ म्हणवून घेण्यास आरंभ केला. पॅरिस विद्यापीठातून तो. एम्. ए. झाला (१४५२).

शिकत असतानाच मद्यालये, वेश्यागृहे यांची सवय लागून पुढे तो गुन्हेगारीचे जीवन कंठू लागला. १४५५ साली त्याने एका धर्मगुरूचा खून केला. परिणामतः पॅरिसमधून त्याला हद्दपार करण्यात आले पण राजाकडून माफी मिळाल्याने तो पुन्हा पॅरिसला आला (१४५६), असेही म्हटले जाते. १४५६च्या डिसेंबरमध्ये नाताळच्या सुमारास त्याने आपल्या काही साथीदारांसह कॉलेज द्‌ नाव्हारमधून (विद्यार्थि – वसतिगृह) सोन्याची ५०० नाणी चोरल्यामुळे त्याच्यावर पुन्हा एकदा पॅरिस सोडून जाण्याचा प्रसंग आला. ह्याच सुमारास त्याने ‘ल पती तॅस्तामां’ ही आपली प्रसिद्ध कविता लिहिली. ‘ल लॅ’ (इं. अर्थ, द लेगसी) हे ह्या कवितेला स्वतः व्हीयाँने दिलेले नाव. ह्या कवितेचे स्वरूप इच्छापत्रासारखे असून त्यात प्रत्येक ८ ओळींची चाळीस कडवी आहेत. दाहक उपरोध, अगतिकता, चीड यांचे वैशिष्ट्यपूर्ण रसायन या काव्यात्म इच्छापत्रात आढळते. उदा. फौजदारी कोर्टाच्या कारकुनासाठी कवीने कोणाकडेतरी गहाण पडलेली आपली तलवार देऊ केलेली आहे तर कोणाला चोरलेले बदक आणि बेइमान प्रेयसीला आपले हृदय दान केलेले आहे.

पॅरिसमधून पळून गेल्यानंतर व्हीयाँ सु. सहा वर्षे फ्रान्समध्ये भटकत राहिला. ह्या काळात तो ऑर्‌लेआंचा ड्यूक याच्या दरबारी असताना गुन्हेगारीच्या एका प्रकरणात त्याला तुरुंगवास घडला. एका प्रकरणात ऑर्‌लेआंचा बिशप याच्या आदेशावरून त्याला तुरुंगात टाकण्यात आले. तुरुंगाच्या आत-बाहेरच्या या काळात व्हीयाँने ल ग्रां तॅस्तामां हे काव्य लिहिले. दोन हजारांहून अधिक ओळींच्या या प्रदीर्घ कवितेत बॅलड प्रकारातील रचना सर्वाधिक आहेत. हे काव्य म्हणजे कवीच्या गतजीवनाचा पश्चात्तापदग्ध आविष्कार आहे. त्याचप्रमाणे पॅरिसच्या अधोलोकाचे प्रभावी चित्र त्याच्यात आढळते.

पुढील काळात एका मारामारीत सहभागी झाल्याबद्दल व्हीयाँला फाशीची सजा सुनावण्यात आली. त्या शिक्षेच्या छायेत असतानाच त्याने ‘ला बाल्लाद दे पांद्यू’ (इं. अर्थ, बॅलड ऑफ हँग्ड मेन) ही कविता लिहिली. ह्या कवितेत आपण इतर काही जणांसह फासावर लोंबत असल्याची कल्पना त्याने केली आहे. फासावर लोंबकळणाऱ्याकडे पाहून लोकांनी हसू नये, तर त्यांच्यासाठी देवाकडे प्रार्थना करावी, असे तो म्हणतो. परमेश्वराकडे त्याने मानवी ‘न्याया’विरुद्ध गाऱ्हाणे मांडले आहे. व्हीयाँच्या सर्व कवितांमध्ये तसेच मध्ययुगीन फ्रेंच कवितांमध्ये ही रचना सर्वोत्कृष्ट म्हणता येईल.

व्हीयाँच्या अपिलावर त्याची फाशीची शिक्षा रद्द होऊन दहा वर्षांसाठी त्याला पॅरिसमधून हद्दपार करण्यात आले (१४६३). त्यानंतर त्याचे काय झाले, याबद्दल कसलीही माहिती मिळत नाही.

व्हीयाँने मुख्यतः ‘बॅलड’ हा काव्यरचनाप्रकार हाताळला. आविष्कारातील विलक्षण थेटपणामुळेच त्याची कविता वाचकांच्या मनाला भिडते. कवितेच्या घाटाचे त्याला नेमके भान होते आणि रचनातंत्रावर पूर्ण पकड होती. दारुडे आणि वेश्या ह्यांच्या जगाचे जिवंत दर्शन घडविणाऱ्या व्हीयाँने आपल्या आईच्या विनंतीवरून ‘अवर लेडी’ (इं. अर्थ) ही कुमारी मेरीची प्रार्थनाही लिहिली.

थोर फ्रेंच कवी रँबो ह्याने व्हीयाँला शापित कवी म्हटले आहे. काही अभ्यासकांनी ‘ल तॅस्तामां’सारख्या कवितेचे विविधार्थ उलगडण्याचा प्रयत्न केलेला आहे. डँटी गेब्रिएल रोसेटी, स्विन्‌बर्न ह्या इंग्रज कवींनी व्हीयाँच्या कवितांचे इंग्रजी अनुवाद केले आहेत.

ऑग्यूस्त लॉंगनॉन ह्या फ्रेंच अभ्यासकाने व्हीयाँशी निगडित अशी महत्त्वाची ऐतिहासिक कागदपत्रे – विशेषतः न्यायालयाशी संबंधित – प्रकाशात आणल्यामुळे त्याच्याबद्दलची काही माहिती उजेडात आली.

संदर्भ : 1. Bonner, A. Ed. Complete Works of Francois Villon, London, 1960.                                                                         

           2. Chaney, E. F. Francois Villon in His Environment, London, 1946.                                                                                                 3. Fox, J. H. The Poetry of Villon, N. J. 1962.           4. Mackworth, Cecily, Francois Villon, 1900.                                                                                                                                       5. Wyndham Lewis, D. B. Francois Villon : A Documented Survey, 1928. 

कुलकर्णी, अ. र.