गोतिए, ते ऑफील : (३१ ऑगस्ट १८११ — २३ ऑक्टोबर १८७२). फ्रेंच कवी, कादंबरीकार, पत्रकार आणि कलासमीक्षक. जन्म तार्ब, गॅस्कनी येथे. शिक्षण पॅरिसमध्ये. काही काळ चित्रकलेचा अभ्यास व त्या कलेची उपासना. नंतर १८३० पासून साहित्याची सेवा पण साहित्यातही चित्रकलेचा प्रभाव जाणवतो. सुरुवातीस स्वच्छंदतावादी संप्रदायाचा पुरस्कर्ता व व्हिक्टर ह्यूगोचा प्रशंसक. ह्यूगोच्यायॅर्नानी ह्या नाटकाच्या गाजलेल्या पहिल्या प्रयोगाच्या वेळी ह्यूगोला संपूर्ण पाठिंबा दिला (१८३०). ह्याच काळात त्याने पोयेझी (१८३०), आल्बेर्त्यूस (१८३२, दीर्घकाव्य), ले जन-फांस (विनोदी कथा), ले ग्रोतेस्क (१८३५, जुन्या फ्रेंच साहित्यिकांचा परिचय) व माद्‌म्वाझेल द् मोपँ (१८३५,कादंबरी) हे ग्रंथ लिहिले. मादम्वाझेल द् मोपँ ह्या उत्तान शृंगाराने भरलेल्या कथेस बरीच प्रसिद्धी मिळाली. मध्यम वर्गीयांच्या नैतिक मूल्यांना जबरदस्त धक्का देणाऱ्या ह्या कादंबरीच्या प्रस्तावनेत गोतिएने ‘कलेसाठी कला’ ह्या तत्त्वाचा पुरस्कार केला आणि समाज, नीती, विज्ञान व राजकारण ह्यांसंबंधी साहित्याच्या संदर्भात पूर्ण अनास्था व्यक्त केली. ‘जे सुंदर तेच शिव जे असुंदर ते अमंगल’. ‘जे अत्यंत निरुपयोगी असते, तेच खरोखर असते’. एमो ए कामे (१८५२) ह्या त्याच्या सर्वोत्कृष्ट काव्यसंग्रहात त्याची भूमिका प्रकर्षाने प्रत्ययास येते. विशेषतः १८५७ मध्ये त्यात अंतर्भूत केलेली ‘लार’ ही कविता म्हणजे गोतिएच्या तत्त्वाचा जाहीरनामाच होय : ‘ही मऊ मऊ चिकणमाती काय कामाची ? हा दुर्लभ कठीण पाषाणच तुझ्या स्वप्नाला चिरंतन घाट देईल. सर्व काही नाशिवंत आहे. श्रेष्ठ कला तेवढी अमर आहे. शहरे उद्ध्वस्त होतात पण दगडाची मूर्ती टिकून राहते’. चित्रकलादी ललितकला व साहित्य यांच्या एकात्मतेवर गोतिएने भर दिला. काव्यातील वस्तुनिष्ठतेचा आणि संयमित अभिव्यक्तीचा पुरस्कार करणाऱ्या पार्‌नेसिअन काव्यसंप्रदायाने गोतिएच्याच काव्यापासून स्फूर्ती घेतली. ल रोमां द ला मोमी (१८५८, इं. भा. द ममीज रोमान्स, १९०८) आणि ल कापितॅन फ्राकास (१८६३) ह्या त्याच्या आणखी काही कादंबऱ्या. गोतिएने क्रोनीक द् पारी, ल मॉनितर, ला प्रेस ह्या नियतकालिकांसाठी कलासमीक्षक म्हणून काम केले. ला रव्ह्यू द पारी आणि लार्तीस्त ह्यांचे संपादनही केले. त्याचे दर्जेदार लेखन ले बोझार आनरोप (२ खंड, १८५५), लार मॉदॅर्न (१८३५), इस्त्वार द लार द्रामातीक दपुई व्हँ-सँका (६ खंड, १८५६) ह्या ग्रंथांत संगृहीत आहे. त्याने काही उत्कृष्ट प्रवासवर्णनेही लिहिली आहेत. उदा., व्होयाज आनेस्पाग्न्य (१८४५), काप्रीस ए झिग-झाग (१८४५), व्होयाज आनिताली (१८५२), व्होयाज आंऱ्यूसी (१८६६). नयी येथे तो निधन पावला.

सरदेसाय, मनोहरराय