हॉल्बर्ग, लूद्व्ही : (३ डिसेंबर १६८४–२८ जानेवारी १७५४). नामवंत स्कँडिनेव्हियन साहित्यिक. जन्म बर्गन (नॉर्वे) येथे. लहानपणीच तो अनाथ झाला पण बर्गनमधील आप्तांच्या आधाराने राहिला. १७०२ मध्ये बर्गन शहर आगीत भस्मसात झाले. त्यानंतर त्याला कोपनहेगन विद्यापीठात शिक्षणासाठी पाठविण्यात आले. हॉल्बर्गला जग पाहायचे होते. त्यामुळे कोपनहेगन विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर तो प्रवासास निघाला (१७०४). तो लंडनला पोहोचला. ऑक्सफर्डलाही त्याला जायचे होते. तेथे गेल्यावर त्याने दोन वर्षे अध्ययन केले. त्याला बासरी आणि व्हायोलिन ही वाद्ये येत होती. ती शिकवून त्याने ह्या दोन वर्षांत स्वतःचा चरितार्थ चालविला. बहुधा ह्याच काळात त्याने आपला ‘इंट्रोडक्शन टू द हिस्टरी ऑफ लीडिंग यूरोपियन नेशन्स’ (इं. शी.) हा ग्रंथ लिहिला तथापि १७११ पर्यंत तो प्रसिद्ध होऊ शकला नाही. ह्या ग्रंथाच्या प्रकाशनाच्या वेळी तो डेन्मार्कमध्ये होता. ह्या ग्रंथाच्या प्रकाशनामुळे त्याला डेन्मार्कचे शाही अनुदान मिळाले. त्यानंतर १७१४ मध्ये तो पुन्हा प्रवासास निघाला. यूरोपमधल्या अनेक शहरांना त्याने मुख्यतः पायी प्रवास करून भेटी दिल्या. १७१६ मध्ये तो डेन्मार्कमध्ये परतला. त्यानंतर त्याने नैसर्गिक कायदे आणि नैसर्गिक हक्क ह्यांवर एक ग्रंथ लिहिला. ह्या काळापर्यंत आर्थिक प्रश्नांनी त्याला ग्रासले होते तथापि १७१७ मध्ये कोपनहेगन विद्यापीठात त्याची प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली. तसेच १७२० मध्ये कोपनहेगन विद्यापीठात वक्तृत्वशास्त्रासाठी असलेल्या अध्यासनावर त्याला नेमले गेले. 

लूद्व्ही हॉल्बर्ग
 

कुठल्यातरी विलक्षण प्रेरणेने हॉल्बर्गने हान्स मिकेलसेन हे टोपणनाव धारण करून विनोदी वाङ्मयाचा एक नवीनच प्रकार निर्माण केला. Peder Paars (१७१९) हे उपहासात्मक महाकाव्य त्याने रचले. डॅनिश साहित्यातील अगदी आरंभीची अभिजात साहित्यकृती म्हणून ह्या महाकाव्याला मान्यता मिळालेली आहे. 

 

१७२२ मध्ये डॅनिश रंगभूमीची कोपनहेगनमध्ये स्थापना झाली आणि हॉल्बर्गने त्या रंगभूमीसाठी सुखात्मिका लिहिण्यास आरंभ केला. आजही ह्या सुखात्मिका ताज्या वाटतात. त्यामुळे अद्यापि त्यांचे प्रयोग होतात. ह्यांपैकी उत्कृष्ट गणल्या गेलेल्या काही सुखात्मिका अशा : सर्व इं. शी. ‘द पोलिटिकल टिंकर’ (१७२२), ‘द वेव्हरर’, ‘जेप्पी अँड द हिल’, ‘द फिजेट’ आणि यूलिसिस फोन इथाका. रोमन सुखात्मिकाकार ⇨ प्लॉटस आणि फ्रेंच सुखात्मिकाकार ⇨ मोल्येर ह्यांचा त्याच्यावर काही प्रभाव असला, तरी त्याच्या सुखात्मिकांचे सत्त्व डॅनिशच आहे. त्याच्या सुखात्मिकांमधला उपरोधाचा रोख जसा तत्कालीन परिस्थितीकडे, तसाच तो सर्वव्यापित्वाकडेही आहे. त्याने डॅनिश रंगभूमीसाठी त्याची अखेरची नाट्यकृती लिहिली (१७२७) कारण आवश्यक तेवढ्या निधीच्या अभावी ही रंगभूमी बंद करावी लागली. हॉल्बर्गच्या अखेरच्या सुखात्मिकेचे ‘फ्यूनरल ऑफ डॅनिश कॉमेडी’ (इं. शी.) हे नावही प्रसंगोचित होते. १७३१ मध्ये त्याने प्रयोग झालेल्या आपल्या सुखात्मिकांत आणखी पाच सुखात्मिकांची भर घालून त्या प्रसिद्ध केल्या. 

 

त्यानंतर हॉल्बर्ग अन्य लेखनप्रकारांकडे वळला. उदा., द जर्नी ऑफ नील्स क्लीम टू द वर्ल्ड अंडरग्राउंड (१७४१, इं. भा.) ह्या त्याच्या उपरोधप्रचुर कादंबरीतील काल्पनिक जलपर्यटन. १७४७ मध्ये त्याला ‘बॅरन’ करण्यात आले. 

 

कोपनहेगन येथे तो निधन पावला. 

कुलकर्णी, अ. र.