नितल जीवसमूह : (बेंथॉस). खोल सागरात राहणारे सजीव (प्राणी व वनस्पती) सर्वसाधारणपणे नितल जीवसमूहात येतात. या जीवसमूहात मोठ्या प्रमाणावर विविधता आढळून येते. सागराच्या तळाशी आढळून येणाऱ्या रासायनिक व इतर फरकांमुळे ही विविधता दिसून येते. नितल जीवसमूहात (अ) फक्त पुनरुत्पत्तीसाठी, अन्नासाठी व विश्रांतीसाठी तळाशी जाणारे प्राणी, (आ) जवळजवळ सर्व आयुष्य पाण्याच्या तळाशी कंठणारे प्राणी व (इ) वाळूमध्ये अगर खडकांमध्ये नलिका करून राहाणारे प्राणी असे प्रमुख गट आढळतात.

नितलाचे समुद्रतटीय व अगाधीय असे दोन भाग आहेत. समुद्रतटीय भाग पाण्याच्या पृष्ठभागापासून सु. २०० मी. पासून सु. ५ ते ६ हजार मी. पर्यंत अगाधीय भाग असतो. समुद्रतटीय भागात सूर्याचे प्रकाशकिरण पोहोचतात. अगाधीय भागामध्ये सूर्यकिरण पोहोचू शकत नाहीत.

समुद्रतटीय भागाचा विस्तार भरतीच्या पाण्याच्या मर्यादेपासून सु. ४०० किमी. पर्यंत व २०० मी. खोल असा समजला जातो. या विभागामध्ये सु. ६० मी. पर्यंतच्या भागात जलवनस्पतींची वाढ फार मोठ्या प्रमाणावर आढळून येते. या भागाला सत्य-समुद्रतटीय भाग म्हणतात. पाण्यामधील लवणांचे ऋतुमानाप्रमाणे कमीजास्त होणारे प्रमाण व भोवतालच्या वातावरणातील बदल यांना अनुसरून विविध प्रणिसृष्टी या भागात आढळते. पाण्याची खोली व उपलब्ध अन्न यांमुळेही प्राण्यांच्या शरीररचनेमध्ये फरक आढळून येतात. पाण्याच्या तळपृष्ठावर सरपटणारे मृदुकाय प्राणी, खंडयुक्त कृमी, काही जातींचे खेकडे, तसेच नलिकांमधून राहणारे खंडयुक्त कृमी, एकाच जागी राहणारे प्रवाळ, ब्रायोझोआ, समुद्रनलिनी यांसारखे प्राणीसुद्धा या विभागात आढळतात. हे प्राणी फार संवेदनाक्षम असतात.

भरती व ओहोटी यांच्या दरम्यानच्या प्रदेशात अनेक प्रकारचे खडक असतात. या खडकांमध्ये अनेक लहानमोठे खोल भाग तयार होतात. या भागातील पाणी प्रत्येक भरतीच्या वेळी बदलले जाते. पाण्यातील निरनिराळ्या लवणांचे प्रमाण बहुतकरून सारखेच असते. या ठिकाणी स्पंज, समुद्रफूल, कवचधारी संधिपाद प्राणी, झिंगे, शेवंडे, खेकडे, अनेक प्रकारच्या गोगलगाई, कालवे वगैरेंसारखे प्राणी आढळतात.

काही खडक हे नेहमी पाण्यातच असतात. त्यांच्यावर सभोवतीच्या वातावरणाचा काही परिणाम होत नाही. फक्त लाटांचा काय परिणाम होत असेल तेवढाच. येथे शैवलांची वाढ खूप मोठ्या प्रमाणावर होते व शैवलांच्या अनुषंगाने राहणारे स्पंज, मृदुकाय प्राणी, खंडयुक्त कृमी, नेमर्टिन प्राणी, ऑसिडियन प्राणी, कवचधारी प्राणी, एकायनोडर्म प्राणी विपुल प्रमाणात सापडतात.

काही खडक भरतीच्या वेळीसुद्धा पाण्यात बुडत नाहीत. या खडकांवरील जीवसृष्टीवर सभोवतालच्या वातावरणाचा ताबडतोब परिणाम होतो. खडकाच्या समुद्राकडील भागाला भरतीच्या वेळी लाटांमुळे पाण्याचा पुरवठा होत असतो. खडकाच्या भागावर नीरिजासारखे खंडयुक्त कृमी, खेकडे, तारामीन, समुद्री अर्चिन व लहान लहान मासे आढळतात. विरुद्ध बाजूच्या भागाला ओहोटीच्या वेळी आत जाणाऱ्या पाण्याचा पुरवठा होतो. या ठिकाणी प्राणी थोड्या प्रमाणात आढळतात.

नितलाच्या वालुकामय प्रदेशात राहणारे प्राणी जरा निराळ्या प्रकारचे असतात. हे प्राणी वाळूमध्ये बिळे करून अगर शरीरातून स्त्रवणाऱ्या द्रावाच्या साहाय्याने वाळूच्या नलिका तयार करून त्यांमध्ये राहतात. त्यांच्या जीवनावर हवामानाचे बदल, लवणांतील बदल ताबडतोब परिणाम करतात. सागरातील शैवले व इतर वनस्पतींच्या कुजण्यामुळे तयार होणाऱ्या कार्बनी (सेंद्रिय) पदार्थांवर या प्राण्यांची उपजीविका चालते. कालव, अँफिऑक्सस वगैरे प्राण्यांना अन्न मिळविण्यासाठी पक्ष्माभिकांचा (द्रव पदार्थात प्रवाह उत्पन्न करणाऱ्या पेशींपासून निघालेल्या केसासारख्या वाढींचा) उपयोग होतो.

काही प्राणी सागराच्या तळाशी असणाऱ्या चिखलात राहतात. या चिखलामध्ये कार्बनी पदार्थ फार मोठ्या प्रमाणावर असतात. या ठिकाणी आदिजीव, गोलकृमी. खंडयुक्त कृमी, कवचधारी संधिपाद प्राणी, समुद्रफूल वगैरे प्राणी आढळतात.

सागराच्या खोल भागात पाण्याच्या लाटांमुळे होणारे परिणाम दृष्टोत्पत्तीस येत नाहीत. जीवनाचा ओघ संथपणे चाललेला असतो. येथे प्रकाशकिरणांचा प्रवेश होऊ शकत नाही. ए. सी. एल्. जी. ग्यूंटर या शास्त्रज्ञांच्या मताप्रमाणे या ठिकाणी लहान लहान मासे सापडतात. या प्रदेशात सापडणाऱ्या मृदुकाय प्राण्यांचे कवच ठिसूळ असते. प्राणी अनेक रंगांचे असतात. या ठिकाणी वनस्पतींची वाढ होत नाही. यामुळे हे प्राणी उपजीविकेसाठी एकमेकांवर अवलंबून असतात. नॉटिलस, व्हीनसची पुष्पपरडी वगैरेंसाठी प्राणी या भागात आढळतात.

पहा : जीवविज्ञान, सागरी.

पुरोहित, प्र. आ.